आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

निसर्गसखी : हेमा साने

  • कौस्तुभ मुद्गल
  • 20.09.25
  • वाचनवेळ 20 मि.
hema sane

रविवार. दुपारची ३-३. ३० ची वेळ. सुट्टी असल्याने दुपारची झोप पाहिजेच. झोपून उठलो की माझी पावलं, (खरं तर माझ्या गाडीची चाकं) वळतात जोगेश्वरी मंदिराला लागून असलेल्या गल्लीकडे. ही गल्ली कायम गजबजलेली असते. या गल्लीत पुस्तकांची, चष्म्यांची दुकानं आहेत. रस्त्यावरही विक्रेते आपली पथारी पसरून हातरुमाल, पायमोजे, स्वस्तातले कपडे आणि अशा अनेक वस्तू विकायला बसलेले असतात. मी माझी गाडी लांबवर लावून या गल्लीत चालत जाणं पसंत करतो. जिथे चालायलाही जागा नाही तिथे चक्क गाडी घेऊन जाण्याला एक वेगळच धैर्य लागतं, आणि ते माझ्यात नाही.

मग अशा गजबजलेल्या गल्लीत जाण्याचं प्रयोजन काय? तर एका व्यक्तीच्या ओढीने मी तिकडे जातो. जोगेश्वरीकडून या गल्लीत लक्ष्मी रोडच्या दिशेने चालायला लागलं की वाटेत एक वडाचा पार लागतो. त्या पाराच्या डाव्या बाजूला ‘१२१, बुधवार पेठ' अशी जुनी पाटी दिसते. तिथे माझी घट्ट मैत्री असलेल्या ८० वर्षांच्या सानेबाई राहतात. जमेल त्या रविवारी मी दोन तास सानेबाईंशी गप्पा मारायला जातो.

सानेबाई म्हणजे डॉ. हेमा साने. वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासक. होय, अभ्यासकच. कारण बाई स्वतःच म्हणतात, की मी काही संशोधक किंवा तज्ज्ञ नाही. २००० साली गरवारे महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागातून हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून त्या निवृत्त झाल्या. निवृत्त झाल्यावर येणाऱ्या पेन्शनवर पुढचं आयुष्य मस्त जगायचं, अशी सर्वसाधारण वृत्ती असते. पण बाई निवृत्त झाल्या आणि आणखी जोमाने पुस्तक लिहिण्याच्या कामाला लागल्या. निवृत्त होण्याआधी त्यांची ८-१० पुस्तकं प्रकाशित झाली होती; पण निवृत्तीनंतर त्याला आणखी वेग आला. त्यांचं भारतीय विद्या (इंडॉलॉजी) या विषयावर विशेष प्रेम आहे. त्यांनी अनेक अभ्यासांविषयीची पुस्तक लिहिली आहेत. त्याबरोबरच भारतीय विद्येच्या अनुषंगाने आणि त्याची वनस्पतिशास्त्राशी सांगड घालूनही त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत.

माझी आणि बाईंची ओळख तशी फारशी जुनी नाही. एका मे महिन्याच्या सुट्टीत मी नागझिरा अभयारण्यात गेलो होतो. तिथे पुण्यातलेच भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. अजित वर्तक यांच्याशी ओळख झाली. नागझिऱ्याहून परतल्यावर ही ओळख वाढतच गेली. एकदा काही कामानिमित्ताने वर्तक सर मला बाईंकडे घेऊन गेले. बाईंनी आपली पीएचडी वर्तक सरांचे वडील म्हणजेच प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. वा. द. वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली केली. आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि आमच्यात ‘फ्रेंडशिप ॲट फर्स्ट साइट' अशी मैत्री झाली. बाईंच्या प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाची एक प्रत त्यांनी मला दिली. मी सहजपणे ‘त्याचे किती पैसे झाले' असं विचारलं, तर बाई ‘पुन्हा येऊ नका माझ्याकडे' असं जरा रागातच बोलल्या. ‘मी भेट म्हणून दिलं आहे तुम्हाला. मैत्रीत पैसे कशाला आणलेत?' असं त्यांनी स्पष्टच विचारलं. स्पष्टवक्तेपणा आणि तत्त्वनिष्ठता हे खरे तर गुण मानले जातात; पण अशा माणसांवर विक्षिप्तपणाचा शिक्का मारला जातो. बाईंच्या बाबतीतही असंच झालंय. पण सानेबाई अत्यंत मनस्वी आहेत. त्यांच्याशी गप्पा मारायला अगदी त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘धमाल मजा' येते.

