
‘श्यामची आई’ चित्रपटातील छोट्या श्यामच्या भूमिकेने मराठी रसिकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य समीक्षक माधव वझे यांचं बुधवारी, सात मे रोजी निधन झालं. घडणीच्या काळातल्या पुण्याच्या आठवणी त्यांनी ‘पुण्यभूषण’ दिवाळी अंकात लिहिल्या होत्या. तो लेख इथे पुनर्प्रकाशित करत आहोत.
माझं सारं लहानपण शनिवारवाड्याच्या परिसरातच गेलं. कारण आमचं घरच मुळी शनिवारवाड्यासमोर होतं. पुण्याच्या इतिहासात शनिवारवाडा ही एक अत्यंत महत्त्वाची वास्तू आहे. शाळेत इतिहास विषय शिकत असताना त्याचा वारंवार उल्लेख येत असे. त्यामुळे शनिवारवाड्यासमोर रहाणं हे अभिमानास्पद वाटत असे. मित्रांशी बोलताना आमच्या घरासमोर शनिवारवाडा आहे असं मी मिरवत असे. आमचा वाडा मोठा होता, तीन मजली. घराच्या खिडकीतून, दारातून शनिवारवाडा, त्याचा भव्य दरवाजा दिसायचा. सकाळ-संध्याकाळ तो उघडताना, बंद करताना त्याचे भलेमोठे अडसर दिसत असत. शनिवारवाड्याच्या मागे नाना फडणीसांचा वाडा, एका बाजूला आबासाहेब मुजुमदारांचा वाडा, पलीकडे सरदार बावडेकरांचा वाडा, आमच्या घराच्या पलीकडे सरदार पुरंदऱ्यांचा वाडा असे भोवताली सगळे पेशव्यांच्या सरदारांचे वाडे आणि मधोमध मखरात असावा असा शनिवारवाडा.
शनिवारवाड्यासमोर त्यावेळी तीन मोठी पटांगणं होती. शाळा सुटली की आम्ही खेळायला तिकडेच असायचो. क्रिकेट, लपाछपी आणि कितीतरी खेळ. शनिवारवाड्यात लपायला भरपूर जागा होत्या. जिने होते, कोपरे होते. याच जागा प्रेमिकांना भेटण्यासाठी म्हणून सुद्धा वापरल्या जायच्या. आमचं घर समोरच असल्यानं मला मात्र या कारणासाठी शनिवारवाडा उपयोगाचा नव्हता.
तिथे एक वडाचं मोठ्ठं झाड होतं. त्याच्याखाली मस्तानीची कबर आहे असं त्यावेळी सगळे सांगत असत. त्या झाडाभोवती थोडंसं भीतिदायक वातावरण होतं. त्या झाडाखाली रोज कोणीतरी कंदील लावून जात असे. तो कोण लावत असे ते काही कळायचं नाही. त्यामुळे एक प्रकारचं गूढ वातावरण तिथे असे. तसंच संध्याकाळच्या वेळी वाड्यामध्ये ‘काका, मला वाचवा' अशा आरोळ्या शनिवारवाड्यात ऐकू येतात, असंही सगळे म्हणत असत. आम्ही भावंडांनी, मित्रांनी अनेकवेळा जाऊन तसं काही ऐकू येतं का हे बघितलं, पण नाही. ती केवळ अंधश्रद्धा होती हे कळायला बराच वेळ लागला.
शनिवारवाड्याचा बाकी परिसर मात्र रमणीय होता. तिथे सतत काही ना काही चालू असे. बाहेरच्या पटांगणात गारुड्याचे, दरवेशांचे खेळ चालत. शनिवारवाड्यावरच्या सभा त्याकाळात प्रचंड गाजत. आचार्य अत्रे, कॉ. डांगे, यशवंतराव चव्हाण अशा अनेक नामवंत वक्त्यांची भाषणं तिथे ऐकायला मिळाली. शनिवारवाड्याशिवाय पुण्यात इतरही अनेक ठिकाणी, शिवाजी मंदीर, केसरीवाडा इथे, भाषणं, सभा, चर्चा असे कार्यक्रम सुरू असत. ते ऐकायची आम्हाला सक्ती असे. सकाळीच वडील सांगत, आज संध्याकाळी अमूक अमूक ठिकाणी सभा आहे. तिथे अवश्य जा. त्यात टाळाटाळ करून चालत नसे. कारण रोज रात्री जेवताना त्याची तपासणी होत असे. शिवाय एरवी सुद्धा जेवताना त्या त्या दिवशी नवीन काय ऐकलं, वाचलं, पाहिलं याविषयी वडील सगळ्या भावंडांना विचारत असत.
