
‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन'. देशातल्या तळागाळातील लोकांनी आपलं काम, आपलं जिणं सुकर व्हावं यासाठी स्वत:चं डोकं लढवून, पारंपरिक ज्ञान वापरून लावलेल्या शोधांचा शोध घेणारी संस्था. डॉ. रघुनाथ माशेलकर व अनिल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने देशाच्या कानाकोपऱ्यांतून लाखो इनोव्हेशन्स शोधून काढली आहेत. त्यांना आर्थिक-तांत्रिक पाठबळ दिलं आहे. ‘इनोव्हेशनची संस्कृती' समाजात निर्माण करण्याचं काम ही संस्था करत आहे, त्याविषयी...
गोपाळ भिसे. खानदेशातल्या एका छोट्याशा गावात जमिनीच्या एका तुकड्यात शेती करणारे गरीब शेतकरी. मोठं उत्पन्न निघेल एवढी जमीन नाही, उत्पन्न नाही. त्यामुळे मजूर परवडत नाहीत. बैलजोडीचाही खर्च अंगावर यावा अशी परिस्थिती. त्यामुळे ट्रॅक्टर वगैरेची तर बातच लांब. पाण्यासाठी विहीर खणायची म्हटलं तरी बायका-मुलांसह राबण्याशिवाय गत्यंतर नाही. शेतीखेरीज दुसरा पर्याय दिसत नाही आणि शेती खाऊ घालत नाही...
एकूण काय, तर महाराष्ट्रातल्या (आणि देशातल्याही) अनेक भागांमधलं प्रातिनिधिक वाटावं असं हे उदाहरण.
ही प्रस्तावना वाचली की पुढे शेतकरी आत्महत्या, राज्यातला शेतीप्रश्न हे सगळं आपल्याला वाचण्याआधीच दिसू लागतं. हे दुष्टचक्र हीच आपली सद्य:स्थिती, असं आपल्याला वाटू लागतं. ग्रामीण भागात, तळागाळात सगळा अंधारच आहे, असा सूर लागतो. त्यामुळे आशेचे थोडेफार किरणही आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत.
गोपाळ भिसे यांचं उदाहरण मात्र पुढे वेगळं, सकारात्मक वळण घेतं.
सगळे मार्ग पैशाच्या अभावाशी येऊन थांबतात, अशा ठिकाणी गोपाळ भिसे यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला, त्याची ही गोष्ट आहे. शेतातले तण काढणं ही शेतकऱ्यांची डोकेदुखी. जिथे बैल, ट्रॅक्टर दिमतीला नाहीत तिथे तर हे काम अक्षरशः जीवघेणं. पण गोपाळ भिसे यांनी या डोकेदुखीवर इलाज शोधण्यासाठी आपलं डोकं कामाला लावलं आणि शोधून काढलं सायकलीच्या चाकावर चालणारं तण उपटण्याचं यंत्र. या यंत्राच्या जोरावर भिसे यांनी आपलं नशीब पालटवलं आहे.
ही झाली गोपाळ भिसे यांची गोष्ट. असतात एकेकजण गिफ्टेड. अशा एखाद्या उदाहरणामुळे सारं चित्र कसं बदलणार, असं तुम्हाला वाटू शकतं. ते खरंही आहे. पण इथे दोन मुद्दे लक्षात घेण्याजोगे आहेत. एक तर भिसे यांचं हे यंत्र त्यांच्यासाठीच नव्हे तर राज्यातल्या असंख्य अल्पभूधारकांसाठी वरदान ठरतं आहे.
दुसरा मुद्दा त्याहून महत्त्वाचा. असा शोध लावणारे गोपाळ भिसे एकटे नाहीत.
