
एके काळी पर्यटन हे थंड हवेची ठिकाणं किंवा धार्मिक स्थळांपुरतंच मर्यादित होतं; पण आता या कल्पनेचा विस्तार होतोय. नुसतीच मौजमजा करण्यापेक्षा आपला परिसर जाणून घेण्यासाठी, इतिहास-भूगोल समजून घेण्यासाठी फिरणाऱ्या मंडळींची संख्या वाढते आहे, पण तरीही आपली धाव अजून ऐतिहासिक स्थळांपुरतीच आहे. पुरातत्त्वाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक स्थळांना आपण अजूनही दुर्लक्षितच ठेवलेलं आहे. त्या स्थळांचं त्यात किती नुकसान आहे ही वेगळी गोष्ट, पण आपण मात्र एका अद्वितीय अनुभवाला मुकतो आहोत. त्या स्थळांपैकीच एक आहे गुजरातमधलं ढोलावीरा.
खरं तर गुजरात गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनात आक्रमकपणे आघाडी घेताना दिसतं आहे. गिरनार इथला सिंह प्रकल्प, कच्छमधील डायनोसोर जीवाश्म पार्क, साबरमती आश्रम, अक्षरधाम मंदिर, चंपानेर-पावागढ ही पर्यटनस्थळं सामान्यजनांमध्ये प्रसिद्ध आहेत, पण ढोलावीरा बघायला कुणी वाट वाकडी करून कच्छच्या रणात गेलेलं मी फारसं ऐकलेलं नाही. काय आहे हे ढोलावीरा प्रकरण?

हडाप्पाकालीन सिंधू संस्कृतीचा इतिहास सांगणारं प्राचीन नगर म्हणजे ढोलावीरा. तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीच्या खुणा सांगणारं भारतातलं हे सर्वांत मोठं पुरातत्त्व स्थळ मानलं जातं. पश्चिम गुजरातमध्ये भुजपासून साधारण २५० किलोमीटरवर हे गाव लागतं. जवळपास पाकिस्तानच्या सीमेलगतच. कच्छच्या रणातल्या खडीर बेटावर हे शहर दडून बसलेलं आहे. ढोलावीराच्या भटकंतीवर जाण्याआधी सिंधू संस्कृतीची ओळख करून घेणं महत्वाचं आहे. पाकिस्तानमध्ये हडाप्पा या ठिकाणी १९२० साली सिंधू संस्कृतीचा पहिल्यांदा शोध लागला. या शोधामुळे भारताच्या इतिहासाला वेगळीच कलाटणी मिळाली. या शोधापूर्वी अखंडित भारताचा इतिहास इ.स.पूर्व पाचशे वर्षांपर्यंतच ज्ञात होता; परंतु या शोधामुळे इ.स.पूर्व पाच हजार वर्षांपर्यंतच्या इतिहासाची पाळंमुळं आपल्याला समजली. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये मिळून सिंधू संस्कृतीच्या साधारण अडीच हजार प्राचीन वसाहती शोधण्यात आल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच वसाहतींचं उत्खनन झालं आहे. या अभ्यासामुळे सिंधू संस्कृतीचे अनेक पैलू प्रकाशात आले आहेत.
हडाप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती ही साधारणपणे पाच हजार वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील सिंध, बलुचिस्तान, पंजाब आणि भारतात राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणा इथे अस्तित्वात आली आणि साधारणत: इ.स.पूर्व १७०० साली लयास गेली असं मानलं जातं. जगातल्या सर्वांत प्राचीन संस्कृतींमध्ये तिचा समावेश केला जातो. तिच्या समकालीन असलेल्या संस्कृती म्हणजे इजिप्त, मेसोपोटेमिया आणि चिनी संस्कृती. परंतु या सगळ्यात सिंधू संस्कृती सर्वांत प्रगत म्हणून ओळखली जाते. त्या काळची नगररचना, पाणीपुरवठ्याचं आणि सांडपाण्याचं नियोजन, अलंकार-आभूषणं, मातीची भांडी, दफनक्रिया, तसेच धातू आणि निर्मितितंत्रही अत्यंत प्रगत होतं. अशा या प्रगत संस्कृतीची पाच मोठी शहरं किंवा राजधान्या आज आपल्याला ठाऊक आहेत. हडाप्पा, मोहन्जोदडो, गणवेरीवाला ही स्थळं आज पाकिस्तानात आहेत, तर ढोलावीरा आणि राखीगढी ही स्थळं भारतामध्ये आहेत. ही पार्श्वभूमी समजून घेतली की ढोलावीराकडे आपण एका वेगळ्या दृष्टीने पाहू लागतो.
ढोलावीराचा शोध लागला तो १९६७-६८ च्या सुमारास. त्यानंतर नव्वदच्या दशकात तिथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत उत्खनन सुरू झालं. डॉ. आर. एस. बिश्त हे या उत्खनन प्रकल्पाचे प्रमुख होते. आपले सहकारी डॉ. के. सी. नवडियाल आणि एस. आर. रावत यांच्याबरोबर त्यांनी पंधरा वर्षं या ठिकाणी उत्खनन आणि संशोधनाचं मोठं कार्य केलं आहे. त्यांच्या या कामामुळेच ढोलावीरा या प्राचीन शहराचा इतिहास आज आपल्यापर्यंत पोहोचू शकला आहे.