पुण्यात बहुतांशी घरांमध्ये त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती. तशीच ती आमच्याही घरात होती. माझे आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, आम्ही सख्खी आणि चुलत भावंडं असे सगळे एकत्र रहात असू. व्याख्यानात बघितलेल्या, ऐकलेल्या वक्त्यांची, शनिवारवाड्यावर येणाऱ्या गारुड्यांची आणि दरवेशांची नक्कल करायची मला सवय लागली होती. त्या नकला मी चांगल्या करत असे. त्यामुळे घरी कोणी पाहुणे आले की मोठी माणसं मला त्यांच्यासमोर नकला करून दाखवायला सांगायची. ‘श्यामची आई' चित्रपटासाठी अत्रे मला बघायला आमच्या घरी आले, तेव्हाही मी असंच काहीतरी त्यांना करून दाखवलं होतं. श्यामच्या भूमिकेसाठी माझी निवड त्यामुळेच झाली असावी.
त्यावेळी घरी केसरी हे वर्तमानपत्रं येत असे. केसरीतला अग्रलेख वाचण्याची सवय वडिलांनी आम्हाला लावली. त्यातले काही विशेष शब्द, वाक्यरचना टिपून ठेवायला ते सांगत असत. त्यामुळे आमची मराठी भाषा समृद्ध होत गेली. आमच्या घरात अनेक पुस्तकं होती. शिवाय गावात अनेक चांगली वाचनालयं होती. नगर वाचन मंदिर, मंडईमधलं किताबमिनार, पुणे मराठी ग्रंथालय वगैरे. लोक नियमितपणे तिथे हजेरी लावत असत. टिळक स्मारक मंदिराचं एक वाचनालय होतं. पण तिथे जास्त करून मोठे ग्रंथ ठेवलेले असत. शिवाय शाळांमध्ये उत्तम ग्रंथालयं असत. घरात ग्रंथसंग्रह असणं हे घराचं भूषण समजलं जाई. पुस्तकांची दुकानंसुद्धा मोठमोठी होती. इंटरनॅशनल बुक डेपो, व्हीनस बुक स्टॉल, डेक्कन बुक स्टॉल अशी अनेक दुकानं होती.
गणपती उत्सव अत्यंत सात्विक पद्धतीनं साजरा होत असे. त्या काळात पुण्यात मेळे होत असत. अनेक कलावंत आपली कला त्यात सादर करत असत. गाणी होत असत. सुधीर फ़डक्यांचं गाणं मी पहिल्यांदा त्यात ऐकलं होतं. चर्चा, परिसंवाद होत असत. अतिशय सुंदर देखावे असत. त्यात बीभत्सपणा अजिबात नव्हता. दिवाळीत रांगोळ्या आणि किल्ले ही पुण्याची ओळखच होती. विशेषतः पाण्यावरच्या रांगोळ्या पहायला आम्ही कसबा पेठेत गुंडाच्या गणपती जवळच्या वाड्यामध्ये जात असू.
पुण्यात रस्त्यांरस्त्यांवर देवळं भरपूर होती. त्यात किर्तनं होत असत. शनिवारवाड्याजवळ एक बटाट्या मारुतीचं देऊळ होतं. आजही आहे. तिथे आम्ही किर्तनं ऐकायला जात असू. फार पूर्वी बटाट्याचा बाजार या जागी भरत असे, म्हणून त्या मारुतीला बटाट्या मारुती असं नाव पडलं. आफळे बुवा, निजामपूरकर बुवा, कानडे बुवा यांची किर्तनं ऐकायला गर्दी होत असे. किर्तनं नुसतीच पौराणिक कथांवर आधारित नसत, तर तत्कालीन राजकारणाचे विषय त्यात मांडले जात. किर्तन झालं की आरतीचं तबक सगळ्यांपुढे फिरवलं जायचं. त्यात तेवणाऱ्या निरंजनावर हात फिरवून लोक त्यात पैसे टाकत असत. आम्हा मुलांकडे कुठले पैसे असायला, मग आम्ही पैसे टाकल्याची नुसती ॲक्शन करत असू.
