
शालेय वयापासून मराठी शुद्धलेखनाने अनेकांना छळलेलं असतं. मराठी भाषेतले र्हस्व-दीर्घाचे नियम खूप किचकट आहेत, असंही म्हटलं जातं. कॉम्प्युटर-इंटरनेटपूर्व काळात शुद्धलेखनाचा अधिकाधिक सराव करणं, हाच यावरचा उपाय होता. आता स्मार्टफोन्सवर मराठी टायपिंगची सुविधा मिळूनही बरीच वर्षं होऊन गेली. पण इंग्रजी भाषेसारखी spell-check सुविधा मराठी भाषेसाठीही अस्तित्वात आहे, हे किती जणांना माहिती आहे? मराठी भाषा गौरवदिनानिमित्त मराठी स्पेलचेक सुविधेचे निर्माते शंतनू ओक यांच्याशी केलेली बातचीत.
इंग्रजीसारखा चालणारा मराठी स्पेल चेकर तुम्ही बनवला आहे. त्याबद्दल सांगा.
फोनवर मराठी शुद्धलेखन तपासण्यासाठी मी एक app तयार केलं आहे. Play-store मध्ये marathi spell check असं सर्च केलं तर हे app तुम्हाला दिसेल. तिथून ते मोफत डाऊनलोड करू शकता. एखाद्या शब्दाच्या शुद्धलेखनाबद्दल तुम्हाला शंका असेल तर app मध्ये तो शब्द टाइप करून तपासू शकता. मोठा मजकूर कॉपी-पेस्ट करून तपासण्याचीही तिथे सोय आहे. मोठा मजकूर असेल तर थोडा वेळ लागतो, इतकंच. यात मराठीबरोबरच संस्कृत स्पेल चेक आणि संस्कृत संधी / विग्रह देखील करून पाहता येतो.
याची थोडी पार्श्वभूमी सांगाल का? मराठी स्पेल-चेकर तयार करावासा का वाटला?
इंग्रजीप्रमाणे शुद्धलेखन तपासू शकणारा स्पेल-चेकर मराठीत नव्हताच. ७-८ वर्षांपूर्वी मॉड्युलर इन्फोटेक या कंपनीने अरुण फडके यांच्या सहकार्याने एक app विकसित केलं होतं. पण ते शुद्धलेखनाचं app होतं. त्यात तुम्ही एखादा शब्द टाईप करायला सुरुवात केली की त्या शब्दाने सुरू होणारे शब्द दिसू लागत. उदाहरणार्थ, ‘माध्यमिक’ शब्दात ‘म’ला पहिली वेलांटी की दुसरी, असा प्रश्न असेल तर तुम्ही ‘मा’ असं टाईप करणं अपेक्षित असे. तसं केलं, की त्यावरून सुरू होणारे शब्द म्हणजे ‘माधुर्य’, ‘माधवी’, ‘माध्यमिक’ दिसू लागत. त्यावरून तो शब्द कसा लिहिला पाहिजे ते समजत असे. थोडक्यात छापील मराठी भाषा कोश मोबाईलवर उपलब्ध करून देण्याचा तो प्रयत्न होता. एका मर्यादित अर्थाने ते app यशस्वी झालं. पण ते आता प्ले-स्टोअरवर उपलब्ध नाही.
इंग्रजी-मराठी डिक्शनरी (English Marathi Dictionary by Innovative Software) हे app लाखो लोकांपर्यंत पोहोचलं आहे. त्यात ‘test’ हा इंग्रजी शब्द टाईप केला की ‘चाचणी’, ‘कसोटी’ आणि ‘परीक्षा’ असे अर्थ दिसतात. तर ‘माध्यमिक’ असा शब्द टाईप केला तर ‘seminary’, ‘secondary’ असे इंग्रजी शब्द मिळतात. पण ‘माध्यमीक’ हा अशुद्ध शब्द असून योग्य शब्द ‘माध्यमिक’ असा हवा, असं तिथे खात्रीपूर्वक समजत नाही.
गूगल-डॉक्समध्ये मराठी स्पेल-चेकर आहे, पण तो अत्यंत बेभरवशाचा आहे. एखादा शब्द एखाद्या ठिकाणी चूक, तर दुसर्या ठिकाणी बरोबर म्हणून दाखवला जातो. अचूक लिखाणाची अपेक्षा करणारे गूगल डॉक्सचा वापर करत नाहीत.
