आभासी जगात आपण चॅट, व्हिडिओ कॉल, फेसबुक लाइव्ह करतो. मात्र, या झाल्या नुसत्या गप्पाटप्पा. याशिवाय इतर हजारो प्रकारचे अनुभव घ्यायचे असतील तर? ती संधी मेटाव्हर्समध्ये आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मेटाव्हर्सबद्दल बरंच ऐकायला मिळतंय. काय आहे हे मेटाव्हर्स? तिथे सर्वांना एकाच वेळी एकाच आभासी जगात संचार करता येईल. प्रत्यक्ष त्या जागी असल्याच्या ‘इमर्सिव्ह' अनुभवांची लयलूट असेल. ते जग थ्रीडीमध्ये खऱ्याखुऱ्या जगासारखं असेल किंवा अगदी हटके अद्भुत असेल. आपले ‘अवतार' तिथे आपले प्रतिनिधी असतील. ते तंतोतंत आपल्यासारखे दिसतील, नाही तर एखाद्या सुपरस्टारसारखे दिसणारे करता येतील.
काटेकोरपणे पाहिलं तर मेटाव्हर्स नवीन नाही. व्हर्च्युअल रिॲलिटी गेमिंगमध्ये बहुढंगी इमर्सिव्ह अनुभव मिळतात. तिथेही अवतार घेता येतात. फँटसीयुक्त वातावरण मिळतं. दूरदूरवर पसरलेल्या मंडळींशी एकत्र खेळता येतं.
नील स्टीव्हन्सन या अमेरिकी सायन्स फिक्शन लेखकाने १९९२ मध्ये ‘मेटाव्हर्स' हा शब्द पहिल्यांदा वापरला. वास्तव जगाचा कंटाळा आला की लोक मेटाव्हर्स या पर्यायी थ्रीडी जगात विहरतात अशी कल्पना त्याच्या ‘स्नो क्रॅश' कादंबरीत होती. या मेटाव्हर्सची समाजरचना वेगळी आणि तिथले अनुभव वेगळे. म्हणून ते जग पर्यायी, ऑल्टरनेटिव्ह. आणि रोजच्या आयुष्याच्या ‘पलीकडले' अनुभव देणारं म्हणून मेटा. ही कल्पना अनेकांनी भारीच उचलून धरली.
बऱ्याच कंपन्यांनी ही पर्यायी आभासी जगाची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न केले. ‘सेकंड लाइफ', ‘रेडी प्लेअर वन' किंवा ‘पोकेमॉन गो' असे गेम्स आले. आभासी जगात वापरायला क्रिप्टोकरन्सी आली. ऑक्युलससारखे व्हर्च्युअल रिॲलिटी हेडसेट्स आले. काही छोट्यामोठ्या कंपन्यांनी प्रयत्न करून बघितले. आणि शेवटी फेसबुकने आपली मेटाव्हर्स जाहीर केली. ते बघून एनव्हिडिया ही ग्राफिक्स हार्डवेअर कंपनी आणि मायक्रोसॉफ्टही सरसावलं. या क्षेत्रात आता स्पर्धा झपाट्याने वाढणार आहे म्हणतात. इतक्या प्रमाणात सर्वांनी गुंतवणूक करावी असं मेटाव्हर्समध्ये आहे काय? त्याची इतकी का मोहिनी सर्वांना पडलीय? याचं उत्तर मेटाव्हर्सच्या उपयोगांमध्ये दडलं आहे. वरवर वाटतो तसा मनोरंजन हा एकच उद्देश त्यामागे नाही. व्हर्च्युअल रिॲलिटीचा वापर आज शिक्षणक्षेत्रात, लष्करी प्रशिक्षणात, वैद्यकीय क्षेत्रात होतो. त्या धर्तीवर आणि त्यापलीकडे मेटाव्हर्सचे कित्येक कल्पक वापर करता येतील.
वीसेक वर्षांपूर्वी घरी बसून शाळा, ऑफिस, बँकिंग, खरेदी अशी कल्पना तरी कोणी केली होती का? इंटरनेटने ही करामत केली. उद्या मेटाव्हर्सच्या बाबतीत हेच होणार आहे. मेटाव्हर्समधली खरेदी म्हटली तर घरबसल्या दुकानातल्या कपड्यांचा रंग आणि पोत पाहून ते कपडे घालून बघता येतील, चप्पल-बूट घालून चालून पाहता येईल. किंवा कॉफी शॉपमध्ये मित्रांबरोबरची मजा जशीच्या तशी अनुभवता येईल, कॉफीचा व्हर्च्युअल आस्वादही घेता येईल. वास्तव आणि वास्तवाच्या पलीकडल्या अभूतपूर्व अनुभवांची सरमिसळ हेच मेटाव्हर्सचं मुख्य आकर्षण आहे.
आपल्या अनुभवांवरून कंपन्या डिझाइन्स सुधारतील, नवी उत्पादनं आणतील. उत्पादनतंत्रात अनोखे बदल करतील. कर्मचाऱ्यांचे डिजिटल ट्विन्स ऑफिसमध्ये भेटून काम करतील. शिक्षणाची पद्धत आमूलाग्र बदलून टाकण्याची ताकद या तंत्रज्ञानात आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन, राहून शिकता येईल. प्रयोग करता येतील. हे उपयोग वाढत जातील यात शंका नाही. खासकरून ज्यांना सहज फिरणं शक्य नाही त्यांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक अडचणी बाजूला ठेवून हरतऱ्हेचे अनुभव घेता येतील. एका आयुष्यात जणू अनेक आयुष्यं जगून होतील. इंटरनेटच्या आधी आणि नंतर यात जसा प्रचंड प्रमाणात फरक आहे तसाच फरक मेटाव्हर्समुळे दिसेल.
पण मेटाव्हर्सची मोहिनी किती टिकेल? सध्या जगभरातले ऑनलाइन अनुभव मिळत असतानाही पर्यटन दुप्पट वेगाने सुरू आहे. ऑनलाइन खरेदी होते तरी दुकानं ओस पडलेली नाहीत. तसं मेटाव्हर्सचं होईल का? नवलाई कमी झाल्यावर लोक कंटाळतील का? दुसऱ्या नव्या तंत्रज्ञानाकडे वळतील का? की उलट होईल? त्यांना पर्यायी जगात अवताराचे मुखवटे घालून राहायला जास्त आवडेल का? खरं जग नकोसं वाटू शकेल का? येता काळ असे अनेक प्रश्न उभे करणार आहे आणि त्यांना तोंड द्यायला आपल्याला सज्ज राहावं लागणार आहे.
मेघश्री दळवी
मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