माझ्या लहानपणी मुठा नदी दुथडी भरून वाहत असायची. हिवाळ्यात पहाटे लवकर उठून नव्या पुलावरून आम्ही भावंडं फिरायला जायचो तेंव्हा पुलावर थांबून वाहते पाणी पाहात किती वेळ जायचा ते कळायचे नाही. पावसाळ्यात पूर आलेल्या नदीमध्ये लकडी पुलावरून उडी टाकणारे आणि पोहत पोहत ओंकारेश्वराच्या काठाशी पोहचणारे कितीतरी उत्साही वीर असायचे. आणि आमचे काम काय? तर त्यानी नदीत उड्या टाकल्या की थोडावेळ तिथेच थांबून, मग मात्र त्यांनी सांभाळायला दिलेले त्यांचे कपडे धावत पळत त्याना ओंकारेश्वरापाशी नेऊन द्यायचे. ती नदी हे पुण्याचे वैभव होते. नदीकाठी छान हिरवळ होती, आणि त्या हिरवळीवर आम्ही मित्र क्रिकेट आणि हुतुतू, दोन्ही खेळात असू.
माझ्या लहानपणचे पुण्यातले लग्न समारंभ आज आठवले की हसू येते. लग्नानिमित्त सहकुटुंब सहपरिवाराला निमंत्रण असायचे. आणि ती निमंत्रणे करायला अक्षत घेऊन साक्षात घरातली वडिल माणसे टांगा करून जात असत. आणि आम्हाला टांग्यात बसवून पुणे दर्शन घडवीत असत. लग्न समारंभाचे निमंत्रण म्हणजे पानसुपारीला यावे. आणि पानसुपारीला लोक आले की हातामध्ये दिलं जाई खाण्याच्या हिरव्या पानावर एक इटुकली सुपारी, एक गोटा, म्हणजे कोणताही वास नसलेलं एक काळपट, मलूल पडलेले फुल, त्याच्या भोवती दोनतीन पानं आणि ते सगळे एका काडीला पांढऱ्या दोऱ्याने घट्ट बांधलेले. गोटा मिळाला की मग हाताला अत्तरदाणीतले अत्तर आणि गुलाबदाणी मधून गुलाबपाणी अंगावर शिंपडले जाई. काही मोठी माणसं त्यांच्या खांद्यावरचं उपरणं अशावेळी पुढे करीत. गोट्याचा नसलेला वास घेता घेता कौतुकाने आमचे नाव वगैरे विचारले जाई. मनात भीती असे की हे आता आपल्याला गणिताचे गुण विचारणार! मग तत्परतेने त्याना पांढऱ्याशुभ्र तलम कागदातला काका हलवाई यांच्याकडचा साखरी पेढा देऊन आम्ही मुले पुढच्या पाहुण्यांकडे लक्ष द्यायचो.
त्यावेळी पुण्यात दुपारच्या वेळी बोहारणी, कल्हईवाले फिरत असत. बोहारणींशी चाललेली घासाघीस ही गंमतीशीर गोष्ट असे. त्याकाळी बायकांना नोकऱ्या नसत. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी हा संवाद वाढत असे असं याचं स्पष्टीकरण वडिलांनी मला दिलेलं होतं.
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भेळ आणि आईसक्रीम घरोघरी केलं जात असे. बाहेर भेळ खाणं फारसं आवडत नसे. शनिवारवाड्याच्या बाहेरही भेळ मिळत असे. नूमविच्या शेजारी गजानन भेळवाला अगदी प्रसिद्ध होता. त्याच्याकडे नेहमी गर्दी असायची. स्वीट होम, संतोष भुवन ही हॉटेल प्रसिद्ध होती. बुवा आईसक्रीमकडे आईसक्रीम खायला गर्दी व्हायची. वेगवेगळ्या प्रकारची आईसक्रीम तिथे मिळायची. स्टीलचे पुढच्या बाजुला चपटे असलेले चमचे आणि खास आईसक्रीमसाठी असलेले काचेचे कप याचं त्याकाळात आकर्षण वाटायचं.