आणखी एक असंच उदाहरण पाहू, मोहम्मद सइदुल्ला
मोहम्मद सइदुल्ला हे बिहारच्या चंपारण जिल्ह्यातल्या एका छोट्या गावचे रहिवासी. पूर ही बिहारच्या आणि चंपारण जिल्ह्याच्या पाचवीला पुजलेली आपत्ती. २५ वर्षांपूर्वी अशा पुरांमुळे अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटायचा. अत्यावश्यक सामान आणण्यासाठी, औषधांसाठी लोकांना जीव मुठीत धरून बोटीतून प्रवास करावा लागायचा, किंवा देवावर हवाला ठेवून पूर ओसरण्याची वाट पाहावी लागायची. सइदुल्लांचं आयुष्यही असंच बेभरवशी होतं. ते नदीपर्यंत सायकलने यायचे आणि बोटीतून पलीकडे जायचे. बोटीत तोबा गर्दी, पुन्हा बोटवाल्याची मनमानी. अशा परिस्थितीत त्यांच्या डोक्यात विचार आला, की आपली सायकलच पाण्यात चालली तर...? कोणालाही ही कविकल्पनाच वाटली असती; पण सइदुल्लांना त्या कल्पनेने झपाटून टाकलं, आणि त्यांनी प्रयोग करत करत दोन्ही चाकांना एकूण चार फ्लोट्स जोडलेली पाण्यावर चालणारी सायकल तयार केली. ही सायकल चंपारण जिल्ह्यातला अजूबा म्हणूनच ओळखली जाते. तिचा लोकांना उपयोग तर होतोच, पण या संशोधनाची दखल परदेशांतल्या भल्या भल्या संशोधकांनीही घेतली आहे.
गोपाळ भिसे, मोहम्मद सइदुल्लांसारखी कित्येक उदाहरणं महाराष्ट्रातली आणि देशभरातली प्रामुख्याने सर्वसामान्यांनी त्यांच्या गरजेपोटी लावलेल्या शोधांची.
अशी माणसं, असे शोध, अशी इनोव्हेशन्स हुडकत एक शोधयात्रा भारतभर फिरते आहे वर्षातून दोनदा. एक साध्यासुध्या वेशातला, पांढरी दाढी राखलेला माणूस या यात्रेत सर्वांच्या पुढे असतो. आठ-दहा दिवस चालणारी ही यात्रा गावागावांत थांबते. हा दाढीवाला माणूस आणि त्याच्या सोबतचे लोक गावकऱ्यांशी बोलतात, त्यांचं जगणं समजून घेतात आणि जगण्यातल्या समस्यांवर त्यांनी काढलेले मार्ग समजून घेतात. त्यातच लपलेली असतात इनोव्हेशन्स, त्यातच लपलेलं असतं नामशेष होत चाललेलं पारंपरिक ज्ञान.
कोण आहेत हे लोक? ही शोधयात्रा कशासाठी? त्यातून असं काय हाती लागणार आहे?
म्हटलं तर हा एका निमसरकारी स्वायत्त संस्थेचा साधा उपक्रम आहे आणि मानलं तर देशाच्या विकासाला वेगळं वळण देणारी एक चळवळ. ही संस्था आहे ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन' आणि हा दाढीवाला माणूस म्हणजे संस्थेचे उपाध्यक्ष आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील प्राध्यापक अनिल गुप्ता.
नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन ही तळागाळातल्या असंख्य व्यक्तींनी लावलेल्या अशा शोधांची कहाणी आहे. यामध्ये काही शेतकरी आहेत, मोलमजूरी करणारे आहेत, अशिक्षित-अकुशल कामगार आहेत, तर काही कुशल, पण बेकार कामगार. काही मेकॅनिक, सुतार तर काही डॉक्टर, इंजिनिअर्स, कॉलेजचे विद्यार्थीही आहेत. अशा लोकांनी फाउंडेशनच्या साथीने आकाराला आणलेल्या शोधांच्या या यशकथा आहेत.
फाउंडेशनची वेबसाइट उघडली की असे इनोव्हेटर्स आपल्याला पानापानांवर भेटतात. आक्रोड सोलण्याचं स्वस्त आणि सोपं मशिन तयार करणारे काश्मीरमधले मुश्ताक अहमद दार, सोलर मॉस्क्विटो डिस्ट्रॉयर बनवणारे केरळचे मॅथ्यूज के. मॅथ्यू, बसल्या बसल्या व्यायाम करण्यासाठी मारुती झूला बनवणारे गुजरातचे साक्राभाई प्रजापती, बांबूचे टवके काढणारं मशिन बनवणाऱ्या नागालँडच्या इमली तोशी यांच्यापर्यत असे अनेक. या वेबसाइटमधून आपण बाहेर पडतो तेव्हा जाणवतं, की आपलाच देश आणि आपलीच माणसं वेगळ्या नजरेतून दाखवणारी एक खिडकीच उघडली आहे. सगळंच काही वाईट चाललेलं नाही.
