आम्ही कोण?
ले 

एक ते नगरसेवक होते, आणि एक आजचे नगरसेवक आहेत

  • हेरंब कुलकर्णी
  • 13.01.26
  • वाचनवेळ 4 मि.
corporator mahatma phule

महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि नगरसेवक होण्यासाठीची धडपड कोणत्याही टोकाला जाते आहे. अशावेळी महाराष्ट्रातील एका विशेष नगरसेवकाची आठवण होते. त्या नगरसेवकाचं नाव होतं ज्योतिराव गोविंदराव फुले. होय, पुणे नगरपालिका १८५८ साली सुरू झाल्यानंतर १८७६ ते १८८२या कालावधीत ज्योतिराव फुले यांची पुणे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली होती.

त्या काळात नगरपालिकेमध्ये कनिष्ठ वर्गाचे प्रतिनिधी नसल्याने गरिबांच्या वस्तीकडे नगरपालिका लक्ष देत नसे (आजही तेच आहे ) त्या वस्तीला वीज, पाणी, आरोग्य या सुविधा देताना भेदभाव होत असे. महात्मा फुलेंनी तिथपासून सुरुवात केली. अर्थसंकल्प तपासणीच्या समितीवर त्यांची निवड झाली होती. पन्नास रुपयाचा एक कारकून नेमण्याऐवजी ३० रुपये व २०रुपयांचे दोन कारकून नेमावेत असा बचतीचा सल्ला त्यांनी नगरपालिकेला दिला होता. बुधवार वाडा येथे ग्रंथालयाच्या खोल्या बांधण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले..

इंग्रजांच्या बाबतीत महात्मा फुले सौम्य भूमिका घेत अशी टीका त्यांच्यावर काहीजण करतात. पण १८८० साली हिंदुस्तानचे महाराज्यपाल लिटन पुण्यामध्ये येणार असल्याने शहराची सजावट करण्यासाठी नगरपालिकेने त्या काळी १००० रुपये (आजचे कित्येक लाख) खर्च करायचं ठरवलं आणि सदस्यांची परवानगी मागितली. ३२ पैकी ३१ सदस्यांनी परवानगी दिली. पण ही सजावट न करता ती रक्कम गरिबांच्या शिक्षणासाठी वापरा, असा सल्ला देत या उधळपट्टीला विरोध करणारे एकमेव नगरसेवक ज्योतिराव फुले होते. ही महात्मा फुलेंची गरिबांविषयीची कळकळ होती.

पुणे शहराला शुद्ध पाणी मिळावे म्हणून पाण्याचा साठा करून तलाव बांधावा व तलावाला फिल्टर लावून स्वच्छ पाणी द्यावे, असे नगरपालिकेने मंजूर केले. झगड्याचे वाड्याजवळ सातारा रोडला तलाव बांधला जात होता. बांधकाम बघण्यासाठी ज्योतिराव फुले नियमितपणे तिथे जात होते पण बांधकाम दर्जेदार होत नव्हते. चीन जसा लावायला पाहिजे तसा लावला जात नव्हता. त्यामुळे पाण्याचा साठा नीट होणार नाही, पाणी झिरपले जाईल व लोकांना फिल्टरचे पाणी मिळणार नाही, असे त्यांच्या लक्षात आले.

फुले यांनी ही तक्रार कमिटी पुढे मांडली. पण कमिटीतले मेंबर ठेकेदाराच्या बाजूचे होते. काम चांगले चालले असल्याचे ते म्हणाले.

पण शेवटी फुले म्हणाले तसेच झाले. पाणी साठले गेले नाही. शहरातल्या लोकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळाले नाही. फुले किती गंभीरपणे सार्वजनिक काम करत होते याचे आणि ठेकेदारांना संरक्षण देणारे लोकप्रतिनिधी तेव्हाही होते याचे हे उदाहरण.

