आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

घोस्ट रायटर

  • आशिष महाबळ
  • 19.07.25
  • वाचनवेळ 6 मि.
ghost writer marathi book on science fiction stories

१९ जुलै, भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक 'जयंत नारळीकर' यांचा जन्मदिवस. अलीकडेच तो राष्ट्रीय विज्ञानकथा दिन म्हणून साजरा होऊ लागला आहे. त्यानिमित्ताने 'समकालीन प्रकाशन'च्या 'घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा' या पुस्तकातील 'घोस्ट रायटर' ही कथा खास युनिक फीचर्स पोर्टलच्या वाचकांसाठी!

“या, या. तुमची साप्ताहिक अपॉइंटमेंट काही तुम्ही पाळत नाही, आणि टेन्शन आलं की लगेच भेटायचं म्हणता. पण म्हणून शनिवारी आलात? तुम्हाला माहीत आहे नं, आम्ही फक्त सोमवार ते शुक्रवार काम करतो म्हणून? गरज पडली की धावत यायचं. इतर वेळी सगळे सायकिऍट्रिस्ट फ्रॉइडचेच वंशज आहेत असं गृहीत धरून तुमच्या लिखाणातून आमच्या पेशाची हवी तशी टर उडवायची. पण मीच बोलतोय पेशंटसारखा. आलाच आहात तर बोला, काय सेवा करू तुमची?”

“टेन्शन? हो, हो, आहे खरं.” नेहमीच्या सायकिऍट्रिक कोचावर किंचित आडवं होत आशिष म्हणाला.

“बोला, अगदी नि:संकोच होऊन.”

“मी एका मासिक साय-फाय कथालेखनाच्या स्पर्धेत भाग घेतो हे तुम्हाला माहितीच आहे. महिन्याच्या शेवटच्या दिवशी कथा पोस्ट करायची चढाओढ असते. महिनाभर लिहू-लिहू असं म्हणत राहतो आणि ते काही होत नाही. इतरांच्या कथा पाहून घाम फुटतो. मग ‘इज्जत का सवाल' म्हणून लिहावं लागतं,” आशिष एका दमात बोलला, आणि तो मग पुढे म्हणाला, “सॉरी, मी खूप बोलतोय.”

“दॅट्स दि आयडिया. बोलण्यातून तुम्ही व्यक्त झालात की मगच आम्ही मदत करू शकतो.”

“तर ती कथा आज ड्यू आहे, आणि कथा न लिहिल्यामुळे टेन्शन आलं आहे खरं.” आशिष म्हणाला.

तो पुढे काहीच बोलत नाही हे पाहून डॉक्टर म्हणाले, “थोडा तरी काही विचार झाला असेल? एखाद्या विषयाबद्दल-”

“विषय दोन महिने आधीच ठरलेला असतो. कधी कधी त्यामुळे फोकस करायला मदत होईल असं वाटतं. कधी कधी मात्र मन अगदीच कोरं राहतं.” आशिष विचारांची जुळवाजुळव करत म्हणाला.

“या वेळी ब्लँक झालंय का?”

“धूसर.”

“धूसर? म्हणजे अस्पष्ट? असं का वाटतंय तुम्हाला?”

“या वेळचा विषय भुतांबद्दलचा आहे.”

ते ऐकून गालातल्या गालात हसत डॉक्टर म्हणाले, “भुतं? तुमच्या गोष्टी विज्ञानाधिष्ठित असतात नं?”

“लोक समजतात तशी भुतं नसतात. ब्रेन डॅमेजमुळे किंवा मेंदूतलं मॅपिंग बिघडल्यामुळे, किंवा राग, लोभ अशा एखाद्या भावनेचा अतिरेक झाल्यामुळे जे भास होतात त्यांनाच भुतं म्हणता येतं.”

