आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

धागा धागा रेखाटताना

  • मृदगंधा दीक्षित
  • 15.11.25
  • वाचनवेळ 18 मि.
asmita potdar

कलाकार नेहमीच प्रयोगशील असतात. किंबहुना प्रयोगशीलता हा कलेचा स्थायीभावच आहे. आधी कला येते, मागून त्यातले प्रयोग येतात. मात्र अस्मिता यांच्या या कलाविष्काराची सुरुवातच प्रयोगांतून झाली.

मागे एकदा पुण्यात अस्मिता यांच्या या फ्युजन चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. तेव्हा त्यांच्या या अफलातून प्रयोगाबद्दल ऐकलं होतं. वर्तमानपत्रांत छापून आलेले त्या चित्रांचे फोटो पाहिले होते, पण तेव्हा प्रत्यक्ष चित्रं पाहण्याची संधी मिळाली नव्हती. तेव्हापासून ही धागाचित्रं पाहण्याची आणि अस्मिता यांना भेटण्याची इच्छा होती. चित्रकला आणि भरतकाम यांचं हे फ्युजन घडलं कसं, भरतकामातून चित्रं साकारावीत असं त्यांना नेमकं कशामुळे वाटलं, हे जाणून घेण्यासाठी अस्मिता यांना संपर्क केला, प्रत्यक्ष भेटीची वेळ घेतली आणि कोल्हापूरला त्यांच्या घरी जाऊन धडकले.

अस्मिता मूळच्या कराडच्या. त्यांचे वडील सोनारकाम करायचे. आई विजया गृहिणी. आईच्या हातात कला होती. ती विणकाम, भरतकाम करत असे. अस्मिता यांना भरतकामाचं बाळकडू आईकडूनच मिळालं. स्वतः वेगळं काही करून बघावं असं त्या वयात त्यांच्या डोक्यात येणं शक्य नव्हतं. शिवाय शाळेत असताना त्यांना भरतकामाची नव्हे, तर चित्रकलेची गोडी लागली. त्यांना चित्रकलेचं अंग होतं. इतर कोणत्याही विषयापेक्षा चित्रकलेच्या तासाला त्या अधिक रमत. मात्र, एका वेगळ्याच प्रसंगाने भरतकामाने पुन्हा एकदा त्यांच्याही नकळत त्यांच्या डोक्यात, मनात गुपचूप प्रवेश केला. झालं असं, की एकदा त्यांच्या शाळेची सहल कोल्हापुरातील न्यू पॅलेस म्युझियमला गेली होती. तिथे त्यांनी शाहू महाराजांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी गाठी आणि दोऱ्यांनी विणलेलं चित्र बघितलं. कसं कोण जाणे, आपणही असं करावं असं त्यांना त्या शाळकरी वयातही वाटलं. त्या चित्राचा त्यांच्या मनावर किती खोल परिणाम झाला असेल हे आज त्यांची धागाचित्रं बघून लक्षात येतं.

asmita potdar

शाळाशिक्षण सुरू असताना चित्रकलेची साथसोबत होतीच. दहावीनंतरचा मार्ग निवडण्याची वेळ आली तेव्हा चित्रकलेचंच शिक्षण घ्यायचं हे त्यांच्या डोक्यात पक्कं होतं. त्याप्रमाणे सांगलीत जी डी आर्ट हा पाच वर्षांचा कोर्स करण्याचं त्यांनी ठरवून टाकलं. मात्र त्यांची ही निवड आई-वडिलांच्या पचनी पडणारी नव्हती. शिवाय त्यांना दहावीच्या पुढे शिकवण्याची वडिलांची फारशी मानसिकता नव्हती. झालं एवढं शिक्षण पुरे झालं, असं म्हणून घरी त्यांच्या लग्नाची बोलणीही सुरू झाली होती. लग्न लावून दिलं जाणार, या विचाराने अस्मिता यांचं धाबं दणाणलं. त्यांना कॅनव्हास आणि सांगलीतला जी डी आर्टचा कोर्स खुणावत होता. त्यांचे एक मामा सांगलीत राहायचे. अस्मिता यांना वाटलं की आपलं म्हणणं कदाचित मामा समजून घेऊ शकतील. शाळेत असताना कधी पानभर निबंध न लिहिलेल्या अस्मिता यांनी मामाला चांगलं दोन पानी पत्र लिहिलं. ‘मला इतक्यात लग्न करायचं नाहीये, मला शिकायचंय,' असा टाहोच त्या पत्रात होता.

