आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

एक होता व्हॅन गॉग

  • वसंत आबाजी डहाके
  • 29.03.26
  • वाचनवेळ 28 मि.
van gog

'फांद्या छाटलेल्या, पानं गळालेल्या विलोवृक्षांची रांग कधी कधी भिक्षागृहातील माणसांच्या रांगेसारखी दिसते. मक्याच्या कोवळ्या कणसांमध्ये काही तरी निर्मळ आणि कोवळं असं आहे, की झोपी गेलेल्या बाळाकडे पाहून जी भावना उदय पावते तसं काहीसं होतं. रस्त्याच्या कडेचं तुडवलेलं गवत झोपडपट्टीतल्या माणसांसारखं थकलेलं आणि धूळमाखलं दिसतं. काही दिवसांपूर्वी पाऊस पडत असताना मी पांढऱ्या कोबींचा एक वाफा पाहिला. गारठलेला आणि बधिर. तेव्हा मला भल्या सकाळी कॉफीच्या टपरीभवती उभ्या असलेल्या, पातळ झगे आणि जुन्या शाली पांघरलेल्या स्त्रिया आठवल्या.'

गेल्या शतकातला युरोपातला महत्त्वाचा अन् जगविख्यात चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने आपला छोटा भाऊ थिओला लिहिलेल्या एका पत्रातली ही वाक्यं आहेत. व्हिन्सेंटच्या बाबतीत शेतं आणि माणसांचं जग एकाकार झालेलं होतं. त्यातही त्याला त्याच्या सभोवतालच्या तळागाळातल्या, कष्ट करणाऱ्या आणि अभावांनी ग्रासलेल्या जगाविषयी प्रचंड कळवळा होता. खेड्यापाड्यांत राहणाऱ्या, घाम गाळणाऱ्या या कष्टकऱ्यांविषयी व्हिन्सेंटला वाटणारा जिव्हाळा त्याच्या पत्रांतून, रेखाटनांतून, रंगचित्रांतून व्यक्त झाला आहे. व्हिन्सेंट स्वतःला 'शेतकरी चित्रकार' (पेझंट पेंटर) म्हणवून घेत असे. त्याने म्हटलं आहे- 'मला ग्रामीण परिसरात आलं की घरी आल्यासारखं वाटतं. खाण कामगारांसोबत, विणकरांसोबत, जमिनीत कुजलेल्या वनस्पती खोदून काढणाऱ्यांसोबत आणि शेतकऱ्यांसोबत आगटीसमोर बसून मी कित्येक संध्याकाळी घालवल्या त्या उगीच नव्हे. दिवसाच्या प्रत्येक प्रहरातलं शेतकऱ्यांचं जगणं मी बघत आलो आहे. त्यामुळे मी त्यात इतका मग्न होऊन गेलो आहे की दुसऱ्या कशाचाही विचार मी करत नाही. खरं तर मला या ग्रामीण परिसराच्या काळजात खोल खोल शिरायचं आहे आणि त्याची चित्रं काढायची आहेत, आणि याशिवाय माझी दुसरी कसलीही इच्छा नाही. मला जाणवतंय की माझं खरं काम तिथेच दडलेलं आहे. म्हणून माझा हात नांगरावर असेल आणि माझी नांगरट शांतपणे चाललेली असेल.'

van gog

शेवटच्या या रूपकात्मक वाक्यातून व्हिन्सेंट सुचवतो आहे की त्याच्या कलेची मुळं कष्ट करणाऱ्यांच्या भूमीतलीच आहेत. शहरी चित्रकारांची ग्रामीण परिसराची, शेतकऱ्यांची चित्रं पाहून त्यात पॅरिसच्या एखाद्या उपनगरातलं जनजीवन व्यक्त झालं आहे, असं व्हिन्सेंटला वाटायचं. त्याच्या मते, हे चित्रकार शेतकऱ्यांच्या जगण्यात खोलवर उतरलेले नसल्यामुळेच त्यांच्या चित्रांमधले शेतकरी आणि त्यांच्या भवतीचा परिसर सुबक-सुंदर असा व्यक्त झालेला असायचा. त्यामुळे त्यांची चित्रं काल्पनिक आणि तथाकथित सुंदर परिसरांची आणि व्यक्तींची वाटत असत. व्हिन्सेंटच्या चित्रांतून मात्र ती माणसं आणि त्यांच्या भोवतीचा परिसर येतो तो तिथल्या माणसांच्या कष्टांसह आणि त्यांच्या व्यथांसह.

व्हिन्सेंट व्हॅन गॉग नेदरलँडचा. ३० मार्च १८५३ रोजी दक्षिण नेदरलंड्समधील झुंडर्ट या छोट्याशा गावी त्याचा जन्म झाला. तिथेच त्याचं बालपण गेलं. त्याचे आजोबा आणि वडीलही धर्मगुरू होते. पण व्हिन्सेंटच्या वडिलांचे तीन भाऊ चित्रकलेच्या व्यवसायात होते. त्यापैकी एकाचं हेग या शहरात असलेलं चित्रकृतीच्या खरेदी-विक्रीचं दुकान पॅरिसमधल्या 'गोपील अॅन्ड साय' या प्रसिद्ध कंपनीशी संलग्न होतं. १८६९ मध्ये अवघ्या १६ व्या वर्षी व्हिन्सेंट या कंपनीत काम करू लागला. पुढे त्याचा लहान भाऊ थिओही याच कंपनीत दाखल झाला. कामाच्या निमित्ताने रोज कलाकृतींशी सबंध येत गेल्याने त्याच्यातील कलाकार जागा झाला. कामासाठी लंडनला मुक्कामी असताना त्याने अनेक प्रसिद्ध ब्रिटिश चित्रकारांच्या कलाकृती पाहिल्या. प्रचंड वाचन केलं. आणि इथेच त्याने पहिल्यांदा रेखाटनं काढायला सुरुवात केली. लंडनच्या मुक्कामात त्याचं घरमालकिणीच्या मुलीवर एकतर्फी प्रेम बसलं; पण तिच्याकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. प्रेमभंगाच्या दुःखातच १८७४ साली तो घरी गेला आणि आई- वडिलांबरोबर काही काळ राहिला. या काळात तो खूपच एकलकोंडा झाला होता.

लंडनला परतल्यानंतर १८७५ मध्ये त्याची पॅरिस इथे बदली झाली, पण त्याचं मन कामातून उडून गेलं होतं आणि त्याला चित्रकलेचे वेध लागले होते. कंपनीत काम करण्याऐवजी तो म्युझियम आणि गॅलरीजमध्ये आपला वेळ घालवत असे. त्यावर्षी ख्रिसमसला परवानगी न घेता घरी गेल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं. मग २३ वर्षांचा तरुण व्हिन्सेंट लंडनच्या एका उपनगरातील शाळेत काम करू लागला. या उपनगरातील दारिद्र्य पाहून त्याला आपण धर्मोपदेशक व्हावं असं वाटू लागलं. पुढे तो थिओलॉजी शिकायला अॅमस्टरडॅमला गेला; पण तिथला अभ्यासक्रम न झेपल्यामुळे तो अर्ध्यावरच टाकून तो गावी परतला. त्यानंतर दोन वर्षांनी तो धर्मोपदेशकाचा अभ्याक्रम पूर्ण करण्यासाठी ब्रुसेल्सला रवाना झाला; पण त्या कामासाठी तो योग्य नसल्याचं त्याला सांगण्यात आलं. एकूण परिस्थिती हताश करणारी होती.