आपल्याही देशात ‘दम‘ आहे
सांगलीचे मकरंद काळे. सतत नव्या गोष्टी करून पाहण्याची त्यांना हौस. एकदा गव्हाच्या ओंबीपासून तयार केलेली खळ काढून तिचा लेप त्यांनी भिंतीवर लावला. काही दिवसांनी त्यांनी तो काढण्याचा प्रयत्न केला, तर तो काही केल्या निघेना. हातोडा मारून भिंत पडायची वेळ आली, पण या लेपाला तडे गेले नाहीत. त्यातून या खळीपासून बुलेटप्रूफ जॅकेट तयार करता येईल का, असा विचार काळे यांच्या डोक्यात आला. वडील निवृत्त लष्करी अधिकारी असल्याने लष्करासाठी काही उपकरणं तयार करण्याच्या दृष्टीने त्यांचं डोकं सतत काम करत असायचंच. यावर आणखी काम केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं, की अशा जॅकेटचा खर्च १० हजारही नाही. ते स्वस्त तर आहेच, शिवाय तापमानरोधकही. अहमदाबादच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये या खळीवर अनेक प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या, आणि त्या सर्व कसोट्यांमध्ये पास झाल्यानंतर आता त्यावर लष्कराच्या संशोधन आणि विकास संस्थेत पुढील चाचपणी सुरू होणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या आयुष्यात तंत्रज्ञानामुळे एक क्रांती घडवली आहे. आज तिशी-चाळिशीत असणाऱ्या व्यक्तींनाही लहानपणी टीव्ही, फोन, मोबाइल्स सर्रास पाहायला मिळत नव्हते. ते हळूहळू आपल्या आयुष्यात आले. आपण जणू हे घडणारच होतं, हे माहिती असल्यासारखं हे नवे शोध स्वीकारत गेलो. हे शोध कुणी लावले, कसे लावले याचा शोध घेण्याचं आपल्यापैकी बहुतेकांच्या डोक्यात कधी आलं नाही. कदाचित हे शोध परदेशांत, किंवा आपल्याकडे बड्या संशोधन संस्थांमध्येच लागणार, असं आपण गृहीत धरलं असावं. पण शोधांच्या मग तो शोध टेलिफोनचा असो किंवा नारळाच्या झाडावर चढण्यासाठीच्या आगळ्या शिडीचा त्यांच्या जन्मकथा अनुभवण्याचं भाग्य आपल्याला लाभलं नाही. इनोव्हेशन फाउंडेशनमुळे अशा शोधांचे साक्षीदार बनण्याची संधी आपल्याला मिळते आहे.
मनसुखभाई प्रजापतींनी केलेल्या इनोव्हेशन्सची जन्मकथाही अशीच थक्क करणारी आहे.
मनसुखभाई प्रजापती गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातले. घरी पूर्वापार व्यवसाय कुंभाराचा. गरिबीमुळे मनसुखभाईंनी दहावीत शिक्षण थांबवलं आणि ते छोटी-मोठी कामं करत घराला हातभार लावू लागले. परिस्थिती अत्यंत बिकट. माणूस खाऊन-पिऊन सुखी असेल तर त्याचं डोकं चालतं, हे म्हणणं मनसुखभाईंनी चूक ठरवलं. एका टाइल्सच्या वर्कशॉपमध्ये प्रेसिंग मशिनवर काम करताना त्यांच्या लक्षात आलं, की असं प्रेसिंग मशिन वापरलं तर कुंभाराकडे दिवसाला मातीचे १०० तवे तयार होतात ते प्रमाण कित्येक पटींनी वाढू शकतं. त्यांनी ३० हजार रुपयांचं कर्ज घेतलं आणि दिवसाला ७०० तवे तयार करायला सुरुवात केली. ते विकण्याचं गणित बसवलं आणि आपल्या घराला गरिबीतून वर काढलं. पण त्यांची इच्छाशक्ती तेवढ्यावर थांबली नाही. त्यांनी अनब्रेकेबल तवे करून पाहिले, मातीपासून नॉन-स्टिक तवे करण्याचं तंत्रज्ञान शोधलं, सामान्यांच्या आवाक्यात बसणारा आणि तुलनेने थंड पाणी देणारा मातीचा वॉटर फिल्टरही तयार केला.