‘गूगल की-बोर्ड’ किंवा ‘देश मराठी कीबोर्ड’ इन्स्टॉल केलेले असतील तर त्यात टाईप करतानाच योग्य तो शब्द सुचवला जातो, हे बरोबर आहे. पण तो शब्द शुद्धलेखनाच्या नियमानुसारच असेल अशी काही शाश्वती नाही. दुसरी गोष्ट, म्हणजे खूप मोठा मजकूर स्पेल-चेक करायचा असेल तर अशी की-बोर्डची मदत काही कामाची नाही.
या app चं काम करण्याच्या बरीच वर्षं आधी मी ओंकार जोशी यांच्यासमवेत कॉम्प्युटरवर वापरण्याच्या मराठी स्पेल-चेकर extension चं काम केलं होतं. ओंकार जोशी हे ‘गमभन’ या प्रणालीचे कर्ते. ‘मायबोली’, ‘मिसळपाव’, ‘ऐसी अक्षरे’ अशा साईट्सवर मराठीत टाईप करण्यासाठी त्यांनी लिहिलेला कोड वापरला जातो. तर, त्या कामाच्या अनुभवातून हे app तयार करण्याचं माझ्या डोक्यात आलं.

जून, २०२३ मध्ये मी app वर काम सुरू केलं. ऑगस्टमध्ये ते पूर्ण झालं आणि प्ले-स्टोअरवर दिसायला लागलं. ही पहिलीच अशी सुविधा, की ज्यात आपण लिहिलेला शब्द शुद्ध की अशुद्ध हे समजतं; अशुद्ध शब्दांसाठी योग्य शब्द सुचवले जातात; संपूर्ण मजकुराचाही स्पेल चेक करता येतो. हे ॲप जवळपास ९९ टक्के अचूक काम करतं.
‘जवळपास ९९ टक्के अचूक’ असं म्हणताना उरलेल्या १ टक्क्याचं काय?
हे app वापरणार्यांनी तो एक टक्का शोधायचा आहे. काय कमी पडतं आहे, कुठे चुकतं आहे का, सुधारणा हवी आहे का, ते मला कळवायचं आहे. मराठी स्पेलचेकचा काहीच फीडबॅक मिळत नाही. त्यामुळे काही चुका असतील तर त्या माझ्यापर्यंत येतच नाहीत. काही शब्द डेटाबेसमध्ये नाहीत, ते टाका, असं देखील कुणी सांगत नाही. या मुलाखतीच्या निमित्ताने app चा वापर वाढला तर ते होईल.
हा स्पेल-चेकर बनवताना मुख्य अडचणी कोणत्या होत्या?
इंग्रजीत एका शब्दापासून फार फार तर ३ किंवा ४ शब्द बनतात. उदाहरणार्थ work या क्रियापदापासून worked, working, works असे शब्द बनतात. पण बहुतेक सर्व भारतीय भाषा संस्कृतपासून बनलेल्या असल्यामुळे त्यात एका शब्दापासून हजारो शब्द बनू शकतात. उदाहरणार्थ ‘बसणे’ या क्रियापदापासून सुमारे ७,५०० शब्द तयार होतात. त्यामुळे स्पेल-चेकरमध्ये हे सर्व शब्द शुद्ध म्हणून दाखवावे लागतात. इतकंच नव्हे, तर चुकलेल्या शब्दाला देखील यातील सर्वात जवळचा शब्द द्यावा लागतो. वेगळ्या शब्दांत सांगायचं, तर इंग्रजीत २ लाख शब्दांमधून योग्य शब्द निवडावा लागतो, तर मराठीत २ कोटी शब्दांमधून सर्वात जवळचा शब्द शोधायचा असतो.
संस्कृतमध्ये कोणत्याही शब्दाचा संधी इतर कोणत्याही शब्दाशी करता येत असल्यामुळे त्यातील अफाट शब्दसंख्या मोजण्याचा प्रयत्न अद्याप कोणी केलेला नाही. माझ्या अंदाजानुसार मराठी भाषा इंग्रजीच्या १०० पट विस्तृत मानली, तर संस्कृत भाषेत मराठीच्या १०० पट अधिक म्हणजे सुमारे २०० कोटी इतके शब्द बनवण्याची क्षमता असली पाहीजे. अर्थात जास्त शब्द म्हणजे श्रेष्ठ भाषा असं काही समीकरण नसतं. कारण फक्त २ लाख शब्दांची इंग्रजी आज जागतिक भाषा आहे, तर २०० कोटी शब्दांची संस्कृत मागे पडली आहे. याच कारणामुळे मी बनवलेला संस्कृत स्पेल-चेकर अजून तितका विश्वासार्ह नाही.