हेही वाचा - धागा धागा रेखाटताना

व्हिन्सेंटच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आलेला अतिशय कठीण काळ होता हा. पण याच काळात व्हिन्सेंट आपल्या आसपासच्या समाजाकडे उघड्या डोळ्यांनी पाहू लागला. स्वतःच्या जीवनातल्या अस्थिरतेमुळे, अपयशांमुळे असेल किंवा लहानपणी छोट्या गावात घालवलेल्या काळामुळे असेल, संवेदनशील व्हिन्सेंटला समाजातल्या शेतकरी-गरीब- कष्टकरी वर्गाशी आपलं काहीतरी नातं आहे असं वाटू लागलं आणि हा वर्ग हाच आपला चित्रविषय याचीही खुणगाठ पटली. या शेतकऱ्यांचं अन् कामगारांचं आयुष्यं रेखाटणारी अनेक चित्रं त्याने या काळात काढली.

तो रेखाटनं करायचा, तेव्हा ती केवळ परिसराची किंवा व्यक्तींची नसायची. कष्टकरी समाजाच्या भावभावनांशी एकरूप झाल्यामुळे त्याच्या चित्रकृतींमधून या समाजाच्या वेदना, व्यथा, त्रस्तता, निराशा प्रतिबिंबित होत असे. ती व्हावी, असा व्हिन्सेंटचा आग्रह असे. त्यासाठी कितीही परिश्रम घेण्याची त्याची तयारी असे. म्हणूनच त्याच्या अनेक चित्रांची एकाहून अधिक रेखाटनं आपल्याला बघायला मिळतात. उदा. हातात कुदळ घेतलेल्या माणसाचं चित्र त्याने पाच वेळा काढलं आहे. खोदणाऱ्याची वेगवेगळ्या अवस्थांतली चित्रं त्याने काढली आहेत. शेतात बियाणं टाकणाऱ्याची चित्रं दोन दोन वेळा काढली आहेत, हातात झाडू घेतलेल्या मुलीची अशीच दोन चित्रं आपल्याला बघायला मिळतात. पांढरी टोपी घातलेल्या, बटाटे सोलणाऱ्या बाईचं, हातातल्या काठीवर रेललेल्या मेंढपाळाचं, माळरानावरच्या म्हाताऱ्या आजारी शेतकऱ्याचं अशी अनेक रेखाटनं त्याने केली. ही रेखाटनं म्हणजे केवळं व्यक्तिचित्रणं न होता ती त्या समूहाच्या सुखदुःखांचा आरसा व्हावीत, यासाठी त्याचा प्रयत्न होता.

van gog

व्हिन्सेंटने बुटांच्या जोड्यांची तीन चित्रं काढली आहेत. तिशीमध्ये असताना साधारण १८८६-८८ च्या दरम्यान. यातल्या दोन चित्रांमध्ये बुटांची एक जोडी आहे, तर दुसऱ्या चित्रात तीन जोड्या आहेत. बाह्यतः ही चित्रं स्टिल लाइफ या चित्रप्रकारात जमा होणारी वाटतात. (तशी फुलं आणि फुलदाणी प्रकारातली चित्रं व्हिन्सेंटने केलेली आहेतच.) परंतु बुटांची ही चित्रं वेगळी आहेत. आयुष्यभर वणवण केलेल्या चित्रकाराने ही काढलेली आहेत हा एक भाग आहेच; परंतु फाटून गेलेल्या, तळ झिजलेल्या, घासून गेलेल्या आणि आता अगदी निरुपयोगी झालेल्या बुटांची चित्रं काढावीत असं त्याला वाटलं यातून त्याला काही तरी सुचवायचं आहे का? तसा कोणताही आविर्भाव चित्रांत नाही. ते फाटलेले बूट आहेत. ते व्हिन्सेंटचे असतील अथवा कुणा शेतकऱ्याचे, कामगाराचेही असतील. या बुटांच्या जोड्यांतून खूप झालेलं चालणं दिसतं आणि त्या बुटांसारखंच वापरून फाटून गेलेलं, झिजलेलं, उसवलेलं जगणंही दिसतं. खुद्द व्हिन्सेंटचं आयुष्यही असंच गेलेलं होतं. वाटचाल, प्रवास, स्थलांतर, वणवण हिंडणं, दिशाहीन भटकणं. कायम अस्थिर असलेल्या, दाही दिशा भटकाव्या लागलेल्या त्याच्या आयुष्याचं हे प्रतीकात्मक चित्रण आहे का? की त्याच्या आसपासच्या भणंगांच्या आयुष्याचं ? काबाडकष्ट करणाऱ्या लोकांविषयीची सहानुभूती या चित्रांतून व्यक्त झाली आहे का? असा काही अर्थ शोधला नाही तरी व्हिन्सेंटने इथे पारंपरिक चित्रणाला छेद दिलेला आहे हे स्पष्ट दिसतं. सबंध चित्रावकाशात त्या फाटक्या कुरूप बुटांवरच आपली नजर स्थिर होते. बुटांच्या जोडीभवतीचा रिक्त,वर्याद अवकाश आणि त्यात हे फाटलेले, उघडलेले बूट मला या चित्रात व्हिन्सेंटची खेड्याविषयीची आणि खेडुताविषयीची बांधिलकी दिसते.

व्हिन्सेंटची ख्रिस्तावर आणि बायबलवर प्रचंड श्रद्धा होती. तो बायबलचं पारायण करत असे. बायबलमधून आपल्या आणि इतरांच्या मनाला शांती मिळेल असं त्याला वाटत असे. कदाचित बायबलवरच्या आणि ख्रिस्तावरच्या श्रद्धेतूनच त्याला दारिद्री, कष्टकरी जनसामान्यांविषयी कळवळा वाटू लागला होता. या लोकांना अज्ञानाच्या, गैरसमजुतीच्या काळोखातून बाहेर काढावं यासाठी त्याला धर्मप्रचारक व्हायचं होतं. त्यासाठी तो भटकत होता. लोकांची स्थिती बघत होता. त्यातूनच शेतकऱ्यांचं अन् कष्टकऱ्यांचं जगणं किती कठीण आहे हे त्याला उमगलेलं होतं. जगण्यासाठी पाहिजे असलेली ऊर्जा ते कुठून मिळवतात, असा प्रश्न त्याला पडत असे.

या काळात त्याचं स्वतःचं आयुष्यही बऱ्यापैकी अस्थिर होतं. धर्मप्रचारक होण्याच्या त्याच्या धडपडीच्या काळातच त्याला खाण कामगारांच्या वस्तीत जाऊन राहायची तीव्र इच्छा झाली. तिथे आपली अधिक गरज आहे असं त्याला वाटत होतं मग १८७८ मध्ये दक्षिण बेल्जियममधल्या बोरिनाज या भागात तो जाऊन राहिला आणि तिथल्या खाण कामगारांची स्थिती त्याने जवळून पाहिली. इतस्ततः विखुरलेल्या त्यांच्या तहान लहान झोपड्या, त्या घरांची शेवाळलेली छपरं, कोळशाच्या भुकटीने माखलेली खाण कामगारांची शरीरं, उंच धुराडी आणि कोळशांचे ढीगच ढीग, पांढऱ्याशुभ्र बर्फावरून चालणारी इथली काळी माणसं पाहिल्यावर व्हिन्सेंटला वाटायचं, की शुभ वर्तमानाच्या पृष्ठावर असतात तशी ही पांढऱ्या कागदावरची काळी अक्षरंच आहेत.