नव्या पुलाच्या खाली आता जिथे पीएमटीचा बस स्टँड आहे, तिथे तालीम होती. करपे तलाव नावाचा एक सुंदर तलावही तिथे होता. मी तिथेच पोहायला शिकलो. त्याच्याच बाजूला एक बाग होती आणि पुण्याच्या महिलावर्गामध्ये ती फार प्रसिद्ध होती. बायकांच्या डोहाळेजेवणाचे कार्यक्रम तिथे होत असत. त्या बागेत अनेक झाडं होती आणि भरपूर वेली होत्या. त्यामुळे बायकांना झोपाळे बांधणं शक्य होत असे. त्यावेळी सारसबागेच्या परिसरात खूपच झाडी असल्यानं संध्याकाळी तिकडे जायला लोक घाबरत असत. तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घ्यायला सकाळीच जात असत. पाषाण तलाव ही गावाबाहेर फिरायला जायची जागा होती.
पुण्यामध्ये नव्या पुलाच्या खाली, शिवाजी उद्यानाजवळ सर्कस येत असे. आणि सर्कसला जायचे म्हणजे एक कार्यक्रमच असे आणि रात्री घरी झोपलो असताना ऐकू येणाऱ्या पिंजऱ्यातल्या वाघ सिंहांच्या भयानक घुमारा असलेल्या डरकाळ्या माझ्या आजही कानामध्ये आहेत. शिवाय रात्री नित्यनेमाने ऐकू येत असत त्या पुणे स्टेशनवरच्या आगगाड्यांच्या कर्णकर्कश शिट्ट्या.
त्यावेळी भरत नाट्य मंदिरात आम्ही नाटकं बघायला जात असू. तेव्हा ते खुलं होतं आणि जमिनीवर बसून नाटक बघावं लागे. नानासाहेब फाटक, छोटा गंधर्व, बालगंधर्व यांची नाटकं मी तिथे बघितली. पुण्यप्रभाव नाटकात एकदा नानासाहेब एकदा एक वाक्य अगदी टीपेच्या आवाजात बोलले, टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढच्याच क्षणी एकदम बेसच्या खालच्या आवाजात त्यांनी पुढचं वाक्य उच्चारलं. त्यांच्या आवाजातली ही फिरत बघून प्रेक्षक अवाक झाले होते.
1936 साली काही नाटक कंपन्या सुरू झाल्या. त्यातली महाराष्ट्र कलोपासक ही एक. तिच्या स्थापनेत माझ्या वडिलांचा सहभाग होता. सुरुवातीला ही संस्था आंतरशालेय नाट्यस्पर्धा भरवत असे. एकांकिका असत. त्यात मी भाग घेतलेला होता. माझं त्यातलं काम केशवराव भोळे आणि ज्योत्स्ना भोळे यांनी बघितलं आणि आचार्य अत्र्यांना माझं नाव शामच्या भुमिकेसाठी सुचवलं. आंतरशालेय स्पर्धा 12 वर्षं भरवल्यानंतर आता आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा भरवू असं माझ्या वडिलांनी सुचवलं. पण त्यानंतर पुढच्याच वर्षी ते गेले. त्यामुळे त्यांच्याच नावाने ही स्पर्धा सुरू झाली पुरुषोत्तम करंडक..
व्याख्यानं, नाटकं, किर्तनं, इतर सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे फार मोठी माणसं लहानपणापासून बघायला मिळाली. या वातावरणामुळे मन थाऱ्यावर राहिलं. वाचनामुळे, मोठ्या माणसांच्या भाषणांमुळे आपण फार कोणी मोठे नाही याची जाणीव सतत राहिली. शामच्या आईमुळे लहानपणी मिळालेलं यश पचवता आलं. शिवाय घरात आईवडिलांचा पुरेसा धाक आणि संस्कार होतेच. शनिवारवाड्याच्या परिसरात राहिल्यानं विविधरंगी अनुभव घेता आले. आज मात्र त्या परिसराचा बकालपणा बघवत नाही. त्यामुळे कसबा पेठेत जाण्याचं मी आताशा टाळतो. माझ्या मनातला पूर्वीचा तो परिसर आता राहिलेला नाही हे बघून मन खंतावतं. पेठांमधलं पुणं आता बरचसं कोथरुड आणि इतरत्र स्थलांतरित झालं आणि जुन्या पुण्यातलं ते वातावरण बदललं. इलाज नाही..
कालाय तस्मै नम:
(पुण्यभूषण दिवाळी २०१८च्या अंकातून साभार)