आम्ही कोण?
ले 

एआय मानवी कलाकारांना पूरक आहे की स्पर्धक?

  • मन्सूर मुल्ला
  • 19.05.25
  • वाचनवेळ 7 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
ai and art

काही महिन्यांपूर्वी घिबली इमेजेसचा ट्रेंड जगभरात गाजत होता. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनाही या ट्रेंडने भुरळ घातली होती. एआयला एका ओळीची सूचना आणि एक फोटो देऊन वेगवेगळ्या प्रकारात चित्रं बनवणं आता शक्य झालंय.

आधी घिबली, नंतर रेट्रो, नंतर डिजनी, एकामागून एक ट्रेंड येतच गेले आणि ते येतच राहतील. कृत्रिम बुद्धीमत्तेने (Artificial Intelligence - A.I.) तयार केलेल्या चित्रांची जितकी वाहवा झाली तितकीच त्यावर टीका देखील झाली. ए.आय.मुळे कलाकार धोक्यात येतील, मानवी कला आणि कलेचं यांत्रिकीकरण होत जाईल अशी चिंता व्यक्त केली गेली. मात्र अशी चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ए.आय.च्या सहाय्याने तयार केलेली कलाकृती, मग ते चित्र असो अथवा चलचित्र, त्याचं श्रेय नक्की कुणाचं? ए.आय. मॉडेलचं? त्याला सूचना देणाऱ्या व्यक्तीचं? की त्या मॉडेलला डेटा पुरवणाऱ्या अफाट माहितीचं? ए.आय.मुळे कलाकार खरंच धोक्यात आले आहेत का ? वाढत्या ए.आय. कलेकडे कलाकार आणि कलाप्रेमींनी कोणत्या दृष्टिकोनातून बघायला हवं?

दहा वर्षांपूर्वी, म्हणजे २०१५ मध्ये, कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणाऱ्या संशोधकांनी एक भन्नाट मॉडेल तयार केलं. ते मॉडेल फोटोंना आपोआप कॅप्शन देऊ शकत होतं. म्हणजे फोटो बघून त्याचं वर्णन करणारं समर्पक वाक्य हे मॉडेल लिहू शकत होतं. आता संशोधकांना उत्सुकता लागली की जर हे मॉडेल उलटं काम करू शकलं तर? फोटोवरून कॅप्शन देतं तसं कॅप्शनवरून फोटो तयार करू शकलं तर? ऐकायला हे खरंच रोमांचक होतं, पण प्रत्यक्षात तेवढंच कठीणही होतं. कारण संशोधकांना जगात अस्तित्वातच नाही अशा नवीन आणि अनोख्या दृश्यांची निर्मिती करण्याची इच्छा होती. सुरूवातीला त्यांनी ए.आय. मॉडेलला हिरव्या रंगाची बस तयार करायला सांगितली आणि त्या मॉडेलने ३२x३२ पिक्सेलचा फक्त एक हिरवा ठिपका तयार करून दाखवला! तरीसुद्धा, भविष्यात काय होऊ शकतं याची झलक त्यातून दिसली होती.

आज ए.आय.चं नवं युग आपण सगळेच अनुभवत आहोत. आता चित्र तयार करण्यासाठी कॅनव्हास, रंग किंवा कॅमेरा, किंवा कॉम्प्युटरचं पेन टूल यातल्या कशाचीच गरज उरली नाहीये. फक्त कल्पना करायची आणि चित्र तयार! यासाठी इनपुट म्हणून केवळ एक साधी ओळ लागते. त्याला ‘प्रॉम्प्ट’ असं म्हटलं जातं.

जानेवारी २०२२ मध्ये, ओपन एआय (Open AI) नावाच्या एका मोठ्या एआय कंपनीने ‘डॅल-ई’ (DALL-E) नावाचं ए.आय. टूल आणलं. हे नाव प्रसिद्ध चित्रकार साल्वाडोर डाली (Salvador Dali) आणि एका लोकप्रिय चित्रपटातील रोबोट कॅरेक्टर वॉल-ई (Wall-E) यांच्या नावांवरून ठेवण्यात आलं होतं. प्रॉम्प्टवरून चित्र तयार करणारं हे टूल अल्पावधीतच लोकप्रिय झालं.

या ए.आय. टूलने कलेच्या दुनियेत क्रांती झाली. कलाकृती निर्माण करण्यासाठी तुम्ही कलाकार असायला हवं ही अटच त्यामुळे बाजूला पडली. जगभरातल्या युजर्सचा डेटा या ए.आय. अल्गोरिदम्सना दिला जातो, अस्तित्वात असलेल्या कलेच्या मोठ्या डेटासेटमधून शिकून ही ए.आय. मॉडेल्स आश्चर्यकारक व्हिज्युअल आर्टवर्क तयार करू शकतात, अगदी वास्तववादी लँडस्केपपासून ते अमूर्त कलेच्या उत्कृष्ट नमुन्यापर्यंत.