हेही वाचा - सुभाष अवचट : अमूर्ताच्या शोधात चित्रकार

या वस्तीत काही काळ राहिल्यानंतर त्याला तिथल्या भयावह स्थितीची जाणीव झाली होती. या कामगारांचं हलाखीचं जगणं पाहून तो खूप अस्वस्थ झाला होता. त्याला हे खाण कामगार दुबळे आणि तापामुळे फिकटलेले वाटत होते. ते थकलेले, सगळं काही ओरबाडून घेतल्यासारखे दिसत होते आणि वयाच्या मानाने फार आधीच म्हातारे झालेले दिसत होते. स्त्रियाही निस्तेज आणि क्षीण झालेल्या दिसत होत्या. खाणीच्या आसपासच या कामगारांच्या झोपड्या, धुराने काळवंडलेली - वठलेली झाडं, काटेरी कुंपणं, उकिरडे, राखेचे ढिगारे आणि निरुपयोगी कोळशांचे ढीग पडलेले होते. खाण कामगारांचं हे जगणं व्हिन्सेंट जवळून अनुभवत होता आणि ते सगळं आपल्या आत साठवत होता.

एकदा त्या भागातल्या एका सातशे मीटर खोल खाणीत उतरून तब्बल सहा तास त्याने तिथे काढले होते. तिथे खाण कामगार कशा प्रकारचं काम करतात हे त्याने पाहिलं होतं. आणि ते किती धोक्याचं आहे हेही त्याला उमजलं होतं. तिथे अगदी मंद उजेडात कामगार कोळसा खणताहेत, काही लोक- विशेषतः मुलं आणि मुली कोळसा भरताहेत ही दृश्यं त्याने पाहिली. ही खाण जुनी होती आणि अत्यंत धोकादायक म्हणून ओळखली जात होती. विषारी हवेमुळे, पाणी भरल्यामुळे अथवा बोगदे कोसळल्यामुळे तिथे अनेकांचे जीव गेलेले होते. आत, खाणीत उतरल्याशिवाय तिथल्या जगाची यथार्थ कल्पना येत नाही, असं त्याने त्या वेळी थिओला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

आपल्या लहान भावाशी, थिओशी व्हिन्सेंटचं जिव्हाळ्याचं नातं होतं. १८८० मध्ये तो परत ब्रुसेल्सला गेला त्या वेळी थिओ पॅरिसच्या ऑफिसमध्ये काम करत होता. त्याच्याकडेच राहून व्हिन्सेंटने चित्रकलेवर अधिक लक्ष केंद्रित केलं. थिओच्या उत्तेजनामुळे तिथे त्याने भरपूर रेखाटनं केली. पुढे तो यत्तेन या गावी जाऊन राहिला आणि तिथे चित्रं काढू लागला. यानंतरच्या काळात व्हिन्सेंटच्या आयुष्यात अनेक वादळं निर्माण झाली. त्याची एक लांबची बहीण त्याच्याकडे राहायला आली होती. ती नुकतीच विधवा झाली होती. तिला एक मुलगा होता. व्हिन्सेंटची तिच्याशी चांगली मैत्री होती. पण जेव्हा त्याने तिच्याविषयी प्रेमभावना व्यक्त केल्या तेव्हा तिने त्याला ठाम नकार दिला आणि ती अॅमस्टरडॅमला निघून गेली. तिच्या नकाराचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. त्या नैराश्यातच तो घरी परतला; पण घरीही त्याचं वडिलांशी भांडण होऊन तो हेगला निघून गेला. १८८२ सालच्या हिवाळ्यात हेगमध्ये राहत असताना क्लासिना मरिया (सिआँ) नावाची वेश्या त्याला भेटली. ती गर्भवती होती. तिच्या प्रियकराने तिला सोडून दिलं होतं. व्हिन्सेंटला तिच्याविषयीच्या काळजीतून प्रेम वाटू लागलं. तिची दशा पाहून व्हिन्सेंटने तिला मॉडेल म्हणून काम दिलं. सबंध हिवाळाभर तिच्यासोबत तो काम करत होता. यासाठी तिला आपण पुरेसे पैसे देऊ शकत नाही याची त्याला खंत होती. आपल्या भाकरीतली भाकर तिला देऊन तो तिच्या बाळाची आणि तिची भूक भागवत होता. व्हिन्सेंटला या स्त्रीशी लग्न करायचं होतं आणि कौटुंबिक जीवनाचा अनुभव घ्यायचा होता. त्याच्या या संबंधाविषयी अनेकांची मतं प्रतिकूल असतील याची त्याला कल्पना होती. थिओही दुरावेल की काय अशी भीती त्याला वाटत असे; पण थिओने त्याला समजून घेतलं होतं. त्यामुळे त्यांच्यात अंतराय निर्माण झाला नाही.

van gog

पण नंतर मरियाशी असलेले संबंध मनाविरुद्ध तोडून तो डेंद्रे या गावी जाऊन राहिला आणि त्याने स्वतःला चित्रं काढण्यात बुडवून घेतलं. पुढे तो पुन्हा एकदा घरी गेला. मधल्या काळात त्याचं अजून एक अयशस्वी प्रेमप्रकरण झालं. एक काळ असाही आला की महिनोन महिने व्हिन्सेंटने पेन्सिल आणि रंगांना हातही लावला नाही.

पण तरीही आसपासच्या लोकांमध्ये मिसळणं, त्यांच्याशी सुखदुःखाच्या गप्पा करणं सुरू होतं. त्यातूनच पुढे त्याने विणकरांच्या घरांनाही भेटी दिल्या. प्रतिकूल परिस्थितीशी लढत जिद्दीने जगणाऱ्या विणकरांचं आणि एकूणच कामगारांचं जगणं पाहिल्यावर आपणही आपल्या आयुष्यातल्या वैफल्यांवर मात करून पुन्हा उभे राहू शकतो, असं व्हिन्सेंटला वाटू लागलं. त्यातूनच खाण कामगारांची, विणकरांची चित्रं काढण्याची ऊर्मी त्याच्यात निर्माण झाली. मग त्याने त्याच्या विफलताग्रस्त काळात टाकून दिलेली पेन्सिल पुन्हा उचलली आणि खाणकामगारांची विणकरांची अनेक रेखाटनं काढली.

खाण कामगारांची आणि विणकरांची जी चित्रं त्याने काढली त्यातून त्यांच्या जगण्यातले कष्ट आणि त्यांच्या जगण्यातली निरर्थकता व्यक्त झाली आहे. विणकरांची अनेक रेखाटनं आणि रंगचित्रं व्हिन्सेंटने केलेली आहेत. त्यात त्याने वेगवेगळ्या बाजूंनी विणकरांकडे पाहिलेलं दिसतं. विणकराची काम करण्याची जागा, त्याचा माग, त्यांवरचे धागे, लॅम्प, बंद खिडकी, काचेतून दिसणारी बाहेरची पवनचक्की असा सगळा तपशील त्याच्या चित्रात पाहत आपण विणकराच्या चेहऱ्याकडे येतो तेव्हा एक दुर्बोध, आत्ममग्न चेहरा आपल्याला दिसतो. जणू एक गूढ, उदास ईश्वर माणसांसाठी सुखदुःखांच्या धाग्यांनी बनलेलं आयुष्यांचं वस्त्र विणतो आहे, असंच हे चित्र पाहताना वाटतं.