नगरसेवक म्हणून महात्मा फुलेंनी दारू दुकानांना विरोध केला होता. पुणे शहरात त्यावेळी दारूचे चार गुत्ते होते. ते वाढवून दहा करण्यासाठी नगरपालिकेने परवानगी दिली. तेव्हा महात्मा फुलेंनी त्याला कडाडून विरोध केला. दारूच्या गुत्त्यांना परवानगी द्यायची असेल तर त्या दुकानांवर कर बसवा अशी आग्रही मागणी धरून त्यांनी संघर्ष केला. महात्मा फुले म्हणतात, ‘नगरपालिका बराच खर्च करून एकीकडे आरोग्य संभाळण्याची कामे करते आणि दुसरीकडे दारू दुकानांना परवानगी देते, हे योग्य नाही. भर वस्तीत दारूचे गुत्ते उघडल्यामुळे लोकांच्या नैतिक अधोगतीची सर्व प्रकारची बीजे पेरली जात आहेत. त्यामुळे शहराचे आरोग्य संभाळणे या नगरपालिकेच्या उद्देशाला बाधा येत आहे. तेव्हा नगरपालिकेने ही दारूदुकाने ते ज्या प्रमाणात हानी करतात, तितका कर त्यांच्यावरू बसवावा..’ दुर्दैवाने, लोक विषारी दारू पितात म्हणून त्यांना शुद्ध दारू दिली पाहिजे, हा आज दिला जाणारा युक्तिवाद तेव्हाही केला गेला आणि पुणे शहरात दहा दारूचे गुत्ते सुरू झाले.

१८७४ साली पुण्यात पंधरा हजार सहाशे गॅलन दारू विकली जात होती ही आकडेवारी धक्कादायक आहे.. आजही दुर्दैवाने महाराष्ट्र सरकार ३२८ नवी दारूची दुकाने वाटत आहे आणि फुले यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होताना हे निर्णय होतात आहे हे दुःखद आहे...

आजची मंडई बांधण्यासाठी मोठा खर्च करायलाही महात्माफुलेंनी विरोध केला होता. ती बांधण्याऐवजी गरिबांच्या शिक्षणासाठी खर्च करा अशी भूमिका त्यांनी मांडली. तिथे जे भाजी विक्री करतात त्यांच्यावर जादा कर लावू नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

एक प्रामाणिक अधिकारी निवृत्त होताना त्याला नगरपालिकेने २०० रुपयांचं घड्याळ भेट द्यावं अशी सूचना फुलेंनी केली होती. प्रत्येक गोष्टीत संघर्ष केल्यानंतर त्यांच्याविषयी अधिकाऱ्यांनी डूख धरलं. नगरपालिकेने मैला टाकण्याची कुंडी फुले यांच्या घराजवळ बसवून त्यांना त्रास देण्याचाही प्रयत्न केला. पण तरीही महात्मा फुले आपलं कर्तव्य बजावत राहिले. गरिबांविषयी निष्ठा असेल तर एक नगरसेवक प्रामाणिकपणे किती प्रभावी काम करू शकतो याचं महात्मा फुले हे उदाहरण होतं.

आज निवडणुकीत होणारा खर्च, एकमेकांवर ओकली जाणारी गरळ, नगरसेवक होण्याच्या प्रेरणा आणि उमेदवारांच्या कोलांट्याउड्या बघितल्यावर महात्मा फुले नावाचे नगरसेवक ही दंतकथा वाटायला लागते.

हेरंब कुलकर्णी | 8208589195 | herambkulkarni1971@gmail.com

हेरंब कुलकर्णी हे निवृत्त प्रयोगशील शिक्षक, तसंच वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी झगडणारे कार्यकर्ते आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

ईश्वर बनसोडे17.01.26
खुप सुंदर लेख! दिडशे वर्षापुर्वी सुद्धा महात्मा फुलेंचे विचार किती प्रागतिक व गोरगरीबांविषयी कनवाळु होते हे प्रस्तुत लेखातुन समजले. धन्यवाद!🙏

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results