
१९२९मध्ये लाहोरला काँग्रेसचं अधिवेशन भरलं. या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्य मागण्याचा आणि सविनय कायदेभंगाची चळवळ करण्याचा निर्णय झाला. नेतृत्व अर्थातच गांधीजींकडे होतं. मात्र चळवळ नेमकी कोणत्या मागणीसाठी करायची हे निश्चित केलं गेलं नव्हतं.
सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावर चळवळ करण्याचं तंत्र गांधीजींनी विकसित केलं होतं. लोकांचा प्रश्न हाती घेतला तर लोक भरभरून प्रतिसाद देतात, हे एव्हाना त्यांना कळलं होतं. आता ते अशाच प्रश्नाच्या शोधात होते.
१९३०च्या फेब्रुवारी महिन्यात त्यांनी व्हॉइसरॉयना एक पत्र लिहिलं आणि त्यात इतर काही मागण्यांसोबत मिठावर वाढवलेला कर कमी करावा, अशी मागणी केली. ही मागणी मान्य केली नाही तर सत्याग्रह करून कायदा मोडू, असंही कळवलं.
गांधीजींच्या या पत्राकडे व्हाइसरॉयने सपशेल दुर्लक्ष केलं. त्यांना मिठाच्या कायद्यासह कोणत्याही मागण्यांमध्ये राजकीयदृष्ट्या धोका वाटला नाही. गंमत म्हणजे अनेक भारतीय नेत्यांनाही गांधीजींच्या या मागणीत दम वाटला नाही. या मुद्द्यावर चळवळ केल्याने हाती काही लागेल, असं त्यांना वाटत नव्हतं. पण गांधीजी आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी साबरमती आश्रम ते दांडीचा समुद्रकिनारा अशी दोनशे किलोमीटरची पदयात्रा करायची असं ठरवलं. या यात्रेच्या तयारीची जबाबदारी त्यांनी सरदार पटेलांवर सोपवली.
१२ मार्च १९३० रोजी गांधीजी आपल्या निवडक ७९ सत्याग्रहींसमवेत साबरमतीहून निघाले. या यात्रेत सर्व पुरुष सत्याग्रही होते. त्याबद्दल टोकलं असता महिलांवर आणखी मोठ्या पराक्रमाची जबाबदारी सोपवली जाणार आहे, असं गांधीजी म्हणाले. पण ती कोणती याचा खुलासा मात्र केला नाही.
अहमदाबाद ते दांडी या प्रवासात लागणाऱ्या गावांमध्ये त्यांनी सभा घेतल्या, भाषणं केली, जनजागृती केली, सत्याग्रहात सहभागी होण्याचं आवाहन केलं. गावोगावी शेकडो लोक या पदयात्रेत सामील होत गेले. सुमारे तीन आठवडे चालत प्रवास करून पदयात्रा ५ एप्रिलला दांडीत पोहोचली तेव्हा तिथे हजारो लोक होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी जनसागराच्या साक्षीने गांधीजींनी मिठागारातलं मीठ उचललं आणि मिठाचा कायदा प्रतिकात्मकरीत्या मोडला. ही कृती करेपर्यंत ब्रिटिशांनी या पदयात्रेकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नव्हतं. सरदार पटेल वगळता कुणाला अटकही केली नव्हती. एरवी खुट्ट झालं की गांधीजींना पकडलं जात असे. यावेळेस गांधीजींकडे दुर्लक्ष केलं गेलं. सरकार लक्ष देत नाही म्हटल्यावर गांधीजींनी सरकारी मिठागर लुटण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे लोकांना कृती करण्याचा कार्यक्रम मिळाला. आतापर्यंत मागे थांबलेल्या महिला पुढे आल्या. दांडीपासून जवळच असलेल्या धरासणा मिठागारावर लोकांनी धाड टाकली.
