आम्ही कोण?
लेखमालिका : पुढच्या हाका

वाढता वाढता वाढे डेटाचा पसारा

  • मेघश्री दळवी
  • 11.06.25
  • वाचनवेळ 3 मि.
data header

असं म्हणतात की जगभरात दर दिवशी कमीत कमी अडीच एक्झाबाइट डेटा निर्माण होतो. म्हणजे अडीचच्या पुढे १८ शून्यं इतका. एका अहवालानुसार जगात आजवर बोलले गेलेले शब्द असतील पाच एक्झाबाइट. म्हणजे आदिमानव बोलायला लागला तेव्हापासून उच्चारल्या गेलेल्या सगळ्या शब्दांचा मिळून जेवढा डेटा होईल त्याच्या निम्म्याने डेटा आपण आता रोज निर्माण करतोय. कमालच म्हणायची माणसाची!

कुठून येतो हा डेटा? आपण डिजिटल साधनांचा वापर करायला लागल्यावर प्रत्येक डिजिटल व्यवहारात डेटा निर्माण होतो आहे. मग तो साधा गुगल सर्च असो वा एखाद्या भाजीवाल्याला केलेलं पेटीएम. व्हिडिओ कॉल असोत की व्हॉटसॲप फॉरवर्ड्‌‍स. दरवेळी आपण डेटा निर्माण करत असतो. साहजिकच गेल्या काही वर्षांमध्ये डेटावाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. एका पाहणीनुसार २०२४ मध्ये जगात १४९ झेटाबाइट (झेटा = एकावर २१ शून्यं) इतका डेटा होता आणि त्यातला ९० टक्के डेटा केवळ आधीच्या दोन वर्षांमध्ये गोळा झालेला होता. म्हणजे दरवर्षी किती अचाट भर पडते पहा.

अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका विश्लेषणानुसार २०३० पर्यंत दरवर्षी आपण एक योटाबाइट इतका डेटा निर्माण करणार आहोत. एक योटाबाइट म्हणजे एकावर २४ शून्यं. हा सगळा डेटा साठवून कुठे आणि कसा ठेवायचा असे मुद्दे तर आहेतच. अशा वाढता वाढता वाढे डेटाचा पुढचा टप्पा काय असेल, हा धसकादेखील आहे. पण गंमत म्हणजे त्यापुढच्या संख्यांना काय म्हणायचं हेच आतापर्यंत ठरलेलं नव्हतं!

योटाबाइट हे नाव १९९१ मध्ये निश्चित केलं गेलं होतं. त्या वेळी ती डेटाची अक्षरश: कमाल मर्यादा आहे, असं वाटत होतं. प्रत्यक्षात अवघ्या ४० वर्षांमध्ये आपण तिथे जाऊन पोहोचणार आहोत. मग त्याच्या पुढच्या प्रचंड संख्यांना काय म्हणायचं हा एक प्रश्न साऱ्यांसमोर उभा राहिला. मोजमापनाच्या मेट्रिक पद्धतीत संख्यांसाठी विशिष्ट उपसर्ग म्हणजे प्रिफिक्स ठरवलेली आहेत. एकावर तीन शून्यं म्हणजे ‘किलो', सहा शून्यं म्हणजे ‘मेगा', नऊ शून्यं म्हणजे ‘गिगा', अशी. या यादीतला पुढचा टप्पा आहे ‘टेरा', १२ शून्यांचा. लॅपटॉपमधील हार्ड डिस्क साधारण दोन टेराबाइट क्षमतेची असते. मग येतो ‘पेटा', १५ शून्यं. गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन या बड्या कंपन्या दर दिवशी ४ ते २० पेटाबाइट डेटा वापरतात, तर तुलनेत मानवी मेंदूची क्षमता सुमारे अडीच पेटाबाइट इतकी आहे.

त्याच्यापुढचे टप्पे ‘एक्झा' (१८ शून्यं), ‘झेटा' (२१ शून्यं) आणि ‘योटा' (२४ शून्यं). याच्या पुढे काय यावर गेल्या वर्षी चर्चा सुरू झाली आणि आणखी दोन टप्पे निश्चित करण्यात आले. ‘रोना' (२७ शून्यं) आणि ‘क्वेट्टा' (३० शून्यं). आता याच्याही पुढे डेटा वाढत गेला तर कदाचित माणसाला पृथ्वीवर राहायला जागा उरणार नाही, मग नावांची काय बात!

मेघश्री दळवी

मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 3

शरदचंद्र बोधेकर 16.06.25
मुद्दा असा आहे की लोकांना आता data डिलीट करण्यास सुद्धा वेळ नाही... जादा मेमरी चे फोन लोक घेत आहे व काही transfer न झालेला data जुन्या फोन मध्ये पण असतो.... Data, फोटो vedio डिलीट करण्यासाठी वेगळे मजूर ठेवावे लागतील..... मोठ्या पसा ऱ्यातुन काय डिलीट करावे व काय नाही हे खूप मोठे काम आहे त्यापेक्षा घरातील कोणते जुने कपडे बोहारणीस द्यायचे व कोणते नाही हे काम खूप सोपे होते.... अरेरे मी पण हे लिहून data खर्च केला...

Narendra Girme12.06.25
अनावश्यक डेटा शक्यतो तयारच होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि जर झालाच तर तो टाइम बाउंड असला पाहिजे म्हणजे काही ठराविक काळानंतर तो नष्ट झाला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे algorithms वापरले पाहिजेत. रिपेटेड डेटा सुद्धा फिल्टर झाला पाहिजे. हे सगळं होतच असेल पण त्यावर काटेकोर लक्ष ठेऊन डेटा वाढीचा वेग कमी केला पाहिजे. मी सकाळ पेपर्स मध्ये असताना (1991) सर्व्हर ची हार्ड डिस्क ९० MB (GB नाही ) होती. आता पेन ड्राईव्ह पण gigabyte मधे असतो.

Sunil 11.06.25
भीषण आहे हे सगळे . या डेटा मध्ये 80 टक्के कचरा असणार म्हणजे गुड मॉर्निंग,गुड नाईट,सणवार, देवधर्म, आय टी सेल चे पगारी टपोरी नोकरांनी बनवून पाठवलेले विखारी प्रोपोगंडा जसे की हिंदू मुस्लिम विषपेरणी , गांधी नेहरू बदनामी याबाबतचे मेसेजेस आणि इन्शुरेंस घ्या लोन घ्या..... असले अनावश्यक मेसेजेस... हे असले सगळे पाठवणार्‍यावर २८ टक्के जीएसटी लावल्यास काहीतरी फरक पडेल. अन्यथा या डेटा च्या वितरण , साठवणुकी साठी लागणार्‍या राक्षसी वीजमागणी मुळे होणारे प्रचंड कार्बन उत्सर्जन , जागतिक तापमानवाढ यामुळे जीवसृष्टीचा विनाश अटळ आहे.

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results