कॉक्रोच जनता पार्टीचं (CJP) सोशल मीडिया पेज सुरू झाल्यापासून मी त्यांना फॉलो करतोय. एक मीम म्हणून ही पार्टी सुरू झाली. पण त्याहून जास्त ते काय करणार, असं मलाही वाटत होतं. पण आपल्यासारख्या मुला-मुलींच्या प्रश्नांबद्दल कुणीतरी बोलतंय, याचा आनंदही होता. त्यामुळे त्यांच्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्ट्स मी रोज बघत होतो.
नीट परीक्षेचा पेपर फुटला, त्याच काळात माझा बारावीचा निकाल लागला. सीबीएसईने यावर्षी पेपर तपासणीमध्ये आणि निकालात खूप घोळ घातले होते. बरं, फेरतपासणी करायचं म्हटलं तर सुरुवातीला त्याची फीसु्द्धा खूप जास्त ठेवली होती. नंतर बहुतेक विद्यार्थांच्या आणि पालकांच्या रोषामुळे ती कमी केली गेली. त्याच काळात आमची CUET ची परीक्षा झाली. या परीक्षेतही काहीतरी घोळ झाल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे आमची खूपच चिडचिड होत होती. नेमकं तेव्हाच अभिजित दिपके आणि त्याच्या CJP ने विद्यार्थांसाठी आंदोलन करायचं ठरवलं. त्यामुळे आपणही त्यात भाग घेतला पाहिजे असं मला वाटू लागलं. शिवाय सोनम वांगचुकही या आंदोलनाला पाठिंबा द्यायला येणार होते. मग मी सहा जूनला जंतर मंतरवर पोचलो. तिथे अपेक्षेइतकी गर्दी नव्हती. पण तरी त्यादिवशी माझ्या बर्याच मुलांशी ओळखी झाल्या, त्यांच्याशी बोलता आलं, त्यांचे विचार कळले. माझा आवडता युट्यूबर समदीश भाटियाही मला त्यादिवशी तिथे भेटला.
त्यानंतरही आंदोलनात काय चालू आहे, याकडे माझं रोज लक्ष होतं. माझ्या मित्र मंडळींपैकी काहींना आंदोलनाला पाठिंबा द्यायचा होता. आम्ही एकत्र जाण्याचा प्लॅन करत होतोच, तेवढ्यात अचानक एक दिवस सरकारने उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना किडनॅप केल्याप्रमाणे तिथून उचलून नेलं. ते आम्हाला अजिबात आवडलं नाही. आम्ही दोघा मित्रांनी त्याचवेळी ठरवून टाकलं, दुसऱ्या दिवशीच्या मोर्च्यात आपणही सामील व्हायचं. मला वाटतं माझ्यासारख्या अनेकांनी त्यावेळी असा निर्णय घेतला असणार..
हेही वाचा - जेन झींनी एका दिवसात देशाला काय दिलं?
मोर्च्याच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता मी आणि माझा मित्र देव शर्मा जंतर मंतरवर पोचलो. तिथे आधीपासूनच सगळीकडे जॅमर्स लावलेले होते. तर काही लावले जात होते. मोर्चा नऊ वाजता सुरू होणार होता. नेट आणि फोन दोन्ही बंद केले गेले होते. आम्ही स्टेजच्या मागच्या बाजूला होतो. आमच्या आणि स्टेजच्या मध्ये बॅरिकेड्स होते. स्टेजवर अभिजित आणि त्याचे इतर साथीदार मुलांशी बोलत होते. पण आम्हाला तिथे पोचता येत नव्हतं. समोर नक्की काय चाललंय, हेही कळत नव्हतं. आम्ही बाकी मुलांसोबत वंदे मातरम, धर्मेंद्र प्रधान इस्तिफा दो, अशा घोषणा देत थांबलो होतो.
जवळपास साडेदहा वाजले तरी आम्हाला आता पुढे काय करायचं आहे, कुठे जायचं आहे ते समजलं नव्हतं. अजूनही नेट आणि फोन बंदच होते. काहीतरी खाऊन घेऊ म्हणून शोधाशोध करत आम्ही थोडे दूर आल्यावर माझा आईशी एसएमेसवर संपर्क झाला. तिच्याकडून आम्हाला कळलं की मोर्चा केव्हाच पुढे जाऊन पटेल चौकात पोचलाय. त्यावेळी आमच्या लक्षात आलं की यांनी इंटरनेट आणि फोन बंद करून मुलांना डिव्हाइड केलं होतं. मुलं पूर्ण स्ट्रेन्थने मोर्च्यात जाऊ नयेत, यासाठी त्यांनी तसं केलं होतं.