हेही वाचा - चित्रकलेशी जडले नाते

व्हिन्सेंटला बोरिनाजमध्ये दिसलेले, कोळशाच्या काळ्या भुकटीने काळवंडलेले, थकलेले आणि दुःखी चेहरे त्याच्या अनेक चित्रांतून आलेले आहेत. खाण कामगारांच्या बायकांचं एक रेखाटन त्याने काढलं आहे. डोक्यावर आणि पाठीवर ओझं घेऊन अगदी वाकून चालत असलेल्या स्त्रिया या रेखाटनात आहेत. पलीकडे उंच रेल्वे ब्रिज दिसत आहे. त्या पलीकडे त्या शहरातली घरं आहेत. दूर टेकडीवर एक घोडा जोडलेली गाडी आहे. ओझी घेऊन वाकलेल्या या स्त्रिया काठीचा आधार घेत कष्टाने पावलं उचलत आहेत. याच रेखाटनात अलीकडे एक वठलेलं, फांद्या छाटलेलं झाड आहे. त्या झाडावर एक लाकडी देव्हारा ठोकलेला आहे आणि त्यात क्रूसावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताची प्रतिमा आहे. येशूने क्रूसाचं ओझं वाहिलं होतं, त्याप्रमाणे या स्त्रियाही आपापले जगण्याचे क्रूस वाहताहेत, असं या रेखाटनातून वाटतं. पेन आणि पेन्सिल यांनी केलेल्या या रेखाटनातला अवकाश उदासपणाने भारलेला आहे. रेखाटनातला रिक्त अवकाश आणि आकृती कोळशाच्या काळ्या भुकटीचे पातळ थर पसरलेले असावेत तशा दिसतात. वरचं आभाळही काळवंडलेलं आहे. त्या एका वठलेल्या झाडाशिवाय तिथे दुसरं झाड नाही की झुडूप नाही. मलूलपणा, विषण्णता या रेखाटनात भरलेली आहे.

माणसांच्या जगण्यातला हताशपणा व्हिन्सेंटला ठिकठिकाणी दिसायचा. 'द स्टेट लॉटरी ऑफिस' हे व्हिन्सेंटचं असंच एक लक्षणीय असं समूहचित्र. लॉटरी ऑफिससमोर जमलेली माणसं, असं हे चित्र आहे. पावसाळ्यातील एका सकाळी व्हिन्सेंट लॉटरीच्या ऑफिससमोरून चालला होता. लॉटरीची तिकिटं विकत घेण्यासाठी जमलेला घोळका त्याने तिथे पाहिला. त्यात बहुसंख्येने म्हाताऱ्या स्त्रिया होत्या, आणि त्यात अशीही माणसं होती जी नेमकं काय काम करतात आणि कशी जगत असतात हे सांगता येत नाही. लोकांचा तो छोटासा घोळका, विशेषतः त्यांचं वाट पाहणं व्हिन्सेंटला स्पर्शन गेलं.त्याने त्याचं रेखाटन केलं आणि नंतर रंगचित्र केलं. या चित्रात लॉटरी ऑफिससमोरच्या या घोळक्यात थकलेली, वाकलेली म्हातारी माणसं आहेत. त्यांचे चेहरे दिसत नाहीत. ती पाठमोरी आहेत. त्यातील एका व्यक्तीचाच चेहरा दिसतो. तो आपल्या बायकोकडे पाहत आहे. तिच्या हातात लहान मूल आहे. ही सगळी माणसं कसल्या तरी चिवट आशेने इथे जमलेली आहेत. दरिद्री, अभावग्रस्त, जगण्याची भ्रांत पडलेली माणसं. जगण्याच्या लढाईत स्वतःला वाचवण्यासाठी ती निकराचा प्रयत्न करत आहेत. अन्न विकत घेण्यासाठी जे पैसे खर्च झाले असते त्यात ही माणसं लॉटरीची तिकिटं विकत घेत आहेत, असं वाटतं. या माणसांच्या स्थितीतून, आविर्भावांतून, त्यांच्या उभं असण्यातून, त्यांच्या आपल्याकडे वळलेल्या पाठींमधून पराकाष्ठेचा हताशपणा दिसतो. त्या लहान बाळाच्या आईची आणि तिच्या नवऱ्याचीही काही अपेक्षा असेल, असं या चित्रातून सूचित होतं. घोळका असला तरी ती माणसं एकेकटी आहेत, तो एकेकट्या व्यक्तींचा समूह आहे. हतबल, हताश, असहाय, तरीही जगण्याची आस असलेल्या माणसांचा समूह. हे सगळं काय आहे, याचा अर्थ काय हे समजून घेतलं पाहिजे असं व्हिन्सेंटला वाटायच.

van gog

व्हिन्सेंटचं नातं आपल्या भूमीशी, खेड्यांशी, शेतकऱ्यांशी होतं. पॅरिस आणि त्यासारख्या मोठमोठ्या शहरांत आपण राहिलेलो असलो तरी अजूनही आपण झुंडर्टच्या (त्याचं जन्मगाव) शेतकऱ्यासारखेच दिसतो अशी त्याची भावना होती. शेतकऱ्यांचा जगाला अधिक उपयोग होतो, त्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या खालीच आहोत असं त्याला नेहमी वाटायचं. शेतकऱ्याने नांगरलेल्या शेतातल्या नांगरटीच्या रेषांमध्ये काव्य लपलेलं आहे, असं त्याला वाटत असे. शेतकरी जसे आपलं शेत नांगरत असतात तसे आपण आपलं कॅनव्हास नांगरतो आहोत असं तो समजत असे शेतकऱ्यांचं आणि आपलं निसर्गाशी नातं आहे आणि आपण चित्रकृतींमधून ते व्यक्त करू शकतो, किंबहुना ते करणं आपल्याला भागच आहे अशी त्याची धारणा होती.

या धारणेतूनच व्हिन्सेंटने शेतकऱ्यांची अनेक चित्रं काढली. संधिप्रकाशात शेतात काम करणाऱ्या स्त्रिया, धान्य पेरणारा माणूस, बटाट्याची रोवणी करणारे शेतकरी, इंधन गोळा करणारे शेतकरी, बटाट्याची लावणी करणारा शेतकरी आणि त्याची बायको, बटाटे उकरणाऱ्या शेतकरी स्त्रिया, दुपारच्या वेळी विश्रांती घेणारं शेतकरी जोडपं, सकाळी शेताकडे निघालेलं जोडपं, शेतात खणणाऱ्या, गवत काढणाऱ्या, बटाटे उकरणाऱ्या, मका कापणाऱ्या स्त्रिया असे सतत कामात, कष्टात मग्न असलेले अनेक शेतकरी स्त्रियांचे चेहरेही काढले. कष्टाने रापलेले, ओबडधोबड असे ते चेहरे आहेत. त्याने अनेक शेताचीही चित्र केलेली आहेत - विशेषतः गव्हाची शेतं. बटाटे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांविषयीही त्याच्या मनात विशेष आस्था होती. त्यातून त्याचं 'पोटॅटो ईटर्स' हे चित्र निर्माण झालं. या चित्रात टेबलाभवती पाच व्यक्ती बसलेल्या दिसताहेत. म्हातारा- म्हातारी, एक तरुण मुलगा, एक तरुण मुलगी आणि एक लहान मुलगी. हे एक शेतकरी कुटुंब आहे आणि त्यांचं संध्याकाळचं जेवण सुरू आहे. त्यांच्या समोरच्या थाळीत उकडलेले बटाटे आहेत. बाजूला काळ्या कॉफीचे कप आहेत वर छताला दिवा टांगलेला आहे. त्याचा उजेड त्यांच्या चेहऱ्यांवर, बोटांवर पडलेला दिसतो आहे. लहान मुलगी पाठमोरी आहे. बाकी लोकांचे चेहरे दिसताहेत. तरुण मुलाच्या चेहऱ्याचा उजवीकडचा भाग दिसतो आहे. त्यांचे चेहरे ओढलेले, आक्रसलेले दिसत आहेत. बोटं ओबडधोबड झालेली आहेत. हाताच्या शिरा टचटचीतपणे दिसताहेत. त्यांच्या घराच्या भिंतीवर एक चित्र आहे. ते बहुधा येशू ख्रिस्ताचं असावं. या व्यक्तींमध्ये काही संभाषण चाललेलं असावं असं वाटत नाही. म्हाताऱ्याने आपला कप पुढे केलेला आहे. म्हातारी खाली मान घालून कपात कॉफी ओतते आहे. तरुण मुलगी तरुण मुलाकडे पाहते आहे. तो तरुण मुलगा विशिष्ट अशा ठिकाणी पाहतो आहे असं दिसत नाही.