दूरवर गाडी लावून जोगेश्वरीच्या त्या गल्लीत चालत जायचं. बाईंच्या वाड्याला एक जुना दरवाजा आहे. तो ढकलून उघडायचा. त्याला स्प्रिंग लावलेली असल्याने तो आपोआपच बंद होतो. उघडताना त्याचा मस्त ‘करर्रर्रर्र' असा आवाज होतो. आत आलो की डावीकडे बाई गरवारे कॉलेजमधे असताना वापरायच्या ती जुनी लूना भिंतीला टेकून लावलेली दिसते. दरवाज्यापासून साधारण: पाच-एक फूट आलो की आपली बाहेरच्या जगाशी असलेली नाळ तुटते. एक तर बाहेरच्या गल्लीतून ऐकू येणारा गलबला बंद होतो आणि तुमच्या समोर असते ती गर्द झाडीतून जाणारी छोटीशी पाऊलवाट. थोडं पुढे गेलो की डाव्या बाजूस जमिनीवर भरघोस वाढलेला मनी प्लांट दिसतो. घराच्या वाटेवर चिक्कू, विलायती चिंच, उंबर अशी अनेक प्रकारची झाडं आहेत. कुंती नावाचं एक झाड आहे, त्याला अत्यंत सुवासिक फुलं येतात. तसंच या झाडांवरून खाली येणाऱ्या अनेक वेली लटकत असतात. पावसाळ्यात या लटकणाऱ्या वेलींना पालवी फुटते. पावसाळ्यात ही वाट हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटांनी सजलेली असते. आत निघालात की वाटेवरच डावीकडे एक लाकडी कपाटही ठेवलेलं आहे. मला या वाटेवरून चालताना नेहमी कुठल्या तरी ट्रेकला आल्यासारखं वाटतं. या वाटेवरून घराकडे जाताना अनेक पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात. वाटेत एखाद्या झाडावर नाचण पक्ष्याने केलेलं घरटंही दिसण्याची शक्यता असते. घराच्या डाव्या बाजूला एक विहीर आहे. पिण्यासाठी लागणारं पाणी सोडून बाई इतर कामांसाठी विहिरीचं पाणी वापरतात.

बाईंचं घर बंद असलेलं मी कधीच बघितलेलं नाही, कारण बाईंच्या घराला दारच नाही. त्यामुळे आत पोहोचलो की दारातून हाक मारायची- “बाई, येऊ का?” खणखणीत आवाजात उत्तर मिळतं- “या!” मग मी पलंगाला टेकून मस्त पाय पसरून जमिनीवर बसतो. छपरातून येणाऱ्या प्रकाशात बाईंचं काहीबाही लिखाण किंवा वाचन चाललेलं असतं. लिहीत असल्या तर ‘थांबा जरा दोन मिनिटं' असं म्हणून त्या आपल्या लिखाणात गर्क होतात.

“काय लिहिताय नवीन?” बाईंचा पहिला प्रश्न. मी काही लिहिलेलं नसतंच.

“कामाच्या गडबडीमुळे लिहायला वेळ झाला नाही...” मी माझ्या आळसावर काही तरी सबब देऊन पांघरूण टाकायचा प्रयत्न करतो.

काही तरी नवीन वाचलेलं असतं. मग आम्ही त्याच्यावर बोलतो. त्या विषयाशी निगडित किंवा त्या विषयाच्या अनुषंगाने अनेक विषयांवर बाई बोलायला लागतात. माझी भूमिका श्रोत्याची असते.

“काय म्हणतोय तुमचा धांडोळा? काही नवीन टाकलंय का त्यावर?” बाईंची दुसरी गुगली. ‘धांडोळा' हा मी आणि माझा मित्र यशोधन जोशीचा ब्लॉग. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही लिहीत असतो. बाईंना या ‘धांडोळ्या'बद्दल अत्यंत कौतुक. असाच एका दुपारी बाईंकडे गेलो होतो. ‘दाखवा हो मला तुमचा धांडोळा मोबाइलवर...' बाई म्हणाल्या. मी त्यांना ब्लॉग उघडून दाखवला. ५-१० मिनिटांनी बाई म्हणाल्या, “थांबा, मी तुम्हाला माझा एक लेख देते.” १२ एप्रिल १९८७ रोजी ‘तरुण भारत'च्या रविवारच्या पुरवणीत ‘आपला इंपोर्टेड उपास' हा त्यांचा लेख छापून आला होता. आपण उपासाला खातो ते बटाटा, साबुदाणा वगैरे पदार्थ कसे देशाबाहेरून येऊन आपल्याकडे रुजले आहेत, याची गंमत त्यांनी त्यात लिहिली होती. त्यानंतर १२-१५ वर्षांनी हाच लेख एका प्रतिष्ठित माणसाने आपल्या नावावर एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात छापून आणला होता. बाईंनी जीर्ण झालेलं ते वर्तमानपत्र शोधून माझ्या हातात ठेवलं आणि त्या म्हणाल्या, “हा लेख घ्या धांडोळ्यासाठी.” आम्ही तो लेख ब्लॉगवर पोस्ट केला. तो आमच्या ब्लॉगवरचा सगळ्यात जास्त वाचला गेलेला लेख आहे.

