१९ जुलै, भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक 'जयंत नारळीकर' यांचा जन्मदिवस. अलीकडेच तो राष्ट्रीय विज्ञानकथा दिन म्हणून साजरा होऊ लागला आहे. त्यानिमित्ताने 'समकालीन प्रकाशन'च्या 'डायनासोरचे वंशज' या विज्ञानकथा संग्रहातली 'अनुत्तरित प्रश्न' ही कथा खास युनिक फीचर्स पोर्टलच्या वाचकांसाठी!
तो प्रसंग घडून तीन वर्षं तर निश्चितच झाली आहेत. भर रस्त्यात एका अनोळखी माणसाचा अपघाती मृत्यू झाला होता. मुंबईत तर असे अपघात रोजच होत असतात. कदाचित ही संख्या पूर्वी कमी असेल, आता वाढली असेल; पण मुंबईत अपघात होतच असतात. आपल्यासमोर चालणारा माणूस एकाएकी आकांताने किंचाळतो, कुठल्या तरी वाहनाचा धक्का खातो किंवा वाहनाखाली येतो, काही क्षणांत त्याचा देह निर्जीव कलेवर होऊन रस्त्यावर पडतो. अशा अपघातातील आकस्मिकतेला, भयाणतेला साक्षी होणारी माणसं स्तंभित होतात, कळवळतात आणि काही वेळाने आपल्या दिशेने चालू लागतात, जरा अधिकच वेगात. काही तासांत तो प्रसंग आणि त्या व्यक्तीचा अनोळखी चेहरा ते विसरूनही जातात.
पण माझ्या मनाच्या अंतरंगात तो प्रसंग अजूनही रुतून बसला आहे. कधी तरी अचानक ती स्मृती जाणिवेच्या पृष्ठभागावर उसळून येते. सुरेशचा चेहरा, त्याचा वेडावाकडा पडलेला देह, त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव माझ्या अंतश्चक्षूंसमोर स्पष्ट तरंगतात. खरं तर मला त्याच्या नावाशिवाय काहीही माहीत नव्हतं. ते नावही अपघातानेच माहीत झालं होतं... तरीही त्या माणसाच्या मृत्यूची आठवण मला अस्वस्थ करते. मग अपराधीपणाची एक गडद काळी छाया माझ्या अस्तित्वाला झाकोळून टाकते आणि काही क्षण त्या अंधःकारात मी गुदमरू लागतो. तसं म्हटलं तर हा अपघाती मृत्यू आणि त्याच्याशी माझा संबंध कसा आला याबद्दल गुप्तता बाळगण्याची काहीही गरज नाही. कायद्याच्या आधारावर नाही आणि नैतिकतेच्या आधारावरही नाही. पण हे माहीत असूनही हा प्रसंग सांगण्याची माझी आत्तापर्यंत हिमत झालेली नाही. पण या घटनेविषयी मौन राखल्याने घटनेत दडलेलं एक रहस्य, एक गूढ पडद्याआडच राहणार आहे आणि ते मला सातत्याने त्रस्त करत राहणार आहे, याची जाणीव असल्यानेच तो प्रसंग मी सांगणार आहे.
मी मुंबईला क्वचितच जातो. लोक जिवाची मुंबई करायला जातात म्हणे. माझ्या बाबतीत मात्र असं आहे, की मुंबईत प्रवेश केल्याबरोबर माझा जीव भेदरून जातो. अनोळखी चेहऱ्यांची गर्दी, ती भोवळ आणणारी जीवनाची गती, ज्ञानेंद्रियांवर कोसळणारा विविध संवेदनांचा धबधबा... मुंबईला जावंच लागणार असेल तर मी आधीच काळ, काम, वेगाची गणितं करायला लागतो. आपली बस केव्हा पोचेल, आपल्याला ज्या दिशेला जायचं आहे त्या दिशेला जाणारी गर्दी तेव्हा असेल का, आपल्याला उतरायचं आहे त्या स्टेशनवर लोकल थांबेल का, आपल्याला सहज खाली उतरता येईल का... अनेक प्रश्न मनात गर्दी करतात.
