बेळगाव जिल्ह्यातलं भोज हे छोटं खेडेगाव. इथेच माझं बालपण गेलं. आमचं एकत्र कुटुंब. माझे वडील माझ्या बालपणीच गेले. त्यामुळे माझे काका हेच कुटुंबप्रमुख व मला वडिलांच्या ठिकाणी. काकांना आम्ही ‘अण्णा' म्हणायचो. अण्णांचा स्वभाव कडक व रोखठोक, मात्र तितकाच प्रेमळ. बालवयात चित्रांचा छंद अनेकांना असतो. मलाही होता. वयाच्या दहाव्या वर्षीच ‘हस्तलिखित' मासिकात माझी चित्रं प्रसिद्ध झाली होती. पुढे आम्ही भावंडं शिक्षणासाठी कोल्हापूरला आलो. चित्रकलेतील साक्षरता म्हणता येईल अशा ड्रॉइंग ग्रेडच्या परीक्षाही मी दिल्या. त्या वेळी बक्षिसंही मिळाली. माझ्यात एक चित्रकार दडलेला आहे याची पहिली जाणीव या वेळी मला झाली. कोल्हापुरातलं वातावरण चित्रकलेला अनुकूल होतं. ख्यातनाम चित्रकार बाबुराव पेंटर, गजबर, आबालाल रहमान यांची चित्रं मला खुणावत होती. चित्रकलेची आंतरिक ओढ इतकी विलक्षण होती, की मॅट्रिक होताच चित्रकलेच्या उच्च शिक्षणासाठी मुंबईला जायचं, हेच मनाने निश्चित केलं.
१९४९ मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून मी कमर्शियल आर्टची पदविका मिळवली. या कोर्सनंतर मल्टिनॅशनल जाहिरात एजन्सीत भरघोस पगाराची नोकरी हे त्या वेळी अनेकांचं स्वप्न असे. जे. जे.मध्ये शिकत असतानाच हास्यचित्रांचा छंद मला लागला. या काळात माझी अनेक हास्यचित्रं ‘मनोहर', ‘हंस', ‘वसंत' आदी मराठी मासिकांत प्रसिद्ध होत होती. मुंबईच्या ‘हंस', ‘मोहिनी' मासिकांचे संस्थापक-संपादक अनंत अंतरकर यांचा या निमित्ताने जवळून परिचय झाला. ‘व्यंगचित्रं काढत राहा' हा त्यांचा संपादकीय पाठपुरावा सारखा सुरू असायचा. मी कोल्हापूरला परत गेलो तरीही तो सुरूच राहिला. व्यंगचित्राकडे एक छंद म्हणूनच मी पाहत होतो. थोडी गंमत. बस, एवढंच. कला म्हणून यात काय असणार आहे? ही वाट नंतर सोडून द्यायची आहे. मनोरंजनाच्या पलीकडे या क्षेत्रात काय असणार आहे?
माझं बालपण, चित्रं, हास्यचित्रं व आजचा मी या सर्व प्रवासात जे प्रश्न समोर आले त्यातल्या अनेक प्रश्नांना आजही माझ्याजवळ उत्तर नाही. माझे भाऊ बी.ए., बी.एस्सी.च्या कॉलेजच्या सर्वमान्य मार्गाने गेले. मलाही त्या वाटा उपलब्ध होत्या. पण चित्रं म्हणजे चित्रंच. अन्य कोणत्याही शिक्षणशाखेचा पर्याय मला मान्य नव्हता. इतका एककल्ली विचार मनात का ठाण मांडून होता? याचं उत्तर आजही माझ्याकडे नाही. चित्रं काढून हा काय करणार, याचं कसं होणार, हे माझ्या काकांना पडलेले प्रश्न होते. याचंही उत्तर त्या वेळी नव्हतं. मुंबईला ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'च्या कोर्सला पाठवण्याचं अण्णांनी मान्य केलं नसतं तर काय? उत्तर नाही. मुलाचा कल पाहून त्याला शिक्षण द्यावं, हा विचार त्या वेळी ओळखीचा नव्हता. चित्रकलेतील कला हाच कल व हीच वाट. ती धूसर, अज्ञात व अनिश्चित असूनही मी का निवडली याचं उत्तर माझ्याजवळ नाही.