पण ए.आय. मॉडेल्स वापरून बनवलेल्या चित्राला कलाकृती म्हणायचं का?

एक उदाहरण पाहू. जेसन मायकल ॲलन. अमेरिकेतल्या कोलोरॅडो टेक्निकल युनिव्हर्सिटीतून कॉम्प्युटर सायन्सची डिग्री मिळवलेला हा तरुण. कलेची कोणतीच पार्श्वभूमी नाही. त्याने २०२२ च्या कोलोराडो स्टेट फेअरच्या वार्षिक ललित कला स्पर्धेत छायाचित्रण (photomanipulation) श्रेणीमध्ये पहिलं बक्षीस पटकावलं. पण त्याच्या विजेतेपदाचं वेगळेपण होतं त्याची निर्मिती. ‘थिएटर डी’ऑपेरा स्पेसियल’ (Théâtre D'opéra Spatial), ब्रह्मांडात असलेलं एक स्पेस ऑपेरा हाऊस, असं एक चित्र त्याने तयार केलं होतं. त्याने हा फोटो मिडजर्नी (Midjourney) नावाच्या जनरेटिव्ह एआय प्लॅटफॉर्मच्या मदतीने तयार केला होता.

अशा प्रकारचा पुरस्कार जिंकणारी ही पहिली ए.आय.निर्मित इमेज ठरली. ॲलनने ही इमेज तयार करण्यासाठी जवळजवळ ६०० हून अधिक टेक्स्ट प्रॉम्प्ट्स आणि इनपुट वापरले. त्यानंतर त्याने ॲडोब फोटोशॉप (Adobe Photoshop) वापरून त्यात बदल केले आणि गिगापिक्सेल ए.आय. (Gigapixel AI) टूलने त्याला मोठं केलं. त्याच्या या कामामुळे माणूस आणि मशीन यांच्यातील निर्मितीची रेषा आणखीनच धूसर करून ठेवली.

ai and art

(image : Théâtre D'opéra Spatial )

पुढे ‘थिएटर डी’ऑपेरा स्पेसियल’ ने फ्रान्समधील एका प्रादेशिक कलास्पर्धेत पहिलं स्थान पटकावलं आणि एकच वाद सुरू झाला. समीक्षकांचं म्हणणं होतं, की याचं श्रेय ए.आय. अल्गोरिदमला मिळालं पाहिजे, मानवी कलाकाराला नाही. एक मतप्रवाह असाही होता, की ही मुळात कलाकृतीच नाही. ए.आय.च्या कलात्मक अभिव्यक्तीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. कलेला एक आत्मा असतो, मात्र ए.आय.ने निर्माण केलेल्या कलाकृतीतील ‘आत्म्याला’ आपण कसं परिभाषित करणार? असा प्रश्न उपस्थित केला गेला.

सतराव्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच इम्प्रेशनिस्ट आणि चित्रकार पॉल सेझानचं एक वाक्य आहे, ‘A work of art which did not begin in emotion is not an art.’ त्यामुळे काही ओळींच्या सूचनेवर तयार झालेल्या चित्राला कलाकृती कसं मानायचं असं विचारलं जाऊ लागलं. ए.आय. मानवी अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेची जागा घेईल अशी भिती अनेक कलाकारांना आणि कालाप्रेमींना वाटू लागली.

मानवी अनुभव आणि भावना नसलेला ए.आय. कलेला ‘कलाकृती’ बनवणारं सारतत्त्व खरंच एखाद्या कलेत उतरवू शकतो का? कलेची प्रेरणा ठरणारा मानवी अनुभव एखादं यंत्र खरंच समजू शकतं का?

फ्रेंच व्हिज्युअल आर्टिस्ट हेन्री मेटिस यांचे शब्द लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे: ‘Creativity is allowing yourself to make mistakes. Art is knowing which ones to keep.’ प्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांनी म्हटलं होतं, ‘Art is the elimination of the unnecessary.’

या दोन विचारांचा आधार घेतला तर ते ए.आय. आणि कलाकारांच्या सहअस्तित्वाचा पाया बनू शकतात. दोन्ही विचारांचं सार लक्षात घेतलं तर चुकांतून शिकत शिकत, जे नको आहे ते टाळून, एका कलाकृतीत काय अपेक्षित आहे याचा शोध कलाकाराला घ्यायचा असतो. कलाकाराच्या कल्पनाशक्तीला जर ए.आय.ची जोड मिळाली तर त्याला हे काम आणखी जलदगतीने आणि आणखी सर्जकतेने करता येण्याच्या शक्यता खुल्या होतात.

