
‘मुलं ही देवाघरची फुलं' असली तरी लागोपाठ आणि फारच मोहोर आला तर तो एक प्रॉब्लेमच होतो. मोहोर (मुलं) तर गळायचाच, पण प्रसंगी झाडही (बाई) मरायचे.
कोणे एके काळी बरीच मुलं व्हावीत, तेव्हा त्यातील काही मोठी होईपर्यंत टिकायची. तेव्हा बरीच मुलं होणं हे वरदान होतं. ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव', किंवा ‘विठू माझा लेकुरवाळा' किंवा नवरात्रात पुजलं जाणारं जिवतीचं चित्र या साऱ्यांतून हेच तर सांगितलं आहे.
पण जसजसं वैद्यकीय ज्ञान, स्वच्छता, लसी इत्यादींचा परिणाम दिसू लागला, आयुर्मान वाढायला लागलं, तसतसं अधिकाधिक संतती हा वर न ठरता शाप ठरू लागला. अटळ, अवांच्छित गर्भारपण ही एक मोठीच समस्या ठरली. यावर मात करण्यासाठी माणसं सतत युक्त्याप्रयुक्त्यांच्या शोधात होती. कसले कसले काढे, योनीमार्गात ठेवायच्या वनस्पती, लावायचे पडदे (डायफ्रॅम), फेसाळ जेली, पुंबीजनाशकं, गर्भमुखाला लावायची झाकणं, असे आता हास्यास्पद वाटतील असे प्रयत्न चालू होते. त्याला प्रसंगोपात यशही मिळत होतं, पण खात्रीचा उपाय हाताशी नव्हता. प्लॅस्टिकचे लिपीज लूप होते. हे आजच्या तांबीचे (कॉपर टीचे) आजोबा. हे त्यातल्या त्यात खात्रीचे पण फार त्रासाचे होते. तेव्हा, कंडोम भरवशाचं म्हणावं इतके बाकी प्रकार बेभरवशाचे आणि त्रासाचे होते. पण कंडोम वापरातही अनेक गोच्या होत्या. मुळात नवरे कंडोम वापरण्यात यशस्वी होतील याचा भरवसा नाही आणि नवरे यशस्वी ठरले तरी कंडोम यशस्वी ठरेल याचाही नाही (आधुनिक कंडोमचं अपयशाचं प्रमाण २० टक्के).
अशा परिस्थितीत पहिली वहिली गर्भनिरोधक गोळी आली. १९५० सालचा हिचा जन्म. आजही इंग्लिशमध्ये ‘द पिल' म्हणजे दुसरी-तिसरी गोळी नव्हे तर ही ‘गर्भनिरोधक गोळी' असाच अर्थ आहे. बाकी सगळ्या गोळ्या आजाराच्या नावांनी ओळखल्या जातात. तापाची, जुलाबाची, डोकेदुखीची, टीबीची वगैरे; पण ही नुसतीच ‘गोळी'. हेवा वाटावं असं अहम स्थान या गोळीने प्राप्त केलं आहे. आजही कोणा पेशंटला विचारलं ‘आर यू ऑन द पिल?' तर, ‘विच्' हा प्रतिप्रश्न येत नाही. विराट म्हणजे जसं कोहलीच, किंवा लता म्हणजे जसं मंगेशकरच, तसंच काहीसं हे.
ही गोळी अनेक बाबतींत पाहिलटकरीण ठरली.
निरोगी, धडधाकट बायकांनी घ्यायचं हे पहिलंच ‘औषध'.
आधी साधनं होती ती वापरायला डॉक्टरची गरज नव्हती. संततिनियमनाचे अग्रणी रघुनाथ धोंडो कर्वे डॉक्टर नव्हते, पण संततीनियमनाची ‘साधनं' देत होते. पण गोळी डॉक्टरी चिठ्ठीशिवाय मिळत नाही. डॉक्टर चित्रात आल्यामुळे गोळीला अधिक विश्वासार्हता प्राप्त झाली.