पण मनसुखभाईंची खरी कमाल पुढेच आहे.
एकदा एका वर्तमानपत्रात या फिल्टरचा उल्लेख ‘गरिबांचा फ्रिज' असा केल्याचं त्यांनी वाचलं आणि त्यांच्या डोक्यात आलं, की सामान्यांना परवडेल अशा किमतीत मातीचा फ्रिज का तयार करू नये? हे डोक्यात घेतल्यावर तीन वर्षं त्यांनी या कल्पनेचा पिच्छा पुरवला आणि खरोखरच १५०० रुपयांमध्ये मातीचा फ्रिज तयार केला. या फ्रिजला कोणत्याही बाह्य ऊर्जा किंवा इंधनाची गरज नाही. याच्या वरच्या भागात तापमान कमी होण्यासाठी पाणी साठवलं जातं, तर खालच्या दोन कप्प्यांमध्ये भाजी आणि दूध राहू शकतं. बाहेरच्या तापमानापेक्षा आतल्या वस्तूंचं तापमान जवळपास चार ते पाच अंशांनी कमी असतं. या फ्रिजला देशातच नव्हे तर परदेशी संशोधकांकडूनही वाहवा मिळते आहे.
देशभरातून अशी सुपीक डोकी शोधण्याचं काम नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन करतं, त्यांना पुरस्कार देतं. पण अशा व्यक्तींची एखाद्या पुरस्काराने बोळवण करण्यासाठी या फाउंडेशनची स्थापना झालेली नाही.
मग कशासाठी शोधायचे हे इनोव्हेटर्स?
या इनोव्हेटर्सनी शोध लावले ते त्यांच्या गरजांवर उत्तरं शोधण्यासाठी.
त्या शोधाचा उपयोग तीच समस्या भेडसावणाऱ्या इतरांना होऊ शकतो का आणि हा शोध त्या इनोव्हेटरसाठी उत्पन्नाचं साधन बनू शकतं का, अशा दोन प्रमुख प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम फाउंडेशनने हाती घेतलं आहे. या प्रश्नांच्या उत्तरांच्या दिशेने जायचं असेल तर केवळ इनोव्हेटर्सना पुरस्कार देऊन भागणार नाही, तर त्यापलीकडे जाऊन त्यांच्या पाठीशी तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या खंबीरपणे उभं राहावं लागेल. तेच काम नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन करतं आहे.
कोणत्याही समाजाच्या भौतिक प्रगतीचा संबंध असतो तो अशा इनोव्हेशन्सशीच. माणसाच्या प्राचीन इतिहासापासून त्याचे दाखले आपण वाचत आलो आहोत. आपलं आयुष्य अधिकाधिक सुकर करणारे शोध लावले जातात आणि त्या शोधांचं रूपांतर कालांतराने उत्पादनात, सवयीत होतं, तेव्हाच प्रगतीकडे आपलं एक पाऊल पडलं, असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच केवळ इनोव्हेशन करणारी डोकी असून भागत नाही, तर त्या शोधांचा उपयोग संपूर्ण समाजाला व्हावा यासाठी त्याचं उत्पादनात, सवयीत रूपांतर व्हावं लागतं. शोध लावणारी कुशाग्र, कल्पक बुद्धी आणि ते शोध प्रत्यक्षात आणणारं सरकार किंवा खासगी उद्योजक असे सर्व घटक समाजात एकाच वेळी सक्रिय असतील तरच उद्यमशील समाजाचं स्वप्न पाहता येऊ शकतं.
ही मोट बांधली जात नसल्यानेच बुद्धिमत्ता आणि कल्पकता असूनही आपण आजवर इनोव्हेशन्सच्या बाबतीत मागे होतो. तुलनेत आजही मागेच आहोत.
इनोव्हेशन कपॅसिटी इंडेक्समध्ये १३४ देशांच्या यादीत आपला ३५ वा क्रमांक लागतो.