ए.आय. म्हणजे सर्जनशीलतेसाठी धोका मानणं कितपत बरोबर आहेॽ ए.आय.मध्ये कलेला वाढवण्याची आणि प्रेरणा देण्याची प्रचंड क्षमता आहे आणि ती आपण ओळखली पाहिजे. ते कसं? सपन नरुला नावाचा भारतीय डिजिटल कलाकार ए.आय.च्या मदतीने मनमोहक भक्तिचित्रं रेखाटतो. तो ए.आय. अल्गोरिदम्स वापरून व्हिज्युअल तयार करतो आणि नंतर स्वतःच्या खास कलात्मक दृष्टिकोनातून त्यात सुधारणा करतो. तो ए.आय.ला वापर कला छापणारं मशीन म्हणून नव्हे तर मानवी कल्पकतेचा आधार म्हणून करतो.

ai and art

( Source : https://www.instagram.com/awedict_nft/ )

ए.आय. मानवी सीमांना धक्का देतो आणि एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याच्या अनपेक्षित अनंत शक्यता निर्माण करतो, ज्या कदाचित इतर मार्गांनी समोर आल्या नसत्या. थकवा, आळस अशा मर्यादा ए.आय.ला नाहीत. ए.आय. कल्पनांचा, शक्यतांचा मोठा साठा निर्माण करू शकतं. मानवी कलाकार, त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेने आणि अनुभवाने, या शक्यतांतून निवड करू शकतात, त्यात सुधारणा करू शकतात आणि त्यांना नवा अर्थ देऊ शकतात. आजच्या काळात अनेक कलाकार ए.आय.चा बाऊ न करता त्याचा वापर करू लागले आहेत. एका कलाकृतीला साकारण्यासाठीचे अगणित मार्ग ए.आय.मुळे त्यांना मिळत आहेत. हा दृष्टीकोन ठेवला तर ए.आय. हा मानवी कलाकारांना पर्याय नाही तर कलेच्या मार्गावरला वाटाड्या आहे असं म्हणता येईल.

ए.आय.ला अजून तरी स्वतःचा दृष्टिकोन नाही, त्याला भरवला जाणार डाटा कितीही अफाट असला तरी त्याची तुलना मानवी विचारांशी करणं चुकीचं ठरेल. ए.आय. किती प्रभावीपणे काम करतं हे ए.आय. वापरणारा किती कुशल आहे यावरून ठरतं. म्हणजे कलाकाराला ए.आय.ची मदत घ्यायची तर त्याला ए.आय. वापराचं तंत्र शिकावं लागणार. कलेसोबत हे तांत्रिक कौशल्य शिकणं त्याच्यासाठी फायद्याचंच आहे.

शिवाय, कलाकाराची दृष्टीच त्याला इतरांपासून वेगळी करते. त्यामुळे काही ओळींच्या प्रॉम्प्टवरून बनवलेली इमेज त्याला छेद देऊ शकेल असं चित्र आत्ता तरी नाही. भविष्यात ए.आय. कितीही शक्तिशाली बनलं तरी मानवी भावना आणि व्यक्त होण्याची तऱ्हा शिकणं त्याच्यासाठी अवघडच असणार आहे.

एक दशक जुनं असणारं ए.आय. अजून शिकतंय. मानवाचा शिकण्याचा प्रवासच काही लाखो वर्षांचा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आदिम काळात मानव तोंडात रंग भरून भित्तिचित्रं रंगवायचा, ब्रशच्या शोधामुळे मानवाची चित्रकला करण्याची प्रतिभा कमी झाली नाही, मग ए.आय. टूल्समुळे कलेकडे पाहण्याचा आणि त्याचा अनेकपदरी अर्थ लावण्याचा मूळ मानवी दृष्टीकोन बदलेल, असं कशावरून? त्यामुळे ए.आय. कलाकाराच्या पोटावर पाय देईल, मानवी कला संपुष्टात आणेल, अशी भीती बाळगण्याऐवजी ए.आय.मुळे मानवी कला कशी बहरेल यावर लक्ष देण्याची गरज आहे.

मन्सूर मुल्ला

मन्सूर थिंक बँक युट्युब चॅनलमध्ये कम्युनिटी मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. डिजिटल मीडिया हा त्याचा आवडीचा विषय आहे







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results