मध्यंतरी दोनेक वर्षं मला डार्विनने पछाडलं होतं. खूप मोठी दाढी, टक्कल, अपरं नाक आणि शोधक डोळे. त्याला जन्मल्याला दोनशे वर्षं पूर्ण झाली आणि त्याच्या उत्क्रांतीवरच्या पुस्तकाला दीडशे वर्षं झाली, त्या निमित्ताने त्याच्यावर लेख यायला लागले आणि बुडतच गेलो त्याच्यात. वास्तविक त्याचं व्यक्तिमत्त्व अशा झपाटून टाकणाऱ्या ‘हीरो'चं अजिबात नाही. दुबळा, कृश. कायम व्याधींनी ग्रस्त. वरकरणी पाहाल तर घाबरटही म्हणाल; कारण तो आपल्या घराच्या परिसरातल्या, आवारातल्या पायवाटेने फिरत असे तेवढंच, नाही तर एरवी कधी घराबाहेरही पडत नसे. उत्क्रांतिवादावरच्या निबंधामुळे तो जगप्रसिद्ध झाला. जो सिद्धांत, जो विषय मांडण्याची कुणाची ताकद झाली नाही, तो त्याने सज्जड पुराव्यानिशी मांडला; आणि त्या वादळानंतरही तो संशोधन करत लिहीतच राहिला...लोकभावनेचं, चर्चचं व इतर दडपण न मानता.
मला शास्त्रज्ञांच्या कथा वाचायला खूप आवडतात. ते कुठल्या रणक्षेत्रावरचे किंवा सार्वजनिक क्षेत्रातले वीर नसतात. एखाद्या विषयाच्या मागे लागत जन्मभर ते कसला तरी शोध घेत असतात. माझे एक संशोधक गुरुजी धोंडे सर यांना एकदा विचारलं, “शास्त्रज्ञाला निराशेची सवय असावी लागते का?” ते हसून म्हणाले, “सवय? अहो, आवडच असावी लागते!” मला एक्स-रेचा शोध लावणारा रॉनजेन (स्पेलिंगनुसार उच्चार राँटजेन) आठवतो. त्याला पुसटसं दिसलं, की हे किरण कोणत्याही वस्तूच्या आरपार जाऊ शकतात, तेव्हा तो त्याच्यामागेच लागला. पहिला एक्स-रे त्याच्या बायकोच्या हाताचा. तिच्या बोटातली अंगठीही त्यात आलीय. त्या किरणांमुळे कॅन्सर होतो हे तेव्हा माहीत नव्हतं. तिला कॅन्सर झाला; ती गेली. रॉनजेनने एक्स-रेचं पेटंट घ्यायचं नाकारलं. त्याने सर्व जगाला शोध अर्पण केला. त्यामुळे आरोग्यतपासणीच्या क्षेत्रात क्रांतीच झाली. मात्र रॉनजेन आर्थिक विपन्नावस्थेत मरण पावला. तो यशस्वी की अयशस्वी? कसं ठरवणार? मी तर त्याला सलामच करतो.
डार्विनभाऊबद्दल वाचतानाही मी असाच थरारून जातो. अहो, तो शाळेत आपल्यासारखाच- काही न येणारा, न रमणारा. त्याचे वडील मोठे डॉक्टर. मामांचं कुटुंब श्रीमंत. आजोबाही प्रसिद्ध. अशा कुटुंबातला हा मुलगा शाळेत कधीच चमकला नाही. वडिलांनी मेडिकलला घातलं. पण त्या वेळची चिरफाड भूल न देता केली जायची. भूल देण्याच्या तंत्राचा शोधच नव्हता ना लागला. त्यामुळे पेशंटचं रक्त, आरडाओरडा पाहून परतच आला हा गडी. त्याला लहानपणापासून निसर्गात भटकायचा नाद होता. किडे जमवून संग्रह केला होता त्याने. तो पाहून वडील संतापले. काय म्हणाले माहीत आहे? ‘यू आर डिसग्रेस टु द फॅमिली!' म्हणजे ‘तू घराण्याला कलंक आहेस!' हे आपल्याला किती ओळखीचं वाटतंय, नाही? शाळेत जे चालतं त्यात आपण रमत नाही. आपण ज्यात रमतो ते शाळेला, घरच्यांना चालत नाही. कसा मेळ घालावा? जगाला वळण देणाऱ्या बहुतेक शास्त्रज्ञ, कलावंतांचे लहानपणी त्यांच्या शाळेने हालच केले. डार्विनच्या वडिलांनी मग त्याला धर्मगुरू करायचं ठरवलं. किडे गोळा करणाऱ्या पोराला धर्मगुरू करायची कल्पना किती अचाट! पण काय करता! प्रतिष्ठेच्या दृष्टीने डॉक्टरच्या खालोखाल तेच समाजमान्य होतं. मग हा केंब्रिजला गेला. ती डिग्री त्याने पूर्ण केली.