कंडोमसारखं साधन वापरायचं तर कामक्रीडेदरम्यान ‘टाइम प्लीज' म्हणावं लागतं. समागमातली सगळी उत्स्फूर्तता, सगळी उत्कटता, सगळा आवेग याचा थेट कचराच की. पण गोळ्या या अधेमधे तडमडत नव्हत्या. तुम्ही तुमचं ‘काम' करा, आम्ही आमचं करतो, हा त्यांचा बाणा. शिवाय, कंडोममुळे लिंगाची आणि योनीमार्गाची थेट भेट होत नाही. या स्पर्शसुखाला पारखं होणं कित्येकांना नकोसं वाटतं. त्या काळचे कंडोमही आजच्या इतके पातळ, मऊसूत आणि ‘चिकनाईयुक्त' नव्हते. गोळ्यांनी हाही प्रश्न मिटला. कंडोम वापरणं न वापरणं हे बरंचसं पुरुषांच्या इच्छेवर होतं. आता हे तो श्रींची इच्छा म्हटल्यावर सौंचा नाइलाजच की! पण गोळी सौंच्या हातात होती.
गोळी ही वापरायला अतिशय सोपी. ठराविक वेळी, गिळा गोळी. बस्स, एवढंच. अतिशय स्वस्त होती गोळी, अजूनही आहे. त्यामुळे गरिबाघरीही पोहोचली ती.
‘एनोव्हीड' या नावाने ही गोळी सुरुवातीला बाजारात आली. त्या पहिल्या जाहिरातीत चित्र होतं ॲन्ड्रोमेडा या ग्रीक देवतेचं. पोसायडॉन या समुद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी हिचा बापच हिला पाताळ पिशाच्च्याच्या तोंडी देणार होता. त्याला ही सहज सापडावी म्हणून हिला समुद्रकिनारी बांधून ठेवलं होतं. त्या पिशाच्च्याचा वध करून हिला बंधमुक्त केलं ते पर्सिअसनी. स्त्रियांना ॲन्ड्रोमेडाप्रमाणेच बंधमुक्त करणारी ही महापराक्रमी गुटिका आहे, असं या जाहिरातीत सुचवलं होतं. ही जाहिरात भविष्यवेधी ठरली खरंच. बायकांना जखडणारे अनेक साखळदंड या गोळीने खळखळा मोकळे केले.
अमेरिकेत तर हे विशेष घडलं. वाढती श्रीमंती, बिनधास्त भोगलोलुपता यांनी बीज पेरलेलंच होतं. गोळीमुळे ते चांगलं तरारून फुटलं. लैंगिकतेत क्रांतीच झाली. उघड उघड लैंगिक संबंध दाखवणारा ‘ब्ल्यू मूव्ही' नावाचा चित्रपट आला. आणि ब्ल्यू फिल्म हा शब्दप्रयोगही. त्या पाठोपाठ असे अनेक बोल्ड सिनेमे आले. तो जमाना फ्लॅपर बायकांचा होता. फ्लॅपर म्हणजे जरा मोकळ्याढाकळ्या वागणाऱ्या, स्वतःला मिरवण्यात कमीपणा न मानणाऱ्या, बॉबकट केलेल्या अशा आधुनिक बायका. गोळी हाती येताच या बायका ‘चेकाळल्या' म्हणता येईल इतकं मोकळं ढाकळं वातावरण निर्माण झालं. नवचैतन्याचा, अनवट आत्मविश्वासाचा दरवळ पसरला. पोरवड्यातून, ‘रांधा वाढा उष्टी काढा' यातून, एकूणच, चूल आणि मूल यापासून सुटका झाली. शिक्षण, नोकरी, धंदा, संशोधन, राजकारण अशी अनेक क्षेत्रं स्त्रियांना खुणावू लागली. आर्थिक स्वावलंबन आलं. कुटुंबात आणि कुटुंबव्यवस्थेत बरीच उलथापालथ झाली.
