एक्झोस्केलेटन म्हणजे बाह्य सांगाडा. आपल्या शरीराच्या आतला सांगाडा जसा आधार देतो, तसाच आधार बाहेरून पुरवणारं हे साधन आज किती तरी ठिकाणी उपयोगी पडत आहे. हात-पाय किंवा मणक्यांना इजा झाली असेल तर एक्झोस्केलेटनच्या मदतीने हालचाली सुकर होतात. जड सामान वाहून नेताना देखील एक्झोस्केलेटनवर भार टाकून आपल्या स्नायूंवरचा ताण कमी करता येतो.
पॅसिव्ह प्रकारच्या एक्झोस्केलेटनना बॅटरीची गरज नसते. त्यामुळे ते कुठेही सहज वापरता येतात. बॅटरी वापरणारी मॉडेल्स तुलनेने महाग असली तरी ती फक्त आधार देत नाहीत, तर हालचालींना मदतसुद्धा करतात. त्यांच्यात आधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली वापरून त्यांची कार्यक्षमता वाढवता येते.
सैन्यात शारीरिक क्षमता अत्यंत महत्त्वाची; पण एखाद्या जवानाला काही दुखापत झाली तर तेवढ्यावरून त्याला बसवून ठेवता येत नाही. तंत्रज्ञानाची साथ देऊन त्याच्या सैनिकी कौशल्याचा वापर आपण करत राहू शकतो. चीनसारख्या देशांनी मिलिटरी एक्झोस्केलेटनचा वापर जोरात सुरू केला आहे. आपणही भारतीय सैन्यात असा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहोत.
अतिउंचीवर, उणे तापमानात किंवा दुर्गम प्रदेशात जवानांना अनेक अडचणींशी सामना करावा लागतो. कधी रसद एअर-ड्रॉप केल्यावर कित्येक किलोमीटर पाठीवर वाहून आणावी लागते. शत्रूच्या टेहळणीपासून बचाव करताना वाहतुकीला खेचरं वापरता येत नाहीत. अशा परिस्थितीत शरीरावर एक्झोस्केलेटन चढवून जवानांचं काम हलकं करता येतं. बर्फात चालताना योग्य आधार मिळावा आणि वेगाने पावलं टाकता यावीत अशी सोय होऊ शकते. आपल्याकडे या दिशेने डीआरडीओचं संशोधन सुरू आहे.
एक्झोस्केलेटन उद्योगातली जागतिक उलाढाल ३०० कोटी डॉलर्सच्या वर आहे. त्यातही पायांना आधार देणाऱ्या एक्झोस्केलेटनना जास्त मागणी आहे. थ्रीडी प्रिंटिंगचा वापर सुरू झाल्याने त्यांच्या किमती आटोक्यात येत आहेत.
तंत्रज्ञानात अलीकडे ‘ऑगमेन्टेशन' हा शब्द जास्त चर्चेत आहे. माणसात असलेल्या क्षमतांमध्ये भर घालण्याचा उद्देश ठेवून त्यात वेगवेगळी साधनं तयार केली जातात. ऑगमेन्टेड रिॲलिटीमध्ये दिसणाऱ्या वास्तवात आभासी भर असते. त्याचा वापर प्रशिक्षण, वैद्यकशास्त्र किंवा गेमिंगमध्ये होतो. त्याच धर्तीवर एक्झोस्केलेटन माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या शारीरिक क्षमतेला ऑगमेन्ट करू शकतो. या दृष्टीने पाहिलं तर या तंत्रज्ञानाचा अवाका किती मोठा आहे हे ध्यानात येईल. विशेषत: संरक्षण क्षेत्रात असं ऑगमेन्टेशन प्रचंड महत्त्वाचं ठरू शकतं.
मेघश्री दळवी
मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