हेही वाचा - ''सारे भारतीय स्थलांतरितच, कोणीही दुसऱ्यापेक्षा कमी किंवा जास्त भारतीय नाही'' - टोनी जोसेफ
पण धर्मशास्त्राचा अभ्यासक्रम चालू असताना डार्विनने आपली निसर्ग भटकंती चालूच ठेवली होती. वडिलांना याची कल्पना नसणार. तो केंब्रिज विद्यापीठातल्या हेन्स्लॉ नावाच्या वनस्पतीशास्त्रज्ञाच्या नादी लागला. ते त्यांच्या भ्रमंतीत त्याला बरोबर नेऊ लागले. याची आवड पाहून तेही चकित झाले असावेत. त्यांच्या निसर्गवेड्या अभ्यासक गटातच तो सामील झाला. एकदा तो भूशास्त्राच्या ग्रुपबरोबर वेल्समध्ये गेला होता. तिथून सुटीत घरी आला, तर एक पत्र येऊन पडलं होतं. त्या पत्राने त्याचं जीवनच बदलून जाणार होतं आणि जगाच्या ज्ञानाची दिशाही. असं त्या पत्रात काय लिहिलं होतं? इंग्लंडच्या राणीच्या मालकीचं एक गलबत जगप्रवासाला निघणार होतं. उद्देश? नवीन मुलूख, नवीन बेटं शोधणं. त्यांचे नकाशे, तिथली माहिती गोळा करणं वगैरे. त्यांना बोटीवर एक निसर्ग संशोधक हवा होता. त्या काळात अशा लोकांना नॅचरलिस्ट म्हणायचे. डार्विन काही प्रशिक्षित नॅचरलिस्ट नव्हता. तरी हे बोलावणं कसं आलं? बघा, नादिष्टपणाचाही उपयोग होतो कुठे कुठे!
तो प्रवास होता दोन वर्षांचा, पण झाला अखेरीस पाच वर्षांचा! त्या वेळी डार्विन केवढा होता? फक्त २२ वर्षांचा! बोटीच्या प्रवासाचा आधीचा अनुभव? शून्य. शिवाय या कामाचा कसलाही मोबदला मिळणार नव्हता. खाऊनपिऊन कामं. तशी डार्विनच्या वडिलांना वाटणारी भीती, नाराजी अनाठायी नव्हती. पण अज्ञातात पाऊल घालावंच लागतं ना. इस्टेट सांभाळत बसला असता तर तो डार्विन झाला असता का?
हे सगळे ज्या बोटीने जाणार होते तिचं नाव एचएमएस बीगल. बोट म्हटल्यावर आजची मोठ्ठी, अनेक मजली सुखसोयींनी युक्त अशी बोट डोळ्यांसमोर येईल. पण ते होतं शिडांचं गलबत. तसं ते फार लहानही नव्हतं. त्यावर ७० माणसं राहत, काम करत होती. ती या सगळ्या जगप्रवासाला टिकली बुवा. सगळे इंग्लंडहून निघाले, अटलांटिक पार करत दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागात, ब्राझीलच्या किनाऱ्याला लागले. तिथून खाली दक्षिणेला वळसा घालून पश्चिम किनाऱ्याला. तिथे चिली पार करत गॅलापॅगोस द्वीपसमूहापर्यंत पोचले. तिथून काही बेटांवर थांबत थांबत, पॅसिफिक महासागर पार करून थेट न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात आले. हिंदी महासागरातून दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून परत ब्राझील. तिथून परत इंग्लंड. केवढा प्रवास आहे हा! आणि तोही शिडावर चालणाऱ्या गलबताने. आणि गलबतावर डार्विनला काम करायला स्वतंत्र केबिन वगैरे नव्हती. बोटीच्या एका बाजूच्या तळात तिघांत मिळून एक खोली मिळाली होती. खोलीत एकच खाट. तिघांतला एकजण नकाशे काढणारा सीनियर होता तो त्या खाटेवर झोपायचा. बाकीचे दोघं हॅमॉकमध्ये (दोरीचा पाळणा) झोपायचे. मध्ये वावरायलाही फारशी जागा नाही.
