आधुनिक काळात संपूर्ण जगावर सर्वाधिक प्रभाव पडलेल्या महामानवांच्या यादीत महात्मा गांधींचं नाव कदाचित सर्वांत वर असेल. अॅडॉल्फ हिटलरला जगात क्रूरकर्मा असं मानलं जातं, तर महात्मा गांधींना शांतिदूत. जगातील मोठमोठ्या नेत्यांना, क्रांतिकारकांना, शास्त्रज्ञ नि तत्त्वचिंतकांना गांधीजी त्यांचे प्रेरणास्रोत वाटत आले आहेत.
अमेरिकेतील गौरेतर (म्हणजे काळ्या) लोकांच्या मानवी हक्कांसाठी मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) अहिंसक पद्धतीने लढले. महात्मा गांधींच्या प्रभावातूनच त्यांनी हा मार्ग स्वीकारला होता. 'येशू ख्रिस्ताने आम्हाला ध्येय दिलं आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग महात्मा गांधींनी दाखवला', असं ते म्हणत. गांधीजींप्रमाणेच त्यांचीही हत्या झाली.
नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेतील काळ्यांचे नेते. आयुष्यभर अहिंसक संघर्ष करून त्यांनी दक्षिण आफ्रिकेला गुलामीतून मुक्त केलं. 'दक्षिण आफ्रिकेतील बदलामागे गांधीजींचे विचार आहेत व त्यांच्या शिकवणुकीमुळेच आम्ही वर्णभेद संपवू शकलो', असं त्यांचं म्हणणं होतं.
हेही वाचा - आधीही झाले होते गांधीजींच्या हत्येचे प्रयत्न
बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले गौरेतर रांष्ट्राध्यक्ष. अमेरिकेच्या लोकशाहीच्या इतिहासावर स्वतःचं नाव कोरलेले. 'माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठे हीरो महात्मा गांधी आहेत', असं राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ते म्हणाले होते.
आंगसान स्यू की या ब्रह्मदेशात लोकशाही रुजवण्यासाठी आयुष्य पणाला लावलेल्या आणि त्यासाठी शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालेल्या नेत्या. त्यांचं शिक्षण भारतात झालं होतं. गांधीजींच्या विचारांतूनच आपली मूस तयार झाली, असं त्या म्हणत. (पुढे सत्ताधारी झाल्यावर मात्र त्यांनी गांधीजींचा मार्ग सोडला, ही गोष्ट वेगळी!)
हो चि मिन्ह हे व्हिएतनाममधील थोर क्रांतिकारक. त्यांचा मार्ग गांधीजींपेक्षा वेगळा होता. 'माझा मार्ग वेगळा होता पण मी आणि माझ्या सहकाऱ्यांचा आदर्श नेहमीच गांधीजी होते', असं त्यांचं म्हणणं होतं.
सीझा चावेज हा मेक्सिकन अमेरिकन कामगार नेता. मानवी हक्कांच्या लढाईत आयुष्य झोकून दिलेला. 'गांधीजी अहिंसेबद्दल फक्त बोलले नाहीत, त्यांनी न्याय आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहिंसक मार्गाचा वापर करून दाखवला', असे उद्गार त्यांनी काढले होते.
दलाई लामा हे जगातील बौद्धधर्मीयांचे सर्वोच्च नेते. तिबेटच्या हक्कांसाठी चीनशी पंगा घेणारे. 'गांधीजी हे मानवी मनाची संपूर्ण समज असलेले महात्मा होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी काम करतो आहे' असं त्यांचं म्हणणं आहे.
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन तर गांधीजींच्या आचारविचारांतून इतके प्रभावित झाले होते, की 'पाचशे वर्षांनंतर गांधी नावाचा हाडामासाचा माणूस पृथ्वीवर होऊन गेला यावर जगाचा विश्वास बसणार नाही' असं ते म्हणाले होते. गांधीजींचं कार्य त्यांना किती लोकोत्तर वाटत होतं, हे त्यातून कळावं. 'महात्मा गांधी हे आमच्या काळातील सर्वांत मोठी दिव्यदृष्टी देणारे राजकीय नेते होते,' असंही ते म्हणत.
