आज आपण हातावर घालतो त्या घड्याळाचं जन्मस्थान कोणतं?
स्वित्झर्लंड.
आज जगातली घड्याळांची सर्वांत मोठी इंडस्ट्री कोणती?
स्वित्झर्लंड.
मग, जगातलं सर्वांत ‘स्लिम आणि वॉटर रेझिस्टंट’ घड्याळ कुठे तयार झालं असेल?
नेमकं नाव माहिती नसलं तरी या प्रश्नाचं उत्तर आपण साहजिकच ‘स्वित्झर्लंड’ हेच देणार. घड्याळांमधलं सर्वोत्तम म्हणजे एक तर ते स्वित्झर्लंडमध्ये किंवा जपानमध्ये तयार झालं असणार. घड्याळांच्या मार्केटमध्ये स्विस कंपन्या ‘बाप’ मानल्या जातात, हे आपल्याला जनरल नॉलेजचा भाग म्हणून माहिती आहेच.
पण या प्रश्नाचं उत्तर ‘भारतात’ असं मिळालं तर? थोडा धक्काच बसेल आपल्याला, नाही का? पण हे उत्तर अगदी खरं आहे. जगातलं सर्वांत स्लिम आणि तरीही वॉटर रेझिस्टंट घड्याळ आहे ‘टायटन’च्या नावावर. कोणत्याही परदेशी कंपनीची मदत न घेता तयार केलेलं हे ‘वॉचमेकिंग’मधलं आश्चर्य ‘टायटन एज’ या नावाने २००० साली बाजारपेठेत दाखल झालं आणि त्याने घड्याळ-निर्मितीतल्या बड्या बड्या कंपन्यांना खडबडून जागं केलं.
पण खरा धक्का तर पुढेच आहे. असं घड्याळ बनवायचं ठरलं तेव्हा ‘टायटन’ने साहजिकच ‘स्विस' या स्वित्झर्लंडमधल्या जगात सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या कंपनीकडे मदतीच्या अपेक्षेने विचारणा केली होती; पण त्यांनी छातीठोकपणे सांगितलं, हे आव्हान अवघडच नव्हे तर अशक्य आहे. घड्याळ एक तर अल्ट्रास्लिम असू शकतं किंवा वॉटर रेझिस्टंट. दोन्ही वैशिष्ट्यं एकाच घड्याळात आणणं केवळ अशक्य आहे.
घड्याळांच्या बाबतीत ‘स्विस’ कंपनीला एखादी गोष्ट अवघड वाटत असेल ती गोष्ट जगात अशक्य म्हणूनच ओळखली जायची. इथे तर ‘स्विस’नेच या आव्हानावर ‘अशक्य’ म्हणून शिक्कामोर्तब केलं होतं. पण ‘टायटन’ने मात्र हे गृहीत नाकारलं. स्विस कंपनीला जमत नसेल तर ते आम्ही करून दाखवू, असं म्हणत हे आव्हान त्यांनी पेललं आणि अवघ्या चार वर्षांमध्ये 'टायटन’च्या संशोधन-विकास विभागाने हे घड्याळ प्रत्यक्षात आणूनही दाखवलं.
हेही वाचा - खेड्यापाड्यांत सोईसुविधा आणि रोजगार उभारणारा तन्वीर इनामदार
जे ‘स्विस'ला शक्य नाही ते आपल्याला जमेल, असा विश्वास होता ‘टायटन’चे त्या वेळचे म्हणजे १९९४मधील व्यवस्थापकीय संचालक झर्क्सिस देसाई यांना. जगातलं सर्वांत स्लिम घड्याळ आपण तयार करावं, ही कल्पनाही त्यांचीच. ‘टायटन’मधल्या कर्मचाऱ्यांचीही मनोधारणा इतर जगापेक्षा वेगळी नव्हती. ती काहीशी न्यूनगंडाचीच होती. ‘स्विस’ला जमत नाही ते आपल्याला कसं जमेल, अशी काचकूच त्यांच्याही मनात होतीच. इंजिनियरिंगच्या दृष्टीने तर असं घड्याळ तयार करणं हे खरोखरीच अवघड काम होतं; पण या न्यूनगंडामुळे झर्क्सिस देसाई यांच्या टीमपुढे त्याहीपेक्षा अवघड काम होतं ते आपल्या कर्मचाऱ्यांना ‘होय, हे शक्य आहे’ हे पटवण्याचं आणि त्यांना या आव्हानाची ओनरशिप घ्यायला लावण्याचं. म्हणूनच ‘टायटन एज’ हे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचं उत्तम उदाहरण असलं तरी त्याचबरोबरीने ते मानसिकता बदलणारं इनोव्हेशनही आहे.