कधी तरी मी बाईंना त्यांच्या बालपणाविषयी विचारतो. हा विषय काढला की बाई नॉस्टॅल्जिक होतात. “आमचं बालपण अत्यंत सुखात गेलं. बाहेर उंबराचं झाड आहे ना, तिथे तीन मजली वाडा होता. बरेच भाडेकरू होते राहणारे. ही जागा माझ्या आईच्या वडिलांची. भाडेकरूंनी महानगरपालिकेत तक्रार केली, इमारतीची डागडुजी मालकांनी करून द्यावी म्हणून. आजोबा म्हणाले, माझ्याकडे पैसे नाहीत. त्या काळी पाच हजार रुपये खर्च येणार होता. मग सगळ्या भाडेकरूंना बाहेर काढून महानगरपालिकेने इमारत पाडली. पण मालकाला बाहेर कसं काढणार? मग आम्ही थोडी डागडुजी करून इथेच राहिलो.'

बाईंच्या घरात वीज नाही; मात्र त्याविना त्यांचं काही अडत नाही. “माझ्या जन्मापासूनच आमच्या घरात वीज आणि वीजमीटर नव्हतं. याचा एक धमाल किस्सा सांगते तुम्हाला. वीजमीटर नसूनही आम्हाला विजेची बिलं येत असत. एक दिवस वीज कंपनीचा अधिकारी तावातावाने भांडत आला- “आता तुमच्या घराची वीजच तोडतो. बिलं भरत नाही म्हणजे काय!” माझी आई तेव्हा घरात होती. ती शांतपणे त्यांना म्हणाली “खुशाल तोडा! पण त्याआधी तुम्हाला आमच्या घरात वीज जोडावी लागेल! ती जोडली की तुम्हाला आमची वीज तोडता येईल. वीज न जोडता कशी तोडणार?” बाईंनी किस्सा सांगितल्यावर आम्ही दोघं खूप हसलो.

बाईंनी स्वतःहून असं राहणीमान स्वीकारलंय. मी इतक्या वेळा बाईंकडे गेलो; पण आजपर्यंत मलाच काय, कुणालाही बाईंनी राहणीमानाविषयी सल्ला दिलेला मी पाहिला नाही. काही लोकांना त्यांची ही राहण्याची पद्धत अतिरेकीही वाटते. ‘मी मजेत आहे. आजही माझं काहीही अडत नाही कशामुळेही.” मात्र, बोलताना त्या नेहमी सांगतात ते सहा ‘आर'बद्दल. ‘रोजच्या जीवनशैलीत बदल न करताही आपण या सहा ‘आर'चं पालन करू शकतो. रिफ्यूज, रिड्यूस, री-यूज, री-सायकल, रिस्टोरेशन, री-स्पेक्ट आणि रिस्पेक्ट हे सहा आर आपण थोडे जरी आपल्या जीवनशैलीत उतरवले तरीही पृथ्वीला पडलेला प्रदूषणाचा विळखा कमी होईल.'

मागील वर्षीच ‘मार्ग शाश्वत विकासाचा' या पुस्तकात बाईंनी अतिशय सोप्या भाषेत हा विषय मांडलेला आहे.

बाईंच्या आईचं माहेरचं आडनाव आपटे. “अहो, प्रसिद्ध साहित्यिक ह. ना. आपटे हे आईचे चुलते.” बाई मला नवीन माहिती देतात. “परवाच आईचा चुलत भाऊ भेटला होता मला. मला म्हणाला, आपल्याकडे बाबांनंतर (ह. ना. आपटे) लिखाणाची परंपरा सांभाळणारी तूच आहेस.” बाईंचे वडील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते, त्यामुळे ते सतत फिरतीवर असत. बाईंना एक भाऊ होता- त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान. सुहास त्याचं नाव. लहानपणी एका मोठ्या आजारातून तो बाहेर आला. त्यानंतरही प्रकृतीच्या तक्रारी चालूच राहिल्या. मग जरा शिक्षण मागे पडलं. मी बाईंकडे गेलो की ते एका कोपऱ्यात एखादं पुस्तक घेऊन वाचत बसलेले दिसत. पांढरा सदरा, लेंगा आणि डोक्याला काळी टोपी असा त्यांचा पेहराव असे. अतिशय मिश्कील स्वभाव होता त्यांचा. बोलायचे एकदम कमी.

“मी पहिली ते चौथी लहान नू.म.वि.त होते. जवळच्या जवळ शाळा कुठे होती मुलींकरता?” बाई शाळेबद्दल सांगू लागतात. “आम्हाला वेलणकर नावाचे एक शिक्षक होते गायनाला. माझ्या लक्षात राहिली ती दोन गाणी. एक म्हणजे ‘जन पळभर' आणि दुसरं म्हणजे ‘ने मजसी ने'. दोन्ही गाण्यांच्या चाली आपण आता ऐकतो त्यापेक्षा वेगळ्या होत्या. सुधीर फडक्यांनी सावरकरांच्या चित्रपटात ‘ने मजसी ने' या गाण्याला ती चाल लावली आहे.” मग बाई गाणं चालीत म्हणून दाखवतात. “आता तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत नसेल ही बाई गात असेल असं, पण मी चांगली गात असे. मी कविता पण लिहायचे. आमच्या वेळी भा. रा. भागवतांचं ‘बालमित्र' नावाचं एक मासिक यायचं. त्यात छापून आलेल्या माझ्या एका कवितेला बक्षीसही मिळालेलं आहे.” भा. रा. भागवत हा आमच्यातील एक आवडता दुवा. “पाचवीपासून मी हुजुरपागा शाळेत जायला लागले. तिथे आम्हाला गायन, शिवणकला आणि चित्रकला हे विषय होते. शिवणकला काही मला जमायची नाही. मी चित्रकला निवडलं. आमचे चित्रकलेचे शिक्षक आम्हाला निसर्गचित्र काढायला विठ्ठलवाडीला न्यायचे. छान होता तेव्हा तो परिसर.”

