आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

अभिजात संगीत वादनाचं आगळंवेगळं फ्युजनः प्रोजेक्ट अनहद

  • शिल्पा दातार
  • 08.12.25
  • वाचनवेळ 6 मि.
anhad

नाशिकमधला उदोजी मराठा शिक्षणसंस्थेचा सुंदर परिसर. पटांगणात शामीयाना उभारण्यात आला होता. पुढ्यात व्यासपीठ होतं. ‘प्रोजेक्ट अनहद’ या इंन्स्ट्रूमेंटल संगीताच्या कार्यक्रमाची ही तयारी होती. सतार, बासरी, तबला, कीबोर्ड आणि ड्रम- वाद्यांनी लय पकडली. बागेश्रीच्या सुरांत तिथले श्रोते न्हाऊन निघाले.

‘प्रोजेक्ट अनहद’. समृद्ध कुटे, अद्वय पवार, प्रतीक पंडित या विशी-पंचविशीतल्या कलाकारांनी याची सुरुवात केली. त्यांच्यापैकी समृद्ध कुटे बासरी वाजवतो. अद्वय पवार तबलावादक आहे, तर प्रतीक पंडित सतार वाजवतो.

पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी धृपद अंगाची बासरी जगभरात प्रसिद्ध केली. त्यांचे शिष्य अनिल कुटे यांचा मुलगा समृद्ध. बाळपणी शब्दांआधीच बासरीचे सूर त्याच्या कानावर पडत होते. शाळेत असताना तो गाण्याच्या क्लासलाही जायचा. तेव्हा तिथे जे शिकायचा, ते तो घरी येऊन बासरीवर वाजवण्याचा प्रयत्न करायचा. बंदिशी वाजवण्याचाही प्रयत्न करायचा. त्याचे वडील हे त्याचे पहिले गुरू. गुरू-शिष्य परंपरेप्रमाणे तोही वडिलांच्या बासरीवादनाच्या क्लासला जायचा; तिथे इतर शिष्यांप्राणेच त्याला वागणूक मिळायची.

त्याला सीसीआरटीची केंद्र सरकारची शिष्यवृत्तीही मिळाली होती. दहावी झाल्यावर त्याला ‘स्पिक मॅके’ची (spic macay) मानाची समजली जाणारी शिष्यवृत्ती मिळाली. त्याअंतर्गत भुवनेश्वरला जाऊन गुरू पं. हरिप्रसाद चौरसिया यांची सेवा करण्याची, त्यांच्या सान्निध्यात राहण्याची संधी त्याला मिळाली. ही शिष्यवृत्ती शाळा-कॉलेजमधील तेरा ते सव्वीस या वयोगटातील मुलांना मिळते. ही शिष्यवृत्ती मिळालेला महाराष्ट्रातला तो एकमेव आणि वयानेही सर्वांत लहान शिष्य होता. भुवनेश्वरच्या आश्रमात रोज सकाळी लवकर उठून रियाज करावा लागायचा. शिवाय गुरुजींसाठी स्वयंपाक करणं, भांडी घासणं, बागेची निगराणी अशी कामंही करावी लागायची. तो सांगतो, ‘‘रोज सहा तास आम्ही रियाज करत असू. गुरुकुलात गुरुजी काही दिवस आम्हाला शिकवायचे, पुढचे दहा दिवस आम्ही रियाज करायचो. तिथं बरंच काही शिकायला मिळालं. गुरूबंधू मोठे असल्याने त्यांच्याकडूनही बरंच शिकलो.’’

गुरुकुलातला एक किस्सा तो सांगतो- "एकदा गुरुजी बासरीवादनात तल्लीन असताना वीज कोसळली. आम्ही खूप घाबरलो. पण गुरुजी शांतपणे बासरी वाजवत राहिले. विजेच्या आवाजाचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नव्हता.” गुरुकुलात राहून बासरीवादनात अमूलाग्र बदल झाला, असं तो म्हणतो.