संध्याकाळी दिव्याच्या उजेडात बटाटे खाणारे हे लोक. जे हात आता त्यांच्या थाळीत आहेत, त्याच हातांनी त्यांनी जमीन खणली आणि किती प्रामाणिकपणे त्यांनी आपलं अन्न मिळवलं आहे! त्यांचा वर्तमानकाळ कष्टाचा आहे आणि भविष्यकाळही तसाच असणार आहे, असं सूचित करणारं हे चित्र आहे. प्रामाणिकपणे कष्ट करावे आणि त्या कष्टांतून मिळालेलं अन्न खावं, हाच त्यांचा दिनक्रम आहे. त्यांच्यात आपलेपणाचा एक बंध आहे. त्या खोलीत पसाभर उजेड आहे. तेवढा तरी उजेड त्यांच्या आयुष्यात आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारं हे चित्र आहे. राखाडी-काळसर अशा चित्रावकाशात दिव्याचा पिवळसर उजेड आणि उजेडाने किंचित का होईना, उजळलेले त्यांचे चेहरे जगण्यातली त्यांची अतूट आस्था दाखवणारे आहेत. व्हिन्सेंटने एका वेगळ्या दृष्टीने या लोकांच्या जगण्याकडे पाहिलेलं दिसतं. व्हिन्सेंटच्या मते हे चित्र शारीरिक श्रमाविषयी, कष्टाविषयी काही सांगतं आहे. हे चित्र खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं चित्र आहे याविषयी त्याला खात्री होती. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या चित्राला भाजलेल्या बेकनचा, उकडलेल्या बटाट्याचा गंध येत असेल तर ते यथायोग्यच आहे, असं व्हिन्सेंट म्हणत असे. शेतकऱ्यांच्या जगण्याचं चित्रण ही एक गंभीर गोष्ट आहे, असंही तो नमूद करतो.

van gog

तोवर व्हिन्सेंटचा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांचा, ते काम करत असतानाच्या हावभावांचा, त्यांच्या पोषाखांचा अभ्यास झालेला होता. तरीदेखील 'पोटॅटो ईटर्स'ची तीन रूपं आहेत. तिसरं आणि अंतिम चित्र व्हिन्सेंटच्या एकूण चित्रकलेला नवं वळण देणारं ठरलं. रेखाटन, लिथोग्राफ आणि रंगचित्र अशी या चित्राची उत्क्रांती झाली. व्हिन्सेंटला स्वतःला दिसणाऱ्या दृश्यांचं, व्यक्तींचं अथवा व्यक्तिसमूहाचं तंतोतंत चित्र काढायचं नव्हतं, तर त्यातला भाव पकडायचा होता. आपल्या मनावर उमटलेला ठसा व्यक्त करायचा होता. थोडक्यात, त्यांचं जगणं चित्रात आणायचं होतं. 'पोटॅटो ईटर्स' या चित्रातील व्यक्तींचे हात, पाय, गळा, डोकं हे प्रमाणबद्ध नसतीलही, पण त्यातील व्यक्ती, त्यांच्या चेहऱ्यांवरचे भाव, डोळ्यांतील शून्यता, खोलीतला उजेड, त्यामुळे अधिकच घनदाट होणारं त्यांचं दुःखीकष्टी आयुष्य प्रतीत होतं.

व्हिन्सेंटच्या काही चित्रांत उजळ रंग वापरलेले दिसतात. त्याचं एक चित्र आहे, ज्यात गवताच्या शेतात कापणी चाललेली आहे. श्रमानंतर दुपारी जरा विसावा घ्यावा म्हणून एक शेतकरी जोडपं गवताच्या पेंढीचं उसं आणि गवताचंच अंथरूण करून झोपलेलं आहे. त्यांच्या उशाकडे गवताच्या पेंढ्यांचा ढीग आहे. शेतकऱ्याने त्याच्या डोळ्यांवर टोपी ओढलेली आहे, तर त्याची पत्नी हातावर डोकं ठेवून पडलेली आहे. शेतकऱ्याच्या बाजूला त्याचे जोडे आणि विळे-कोयते आहेत. पलीकडे बैल चरताहेत. शेजारी बैलगाडी आहे. तिथे एक मनुष्य आहे. दुपारच्या उन्हात सगळ सोन्यासारखं झळाळलेलं आहे. शेतकयांच्या कष्टाळू जीवनातली एक स्थिती या चित्रात दिसते. या चित्राचा सबंध अवकाश निर्मळपणाने आणि निरागसतेने भारलेला आहे. व्हिन्सेंटला हे चित्र जे. एफ. मिलेट याच्या एका चित्रावरून सुचलेलं असलं, तरी व्हिन्सेंटच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यात जी सळसळ आहे ती मिलेटच्या चित्रात नाही. व्हिन्सेंटच्या या वामकुक्षी चित्राला भव्यतेचा आयाम आहे. त्यातून जणू काही त्याने शेतकऱ्यांच्या कष्टकरी जगण्यालाच सलाम केला आहे असं दिसतं. मिलेटच्या चित्रावरूनच सुचलेलं पण व्हिन्सेंटने स्वतःच्या शैलीत चित्रित केलेलं शेतकरी नवरा-बायको आणि त्यांचं मूल हे चित्र व्हिन्सेंटच्या स्वतःच्या आयुष्याच्या आणि चित्रप्रवासाच्या संदर्भात अर्थपूर्ण आहे. या चित्रात एक शेतकरी खाली बसलेला आहे आणि त्याने आपले दोन्ही हात पुढे केलेले दिसत आहेत. बाजूला त्याची बायको खाली वाकलेली दिसते आहे. तिच्याजवळ लहान मुलगी आहे. ती मुलगी पहिली पावलं टाकत असणार. या चित्रात पलीकडे घर आहे. त्यावर बहरलेलं झाड झुकलेलं आहे. त्याच्या अलीकडे एक वाफा दिसतो आहे. हे एक हृद्य चित्र आहे. फिकट हिरव्या, फिकट पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वापराने हे चित्र अनुकूल, सुखद संवेदना निर्माण करणारं झालं आहे. सबंध चित्रात प्रसन्नता आहे. व्हिन्सेंटला आयुष्यभर जे हवं होतं ते या चित्रात सहजपणे व्यक्त झालेलं दिसतं.