त्या दिवशी मी व्हीटीवरून कल्याणला निघालो ते असे सर्व हिशोब करूनच. सकाळच्या वेळी कल्याणकडे जाणारी शेवटची फास्ट गाडी मी पकडली. डबा रिकामा होता. मी खिडकीजवळची जागा पकडून पिशवीतून पुस्तक बाहेर काढलं आणि वाचायला सुरुवात केली. लोक चढत होते, उतरत होते. भोवती गडबड- गोंधळ चालू होता. गाडी स्टेशनवर थांबली की बाहेरचे आवाजही आत येत होते. मी पुस्तकात गुंगलो होतो.
ठाणे गेल्यावर भोवतालची गर्दी जरा कमी झालेली जाणवली तसा मी जरा मोकळाढाकळा बसलो. पुस्तक बंद करून पिशवीत ठेवून दिलं. पाय समोरच्या बेंचखाली ताणून अंग जरा ताणलं. त्या क्षणाला मी कशाचा विचार करत होतो मला आठवत नाही, पण एकाएकी मला जाणवलं, माझ्या कानांवर काही विशिष्ट आवाज येत होते-कुच..कुच..कुई..कुई.. माझं लक्ष त्या आवाजांकडे वेधलं गेलं. कुच..कुच..कुई..कुई.. मी वर नजर उचलून पाहिलं. उभं राहणाऱ्यांच्या डोक्यांवर उभ्या-आडव्या पाइप्सवर लटकत असलेली हॅन्डल्स तालात डोलत होती, हेलकावे खात होती आणि त्यांचा आवाजही येत होता, सामायिक एकाच प्रकारचा. गाडीच्या गतीनुसार त्यांची हालचाल आणि आवाजही कमी-जास्त होत होता. त्यात अनैसर्गिक काहीच नव्हतं, पण त्या आवाजातून मला वेगळंच जाणवलं होतं.
माझ्या मनाने त्या आवाजातून अक्षरं वाचायला सुरुवात केली होती. वर्षानुवर्षं जी सवय लागली होती ती नाहीशी होणं कठीणच होतं. मी पूर्वी वायरलेस ऑपरेटर होतो. वायरलेस ऑपरेटर्सना पूर्वी मोर्स कोडमधून संदेशाची देवाणघेवाण करावी लागत असे. मिलिटरीमध्ये दोन वायरलेस स्टेशन्समध्ये संदेशांची देवाणघेवाण असो वा दोन पोस्ट ऑफिसांत होणारी तारसंदेशांची देवाणघेवाण असो, त्यासाठी मोर्स कोडचा उपयोग केला जायचा. मोर्स कोडची भाषा आकारात येते दीर्घ आणि ऱ्हस्व आवाजांच्या वेगवेगळ्या रचनांतून. समजा, कुणी तरी एक किंचित दीर्घ शिट्टी दिली आणि त्यामागोमाग त्या प्रमाणात एक ऱ्हस्व शिट्टी दिली, तर वायरलेस ऑपरेटरच्या मनात ताबडतोब अक्षर आकार घेईल- इंग्रजी एन. माझ्या मेंदूने तेच केलं होतं, नकळत. आणि माझ्या लक्षात आलं होतं, माझ्या कानांवर येणाऱ्या आवाजांतून काही अक्षरं आकाराला आली होती.
या मोर्स कोडविषयी एक विनोद मी ऐकला होता. असेच पोस्टात मोर्स ऑपरेटर्स असणारे दोन कर्मचारी हॉटेलात गेले होते. जवळच्याच टेबलावर एक सुंदर तरुण स्त्री आणि एक प्रौढसा पुरुष बसले होते. या कर्मचाऱ्यांपैकी एकाने आपल्या सहकाऱ्याचं लक्ष तिच्याकडे वेधण्यासाठी टेबलावर कड्कट, कड्कटकट भाषा सुरू केली आणि मित्राला सांगितलं, “काय माल आहे रे” ! मित्राने वळून पाहण्याआधीच त्या तरुणीच्या बरोबर असलेल्या माणसाची बोटंही टेबलावर टकटकू लागली, “मी या मालाचा बाप आहे!'