ढोलावीरा हे गाव अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी वसलेलं आहे. आजही या ठिकाणी पाण्याची सोय नाही. कच्छच्या मोठ्या रणात खदीर नावाचं बेट आहे. त्या बेटावर हे ठिकाण आहे. या वसाहतीच्या बाजूने कच्छचं रण म्हणजे मिठाचं नैसर्गिक आगर आहे. इथूनच पुढे पाकिस्तानची हद्द सुरू होते. आता तिथे पक्ष्यांची आणि रानगाढवाची अभयारण्यं आहेत. अशा दुर्गम ठिकाणी नागर वसाहत कशी आणि का निर्माण झाली असावी, हा प्रश्न आपल्याला ढोलावीराची माहिती घेताना सुरुवातीलाच पडतो. त्याचं उत्तर शोधण्याचं काम अजूनही सुरूच आहे. पण या दुर्गम ठिकाणीही इतकं सुंदर आणि सुबक शहर अस्तित्वात यावं याचं आश्चर्य वाटत राहतं. ढोलावीराची तुलना आताच्या शहरांबरोबर केली, तर त्या वेळची शहर-रचना आणि सुविधा या जास्त चांगल्या आणि प्रगत असल्याचं अनुमान निघतं.
कशावरून काढता येतो असा अंदाज? ढोलावीराच्या वसाहतीचा आकार चौकोनी आहे. विस्तार जवळपास अडीचशे एकरांचा. वसाहतीच्या चारही बाजूंनी दगडांची मजबूत तटबंदी बांधण्यात आली आहे. आपण जसजसे तिच्या जवळ जाऊ लागतो तसतशी या तटबंदीची भव्यता जाणवायला लागते. तटबंदीच्या उत्तरेकडे मुख्य दरवाजा आहे. या दरवाज्यातून वसाहतीमध्ये आपण प्रवेश करतो. प्रवेशासाठी भव्य पायऱ्या बांधलेल्या आहेत, त्याचबरोबर दरवाज्याच्या बाजूला निरीक्षक कक्षही आहेत. दरवाज्याला मोठी कमान असावी हे तिथल्या तुटलेल्या अवशेषावरून दिसून येतं. अत्यंत सुबकतेने दगड घडवून हे खांब तयार केलेले दिसतात. आणि या खांबांना आधार म्हणून विविध आकारांचे दगड लावलेले दिसतात.

नगराची अंतर्गत रचना अत्यंत प्रमाणबद्ध, आखीव-रेखीव आणि योजनाबद्ध आहे. पूर्ण शहर तीन भागांमध्ये विभागलेलं दिसतं. राजवाड्याचा भाग, मिडल टाऊन आणि लोअर टाऊन. राजवाड्याच्या भागात आपल्याला मुख्यत: श्रीमंती घरांचे अवशेष पाहायला मिळतात; तर सर्वसामान्य जनतेच्या भागात घरं, दुकानं यांचे अवशेष आहेत. राजवाड्याच्या भागात दोन क्रीडांगणं आहेत. एक मोठं आणि एक छोटं. त्यांचा वापर बाजारासाठी, बैलांच्या शर्यतींसाठी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केला जात असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो. राजवाड्याला चार दरवाजे आहेत आणि दरवाज्यांना एल आकारात बांधलेल्या पायऱ्या दिसतात. दरवाज्यांच्या बांधकामासाठी चकाकी किंवा पॉलिश केलेले दगड आणि स्तंभांचा उपयोग केलेला आहे. राजवाड्याच्या भागातही भव्य तटबंदी दिसून येते. या तटबंदीला दरवाजे, मनोरे आणि सॅलेन्ट आहेत. स्तभांचा खालचा भाग डमरूच्या आकाराच्या दगडांनी बांधलेला आहे. इथल्याच एका प्रवेशद्वाराजवळ सिंधू संस्कृतीच्या लिपीत लिहिलेला एक दहा अक्षरी लेख सापडला आहे. हा लेख सिंधू संस्कृतीतला सर्वांत मोठा लेख मानला जातो. आजपर्यंत सिंधू लिपीचं वाचन करण्याचे बरेच प्रयत्न पुरातत्त्वज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञांनी केलेले आहेत, परंतु यापैकी कोणत्याच प्रयत्नांना फळ आलेलं नाही. त्यामुळे या लेखात काय लिहिलंय हे अजून कळू शकलेलं नाही. जेव्हा ते कळेल तेव्हा आपल्याला या संस्कृतीच्या आणखी खोलात जाता येईल.