हेही वाचा - मोरयार गुड्डा - २५०० वर्षांपूर्वीचं आश्चर्य
पहिल्या दिवसापासून त्याला बोट ‘लागायला' सुरुवात झाली. उलट्यांनी तो बेजार झाला. अगदी प्रवासाच्या अखेरपर्यंत त्याला हा त्रास होत राहिला (नि पुढे जन्मभरही तो आजारीच राहिला). आसपासच्या लोकांना त्याचं आश्चर्य वाटायचं, की त्या त्रासाने त्याच्या कामावर त्याने परिणाम होऊ दिला नाही. डार्विन हे का सोसत होता? कारण उघड आहे. तो झपाटलेला माणूस होता. त्याला निसर्गातली कोडी उलगडण्याचं वेड लागलं होतं, आणि आयुष्यात एखाद्यालाच मिळते अशी ही संधी त्याला मिळालेली होती. कोणत्याही बेटावर गलबत नांगरलं की डार्विन कुणाला तरी सोबतीला घेऊन जंगलात शिरायचा. बोटीतून उतरलं की नदी असेल तर लहान होडकं घेऊन आत जायचं. तिथून पुढे पायी प्रवास- दीड-दोनशे मैल! अडीचशे-तीनशे किलोमीटर! म्हणजे पुण्याहून कोल्हापूरला पायी...तेही रस्त्याने जाण्यासारखं सुखाने नाही, तर झाडं-झुडपं दूर करत. घनदाट जंगलात वाटा कुठल्या? शिवाय जंगलातली जनावरं? चावणाऱ्या जळवा, किडे...
किती तऱ्हेतऱ्हेचे प्राणी तो बघत होता! सांगाडे, जीवाश्म, जंगलात जे जे दिसेल ते उचलून पठ्ठ्या बोटीवर आणत असे. त्याने वनस्पतींचे नमुने गोळा केले. किडे तर असंख्य. पक्षीही शिकार करून पेंढा भरून ठेवले. त्या वेळी फोटोग्राफी नव्हती. त्यामुळे संशोधकांना शिकार करावीच लागायची. छोट्या प्राण्यांची कातडीदेखील त्याने जमवली.
त्यांच्या बोटीचा मुक्काम एका ठिकाणी एखादा आठवडा असायचा. मग पुढचं कुठलं तरी बेट गाठायचं. त्या प्रवासात तरी डार्विनने विश्रांती घ्यावी ना! पण नाही. त्या वेळात तो जमवलेल्या प्रत्येक नमुन्याची नोंद, वर्णन, वर्गीकरण करण्याचं काम करायचा. रोजची डायरी लिहायचा. घरी मित्रांना पत्रं लिहायचा. ही पत्रं कशी जायची? त्या जंगलात काही पोस्टाच्या पेट्या नव्हत्या. बंदरावर इंग्लंडकडे जाणाऱ्या बोटी भेटल्या की तो ही पत्रं तर द्यायचाच, पण जमवलेले अवाढव्य नमुनेही पाठवायचा. तिकडे त्याच्या घरातल्या काही खोल्या भरून गेल्या असणार.
एके ठिकाणी त्याला टेकडीच्या तुटलेल्या भागात पांढरं काही तरी दिसलं. ते उकरलं. तो मोठ्या प्राण्याचा अवशेष होता. तो काढेपर्यंत आणखी हाडं दिसली. सगळा डोंगर म्हणजे कबरस्तानच होतं. त्याचा अभ्यास केल्यावर पुन्हा तोच प्रश्न पडला- हे सगळं गेलं कुठे? त्यात आफ्रिकेतल्या गेंड्याचा भाऊबंद होता. हा इकडे कसा? आफ्रिकेतून इथे येणं शक्य नव्हतं. मग हे खंड पूर्वी एकच होते की काय? (पुढे वेग्नरने हे शोधून काढलं.) एका प्रश्नातून अनेक प्रश्न. प्रश्न पडणं ही किती महत्त्वाची घटना असते! माणसाला प्रश्नच पडले नसते तर? आजवर जे ज्ञान साठलं आहे ते मिळालं असतं का?