मामाला भाचीची तळमळ जाणवली. त्याने अस्मिता यांच्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला; पण व्यर्थ. वडील काही बधले नाहीत. वडील हट्टी, तर पोरगी दहा हट्टी निघाली. ती सरळ घरातून पळून गेली. कपडेलत्ते, पैसे सोबत न्यायचं सोडून काढलेली चित्रं आणि पेन्सिली, रंग घेऊन ती सांगलीच्या बसमध्ये बसली. तेव्हा कराड गाव लहान, गावात सगळे एकमेकांना ओळखणारे. कुणी तरी तिला बसमध्ये बसताना बघितलं आणि घरी कळवलं. आपली मुलगी जाऊन जाऊन मामाकडेच जाईल हे घरच्यांनी ताडलं. झालं, अस्मिता मामाकडे पोचते ना पोचते तोच आई-वडील मागून हजर. मामाच्या घरात चांगलाच वाद पेटला. वडिलांसमोर मामाचा टिकाव लागणार नाही हे कळल्यावर अस्मिताने पुन्हा पायांत चप्पल अडकवली. या वेळी तर ती रिकाम्या हातानेच बाहेर पडायच्या तयारीत होती. घरच्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, तर म्हणाली, “मला कुणाचीही मदत नको. मी एकटी राहीन, पडेल ते काम करीन, पण जी डी आर्ट करेनच!” आता ही मागे हटायची नाही हे वडिलांना कळून चुकलं. शेवटी ते तयार झाले. पाच नाही, पण दोन वर्षांचा कोर्स करण्याची परवानगी मिळाली. अट होती- कोर्स संपला की लग्न करायचं.

जी डी आर्टच्या पहिल्या वर्षी अस्मिता मामाकडे राहिल्या, पण दुसऱ्या वर्षी वडिलांनी त्यांना होस्टेलला ठेवलं. अस्मिता सांगतात, “हे होस्टेलचे दिवस माझ्या आयुष्यातले सर्वांत रम्य दिवस होते. तिथे वेळेचं बंधन नव्हतं आणि माझा अखंड वेळ संपूर्णपणे माझा होता. कलेचं शिक्षण चालू होतं. बाकी वेळेत आम्ही मैत्रिणी चालत निघत असू. वाटेत शेतं, गोठे, जनावरं कुठलाही लॅन्डस्केप पकडून चित्रं काढायला बसत असू. पुस्तकं, संगीत, भटकंती आणि मैत्री, वयाला वेड आणि वळण लावणारे हे छंद मला इथेच सापडले. या काळाने मला कलेशी जोडलेला स्वातंत्र्याचा धागा स्पष्ट करून दाखवला.”

asmita potdar

दोन वर्षं भुर्रकन उडून गेली. वडिलांना कबूल केल्याप्रमाणे अस्मिता लग्नाला तयार झाल्या, पण आता त्यांचीही एक अट होती- ‘मी लग्नानंतर शिक्षण पूर्ण करणार'. ही अट मान्य करणारं कोल्हापूरच्या अरुणकुमार पोतदार यांचं स्थळ मिळालं. लग्न झालं; पण लग्नानंतर शिक्षण मागेच पडलं. कारण आता घरच्यांना मुलाबाळांचे वेध लागले. अस्मिता यांना दिवस गेले. आता हे चक्र असंच सुरू राहणार की काय याची काळजी मनात दाटत असतानाच अस्मिता यांची आई मदतीला आली. ती म्हणाली, “बाळ झालं की मी त्याला सांभाळेन, तू शीक.” आणि खरोखरच अस्मिता यांच्या मुलीला पहिली अडीच-तीन वर्षं आईने सांभाळलं. या काळात अस्मिता यांनी उरलेला तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केला.

शिक्षण पूर्ण झालं. मग दुसरी मुलगी झाली. अस्मिता पुन्हा घर-संसारात बुडून गेल्या. मात्र चित्रकलेने त्यांची साथ सोडली नव्हती. चित्रकलेशी संबंधित त्यांचे काही न काही उद्योग सुरू असायचे. सुरुवातीला काही काळ कागदाच्या लगद्यापासून वस्तू बनवणं, रांगोळ्या काढणं यात त्या रमल्या; पण पारंपरिक रांगोळी काढण्यात त्यांना समाधान वाटेना. मग त्यांनी त्यात प्रयोग सुरू केले. कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी येणार होते. अस्मिता यांनी रांगोळीमधून त्यांचं पोर्ट्रेट रेखाटलं. ते बघून मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं. अशीच एकदा त्यांनी काही निमित्ताने अर्जुनाला गीता सांगणाऱ्या महारथी कृष्णाची रांगोळी काढली. ती दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये पहिल्या पानावर छापून आली. हातातली कला काही लपून राहणार नव्हतीच. हळूहळू अशा प्रकारच्या कामांमधून त्यांना काही प्रमाणात पैसेदेखील मिळायला लागले. रांगोळीसाठी अस्मिता पोतदार हे नाव कोल्हापुरात प्रसिद्ध होत गेलं. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे अशा कामांमधून संसाराला हातभार लागण्याचं समाधान होतंच. शिवाय आपली कला जोपासली जाण्याचा आनंदही होता.