गुरुकुलातून तो नाशिकला घरी परतला तेव्हा कोविडचा काळ होता. अद्वय, प्रतीक हे त्याचे मित्रही घरीच होते. अद्वय पवार पुण्याला पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे तबला शिकत होता. नाशिकमधील प्रसिद्ध ‘पवार तबला ॲकेडमी’ ही त्याच्या वडिलांची. तर प्रतीक पंडित प्रसिद्ध सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांचा शिष्य. उस्ताद शाहीद परवेझ यांच्या पुण्यातील घरी राहून तो सतार शिकत होता.

नाशिकमध्ये हे तिघं कोविडकाळात भेटले, तेव्हा सार्वजनिक कार्यक्रम बंद होते. तेव्हा हाताशी वेळ होता. तिघांच्या सहज गप्पांमधून विचार पुढे आला, की, स्वतःचं वेगळं असं काहीतरी केलं पाहिजे. तबल्याचा ताल आणि बासरी, सतारीच्या सुरांच्या मिलाफाने आपण फ्युजन तयार करू शकतो.’ अर्थात, पुढे काही करण्याआधी त्यांनी आपापल्या गुरूंची परवानगी घेतलीच. त्यात त्यांना चौथा कलाकार भेटला- प्रफुल्ल पवार. तो ड्रम वाजवण्यात निपुण होता..

त्यानंतर हे चौघं मिळून वेगवेगळे प्रयोग करायला लागले. हा प्रयोग फक्त वादनाचा असणार होता. यात गायन कुठेही नव्हतं. एरवी गायन मुख्य असतं आणि त्याला साथ द्यायला वाद्यं असतात. इथे मात्र वाद्यांचीच प्रमुख भूमिका असणार होती! प्रत्येक वाद्याला योग्य न्यायही मिळाला पाहिजे हाच चौघांचा प्रयत्न होता.

त्यांनी या बँडचं नाव ठेवलं, ‘प्रोजेक्ट अनहद’. अनहद म्हणजे अमर्यादित… कुठल्याही सीमारेषा नसलेलं संगीत. प्रोजेक्टची तयारी सुरू झाली. त्यासाठी चौघंही वेगवेगळी कंपोझिशन्स करत असत.

दरम्यान चौघांचंही संगीत शिक्षण सुरूच होतं. अद्वय आणि प्रफुल्ल यांनी संगीत विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. प्रतीक कॉमर्सचा विद्यार्थी होता. समृद्धने परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर म्युझिक ॲनॅलिटिक्समधलं पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो लंडनला गेला. तिथे त्याला म्युझिक थेरपीत काम करणारा फ्रेंच रूममेट मिळाला.. समृद्धचा डेझर्टेशन प्रोजेक्ट बायोमेट्रीक म्युझिकवरचाच होता.

‘प्रोजेक्ट अनहद’चं इंन्स्ट्रूमेंटल फ्युजनचं पहिलं सादरीकरण काळा राम मंदिरात झालं. ताल आणि सूर एकाच पातळीवर आणत कार्यक्रम करणं ही खरी कसोटी होती. ती या चौघांनीही व्यवस्थित पार पाडली. कारण त्यांना एकमेकांच्या क्षमता माहीत होत्या. असं आगळंवेगळं फ्युजन संगीत ऐकल्यावर प्रेक्षकांमधून छान प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.

केवळ वादनातून शास्त्रीय संगीताची अनुभूती देणारा नाशिकमधला हा पहिलाच बँड आहे. साधनशुचिता आणि परंपरा जपत तरल अभिजात संगीत ऐकवण्याला या बँडचं प्राधान्य आहे.

नाशिकच्या कार्यक्रमानंतर त्यांचे देशभरात इतके कार्यक्रम होऊ लागले, की आता दौऱ्यांचं वेळापत्रक आखावं लागतं. इंदूर, चंद्रपूरपासून हैदराबाद, मुंबईपर्यंत… आताही रण ऑफ कच्छ उत्सवासाठी त्यांना आमंत्रित केलं गेलंय.