त्यानंतर मात्र लगोलग गांधीजींना अटक केली गेली. त्यांनी चळवळीचं नेतृत्व अब्बास तय्यबजींकडे सोपवलं. पुढे त्यांनाही अटक झाली. दरम्यान धरासणा सत्याग्रहाचं केंद्र बनलं. तिथे सरोजिनी नायडूंच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह सुरू झाला. पोलिसांनी हा सत्याग्रह अमानुषपणे मोडून काढण्याचा प्रयत्न केला. सत्याग्रही कायदा मोडण्यासाठी पुढे आले की पोलिस त्यांच्यावर तुटून पडत. त्यांच्या छातीवर, डोक्यावर प्रहार करत. सत्याग्रही रक्तबंबाळ होत, त्यांची हाडं तुटत, कवट्यांना मार बसे. अनेकांना अशा अवस्थेत मिठाच्या पाण्यात ढकललं जाई.
त्यामुळे आणखीनच वेदना होत. या क्रूर हिंसेत चारजणांना प्राणही गमवावे लागले.
पण या सत्याग्रहात एकाही माणसाने प्रतिकार केला नाही. ते फक्त जुलूम सहन करत राहिले. त्यांचं हे शौर्य पाहून देशभर लोक सत्याग्रहात सहभागी होऊ लागले. मुंबईपासून बंगाल-बिहारपर्यंत सारा भारत या चळवळीत उतरला. आज पाकिस्तानात असलेल्या कराचीतही निदर्शनं झाली. पेशावर शहरातही सत्याग्रहाच्या समर्थनार्थ मिरवणूक निघाली. त्यात पोलिसांनी बेछूट गोळीबार करून प्रेतांचा खच तयार केला. तिथे सत्तर लोक मारले गेले.
या सत्याग्रहात भारतीयांनी आपल्यातील असीम धैर्याचं दर्शन घडवलं. असहकार आंदोलनात जसा हिंसाचार झाला होता, तसं आता झालं नाही. या आंदोलनातील महिलांच्या सहभागामुळे त्यांचा सार्वजनिक जीवनातील वावर खुलेपणाने सुरू झाला.
अखेरीस देशाचा निश्चय पाहून इंग्रजांनी माघार घेतली आणि मिठावरचा कर रद्द केला. अहिंसात्मक मार्गाने इंग्रजांना नमवता येतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
चळवळीच्या सुरुवातीच्या टप्प्यात इतरांप्रमाणेच मोतीलाल नेहरूही साशंक होते. यातून काय साध्य होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या सहा पानी पत्राला गांधीजींनी तीन शब्दांत उत्तर दिलं होतं. त्यांनी लिहिलं होतं : ‘कर के देखो!' या अजब पत्रामुळे मोतीलाल नेहरू नाराज झाले, पण त्यांनी आपणही मिठाचा कायदा मोडणार आहोत, अशी सूचना कलेक्टरला दिली. त्याक्षणी त्यांना अटक करण्यात आली. त्यावरून त्यांना या सत्याग्रहाचं महत्त्व लक्षात आलं. आपली चूक मान्य करत त्यांनी गांधीजींना पत्र पाठवलं. त्यात लिहिलं होतं : करने से पहले ही देख लिया!
या चळवळीत जे अनेक हृद्य प्रसंग घडले त्यातल्या एकामुळे गांधीजींच्याही आयुष्याला नवं वळण लाभलं. एका गावी १०५ वर्षांच्या आजी गांधीजींना भेटण्यास उत्सुक असल्याचं त्यांना कळलं. गांधीजी स्वत: त्यांच्या घरी गेले आणि पाया पडले. आशीर्वाद मागितला. त्या म्हणाल्या, “स्वराज्य मिळवून लवकर परत या.” गांधीजींनी जाहीर केलं की, ‘कावळ्याच्या मौतीने मरेन, स्वराज्याचा घोष करत भटकत मरून जाईन; पण स्वराज्य मिळवल्याशिवाय साबरमती आश्रमात पाऊल ठेवणार नाही.'
आणि खरोखरच ते पुन्हा साबरमतीला गेले नाहीत. त्यांनी आपला मुक्काम वर्ध्यात हलवला आणि सेवाग्राममध्ये आश्रम उभारून तिथून स्वातंत्र्य चळवळीची सूत्रं हलवायला सुरुवात केली.
अशा रीतीने दांडीयात्रा भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवून गेली.
("असे होते गांधीजी" या समकालीन प्रकाशनाच्या पुस्तकातून साभार)
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.