हेही वाचा - गोष्ट माझ्या हसऱ्या रेषांची

एकीकडे शेतकऱ्यांची, शेतांची चित्रं काढत असताना तो आसपासच्या निसर्गातही भटकत होता. त्याची चित्रं काढत होता. निसर्गाकडे पाहत असताना तो चित्रामध्ये कसा पकडायचा, हा प्रश्न त्याला पडत असे. निसर्गाच्या विविध रंगच्छटा पकडणं हे किती कठीण काम आहे याचीही त्याला जाणीव होती. तरीदेखील त्याच्याजवळ जे रंग आणि जेवढे कॅनव्हास होते त्यांचा उपयोग करून त्याने चित्रं केली. निसर्ग आपल्याशी बोलतो, तो आपल्याला काही तरी सांगतो, आपण ते लघुलिपीत लिहून घेतो, त्यातले काही शब्द उलगडणार नाहीत, काही चुकाही झालेल्या असतील; तरीदेखील रानाने किंवा एखाद्या आकृतीने जे काही आपल्याला सांगितलेलं असतं त्यातलं काही तरी आपल्या चित्रात असतं, असं व्हिन्सेंटने म्हटलेलं आहे, आणि ते खरं आहे. निसर्गचित्रं काढणाऱ्यांचं निसर्गाशी नातं असलं पाहिजे, शेतं कुरणं-रानं यांच्याविषयी त्यांना प्रेम असलं पाहिजे हे त्याला उमगलेलं होतं.

म्हणूनच व्हिन्सेंटला निसर्गात पेंटिंग दिसत असे. दूरदूरपर्यंत पसरलेली शेतं, कुरणं, आभाळात एकापाठोपाठ एक असे येत जाणारे ढग, झाडं, पाऊस..एक विलक्षण पेंटिंग आपल्या समोर आहे, असं त्याला वाटायचं. स्टुडिओत बसून चित्र काढण्यापेक्षा रोज बाहेर जाऊन पेंटिंग करण्यात त्याला खरा कानंद मिळत असे. त्याविषयी त्याने म्हटलं आहे- 'गो अॅण्ड पेंट आऊट ऑफ डोअर्स आन द स्पॉट इटसेल्फ ! देन ऑल माइंड्स ऑफ थिंग्ज हॅपन,' सूर्यप्रकाशाचे, झाडांचे, भूमीचे, आकाशाचे रंग, विविध रंगछटा- हे सगळं चित्रातून व्यक्त करण्याचा त्याचा प्रयास असायचा. निसर्गाच्या झपाट्याने बदलत जाणाऱ्या अनंत रंगछटा त्याला वेगाने पकडायच्या असत. निसर्गातला उजेडाचा चमत्कार पेंटिंगमध्ये आणायचा असेल तर हात जलद चालला पाहिजे, हेही त्याला चांगलंच उमगलं होतं. त्याला रंगांचंही चांगलं भान होतं. लाल, पिवळा आणि निळा हे मूलभूत रंग आणि त्यापासून तयार होणारे नारिंगी, हिरवा आणि जांभळा हे रंग. त्यात काळा रंग मिसळला की ग्रे रंगाच्या अनंत छटा मिळतात. या अनंत छटा व्हिन्सेंटच्या निसर्गचित्रांत पाहायला मिळतात.

van gog

शेतं त्याला सुंदर वाटत असत. मक्याची तोडणी सुरू आहे. बटाटे काढायला झाले आहेत. त्यांची पानं गळून पडताहेत. गव्हाला शुभ्र फुलोरा आलेला आहे... हे सगळं त्याला सुंदर दिसत असे. कापणीचा हंगाम येतो तेव्हा शेतात वेगवेगळ्या रंगांची सरमिसळ कशी होत असते हे त्याने पाहिलं होतं. गव्हाच्या शेतांची अनेक, चित्रं त्याने काढलेली आहेत. त्यातला जुन्या सोन्यासारखा पिवळा रंग, भाजून काढणारा सूर्य आणि निळं आभाळ; नुस्तं गव्हाचं शेत; पलीकडे घरं, दूर डोंगररांगा, कापणी करणारा आणि गव्हाचं शेत- गव्हाच्या पेंड्याच्या गंज्या रचलेल्या. गव्हाचं हिरवं शेत, डोंगररांगा आणि उगवता सूर्य. आभाळ झाकोळून आलेलं. गडद निळसर- काळसर रंग. त्याखाली विस्तीर्ण असं पिवळं-हिरवं गव्हाचं शेत. मक्याचं शेत, हिरव्या ज्वाळा आकाशाकडे झेपावल्या असाव्यात तशी सायप्रसची झाडं, दगडी डोंगररांगा, फिकट निळं आभाळ, त्यात फिकट जांभळी छटा असलेले पांढरे ढग. या सगळ्याच चित्रांत एक विलक्षण आवेग दिसतो. चराचराची प्रचंड घुसळण चाललेली असावी असं ही चित्रं पाहताना वाटत राहतं. अलीकडे पिवळसर शेत, पलीकडे शहर, तिथल्या इमारती, धूर ओकणाऱ्या चिमण्या, शहरापलीकडे पिवळा सूर्य, दूरपर्यन्त अनेक शेतं, पलीकडे बोडख्या डोंगररांगा, शेतांत काम करणारी माणसं, पिवळ्या हिरव्या रंगांच्या विविध छटा; गव्हाचं पिवळं झळाळणारं अथांग शेत, शेतामधून कुठे तरी निघालेली पायवाट, शेतावर भिरभिरणारे काळे कावळे, शेतावरचं गडद काळं-निळं अनंत आकाश. व्हिन्सेंटला गावाभवतीच्या निसर्गाचं जे सौंदर्य जाणवलं होतं ते या सर्व चित्रांमधून व्यक्त झालेलं आहे, त्याचबरोबर त्याची आंतरिक स्थितीही व्यक्त झाली आहे.

व्हिन्सेंटला आपण काय आहोत आणि जग आपल्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतंय याची चांगली जाणीव होती. मात्र, तो जगावर रागावलेला नव्हता, किंबहुना आपल्या चित्रांतून आपण काय, कसे व्यक्त होतो हे त्याला महत्त्वाचं वाटायचं. आपण सतत दुःखात, त्रासात असलो तरी आपल्या आत एक शांतता, शुद्ध संगती आणि संगीत आहे असं त्याला वाटत असे. त्यामुळेच अत्यंत गरीब झोपड्यांत त्याला रेखाटनं आणि चित्रं दिसायची. विविध शेतांची जी चित्रं त्याने काढलेली आहेत त्यातून या आंतरिक संगतीचा प्रत्यय येतो. दूरदूरपर्यन्त पसरलेली हिरवी-पिवळी शेतं आणि त्यावरचं काळं-निळं खिन्न-उदास आभाळ. व्हिन्सेंटच्या वैयक्तिक जीवनातली खिन्नता, यातना, एकाकीपणा, अपमान, पराभव या सगळ्या गोष्टी त्याच्या अहोरात्र चालणाऱ्या कामात वितळून जात आणि चित्रकृतींमध्ये हिरव्या, निळ्या, पिवळ्या, लाल, करड्या, काळ्या रंगांमध्ये माणसांच्या वसतीच्या अवतीभवतीचा निसर्ग वस्तुनिष्ठ - वास्तवातीत रूपांमध्ये व्यक्त होत असे.