मराठी स्पेल-चेकरचा वापर अजूनही सार्वत्रिक का झालेला नाही?
मराठी माणूस शुद्धलेखनाविषयी फारसा गंभीर नाही हे त्याचं एक कारण असू शकतं. शाळांमधून आता र्हस्व / दीर्घ चुका या चुका समजल्या जात नाहीत, असं सांगितलं जातं. शुद्धलेखनाचा फार आग्रह धरला तर टर उडवली जाण्याची शक्यता असते. सरकारी पातळीवरही याबाबत औदासीन्य दिसून येतं. रेमिंग्टन हा की-बोर्ड केव्हाच कालबाह्य झाला आहे, पण सरकारी परीक्षा फक्त त्याच की-बोर्डवर घेतल्या जातात. इंग्रजी की-बोर्डवर स्टीकर लावून एक, एक शब्द कसे तरी झगडत टाईप करण्यापेक्षा ‘गमभन’सारखं साधं-सोपं सॉफ्टवेअर वापरणं सोपं नाही का?
ओंकार जोशींसोबत केलेलं काम कोणतं? त्या कामाचा अनुभव या app च्या कामात कसा उपयोगी ठरला?
मगाशी सांगितलं तसं, ओंकार जोशी आणि मी मिळून संगणकासाठीचा मराठी स्पेल-चेकर तयार केला आहे. अनेक वर्षांपासून तो extension च्या स्वरूपात उपलब्ध आहे. ते एक्स्टेंशन आणि आताचं हे स्पेल-चेकर ॲप दोन्ही ‘हंस्पेल’ (Hunspell) या ओपन-सोर्स टूलवर आधारित आहे. त्यात वेळोवेळी आपापल्या भाषेतल्या गरजेनुसार सुधारणा करता येतात. मराठी स्पेल-चेकरमध्ये मी बनवलेली शब्दयादी तुम्हाला अपूर्ण वाटली तर तुम्ही देखील तुमची स्वतःची शब्दयादी बनवू शकता. मी जमवलेले शब्द तुम्ही त्यात जसेच्या तसे वापरू शकता. कारण हे सर्व GPL या मुक्त स्रोत लायसन्सद्वारे उपलब्ध आहेत. जर्मन, पोर्तुगीज भाषेत असे वेगवेगळ्या लोकांनी बनवलेले २-३ अॅड ऑन उपलब्ध आहेत.
‘हंस्पेल’ हा काय प्रकार आहे? त्याचा मराठी स्पेल-चेकरशी कसा संबंध आहे?
हंस्पेल म्हणजे हंगेरियन भाषेतील स्पेलचेक बनवण्यासाठी लिहिलेला प्रोग्राम. त्याचा मूळ लेखक - लास्लो नेमिझ. त्याने लिहिलेला मूळ कोड नंतर अनेकांनी सुधारून वाढवला आहे. माझा देखील त्यात खारीचा वाटा आहे. तुम्ही जेव्हा फायरफॉक्स / लिब्रे ऑफिस / गूगल क्रोम यांसारख्या अॅप्लिकेशनमध्ये इंग्रजी स्पेल चेक वापरता तेव्हा तुम्ही हंस्पेल वापरत असता.
युरोपातल्या एका छोट्याशा देशातल्या भाषेसाठी बनवलेलं सॉफ्टवेअर जसंच्या तसं मराठीसाठी वापरता येतं..?
हो, कारण मराठी आणि हंगेरियन या दोन्ही भाषा इंडो-युरोपियन कुळातल्या आहेत. आशिया/ युरोप खंडात बोलल्या जाणार्या सर्व भाषा या कुळात येतात. आज अशा सुमारे ४००-४५० भाषा आहेत आणि त्यांचा आपसांत घनिष्ठ संबंध आहे. ही गोष्ट भाषेच्या अभ्यासकांनी फार पूर्वी मान्य केली आहे. आफ्रिका / चीन आणि दक्षिण अमेरिका या खंडातील भाषा इंडो-युरोपियन कुळापेक्षा वेगळ्या असल्यामुळे त्या खंडात बोलल्या जाणार्या भाषांसाठी हे सॉफ्टवेअर चालत नाही.