मातृत्वाचं ओझं पेलणं आता ऐच्छिक झालं. गोळीने नकळतपणे गर्भारपण नाकारण्याचा अधिकार बायकांना बहाल केला. त्यामुळे ‘चुकून' जर दिवस राहिले तर गर्भपाताची मागणी आता स्वाभाविक आणि तर्कसंगत ठरली. ही मागणी आणि तिची पूर्तताही जोमाने पुढे आली. जर गरोदरपण टाळणं हा अधिकार आहे, आणि प्रयत्न करूनही ते शक्य झालं नाहीये, तर उद्भवलेली गर्भावस्था संपवणं हाही अधिकार आहेच म्हणायचा. कायद्याने गर्भपाताला परवानगी देण्याशिवाय आता धुरीणांना गत्यंतर राहिलं नाही. गर्भपाताला सर्वच धर्मांचा कडाडून विरोध आहे. पण गोळीने सुरू केलेले युक्तिवाद अटळपणे गर्भपाताचा अधिकार, कायदेशीर गर्भपात, याच मार्गाकडे बोट दाखवत होते. परिणामी, जगभर गर्भपाताचे कायदे आले ते कालांतराने सैलसर झाले. भारतात निव्वळ ‘गर्भनिरोधक साधन फेल गेलं' या कारणाने गर्भपात करायला कायद्यानी परवानगी आहे. आता प्रत्यक्षात असा प्रयत्न झाला होता वा नव्हता हे कसं पडताळणार? तेव्हा पेशंटचा शब्द हाच पुरावा. थोडक्यात, ‘मागेल तिला गर्भपात' असा आपला कायदा आहे.
समागमाला सतत संतती संभवाची शय्यासोबत होती. ही जोडगोळी गोळीने तोडली आणि उन्मुक्त संभोगसुख शक्य झालं. आलेत संबंध, राहिलेत दिवस, मग आता काय करणार, लावून टाका लग्न! असे मारून मुटकून विवाह कमी झाले. आता उशिरा लग्न केलं तरी चालणार होतं. मग लग्नाची घाई करा कशाला? किंवा लग्नाची उठाठेवच करा कशाला? एकूणच, उशिरा उशिरा लग्न होण्यात आणि लहान लहान वयात शारीरिक संबंधांना सुरुवात होण्यात या गोळीचाही काही वाटा आहे. लग्नाची गरज कमी झाली आणि त्याबरोबर येणाऱ्या आणाभाकांची साथसंगतही संपली. जन्मोजन्मी साथ देण्याच्या वचनाची गरजही आता कमी झाली. बांधिलकी संपली. अवांछित संततीची भीती गेल्यामुळे विवाहबाह्य संबंधातले अडथळे आणि धोके कमी झाले. यामुळे स्त्रियांचा फायदा झाला का तोटा, हा अजूनही वादाचा विषय आहे. पुरुषांचा मात्र फायदाच झाल्याचं अभ्यास सांगतात. मुळात स्त्रियांच्याही काही लैंगिक भावभावना असतात, त्या पुरुषांपेक्षा भिन्न असतात, पुरुषांना वाटतात त्यापेक्षाही भिन्न असतात आणि त्या लग्ननिरपेक्ष असतात हा मुद्दा जोरकसपणे पुढे आला. प्रथमच, पुरुषांप्रमाणे स्त्रियाही आता संततिछायेशिवाय संभोगसुख अनुभवू लागल्या. प्रस्थापित नैतिकतेला या गोळीने जबरदस्त धक्का दिला. श्लील-अश्लील, नैतिक-अनैतिक असे वाद अमेरिकेतही झडले. तिथे गोळी आधी फक्त विवाहित स्त्रियांनाच उपलब्ध होती. काही लोकचळवळी आणि काही कायदेशीर लढायांनंतर ती अविवाहितांना मिळू लागली. पण या स्वातंत्र्याची काही कटू फळंही होती. गोळी उपलब्ध होताच विवाहबाह्य संबंध, गुप्तरोग, कुमारी मातृत्व, गर्भपात, एकल पालकत्व आणि घटस्फोट अशा सगळ्यांतच लक्षणीय वाढ झाली. पण आज इतक्या वर्षांनंतर ताळा मांडला तर एकुणात फायदाच झाला म्हणायचा. आता बायका वाममार्गाला लागणार, बजबजपुरी माजणार, अशी हाकाटी पिटली जात असतानाच बहुसंख्य बायका चक्क शिक्षण आणि करियरच्या मार्गाला लागल्या, कुटुंबसंस्था शाबूत ठेवून स्वतः बंधमुक्त झाल्या.
