प्रत्येक माणसाच्या अंगी अनेक कलांचा वास असतो यावर माझा विश्वास आहे. लहानपणी गाणं, नाचणं, नक्कल करणं अशा अनेक गोष्टी आपण करत असतो. मात्र,त्या सगळ्याच कलांमध्ये आपल्याला गती प्राप्त होते असं नाही. काळाच्या ओघात म्हणा, शाळेच्या अभ्यासामुळे म्हणा किंवा पोटापाण्याला लागल्यावर म्हणा, आपण त्या सगळ्या गोष्टी विसरतो. कदाचित, त्याची उपयोगिता नसल्याने आपण त्यावर लक्ष केंद्रित करत नाही आणि त्या नकळतपणे किंवा जाणूनबाजून विसरतो.
चित्रकला ही त्यातलीच एक कला आहे. काही कळत नसतं तेव्हापासून आपण चित्र काढतो. त्याचे आकार-उकार किंवा त्याची भूमिती-गणित आपल्याला कळत नसतात. आपण काय काढतोय हेही कळत नसतं, पण आपण नुसत्या रेघोट्या मारत असतो. मातीत, वाळूत, पाटीवर, पेपरवर कुठेही, हातात जे येईल त्याने ती चित्रं आपण साकारत असतो. याचं कारण माणसातली ती नैसर्गिक कला आहे. म्हणून नाही का, आदिमानवाने गुहाचित्रं बनवली, जी मानवाला भाषा येण्याच्याही अगोदर जन्माला आली आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीपासून माणसाच्या अंगी चित्रकला आहे आणि उत्क्रांतीमध्येही टिकून राहिली आहे. लहान मूल बोलायला शिकण्याच्या अगोदर चित्र काढायला लागतं. कारण चित्रकला हे माणसाचं एक्स्प्रेशन आहे. त्याची सगळ्यात आदिम अशी ती अभिव्यक्ती आहे.
...आणि आज आपल्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्षित कला कुठली असेल तर चित्रकला. या कलेबद्दल आपल्याकडे कुणाला आत्मीयता किंवा प्रेम नाहीय. माझ्या चाळीस वर्षांच्या अनुभवात तरी ‘माझा मुलगा छान चित्र काढतो' किंवा ‘त्याला चित्रकलेची फार आवड आहे' असं कोणी पालक म्हटल्याचं आठवत नाही. मुलगा गातो, वाद्य वाजवतो, नाचतो वगैरे बोलताना ऐकलंय; पण चित्रकला किंवा शिल्पकलेचं कौतुक होत नाही. कारण पालकांना त्यात अर्थकारण दिसत नाही. शिवाय चित्रकला म्हणजे खर्चिक कला आहे. कागद, रंग, ब्रश वगैरे कोण खर्च करणार? त्यात एखाद्याला उपजत आवड असेलही; पण पालकांची नजर झापडबंद असल्याने ‘कसले भिकेचे डोहाळे' म्हणून त्याला हिणवलं जातं. शेवटी, त्याला वाटतं, झक मारली आणि चित्रकलेच्या नादी लागलो!
खरं तर आपण प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत चित्रकला शिकतो; पण आपण त्याच्याकडे केवळ परीक्षेचा विषय म्हणून पाहतो. त्यात गोडी निर्माण व्हावी म्हणून ना पालक प्रयत्न करत, ना शिक्षक. चित्रकलेचे शिक्षकही इतर शिक्षकांपेक्षा थोडे डावेच गणले जातात. त्यांना फार काही मान नसतो. तेही असेच कुठल्या तरी आर्ट स्कूलमधून पास झालेले असतात, आणि ही कला उदरनिर्वाहासाठी वापरतात. ते घरी गेल्यावर स्वत: किती चित्रं काढतात हा प्रश्नच आहे. म्हणजे थोडक्यात, चित्रकला समाजात रुजावी म्हणून कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही.