असेच प्रयोग म्हणून त्यांनी काही पोर्ट्रेटस् आणि पोस्टर्स केली. स्थानिक निवडणुकीत उभ्या असलेल्या एका उमेदवाराची पोस्टर्स रंगवून देण्याचं काम केलं. त्याचं एक उभं पोर्ट्रेटदेखील चितारून दिलं. या सगळ्या कामाचे त्यांना तेव्हा आठ हजार रुपये मिळाले. सहाशे रुपये पगारात घर चालवणाऱ्या गृहिणीसाठी आठ हजार रुपये ही रक्कम खूप मोठी होती. कलेमार्फत घरबसल्या बऱ्यापैकी पैसे मिळू शकतात हे सिद्ध झालं. तसे त्या मिळवतही गेल्या.

पण या कामांतून समाधान मिळत नव्हतं. शाळेत असताना म्युझियममध्ये बघितलेलं ते भरतकाम-चित्र मनात घर करून राहिलं होतं. ते त्या वेळी पुन्हा एकदा अलगद वर आलं. अखेर तसं एक चित्र भरून बघायचं त्यांनी ठरवलं. त्याला मुहूर्त मिळाला तो एका वेगळ्याच गोष्टीने. त्यांच्या भाड्याच्या घरात पाण्याची समस्या होती. सार्वजनिक नळाला पहाटे दोन-अडीचला पाणी यायचं. तिथे नंबर लावून पाणी भरावं लागायचं. मध्यरात्री उठायला उशीर झाला तर यांचा नंबर येईपर्यंत पाणी जायचं. यावर उपाय म्हणून अस्मिता यांनी एक दिवस ठरवलं, की पाणी येईपर्यंत झोपायचंच नाही. पण मग दोन-अडीच वाजेपर्यंत करणार काय? त्यांच्या पहिल्यावहिल्या भरतकाम-चित्राची सुरुवात झाली ती तिथे. पती अरुणकुमार यांच्या एक फोटोवरून त्यांनी कापडावर चित्र काढलं आणि ते भरायला घेतलं.

अशी स्केचेस- चित्रं काढणं, रंगवणं त्या शिकल्या होत्याच. पण आता त्या चित्रात रंगीत धाग्यांनी रंग भरायचे होते. त्यांनी निवडून त्या त्या रंगच्छटांचे दोरे आणले. लहानपणी त्या शिकल्या होत्या ते पारंपरिक पद्धतीचं भरतकाम. त्यात मुख्यत्वे पानाफुलांची नक्षी असायची, पण त्यातून चित्र उभं करायचं हे किचकट काम होतं. मात्र, हातातली कला इतकी ताकदवान होती, की कोणता टाका घालावा, किती अंतरावर घालावा, टाक्यांची उभी-आडवी दिशा कशी निवडावी-कशी बदलावी, दोरा कुठे बदलावा, असे प्रश्न त्यांना वळसा घालून निघून गेले. बघता बघता पोर्ट्रेट भरून झालं. अस्मिता म्हणतात, “बोटांत चित्रकला होती; छटा, स्ट्रोक्स, प्रमाण यांचं ज्ञान होतं. भरतकाम येत होतं. सुप्त मनाच्या पातळीवर या दोहोंची हातमिळवणी झाली असावी.”