van gog

वास्तवदर्शी चित्रं काढण्याकडेच त्याचा जास्त कल होता. कष्ट करणाऱ्या माणसांप्रमाणेच हताश, दुःखी माणसंही त्याच्या चित्रांचा विषय झाली होती. 'सॉरो' हे त्यातीलच एक चित्र. हेगमध्ये व्हिन्सेंटला भेटलेली मरिया ही या चित्रातली मॉडेल आहे. या चित्रातल्या नग्न स्त्रीने गुडघ्यांवर हातांची घडी घालून त्यात आपला चेहरा लपवलेला आहे. पाठीवर केस पसरलेले आहेत. स्तन ओघळलेले आहेत. ती गर्भवती असावी असं दिसतं आहे. चित्रात बाकी काहीही नाही. मानवी व्यथावेदनांविषयी व्हिन्सेंटच्या काळजात असलेली सहानुभूतीच या चित्रातून व्यक्त झालेली दिसते. व्हिन्सेंटच्या मते या चित्रात जीवनासाठी चाललेला लढा व्यक्त झाला आहे. अशाच प्रकारचं 'ओल्ड मॅन इन सॉरो' हे रेखाटन त्याने केलं. यात फायरप्लेसजवळ खुर्चीवर एक मनुष्य बसलेला आहे. त्याने आपल्या हातांनी स्वतःचा चेहरा झाकून घेतलेला आहे. काही काळाने या रेखाटनावरून त्याने रंगचित्र केलं. या दोन्ही चित्रांपूर्वी व्हिन्सेंटने 'वर्न आऊट' हे चित्र केलेलं होतं. दोन्ही हातांमध्ये डोकं लपवलेला शेतकरी आणि त्याच्यासमोर चहाची किटली टांगलेली. अशी अनेक माणसं व्हिन्सेंटने चितारली.

व्हिन्सेंटने जशी एकाकी व्यक्तींची, समूहांची चित्रं काढली आहेत तशीच शेतांची, डोंगररांगांची, टेकड्यांची, घरांची, झोपड्यांचीही चित्रं काढली आहेत. त्याच्या परिसर चित्रांनी माणसांच्या जगण्याचं वास्तव कळतं, त्याचप्रमाणे या साध्या गोष्टींमध्ये लपलेलं सौंदयही प्रकट होतं. व्हिन्सेंटचं त्याच्या खोलीतून दिसणाऱ्या सुतारखान्याचं एक चित्र आहे- कारपेंटर्स वर्कशॉप. त्यात अगदी अलीकडे दोऱ्यांवर कपडे वाळत घातलेले आहेत, पलीकडे सुतारखान्यात काही माणसं काम करताहेत. त्यापलीकडे झाडं आहेत, त्यापलीकडेही इमारतींचे आकार दिसताहेत. सफरचंदाच्या बागेमध्ये काम करणारा माणूस असं त्याचं एक रेखाचित्र आहे. नुकतीच पानं फुटताहेत अशी विरळ झाडं, मागे उतरत्या छपरांच्या इमारती, समोर झाडाजवळ फावड्याने माती उकरत असलेला, खाली झुकलेला माणूस.

पार्क, गॅस टॅक्स, मासे वाळवण्याची कोठारं, कॅफे, पवनचक्क्या, फॅक्टरी, स्मशानातली पानगळ, डान्स हॉल, फार्म हाउसेस, टेकाडं, वादळी हवेतला समुद्रकिनारा, चर्चेस, पाणचक्क्या, झोपड्या, नावेत बसून मासेमारी करणारा माणूस, भाजीपाल्यांच्या बागा, नदीवरचे पूल, समुद्रातली जहाजं, सोडून ठेवलेल्या घोडागाड्या, कोळसा वाहणाऱ्या नावा, कालव्याकाठी धुणी धुणाऱ्या स्त्रिया, रेल्वे ब्रिज, हॉस्पिटल वॉर्ड, ऑलिव्ह बागेत काम करणारे स्त्री-पुरुष, तुरुंग आणि त्यात गोल गोल फिरणारे कैदी, खेड्यातले रस्ते अशी विविध चित्रं व्हिन्सेंटने केलेली आहेत. या चित्रांमध्ये व्हिन्सेंटने असे काही तपशील भरले आहेत की त्यामुळे ती जिवंत वाटतात. उदाहरणार्थ, नदीवरचा घडीचा पूल, त्यावरून जाणारी घोडागाडी, खाली काठावर आणि काठाजवळच्या पाण्यात कपडे धुणाऱ्या स्त्रिया, वापरात नसलेली नाव, आभाळाचा आणि पाण्याचा निळा रंग, पुलाच्या पाण्याकडच्या भिंतीवरची निळी छटा, काठावरच्या उंचवट्याचा विटकरी रंग, काठावरची हिरवी-पिवळी लव्हाळी- या सगळ्यांमुळे पाहणाऱ्याच्या मनाला आल्हादकतेचा आणि शांततेचा स्पर्श होतो. दुसऱ्या एका चित्रात अलीकडे शेतं आहेत, पलीकडे शेतं आहेत. मधल्या वाटेवरून एक घोडागाडी चाललेली आहे. पलीकडच्या शेतांपलीकडे आगगाडी जाते आहे. इंजिनातून निघणारा धूर दाखवलेला आहे. त्यापलीकडेही शेतं आहेत. मधल्या वाटेजवळ लाल छपराची घरं आहेत. अलीकडच्या शेतात एक माणूस काम करतो आहे. हिरवी शेतं, लाल छपरांची घरं, काळसर-निळसर आगगाडी, दूरपर्यन्त पसरलेल्या शेतांमुळे आलेली विस्तीर्णता आणि त्यात आपलं लक्ष वेधून घेणारी घोडागाडी. अशा विशाल अवकाशात व्हिन्सेंटचं मन निवत असावं.

हेही वाचा - सेरेंडीपिटी : डोकं घुसळून काढणारा अनुभव

व्हिन्सेंटची रंगयोजना काही विचारातून होत असे. त्याच्या 'द नाइट कॅफे' या चित्राविषयी त्याने लिहिलं आहे- 'नाइट कॅफे' ही गोष्टच अशी आहे की जिथे आपण आपली नासाडी करून घेऊ शकतो, वेडसर होऊ शकतो अथवा एखादा गुन्हा करू शकतो. म्हणूनच माणसातले उग्र विकार व्हिन्सेंटने लाल आणि हिरव्या रंगांच्या माध्यमातून व्यक्त केले आहेत. या चित्रातली खोली लालभडक आणि गडद पिवळ्या रंगात रंगवली आहे. या खोलीत मध्यभागी हिरवं बिलियर्ड टेबल आहे. छताला चार पिवळे दिवे टांगलेले आहेत आणि त्यांचा नारिंगी-हिरवट उजेड पडलेला आहे. अत्यंत मोकळ्या वाटणाऱ्या या खोलीतल्या व्यक्ती हिरव्या छटांमधल्या आहेत. त्या कॅफेच्या यजमानाचा पोषाख तेवढा पांढरा आहे. त्यावरही पिवळ्या-हिरव्या रंगांच्या छटा पसरलेल्या आहेत. छत हिरवं आहे. टेबलांवर हिरव्या बाटल्या आणि पांढरे प्याले आहेत. पलीकडे भिंतीजवळच्या टेबलवर पुष्पपात्र आणि हिरव्या बाटल्या आहेत. भिंतीवर एक घड्याळ आहे, त्यात बारा वाजून गेलेले दिसताहेत. व्हिन्सेंटच्या मते त्याला या चित्रातून काळोखाची सत्ता व्यक्त करायची आहे. हे चित्र अगदी घाणेरडं आहे, असं मतही त्याने व्यक्त केलं होतं, पण त्याचबरोबर त्यात काही खोल अर्थही भरलेला आहे, असंही तो म्हणतो. आज आपण हे चित्र वा त्याची मुद्रित प्रतिकृती पाहतो तेव्हा आपल्याला ते अग्ली किंवा बॅड वाटत नाही. स्वतःच्या काळाच्या पूढे जाणारी व्हिन्सेंटची वास्तवाभिमुखता त्यात दिसते. आणि मुख्यतः हिरव्या, लाल, पिवळ्या रंगांच्या वापरातून हा चित्रकार सांकेतिक चित्रकलेपासून किती पुढे गेलेला होता हेही आपल्याला समजतं.