डॉक्टर स्वत:शीच पुटपुटले- “इथे पेशंट कोण आणि डॉक्टर कोण हेच धूसर होतंय.” मग प्रत्यक्ष बोलले, “अरे वा! बरंच माहीत आहे की तुम्हाला. या प्रत्येक प्रकारचं एक-एक उदाहरण देऊ शकाल? कदाचित कोणती उदाहरणं सुचतात यावरून मी काही मदत करू शकेन.”

“खरं तर एका छान उदाहरणाबद्दल लिहायचं होतं. या प्रयोगात दोन खुर्च्या एकामागोमाग ठेवायच्या. मागच्या खुर्चीवरच्या व्यक्तीचा - याला पश्या म्हणू या- हात समोरच्या खुर्चीवरच्या व्यक्तीच्या- याला दर्शू म्हणू या- नाकापर्यंत पोचेल अशा त्या हव्यात. आंधळी कोशिंबीर खेळताना बांधतो तसे पश्याचे डोळे एका पट्टीने बांधायचे. आता एकाच वेळी दोन गोष्टी करायच्या. पश्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीने दर्शूच्या नाकाच्या शेंड्याला स्पर्श करायचा, आणि त्याच क्षणी तेवढ्याच काळासाठी स्वत:च्या हाताची तर्जनी पश्याच्या नाकाच्या शेंड्याला टेकवायची.”

“इंटरेस्टिंग. तुम्ही झोनमध्ये आहात, बोलत रहा,” डॉक्टर तल्लीनतेने ऐकत म्हणाले.

“काय? हो. आता हेच काही क्षणांच्याच पण वेगवेगळ्या कालांतराने करत राहायचं. पश्याला- म्हणजे खरं तर त्याच्या मेंदूला- जाणवतं की नाकाला काही तरी चाटून गेलं. नेमकी त्याच वेळी त्याची तर्जनी दर्शूच्या नाकाला लागल्याने तर्जनीला पण स्पर्शाची संवेदना झाल्याचं जाणवतं. पश्याच्या मेंदूत त्याचं नाक कुठे आहे याचं मॉडेल असतं. पण या दोन्ही संवेदना एकत्र झाल्याने आपलीच तर्जनी आपल्या नाकाला लागते आहे असंही वाटतं.” एवढं बोलून आशिष थांबला.

“तर?” मधला पॉज ड्रॅमॅटिक्ससाठी आहे हे जाणवूनही डॉक्टरांना राहवलं नाही.

“पण मेंदूकडे असलेल्या मॉडेलमध्ये एक तिसरा घटकही असतो-हाताची तर्जनी शरीरापासून किती दूर आहे ते डोळे बंद असतानाही ते आपल्याला कळतं.”

“खरंच की.” वेड पांघरून डॉक्टर म्हणाले.

“त्यामुळे मेंदूला फक्त एवढंच वाटत नाही की आपलीच तर्जनी आपल्या नाकाला लागते आहे, तर असंही वाटतं, की ते नाक चांगलं दीड फूट दूर आहे, तेवढ्या लांबीचं आहे.”

“पिनोक्कीओ!”

“त्याही पुढे जाऊन नाक फक्त टीचभर दूर असल्याचं वर्षानुवर्षांचं मॉडेल लगोलग प्रकटतं आणि पुन्हा नाकाला स्पर्श जाणवला की नाक लांब होतं. याप्रमाणे नाकाची लांबी कमी-जास्त होत राहते. करून पहा स्वत: हा प्रयोग.”

डॉक्टर पुन्हा स्वत:शी पुटपुटले- “असलं काही केलं तर प्रॅक्टिस बंद पडायला वेळ लागणार नाही.” मग प्रत्यक्षात म्हणाले, “ब्राव्हो. लिहा की असंच. झाले चांगले दोन-चारशे शब्द इथे.”

ट्रान्समधून बाहेर न येताच आशिष म्हणाला, “दोन-चारशे शब्द? हां, ते.” मग किंचित आश्चर्याने त्याने विचारलं, “तुम्हालाही माहीत आहे फ्लॅश हा प्रकार?”