asmita potdar

आजही त्या आधी कापडावर पेन्सिलने चित्राची बाह्यरेषा काढून घेतात आणि मग भरतकाम करत जातात. काही चित्रांमध्ये बेसची गडद छटा आधी भरून घेतात आणि मग विविध छटांनी वरचं काम करतात. (अस्मिता यांनी केलेलं वाघाचं आणि पक्ष्यांची काही चित्रं पाहिलीत तर या छटांचा अंदाज येईल.) अगदी क्वचित काही चित्रं सलग भरता येतात. भरतकामात शंभरहून अधिक प्रकारचे टाके असतात. चित्रात कुठल्या ठिकाणी कुठला टाका वापरायचा हे ठरवावं लागतं. चित्रातील स्ट्रोक्सप्रमाणे धागे उभे-आडवे कसे घालायचे ते ठरवावं लागतं. हे किती वेळखाऊ काम असेल, कल्पना करा. पण आपण तसं म्हटलं तर त्या पटकन आपल्याला दुरुस्त करत म्हणतात, “हे काम नाहीय. कामात वेळ जातो. ही कला आहे, साधना आहे. तासन्‌‍तास कसे गेले कळतसुद्धा नाही.”

पोर्ट्रेट, निसर्गचित्रं, लेणी, पौराणिक चित्रं, इतर चित्रकारांची भावलेली चित्रं असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले आहेत. बहराच्या ऋतूमधलं थ्रीडी परिणाम देणारं लँडस्केप एका चित्रात तळ्याकाठची झाडं, तळ्यातलं प्रतिंबिंब, पाण्यातल्या लहरी; दुसऱ्या चित्रात नुसत्या पांढऱ्या रंगाच्या कित्येक छटा; लेण्यांच्या चित्रांमधली शिल्पं, त्यातले उठाव, सावल्या हे तर जमून आलेलं आहेच; पण त्या चित्रातला रिकामा भाग चित्राला अमूर्ततेकडे घेऊन जाणारा आहे. राजस्थानी पगडी घातलेले, वाढलेल्या दाढीचे आणि पिळदार मिश्यांचे म्हातारबुवा, मस्त कश मारत बसलेला नेपाळी बाबाजी, डोक्यावर पागोटं घाटलेला रांगडा धनगर या चित्रांमधल्या सावल्या, सुरकुत्या, डोळे हे बारकावे शोधू तसे सापडत जातात. या सगळ्या चित्रांमधला समान धागा म्हणजे त्यातल्या भुरळ घालणाऱ्या रेषा म्हणजेच भरतकामाचे टाके. अस्मिता यांनी पुढे सचिन तेंडुलकरचंही एक धागाचित्र केलं.

दरम्यान, याच सुमारास अस्मिता महाराणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत कलाशिक्षक म्हणून रुजू झाल्या. त्या सांगतात, “शाळेच्या नोकरीने मला आर्थिक स्थैर्य दिलं. शिवाय सतत उत्साहाने वाहणारा मुलींचा वाहता झरा.. त्यामुळे पुढे कितीही अडचणी आल्या तरी मला कधीही निराशेने ग्रासलं नाही. यात माझ्या विद्यार्थिनींचं कुतूहल, उमेद आणि हिरीरी यांचा सिंहाचा वाटा आहे.”

एकीकडे त्यांचा भरतकामातल्या चित्रांचा प्रवास सुरूच होता. भारताच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून कापडाशी निगडित पारंपरिक कलाकृतींसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. अस्मिता यांनी सुरुवातीच्या टप्प्यात भरलेलं ‘भारतीय शेतकरी' हे चित्र या मंत्रालयाला पाठवलं. या चित्रासाठी अस्मिता यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सात वर्षांनंतर पुन्हा ‘राजस्थानी शेतकरी' या चित्रासाठीदेखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या दोन्ही धागाचित्रांमधल्या चेहऱ्यांवरच्या रेषा, प्रकाश, सावली, भाव आणि डोळे यांतले बारकावे दोऱ्यांच्या भरतकामातून आणले आहेत हे विस्मयकारक वाटतं. कश मारणाऱ्या नेपाळी बाबाचं चित्रंही असंच जिवंत आहे.

asmita potdar

अँकर या दोरे बनवणाऱ्या कंपनीकडूनदेखील चित्रांची स्पर्धा भरवली जाते. त्यातही त्यांच्या ‘नववधू' आणि ‘खेडेगाव' या दोन चित्रांना पारितोषिकं मिळाली आहेत. भारतात मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, अमृतसर अशा अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरली आहेत. इतकंच नव्हे, तर भारत शासनाकडून इटलीमध्येही त्यांच्या धागाचित्रांची प्रदर्शनं भरवली गेली आहेत. त्या जातील तिथे त्यांच्या या अनोख्या कलेचं कौतुक होत आलं आहे.

