
घिबली आर्टने मागील दोन दिवसांत इंटरनेटवर गदारोळ माजवलाय. राजकारणी, सेलिब्रिटी, खेळाडू, कॉलेजवयीन तरुण तरुणी ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण घिबलीच्या प्रेमात पडलेत. इतके की घिबली इफेक्ट करून देणाऱ्या एआय साइट्सवर ट्रॅफिक जॅम झाला आहे. पण हा घिबली एनिमेशन प्रकार कालआजचा नसून तब्बल चाळीस वर्षं जुना आहे.
जपानी चित्रपट दिग्दर्शक हयाओ मियाजाकी यांनी १५ जून १९८५ रोजी तीन सहकाऱ्यांसोबत जपानच्या टोक्यो शहरातील घिबली स्टुडिओची स्थापना केली. घिबली या शब्दाचा अर्थ 'वाळवंटातील गरम हवा' असा आहे. मियाजाकी यांनी एनिमेशन क्षेत्रात नवीन वारं वहावं, नवे आणि भन्नाट प्रयोग व्हावेत या हेतूने घिबली स्टुडिओची स्थापना केली. एनिमेशन इंडस्ट्रीत मोठं नाव असलेल्या घिबली स्टुडियोने आतापर्यंत २५ पेक्षा अधिक फिचर फिल्म्स, लघुपट, एनिमे फिल्म्स, अनेक जाहिराती आणि टेलिव्हिजन शोजची निर्मिती केली आहे. २००१ साली त्यांनी बनवलेल्या ‘स्पिरिटेड अवे’ सिनेमासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कारही मिळाला. शिवाय २०१४ साली त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कारानेही गौरवण्यात आलं.

२८ मार्च २०२५ रोजी चॅट जीपीटी आणि एआयने हयाओ मियाजाकी यांच्या सिनेमातील एनिमेशनमधून प्रेरणा घेऊन साध्या फोटोला घिबली स्टुडीओचा इफेक्ट देऊन त्याचं एनिमेशन बनवण्याचं टूल आणलं. बघता बघता हा ट्रेंड सोशल मीडियावर गाजायला लागला. चॅट जीपीटीवरील या घिबली एनिमेशन प्रकारात हाताने रेखाटल्याप्रमाणे कलाकृतीचा आव, कुठल्याही चित्राचं नेमकं डिटेलिंग, मृदू रंगसंगती हे मियाजाकी यांच्या एनिमेशन शैलीची वैशिष्ट्य दिसून येतात.
या ट्रेंडबद्दल खुद्द हयाओ मियाजाकींना काय वाटतं? ते म्हणतात, "प्रामाणिक कलाकृतीच्या निर्मितीसाठी आवश्यक खऱ्याखुऱ्या मानवी भावना आणि अनुभव एआय तयार करू शकत नाही आणि जरी एआयने ते केलं तरी त्या कलाकृतीत जीव आणि मानवता नसेल. माझी कलाकृती अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाशी जोडली जावी अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती.”
मात्र मियाजाकी यांच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायला नेटकऱ्यांना वेळ कुठे आहे?