आम्ही कोण?
अनुभव 

सेरेंडीपिटी : डोकं घुसळून काढणारा अनुभव

  • सुहास कुलकर्णी
  • 30.12.25
  • वाचनवेळ 6 मि.
serendipity arts festival

गोव्यात चार दिवस जाऊन आलो की, एका वेगळ्या जगात सफर करून आल्यासारखं वाटतं. तेच फीलिंग पुदुच्चेरीला किंवा कोचीला जाऊन आल्यानंतर येतं. युरोपीयन सत्तांनी वसवलेली ही शहरं तिथल्या दोन-चारशे वर्षांच्या देखण्या इमारतींनी नटलेली आहेत. पुदुच्चेरीतील व्हाईट टाऊन भाग आणि कोचीतील कोची फोर्ट या भागातील इमारती, रस्ते, सजावट विशेष प्रेक्षणीय. हल्लीच श्रीलंकेत जाऊन आलो तिथेही गाल फोर्ट भाग असाच देखणा.

पण गोवा कसा आपल्याला जायला-यायला जवळचा आहे. सकाळी निघालं की संध्याकाळी गोव्यात. तसं पाहिलं तर गोव्यात उत्तरेकडे केरी-तेरेखोलपासून दक्षिणेकडील पार कारवारपर्यंतचा भाग बराच फिरून झाला आहे. राजधानी पणजीतही थोडी फिराफिरी झाली होती, पण या शहरात म्हणावा तसा मुक्काम केला नव्हता. जुन्या पोर्तुगीज बांधणीच्या इमारती असलेला फाँटेनाज भाग तेवढा नीट पाहिला होता. अल्तिनो किंवा बंपाल भाग गाडीतून फिरता फिरता तेवढा दिसला होता.

पण यंदा गोव्यात भरणाऱ्या सेरेंडीपिटी आर्टस् फेस्टिव्हलला जायचं ठरवलं आणि प्रॉपर पणजीत मुक्काम केला. तोही पणजीच्या ऐन मध्य भागात. सेरेंडीपिटी फेस्टिव्हल ज्या भागात भरला होता, त्याच्या आसपास. हा सगळा भाग शंभर-दोनशे किंवा त्याहूनही आधीच्या वर्षांत बांधला गेलेला. पण अगदी नीट राखलेला. एकेक इमारत म्हणजे निव्वळ देखणेपणा. पांढऱ्या आणि पिवळ्या रंगांनी रंगवलेल्या रेखीव इमारती. नीट निगा राखलेल्या. बहुतेक घरं रहिवासी आहेत तर काही घरात हेरिटेज हॉटेल्स वसलेली आहेत. त्यामुळे त्या भागात पायी फिरताना पोर्तुगालमध्ये असल्याचा फील येतो. प्रत्यक्ष पोर्तुगालला गेलेलो नसल्याने तो फील खरा-खोटा माहीत नाही.

यंदा सेरेंडीपिटी फेस्टिव्हलचं दहावं वर्ष असल्याचं कळलं होतं. असा काही फेस्टिव्हल भरतो हे त्या आधी माहीतच नव्हतं. कोची बिनालेविषयी ऐकून होतो, पण आपल्या शेजारी असा काही फेस्टिवल भरतो हे गावीही नव्हतं.

‘काय असतो बुवा हा आर्टस् फेस्टिव्हल’, असं म्हणून शोधाशोध सुरू केली. पहिली गाडी अडली सेरेंडीपिटी या शब्दापाशी. ऑक्सफर्ड डिक्शनरीत शब्द शोधला तर अर्थ निघाला Occurence of events by chance in a fortunate way. आणखी शोधाशोध केली तेव्हा शब्द कुठून आला हे कळलं. जुन्या पर्शियन भाषेत श्रीलंकेला सेरेंडीप म्हटलं जात असे. (अरब भाषेत सारंदीब आणि संस्कृतमध्ये सिंहलद्वीप.) एका पर्शियन परिकथेत या सेरेंडीप बेटावर तीन राजपुत्रांना अपघाताने सुखद असे शोध लागत जातात. त्यावरून होरेस वॉलपोल या लेखकाने त्यावरून सेरेंडीपिटी असा शब्द योजला, असं सापडलं.