मलाही चित्रकला हा विषय होता आणि मीही त्याकडे परीक्षा म्हणूनच पाहिलेलं होतं. पण मला आठवतंय, की मला चित्रकलेची आवड होती. मी चित्रं छान काढत असे. कारण विज्ञानामधल्या आकृत्या मुलं माझ्याकडून काढून घेत असत; पण कथाकथन, वक्तृत्व, अभिनय, गाणं या सगळ्यांप्रमाणे चित्रकलेतही आणखी काही करावं एवढं शहाणपण मला त्या वयात नव्हतं. मी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असे, पण चित्रकलेत परीक्षा दिल्याचंच स्मरतंय. चित्रकलेच्या ओळीने तीन परीक्षा मी पास झालो होतो. त्याचं प्रशस्तिपत्रकही मिळालं होतं मला; पण हळूहळू हे मागे पडलं आणि गाणं, अभिनय वाढीला लागले.
पुढे कॉलेजला गेल्यावर चित्रकला हा विषय पूर्णपणे मागे पडला. एवढंच काय, आपण चित्रकला शिकलोय हेच मी विसरत गेलो. महाविद्यालयीन शिक्षण कसंबसं पूर्ण झालं. मग पुढे मुंबईला जाऊन अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू झाली. गाणं तर माझा छंद होता आणि आहे. गाण्यात एक वेगळंच समाधान आहे. भारतीय शास्त्रीय आणि सुगम संगीत तर मला प्राणप्रिय आहे. त्यातही लता मंगेशकरांचं सुगम फिल्मी संगीत आणि गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचं शास्त्रीय संगीत मला खूप भावतं. खरं तर या दोघींइतकं मला इतर कुणीच आवडत नाही. त्यांच्या सुरांमध्ये असं काही आहे, जे मला पारलौकिकत्वाचा स्पर्श करून जातं. त्यामुळे एकीकडे अभिनयाच्या क्षेत्रात हातपाय मारत असतानाही गाणं माझ्यात जिवंत राहिलं.
पुढे अनेक अर्थांनी मी मुंबईत स्थिरावलो. करोनाच्या आधीचा काळ फार विविधांगी होता. त्याआधी पाच वर्षं सोनी टीव्हीवरची ‘मेरे साई' नावाची मालिका चालू होती. ‘वाडा चिरेबंदी' आणि ‘अलबत्या गलबत्या' ही नाटकं जोरात चालू होती. खूप कष्ट होते, पण त्यातून मिळणारं यशही अपार होतं. त्याच दरम्यान मला कुठे तरी अपूर्णत्वाची जाणीव व्हायला लागली होती. ती अशा अर्थाने, की कोणत्याही नाटकाचे एकदा २५ प्रयोग करून झाले की आपल्याला भूमिका सापडते. त्यानंतर आपण रुळतो. ठराविक जागा तशाच्या तशा घेतल्या की तो प्रयोग तंत्राच्या अंगाने मारून नेता येतो. ‘अलबत्या गलबत्या' आणि ‘वाडा चिरेबंदी'मध्ये माझा मलाच एकसुरीपणा जाणवायला लागला होता. वेगळं काही तरी करायला पाहिजे ही बोच आतमध्ये वाढीला लागली होती, पण वेगळं म्हणजे काय करायचं हे कळत नव्हतं. लेखन करायचं तर त्यासाठी लागणारी ऊर्जा माझ्याजवळ नाही असं नाही. म्हणजे कुणी म्हणालं, की या-या विषयावर तुझं मत लिहून दे, तर लिहून देतो. पण काहीबाही प्रयोजन असल्याशिवाय मला लिहिता येत नाही. वाटत होतं, की गाणं शिकावं; पण बालपणात जसं गाणं गळ्यावर चढतं तसं काही आता होणार नाही हे मला माहीत होतं. तेही शिकेन कधी तरी माझ्या आवडीसाठी, पण आता एवढ्यात नाही. तर वेगळं काय करावं, हा विचार सतत मनात येत होता. आपल्याच कलेला चिकटून असणारी कला शिकावी किंवा ती जाणून घ्यावी असाही विचार होत होता. अगदी गेला बाजार असंही वाटत होतं, की आपण थोडं समाजकारणही करायला हवं. (हे अजूनही वाटतंय, पण त्यात अजून मार्ग सापडत नाहीये.) म्हणजे असा एक उपक्रम करायचा विचार होता, की प्राथमिक शाळांमध्ये जाऊन मुलांना गोष्टी वाचून दाखवाव्यात; जेणेकरून मुलांना वाचनाचं महत्त्व कळेल आणि मुलं पुस्तकं वाचायला लागतील. वाचनासाठी एक मानसिक एकाग्रता लागते. ती मुळात गोळा करावी लागते. ती गोळा करण्यासाठीसुद्धा पूर्वतयारी करावी लागते. त्याचंही नियोजन मुलांना शिकवता येईल का, याचाही विचार मनात होता आणि आहेही. पण ते अजून तरी घडलेलं नाही.