हेही वाचा - ढोलावीरा : पाच हजार वर्षांपूर्वीचं प्रगत शहर
डार्विनला गुलामी अजिबात मान्य नव्हती, आणि ब्रिटिश सत्ता तर त्यावरच विसावलेली. किती दोष दिला, तरी कॅप्टनमुळे डार्विनला ही संधी मिळाली, म्हणून विज्ञानाला संधी मिळाली, म्हणून आपल्यालाही. पुढे डार्विनच्या पुस्तकावर गदारोळ माजला, तेव्हा फिट्झरॉय म्हणाला, “हा असं काही करतोय, असं काही लिहिणार आहे हे त्या वेळी मला कळलं असतं तर त्याच वेळी मी त्याला समुद्रात फेकून दिलं असतं!” त्याने तसं केलं नाही हे आपलं नशीब!
बीगल हळूहळू दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याने वर वर उत्तरेकडे येत होती. मुख्य भूमीच्या पश्चिमेला चार-पाचशे मैलांवरच्या गॅलापॅगोस या बेटांच्या समूहापाशी आल्यावर मुक्काम पडला. बुद्धाला बोधिवृक्षाखाली जसं ज्ञान झालं, तसंच डार्विनला इथे उत्क्रांतीचं कोडं उकललं. डार्विनने उत्क्रांती झाली हा शोध लावला नाही, तर उत्क्रांती कशी झाली हे शोधून काढलं. तो १८३६ मध्ये इंग्लंडला परत आला. तो लगेच उत्क्रांतीविषयी बोलला नाही. एक तर त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार होत्या. चर्चचा विरोध होणार होता. आणि दुसरं म्हणजे त्यालाही त्या विषयाचा नीट अभ्यास करायचा होता. नीट म्हणजे किती काळ? काही महिने? एखादं-दुसरं वर्ष? छे छे! तब्बल २० वर्षं तो अभ्यासच करत राहिला. त्याने अक्षरशः हजारो नमुने आणलेले होते. प्रत्येक नमुना तो घेऊन बसायचा. त्याची सविस्तर नोंद करायचा. त्याचे किती वेगवेगळे निष्कर्ष काढता येतील याचा सांगोपांग विचार करायचा...की नंतर पुढचा नमुना.
पुढे त्याने सूत्ररूपाने लिहिलेल्या पुस्तकाचं नाव ‘ओरिजन ऑफ स्पेसीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन' असं लांबलचक असलं तरी ते ‘ओरिजन ऑफ स्पेसीज' या नावाने ओळखलं जातं. त्या पुस्तकाने प्रचंड खळबळ माजली. नुसती वैज्ञानिक जगतातच नव्हे, तर सर्वसामान्य लोकांमध्येही.
धार्मिक मताच्या लोकांमध्ये विरोधही वाढत होता. ही सगळी सृष्टी देवाने निर्माण केली. या मताला क्रिएशनिस्ट ‘भूमिका' म्हणायचे. या क्रिएशनिस्टांचा एक म्होरक्या होता- बिशप सॅम्युअल बिल्बरफोर्स. हा प्रतिपक्षाचा उपहास करत भंबेरी उडवायचा, अशी त्याची प्रसिद्धी. त्याला ‘सोपी सॅम' हे लोकप्रिय नाव होतं. त्या सगळ्या विरोधकांनी विद्यापीठात चर्चा आयोजित केली. डार्विन कधी सभेत बोलायला जात नसे, पण सगळीकडे त्याचा मित्र टी. एच. हक्सले जात असे आणि डार्विनची बाजू जोरदार मांडत असे. ते इतकं प्रभावी, की लोक त्याला डार्विनचा कुत्रा (बुलडॉग) म्हणत. तर या वादविवादाला तो जाणार होता. सॅम वैज्ञानिक नसला, तरी रिचर्ड ओवेन या विरोधक वैज्ञानिकाने सॅमची तयारी करून घेतली. सभेला प्रचंड गर्दी होती. पण सॅमला पद्धतशीरपणे डार्विनची मतं खोडता आली नाहीत. त्याने उपहासाचा आश्रय घेतला. हक्सलेकडे पाहून तो म्हणाला, “तुमचे पूर्वज माकड, हे आईकडून की वडिलांकडून?” हक्सलेने आपल्या भाषणात आधी डार्विनच्या मताचं पद्धतशीर समर्थन करून शेवटी म्हटलं, “अशी बेजबाबदार विधानं करणाऱ्या मठ्ठ माणसापेक्षा माकड पूर्वज असलेलं पत्करीन!” सभेत गोंधळ उडाला. हक्सलेने सभा जिंकलीच.