कोणत्याही कंपनीमध्ये अशी आव्हानं स्वीकारली जातात, चाकोरी मोडली जाते ती गरजेपोटी किंवा एखाद्या कंपल्शनमधून. झर्क्सिस देसाई यांनी या घड्याळाचं स्वप्न पाहिलं तेव्हा ‘टायटन’मध्ये अशी कोणतीच परिस्थिती नव्हती. सगळं उत्तम सुरू होतं. म्हणूनच या इनोव्हेशनकडे पाहताना टायटनचा त्याआधीचा प्रवास समजून घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. टाटा उद्योगसमूह आणि तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळ यांनी फ्रान्समधील एका कंपनीच्या तांत्रिक मदतीने १९८५ मध्ये ‘टायटन’ ही कंपनी सुरू केली. १९८७च्या सुमारास त्यांची घड्याळं बाजारात यायला सुरुवात झाली. १९९२मध्येच टायटनने आपल्या फ्रेंच कोलॅबरेटरच्या पुढे मुसंडी मारली. तंत्रज्ञान आणि डिझाइन या दोन्ही पातळ्यांवर ‘टायटन’ त्याच्या फ्रेंच मदतनीसापेक्षा वरचढ कामगिरी करत होतं. त्यामुळे ‘टायटन’ने या कोलॅबरेशनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णयही चाकोरी मोडणाराच होता. कारण ‘टायटन’चं स्वप्न केवळ स्वबळावर काम करण्याचं नव्हतं, तर जागतिक स्पर्धेत पाय रोवायचं होतं. तुम्हाला जगाच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर तुमच्याकडे सर्वोत्तम तंत्रज्ञान हवं, हा साधा नियम होता; पण टायटनने निर्णय घेतला आणि तो यशस्वीही करून दाखवला. घड्याळांची मशिनरी स्वबळावर तयार होऊ लागली.
झर्क्सिस देसाई यांनी त्यांच्या टीमसमोर पुढचं आव्हान ठेवलं तेव्हा ‘टायटन’ नुकतीच स्वतःच्या पायावर उभी राहत होती, स्थिरस्थावर होत होती, यशस्वी म्हणून वाटचाल करू लागली होती. अशा वेळी आणखी एक जोखीम उचलण्याची गरज काय, असा प्रश्न कोणालाही पडला असता. पण देसाई यांना मात्र जागतिक स्पर्धेत अव्वल स्थानावर जाण्याचं स्वप्न खुणावत होतं. एकीकडे घड्याळांना थेट मोबाइलचीच स्पर्धा भेडसावू लागली होती. त्यामुळे एका वर्गाचा विचार करून घड्याळांना स्टेटस सिंबॉल, दागिन्यांच्या तोडीची ॲक्सेसरी बनवणं गरजेचं होतं, तर दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी घड्याळ वापरणं ही कमीत कमी कटकटीची गोष्ट असली पाहिजे, याचं भानही राखावं लागत होतं. घड्याळांच्या जगातला नवा ट्रेंड होता ‘स्लिम’ असण्याचा. स्पर्धेत बाजी मारण्यासाठी हा ट्रेंड पाळण्याची गरज तर होतीच, शिवाय तांत्रिकदृष्ट्या त्यात असणारं आव्हानही देसाई यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. १९९४मध्ये संशोधन-विकास विभागाचे प्रमुख बी.जी. द्वारकानाथ यांच्यासमोर त्यांनी ही कल्पना मांडली. द्वारकानाथ यांचेही डोळे चमकले आणि त्यांनी एका क्षणात हे आव्हान स्वीकारलं.