इनोव्हेशन्स आपल्या देशातली, पण त्यांचं ॲप्लिकेशन पहिल्यांदा बाहेरच्या देशात, अशी उदाहरणं कमी नाहीत. मद्रास आयआयटीमधील अशोक झुनझुनवाला यांनी वायरलेस लोकल लूप टेक्नॉलॉजी विकसित केली. ती भारतात वापरली जाण्याआधी ब्राझील, मादागास्कर आणि अंगोलात गेली होती. एनकोअरच्या विनय देशपांडे यांनी ‘मोबिलिस' हा पर्सनल कॉम्प्युटर तयार केला. त्यांना ‘सीएसआयआर'तर्फे निधीही मंजूर झाला; पण त्यांचा पहिला कॉम्प्युटर भारतात नव्हे, तर मलेशिया आणि ब्राझीलमध्ये तयार होतो आहे.
अशी अनेक उदाहरणं देता येतील. भारत गेली कित्येक वर्षं महासत्ता बनण्याची केवळ स्वप्नंच का पाहतो आहे याचे हे दाखले. क्षमता आहे, पण त्याचा उपयोग करून घेता येत नाही, याचे हे दाखले.
ही परिस्थिती बदलावी, या दिशेने २००० साली आपण टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनची स्थापना. देशातल्या तळागाळातला नागरिकांच्या डोक्यातून, त्यांच्या पारंपरिक ज्ञानातून तयार होणाऱ्या व्यवहार्य कल्पनांना व्यासपीठ दिलं पाहिजे, त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे, या उद्देशाने डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत हे फाउंडेशन उभं राहिलं.
गेल्या १० वर्षांत डॉ. माशेलकर आणि अनिल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली या फाउंडेशनने देशाच्या कानाकोपऱ्यांतून लाखो इनोव्हेशन्स शोधून काढली आहेत, त्यातील असंख्य इनोव्हेशन्सना आर्थिक व तांत्रिक पाठबळ दिलं आहे. इनोव्हेशन्स हेच आपल्या देशाला पुढे नेणारं पाऊल आहे, हे सर्व पातळ्यांवर रुजवण्यासाठी ही धडपड चालली आहे.
अनेकदा सर्वसामान्य माणसं अशा कल्पना जन्माला घालतात, पण त्यांना व्यवहार्य रूप देण्यात ती कमी पडतात. एक तर त्यांच्याकडे तशी दृष्टी नसते, भांडवल नसतं किंवा तांत्रिक ‘नो-हाऊ‘ नसतं. म्हणजेच माइंड टु मार्केट या प्रवासातच अनेकदा कल्पना अकाली मरतात. फाउंडेशनचं सर्वांत महत्त्वाचं उद्दिष्ट या कल्पनांना जगवणं, त्यांना मार्केट दाखवणं हेच आहे.
कोइमतूरचे ए. मुरुगंथम
फाउंडेशनच्या आर्थिक मदतीमुळे कोइमतूरच्या ए. मुरुगंथम यांचं इनोव्हेशन देशभरात पोचलं आहे. हे मशिन प्रत्यक्षात उतरवण्यापासून ते त्याची कार्यक्षमता वाढवण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत फाउंडेशनने त्यांना मदत केली आहे. मुरुगंथम यांनी एकदा त्यांच्या पत्नीला घरातलं जुनं कापड घेऊन बाथरूममध्ये जाताना पाहिलं. आपली बायको पैसे वाचावे म्हणून सॅनिटरी नॅपकिन्स वापरत नाही, हे कळल्यावर त्यांना धक्काच बसला. देशातल्या किती तरी बायकांचा हा प्रश्न आहे, हे जाणवल्याने त्यांनी नॅपकिन्सचं मशिन तयार करण्याचं मनावर घेतलं. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या नॅपकिन्सची त्यांनी प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यामध्ये वुड फायबर वापरलं जातं, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यावर प्रयोग करत करत वुड फायबरचं युनिट तयार करण्यापासून ते दिवसाला हजार नॅपकिन्स बनवणारं मशिन करण्यापर्यंत नाना गोष्टी मुरुगंथम यांनी चिकाटीनं केल्या. एवढंच नव्हे, तर मुरुगंथम यांनी एटीएमच्या धर्तीवर नॅपकिन्सचं व्हेंडिंग मशिनही तयार केलं. फाउंडेशनच्या मदतीमुळे त्यांच्या प्रयत्नांचं चीज झालं. आज मुरुगंथम यांनी तयार केलेलं मिनी सॅनिटरी नॅपकिन्स तयार करण्याचं मशिन देशभरात ८० ठिकाणी बसवलं गेलं आहे.