शाळेतल्या आठवणी आणि शिक्षकांबद्दल जेवढा जिव्हाळा असतो तेवढा तो कॉलेजमधल्या आठवणी आणि शिक्षकांबद्दल राहत नाही. बाईंचं कॉलेजमधलं शिक्षण झालं ते फर्ग्युसनला. “कॉलेजमधल्या फारशा आठवणी नाहीत. मी फिजिक्सच्या एका क्लासला जात असे. दीक्षित नावाचे शिक्षक होते शिकवायला. खूप सुंदर शिकवायचे.”

बाईंचं शिक्षण चालू असतानाही त्यांच्या घरात वीज नव्हतीच. “कंदिलाच्या किंवा चिमणीच्या प्रकाशात माझा अभ्यास उत्तम झाला. अगदी पीएच.डी.चा प्रबंधही चिमणीच्या प्रकाशातच लिहून काढला मी.” बाई सांगतात.

१९६० साली बाईंचं महाविद्यालयीन शिक्षण संपलं आणि १९६२ साली त्या आबासाहेब गरवारे कॉलेजमधे अध्यापक म्हणून रुजू झाल्या. “कॉलेजमधला हा काळ फार धमाल होता. आम्ही काय काय उद्योग केलेत! आजही कुठे गेले की एखादा तरी विद्यार्थी भेटतोच.” मग बाई १९८७ साली त्यांनी कॉलेजमधे ‘जीवाश्म' या विषयावर भरवलेल्या प्रदर्शनाविषयी सांगतात. “मुलं खूप उत्साही असतात हो. त्यांना तुम्ही दिशा दाखवायला लागते. आमचा एक गट होता कॉलेजमध्ये- स्टुडंट्स ॲक्टिव्हिटी सेंटर (एसएसी) नावाचा. त्या गटात संतोष शिंत्रे, किशोर सरपोतदार, श्यामला सरदेसाई, जयंत गाडगीळ असे किती तरी विद्यार्थी होते. आम्ही दरवर्षी कुठली ना कुठली स्पर्धा घेत असू. नाट्यसंगीत, नाट्यवाचन, अभिवाचन, कथाकथन अशा वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धा घेतली जात असे. धमाल होती सगळी!”

बाईंनी पहिल्यांदा प्रदर्शन भरवलं तेव्हा कॉलेजचे प्रिन्सिपॉल नाराज झाले, पण त्याच प्रदर्शनाची बातमी दूरदर्शनवर आली.

“एकदा फारच मजा झाली कॉलेजमधे...” बाईंकडे कॉलेजमधल्या किश्शांची उणीव नसते. ‘डिसेक्शनसाठी पिंजऱ्यात पकडून सरडे आणले होते लॅबमध्ये. रात्री त्यातल्या एका सरड्याने पिंजरा कुरतडला. सगळे सरडे पिंजऱ्याच्या बाहेर! सकाळी डिपार्टमेंटच्या इमारतीत जिकडे तिकडे सरडेच सरडे!”

“गरवारे कॉलेजकडून प्रभात रोडकडे एक गल्ली जाते. ती पुढे तशीच भांडारकर रोडला जाते. याच गल्लीत हिराबाई बडोदेकरांचा बंगला आहे. कॉलेजला असताना मी विद्यार्थ्यांना घेऊन या गल्लीत फिरायला जायचे. या गल्लीमध्ये खूप प्रकारची झाडं आहेत.” मग बाई एकेका झाडाबद्दल सांगू लागतात. माझ्या वनस्पतिशास्त्राच्या माफक ज्ञानामुळे मी फक्त मान डोलवत असतो.

एकदा दुपारी १२.३० वाजता बाईंचा फोन आला- “मी आकाशवाणीसाठी एक लेख लिहिते आहे. हिराबाई बडोदेकरांच्या बंगल्याच्या इथे तामणचं एक झाडं होतं. जरा जाऊन अजूनही आहे का बघून सांगता का?” मग बाईंनी मला झाडाचं वर्णन, त्याला येणारी जांभळी फुलं याबद्दल सांगितलं. मी पटकन गाडी काढली आणि तिथे पोहोचलो. मला काही बाईंनी वर्णन केलेलं झाड किंवा फुलं दिसेनात. दोन-तीनदा चक्कर मारून परत आलो आणि बाईंना फोन लावला- “मला काही दिसलं नाही झाड.” मग बाई म्हणाल्या, “टिळक रोडला पंडित गॅरेज होतं ना तिथेही एक झाड होतं. कधी जाता-येता दिसलं तर बघा.” दोन दिवसांनी त्याच गल्लीतून जाताना हिराबाई बडोदेकरांच्या बंगल्याच्या बाहेरील फुटपाथवर जांभळी फुलं आलेला तामणचा भला मोठा वृक्ष मला दिसला आणि मी डोक्याला हात लावला.