मूळ कल्पना होती जगातलं सर्वांत ‘स्लिम’ घड्याळ तयार करण्याची. स्लिम म्हणजे किती? तर जास्तीत जास्त ३.५ मिलिमीटर जाडीचं. पण भारताच्या बाजारपेठेसाठी एखादं घड्याळ तयार करायचं तर ते केवळ स्लिम असून भागणार नव्हतं. ते ‘वॉटर रेझिस्टंट’ असणंही तितकंच गरजेचं होतं. भारतीय ग्राहकांच्या दृष्टीने खरेदीतला तो मुख्य निकष होता. खरं तर अल्ट्रास्लिम घड्याळदेखील जागतिक बाजारपेठेत हंगामा करणारं ठरलं असतं. भारतातल्या एका उच्चभ्रू वर्गालाही या घड्याळाने नक्कीच भुरळ पाडली असती. पण हे घड्याळ वॉटर रेझिस्टंट असलं पाहिजे, यावर टायटनची टीम, प्रामुख्याने झर्क्सिस देसाई ठाम होते. टाटा उद्योगसमूहाचं वेगळेपण आहे ते यातच. आपण जे प्रॉडक्ट तयार करणार ते केवळ हायक्लास असता कामा नये, तर ग्राहकांच्या खऱ्या गरजांचाही त्यात विचार झाला पाहिजे, हे तत्त्व टाटांनी इंडिका आणि नॅनोप्रमाणेच ‘टायटन’मध्येही आणलं. त्यामुळे साहजिकच आव्हान आणखी अवघड झालं. कारण आजवर कोणतंही अल्ट्रास्लिम घड्याळ वॉटर रेझिस्टंट नव्हतं. मुळात अल्ट्रास्लिम घड्याळं ही रोजच्या वापरासाठी तयारच व्हायची नाहीत. ही घड्याळं फक्त स्टेटस सिंबॉल म्हणून वापरली जायची किंवा घड्याळांच्या कंपन्यांमध्ये म्युझियम्सची शोभा वाढवायची. रोजच्या धबडग्यात टिकेल आणि वॉटर रेझिस्टंटही असेल असं अल्ट्रास्लिम घड्याळ हे इंजिनियरिंगच्या दृष्टिकोनातूनही एक मोठं ‘ब्रेक-थ्रू’ असणार होतं.
असं ब्रेक-थू्र आव्हान एखादी टीम आपल्या नेत्याकडून स्वीकारते तेव्हा त्यांचा ॲटिट्यूड साधारण असा असतो : ‘बॉस, तुम्ही हे प्रॉडक्ट कसं करायचं ते सांगा. त्यानुसार आम्ही काम करत जातो. झालं तर उत्तमच, पण नाही झालं तर आम्ही तरी काय करणार?’ एकुणात, स्वप्न एकाचं, ते प्रत्यक्षात आणायचं दुसऱ्याने, असा कारभार बऱ्याच ठिकाणी असतो. हे स्वप्न खालच्या लोकांपर्यंत ट्रान्स्फर करणं गरजेचं आहे, हे बऱ्याच लीडर्सच्या लक्षात येत नाही, किंवा लक्षात आलं तरी ते ट्रान्स्फर करणं जमत नाही.
हेही वाचा - शोध घेणाऱ्या माणसांचा शोध
‘टायटन’चं वेगळेपण असं, की झर्क्सिस देसाई, संशोधन प्रमुख द्वारकानाथ, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सुब्रह्मण्य भट, घड्याळांच्या ‘मूव्हमेंट’ विभागाचे प्रमुख नागराज या साऱ्यांनीच केवळ इंजिनियरिंग हे मुख्य आव्हान मानलं नाही, तर हे स्वप्न टीमकडे ट्रान्स्फर करणं आणि ‘आपण हे करू शकतो’ असा विश्वास टीममध्ये निर्माण करणं अधिक महत्त्वाचं मानलं. या अधिकाऱ्यांनी आपापल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतलं, त्यांच्याशी चर्चा केल्या, त्यांच्यावर विश्वास टाकला आणि म्हटलं, ‘स्विस’ हे करू शकत नसेल, पण तुम्ही हे करू शकता याबद्दल आमची खात्री आहे. त्यामुळे सगळे मिळून कामाला लागू या.’