“फ्लॅशबॅकचा काय संबंध? तुम्हाला शब्दागणिक पैसे मिळतात म्हणून म्हटलं.”

हे ऐकून आशिष सोफ्यावर उठून बसला आणि जरा चिडूनच म्हणाला, “तुम्हाला सेकंदाप्रमाणे पैसे मिळतात, पण शब्दाप्रमाणे पैसे मिळण्याइतकं कुठे मराठी लेखकांचं भाग्य थोर?”

“पण तुमच्या स्पर्धेकरता तर होईल ना लिहून.”

“यात भूत नाही ना आलं! कथांचे जर्म्स खूप असतात हो, पण त्या रोपांची झाडं सहजासहजी होत नाहीत हीच तर शोकांतिका.” पुन्हा थोडंफार हताशपणे कोचावर पसरत आशिष म्हणाला.

डॉक्टर घड्याळाकडे नजर टाकत म्हणाले, “तुम्ही अजून एक-दोन मुद्दे मांडले होते. ब्रेन डॅमेज, अतिभावनिकता वगैरे. माझ्या ब्रेन डॅमेज असलेल्या पेशंट्समुळे त्यांना कशा प्रकारचे भास होतात हे मी पूर्ण जाणून आहे. पण माफ करा, पेशंट्सची माहिती गोपनीय असल्याने तुम्हाला सांगता येणार नाही.”

“त्यांची माहिती नकोच आहे. आपलं बोलणंही तुम्ही कुणाला सांगणार नाही, याच भरवशावर तर तुमच्याकडे येतो मी.”

“गुड. तर कोणते मुद्दे उरले?”

पुन्हा ट्रान्समध्ये शिरत आशिष म्हणाला, “फॅण्टम लिम्बसुद्धा न विसरलेल्या ब्रेन मॅपिंगचाच प्रकार आहे. काही लोकांच्या बाबतीत हात तुटल्यावरही त्या हाताचा मेंदूत असलेला नकाशा अखंड राहिल्याने तो हात दुखत राहू शकतो. पण आता त्यावर मिरर-बॉक्ससारखे उपाय निघाले आहेत, आणि फॅण्टम लिम्बचा चावून चोथा झाला आहे.”

डॉक्टर पुन्हा गालातल्या गालात हसले, “पण फॅण्टम- म्हणजे प्रत्यक्षात नसलेल्या हाताला दुसरी व्यक्ती चावणार कशी?”

“हं, त्याबद्दल चांगली साय-फाय कथा लिहिता येईल कदाचित. खरं तर फक्त लिम्बऐवजी एखादी पूर्ण व्यक्तीसुद्धा फॅण्टम रूपात जाणवू शकते. अशी व्यक्ती त्रास देत असेल तर भूत, मदत करणारी असेल तर सूतच, नाही तर देवदूत. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' हा पण यातलाच प्रकार. सियाचीनसारख्या ठिकाणी कमी प्राणवायू आणि प्रचंड मानसिक दबावाखाली वावरणाऱ्या अनेकांचं मनोधैर्य अशाच भासमान व्यक्तींनी देऊ केलेल्या मदतीमुळे वाढतं.”

डॉक्टर कौतुकमिश्रित आश्चर्य दाखवत म्हणाले, “तुम्ही हे सगळे मुद्दे एकत्र का नाही करत? तुमची माहिती शास्त्रमान्य आहे. नाही झाली गोष्ट तर निदान एखादा चांगला प्रबंध होईल!”

“नाही ना! गोष्टच हवी असते. त्याचंच तर टेन्शन आलं म्हणून इथे आलो. नाही म्हणायला झाली तुमची तशी मदत. टेन्शन ऑलरेडी कमी झाल्याचं जाणवतंय. थँक्यू, डॉक्टर.”

आशिष उठून बसला आणि इकडे-तिकडे पाहत म्हणाला, “डॉक्टर? ...डॉक्टर!”

आशिष महाबळ







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Shreenivas N Mate'20.07.25
कथा फार छान झाली आहे

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results