झाड ओळखता येणं ही एक कला आहे. एकच झाड तुम्ही वरच्यावर बघत राहिलात की त्या झाडाच्या पानांचा आकार, त्यांची रचना, त्या झाडाला येणारी फुलंही तुमच्या डोक्यात बसतात. आमच्या ऑफिसच्या आवारात असलेलं असंच एक झाड. उन्हाळ्यात या झाडाच्या खोडातून रस पाझरू लागतो आणि अनेक प्रकारचे भुंगेरे, पाली, फुलपाखरं तो रस चाखायला येतात. ब्लू ओकलिफ हे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरू याच काळात या झाडावर येतं. अनेकांना विचारूनही त्या झाडाची ओळख पटत नव्हती. शेवटी बाईंकडे गेलो. “एखादी फांदी, फुलं, बिया या घेऊन. आपण ओळखू या.” बाई म्हणाल्या. नेमका त्याच वेळेस झाडाच्या फुलोऱ्याचा मोसम होता. सगळ्या गोष्टी जमवल्या आणि बाईंकडे पोहोचलो. आधी वर्णन केल्यावरून ते झाड कॅशिया कुळातलं आहे हे बाईंनी ओळखलं होतंच. आम्ही अंगणात मस्त मांडी घालून बसलो. बाईंनी घरातून एक जाडजूड ग्रंथ आणला आणि कॅशियाचा विभाग उघडला. त्यात असलेल्या पानं, फुलं, बिया यांच्या आकृत्या मी आणलेल्या नमुन्याबरोबर जुळवून बघायला सुरुवात केली... “कॅशिया ग्रॅण्डिस!” बाईंनी झाड ओळखलं आणि मला त्याची वेगवेगळी वैशिष्ट्यं सांगितली. त्यावरून मग मी पुण्यात वेगवेगळ्या भागांत असलेली कॅशिया ग्रॅण्डिसची झाडं शोधली.

कॉलेजमधे शिकवत असतानाच बाईंनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे चालत असलेल्या इण्डॉलॉजी (म्हणजेच भारतीय विद्या अर्थात प्राचीन भारताचा इतिहास) या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. हा आमच्या दोघांचाही आवडता विषय असल्याने आमच्या गप्पांचा ओघ तिकडे वळतोच. सर्टिफिकेट, डिप्लोमा, बी.ए., एम.ए. आणि शेवटी एम.फिल. असं आम्ही शिकलो. आम्ही शेवटपर्यंत टिकलो ते केवळ शिक्षकांमुळे. आम्हाला शिकवायला ढवळीकर, देगलुरकर, शां. ब. देव, म. श्री. माटे, शोभना गोखले अशी मातब्बर मंडळी होती. बाईंचा एम.फिल.चा प्रबंध होता लोणी भापकरच्या मंदिरावर आणि मार्गदर्शक होते माटे सर. “फार ओढाताण व्हायची परीक्षा चालू झाली की. एका दिवशी दोन दोन-पेपर. कॉलेजमधे जाऊन मस्टरवर सही करायची आणि पळत परीक्षेला यायचं.”

“कुठे गेला होतात भटकायला इतक्यात?” आमच्या गप्पा पुढे चालू होतात. मग त्या दरम्यान केलेल्या एखाद्या भटकंतीवर बोलणं चालू होतं. बाईंनी कॉलेजला असताना प्रचंड भटकंती केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झाडांचे नमुने गोळा करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना घेऊन जात. सुमारे ३०-४० वर्षांपूर्वी त्या जिथे जिथे फिरलेल्या आहेत तिथल्या झाडांबद्दलच्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. हा झाला शैक्षणिक भाग. याबरोबरच या भटकंतीत घडलेल्या अनेक प्रसंगांची मोठी जंत्री आहे त्यांच्याकडे. कॉलेजमध्ये असताना बाईंचं विद्यार्थ्यांशी मैत्रीचं नातं होतं. कधी तरी त्या विद्यार्थ्यांना रत्नागिरीला घेऊन गेल्या होत्या. दिवसभर हिंडून झाडांचे नमुने गोळा करून झाले. परतीची गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे होती. रात्रभर काय करायचं हा प्रश्न. जेवण झालं आणि बाई सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन चित्रपट बघायला गेल्या. शेवटचा खेळ असल्याने रात्री १२ वाजता तो संपला. आता झोपलो तर पहाटेची गाडी चुकेल म्हणून सगळे स्टॅण्डवर जाऊन जागत बसले.