हेही वाचा - भगतसिंग आणि गांधीजी
जगप्रसिद्ध अभिनेते चार्ली चॅप्लिन, आयरिश लेखक व विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ, संगीतकार जॉन लेनन, ब्रिटिश दिग्दर्शक व अभिनेते रिचर्ड अटेनबरो, फ्रेंच लेखक रोमाँ रोलाँ, अमेरिकन पत्रकार लुई फिशर, अमेरिकन इतिहासकार विल ड्युरंट असे जगभरचे प्रतिभावंत गांधीजींमुळे प्रभावित होत आले आहेत. अशा नामवंतांची यादी थोडक्यात थांबणारी नाही. जगात कुणाला गांधीजी हे येशू ख्रिस्ताचे अवतार वाटले, तर कुणाला गौतम बुद्धाचे. गांधीजी इंग्लंडला गेले होते तेव्हा त्यांना तिथल्या विद्वानांशी चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं. तेव्हा एका विद्वानाने गांधीजींची तुलना सॉक्रेटिसशी केली. 'सॉक्रेटिसनंतर जगाने असा आत्मनिर्भर आणि शांतचित्त माणूस पाहिला नसेल', असं ते म्हणाले.
पर्ल बक या अमेरिकन लेखिका. त्यांचं एक वाक्य मोठं मार्मिक आहे. 'गांधींचं म्हणणं बरोबर होतं. ते त्यांनाही माहीत होतं. ते आपल्यालाही माहीत आहे. एवढंच काय गांधींना जिवे मारणाऱ्या मारेकऱ्यांनाही माहीत होतं की गांधी म्हणताहेत ते बरोबर आहे.'
हेही वाचा - नेताजी आणि गांधीजी
हेन्री फोर्ड हे जगप्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फार अस्वस्थ होते. अमेरिकन सरकारच्या युद्धात उतरण्याच्या निर्णयाने ते निराश झाले होते. तेव्हा त्यांना गांधीजींचा शांतीचा संदेश जवळचा वाटून गेला. 'तुम्ही जगातील सर्वश्रेष्ठ मानवांमधील एक आहात,' असं म्हणणारं पत्र त्यांनी गांधीजींना पाठवलं. गांधीजींनी त्यांना आपला एक चरखा भेट म्हणून पाठवला. गंमत म्हणजे एकसे एक अत्याधुनिक वाहनं बनवणारे हेन्री फोर्ड गांधीजींच्या या साध्याशा लाकडी चरख्यावर शांतपणे सूत कातत.
हेही वाचा - गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात व्हॉईसरॉय आणि भारतीय नेत्यांना दम वाटला नव्हता
स्टीव्ह जॉब्ज हा जगातल्या संगणकक्रांतीचा नायक. आधुनिक जगातील नव्या बदलांचा सेनापती. १९९७ साली त्याने 'अॅपल' कंपनीची नव्याने मूहूर्तमेढ रोवली तेव्हा तो गांधीजींच्या प्रतिमेसमोर उभा राहिला आणि म्हणाला, 'आपण जग बदलू शकतो असं ज्या वेड्या लोकांना वाटतं, तेच जग बदलत असतात.'
जगभरातील या आणि अशा अनेक लोकांच्या गांधीजींबद्दलच्या भावना पाहिल्या की वाटतं, गांधीजी आपल्या भारतीयांनाच पुरेसे समजले नाहीत का? आपण त्यांना इतिहासाच्या पुस्तकात किंवा सरकारी कार्यालयांच्या भिंतींवर फोटोत किंवा रुपयाच्या नोटांवर किंवा गावोगावच्या पुतळ्यांत ठेवून दिलं आहे. याऊपर त्यांच्यामुळेच फाळणी झाली आणि तेच सर्वांत मोठे गुन्हेगार आहेत, अशी चिखलफेकही त्यांच्याबाबत केली जाते. प्रत्यक्षात गांधींजींच्या विचारांच्या मुळापर्यंत आपण पोहचूच शकलेलो नाही. त्यांच्या विचारांचं मर्म आपण समजूच शकलेलो नाही. त्यांच्या जीवनाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचूच शकलेला नाही.
(समकालीन प्रकाशनाच्या 'असे होते गांधीजी' या पुस्तकातून साभार)
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
