आम्ही कोण?
लेखमालिका : पुढच्या हाका

अवकाशातल्या भाज्या

  • मेघश्री दळवी
  • 30.06.25
  • वाचनवेळ 3 मि.
space tomato

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक नेहमी या ना त्या कारणाने प्रकाशझोतात असतं. कधी तिथले प्रयोग, तर कधी तिथले अवकाश प्रवासी. हल्लीच अवकाश स्थानकावरच्या एका नव्या बातमीने लक्ष वेधून घेतलं आहे. तिथे लावलेली टोमॅटोची रोपं मस्त वाढलेली आहेत आणि त्यांना छोटे छोटे टोमॅटो लागलेले आहेत. स्थानकावर भले दोनशे प्रकारचं पॅकबंद अन्न उपलब्ध असेल, पण ताज्या टोमेटोंची मजा काही औरच!

स्थानकावरचे अवकाशयात्री नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असा नियमित आहार घेतात. जेवणाचे पॅकेट्स आयत्या वेळी उघडून त्यातले पदार्थ हवे तसे गरम करतात किंवा शिजवून घेतात. मीठ-मिरपूडसुद्धा घालून घेतात, पण तिथे मीठ, मिरपूड, मसाले चक्क द्रवरूपात असतात. त्याला तसं कारणही आहे. शून्य गुरुत्वाकर्षणात पूडस्वरूपातल्या मसाल्यांचे बारीक बारीक कण हवेत तरंगत राहिले तर? त्यातले काही नाका-डोळ्यांत गेले तर? अतिशय नाजूक अशा इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत गेले तर? याच कारणासाठी तिथे ब्रेड न वापरता टॉर्टिलाचं सँडविच करतात.

प्रयोगांसाठी म्हणून अवकाशयात्री त्या स्थानकावर महिनोन्‌‍महिने काढतात. त्यांना तेच तेच खाण्याचा कंटाळा येऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतलेली असते. ठराविक काळानंतर पृथ्वीवरून जाणारं शटल त्यांच्यासाठी नवनवीन चवीचे पदार्थ घेऊन जातं. त्यात ताजी फळं, सॅलड, मिठाईचा समावेश असतो. स्थानकावरचे यात्री या शटलची आतुरतेने वाट बघत असतात.

रोजच्यासाठी अशी व्यवस्था ठीक आहे, पण कधी तरी पार्टीचा मूड होणार ना? पिझ्झा-बर्गरची आठवण येणार ना? मग कोणी नवा पाहुणा येणार असेल तेव्हा हे यात्री मजा मजा करून घेतात. जां-लू क्रेटीएन हा फ्रेंच अवकाशयात्री स्थानकावर जाताना हौसेने स्वादिष्ट फ्रेंच पदार्थ घेऊन गेला होता. रशियन यात्री आपल्या पद्धतीचे अफलातून पदार्थ आणतात. इटालियन स्पेस एजन्सीचा पाओलो नेस्पोली तिथे असताना त्याला पिझ्झाची आठवण झाली. मग काय! पिझ्झाचे सगळे घटक तिथे पाठवण्यात आले आणि पाओलोने सफाईने शून्य गुरुत्वाकर्षणात पिझ्झा बनवून दाखवला.

ही झाली आताची गोष्ट. पण आज ना उद्या अशी अवकाशस्थानकं अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायची आहेत. नासाची आर्टेमिस मोहीम चंद्रावर मानवी वसाहत उभारणार आहे. तेव्हाही स्थानिक अन्नाची गरज भासेल. त्यामुळे अवकाशात ताजी भाजी पिकवायची तयारी जोरात सुरू आहे. याआधी अवकाशस्थानकावर मुळ्यासारख्या पालेभाज्या पिकल्या आहेत. लेट्युस वाढलं आहे. त्यांचे नमुने पृथ्वीवर आणून तपासणी करून पाहिली असता त्यांच्यात चांगलं पोषणमूल्य असल्याचं दिसलं आहे.

पण अवकाश स्थानकात या भाज्यांची शेती होते कशी? तिथे शून्य गुरुत्वाकर्षणात मुळं खाली आणि फांद्या वर अशी रोपांची वाढ होत नाही. तिथे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरावं लागतं. सध्या स्थानकावर व्हेजी यंत्रणेत रोपांसाठी छोटे छोटे कप्पे केलेले आहेत. तिथे एक्सरूट्स यंत्रणा हायड्रोपॉनिक आणि एरोपॉनिक तंत्रांचा वापर करून वनस्पती वाढवण्याचे प्रयोग करत आहे. या तंत्रात माती किंवा इतर माध्यमांशिवाय कमी जागेत, कमीत कमी देखभाल करून पोषक भाज्या पिकवता येतात.

त्यात टोमॅटो वाढवण्याचे प्रयोग ठरले तेव्हा स्पेसएक्स ड्रॅगन यान टोमॅटोच्या बिया घेऊन गेलं. अवकाशातल्या रेडिएशनचा परिणाम होऊ नये म्हणून जाड धातूंच्या आवरणात या बियांचं व्यवस्थित पॅकिंग केलं गेलं होतं. बिया रुजल्या, पानं आली, चिमुकली फळं आली, तेव्हा अवकाशयात्रींनी आनंदाने त्यांचे फोटो शेअर केले. यातले काही टोमॅटो पृथ्वीवर आणून त्यांचं विश्लेषण होईल. खाऊन त्यांची चव पाहिली जाईल. पृथ्वीवर लावलेल्या टोमॅटोंशी त्यांची सर्वप्रकारे तुलना होईल.

अजूनही हे प्रयोग बाल्यावस्थेत आहेत. अजून पुष्कळ दूरचा पल्ला गाठायचा आहे. छोट्या प्रमाणावर यशस्वी झालेले प्रयोग मोठ्या प्रमाणावर पार पाडायचे आहेत. मग हळूहळू अवकाशातल्या शेतीचं दर चौरस फुटातलं उत्पादन वाढवायचं आहे. माणसाने शेतीला सुरुवात केली १० ते १५ हजार वर्षांपूर्वी. त्यात खूप बदल होत गेले. अथांग अवकाशातली शेती हा त्यातला मोठा रोमांचकारी टप्पा आहे. त्याचा अनुभव घ्यायला म्हणून कदाचित अवकाश स्थानकावरून आयात केलेल्या भाज्या इथे पृथ्वीवर कौतुकाने खाल्ल्या जातील.

मेघश्री दळवी

मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

रवींद हरणस कर01.07.25
खूप छान माहिती मिळाली

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results