‘बिझनेस डेव्हलपमेंट आणि मायक्रो व्हेंचर इनोव्हेशन फंड' ही विंग अशा अनेक इनोव्हेटर्ससाठी बूस्टर ठरते आहे. व्यवहार्य कल्पनांची निवड करून देशातल्या आणि जगातल्या काही प्रख्यात संशोधन संस्थांच्या मदतीने त्या तांत्रिकरीत्या परिपूर्ण करणे आणि नंतर त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी भांडवली कर्ज पुरवणे, हा तर त्या कामाचा मुख्य भाग आहेच. पण त्याबरोबरीने सरकारी, निमसरकारी, खासगी अशा सर्व प्रकारच्या उद्योगांशी अशा कल्पनांची जोड घालून देण्यानेही इनोव्हेशन्सच्या उपयोगाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढते आहे. कारण एका माणसाने कर्ज घेऊन एखादं उत्पादन तयार करणं आणि एखाद्या मोठ्या कंपनीने ते त्या माणसाकडून विकत घेणं, यात समाजाचा फायदा आहे आणि ती कल्पना शोधणाऱ्या माणसाचाही. म्हणूनच अशी इनोव्हेशन्स आणि माणसं शोधून फाउंडेशनचं काम थांबत नाही. त्या इनोव्हेशन्सचा डाटाबेस तयार करणं, त्यात व्हॅल्यू ॲडिशन करणं, ती कल्पना व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य ठरावी यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी पैसा पुरवणं आणि या कल्पनांचा बौद्धिक हक्क जपणं, अशा विविध पातळ्यांवर हे काम चालू आहे.
हा शोध क्रांतिकारी आहे
सारीच इनोव्हेशन्स छोट्या पातळीवरची नाहीत. नगरमधल्या पंढरीनाथ सर्जेराव मोरे यांनी कांद्याच्या लागवडीसाठी तयार केलेलं मशिन एखाद्या इंजिनियरने मोठ्या फॅक्टरीत तयार केलेल्या मशिनच्या तोडीचं आहे आणि देशातल्या कित्येक कांदा उत्पादकांना वरदान ठरणारं आहे.
कांद्याची पेरणी हे अतिशय किचकट, वेळखाऊ आणि मजुरांवर अवलंबून असलेलं रब्बी हंगामातलं काम. या काळात बऱ्याचदा कामासाठी मजूर मिळत नाहीत, असा त्यांचा अनुभव होता. शिवाय हे काम मजुरांकडून एकसारखं होत नाही आणि त्याच्या पिकाची पुढची काळजी घेण्यासाठी कष्ट उपसावे लागतात ते वेगळेच. त्यावर उपाय म्हणून त्यांनी सेमी-ऑटोमॅटिक मशिन तयार करण्याचा विडा उचलला. महिना-दीड महिना सतत प्रयोग केल्यानंतर, अनेकदा अपयश आणि काही वेळा अपघात सहन केल्यानंतर त्यांना हे मशिन बनवण्यात यश आलं. एका ट्रॅक्टरला पाती जोडून हे मशिन तयार केलेलं आहे. त्यामध्ये एकाच वेळी कांद्याची पेरणी, खताची फवारणी आणि सिंचनासाठी चॅनेल्स तयार करण्याची सोय आहे.
हा शोध खरं तर क्रांतिकारी आहे आणि अनेक शेतकऱ्यांना दुष्टचक्रातून बाहेर काढणारा आहे; पण मोरे त्यावर बौद्धिक हक्क सांगणं नाकारतात. ज्यांना शक्य आहे त्यांना याचा फायदा घेऊ द्या; त्यातूनच माझी रॉयल्टी मिळेल, असं ते मानतात.