अस्मिता यांच्या या कलाकृतींमधल्या धाग्यांची निर्दोष वळणं आपल्याला पुन्हा पुन्हा अचंबित करतात. कारण यातला एक धागा, एक वळण चुकलं तरी हा परिणाम साधला जाणार नाही, हे ते चित्र पाहताक्षणी लक्षात येतं. भरतकामाच्या टाक्यांची अशी ‘हार्मनी' हाच त्यांच्या धागाचित्रांचा ‘यूएसपी' आहे.

कागदात बांधून दिलेला कोल्हापुरी वडापाव, ब्रेड स्लाइस, त्यावर तळलेली मिरची आणि शेजारी पाण्याचा ग्लास असं एक चित्र त्यांनी भरलं आहे. एकाच चित्रात त्यांनी वर्तमानपत्राचा चुरगळलेला कागद, त्यावरच्या बातम्या, ब्रेडचा लुसलुशीतपणा, काचेच्या ग्लासातलं पाणी असे अनेक पोत आणले आहेत. कोल्हापूर सिरीजमध्ये त्यांनी अंबाबाईचं मंदिर, रंकाळा, पंचगंगा पात्रातील मंदिर अशी चित्रं भरली आहेत.

asmita potdar

एकीकडे कलेतले असे प्रयोग चालू असताना विविध चित्रकारांच्या चित्रांचा अभ्यास, समकालीन चित्रकारांची चित्रं बघणं, त्यांच्याशी संपर्क करणं या गोष्टी चालूच होत्या. यामधूनच त्यांनी मिलिंद मुळीक यांची जलरंगांतली चित्रं बघितली. मुळिकांची लँडस्केप्स त्यांना विशेष भावली. ती चित्रं आपण भरतकामाने कापडावर उतरवावीत असं त्यांना वाटलं. मग या वेडाचा पिच्छा सुरू झाला. ही चित्रं इतकी सुंदर झाली आहेत! ती धागाचित्रं बघून मुळीक यांची प्रतिक्रिया होती, ‘माझ्या चित्रातल्या रंगांपेक्षा तुमच्या धाग्यांमधून झाडं अधिक उठून दिसतात!'

लँडस्केपमधली झाडं रेखाटण्यासाठी अस्मिता यांनी कधी एक टाका, कधी डबल टाका वापरला आहे. जवळची पानं दाखवण्यासाठी जाड धागा आणि डबल टाका वापरला आहे, तर लांबची झाडं दाखवण्यासाठी बारीक धागा वापरला आहे. काही चित्रांत निळ्या आभाळासाठी आपोआपच गोल गोल टाके घातले गेले. प्रकाशकिरणांविषयी तर त्यांना विशेष आपुलकी असल्याचं जाणवतं. त्यांच्या स्वभावातही ती सकारात्मकता आणि ताजेपणा असल्यामुळे असेल कदाचित, सकाळची किरणं त्यांनी अनेक ठिकाणी फार कल्पकतेने भरली आहेत. शीत रंगसंगती त्यांना अधिक भावते. लँडस्केपना आलेला थ्रीडी इफेक्ट, कुठे व्हॅन गॉगचा प्रभाव, प्रकाशकिरण आणि सावलीचे खेळ यामुळे त्या चित्रासमोर उभं राहिल्यानंतर आपण चित्रात आत आत चाललो आहोत असा भास होतो. फुलांनी डवरलेल्या झाडांच्या एका लँडस्केपकडे बघताना तर ही फुलं आत चित्रात आहेत की काचेवर चिकटवली आहेत असं वाटतं. त्या फुलांसाठी त्यांनी गाठीचा टाका वापरला आहे.

एम्ब्रॉयडरीमधून चित्रं रेखाटणं हा प्रयोग इतका यशस्वी झाल्यानंतर कायमस्वरूपी तेवढंच करत राहणं सहज शक्य होतं. पण स्थितीमध्ये रमेल तो कलाकार कसला! साहजिकच त्यांनी एम्ब्रॉयडरीच्या धाग्यांसोबत प्रयोग करायला सुरुवात केली. त्यामध्ये चांदी आणि तांब्याच्या तारेतून अशोकचक्र, आरशात निरखणारी स्त्री अशी चित्रं त्यांनी भरली आहेत. त्यासाठी त्यांनी सुईतून ओवता येतील इतके चांदीचे आणि तांब्याचे नाजूक धागे खास करवून घेतले. या दोनच रंगांतून लाल, निळा अशा अनेक रंगीत धाग्यांचा परिणाम चित्रात दिसतो. हे कसं काय घडवलं असेल हा प्रश्न मनात उमटणं स्वाभाविकच. त्यावर त्या म्हणतात, “कलाकृती घडवायला आपण सुरुवात करतो, पण त्याचं अंतिम स्वरूप कसं असेल हे त्या प्रवासात हळूहळू ठरत जातं. कधी कधी असे काही परिणाम आपण न ठरवता साधले जातात.”