त्या विनोदाची आठवण येऊन मी स्वत:शीच हसलो. समोरच्या माणसाने माझ्याकडे जरा विचित्र नजरेने पाहिलंही; पण माझं सर्व लक्ष, म्हणजे नजर आणि कान त्या हॅन्डल्सच्या हालचालीकडे लागलं होतं. काही वेळातच हॅन्डल्सचे हेलकावे वाढले. आता डब्यालाही धक्के बसत होते. आवाज यायला सुरुवात झाली... कुई..कुच..कुच.... कुच..कुच.... कुई..कुच...कुंई..कुच... माझा कणा एकदम ताठरला. माझे कान त्या आवाजावर केंद्रित झाले. मनातल्या मनात मी अक्षरं लिहीत होतो... अंगावर काटा उभारला होता माझ्या...आवाज येत होता- ‘डी आय.. एन ए.. एन ए..टी एच...' मी लिहीत होतो वाक्य माझ्या मनातील काल्पनिक कागदावर...दीनानाथ, नाऊ इज द टाइम..
...आणि माझ्या समोर बसलेल्या बाईच्या मांडीवरील पोराने एकदम टाहो फोडला. मी नकळत धडपडत उभा झालो. माझ्या ओठांतून कदाचित एखादी शिवीही निसटली असावी. माझं सर्व लक्ष त्या हॅन्डल्सवर लागलं होतं.. कान त्या मुलाच्या रडण्याचा आवाज गाळून हॅन्डल्सचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होते...पण ते अशक्य होतं. मी उठून धडपडत मधल्या पॅसेजमध्ये आलो, त्या हॅन्डल्सच्या खालीच उभा राहिलो; पण आता हॅन्डल्सची हालचाल बंद झाली होती. मी भानावर आलो. माझ्या लक्षात आलं, जवळचे सर्व लोक माझ्याकडे विचित्र नजरांनी बघत होते. काहीजण केवळ कुतूहलाने, मी विनाकारण सीट सोडून उभा झालो म्हणून. मी थोडा दाराकडे सरकलो. मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी उत्तेजित झालो होतो. मनात एक वादळ माजलं होतं. एकच प्रश्न घोंघावत होता, दीनानाथ, हीच वेळ आहे... हा संदेश माझ्याकरताच होता... कशाची वेळ आहे ही?... कोण मला संदेश पाठवत होतं? हे माझ्या मनाचे खेळ? की योगायोग? मला काही सुचेनासं झालं होतं. कोणी तरी मला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. कोण? कुणी परग्रहस्थ की कुणा मृत ऑपरेटरचा आत्मा? विचित्र विचित्र कल्पना माझ्या मनात उगवत होत्या.
मी कल्याणला उतरलो, पण स्टेशनबाहेर न जाता परत उलटी लोकल पकडून ठाण्याकडे निघालो. ठाण्याला जाणाऱ्या गाडीला अर्थातच गर्दी होती. पाइपवरील त्या हॅन्डल्सला अनेक हात लटकत होते. हॅन्डल्स हलण्याला संधी तरी कुठे होती? मी ठाण्याला उतरलो, परत कल्याणला निघालो. मी त्यानंतर किती चकरा मारल्या मलाच माहीत नाही, पण कल्याणचं माझं काम न करताच मी परत मुक्कामी आलो. कुणाजवळ काही बोललो नाही.
मी ठरवलं, परत फक्त एकदाच संधी घेऊन पाहायची. परत त्याच गाडीने, त्याच डब्यातून प्रवास करायचा.