स्त्री-पुरुष संबंधांना असे वेगवेगळे आयाम गोळीने प्राप्त झाले आहेत. गोळीच्या वाह्यात समाजपरिणामांवर भरपूर खल झाला आहे. मात्र, गोळीमुळे समाजाची चाल बिघडत नाही, असं गोळीचे कर्ते डॉ. जॉन रॉक आणि डॉ. ग्रेगरी पिन्कस यांनी ठासून सांगितलं. आधीही ‘अनैतिक' संबंध होतेच. दिवस राहू नयेत म्हणून युक्त्या-प्रयुक्त्या आधीही वापरल्या जातच होत्या. गोळी ही अधिक प्रभावी पर्याय म्हणून पुढे आली एवढंच. उच्छृंखल वागायला काही गोळी सांगत नाही. तो निर्णय ज्याचा त्याचा असतो. उलट, अशा वागणुकीतून उद्भवणारे दुष्परिणाम गोळीमुळे टळतात. अंधारात टॉर्च तर चोरही वापरतात आणि सावही; मग चोरीला साथ देतो म्हणून टॉर्चला धोपटण्यात काय हशील?
पण अमेरिकन समाजातही गोळीचा प्रवेश हा लपूनछपूनच झाला. ‘असल्या' विषयावर जाहीरपणे चर्चा चर्चला निषिद्ध होती. ‘गर्भनिरोधक'मधील ‘ग'सुद्धा उच्चारायला अमेरिकेत कायद्याने बंदी होती. कोमस्टॉक कायद्यानुसार गर्भनिरोधकाबद्दल बोलणंही अश्लीलतेखाली मोडत होतं. त्यामुळे ही बाजारात आली ती ‘सायकल कंट्रोल'साठी. म्हणजे पाळीच्या अनियमितपणासाठी उपयुक्त म्हणून. ‘या गोळीने बीजनिर्मिती थांबते' असा सावधानतेचा ‘वैधानिक इशारा' तिच्यावर छापला होता. मग डॉक्टर मंडळी ही गोळी इतर काही कारणांनी दिली असं कागदोपत्री दाखवायचे. पुढे कायदे बदलले आणि उजळ माथ्याने गोळी देणं शक्य झालं.
तो काळच तसा होता. दुसरं महायुद्ध संपलं होतं. वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय होता. तेव्हा गर्भनिरोधक साधन, स्वैर लैंगिक संबंध सुकर व्हावेत म्हणून नाही, तर लोकसंख्या आटोक्यात यावी म्हणून हवंहवंसं वाटत होतं. या गोळ्यांचा जन्म खास लोकाग्रहास्तव झाला. पण हा आग्रह सुप्त होता. सरकार, विद्यापीठं, सरकारी संशोधन संस्था यात मुळीच रस घ्यायला तयार नव्हत्या. यात पैसा ओतला तो एका श्रीमंत, उच्चशिक्षित म्हातारीने. हिने जवळपास एकहाती पैसा पुरवला आणि हे संशोधन तडीस नेलं. पंचाहत्तरीची ती समृद्ध वृद्धा होती कॅथरीन मॅक-कॉर्मिक. बाई हुशार होती. एम.आय.टी.तून जीवशास्त्र शिकली होती. स्वतः शास्त्रज्ञ होती. विधवा होती. नवऱ्याच्या गडगंज संपत्तीची वारस होती. स्त्रीकारणात रस घेणारी होती. ‘तेवढा गोळीचा शोध लागला की मी शांतपणे डोळे मिटायला मोकळी' अशी तिची धारणा होती... आणि तिला यासाठी पटवलं अशाच एका वयस्क, चळवळ्या म्हातारीने; मार्गारेट सँगरने. या स्त्रीमुक्तिवादी कार्यकर्तीने या गोळीच्या संशोधनासाठी मोठा निधी उभारला. स्त्री ही मुक्तीच्या मार्गातली धोंड असेलही, पण स्त्रीमुक्तीच्या मार्गात मात्र अटळ गरोदरपण हीच धोंड होती. इवल्याशा गोळीने ती प्रभावीपणे हटवली.