हेही वाचा - कोकणातला कातळखजिना
वास्तविक माकड आपले पूर्वज आहेत असं डार्विनने कधीही म्हटलं नव्हतं. त्या पुस्तकात तर माणसाचा असा उल्लेख वा चर्चा नाहीच; पण या लोकांनीच त्याला हे स्वरूप दिलं. पुढच्या लिखाणात आलेलं त्याचं मत म्हणजे माकड आणि माणूस यांचा पूर्वज एक आहे. आता तर चिम्पांझींमध्ये आणि आपल्यामध्ये बहुतांश जीन्स समान असल्याचं संशोधन आलंय. म्हणजे आपण उत्क्रांतीमधली भावंडं आहेोत. तरी त्या वेळी माकडाचं शरीर आणि डार्विनचं तोंड अशी किती तरी व्यंगचित्रं प्रसिद्ध झाली. डार्विन म्हणत होता, उत्क्रांती सरळ रेषेत नाही झाली तर फांद्या फुटत झाली. तसंच, ‘बळी तो कान पिळी' या अर्थाचं काही तो कधी म्हणालेला नाही. ‘प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता' हेच त्याचं म्हणणं; पण ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट'चा खूप विपर्यास झाला. मुळात हे वाक्य हर्बर्ट स्पेन्सर या तत्त्ववेत्त्याचं. ते डार्विनला चिकटलंच. वंशश्रेष्ठतेवर विश्वास असणाऱ्या लोकांनी त्यांच्या प्रसारासाठी हे विपर्यस्त करून वापरलं. त्याला ‘सोशल डार्विनिझम' नाव पडलं.
माणूस कसा उत्क्रांत झाला? एक तर तो दोन पायांवर चालायला लागला. त्याचे हात वळू शकले. त्याची बोटं सुटी झाली. अंगठा वेगळा झाला. तो अंगठा चार बोटांच्या समोर आणता येऊ लागला. त्यामुळे वस्तू पकडून स्वत:कडे वळवून तो पाहू लागला. निरीक्षण वाढलं. मेंदूची वाढ सुरू झाली. दोन पायांवर चालू लागल्यावर स्वरयंत्र काही इंच खाली आलं. जास्त आवाज काढण्याची क्षमता आली. भाषा तयार झाली. मेंदूला नव्या गोष्टी सुचू लागल्या, जमू लागल्या. मग काय, प्रगतीच प्रगती! इतका प्रगत मेंदू, इतकी निर्मितिक्षमता, संवेदनशील मन मिळाल्यावर माणसाने नंदनवन निर्माण करायचं होतं; पण काय परिस्थिती झाली ती आपण पाहतोच आहोत.
डार्विनचं एक वाक्य म्हणजे त्याच्या म्हणण्याचं सार आहे : ‘एखादी प्रजाती स्ट्राँग आहे, बळकट आहे म्हणून ती टिकेल असं नाही. एखादी बुद्धीने हुशार आहे म्हणून ती जगेल असंही नाही. तर कोणतीही प्रजाती परिस्थितीशी जुळवून घेणारी (ॲडॅप्टेबल) असेल तरच जगते. कुणाची ताकद किती, हा निसर्गात प्रश्न नसतो. तुम्ही जगू शकता की नाही हे महत्त्वाचं.' माणसाने बोध घ्यावा असं हे वाक्य.
डार्विनवर लिहिताना एका वैज्ञानिक मासिकाने लिहिलंय ते किती खरं आहे! ‘आजवर जगाला वळण देणारे न्यूटन, आईन्स्टाईन, फ्रॉइडसारखे खूप शास्त्रज्ञ झाले; पण त्यांच्या संशोधनावर नंतर बरेच आक्षेप आले. नंतर आलेल्या संशोधनाने त्यांच्या मांडणीतला काही भाग अप्रस्तुत ठरला. अशी इतरही उदाहरणं आहेत. पण डार्विनच असा, की त्याची ‘नॅचरल सिलेक्शन'ची कल्पना जशीच्या तशी टिकून राहिलीय. नंतर आलेल्या संशोधनामुळे उलट त्याच्या विचारांना पुष्टीच मिळालीय. म्हणून तो आपला सगळ्यांचा बाप!"
(समकालीन प्रकाशनाच्या 'जवळचे' या पुस्तकातून साभार)