दुसऱ्या दिवशी मी सकाळी अर्धा तास आधीच व्हीटीला पोचलो. रात्रभर मला झोप आली नव्हती. चुळबूळ करत अर्धवट स्वप्नावस्था, अर्धवट निद्रावस्था अशी रात्र पार केली होती. शरीर गरम झाल्याचं आणि मनावर एक विचित्र नशा चढल्यासारखं वाटत होतं. ती विशिष्ट गाडी लागल्याबरोबर मी त्याच डब्यात धडपडत चढलो. त्या खिडकीशी एक माणूस बसला होता आधीच. मी त्याच्या शेजारी बसलो. मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. उगाच काही तरी अपेक्षा करणं चुकीचंच आहे. कालची घटना होऊन गेली. एक विचित्र आभास किंवा योगायोग. पण मी आता तसं काही परत घडेल अशा आशेने जात नाहीये. माझं कल्याणचं काम आटोपायला चाललोय मी... मनाला मी समजावत राहिलो, पण तरीही ठाणे जाण्याची प्रतीक्षा करत राहिलो.
-आणि अखेर तो क्षण आला, ती विशिष्ट जागा आली. गाडीचा खडखडाट वाढला, हॅन्डल्स हेलकावे खाऊ लागले..आवाज येऊ लागला.. कुच.. कुच.. कुच.... कुच.कुई.. कुई....कुच..कुई..कुच....अक्षरं येत होती, मी वाचत होतो. माझ्या लक्षात आलं, आजचा संदेश माझ्याकरता नव्हता... एस यू आर ई एस एच.. सुरेश, बिवेअर ऑफ पाइपर ओड. माझ्या लक्षात येईना.. पी आय पी इ आर...ओ डी..परत मनात प्रश्नांची झुंबड उठली. गोंधळ सुरू झाला. पाइपर ओड हा काय प्रकार आहे? आणि हा सुरेश कोण? ओ डी हा कशाचा शॉर्टफॉर्म आहे का? का एखादं अक्षर राहिलंय अजून? पण मी आज काही गोंधळ व्हायला संधीच दिली नव्हती. माझी खात्री होती, की संदेश पूर्ण होता. या सुरेशला सावध राहण्याचा संदेश होता.. कशापासून? कोण सुरेश? आपल्या भोवतालच्या माणसांत कुणी सुरेश असेल का?
गाडी कल्याणला थांबली. मी कल्याणला उतरलो. मनातल्या प्रश्नाला खोल दडपून टाकत मी गर्दीबरोबर जिन्यावरून वरच्या पुलावर गेलो. पुलावरून इतरांसारखाच घाईघाईने चालायला लागलो. जिना उतरलो. माणसांची ती गर्दी आता स्टेशनच्या बाहेर पडून रस्त्याकडे निघाली होती. आडव्या रस्त्यावर रिक्शावाल्यांची आरडाओरड चालू होती, भाजीवाल्यांची धावपळ चालू होती. माझ्या मनातील तो प्रश्न झटकून टाकण्यात मी यशस्वी झालो होतो. आता मी विचार करत होतो, चालत जावं की रिक्षाने जावं? जावं तर कुठल्या रस्त्याने जावं? मान उंचावून मी गर्दीच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करत होतो आणि गर्दीतून वाट काढत पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होतो...
...तोच माझ्या कानावर शब्द आले, “सुरेश, मी चलतो रे. बस लागलेली दिसते.' मी दचकून शब्दांच्या मुळाचा शोध घेतला. माझ्या समोर काही फुटांच्या अंतरावर असलेले दोघं आपापसात बोलत होते. माझ्या हेही लक्षात आलं, की हे दोघंही माझ्याच डब्यातून प्रवास करत होते, माझ्या शेजारीच बसले होते. पण यातील सुरेश कोण? बहुधा काल मी जिथे बसलो होतो तिथे बसला होता तोच सुरेश असणार.