काही चित्रांसाठी त्यांनी अँकर कंपनीचे दोरे, तर काही चित्रांसाठी रेशीम वापरलं आहे. काही ठिकाणी शिफॉनची लेस वापरली आहे. काही चित्रांसाठी कापडाचे एकेक धागे सुटे करून त्या धाग्यापासून भरतकाम केलं आहे. महात्मा गांधींच्या पोर्ट्रेटसाठी त्यांनी चक्क आपल्या सासूबाईंचे पिकलेले केस वापरले आहेत, तर मदर तेरेसा यांचं चित्र एका विद्यार्थिनीच्या केसांपासून बनवलं आहे. बारीक बारीक मणी विणूनदेखील त्यांनी काही छोटी चित्रं घडवली आहेत. कलाकार कसा सतत नावीन्याच्या शोधात असतो त्याची ही उदाहरणं.

चित्रं भरण्यासाठी काही ठिकाणी अस्मिता यांनी सुती कापड वापरलं आहे, तर चांदीच्या तारांनी विणताना कापड जाड पाहिजे म्हणून पँटचं कापड वापरलं आहे. सिल्क, बिझीलिझी अशी कापडंही त्या वापरतात. ते कापड घट्ट ओढून बसवून घ्यावं लागतं; ते फाटता कामा नये, मळता कामा नये म्हणून काळजी घ्यावी लागते. महिनोन्‌‍महिने एका चित्राचं काम चालतं. तेवढे दिवस ते कापड हाताळलं जाणार असतं.

एकदा घातलेले टाके उसवायची सहसा वेळ येत नाही, ही अस्मिता यांची आणखी एक खासियत. टाके उसवण्याचा एकच प्रसंग आल्याचं त्या सांगतात. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं पोर्ट्रेट बनवताना काही धागे चुकले. ते उसवावे लागले. त्या नादात कापड फाटलं. ते कापड रफू करून घेतलं आणि काम पुढे चालू ठेवलं.

कोरोना टाळेबंदीच्या काळात एका ओळखीच्या विक्रेत्याची लोकर विकली जात नव्हती. अस्मिता यांनी ती सगळी लोकर एका दमात खरेदी करून टाकली. “त्यातल्या इंग्लिश शेड्सचा मला मोह झाला. आता वरची खोली त्या लोकरीने भरलीय. तिचं काय करायचं असा विचार करता करता आता लोकरीचं भरतकाम करून काही पक्ष्यांची चित्रं करायचा प्रयोग सुरू आहे,” असं त्या सांगतात.

asmita potdar

अस्मिता यांनी काही चित्रं एक किंवा दोनच रंगांत भरली आहेत, तर मुळिकांच्या एका चित्रावरून केलेल्या धागाचित्रात ऐंशीच्या वर शेड्स वापरल्या आहेत. दोऱ्यांचे रंग निवडावे लागतात, तसा कापडाचा रंगसुद्धा ठरवावा लागतो. कारण कापडाच्या रंगावर चित्रात भरलेल्या रंगांच्या छटा अवलंबून असतात. लेण्यांच्या सिरीजमध्ये अस्मिता यांनी एकदा काळं, तर एकदा पांढरं कापड वापरलं आहे. सुरुवातीला त्या संपूर्ण चित्र भरायच्या. हळूहळू रिकाम्या सुटणाऱ्या जागेतली गंमत त्यांना कळत गेली. मग एकदा त्यांनी शेतातल्या पायवाटा दाखवण्यासाठी त्या जागी कापड रिकामं सोडलं. लेण्यांची चित्रं, गांधीजी, मदर तेरेसा... हळूहळू चित्रांमधल्या मोकळ्या जागा अधिक परिणामकारक दिसू लागल्या.

‘ओलेती'सारखी काही चित्रं क्लासिक चित्रांची कॉपी आहेत, तर काही चित्रांसाठी फोटो काढून घेऊन मग ते बघून चित्रं भरलेली आहेत, तर काही चित्रं अस्मिता यांनी स्वत:च काढून नंतर भरतकाम केलं आहे.