हा शब्द गोव्यातील या महोत्सवाबाबत किती चपखल आहे याचा प्रत्यय या महोत्सवातील कलाकृती बघताना येत गेला. नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, लोककला, इस्टॉलेशन्स, सिनेमा अशा विविध कलांचे आविष्कार तिथे घडत होते. तिथे भाषणं चालू होती, परिसंवाद भरत होते, वर्कशॉप्स चालू होते. प्रदर्शनं तर होतीच. दहा-बारा ठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत हा सिलसिला चालू होता.

serendipity arts festival

हातात असलेले दिवस आणि आवड यांची सांगड घालून प्रामुख्याने प्रदर्शनं बघायची ठरवली. त्यातलीही शहरातली चार-पाच ठिकाणं निवडली. मुख्य प्रदर्शन भरलेलं होतं ‘ओल्ड जीएमसी कॉम्प्लेक्स’मध्ये. मांडवी नदीच्या काठावर मुख्य रस्त्याला लागून ही वास्तू उभी आहे. कुणी या वास्तूला कॉम्प्लेक्स म्हणत होतं तर कुणी पॅलेस. शोधाशोध केली तर या इमारतीचं मूळचं नाव ‘मॅक्विनेझ पॅलेस’ असंच होतं, असं निष्पन्न झालं. दोन पोर्तुगीज भावंडांनी ही भव्य वास्तू 1702 मध्ये बांधली म्हणे. या भावंडांना मॅक्विनेझेस असं म्हटलं जात असे, म्हणून तिचं नाव मॅक्विनेझ पॅलेस झालं. पुढे 120 वर्षांनी, 1842 मध्ये पोर्तुगीजांनी या इमारतीत गोवा मेडिकल कॉलेज काढलं. हे निव्वळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिलं मेडिकल कॉलेज होतं. पुढे स्वातंत्र्यानंतर तिथे सरकारी कार्यालयं वसली. पण इमारतीचं महत्त्व ओळखून ‘एंटरटेन्ट सोसायटी ऑफ गोवा’कडे ही वास्तू सुपूर्त करण्यात आली. तिथं आता सेरेंडीपिटी, फिल्म फेस्टिव्हल वगैरे भरतात.

या इमारतीत भरलेल्या प्रदर्शनात अजबगजब कलाकृती बघायला मिळाल्या. काश्मिरी वूड कार्व्हिंग आणि केनच्या कलाकृती वगैरे तर ठीकच पण डोकं भंजाळून टाकणाऱ्या कल्पना इथे कलावंतांनी लढवल्या होत्या. कलाकृतींचे संदर्भ कळावेत अशी माहिती सोबत डकवलेली होती. अनेकदा ती न वाचता तर अर्थबोधच होत नव्हता. पण संदर्भ कळला की डोक्यात लख्ख प्रकाश पडायचा. अनाकलनीय गोष्ट उकलण्याचा आनंद वेगळाच. हल्ली जग इतकं सपाट, बाजारू आणि सगळ्यांना कळेल असं सामान्य बनलं आहे, की असा अनुभव विरळाच.

एका भिंतीवर एक भलंमोठं चित्र होतं. म्हटलं तर त्याला आकार होता, म्हटलं तर नव्हता. एका प्रतिमेला मागची प्रतिमा गिळते आहे असं काहीसं प्रथमदर्शनी दिसत होतं. माहिती वाचली तेव्हा त्या चित्रामागचा विचार कळला. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाखाली साप येऊन चिरडला गेला तर कसा दिसेल, असं ते चित्रं होतं. दुसऱ्या एका भिंतीवर हिरव्या-पांढऱ्या रंगाची दरी-सतरंजी टांगलेली होती. वरून-खालून हिरवा रंग आणि मधल्या पांढऱ्या भागात हिरव्या दोऱ्यांची वीण. डिझाईन म्हणून बघायला आकर्षक होतं. पण अर्थ काय? कलावंताच्या मते हे रेन फॉरेस्टचं रूप होतं.

serendipity arts festival serendipity arts festival

अशी अनेक चित्रं, फोटो, इन्स्टॉलेशन्स तिथे होती. पोस्ट मॉडर्नपेक्षाही पुढची वाटावीत असं त्यांचं स्वरूप होतं. मॅडनेसची झलकही काही कलाकृतींमध्ये होती.