पुढे ‘हंस प्रकाशना'चं पुण्यात स्थलांतर झालं. त्या वेळी अनंत अंतरकरांच्या सूचनेनुसार त्यांना सहकार्य करण्यासाठी मी तात्पुरता मुक्काम म्हणून कोल्हापुराहून पुण्यात आलो. हा तात्पुरता मुक्काम आज अठ्ठावन्न वर्षांचा झाला, तरीही अजून मी पुण्यातच आहे. माझ्या एकरंगी चित्राने बहुरंगी वेष पेहरून मुखपृष्ठावर प्रवेश केला. १९५२च्या एका दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर माझं चित्र (युवतीच्या साडीवर मांजराचे प्रिंट्स- तरुणाच्या मॅनिलावर उंदराचे प्रिंट्स) प्रसिद्ध झालं. त्याचं चांगलं स्वागत झालं. नंतर माझ्याकडे अनेक प्रकारच्या कामांचा ओघ सुरू झाला. हे मुखपृष्ठ माझ्या करियरला दिशा देणारं ठरलं. व्यंगचित्र माध्यमातून अनेक विषय मी चित्रित केले- गणित, शास्त्र, व्यवस्थापन, बँकिंग, जाहिरात, कायदा... अगदी तत्त्वज्ञानसुद्धा. चित्रकलेच्या वाटेवर सहज भेटलेलं हे व्यंगचित्र मनोरंजनाच्या पलीकडे जाणारं आहे हे लक्षात आलं. हे उथळ असतं तर मला त्याचा तळ दिसला असता. उलट, माझ्या सृजनशक्तीला सतत आव्हान देत आजही ते माझ्यापुढे उभं आहे. हास्यचित्र कलेच्या निकषावर उथळ असतं तर मी मुळीच इकडे वळलो नसतो. मी पेंटिंगकडे वळलो असतो. चित्रं व हास्यचित्रं यांचं नातं स्पष्ट व्हावं म्हणून माझ्या ‘हसरी गॅलरी' या चित्रप्रदर्शनात एक पॅनेल असे. या पॅनेलमध्ये वास्तव शैलीत मी केलेली स्केचेस, पोर्ट्रेट्स, निसर्गचित्रं असे नमुने लावलेले व त्या पॅनेलला शीर्षक असे- ‘हास्यचित्राची वाट चित्रकलेतून जाते'.
मला भेटलेल्या या हास्यचित्राने अनेक वळणं घेतली. यातलं जे जे स्वाभाविक म्हणून भावलं, सुचलं तसं ते उलगडत गेलं. मी मुखपृष्ठाच्या माध्यमातूनच हास्यचित्राकडे आलो. त्यामुळे शब्दांशिवाय चित्राने बोलायला हवं, ही तालीमच मला मिळाली. रेषा, रंग आणि आकार यांची वैश्विक भाषाच माझ्याजवळ आली. अशी चित्रं देश व भाषा यांच्या सीमा सहज ओलांडतात याची प्रचिती मला माझ्या विविध प्रदर्शनांतून मिळाली. ‘हसरी गॅलरी' हे चित्रांचं प्रदर्शन महाराष्ट्रातील सर्व महत्त्वांच्या शहरांत, शिवाय चित्रहास, प्रात्यक्षिकं या माध्यमातून दिल्ली, इंदौर, ग्वाल्हेर, वडोदरा, हैदराबाद, बेंगळुरु इ. अनेक शहरांतही सादर झाली. १९९७च्या परदेश प्रवासात अमेरिकेतील सहा शहरं व लंडन इथेही चित्रं प्रदर्शित झाली. ‘चित्रहास' हा कार्यक्रम मी व माझी पत्नी शकुंतला सादर करतो. यामध्ये बहुरंगी चित्रांच्या स्लाइड्स व प्रात्यक्षिकं यांचा समावेश असतो. प्रदर्शनात भेटलेल्या रसिकांच्या सूचनेवरून माझे चित्रसंग्रह प्रकाशित झाले.
‘मिस्कील गॅलरी', ‘हसरी गॅलरी' ही पुस्तकं, तसंच २०११ मध्ये ‘रेषाटन' हे माझं सचित्र आत्मवृत्त प्रकाशित झालं. लहान मुलांसाठी ‘पेंटिंग फॉर चिल्ड्रेन' ही छोटी पुस्तकं मराठी व इंग्रजीत प्रसिद्ध झाली.
या संदर्भात एक आठवण इथे सांगावीशी वाटते. एकदा एक जागरूक माता आपल्या छोट्या मुलाला घेऊन माझ्याकडे आल्या. त्यांनी त्याच्या चित्रांची वही माझ्यापुढे धरली. अपेक्षा- जरा मार्गदर्शन हवं इ. मला म्हणाल्या, “याला चित्रकलेला घालायचं आहे. ही स्केचेस थोडी वेडीवाकडी आहेत. प्रथम तो व्यंगचित्रं तरी नक्की काढेल. नंतर तो सुधारेल.” “सुधारेल?” म्हणजे मी आता कोणत्या टप्प्यावर आहे, असा प्रश्न मलाच पडला. शेवटी त्या बाईंना मी सांगितलं, “त्याला प्रथम चित्रकला शिकू द्या. व्यंगचित्र ही एक भाषा आहे. राजकीय टीकाचित्रात ती प्रहार करते. शैक्षणिक पुस्तकात ती क्लिष्ट विषय सोपा व प्रसन्न करते.”