गर्दीतून वाट काढत, धक्के मारत, शिव्या खात मी पुढे सरकू लागलो. मी काय करणार होतो मलाच माहीत नव्हतं, पण मला त्याचा चेहरा पाहून खात्री करून घ्यायची होती. हाच गृहस्थ त्या खिडकीपाशी बसला होता का? याचंच नाव सुरेश आहे का? त्याचा जोडीदार एका दिशेला निघून गेला आणि तो रिक्षांच्या गर्दीतून, लोकांमधून वाट काढत रस्त्याच्या कडेला पोचला. एक प्रचंड मोठा ट्रक त्याच्या समोरून पुढे सरकत होता. ट्रकच्या मागे रिक्शा आणि त्यामागे एक मेटाडोर... माझी नजर मेटाडोरच्या मागच्या बाजूला गेली आणि मी दचकलो, मेटाडोरमध्ये स्टील रॉड्स ठेवलेले होते आणि ते गाडीच्या बाहेर आले होते. गाडीच्या धक्क्यांनी ते हलत होते, हेलकावत होते...एकदम माझ्या लक्षात आलं, पाइपर ऑड नाही, पाइप रॉड..
नकळत मी ओरडलो, “सुरेश- बिवेअर ऑफ पाइप!” पुढचे शब्द माझ्या घशातच अडकले. पुढे एकदम ओरडा झाला, धावपळ झाली. मेटाडोर कच्चकन ब्रेक दाबून थांबला. सुरेश खाली पडला होता, तडफडत होता. त्याच्या हातातील पिशवी बाजूला पडली होती. त्यातील टिफिन बाहेर पडला होता आणि त्याच्या मानेवरील जखमेतून रक्ताचं कारंजं उडत होतं. मी मागे वळलो, वेड्यासारखा धावत सुटलो. मी कुठे धावत होतो? कशापासून दूर पळत होतो?
माझ्या डोळ्यांसमोर तो तडफडणारा सुरेशचा देह आहे. त्याचा चेहरा.. सुरेश म्हणून मी ओरडल्यावर तो गर्रकन मागे वळला होता आणि त्याच वेळी त्याच्या समोर वळण घेणाऱ्या मेटाडोरमधील लोखंडी रॉडला हेलकावा बसला होता आणि तो रॉड त्याच्या दिशेने झेपावला होता. क्षणभर आमची नजरानजर झाली होती. त्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव तसेच राहिले होते. तो मागे वळला होता, त्यामुळे त्याच्या मानेच्या दिशेने येणारा रॉड त्याला दिसला नव्हता आणि तो त्याच्या मानेत घुसला होता.
आता मी विचार करतो तेव्हा तीन प्रश्न माझ्यासमोर उभे राहतात. मला माहीत आहे की या तिन्ही प्रश्नांची निश्चित उत्तरं मला मिळणं शक्य नाही, आणि मिळाली तरी त्यांचा आता काहीही उपयोग नाही. पहिला प्रश्न आहे, हॅन्डल्सच्या हिंदोळ्यातून त्या खिडकीजवळ बसलेल्या व्यक्तीला हा संदेश कोण देत होतं? दुसरा प्रश्न आहे, समजा मी त्याला सुरेश म्हणून आवाज दिला नसता आणि त्याने मागे पाहिलं नसतं, तर त्याच्या चेहऱ्याच्या दिशेने येणाऱ्या रॉडला पाहून त्याने त्यापासून स्वत:ला वाचवलं असतं का? यातूनच तिसरा प्रश्न येतो, त्याच्या मृत्यूला मी कारणीभूत झालो आहे का?
पण थांबा. आणखीही एक अनुत्तरित प्रश्न आहे ... त्याच्या आदल्या दिवशी मी त्या खिडकीत बसलो असताना माझ्या नावाने आलेला संदेश मी पूर्ण ऐकला असता आणि त्या संदेशाप्रमाणे ‘दीनानाथ, हीच वेळ आहे' यापुढे सांगितलेलं नीट ऐकून तसा वागलो असतो तर...? आज मी कुठे असतो? काय करत असतो?