या दोन मजली महालाच्या दालनादालनांत असे अनेक आविष्कार बघायला मिळत होते. पण फक्त या कलाकृतीच नव्हे, तर खुद्द ही इमारत आतून पाहणं हाही एक अनुभव होता. प्रशस्त वळणदार लाकडी जिने, मोठमोठ्या खिडक्या, प्रचंड दरवाजे, कॉरीडॉर, पिलर्स, झुंबरं, सुबक-सुंदर सजावट आणि या सर्वांचा मान राखत कुठेही बटबटीतपणा, भडकपणा येऊ न देता चाललेलं प्रदर्शन. मस्त अनुभव!

serendipity arts festival

ओल्ड जीएमसीप्रमाणेच ओल्ड डीओए बिल्डिंगमध्ये दुसरं प्रदर्शन चालू होतं. डीओए म्हणजे डायरेक्टोरेट ऑफ अकाऊंटस्. पूर्वी इथे या खात्याचं कार्यालय होतं. आता तिथे प्रदर्शनं भरतात. या इमारतीला फझेन्डा बिल्डिंगही म्हणतात. फझेन्डा हा पोर्तुगीज शब्द आहे. त्याचा अर्थ अकाऊंटस्! बाहेरून कशीशी दिसणारी ही इमारत आतून मात्र जीएमसी प्रमाणेच देखणी आहे. ही देखील 1855 मध्ये बांधलेली वास्तू आहे. जीएमसीप्रमाणेच देखणी.

serendipity arts festival

इथे एका भव्य हॉलमध्ये दगडासारख्या आकाराच्या वस्तू जमिनीवर विशेष पद्धतीने रचून पाण्याच्या लाटेचा आकार दिला गेला होता. काय होतं हे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता, त्याचं प्रतीक म्हणून हे इन्स्टॉलेशन केलेलं होतं. हॉलमध्ये महाडच्या तळ्याचे फोटोही लावलेले होते. त्यातून विषय मांडला गेला होता. एका दालनात टॉवेलच्या विविध तुकड्यांवर कोपरापासूनच्या हातांची चित्रं होती. हे काय होतं? बांगला देशातील गार्मेंट कारखान्यांत कामगारांचं शोषण होतं, त्याचं हे प्रतीकरूपातलं चित्रण होतं. एका दालनात गोव्याकडील फेमस नरकासुराला जागा दिली गेली होती. नरकासुराची विविध डिझाइन्स रंगरंगोटीची साधनं, विविध मॉडेल्स यांचा खेळ तिथे मांडला होता. या इमारतीतील अनेक कलाकृती डोक्याला खाद्य देणाऱ्या, कल्पनाशक्तीला ताण देणाऱ्या होत्या. काही नक्कीच डोक्यावरून जाणाऱ्या होत्या. पण आपल्याला काही अर्थबोध होत नाहीये ही गोष्टही खूप काही देऊन जाणारी होती.

serendipity arts festival serendipity arts festival

तिसरं ठिकाण होतं कला अकादमी. इथे तुलनेने कमी कलाकृती होत्या. पण ही इमारत पाहणं हा वेगळा अनुभव होता. चार्ल्स कोरिया या स्थापत्यकाराने पंचावन्न वर्षांपूर्वी बांधलेली ही भव्य, मोकळीढाकळी आणि श्वास घेतेय, असं वाटणारी देखणी वास्तू. मोठमोठ्या भिंतींवर मोठमोठी कायमस्वरूपी चित्रं हे इथलं एक वैशिष्ट्य. इमारतीच्या आतील जिने, खिडक्या, ओटे हे सर्व भिंतीवरच्या चित्रात सामावून घेणारी ही चित्रं अफलातूनच. गोव्यातील ताज ग्रुपच्या ‘सिदाद ए गोवा’ या पंचतारांकित हॉटेलची कल्पनाही चार्ल्स कोरिया यांच्याच डोक्यातून उतरलेली. तिथेही या प्रकारची चित्रं बघितली होती.

serendipity arts festival

अशा एक ना अनेक गोष्टी सेरेंडीपिटी फेस्टिव्हलमध्ये बघायला नि अनुभवायला मिळाल्या. ज्यांना म्हणून रूटीन कलांचा उबग आला असेल, त्यांनी डोकं आतून घुसळून घेण्यासाठी या फेस्टिव्हलला जायलाच हवं.

सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com

सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results