असंच एके दिवशी माझ्या मुलांचं शाळेचं काही तरी काम चालू होतं. शाळेने त्यांना चित्रकलेचा काही गृहपाठ दिलेला होता, आणि तो मी करून घेत होतो. एका बाजूला मुलं चित्रं काढत होती. सहज म्हणून मीही चित्र काढत होतो. मी काढलेलं एक चित्र बरं आलं. ते मुलांना आणि मयूरीलाही (बायको) आवडलं. म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी चित्र काढलं. ते नीटसं नाही आलं. बघून चित्र काढता येतं का ते पाहू या, म्हणून मी यूट्युबवर चित्रकलेचं प्रात्यक्षिक पाहिलं आणि मग थांबून थांबून चित्र काढायचा प्रयत्न करायला लागलो, तर हळूहळू मला जमायला लागलं. मग रोज चित्र काढण्याचा सराव करायला लागलो, त्यात हळूहळू गोडी उत्पन्न झाली. अजूनही चित्रकलेकडे मी विरंगुळा म्हणूनच पाहत होतो. आधी चित्र पाहून चित्र काढायला लागलो. त्यानंतर फोटो पाहून चित्र काढायला सुरुवात केली. चित्रात रंग छान भरता येऊ लागले.
मला पहिल्यापासून निसर्गचित्रं फार आवडतात. कारण निसर्ग आपल्या आत असतो. ऋतूनुसार त्याचे रंग, स्वभाव वेगवेगळे असतात. निसर्गातले रंग कागदावर उतरवणं खूप आल्हाददायक असतं. त्यामानाने मला माणसांची चित्रं काढता येत नाहीत. त्यात एक तंत्र असतं. त्यातली ॲनाटॉमी महत्त्वाची असते. ती मला अजून शिकायची आहे. पण निसर्गचित्रं मात्र मला जमतात.
असं सारं चालू असताना अचानक करोना आला आणि टाळेबंदी लागली. सगळंच उलटपुलट झालं. ज्या गोष्टींना पूर्वी किंमत होती किंवा मूल्यं होती, ती बदलली. माणसांच्या गरजा आणि धारणा बदलल्या. मी आमचं शूटिंग २२ मार्चला संपवलं आणि त्याच दिवशी टाळेबंदी लागली. मुलांच्या शाळा आधीच बंद झाल्या होत्या. मयूरीला घरूनच ऑफिसचं काम होतं. तर म्हटलं, घरी बसून काय करायचं, त्यापेक्षा आपण गावीच जाऊ या. एका रात्रीत आम्ही सामान भरलं आणि गावी निघून गेलो. जाताना माझे रंग आणि कागद जेवढे होते, ते सगळे घेतले.