नगराची रचना करताना स्थापत्यशास्त्राचा खूप चांगला वापर त्या काळी केला गेला होता. नगरातले सर्व मोठे रस्ते हे उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम जातात. इथला सर्वांत मोठा मुख्य रस्ता तेरा मीटर रुंद असावा. इतर सर्व छोटे रस्ते हे एकमेकांना समांतर आणि मोठ्या रस्त्याशी काटकोनात मिळणारे आहेत. त्यामुळे शहराची रचना एखाद्या बुद्धिबळाच्या पटासारखी दिसते. सर्वत्र छोटे छोटे चौकान तयार झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये घरांचे अवशेष सापडतात. घरं बांधतानाही रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीची काळजी घेतलेली दिसते. कुठल्याही घराचे दरवाजे हे मुख्य रस्त्यावर उघडत नाहीत तर आतल्या छोट्या रस्त्यावर उघडले जातात. घरांच्या सापडलेल्या अवशेषांवरून या वसाहतीमध्ये दोन-चार-सहा खोल्यांची घरे असावीत असा अंदाज बांधला गेलाय. त्यातील काही घरं दुमजलीसुद्धा होती. सर्व घरांमध्ये अंगण, न्हाणीघर आणि स्वयपांकघर या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात.
घरांची नीटनेटकी बांधणी हे हडाप्पाकालीन वैशिष्ट्य इथेही सापडतंच. पण नगररचनेचा सर्वांत अप्रतिम पुरावा आपल्याला या वसाहतीत मिळतो तो म्हणजे त्या काळची सांडपाण्याची उत्तम सोय. ढोलावीरातल्या प्रत्येक घरात कूपनलिका होत्या. या सर्व नलिका पुढे जाऊन मोठ्या गटाराला मिळतात. सांडपाणी वाहून नेण्यासाठी मुख्य गटारं बांधलेली आहेत. या गटारांवर दगडांची झाकणं लावली आहेत आणि काही अंतरावर झाकणं उघडी करून माणूस आत उतरून सफाई करू शकेल अशी व्यवस्थाही केली आहे. आजही आपण आधुनिक शहरांमध्ये हीच यंत्रणा वापरतो आहोत. गटारांची उंची सर्वसाधारण माणसाच्या उंचीपेक्षा जास्त आहे. गटाराच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी सेफ्टी टँकसुध्दा बांधलेले या ठिकाणी पाहायला मिळतात.

सांडपाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचंसुद्धा अतिशय व्यवस्थित नियोजन केलेलं दिसतं. सर्व नगरात मोठमोठ्या विहिरी खोदलेल्या दिसतात आणि त्या सुंदर पद्धतींने दगडांनी बांधलेल्या आहेत. या विहिरींचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. काही विहिरी नेहमीप्रमाणे बांधलेल्या आहेत, तर काही विहिरींना जिने किंवा पायऱ्या केलेल्या आहेत आणि आत मुख्य स्रेोत आहे, तर काही विहिरींना वरून पाणी खेचण्याची सोय आहे. या ठिकाणी पाणी दोरखंडाने ओढल्याने दगडावर दोरखंडाच्या घर्षणाच्या खुणासुद्धा पाहायला मिळतात. या भागात पावसाचं प्रमाण खूपच कमी असल्यामुळे पावसाच्या पाण्याने विहिरी भरण्यासाठी उत्तम व्यवस्था केलेली दिसते. या वसाहतीच्या बाजूला दोन छोट्या नद्या वाहतात मनहार आणि मनसार. या नद्यांना बारमाही पाणी नसतं, पण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला की इथे पूर येतो. या पुराच्या पाण्याचा वापर करण्यासाठीही इथे व्यवस्था उभारलेली आढळून येते. या नद्यांना बांध घालून त्यांचं पाणी वसाहतीमध्ये फिरवलं होतं आणि त्याची साठवण दगडामध्ये सोळा मोठे जलाशय खोदून केली होती. हे जलाशय आपल्याला आजही वसाहतीच्या बाजूंनी पाहायला मिळतात. जलाशय बांधतानासुद्धा खूप काळजी घेतलेली दिसते. प्रत्येक जलाशय हे पहिल्या जलाशयापेक्षा खालच्या उंचीवर बांधलं आहे, जेणेकरून पाणी हळूहळू प्रत्येक जलाशयामध्ये जाऊ शकेल. या जलाशयांमधून पुढे पाणी प्रत्येक विहिरीमध्ये सोडलेलं दिसतं. अशा प्रकारचं पाण्याचं आणि सांडपाण्याचं व्यवस्थापन सिंधू संस्कृतीच्या इतर कोणत्याही वसाहतीत दिसून येत नाही. इतकंच नव्हे, तर इतर कोणत्याही संस्कृतीत याचा पुरावा नाही.