मग आम्ही पुन्हा जंतर मंतरपाशी आलो आणि पटेल चौकाकडे जाण्याचा रस्ता शोधू लागलो. पण बहुतेक पटेल चौकात लाठीचार्ज होतोय, तिथे खूप गर्दीही आहे. त्यामुळे तिथे जाण्याऐवजी टॉलस्टॉय मार्गावर मुलं आहेत, त्यांच्यासोबत जा असं आईने आम्हाला सांगितलं. पण इंटरनेट सुरू नव्हतंच, जीपीएस पण चालत नव्हतं, त्यामुळे रस्ते सापडत नव्हते. आम्ही तिथेच वेगवेगळ्या रस्त्यांवर बराच वेळ फिरत राहिलो. शेवटी कंटाळून आता घरीच जावं का, असाही विचार मनात आला. पण बहुतेक मेट्रो स्टेशन्स बंद केली होती. फक्त मंडी हाऊस किंवा बाराखंबा रोड एवढी दोनच स्टेशन्स सुरू आहेत. घरी यायचं असेल तर तिथून यावं लागेल, असं आईकडूनच कळलं.
मेट्रो स्टेशनकडे जायचा रस्ता शोधताना अचानक आम्हाला संसद मार्गाकडे चाललेले मुलांचे घोळखे दिसले. आम्ही दोघं त्या मोर्च्यात सामील झालो. रस्त्यातले बरेच बॅरिकेड्स खाली पडलेले होते. ते ओलांडून आम्ही पुढे निघालो. एवढंच नव्हे तर पोलिसांनीच काही बॅरिकेडस बाजूला करून आम्हाला रस्ता मोकळा करून दिला. त्यांनी असं कसं केलं असं वाटत असतानाच त्याचं उत्तर मिळालं. सगळी मुलं पुढे गेल्यावर त्यांनी मागचे बॅरिकेड्स पुन्हा लावून रस्ता अडवला आणि अश्रुधुराचे गोळे फोडायला सुरवात केली. पुढेही रस्ता बंद केलेला होता. त्यामुळे आम्हाला अश्रुधुरापासून बचाव करायला मार्गच राहिला नाही. आम्हाला रस्त्यात कोंडून ठेवलं गेलं होतं. काहीजण बॅरिकेड्सवरून उड्या मारून अश्रुधुरापासून वाचण्याचा प्रयत्न करत होते. पण बॅरिकेडस ओलांडून जावं तर तिथेही लाठीहल्ला आणि अश्रुधूर होताच. सभोवताली सगळीकडे फक्त आणि फक्त अश्रुधूरच होता. तिथून बाहेर पडायला रस्ताच नव्हता. नंतर मला कळलं की खरं तर असे निषेधाचे मोर्चे किंवा सभा असेल तर जमावाला तिथून परत जाण्यासाठी एखादा तरी जायचा रस्ता मोकळा (एक्झिट रुट) ठेवावा लागतो. पण तिथे असा कोणताही रस्ताच नव्हता. मोठमोठ्या डिटीसीच्या बस उभ्या करून पोलिसांनी आजूबाजूचे सगळे रस्ते आणि छोट्या गल्ल्या अडवल्या होत्या. एक तर पुढे संसदेपर्यंत जा आणि मार खा किंवा जिथे आहात तिथे किमान अश्रुधूर तरी खाच, असं पोलिसांचं म्हणणं होतं.
तिथे आम्हाला आमच्यापेक्षा थोड्या मोठ्या तीन मुली भेटल्या. त्या घाबरून पॅनिक झाल्या होत्या. त्यांना आम्ही आमच्याजवळ असलेलं थोडं पाणी दिलं. एकत्र फिरलो तर थोडं सुरक्षित वाटेल म्हणून त्यासुद्धा आमच्याबरोबर चालायला लागल्या. अश्रुधुरापासून बचाव करत आम्ही ली मेरिडियन हॉटेलजवळच्या युथ काँग्रेस ऑफिसमध्ये पोचलो. तिथल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला आत घेतलं. बसायला जागा, तोंड धुवायला-प्यायला पाणी दिलं. ही खाजगी मालमत्ता आहे. इथे पोलिस येणार नाहीत, असं त्यांनी आम्हाला सांगितलं.