ललित साहित्याच्या सजावटीच्या वेळी हास्यचित्राची भाषा वेगळी असते. साहित्याचं तिथे भाषांतर नसतं. त्यातील काही अनुभूती अशा असतात की जिथे शब्द पोचत नाहीत तिथे चित्र पोचतं. हास्यचित्रांचेही अनेक पैलू असतात. खो खो करून हसू आणणारी, निखळ आनंद देणारी चित्रं; कवितेच्या अंगानं जाणारी तरल अनुभव देणारी, अंतर्मुख करणारी. माझी काही चित्रं दोन स्तरांवर संवाद करतात. एक मुखपृष्ठ- रस्त्यावर सिग्नलच्या चौकात वाहनं थांबलेली. दोन स्कूटर्स जवळ जवळ थांबलेल्या. मागे पिलियन सीटवर बसलेल्या परिचित स्त्रिया अनायासे जवळ आल्या. त्यातील एक स्त्री तिथेच दुसरीला कुंकू लावून निमंत्रण पत्रिका हातावर ठेवतेय. या गमतीदार प्रसंगाला दुसरा एक समांतर अर्थ स्पर्श करतो. गर्दी आणि वेग यांच्या नव्या जीवनशैलीमुळे माणसाचं सहजसुंदर जीवन किती आक्रसून तणावाखाली गेलंय, ही अगतिकता इथे अधोरेखित करते.
राजकीय टीकाचित्रं मी केली आहेत, पण कार्यक्षेत्र म्हणून मला त्यात रस वाटला नाही. निखळ आनंद देणारी चित्रं, दैनंदिन- सामाजिक विषयांतील विसंगतीवर सहज बोट ठेवणारी माझी चित्रं केव्हा केव्हा कुणाच्या दृष्टीने दाहक ठरतात. मध्य प्रदेशातील एका मासिकाच्या विशेषांकासाठी मी बहुरंगी विनोदी चित्र पाठविलं. चित्राचं स्वरूप असं- एक साधू डोळे मिटून बसलेला. एक हात आकाशाकडे, दुसरा हात एका स्त्रीच्या पर्समध्ये. ती भक्त स्त्री मात्र डोळे मिटून हात जोडून समोर बसलेली.
हे चित्र प्रकाशित होताच चांगलाच गहजब उडाला. संपादक महाशयांच्या कचेरीवर मोर्चा. त्या चित्रामुळे कुणा साधू पंथाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यांनी आत्मदहनाची धमकी दिली इ. हा सारा वृन्तात त्या संपादकांनी मला पत्रातून कळविला व दिलगिरीसह खुलासा केला, की आम्ही ते चित्र नंतर जरूर ते बदल करून पुन्हा प्रकाशित केलं. नंतर दोन वर्षांनी हेच (मूळ चित्र) ‘मोहिनी' दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ म्हणून प्रकाशित झालं. मराठी वाचकांनी नेहमीप्रमाणेच त्याचं स्वागत केलं. त्या चित्रातील टीका तथाकथित साधूवर-ढोंगबाजीवर होती.
व्यंगचित्राची भाषा समजली नाही तर कसे घोळ होतात याचं दर्शन आपल्याला अनेकदा होत असतं. सत्तेच्या राजकारणाचा प्रवेश प्रत्येक क्षेत्रात झाला की कसं अंधत्व येतं याची अशी ठसठशीत उदाहरणं सतत दृष्टीस पडतात. व्यंगचित्र ही लोकशाहीची भाषा आहे. त्याला घटनेने मान्यता दिलेली आहे. किती तरी भेदक शब्दांनी अनेक खासदारांनी आपली नापसंती- मतभेद यापूर्वी पार्लमेंटमध्ये व्यक्त केले आहेत. मात्र, हाच आशय व्यंगचित्रं मांडतात तेव्हा तो जास्त प्रखर होतो की काय? मतभेद व्यक्त करणारी व्यंगचित्रांची अहिंसक वाट बंद झाली तर असनदशीर हिंसेची वाट खुली होते. यालाच तुम्ही तालिबानी वाट म्हणाल. कोणताही मौलिक विचार विडंबनाने कधीही भ्रष्ट होत नाही, उलट तो उजळून निघतो.
थोडक्यात, चित्र व व्यंगचित्र अद्याप आपल्याकडे पुरेसं रुजलेलं नाही. त्याच्या साक्षरतेची नितांत गरज आहे, असं मला नेहमी वाटत आलं आहे.
(समकालीन प्रकाशनाच्या 'हसऱ्या रेषा बोलक्या रेषा' या पुस्तकातून)