मोरे यांचा हा विचार आपल्या देशाला नवीन नाही. पण आता ही मानसिकता बदलण्यासाठीही इनोव्हेशन फाउंडेशन काम करतं आहे. बौद्धिक मालमत्ता हक्क जपण्याची चळवळ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी भारतात सुरू केली, तेव्हा तर असा आपल्या ज्ञानावर हक्क सांगितला जाऊ शकतो, हेच आपल्याला नवीन होतं. एक तर संपूर्ण अज्ञान किंवा मोऱ्यांसारखा आध्यात्मिक विचार. स्वतः केलेल्या संशोधनाबद्दलही स्वामित्वाची भूमिका नाही, तिथे हळद-कडूनिंब यांच्या औषधी वापरासारख्या पूर्वापार चालत आलेल्या ज्ञानाबाबतीत आपण बेफिकीर असणार, हे उघडच होतं. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनमुळे देशभरात ही चळवळ सुरू झाली आणि फाउंडेशनने उभ्या केलेल्या यंत्रणांमुळे ती स्थिरावली.
माइंड टु मार्केट
इनोव्हेशन फाउंडेशनने आजवर देशात एकूण ३५० पेटंट्ससाठी अर्ज केले आहेत, त्यातली ३३ पेटंट्स मिळाली आहेत. अमेरिकेत अर्ज केलेल्या सात पेटंट्सपैकी चार मिळवण्यात यश आलं आहे. शिवाय इनोव्हेशन फाउंडेशनच्या प्रोत्साहनामुळे, जागृतीमुळे बाहेरून सुरू असलेले प्रयत्न वेगळेच. हे आकडे छोटे वाटले तरी ही पेटंट्स सर्वसामान्य माणसांना त्यांच्या एरवी ‘नस्ते उद्योग' समजल्या जाणाऱ्या शोधांसाठी मिळाली आहेत, हे लक्षात घेण्याजोगं आहे; आणि अशा प्रत्येक कल्पनेच्या ‘माइंड टु मार्केट' प्रवासात बौद्धिक मालमत्ता हक्कासाठी प्रयत्न, हा आता अविभाज्य टप्पा बनला आहे, हे या कामाचं मोठं फलित आहे. पारंपरिक ज्ञानाचा व्यावसायिक वापर करतानाही आधी त्या समाजाची किंवा त्या त्या माणसाची लेखी परवानगी घेतली पाहिजे, यासाठीही इनोव्हेशन फाउंडेशनने जोर लावला आहे.
वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या संस्था, यंत्रणांचं जाळं
इनोव्हेशन फाउंडेशनने वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या संस्था, यंत्रणांचं जाळं देशभरात उभं केलं आहे. हनी बी नेटवर्क, सृष्टी (सोसायटी फॉर रिसर्च अँड इनीशिएटिव्ह्ज फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजी अँड इन्स्टिट्युशन्स) आणि ग्यान (ग्रासरूट इनोव्हेशन्स ऑगमेंटेशन नेटवर्क) या इनोव्हेशन फाउंडेशनशी संलग्न असणाऱ्या संस्था वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करतात. राष्ट्रीय स्पर्धा, जिल्हा-तालुका पातळीवर अशा कल्पक व्यक्तींचं नेटवर्क उभारणं, माध्यमांना या चळवळीत सहभागी करून घेणं, असे अनेक मार्ग इनोव्हेशन फाउंडेशनने शोधून काढले आहेत, ते कल्पकतेने राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शोधयात्रा हा त्यातला लक्ष वेधून घेणारा उपक्रम.