व्हिन्सेंटने पेन आणि पेन्सिलीने अनेक रेखाटनं केली, पण त्याच्या अभिव्यक्ती प्रेरणेला रेषेपेक्षा रंग अधिक जवळचे वाटत असत. त्यामुळे त्याच्या चित्रांत ब्रशचे फटकारे दिसतात. ब्रश हातात घेऊन अत्यंत जलद रीतीने आतल्या आवेगासह तो चित्र काढत असे. 'व्हीट फील्ड विथ क्रोज' मधला, 'रोड विथ सायप्रसेस अॅण्ड स्टार्स' मधला ब्रशचा वापर पाहिला तरी त्याचे ब्रशस्ट्रोक्स याच त्याच्या रेषा होत्या हे जाणवतं.

van gog

व्हिन्सेंटजवळ काही तंत्र नाही, असं त्याला हिणवलं गेलं. व्हिन्सेंटजवळ तंत्र नव्हतंच. त्याच्या आतूनच चित्रातली स्थिती, प्रसंग, रंग, रंगछटा येत असे. लोकांना 'स्पर्श' करतील अशीच रेखाटनं आपल्याला करायची आहेत, असं तो म्हणायचा. त्याने केलेल्या काही लॅण्डस्केपची उदाहरणं देऊन तो म्हणतो, की त्यात असं काही तरी आहे की जे सरळ माझ्या काळजातून आलेलं आहे.

१८८५ मध्ये त्याने अँटवर्पच्या एका चित्रकला संस्थेत नाव नोंदवलं; पण तिथली अकॅडमिक शिस्त त्याला मान्य झाली नाही. त्यामुळे तो थिओकडे पॅरिसला निघून गेला. तिथे त्याला रसेल, तुलो लोत्रेक, बर्नार्ड हे चित्रकार भेटले. थिओने त्याला मोने, रेन्वा, सिसली, पिझारो, देगा, सिनॅक, सुरा आदींच्या चित्रकृतींचा परिचय घडवला. त्यामुळे फ्रेंच चित्रकलेतली प्रगती त्याला समजली. इथेच त्याची चित्रकार पॉल गोगँशी ओळख झाली. इथल्या दोन वर्षांच्या वास्तव्यात त्याने दोनशेहून अधिक चित्रं काढली. १८८८ मध्ये त्याने पॅरिस सोडलं आणि तो आर्ल इथे जाऊन राहिला. व्हिन्सेंटला इथे एक आर्टिस्ट कॉलनी उभारायची इच्छा होती. अर्थात पैशाअभावी ते शक्य नव्हतं. मग त्याने एक यलो हाऊस भाड्याने घेतलं. तिथे आपल्या कॉलनीचं स्वप्न पूर्ण करता येईल असं त्याला वाटत होतं. त्याच वर्षी पॉल गोगँ त्याच्याबरोबर तिथे राहायला आला. दोघं चित्रं काढत, चर्चा करत. पण एके दिवशी त्यांच्यात वादळी चर्चा झाली. व्हिन्सेंट धारदार पातं घेऊन पॉलच्या अंगावर धावून गेला. मग पॉल घाबरून तिथून निघून गेला. त्याच रात्री व्हिन्सेंटने प्रचंड मानसिक दबावाखाली आपला डावा कान कापला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. १५ दिवसांनी तो परतला; पण तिथल्या रहिवाशांच्या विनंतीवरून त्याला परत मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं. या सगळ्या काळातही त्याचं चित्रं काढणं थांबलं नव्हतं. १८९० मध्ये मनो रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्याला घराची आणि विशेषतः थिओला भेटायची ओढ लागली. मग तो त्याला भेटायला पॅरिसला गेला आणि तिथून चार दिवसांनी आवेर इथे गेला आणि चित्रकार गाशेबरोबर राहू लागला. तिथे तो पुन्हा उत्साहाने चित्रं काढू लागला. पण हा काळ छोटा होता. गाशेबरोबरच्या भांडणाने तो संपला. पुन्हा त्याची मानसिक अवस्था कोलमडली. थिओवरील अवलंबित्वाविषयी अपराधीपणाची भावना आणि यशस्वी होण्यातील असमर्थता या गोष्टी त्याला डाचू लागल्या. एकलकोंडेपणावर आपण कधीच मात करू शकणार नाही आणि या मानसिक आजारातून कधीच बरे होऊ शकणार नाही अशी त्याची मानसिकता झाली. या निराशेतूनच सैरभर अवस्थेत त्याने २७ जुलै १८९० रोजी स्वतःवर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी म्हणजे २९ जुलैला त्याची जीवनयात्रा संपली. व्हिन्सेंटचं व्यक्तिगत आयुष्य विफलतेने ग्रासलेलं होतं. आयुष्यभर त्याला स्त्रीचं उत्कट प्रेम मिळालं नाही. स्वतःच्या कलाकृतीचा व्यवसाय त्याला मान्य नव्हता. संबंध हयातीत त्याचं एकमेव चित्र विकलं गेलं. चित्रकार म्हणून प्रतिष्ठा व प्रशंसा त्याच्या वाट्याला कधीच आली नाही. व्हिन्सेंटच्या मृत्यूच्या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या कलेविषयी एक लेख छापला गेला. त्याच्या हयातीत त्याच्या चित्रांविषयी प्रसिद्ध झालेला हा एकमेव लेख.

van gog

शेवटच्या काळात मानसिक ताणतणाव आणि वैफल्याने व्हिन्सेंटच्या मनावर ताबा मिळवला असला तरीही दुसरीकडे त्याचा समाजपरिवर्तनावरचा विश्वास ढळला नव्हता अथवा त्याची सामाजिक बांधिलकी क्षीण झाली नव्हती. याविषयी एक उदाहरण सांगितलं जातं. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी व्हिन्सेंटने 'आवेर टाऊन हॉल ऑन १५ जुलै १८९०' हे चित्र काढलं होतं. बॅस्टिलचा तुरुंग फोडून मुक्तीची घोषणा झाल्याला १०१ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जो उत्सव साजरा झाला त्याचं हे चित्र होतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तीन मूल्यं देणाऱ्या फ्रेंच राज्य क्रांतीविषयीची आदरभावनाच व्हिन्सेंटने या चित्रातून व्यक्त केली होती.

व्हिन्सेंट धर्मप्रचारक होऊ शकला नाही; पण तो खाण कामगारांच्या, विणकरांच्या, सुतारांच्या, शेतकऱ्यांच्या सहवासात राहिला. ग्रामीण परिसर व तिथलं अभावाचं जिणं त्याने पाहिलं, अनुभवलं. त्यातून जो धर्मविचार त्याला स्फुरला तो त्याने आपल्या असंख्य रेखाटनांतून आणि रंगचित्रांतून व्यक्त केला.

तो सोडवणं, उकलणं ही रसिक म्हणून आपली जबाबदारी आहे.

(अनुभव, दिवाळी २०१४च्या अंकातून साभार..)

वसंत आबाजी डहाके







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results