मराठी स्पेल-चेकरच्या दृष्टीने हा संबंध कसा लक्षात आला?
साधारण २००८-०९ साली ओंकार जोशी यांनी ‘उपक्रम’ या साइटवर या संदर्भात आवाहन केलं. तोपर्यंत याबद्दल कुणालाच माहिती नव्हतं. त्यांचं आवाहन वाचून मी त्यांना संपर्क केला. आम्ही दोघांनी या मराठी स्पेल-चेकर extension चं काम सुरू केलं तेव्हा ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली’ असा आमचा काहीसा कॅज्युअल दृष्टीकोन होता. कारण हंस्पेल मराठीसाठी जसंच्या तसं उपयोगी ठरेल, असं सुरुवातीला वाटलं नव्हतं.
मराठी स्पेल-चेकर प्रकल्पाचा खर्च कोण करतं? देणगी वगैरे मिळते का? की तुम्ही वैयक्तिक पातळीवर हे सगळं केलंत?
वैयक्तिक पातळीवरच केलं. आवड म्हणून. किंवा छंद म्हणा हवं तर. गिर्यारोहण, तीर्थयात्रा, युरोप टूर, अमेरिका वारी अशी काहींची स्वप्नं असतात. तसं हे माझं स्वप्न.
खर्चाचं जाऊ द्या, मराठी स्पेल-चेकर app मध्ये कुणीच अजून स्वतःहून फारसा रस दाखवलेला नाही. त्याबद्दल बोलण्यासाठी आपणहून संपर्क साधणारं युनिक फीचर्स पोर्टल हे पहिलंच. या पूर्वी मी प्रसारमाध्यमाशी संबंधित लोकांशी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही विशेष प्रतिसाद दिला नाही. या प्रकल्पाबद्दल दोन ओळी लिहा अशी विनंती केली तर एका मोठ्या नामवंत संपादकांनी नम्रपणे ‘नाही’ म्हणून सांगितलं. सल्ला/मार्गदर्शन मात्र वेळोवेळी मिळत गेलं. त्यात ओंकार जोशी यांचं नाव घेता येईल. त्या व्यतिरिक्त उपक्रम, मनोगत, मायबोली यांसारख्या साइट्सवरील त्याबद्दलच्या जाहीर चर्चा तर कोणालाही वाचता येतीलच.
स्पेल-चेकर extension आणि २०२३ मधलं app, ही दोन्ही कामं हंस्पेलवर आधारित होती. म्हणजे हंस्पेलची आणि तुमची जवळपास १६-१७ वर्षांची साथसोबत..
‘हंस्पेल’मुळे भाषेकडे पाहण्याची एक विशाल दृष्टी मला मिळाली. इंग्रजीत ज्याला bird’s eye view म्हणतात अशी दृष्टी. हा माझा व्यक्तिगत फायदा म्हणता येईल. म्हणजे बघा, तुम्ही जेव्हा विमानातून जमिनीकडे पाहता तेव्हा तुम्हाला शेकडो किलोमीटर परिसर एकाच नजरेत दिसतो. गाव/ तालुका वेगळे ओळखू येत नाहीत. तसं, या प्रोजेक्टने जवळपास अर्ध्या जगातील भाषा कवेत घेतल्या आहेत, त्यातील आंतर-संबंध उलगडून दाखवले आहेत, त्यातील साम्यस्थळं अधोरेखित केली आहेत. डॅनिश (डेन्मार्क), जर्मन, क्रोएशियन, हंगेरियन, नॉर्वेजियन, कोरियन, स्विडिश, फारसी, डच, इस्टोनियन अशा ८ ते १० भाषांमध्ये संस्कृतसारखे संधी शक्य असतात, हे मला या प्रोजेक्टदरम्यान समजलं. आणखी एक उदाहरण पर्शियन (फारसी) भाषेचं. उजवीकडून डावीकडे लिहिल्यामुळे पर्शियन लिपी दुर्बोध झाली तरी त्या भाषेचा डी.एन.ए. इतर भाषांशी मिळता-जुळता आहे, हे मला या कामामुळे समजलं.