वर्षातून दोन वेळा इनोव्हेशन फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रा. अनिल गुप्ता आणि त्यांचे सहकारी-कार्यकर्ते देशातील दुर्गम भाग पिंजून काढतात. १० दिवसांच्या प्रवासात ग्रामीण भागातल्या लोकांचं जगणं, त्यांच्या समस्या आणि त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरं समजून घेण्याचा हा प्रयत्न असतो. या शोधयात्रांमध्ये त्या त्या गावातली उद्योगी मंडळी तर नजरेत भरतातच, पण पारंपरिक ज्ञान समोर येण्यासाठीही त्याचा फायदा होतो. कधी एखाद्या पिकावर पडणारा रोग दूर करणारी औषधी गावातल्या म्हातारबाबांकडे असते, तर कधी पाणी साठवण्याचे अजब उपाय एखाद्या गावात पूर्वापार चालत आलेले असतात. आपल्याकडे हे ज्ञान आहे, ते इतरांपेक्षा वेगळं आणि त्यांना उपयोगी आहे, याची जाणीवच नसल्याने या शोधयात्रा आणि अनिल गुप्तांसारख्या झपाटलेल्या माणसाची कौतुक भरली नजर हे या गावकऱ्यांच्या दृष्टीनं एक आश्चर्यच असतं. अशी २७ वी शोधयात्रा संपवून इनोव्हेशन फाउंडेशनचे वारकरी नुकतेच झारखंडमधून परतले आहेत.
उद्यमशील समाजाचं स्वप्न बघायचं तर..
एखादी ठिणगी पूर्ण जोर लावून फुलवत राहावी, तसं वेगवेगळ्या बाजूंनी फुंकर मारण्याचं काम इनोव्हेशन फाउंडेशन करते आहे. त्यातली सर्वांत महत्त्वाची ठिणगी आहे मुलांमध्ये दिसणारी.
उद्यमशील समाजाचं स्वप्न बघायचं तर उद्याच्या नागरिकांना या चळवळीत सामील करून घेतलं पाहिजे, या विचारानं इनोव्हेशन फाउंडेशनने मुलांसाठी ‘इग्नाइट‘ स्पर्धा सुरू केली, आणि असं लक्षात आलं, की मोठ्या माणसांपेक्षाही ती अधिक कल्पक आहेत. त्यांना चाकोऱ्यांची, मर्यादांची कल्पनाच नसल्याने त्यांच्या डोक्यातून निघणाऱ्या इनोव्हेशन्सचा आवाका शास्त्रज्ञांनाही चकित करणारा आहे. सायकल फिरवल्यावर चालणारं वॉशिंग मशिन, पावसाचं पाणी साठवणारी छत्री, सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर आपोआप पाणी टाकण्याची यंत्रणा, शरीरातल्या उष्णतेचा वापर करून सेलफोन चार्ज करण्याचं तंत्रज्ञान, ऑटोमॅटिक जेवण तयार करणारं मशिन, अशा कित्येक कल्पना-उत्पादनं-यंत्रणा मुलांनी गेल्या चार वर्षांमध्ये इनोव्हेशन फाउंडेशनपर्यंत पोचवल्या आहेत. त्या व्यवहार्य कशा होतील यासाठी विचार केला आहे. इनोव्हेशन फाउंडेशन या मुलांना नव्हे, तर ही मुलंच पुढच्या कामाला वेगळी दिशा देतील अशी शक्यता आहे. ही उदाहरणं अगणित आहेत.
इनोव्हेशन फाउंडेशनकडे गेल्या १० वर्षांमध्ये तब्बल १० हजार इनोव्हेटर्सचं डॉक्युमेंटेशन आहे, आणि त्यात रोज वाढ होत आहे.
पण संख्या हे काही याचं एकमेव वैशिष्ट्यच नव्हे. वैशिष्ट्य आहे ते धडपडण्याची, प्रयोगशील बनण्याची संस्कृती तयार होण्यात. एकूण काय, तर इनोव्हेशनची संस्कृती समाजात निर्माण करण्याचं काम इनोव्हेशन फाउंडेशनने हाती घेतलं आहे. पण एखाद्या समाजाला छोट्या छोट्या सवयी लावणं अवघड तिथे समाजात कल्पकतेचा आणि उद्यमशीलतेचा धागा तयार व्हावा, याचं स्वप्न पाहणं धाडसाचंच. भारतासारख्या आकाराने प्रचंड आणि समाज म्हणून एकसंध नसलेल्या देशात तर ते नदीच्या प्रवाहाची दिशा बदलण्याइतकंच अशक्य. पण हे अशक्य आव्हान इनोव्हेशन फाउंडेशनने स्वीकारलंय आणि तळागाळातल्या इनोव्हेटर्सच्या जोरावर पेलूनही दाखवलंय.
(अनुभव मासिकाच्या जून २०११ अंकातून)
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.