बाईंनी आतापर्यंत बी.एस.सी.च्या अभ्यासक्रमाविषयी २५ ते ३० पुस्तकं लिहिली आहेत; पण त्यांचं मुख्य काम आहे ते त्यांनी लिहिलेली ललित पुस्तकं. या ललित लेखनात वनस्पतिशास्त्रावरची पुस्तकं आहेतच. शिवाय इंडॉलॉजीची सांगड वनस्पतिशास्त्राशी घालून त्यांनी लिहिलेली ललित पुस्तकं अतिशय रंजक आहेत. बुद्ध परंपरा आणि बोधीवृक्ष, वनस्पतींच्या दंतकथा, सम्राट अशोक अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांनी काही पुस्तकं अनुवादितही केली आहेत. आजही त्यांचं पुस्तक लिहिण्याचं काम अव्याहतपणे चालू असतं. घरात वीज नसतानाही दिवसा घरात येणाऱ्या प्रकाशात आणि अंधार पडल्यावर सोलरवर चार्ज केलेल्या दिव्यांच्या प्रकाशात वाचताना किंवा काही तरी लिहिताना बाई सापडतील.

गप्पांचा विषय वळतो बाईंच्या पुस्तकांवर. “सध्या नक्षत्रांवर लिहितेय. दुर्गाबाई भागवतांचं ‘लोकसाहित्याची रूपरेषा' हे पुस्तक आणलं होत एकदा नगर वाचनालयातून. त्यात मिळाला हा विषय. तसंच आणखी एक इंग्रजी पुस्तक ‘द स्टँडर्ड डिक्शनरी ऑफ फोकलोर' यातून बरेच संदर्भ मिळाले.” मग बाई मला सप्तर्षी, कृत्तिका असं काय काय सांगायला लागतात. बाईंची स्मरणशक्ती तल्लख आहे. चोवीस नक्षत्रं, सप्त ऋषी, त्यांच्या सहा कृत्तिका यांची नावं त्या धडाधड सांगतात. पुढल्या पाच मिनिटांत ते मी विसरलेलो असतो. “आपली नक्षत्रं या नावाचं मराठीमध्ये एक चांगलं पुस्तक आहे. र. वि. वैद्य त्या पुस्तकाचे लेखक होते.” बाई आणखी माहिती पुरवतात. “आणखी एक गंमत सांगते. ‘संशयकल्लोळ' नावाचं नाटक माहितीये तुम्हाला. त्यातल्या सगळ्या पात्रांची नावं नक्षत्रांची आहेत.”

काही ना काही कारणांनी बाईंचा हा प्रकल्प रेंगाळला. एक-दोघांनी पुस्तक करण्यासाठी त्यांच्याकडून हस्तलिखिताचं बाड नेलं आणि पुढे काहीच केलं नाही. अखेर ते पुस्तक त्यांनी त्यांचे नेहमीचे प्रकाशक व्हिजन प्रकाशनचे सिंघल यांना दिलं. “नक्षत्रांच्या पुस्तकाचं कुठवर आलं?” या वेळी प्रश्न मी विचारतो. “आलंय टाइप होऊन; पण तपासायला वेळच होत नाहीये.” बाई सांगतात.

मग बाई त्यांनी लिहिलेला एखादा नवीन लेख वाचायला देतात. पाठकोऱ्या कागदावर लिहिलेला तो लेख मी तिथल्या सोलर दिव्याच्या प्रकाशात वाचून काढतो. बाईंची लिखाणाची भाषा समजायला अतिशय सोपी. उगाचच जड शब्द न वापरता सहज-साध्या भाषेत त्या विषय समजावतात. ही भाषा अतिशय ओघवती आहे. लोकांना गोष्टी वाचायला आवडतात आणि बाईंना तसं लिहायला आवडतं. त्यामुळे त्यांचं लेखन रटाळ होत नाही.

“काय करू? कॉफी घेणार का?” बाईंचा प्रश्न. उन्हाळ्याचे दिवस असतील तर कॉफीऐवजी कोकम सरबत विचारलं जातं. बाईंच्या अमेरिकेत असलेल्या एका विद्यार्थिनीने लाट्टे नावाची कॉफी पाठवलेली असते. मग गॅसवर दूध उकळून कॉफी बनवली जाते. ‘साखर बघा हं' असं म्हणत कमी गोड असलेल्या कॉफीबरोबरच आमच्या गप्पा पुढे सरकतात. “थांबा, आज तुम्हाला एक वेगळी गोष्ट खायला देते. खाल्ल्यावर ओळखून दाखवायची हं!” असं म्हणून बाई वाटीत काही तरी खायला देतात. “गुलाबासारखं लागतंय.” मी म्हणतो. मला ओळखता येत नाही. “अहो, पुरोहितकडे मिळणारे रोझ बॉल्स आहेत ते!” मी ऐकून घेतो.

“लहान नू.म.वि.च्या समोर एक बटाटेवडे विकणारा माणूस असतो संध्याकाळी. अजित (वर्तक सर) आणि तुम्ही या एकत्र. माझ्याकडून तुम्हाला बटाटेवड्यांची पार्टी!” वर्तक सरांना आणि मला अजून संध्याकाळी जायला काही जमलेलं नाही.