आमचं गाव कासार-कोळवण. कोकणातलं अतिशय छोटं गाव. चार डोंगरांच्या मध्ये वसलेलं हे गाव वीस-पंचवीस घरांचं आहे. गावातून छोटी नदी जाते. अलीकडच्या काळात झाडं तोडून थोडं उघडं-बोडकं झालंय; पण माझ्या लहानपणी त्याची शोभा काही औरच होती. तेव्हा आमचं मोठंच्या मोठं श्रीमंती थाटाचं घर होतं. तिथे आजी-आजोबा, चुलत आजी-आजोबा, चुलत काका, सख्खे काका-काकू आणि खूप गडीमाणसं असत. घराभोवती नारळी-पोफळीच्या बागा, आंब्याची पुष्कळ झाडं असं वैभव होतं. पण आता ते जुनं घर पाडून एक छोटं घर बांधलंय. दोन काका-काकू तेवढे तिथे राहतात. सगळ्यांची मुलं गेली बाहेर किंवा शहराच्या ठिकाणी. आयुष्यात काही न घडणारी माणसं उरलीत, बाकी मोकळं झालं गाव. खायला काही नाही. हातखर्चाला पैसे पाहिजेत म्हणून झाडंमाडं तोडतात, पण झाडं लावत मात्र नाहीत. त्यामुळे गावाची शोभा कमी झाली. आपल्याकडच्या बऱ्याच गावांची परिस्थिती अशीच आहे. फार भीषण आहे हे सगळं...
तर आम्ही गावी आलो तसे मग सगळेच भाऊ, त्यांच्या बायका, काका-काकू पण तिथे राहायला आले. सगळे मिळून आम्ही त्या घरात वीस-पंचवीस जण झालो. मुलांना फार आनंद झाला. एक तर अभ्यास नाही आणि खेळायला मनमुराद जागा. मनसोक्त डुंबायला नदी होती. आंबे-फणस होते. करवंद, जांभळं आणि काजूची बोंडं होती. त्यामुळे मुलांची चंगळ झाली, पण मोठ्या माणसांची मात्र कोंडून ठेवल्यागत अवस्था होती. उठायचं, न्याहारी करायची, दुपारी नदीवर अंघोळीला जायचं. परत यायचं. जेवायचं, झोपायचं, संध्याकाळी फिरायला जायचं. फार तर पत्ते खेळायचे. इतकंच. पण मी मात्र चित्रकलेचं सामान बरोबर नेल्यामुळे तरलो. सगळे कागद वापरून झाले. नवे कागद कसे आणणार? कारण स्टेशनरी दुकानं वगैरे बंद होती. मग नदीवर अंघोळीला जायचो तेव्हा लक्षात आलं, की इथे वेगवेगळ्या आकारांचे दगड आहेत. त्यांवर आपण चित्र काढू शकतो. घरामध्ये खूप जुने पाट होते आणि काही फळ्या होत्या. त्यांवरही चित्रं काढायला लागलो. ती सगळी चित्रं व्हॉटस्अपवर आणि फेसबुकवर टाकत होतो. ते लोकांना आवडत होतं. लोक कौतुकही करत होते. शिवाय माझा वेळही छान जात होता. मात्र, एके दिवशी ठरलं, की आता देवरूखला राहायला जायचं. तिथेही चित्रकला चालूच होती. मधल्या काळात रंग संपले. मग मी रत्नागिरीहून मागवले. कॅम्लिनचे श्रीराम दांडेकर ओळखीचे होते. त्यांनी रत्नागिरीच्या त्यांच्या ओळखीच्या माणसाला सांगून मला रंग पाठवले.