या ॲप्रोचमुळे ‘त्यांनी सांगायचं- यांनी ऐकायचं’ हे नातंच 'टायटन’मध्ये बदलून गेलं. टीमने या स्वप्नाची ओनरशिप घेतली, आणि त्यानंतरचं त्यांचं वाक्य होतं : ‘बॉस, आता हे आमच्यावर सोपवा. अडचणींतून कसा मार्ग काढायचा ते आम्ही पाहतो.’ आणि खरोखरच बदललेल्या ॲटिट्यूडने जादू केली. 'टायटन'च्या प्रत्येक विभागातला माणूस ‘चार्ज’ झाला.
अर्थात ‘स्लिमेस्ट वॉटर रेझिस्टंट’ घड्याळ हे इंजिनियरिंगच्या दृष्टीनेही खडतर काम होतं. हे घड्याळ तयार करायचं तर ‘मूव्हमेंट’ म्हणजे मशिन, ‘केस’ म्हणजे त्या मशिनवर चढणारं कव्हर आणि असेंब्ली म्हणजे या दोन्ही गोष्टींची एकत्रित जुळणी, या तिन्ही विभागांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणावे लागणार होते. आजवर असं काम कोणी केलेलंच नव्हतं, त्यामुळे कशाच्या आधारावर पुढे जायचं हे कळत नव्हतं.
पहिला टप्पा होता तो या घड्याळाची ‘मूव्हमेंट’ म्हणजेच आतलं मशिन तयार करण्याचा. एवढं पातळ घड्याळ बनवण्यासाठी मशिनची जाडी ३-४ मि.मी.वरून १.१५ मि.मी.पर्यंत खाली आणावी लागणार होती. म्हणजेच या मशिनमधल्या प्रत्येक भागाचा आकार निम्म्याहून कमी होणार होता. मुख्य प्रश्न होता तो मशिनमधल्या बॅटरी आणि स्टेप मोटरचा. बॅटरीचा आकार कमी करायचा तर तिच्या क्षमतेवर परिणाम होणार हे सरळच होतं. एक तर तुम्हाला लहान आकाराची बॅटरी मिळू शकते किंवा जास्त क्षमता असणारी. पण ‘टायटन’ची टीम ‘एक तर’वर समाधान मानायला तयार नव्हती. त्यांना ‘दोन्ही' हवं होतं. हा ‘आयदर ऑर'च्या ऐवजी ‘बोथ'चा हट्ट धरणं यातच त्यांचं इनोव्हेशन होतं.
जगभर धुंडाळल्यावर ‘टायटन'ला हव्या त्या आकाराची बॅटरी देऊ शकेल असा एक उत्पादक अमेरिकेत सापडला. ही बॅटरी १.०५ मिमीची होती आणि तुलनेने तिचा पॉवर बॅकअप जास्त होता. पण तरीही त्याने भागणार नव्हतंच. वॉटर रेझिस्टंट घड्याळ बनवायचं तर मागचं कव्हर शक्य तितक्या कमी वेळा उघडायला हवं, आणि तसं असेल तर बॅटरी बदलण्यासाठी ते वारंवार उघडावं लागू नये एवढी बॅटरीची क्षमता हवी. बॅटरी याहून जास्त क्षमतेची मिळत नाही हे मान्य केल्यावर ‘टायटन’ने उलट्या दिशेने विचार सुरू केला आणि कमीत कमी बॅटरी लागेल अशी स्टेप मोटर तयार करण्याच्या मागे ते लागले. बऱ्याच प्रयत्नांती हे अशक्यही टायटनने शक्य करून दाखवलं. परिणाम आश्चर्यकारक होता : बॅटरीचं आयुष्य दुपटीने वाढलं होतं. या स्टेप मोटरचा प्रत्येक भाग टायटनमध्येच तयार झाला आणि शेवटी १.१५ मिमीची ‘मूव्हमेंट’ तयार करण्यातही टायटनने यश मिळवलं.