अमेरिकेतील कायदेशीर अडचणीमुळे पहिल्यावहिल्या गोळ्यांची ट्रायल झाली प्युर्तोरिकोमध्ये (मध्य अमेरिकेतील एक देश). तिथे जनता अफाट होती, कायदे जाचक नव्हते आणि उद्भवणाऱ्या गंभीर दुष्परिणामांकडे सरसकट दुर्लक्ष केलं तरी कोणीही त्यात लक्ष घालणारं नव्हतं. पेशंटची संमती, त्यांना संपूर्ण माहिती देणं, त्यातून उद्भवणाऱ्या दुष्परिणामांची संपूर्ण जबाबदारी संशोधकांनी घेणं; या गोष्टी तर त्या काळी संकल्पनांच्या पातळीवरही नव्हत्या. त्यामुळे संशोधन सोपं गेलं, पण कुणा अनामिकांवर अन्याय झालाच झाला.
गोळी आणि तिच्या साइड इफेक्ट्सबद्दल उदंड चर्चा झाल्या आहेत. इथे दुष्परिणामापेक्षा सहपरिणाम हा शब्द मला अधिक योग्य वाटतो. कारण साइड इफेक्ट म्हटलं की ते वाईटसाईटच असणार असं लोकांना वाटतं. वास्तविक असे परिणाम दोन्ही तऱ्हेचे असू शकतात, असतात. गोळीच्या सहपरिणामांबाबत उभय पक्षांनी प्रतिपक्षावर अप्रामाणिकपणाचे आरोप केले आहेत. गढुळलेल्या वातावरणात कधी कधी वाटही हरवली आहे. अशा परिणामांची चर्चा प्रस्तुत आहे, पण त्यांचा बागुलबुवा उभा करणं अप्रस्तुत. शिवाय, गोळीच्या सहपरिणामांची तुलना ही गोळी न घेतल्याने उद्भवणाऱ्या, अवांछित गर्भधारणेच्या परिणामांशी करायला हवी. नकोशा गर्भधारणेमुळे गर्भपात, त्यातली कॉम्प्लिकेशन्स, आर्थिक, सामाजिक कौटुंबिक ताणतणाव, गरिबी, दारिद्य्र हे सर्व वाढीस लागतं त्याचं काय? हे सारं कमी झालं तर कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राचा फायदाच आहे की.
मळमळ, अर्धशिशी, वजन वाढणं, सूज अशा जरा साध्याशा सहपरिणामांपासून ते रक्ताच्या गुठळ्या होणं, हृदयबाधा, शर्कराबाधा, यकृतबाधा अशा गंभीर विकृतींपर्यंत अनेक प्रकार या गोळ्यांनी घडत होते. यातील कोणत्या औषधाने काय घडतंय याची गणितं डॉक्टर आणि संशोधक मांडत होते. एनोव्हीडमध्ये ९.८५ मिलिग्रॅम प्रोजेस्टेरॉन आणि ०.१५ मिलिग्रॅम इस्ट्रोजेन होतं. सर्वांत कमी पण सर्वांत प्रभावी डोस, सर्वांत स्वस्त पण सर्वांत सुरक्षित प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन यांचा सतत शोध सुरू होता, आजही आहे. या साऱ्यामुळे आजच्या गोळ्यांत हेच प्रमाण साधारण ०.३ मिलिग्रॅम प्रोजेस्टेरॉन (सुमारे ३० पट कमी) आणि ०.०२ मिलीग्रॅम ईस्ट्रोजेन (सुमारे आठपट कमी) इतकं कमी असतं. सततच्या संशोधनातून आपण अत्यल्प मात्रेची, अत्यंत परिणामकारक, अधिकाधिक सुरक्षित गोळी बनवू लागलो आहोत. गोळीच्या संशोधनातूनच पुढे गर्भनिरोधकांत अधिक विविधता आली. आता इंजेक्शन, त्वचेखालील इम्प्लांट, योनीमार्गात ठेवायच्या रिंग असे अनेक होर्मोनल पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. काही नॉन-होर्मोनल पर्यायही आहेत. एकुणात, गोळीचं संशोधन बहुप्रसवा ठरलं तर!