चार वर्षांपूर्वी बाईंचे बंधू वारले. तेव्हापासून बाई तिथे एकट्याच राहतात अशी आपली समजूत; पण बाईंबरोबर तिथे त्यांची दोन मांजरं आणि एक कुत्री राहते. गप्पांच्या मध्येच मन्या भूक लागली म्हणून ओरडत येतो. मग थोडा दूधभात कालवला जातो. हे सगळं होईपर्यंत मन्या अख्खं घर डोक्यावर घेतो. सकाळनंतर कुत्रीने काही खाल्लं नसल्याने तिलाही बाई खायला देतात. तेवढ्यात चिचुंद्रीचा आवाज यायला लागतो. ‘तिला दुधावरची साय पाहिजे खायला' असं म्हणत बाई दुधावरची साय एका झाकणीत काढतात. मध्येच डोक्यावरल्या झरोक्यातून एक मुंगूस डोकावून जातं. बाईंचं या सगळ्यांशी एक घट्ट नातं आहे. त्यांच्याबद्दल त्या थोड्या हळव्याही आहेत. यातलं कुणीही आजारी पडलं की त्या अस्वस्थ होतात. आमच्या गप्पांदरम्यान मन्या बाईंच्या मांडीवर बसून एक डुलकी काढतो.

मध्येच बाईंना भेटायला कोणी तरी डोकावतं. महत्त्वाचं कोणी नसेल तर बाई त्यांना कटवतात. बाईंची बरीच पुस्तकं व्हिजन प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेली आहेत. व्हिजनचे सिंघल आणि बाईंमध्ये व्यवसायाच्या पलीकडे एक घट्ट नातं आहे. व्हिजनचं ऑफिस बाई राहतात त्याच्या समोरील बाजूस आहे. तिथेच काम करणारे मनीषभाईही बाईंना त्यांच्या बारीकसारीक कामात खूप मदत करतात. आमच्या गप्पा चालू असतानाच कधी कधी मनीषभाईंची १२ वीला असलेली मुलगी खुशबू अभ्यासासाठी येते. एकीकडे तिचा अभ्यास घेणं आणि एकीकडे आमच्या गप्पा चालूच असतात. बाईंच्या घरासमोरच मुमताज नावाचा मोजेवाला उभा असलेला दिसेल. खरं तर मोजे विकणं हा काही त्याचा मुख्य व्यवसाय नाही. “त्याच्या हातात जादू आहे. मालिश करणं हा त्याचा मुख्य व्यवसाय. भेटण्यासाठी कुठली जागा पाहिजे म्हणून तो मोज्यांचं दुकान लावतो.” बाई मुमताजबद्दल माहिती देतात. मुमताजही बाईंना त्यांच्या कामात बरीच मदत करतो. तोही मध्ये डोकावून जातो.

एवढ्यात बाईंवर अनेक माहितीपट झाले. “तुम्ही सेलिब्रिटी झालात!” मी चेष्टेने त्यांना म्हणतो. त्यावर बाई म्हणतात, “कसली सेलिब्रिटी; कटकट झालीये नुसती! सतत कोणी ना कोणी भेटायला येतं आणि फुकटचे सल्ले देऊन जातं. परवाच एक शाळेतल्या बाई आपल्या १०-१२ विद्यार्थ्यांना घेऊन आल्या होत्या. सगळ्या विद्यार्थ्यांनी एकसारखेच प्रश्न विचारले. त्यांना तीच ती उत्तर देऊन डोकं भणभणलं.”

आजही बाईंना वरचेवर फोन येतात- आम्हाला एक माहितीपट बनवायचा आहे म्हणून. ‘आता नाही' असं बाईंनी ठामपणे ठरवलंय. माहितीपट पाहून भेटायला येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्याचा बाईंना त्रास होतो. त्यांच्या लिखाणात किंवा वाचनात खंड पडतो.

आता आमची गाडी वळते ती चित्रपटांकडे. “हरिश्चंद्राची फॅक्टरी हा मी बघितलेला शेवटचा चित्रपट.” बाई सांगतात. मग अमिताभ बच्चन ते वहिदा रेहमान यांच्या चित्रपटांवर, त्यातल्या गाण्यांवर आमची चर्चा होते. बर्मन पिता-पुत्रांचा मी चाहता. मग त्यांनी दिलेल्या संगीताबद्दल मी बाईंना सांगतो. बाई पण त्यांनी बघितलेल्या चित्रपटांवर आणि नाटकांवर बोलतात. “अश्रूंची झाली फुले नाटक बघितलंय तुम्ही? फार सुंदर. मी चारदा बघितलं आहे. काशिनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर आणि चित्तरंजन कोल्हटकर यांनी किती सुंदर भूमिका केल्यात! मध्यंतरी ‘देवराई' नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. त्या चित्रपटासाठी सुमित्रा भावे येऊन गेल्या होत्या माझ्याकडे.” एक नवीनच माहिती कळते.

बाईंच्या वनस्पतिशास्त्रातील कामामुळे आजवर त्यांचे अनेक सत्कार झाले आहेत. पलंगाच्या बाजूलाच त्या सत्कारात मिळालेल्या ट्रॉफ्या पडलेल्या असतात. “माझं घर लहान. त्यात या ट्रॉफ्या कुठे ठेवायच्या हा मोठा प्रश्न आहे. शाली तर इतक्या मिळालेल्या आहेत काय सांगू तुम्हाला!'