या लेखात हा सगळा प्रवास एका पानात सांगून संपला, पण प्रत्यक्षात तो दर दिवशी परीक्षा पाहणारा होता. प्रत्येक स्पेअरपार्ट तयार करणं म्हणजे इनोव्हेशन होतं. ते तयार करताना कोणतेही बेंचमार्क नव्हते. असते तरी कोणत्याही प्रतिस्पर्धी कंपनीने टायटनला त्यासाठी मदतीची तयारी दाखवली नसती, हे उघडच आहे.
हेही वाचा - मराठीतला हा एकमेव स्पेलचेकर ९९ टक्के अचूक काम करतो. उरलेला एक टक्का तुमच्या वापराने भरून निघेल..
आता प्रश्न होता या मूव्हमेंटभोवतीची ‘केस’ म्हणजे कव्हर तयार करण्याचा. ही केस तरी नक्कीच स्वित्झर्लंडमध्ये मिळेल, अशी खात्री ‘टायटन’ला होती. त्यासाठी नागराज आणि द्वारकानाथ ‘बेसेल’मधल्या प्रख्यात वॉच फेअरमध्ये पोचले. त्यांनी तिथल्या सर्वोत्तम कंपन्यांसमोर आपली मागणी मांडली : १.१५ मिमीची मूव्हमेंट तयार आहे. आता त्यासाठी वॉटर रेझिस्टंट केस तयार करून हवी आहे.
इथे त्यांना आणखी एक धक्का पचवावा लागला; पण या वेळी धक्का फक्त त्यांनाच नव्हे तर स्विस कंपन्यांसाठीही होता. एवढ्या कमी जाडीची मूव्हमेंट तयार होऊ शकते आणि तीही भारतात, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. पण या मूव्हमेंटसाठी वॉटर रेझिस्टंट केस तयार करणं अवघडच नव्हे तर अशक्य आहे, असं एक नव्हे तर अनेक कंपन्यांनी त्यांना सांगितलं. पुन्हा एकदा स्वतःच्याच क्षमता ताणण्याखेरीज पर्याय नव्हता. उत्तर शोधण्यासाठी गेलेले हे दोघं भारतात नवं आव्हान घेऊन परतले.
घड्याळाची केस म्हणजे त्याचं बॅक कव्हर, वरची काच आणि वेळ लावण्यासाठी एका बाजूला असणारा क्राऊन. ही केस तयार करण्यासाठी अटी खूप होत्या. मागचं कव्हर वॉटर रेझिस्टंट हवं, काच नेहमीच्या घड्याळाच्या काचेपेक्षा ७५ टक्के कमी जाडीची हवी, तरीही दणकट आणि वॉटर रेझिस्टंट हवी आणि घड्याळ सौंदर्याच्या दृष्टीनेही उत्तमच हवं... एक ना दोन! या नव्या आव्हानासाठी टायटनची ‘डिझाइन’ आणि ‘मॅन्युफॅक्चरिंग’ टीम कामाला लागली. सगळाच खेळ इतक्या कमी मिलिमीटर्सचा होता की थोडंही ‘उन्नीस-बीस’ होऊन चालणार नव्हतं. पॉइंट फाइव्हची गरज असेल तर ती गोष्ट पॉइंट फाइव्हचीच असावी लागणार होती. पॉइंट सिक्सनेही काम बिघडू शकलं असतं. बॅक कव्हर आणि क्राऊन तयार करणारी टीम म्हणाली, एवढ्या कमी जाडीची दणकट काच करून मिळाली तर बाकी आमच्यावर सोपवा. आता सारे दणकट काचेच्या मागे लागले. सगळीकडे धडका मारून मारून हाही अडथळा तुटला. सफायर ग्लास वापरली तर किंमत वाढेल पण पातळ आणि दणकट हे दोन्ही निकष ही काच पूर्ण करेल, असा शोध लागला आणि आणखी एक पाऊल पुढे पडलं.