मराठीनंतर मी हिंदी भाषेतील स्पेल चेकरही बनवला. वास्तविक हिंदी आणि मराठी एकाच भाषेपासून बनलेल्या असल्यामुळे त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत गेला आहे. बदलत्या काळानुसार भाषेच्या अभ्यासकांनी ‘हंस्पेल’चाही अवश्य अभ्यास करावा. त्यातून भाषेचा भूतकाळ आणि त्याची वर्तमानाकडे झालेली वाटचाल याकडे पाहण्याची एक वेगळी आणि विशाल दृष्टी मिळेल. तिचा आपल्याला इतर ठिकाणी देखील फायदा होईल.
एखाद्याला कदाचित अतिशयोक्ती वाटेल, पण पाणिनीच्या ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथानंतर भाषेला सूत्ररूपात मांडण्याचा ‘हंस्पेल’ हा एक महत्त्वाचा प्रयोग आहे. हंस्पेलच्या फॉरमॅटमध्ये कोणतीही भाषा बसवताना शब्दांचा ल.सा.वि. काढावा लागतो. पाणिनीने देखील अशाच प्रकारे संस्कृत भाषेची बांधणी केली. त्यामुळे तिचा विस्कळीतपणा जाऊन त्याला बांधेसूदपणा आला. संस्कृतच्या अभ्यासकांचं पाणिनीशिवाय पान देखील हलत नाही. तसं काहीसं भविष्यात ‘हंस्पेल’च्या बाबतीत होऊ शकतं.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण बोलतोय. तुम्ही काम केलंत त्या तंत्रज्ञानाच्या संदर्भाने मराठी भाषेकडे कसं बघायला हवं असं तुम्हाला वाटतं?
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी सुमारे १०० वर्षांपूर्वी ‘मराठी भाषा मुमूर्षू आहे काय?’ या शीर्षकाचा लेख लिहिला. त्याचा अर्थ ‘मराठी भाषा मरायला टेकली आहे काय?’ असा होतो. आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी ‘सुशिक्षित मराठी माणसांचे शिक्षण, पत्रव्यवहार, ग्रंथलेखन इ. गोष्टी इंग्रजी भाषेतच चालतात,’ हे सांगून ‘पुढच्या काळात मराठी भाषा केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित राहील का’ अशी शंका प्रदर्शित केली.
ही शंका आज काही प्रमाणात खरी ठरली असली तरी नवीन युगाची आव्हानं पेलून मराठी रडतखडत का होईना अद्यापही जिवंत आहे. याचं महत्त्वाचं कारण मराठी (आणि एकूणच सर्व भारतीय भाषा) अत्यंत लवचीक आहेत. प्रथम संस्कृत मग उर्दू, फारशी, अरबी, त्यानंतर इंग्रजी, पोर्तुगीज अशा अनेक भाषांतील शब्द मराठीत जसेच्या तसे किंवा थोडेफार बदल करून रूढ झाले आहेत. दुसरी गोष्ट, नुसती भाषाच नव्हे तर देवनागरी लिपी देखील खूप लवचीक आहे.
‘अॅ’ आणि ‘ऑ’ हे दोन स्वर तुम्हाला तुमच्या लहानपणी वर्णमालेत शिकवले होते का? तर नव्हते! मग तुम्हाला action आणि oscar सारखे इंग्रजी शब्द वाचताना/देवनागरीत लिहिताना कधी त्रास झाला का? नाही झाला. असे इंग्रजी शब्द लिहिण्यासाठी या दोन अतिरिक्त स्वरांची गरज पडली तेव्हा ती कोणताही शासकीय अध्यादेश न निघता पूर्ण झाली. हे प्रागतिकतेचं लक्षण आहे, मुमुर्षत्वाचं नव्हे.
तसंच आताच्या तंत्रज्ञान युगात कॉम्प्युटर, इंटरनेटच्या साथीने मराठी भाषा पुढे जात राहायला हवी. भाषेवर प्रेम असणारे आणि तंत्रज्ञान जाणणारे, दोघांनी त्यासाठी जमेल तसे प्रयत्न करायला हवेत.
-----
अधिक माहितीसाठी संपर्क -
शंतनू ओक
इमेल : shantanu.oak@gmail.com
-----
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.