बाईंचं मला जाणवलेलं सगळ्यांत मोठ्ठं काम म्हणजे त्यांनी घडवलेले विद्यार्थी. आमच्या गप्पा चालू असताना कधी कधी त्यांचा एखादा विद्यार्थी डोकावतो. बऱ्याच वेळा बाईंना त्याच्या नावासकट त्याची बॅचही माहिती असते. विद्यार्थ्यांवर त्या भरभरून बोलतात. “आता किती वर्षं झाली, पण आजही कुठेही गेले तरी एखादा तरी विद्यार्थी भेटतोच. बँकेत, कोर्टात असे कुठेही विद्यार्थी भेटतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओळख दाखवतात. त्यांच्यामुळे माझी कामंही पटापट होतात. आजही माझे विद्यार्थी मला ओळख दाखवतात, म्हणजे मी बरं शिकवत असावे!” बाई मिस्कीलपणे म्हणतात. बाईंचं हे काम मला जास्त महत्त्वाचं वाटतं.

बाई अत्यंत विद्यार्थिप्रिय शिक्षिका होत्या. वनस्पतिशास्त्र हा तसा रूक्ष विषय. त्यात झाडांच्या लॅटिन नावांच्या भीतीने या विषयाकडे वळणारे कमी. बाई शिकवताना ही लॅटिन नावं लक्षात कशी ठेवायची याची क्लृप्ती मुलांना सांगत. “एखादं हिंदी गाणं, कविता आपल्याला लवकर लक्षात राहते. मग त्या गाण्यातल्या अक्षरांवरून झाडांची नाव लक्षात ठेवायची. असं शिकवलं की विद्यार्थ्यांच्या मनातली भीती कमी होत असे.” बाई सांगतात. बाईंनी आजवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत; पण एका पुस्तकाचा खास उल्लेख करायलाच हवा. विद्यार्थ्यांना वनस्पतिशास्त्र शिकवताना कुठली तंत्रं वापरावीत हे शिक्षकांना सांगणारी एक छोटी पुस्तिका त्यांनी लिहिली होती.

“परवाच माझ्या पुस्तक प्रकाशनात एक विद्यार्थी भेटला. मोठा कारखानदार झालाय तो.” बाई एका विद्यार्थ्याबद्दल सांगू लागतात. “अगदीच टिवल्या-बावल्या करायचा. एकदा त्याला मी आव्हानच दिलं : तू या विषयात जास्त मार्क मिळवलेस तर मी तुझा पेपर नोटिस बोर्डावर लावेन. त्याने खरंच मिळवले की मार्क्स.” तो बाईंना भेटल्यावर म्हणाला, ‘त्या वेळी तुम्ही मला तसं म्हणालात आणि माझ्यात अभ्यासाची गोडी निर्माण झाली.”

असे अनेक विद्यार्थ्यांचे प्रसंग बाईंच्या पोतडीत आहेत.

वीज नसल्याने घरात अंधार जरा लवकर उतरू लागतो. गप्पा चालू असतानाच एकीकडे बाई कापूस घेऊन त्याच्या वाती वळत असतात- तिन्हीसांजेला देवासमोर दिवा लावण्यासाठी. मग एका पणतीत तेल आणि नवीन वात घालून दिवा पेटवतात. दिवा पेटवतानाही आधी काही तरी पेटवायला वापरलेली काडेपेटीतली अर्धी काडी वापरून दिवा लावला जातो. एक दिवा देवाजवळ आणि दुसरा कोनाड्यात. दिव्यांचा पिवळसर प्रकाश सगळ्या घरभर पसरतो. भिंतीवर असलेलं

६०-७० वर्षांपूर्वीचं घड्याळ अजूनही अव्याहतपणे चालू आहे. टोले ऐकवून ते आम्हाला वेळेची जाणीव करून देतं. “बाई, निघू का?” मी विचारतो. “येस्स. पुन्हा भेटू.”

मग मी या गप्पांमध्ये मिळालेलं भांडार घेऊन निघतो. आता पुन्हा गल्लीमधल्या गर्दीतून परत जायचा कंटाळा येतो. गप्पांमध्ये मला अनेक नवीन विषयांवर माहिती मिळालेली असते. हे खाद्य मला पुढच्या आठवडाभर पुरतं. दर रविवारी बाईंकडे जायला जमतंच असं नाही. वर्तक सर मात्र न चुकता आठवड्यातून दोन-तीनदा बाईंकडे जातात. त्यांच्याकडून बाईंची ख्यालीखुशाली समजते. बाईंना भेटायला पाहिजे, या विचाराने मग एखाद्या रविवारी माझी पावलं परत आपोआप जोगेश्वरीच्या त्या बोळाकडे वळतात.

(पुण्यभूषण, दिवाळी २०१९च्या अंकातून साभार.)

कौस्तुभ मुद्गल







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

Satish Ananda wakase 21.09.25
Salute to Sane bai ...apan eka diwy wyaktimtawala bhtawaalat yabddl apnas mnapasun dhanyawad

ऋतुराज20.09.25
सुंदर लेख

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results