टाळेबंदी थांबायची लक्षणं नसल्यामुळे सगळंच खोळंबल्यासारखं झालं होतं. मग कुठून तरी सुरुवात करावी म्हणून झी मराठीवर मालिका करायचं ठरलं. त्या मालिकेचं चित्रीकरण रत्नागिरीमध्ये करायचं ठरलं. मग तिथे एक फ्लॅट भाड्याने घेतला. तिथे मी राहायला आलो. तिथेही चित्रकला चालू होती. दिवसा चित्रीकरण आणि संध्याकाळी फिरणं चालू होतं. पण खरं सांगायचं तर कोरोनामुळे हादरायलाही झालं होतं. चार महिने काम नाही, एका पैशाची मिळकत नाही. आणि या सगळ्यापेक्षा हे संपणार कधी, संपणार आहे की नाही याची काहीच शाश्वती नव्हती. या काळात चित्र काढताना मात्र मन रमत होतं. माझा तेवढा वेळ ताणमुक्त जात होता.
हळूहळू टाळेबंदी शिथिल व्हायला लागली. बऱ्यापैकी नियम पाळून फिरायची मुभा मिळाली. मग मुंबईत आलो. माझं शूटिंग सुरू झालं. चित्रं काढणं चालूच होतं. असाच एक दिवस शूटिंगला गेलो होतो. माझा चित्रकलेचा विषय चालू होता, तर किशोरी गोडबोले मला म्हणाली, की ‘तू चित्रं कधी विकणार असशील तेव्हा सांग मला. मला एक विकत घ्यायचंय.' म्हटलं, “नक्की देतो.” आणि तेव्हाच मला एक कल्पना सुचली. कोरोनाच्या काळात रोज हातावर पोट असलेल्या लोकांचे सगळ्यात हाल झाले. त्यांना आमचे नाटकवाले जमतील तशी मदत करत होते. मग मीही ठरवलं, की आपण चित्रं विकायची आणि ते पैसे रंगमंच कामगारांना द्यायचे. फेसबुकवर आणि इतरत्र मी आवाहन केलं, की ‘अशा पद्धतीने मदत करतोय, तर चित्रं विकत घ्या.' लोकांनी खरंच चांगला प्रतिसाद दिला. अश्विनी भिडे-देशपांडे, किशोरी गोडबोले, सुबोध भावे यासारख्या कलाकारांनी आणि श्रीराम दांडेकरांसारख्या कलाप्रेमींनी चित्रं विकत घेतली. अनेकांनी हेटाळणी, कुचेष्टाही केली; पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. तीन-साडेतीन लाखांची विक्री झाली माझ्या चित्रांची. ते सगळे पैसे गरजेनुसार लोकांना दिले. हा चांगला उपक्रम माझ्या चित्रकलेतून घडला म्हणायचा.
अनेकदा माझ्या मनात चित्रकला आणि अभिनय या दोन कलांची नकळत तुलना केली जाते. मला वाटतं, व्यक्त होण्यासाठी चित्रकला ही माझी गरज आहे. अभिनय ही नाही म्हटलं तरी दुय्यम कला आहे. याचं कारण ती परावलंबी आहे. तुमचं काम चांगलं होण्यासाठी केवळ तुम्हाला अभिनय चांगला येऊन चालत नाही, संहिता चांगली मिळायला हवी. मग दिग्दर्शक, कॅमेरामन, सहकलाकार, निर्माता, वितरक हे सगळं जुळून यायला हवं, तरच आपण काम चांगलं करतो हे लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. बरं, हे सगळं जुळून आलं तरी लोक ते पाहायला तिकीट काढून यायला पाहिजेत. पण हेही खरं आहे, की नाटक-सिनेमा-सीरियलमधला अभिनय ही थेट लोकांपर्यंत पोहोचण्याची कला आहे. त्याचा परिणाम काही वेगळाच असतो. दुसरं असं, की त्या रोजच्या जगण्याशी निगडित असणाऱ्या कला आहेत. गोष्ट ऐकायला सर्वांना आवडते आणि मग तीच गोष्ट दृक्-श्राव्य स्वरूपात पाहायला मिळाली तर गंमत येते. लोकांच्या मनात ती दीर्घकाळ रुंजी घालते.