तोपर्यंत ‘टायटन’मधलं वातावरणही कमालीचं बदललेलं होतं. कोणत्याही अडथळ्याकडे लोक ‘बघतोच कसं होत नाही ते’ या दृष्टीने दात-ओठ खातच पाहू लागले होते. एवढ्या पातळ मेटलमध्ये काच बसवणं, ती वॉटर रेझिस्टंट असणं आणि एवढं सगळं करून ती सुंदर दिसणं जवळपास अशक्य वाटत होतं. पण ‘टायटन’च्या टीमने नवे पर्याय शोधले, नवी उपकरणं वापरली आणि प्रश्न सुटू लागले. हळूहळू स्वप्न प्रत्यक्षात येताना दिसू लागलं, तसतसे प्रश्नही कमी होऊ लागले. घड्याळ प्रत्यक्ष तयार झालं तेव्हा एकीकडे टीमचा विश्वास बसत नव्हता, तर दुसरीकडे स्वत:च्या क्षमतांबद्दल नवे शोध लागल्याने टीम नव्या आत्मविश्वासाने झळकत होती. अल्ट्रास्लिम, वॉटर रेझिस्टंट आणि त्याच वेळी स्विस कंपन्यांच्या डिझाइनच्या तोडीचं आकर्षक घड्याळ त्यांच्यासमोर होतं.
ते बाजारपेठेत आणण्याआधी आता एक महत्त्वाचा टप्पा बाकी होता- घड्याळाच्या टेस्टिंगचा. हे घड्याळ जगातल्या सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या ‘क्रोनोफास्टबल एस. ए.’ या होरॉलॉजिकल टेस्टिंग एजन्सीकडे पाठवण्यात आलं. जवळपास आठ आठवड्यांच्या रिगरस टेस्टिंगमधून ते पार पडलं आणि ‘उत्तम’ असा शेरा घेऊन बाहेर पडलं. पण ‘टायटन’च्या टीमचा केवळ या सर्टिफिकेटवर विश्वास नव्हता. द्वारकानाथ यांचं म्हणणं होतं, या टेस्ट्स कितीही परिपूर्ण असल्या तरी त्या प्रत्यक्ष परिस्थितीसारख्या खडतर नसतात. ‘टायटन’ला हे घड्याळ खरोखरच सर्वोत्तम हवं होतं. द्वारकानाथ यांनी स्वत: या घड्याळाला एका वेगळ्या परीक्षेला बसवलं. घड्याळ भिंतीवर वेगवेगळ्या कोनांमध्ये जोरजोरात फेकून मारलं, स्विमिंग पूलमध्ये बुडवलं आणि शेवटी बेंगळुरू-होसूर या जवळपास कच्च्या रस्त्यावरून गाडीच्या शॉक ॲब्सॉर्बर्सना बांधून या घड्याळाला २०० किलोमीटरची सैर घडवली. घड्याळ सुरक्षित होतं आणि सुरू होतं.
आता आणखी काही करायचं बाकी नव्हतं. घड्याळ बाजारपेठेत आणायचं आणि त्यावरच्या प्रतिक्रिया पाहायच्या. आणि खरोखरच या घड्याळाने इतिहास घडवला. ‘टायटन’च्या उत्पन्नात आणि शिरपेचात तर ते मानाचा तुरा बनलंच, पण जगातल्या ‘वॉच इंडस्ट्री’लाही त्याने भारताकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वत:च्या मर्यादा मान्य करत परदेशी तंत्रज्ञानाला सलाम करणाऱ्या अनेक भारतीयांना त्यांच्यातली गुणवत्ता काय कमाल घडवू शकते, याची नव्याने ओळख करून दिली. आपल्याच क्षमतेवर विश्वास ठेवून आपण महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहू शकतो आणि त्या स्वप्नात सर्वसामान्यांना भागीदारही करू शकतो, हे दाखवून दिलं.
उद्या तुम्ही ‘टायटन एज’ हातावर घालाल तेव्हा लक्षात ठेवा, ते फक्त अल्ट्रास्लिम घड्याळ नसेल, तर ते भारतीयांच्या अल्ट्रा-ॲम्बिशियस वृत्तीचं प्रतीकही असेल!
(अनुभव, सप्टेंबर २०११च्या अंकातून साभार.)
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.