अस्मिता यांनी विष्णूच्या दशावतारांचं एक चित्र भरलं आहे. त्याचे काठ एकाच पांढऱ्या छटेत भरले आहेत, पण धागे उभे-आडवे घातल्यामुळे छटा वेेगवेगळ्या दिसतात. हे धागाचित्र पूर्ण व्हायला दीड वर्ष लागलं. सकाळच्या किरणांतल्या झाडांचं एक लँडस्केप आहे. ते पूर्ण व्हायला चार वर्षं लागली. अशा वेळी ‘किती दिवस एकच चित्र चालू आहे!' असं घरून ऐकायला मिळतं. पण अशी वाक्यं मनावर न घेता अस्मिता आपलं काम सातत्याने मन लावून करत राहतात.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळाला तरी आपल्या शहरात मात्र चित्रकलेविषयी काहीशी उदासीनता असल्याची खंत अस्मिता यांना वाटते. स्थानिक पातळीवरदेखील आपली ओळख व्हावी या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या राहत्या घरी पहिल्या मजल्यावर ‘जतन' याच नावाने त्यांच्या चित्रांची कायमस्वरूपी गॅलरी सुरू केली आहे, तर दुसऱ्या मजल्यावर त्यांचा स्टुडिओ आहे. ही गॅलरी उभी करण्यात त्यांच्या कलावंत मुलीही उत्साहाने सहभागी झाल्या. आईचे भरतकाम करतानाचे व्हिडिओ शूट करणं, वेबसाइटवर फोटोज टाकणं अशी कामं त्या करत असतात.

अस्मिता सांगतात, गॅलरीमध्ये त्या चित्रांच्या मागच्या बाजूच्या धाग्यांचं जंजाळ दिसेल अशी चित्रंही त्यांनी लावली आहेत. हे खरंच भरतकाम केलंय का, असा प्रश्न पडणाऱ्यांसाठी आणि अचंबित रसिकांसाठीची ही खास सोय केली आहे. कोल्हापूर फिरायला आलेल्या पर्यटकांनी आपली गॅलरी बघायला यावं, आसपासच्या भागातल्या शाळांच्या सहली इथे याव्यात असं त्यांना वाटतं. सर्वसामान्यांच्या सांस्कृतिक जगतामध्ये अशा विविध कलांना स्थान मिळावं अशी त्यांची इच्छा आहे.

asmita potdar

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांनंतर अस्मिता यांच्या धागाचित्रांना चांगली मागणी यायला लागली होती. तरीही चित्रांच्या प्रदर्शन-विक्रीपेक्षा गॅलरीमध्ये चित्रं जतन करणं त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामागचं कारणही त्या सांगतात, “शासनाने प्रदर्शन भरवलं असेल तर येण्याजाण्याचा खर्च ते देतात, सोय करतात. नाही तर ही सगळी चित्रं त्या त्या शहरांमध्ये घेऊन जाणं, त्याच्या ट्रान्सपोर्टचा खर्च करणं, त्याच्या फ्रेम्स, काचा यांचं प्रवासात होणारं नुकसान झेलणं हे सगळं जिकिरीचं आणि न परवडणारं होऊन जातं. त्यातही काही चित्रांना लाखाच्या घरात किंमत आली, नाही असं नाही; पण आता मी तो विचारच मनातून काढून टाकला आहे. या भरतकाम चित्रांना लागणारा वेळ आणि कौशल्य हे दोन्ही बघता कलाकृतीची किंमत बऱ्यापैकी वाढत जाते. एवढी किंमत द्यायला सहजी कुणी तयार होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही अशी चित्रं माझ्याकडून एकदाच होणार. याची प्रिंट नाही काढता येत. त्यामुळे ती विकण्यापेक्षा आपल्याकडेच जतन करून गॅलरीमध्ये सर्वांसाठी खुली ठेवावीत, असा विचार आहे.”

या एम्ब्रॉयडरी पेंटिंगच्या नादी लागल्याने चित्रकला मागे पडली याची त्यांना कधी कधी खंत वाटते, पण त्याला आता इलाज नाही हेदेखील त्या जाणतात. मात्र कितीही झालं तरी त्या अधूनमधून काही ना काही चित्रं काढतात. त्यांच्या दोन्ही मुलींच्या हातात चित्रकला आहे. दोघीही याच क्षेत्रात काम करतात, याचा अस्मिता यांना मोठा आनंद आहे. “माझ्या आईने मला प्रोत्साहन दिलं, पण तिला काही मर्यादा होत्या. मी मोकळेपणी माझ्या मुलींना शिकवू शकले याचं समाधान वाटतं.”

शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी बऱ्याच अटी असतात. तुम्ही तुमची कला इतर किमान तीस लोकांना शिकवली असली पाहिजे, ही त्यापैकी एक अट. त्या निमित्ताने अस्मिता यांनी ही फ्युजन कला शिकवायला सुरुवात केली, विनामोबदला! शिवाय तरुणपणी आर्थिक चणचणीमुळे झालेली ओढाताण आणि कुणाचं तरी प्रोत्साहन मिळण्याची गरज अस्मिता विसरलेल्या नाहीत. त्यामुळे आपल्यासारख्याच स्थितीत असलेल्या इतर मुलींना मदत करावी, त्यांना चार पैसे मिळवून द्यावेत, अशा विचारातून त्यांचं काम चालू असतं. बाहेरगावचे अनेक लोक ही कला शिकण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करत असतात. प्रत्येक ठिकाणी जाऊन, राहून शिकवणं शक्य नसतं. म्हणून अशा इच्छुकांच्या सोयीसाठी त्यांनी २०११मध्ये हँड एम्ब्रॉयडरी पुस्तक इंग्रजीतून काढलं. प्राथमिक भरतकाम येणाऱ्या व्यक्तीला हे बघून शिकता येईल अशा कल्पकतेने पुस्तकाची रचना केली आहे. भरतकाम, क्लॉथपेंटिंग आणि रांगोळी हे नव्याने शिकणाऱ्यांसाठी त्यांनी ‘डिझाइन' नावाने मराठीत एक पुस्तक काढलं आहे.

या कलासाधनेतून आपल्या व्यक्तिमत्त्वात हळूहळू फरक पडत गेल्याचं जाणवतं असंही अस्मिता सांगतात. “तासनतास एकाग्र चित्ताने एका जागी भरतकाम करत बसलं की बाकी दुनियेतले राग, लोभ काही शिल्लकच राहत नाही. या कलेने मला अधिक चांगलं माणूस बनवलं. अजूनही तो प्रवास सुरू आहे- पण असूया, मत्सर आपल्यातून गळून पडले आहेत हे मला जाणवतं. योग, ध्यान या गोष्टींमध्ये मला रस वाटू लागला आहे. ही गॅलरी बांधताना तळघरामध्ये माझ्या योगवर्गासाठी मी वेगळी जागा बांधून घेतली आहे.”

अस्मिता आता नोकरीतून निवृत्त झाल्या आहेत. आता पूर्णवेळ चित्रकला आणि त्यात नवे नवे प्रयोग करण्याचा त्यांचा मानस आहे. चिंध्या गुंडाळून त्यापासून शिल्पं घडवण्याचा प्रयोग सध्या त्या करतायत. लेकुरवाळा विठ्ठल आणि त्याची संतमंडळी हे त्यांच्या शिल्पांचे विषय आहेत. ‘विठ्ठलाला जातीपातीची बंधनं नाहीत म्हणून मला तो जवळचा वाटतो', असं त्या सांगतात. एकीकडे तासन्‌‍तास एका जागी बसून एकाग्रतेने भरतकाम करत बसण्याची स्थिरता आणि सतत वेगळं काही तरी करण्याची अधीरता, दोन्ही त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या स्वभावात कलाकारी लहरीपणादेखील आहे. आपली धागाचित्रं, वैयक्तिक आयुष्य, पुरस्कार कशाहीविषयी बोलताना त्यांच्या सुरात आत्मप्रौढी काय, साधा अभिमान किंवा मीपणाची जाणीवदेखील दिसत नाही. संघर्ष आणि यश कशाहीबद्दल बोलताना त्या एका तटस्थभावाने बोलतात.

एक-एक टाका भरत धागाचित्र साकारताना हा तटस्थ भाव त्यांच्या कलाकृतींतही गुंफला जात असावा. म्हणून तर ही धागाचित्रं नजरेचा ठाव घेतात.

(अनुभव, दिवाळी २०२४च्या अंकातून साभार)

गॅलरीचा पत्ता: जतन बंगला, गुलाबनगर, पाचगांव रोड. कोल्हापूर
मोबाईल नंबर: ७४९९५८६९१९
Gmail: artistasmitapotdar@gmail.com
Website: https://asmitapotdar.com/

मृदगंधा दीक्षित | mrudgandha.uniqueportal@gmail.com

मृदगंधा दीक्षित युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून त्यांना कथा-कादंबरी-कविता लिहिण्यातही रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

श्रीरंग जोशी 19.02.26
अतिशयच सुंदर चित्रे. अगदी खरी वाटणारी

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results