गोळ्या घेणाऱ्या हजारांतील एखाद्या स्त्रीला रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात; पण दिवस राहिलेल्यांपैकी दर हजारी तीन बायकांना हा त्रास होतो. म्हणजे गोळाबेरीज करता गोळ्यांनी त्रास कमी होतो असंच म्हटलं पाहिजे. गोळ्यांमुळे अंगावरचे कमी जाते, परिणामी, या कारणासाठी ऑपरेशन करावं लागत नाही. परिणामी, ऑपरेशन आणि तदनुषंगिक आजार/मृत्यू टळतात. हाही मोठाच पण सहसा लक्षात न येणारा फायदा आहे. गोळ्यांनी ग्रीवेचा आणि स्तनाचा कॅन्सर होतो का नाही हा वादाचा मुद्दा आहे, पण गर्भाशयाच्या अस्तराचा आणि स्त्रीबीजग्रंथींचा कॅन्सर टळतो हे निर्विवाद सत्य आहे. तेव्हा परिणाम आणि सहपरिणामांचा विचार संदर्भासहित व्हायला हवा.
गोळीकडे अनेकांनी अनेक नजरांनी बघितलं आहे. स्त्रीवाद्यांनी तर एकूणच गर्भनिरोधन संशोधनावर शरसंधान केलं आहे. हा सारा स्त्रियांविरुद्ध पुरुषप्रधान व्यवस्थेने रचलेला बनाव आहे. सारीच निरोधकंबायकांसाठीच का? पुरुषांसाठी मुळी संशोधनच नाही! हा प्रश्न सँगर, मॅक-कॉर्मिक इत्यादींनाही विचारला गेलाच होता. पण त्यांचं उत्तर होतं, की बायकाच साधनं नीट वापरतील अशी आम्हाला खात्री आहे. न वापरल्याचा त्रास बायकांनाच भोगावा लागणार आहे. पुरुष लेकाचे करून सवरून नामानिराळे! तेव्हा पुरुषांऐवजी बायकांसाठी गोळ्या शोधण्यावर त्यांनी जाणूनबुजून भर दिला. लोकसंख्या नियंत्रणाचं एक भक्कम हत्यार म्हणून गोळी विख्यात आहे. मुक्त कामाचाराला संरक्षण पुरवणारी म्हणून ही कुख्यात आहे. नेमक्या नकोशा लोकांना; म्हणजे काळ्या, दरिद्री, वेड्या, रोगिष्ट, परधर्मी लोकांना; पिल्लावळ होऊ नये म्हणून गोऱ्या, श्रीमंत, शिष्ट, सुदृढ, धर्मवेड्या लोकांना ही हवीहवीशी वाटली आहे. उत्तम प्रतीच्या जाणत्या जनांनाच पुनरुत्पादनाची संधी देऊन, मानवी सुपर-उत्क्रांतीची स्वप्नंही या गोळीच्या बळावर काहींनी पाहिली आहेत. गोळीसारख्या कोणत्याही प्रभावी तंत्रज्ञानाला काळी-पांढरी बाजू असतेच.
लोकसंख्येचा विस्फोट या गोळीने (आणि अन्य साधनांनी) प्रभावीपणे रोखला आहे. लोकसंख्यावाढीचा वेग आता निम्म्यावर आला आहे. (म्हणजे गाडी अजून पुढेच जात आहे, पण शंभर ऐवजी आता पन्नासच्या स्पीडने जाते आहे.) गर्भनिरोधक गोळ्या हा प्रकार आता इतका सर्रास वापरला जातो, की या इवल्याशा गोळीने जगात काय उलथापालथ केली ते आपल्या लक्षातही येत नाही. बंदुकीच्या गोळीनंतर समाजपुरुषाच्या वर्मी लागली ती ही गोळी. कर्वे, फुले, आगरकरांइतकेच या गोळीचेही इथल्या स्त्रियांवर उपकार आहेत. गोळीचा पुतळा उभारता येत नाही एवढंच!
(डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या “आधुनिक वैद्यकीची शोधगाथा” या समकालीन प्रकाशनाच्या पुस्तकातून साभार)