मलेशियात पाच ते सहा ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. बहरिनला कार्यक्रम होतात. कझाखस्तानमध्ये २०२३ मध्ये पहिल्यांदा कार्यक्रम झाला. तिथून आजही आमंत्रण येतंच. कझाखस्तानला एकदा समृद्धबरोबर तिथल्या सहा ते सात बासरीवादकांची जुगलबंदी झाली. कार्यशाळा आणि कॉन्सर्टच्या माध्यमातून तिथल्या लोकांपर्यंत भारतीय सूर पोहोचताहेत. रशियन आणि कझाक लोकांना इंग्रजीही येत नाही, दुभाष्याच्या मदतीने शिकवावं लागतं. पण तिथले विद्यार्थी भारतीय वाद्य वाजवायला शिकताना खूप मेहनत घेतात. भारतीय शास्त्रीय नृत्य करणाऱ्या कझाक नर्तिकेबरोबरही एकदा ‘प्रोजेक्ट अनहद’चं एक सादरीकरण झालं. दूतावासातही कार्यक्रम झाला. हे चौघं सांगतात, ‘‘तिथल्या लोकांना भारतीय संगीताची भुरळ पडलीय. भारतातून कलाकार त्यांच्या देशात जाणं हीच खूप मोठी गोष्ट असते त्यांच्यासाठी. एका कार्यक्रमात राग दुर्गा वाजवल्यावर एका श्रोत्याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. भारतातली काही मुलं रशिया, कझाखस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतात, तेही आवर्जून कार्यक्रमाला येतात.”

इथे केशवसुतांच्या ‘सतारीचे बोल’ या कवितेची आठवण येते. कवितेतल्या माणसाची अवस्था ‘काळोखाची रजनी होती, हृदयी भरल्या होत्या खंती,’ अशी असते. सतारीचे ‘दिडदा दिडदा’ हे बोल ऐकून तो तणावमुक्त होतो. बासरीचं तेच. मन अशांत असलं आणि बासरीचे सूर कानावर पडले की अपार शांतता मिळते, ती वर्णनातीत असते. तबल्याच्या तालात आपण हरवून जातो. भारतीय संगीत आणि वाद्यं यांची जादू उगाच नाही जगभरातल्या श्रोत्यांवर गारूड करत!

समृद्धने कझाखस्तानमध्ये एका पाश्चात्य बासरीवादकाबरोबर मोझार्टची ‘टर्किश मार्च’ ही सिंफनी वाजवली. समृद्धची बांबूची बासरी आणि त्या वादकाची धातूची बासरी… यांतून रागदारीचे सूर उमटले त्याला तोड नाही, असं श्रोत्यांनी सांगितलं. तिथल्या लोकांना बांबूची बासरी आवडते, तिथल्या कलाकारांना आपल्याकडची भजनंही वाजवावी वाटतात.. कझाखस्तान हा मुस्लिमबहुल देश असल्याने हे विशेष. शेवटी मनाला आनंद देणाऱ्या सुरांना कोणत्याही जातिधर्माचं, देशांच्या सीमारेषांचं बंधन नसतं, हेच खरं.

‘प्रोजेक्ट अनहद’ची शाखा आता जपान आणि कझाखस्तानमध्येही आहे. भारतातही त्यांच्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद आहे. आपल्याला वाटतं, रॅप, पॉपच्या जगात भारतीय शास्त्रीय संगीताचं काय होणार? पण तरूणाईचा त्याकडे वाढता कल पाहून आपलं संगीत खऱ्या अर्थाने अभिजात असल्याचा प्रत्यय येतोय.

स्पिक मॅके
१९७७ साली दिल्लीमध्ये डॉ. किरण सेठ यांनी ‘स्पिक मॅके’ या संघटनेची स्थापना केली. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत, संस्कृती, कला आणि जागतिक वारसास्थळांच्या प्रसारासाठी ही संघटना काम करते. वेगवेगळे इव्हेंट आणि कार्यशाळांच्या माध्यमातून देशभरातल्या तरूणाईला जोडण्याचे प्रयत्न केले जातात. कलेच्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून दिग्गज गायक, नर्तक, गीतकार, संगीतकार, वादक, कलाकार यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते. 

शिल्पा दातार | 7020659314 | mrs.shilpapankaj@gmail.com

शिल्पा दातार या मुक्त पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results