तिथे आमच्यासारख्या बर्याच जणांनी आसरा घेतला होता. तिथे आम्हाला खरंच सुरक्षित वाटू लागलं. तिथून घरी कसं परत कसं जायचं याचा आम्ही विचार करू लागलो. नशिबाने तिथे आईशी एसएमएसवर संपर्क होत होता. ती आम्हाला तिथून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तिच्या काही पत्रकार मित्रांना संपर्क करत होती. तिच्याकडून आम्हाला कळलं कि पोलिस पत्रकारांनासुद्धा मारहाण करत आहेत. याचदरम्यान पोलिसांनी चक्क आम्ही होतो त्या इमारतीच्या आत अश्रुधुराचे बॉम्ब फेकायला सुरुवात केली. पहिला बॉम्ब गेटजवळ पडल्यावर आम्ही थोडे आतल्या दिशेला गेलो, तर दुसरा बॉम्ब तिथल्या राजीव गांधींच्या पुतळ्याशेजारी पडला. आम्ही त्या इमारतीच्या आत जायला लागलो, तसा त्या खोलीच्या दरवाज्यात पुढचा अश्रुधुराचा गोळा पडला. त्या खोलीत कोंडले जाऊन अश्रुधुराने चोक होतो की काय अशी भीती वाटू लागली, पण नशिबाने मागच्या दारातून आम्हा सर्वांना बाहेर पडता आलं. आम्ही थोडा वेळ मागच्या लॉनवर थांबलो होतो. आमच्यासोबत असलेल्या एका मुलीने तिच्या मित्राला संपर्क करून तिथे बोलवलं. तो तिथून आम्हाला बाहेर घेऊन गेला.
हेही वाचा - कॉकरोच आंदोलनाविषयी तरुण काय विचार करतात?
ते दोघे आणखी काही वेळ मोर्च्यात थांबणार होते. आम्ही मात्र तोपर्यंत खूप थकलो होतो. शारीरिक थकव्यापेक्षा सरकार आणि पोलिसांच्या वर्तणुकीबद्दल प्रचंड चीड, आणि भीती यामुळे मानसिक थकवा वाटायला लागला होता. सकाळपासून काही खाल्लंही नव्हतं. आता यानंतर तिथे थांबून अश्रुधुराचा आणि लाठीचार्जचा सामना करू शकू असं आम्हा दोघांनाही वाटेना. त्या भय्याने आम्हाला गल्ली बोळांमधून बाहेर काढत मंडी हाऊस मेट्रो स्टेशनकडे जाण्यासाठी ऑटोमध्ये बसवून दिलं. तिथून मट्रो स्टेशन चार-पाच किलोमीटरवर होतं. वाटेत आम्हाला आणखी एक मुलगी दिसली. ती बहुतेक पोलिसांच्या मारहाणीमुळे किंवा मारहाण बघितल्यामुळे काहीतरी ट्रिगर होऊन तिचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वाटत होतं. ती डोकं हातात घेऊन मुझे मत मारो, मुझे मत मारो म्हणत ओरडत होती. तिला मदत करायला जाणार्या व्यक्तीला घाबरत होती. असं काय बघितलं होतं तिने काय माहीत!
शेवटी सव्वाचार वाजता आम्ही घरी पोचलो. घरी पोचल्यावर इंटरनेट सुरू झालं. थोडाफार लाठीहल्ला होताना आम्हाला दिसला, पण घरी पोचल्यावर आम्हाला पोलिसांच्या लाठीचार्जच्या, मारहाणीच्या कहाण्या वाचायला, बघायला मिळाल्या.
त्यादिवशी पोलिस काहीही न बघता अश्रुधूर सोडत होते, मारहाण करत होते. समोर लहान मुलं आहेत, बायका आहेत, शांतपणे आंदोलन सुरू आहे, लोक काहीही न करता फुटपाथवर उभे आहेत की घरी परत चालले आहेत हे न बघता लाठीचार्ज होत होता. अश्रुधूर सोडला जात होता. आम्ही जास्त मारहाण तर नाही बघितली, पण भरपूर अश्रुधुर झेलला. आम्ही मास्कचं मोठ्ठं पाकिट सोबत घेऊन गेलो होतो. प्रत्येक अश्रुधुराच्या गोळ्यानंतर मास्क बदलत होतो, तोंड आणि डोळे धूत होतो, शिवाय मध्येच थोडा वेळ पाऊसही येऊन गेला. त्यामुळे बहुतेक आम्हाला तितका त्रास झाला नाही.