डॉ. रॅन्डल लॉ या शास्त्रज्ञाने अमेरिकेतील विसकॉनसीन विद्यापीठामध्ये हडाप्पा इथल्या उत्खननात सापडलेल्या वस्तूंचा, मुख्यतः दगड आणि धातूंचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केलेला आहे. या अभ्यासातून असं समोर आलंय, की हडाप्पा वसाहतीत बांधकामासाठी वापरलेला चुनखडक हा मुख्यत: ढेोलावीरा या ठिकाणाहून आयात झाला होता. याचबरोबर मण्यांना छिद्र पाडण्यासाठी लागणारा अर्नेस्टाइट नावाचा कठीण दगडसुद्धा कच्छच्या रणातूनच इतर वसाहतींमध्ये पोहोचला होता. विविध अलंकार आणि आभूषणं बनवण्यासाठी वापरलेला कार्नेलियन नावाचा लाल रंगाचा दगडही गुजरातमधूनच गेला होता. या निष्कर्षांवरून असा अंदाज बाधला जातो, की ढोलावीरा हे ठिकाण सिंधू संस्कृतीतलं अतिशय महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं.

ढोलावीराच्या वसाहतीमध्ये शिरण्यापूर्वी बाहेरच्या बाजूला एक छोटेखानी संग्रहालय उभारण्यात आलं आहे. या संग्रहालयात ढोलावीरा इथल्या उत्खननातून मिळालेल्या काही वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. मातीचे मोठे रांजण, कुंभ, ताट-वाट्या आणि इतर मातीची भांडी इथे पाहायला मिळतात. मातीच्या भांड्यांवर लाल रंगाचा पोत दिलेला आहे आणि त्यावर काळ्या रंगाने विविध नक्षीकाम केलेलं दिसून येतं. भांड्याचा पक्केपणा आणि कलात्मकता पाहिली की ती पाच हजार वर्षांपूर्वीची असतील यावर विश्वास ठेवणं खरोखर अवघड जातं. त्या काळातील प्रगत कलेचा अंदाज बांधण्यासाठी हे संग्रहालय पुरेसं आहे. विविध दगडांपासून तयार केलेले अलंकार आणि आभूषणंही इथे पाहायला मिळतात. एवढंच नव्हे, तर त्या काळातील शिक्के आणि वजनमापंही या संग्रहालयात आहेत. हे सगळं शांतपणे बघायचं आणि प्रत्यक्ष ढोलावीराच्या अवशेषांतून फेरफटका मारायचा म्हणजे भरपूर वेळ काढूनच जायला हवं.
मकर संक्रांतीच्या काळात गुजरातमध्ये भरवण्यात येणाऱ्या ‘रणोत्सवा'मध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. धोरडो आणि बन्नी येथील हस्तकला बनवणाऱ्या खेड्यांंना हजारो लोक भेट देतात पण ढोलावीराकडे फारसं कुणी वळत नाही. अशा तऱ्हेचं पर्यटन कमीच लोकांना आकर्षित करणार, हे गृहीत धरलं, तरी अशा भटकंतीत रस असणाऱ्या अनेकांना या प्राचीन शहराबद्दल माहितीच नाही. ढोलावीराचं उत्खननही तुलनेने अलीकडच्या काळात झालं आहे. त्यामुळे हडाप्पा-मोहेंजदडोसारखं ते सर्वांच्या तोंडी बसलेलं नाही, हे त्याचं एक कारण असू शकतं. शिवाय इथे पर्यटनाच्या दृष्टीने फारशा सोईही नाहीत. पण आपल्या संस्कृतीतला सर्वांत प्राचीन ठेवा बघायला हवा, असं वाटणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी ढोलावीराला भेट द्यायलाच हवी.