पण चित्रकला आणि संगीत या खूप आदिम कला आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सापडलेली कातळशिल्पं हजारो वर्षं जुनी आहेत. गुहांमधली चित्रं तेवढीच जुनी आहेत. चित्रकला प्रतिसृष्टी निर्माण करते. कलाकार त्याच्या आतून काही तरी काढून ते कागदावर उतरवत असतो. सगळे युरोपियन चित्रकार घ्या. शेकडो वर्षांपूर्वीही त्यांनी काय काम करून ठेवलंय! आपली अजिंठ्याची चित्रं पाहा. काय अप्रतिम अभिव्यक्ती आहे! चित्रांमधून आतलं जगही दाखवत असतो चित्रकार. पाश्चात्त्य देशांतल्या अनेक चित्रकारांची चित्रं मी पाहत असतो. व्हॅन गॉगला काय म्हणावं! मानसिक आजार असताना त्याने जे काम केलंय ते केवळ अफाट आहे. जसं संगीत तुम्हाला पारलौकिकत्वाला स्पर्श करण्याची संधी देतं, तसं एखादं चित्र तुम्हाला गूढ, अज्ञात प्रदेशाची भेट घडवू शकतं.
पूर्वीच्या महान कलावंतांनी काढलेली चित्रं आणि कोरलेली शिल्पं पाहत पाहत माझा चित्रकलेचा प्रवास आत्ता कुठे सुरू झालाय. मला यातून आणखी भारी असं काही गाठायचंय का? तर नाही. माझा विरंगुळा आहे हा. चित्रकलेमुळे माझं दोन-चार तास उत्तम मेडिटेशन होतं, ध्यानधारणा होते. मी हरवून जातो. तेवढंच मला हवं आहे.
मघाशी म्हटलं तसं, चित्रकला ही आधी माझी गरज आहे. कुणासाठी म्हणून मी चित्रं काढत नाही. ती आधी माझ्यासाठी असतात आणि मग इतर ते पाहतात. त्या अर्थाने ही कला कुणावर अवलंबून नाही. अमूर्त चित्रं ही या सगळ्यातली खूप वरची अवस्था आहे. त्यात काही म्हणायचं असतंही आणि नसतंही. त्यात काय सापडलं हे नाही सांगता येत, पण काही तरी दिसतं. रागसंगीतामध्येही हाच अनुभव आपण घेत असतो. किशोरीताई, कुमार ऐकताना असं काही तरी जाणवतं, जे शब्दांत सांगता येत नाही. पण आत काही तरी समृद्ध होतं, एवढंच कळतं.
या सगळ्याचा माझ्या अभिनयावर परिणाम होतो का? तर निश्चितपणे होतो. गाण्यांचा तर खूप परिणाम होतो. लय, ताल, सूर हे कुठेही येतात. त्या त्या रंगाचे सूर पकडावे लागतात. अभिनयातही वाक्य फेकणं म्हणजे काय असतं? तर त्या वाक्याचं रागसंगीतासारखं नोटेशन करावं लागतं. आवाजातले चढ-उतार काय, ते शब्दांवरचे जोर काय, संगीताचं चांगलं आकलन असल्याशिवाय यातलं काहीही उत्तमप्रकारे करता येत नाही. चित्रातही एक लय असते. चित्रामध्ये आपण रंग भरतो आणि भूमिकेतही नट रंगच भरत असतो. म्हणजे काय, तर एखादी निसर्गरम्य जागा, डोळ्यांसमोर मावळता सूर्य आपण चितारतो, तेव्हा जे रंग, जे वातावरण, जी शांतता आपण त्यात रंगांद्वारे भरतो, अगदी तसेच रंग उत्तम भूमिका रंगवताना नटाला भरावे लागतात. त्यामुळे चित्रकला आणि संगीताशी उत्तम जवळीक साधली तर तो नट फार काही ऐकू शकतो.