गोदी मीडियाच्या बातम्यांमध्ये मात्र सगळं उलटंच दाखवलं जात होतं. आंदोलकांनीच हिंसाचार केला, अशा बातम्या दिल्या जात होत्या. त्या पाहून आम्हाला वाटलं आम्ही भलत्याच मोर्च्यात गेलो होतो की काय! आंदोलकांपैकी सगळ्यांनीच चूपचाप मार खाल्ला असेल असं मी म्हणत नाही, काहीजणांनी प्रतिकार किंवा पलटवार केला असू शकतो. पण पोलिसांनी केलेल्या मारहाणीची त्याच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. सुरुवात पोलिसांनी केली हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. पोलिसांनी आणि सरकारने मुलांना घाबरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण मुलं घाबरली नाहीत. ती डटून राहिली. त्यानंतर मी पुन्हा आंदोलनात सहभागी होऊ शकलो नाही. पण लवकरच परत जाणार आहे.
हेही वाचा - कॉक्रोच आंदोलनामुळे निर्माण झालेले प्रश्न
युथ काँग्रेसच्या ऑफिसमध्ये एक काका आमच्यासारखेच आसऱ्याला आले होते. ते स्वतः आरएसएसचे कार्यकर्ते होते. पण या प्रकरणात सरकारची चूक होतेय, असं त्यांना वाटत असल्यामुळे ते मुलांना पाठिंबा देण्यासाठी मोर्च्यात सामील झाले होते. माझे बरेच मित्र आंदोलनात सहभागी झालेत किंवा स्वतः सहभागी होऊ शकले नसतील तरी त्यांचा आंदोलकांना पाठिंबा आहे. दिल्लीतून नुकतीच पुण्याला शिकायला गेलेली एक मैत्रीण तिथल्या आंदोलनातही सहभागी झाली.
आंदोलनाला आणि त्यात सहभागी झाल्यामुळे मला आणि माझ्या पालकांना ट्रोल करणारे, शिव्या देणारेही एक-दोन लोक भेटले. पण तसे लोक कमी होते.
माझ्यासाठी हे आंदोलन राजकीय नाहीय. शिक्षणासारख्या आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यासाठी केलं गेलेलं अराजकीय आंदोलन आहे. शिक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्या विद्यार्थ्यांनी पुढे यायलाच हवं. लोकांना वाटतंय हे आंदोलन फक्त नीट आणि तत्सम परीक्षांपुरतं आहे. पण तसं नाहीये. हा आताचा मुद्दा आहे. आताचा ट्रिगर आहे. इतरही अनेक मुद्दे यात लावून धरले जाताहेत. लावून धरले जायला हवेत. त्यासाठी पालकांनाही पुढे यायला हवं. उच्च शिक्षण म्हणजे नीट आणि जेईई इतकंच नसतं हे मुलांना आणि पालकांना कळायला हवं. मी ह्युमॅनीटीजचा विद्यार्थी आहे. आपल्याकडे फक्त अभ्यासाची इच्छा नसणारी किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याची इच्छा असणारी मुलंच कला शाखेकडे वळतात. अभ्यास करण्यापेक्षा पाठांतरावर भर दिला जातो. खरं तर माझी शाखा फिलॉसॉफर्स तयार करते, मुलांना विचार करायला शिकवते. त्यामुळे त्याकडे मुलांनी वळायला पाहिजे. गंभीरपणे त्याकडे बघायला पाहिजे. पण कोणी लक्षच देत नाही. The Indian education system doesn't really produce thinker. It produces workers. we are not taught in school or home to think on our own. हे बदलणं गरजेचं आहे. सध्याच्या अभ्यासक्रमात उलटच होतंय. मुलांना प्रश्न विचारायला शिकवलं जात नाही. त्यांनी प्रश्न विचारले तर त्यांना गप्प बसवलं जातं. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावरची सरकारची प्रतिक्रिया हे त्याचंच उदाहरण.
पण आता किमान आम्ही तरुण मुलं एकत्र येतोय. कदाचित पुढे काहीतरी चांगलं घडवू.
(फोटो सौजन्य - आयाम देपुरी, देव शर्मा)