शिवाय, माझ्या माझ्यासाठी सांगायचं, तर अलीकडे मला अभिनयामध्ये काही विशेष घडताना दिसत नाही. ज्या प्रकारच्या भूमिका मला मिळायला पाहिजेत, ज्या पद्धतीचं वातावरण अभिनेता म्हणून मला अपेक्षित आहे, ते कुठे तरी कमी पडतंय असं वाटतं. आतून खूप काही करण्याची इच्छा आहे, पण ते आपल्या हातात नाही याची जाणीव व्हायला लागली आहे. त्याने आतल्या कलेला एक तुंबलेपण आलं आहे. त्या कलेला प्रसरण पावायचं आहे, पण ते शक्य होत नाहीये. राग, संगीत आता मी शिकू शकत नाही. कारण त्याला वेगळी ऊर्जा लागते. गुरू करून मी शिकूही शकतो. पण त्यासाठीचा वेळ, मनाची तयारी सध्या माझ्याकडे नाही. अशा वेळी चित्रकला माझ्या मदतीला धावून आली. आतल्या एक कलेने दुसऱ्या कलेमध्ये स्वत:ला मोकळं केलं.
बरेचजण विचारतात- अमुक एक चित्र काढावंसं का वाटतं? त्याचं उत्तर- अमुक एक चित्र काढावंसं वाटतं यापेक्षा मला चित्र काढावंसं वाटतं हे आता माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. असंही वाटतं, की चित्र काढण्याला काही प्रयोजन असावं का? किंवा, मला तसं काही वाटतं का? तर त्याचं उत्तर ‘नाही' असंच द्यावं लागेल. याचं कारण या कलेशी मी अजून ओळखच करून घेतोय. ती पूर्ण परिचयाची झाल्यावर मग त्यामध्ये स्वत:चा शोध घेणं चालू होऊ शकतं.
अभिनेता म्हणून मला विविधांगी भूमिका करणं आवडतं- अगदी वेगवेगळ्या वयोगटांच्याही भूमिका. तसंच चित्र काढण्याच्या कुठल्याही माध्यमाला मी गौण मानत नाही. मी ॲक्रिलिक आणि वॉटर कलरमध्येही काम करतो. आणखी एक- अनेक कलाकार असे आहेत, ज्यांच्याकडे एक म्हणजे एक कला असं नाहीये. लताबाई फोटोग्राफी छान करायच्या. आशाताई स्वयंपाक उत्तम करतात. किशोरीताई कविता करायच्या, रांगोळी छान काढायच्या. कुमारजी नकला छान करायचे. वसंतराव तबला वाजवायचे, पु.लं.बद्दल तर काय बोलावं. म्हणजे कला एकमेकांच्या वळचणीलाच असतात. फक्त आपलं लक्ष जायला हवं.
थोडक्यात काय, तर चित्रकला आणि संगीत या चांगल्या जीवनासाठी आवश्यक अशा कला आहेत असं मला वाटतं. त्या आपल्यात असल्या पाहिजेत असं नाही, पण त्याचं रसग्रहण करता यायला हवं. मुळात आपल्याला कुठल्याही गोष्टींची समज आली तरच आपण पुढे जातो. चित्रकलेच्या बाबतीत माझा असाच काहीसा अनुभव आहे. ज्या कलेशी माझा संबंध नव्हता ती अचानक एका वळणावर भेटते काय आणि पुढचा प्रवास सुरू होतो काय... खूप अगम्य गोष्टी असतात आपल्या आयुष्यात.
(अनुभव, फेब्रुवारी २०२३च्या अंकातून साभार.)
Key highlights- Vaibhav Mangle's journey is truly inspiring! It shows how painting, a talent he had almost forgotten from his childhood, turned into his safe haven during the pandemic. His story is all about how he used art not just for charity, but also as a way to meditate and grow personally. It's a wonderful reminder that engaging in creative pursuits can really brighten our lives in so many ways!
