आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची

  • विवेक सावंत
  • 28.02.26
  • वाचनवेळ 15 मि.
pabal vidnyan ashram

डॉ. श्रीनाथ कलबाग हे ग्रामविकासकेंद्री तंत्रशिक्षण संकल्पनेचे जनक आणि त्या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी स्थापन झालेल्या ‘विज्ञान आश्रम, पाबळ' या संस्थेचे संस्थापक. ग्रामीण जनतेच्या जीवनातल्या खऱ्याखुऱ्या गरजांपासून तुटलेले आणि ग्रामविकासाचे उद्दिष्ट गमावून बसलेले पुस्तकी शिक्षण हे शिक्षणच नव्हे, ते कुचकामी आहे, अशी त्यांची धारणा होती. तशा निरुपयोगी व घातक शिक्षणाला त्यांनी आपल्या प्रयोगांमधून आणि अपार कष्टांतून एक भक्कम पर्याय उभा केला. ‘ग्रामीण विकासातून तंत्रशिक्षण आणि त्या शिक्षणातून अधिक फलदायी असा विज्ञाननिष्ठ ग्रामविकास' हे त्यांचे ध्येय होते. १९८३ ते २००३ ही त्यांच्या जीवनाची अखेरची दोन दशके म्हणजे या ध्येयासाठीचे ध्यासपर्व. या ध्येयाच्या परिपूर्तीसाठी त्यांनी पाबळसारख्या अवर्षणग्रस्त गावाची निवड केली. त्या गावाच्या सान्निध्यात समर्पित भावनेने आणि आश्रमीय जीवनपद्धतीचा मनोमन अंगीकार करून त्यांनी तंत्रशिक्षणाचे आणि तंत्रवैज्ञानिक शिक्षणाचे नवनवीन प्रयोग केले. ग्रामविकासासाठी स्थानिकांच्या बुद्धिकौशल्याला साद घालत अनेक तंत्रवैज्ञानिक नवोन्मेष उभे केले. शेकडो ग्रामीण युवांना स्वत:च्या पायावर उभे केले. त्यांचा आत्मविश्वास शतगुणित केला आणि त्यांच्यातून संशोधक वृत्तीचे यशस्वी ग्रामीण उद्योजक घडवले. इतकेच नव्हे, तर आपले जीवितकार्य तितक्याच समर्थपणे आणि निष्ठेने पुढे नेतील असे डॉ. योगेश कुलकर्णी यांच्यासारखे समर्थ उत्तराधिकारीही घडवले, पण स्वत: कधी आयकॉन किंवा आयडॉल बनले नाहीत. विनोबा म्हणतात, ‘काही लोक आपल्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी संस्था स्थापन करतात आणि त्यात स्वत:च मूर्तिरूप होऊन बसतात!' डॉ. कलबाग मात्र विज्ञान आश्रमात मूर्तिरूप झाले नाहीत तर आजतागायत स्फूर्तिरूप होऊन राहिले आहेत.

हे जवळपास अशक्य कोटीतील वाटणारे आणि ग्रामीणबहुल भारताला पथदर्शक कार्य त्यांनी कसे साध्य केले, त्यांचे हे जीवितकार्य त्यांच्या पश्चातही किती समर्थपणे चालू आहे, कसे विस्तारत आहे, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. विज्ञान आश्रमाच्या जडणघडणीतल्या महत्त्वाच्या टप्प्यांचे सहभागी-साक्षीदार असलेल्या आणि गेली वीस वर्षे या संस्थेला नेतृत्व देत आलेल्या डॉ. योगेश कुलकर्णी यांच्याव्यतिरिक्त क्वचितच कोणी हे आव्हान पेलू शकले असते. ‘आश्रम आणि मी' हे अप्रतिम प्रकरण वाचल्यावर हे विधान वाचकाला पटेल.

हेही वाचा - आयुकाची गोष्ट

डॉ. कलबाग यांच्या जीवनकाळात आणि त्यांच्या पश्चातही विज्ञान आश्रमात समर्पित भावनेने चाललेल्या प्रयोगनिष्ठ संशोधनाविषयी, अफलातून नवोन्मेषांविषयी आणि मूलभूत तत्त्वचिंतनाविषयी मी गेली कित्येक वर्षे उत्साहाने आणि आत्मीयतेने माहिती घेत आलो आहे. त्यामुळे माझे शिक्षणविषयक विचार व कार्यही प्रभावित झाले आहे. पण संपूर्ण देशाच्या शिक्षणव्यवस्थेला योग्य दिशा देण्याची कुवत असलेल्या या कार्याचा परिचय सर्वसामान्यांना होणे गरजेचे होते. पाबळसारख्या आडगावी चाललेल्या या मुलखावेगळ्या स्फूर्तिदायक कार्याचा सारांश जिज्ञासू मराठी वाचकांपर्यंत कसा पोहोचणार अशी रुखरुख वाटत असे. विज्ञान आश्रमाच्या रूपाने गेली चार दशके अव्याहत चाललेल्या शैक्षणिक परिवर्तनाच्या मूलभूत कार्याद्वारे विकसित होत गेलेले ‘ग्रामविकासकेंद्री शिक्षणविचारधन' वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी एका आटोपशीर पण समग्र अशा पुस्तकाची निकराची गरज होती. माझ्याप्रमाणे अनेक जाणकारांनाही तसे वाटत असे. प्रस्तुत पुस्तकाने ती प्रतीक्षा अखेर संपवली. नुसती संपवलीच नाही तर अतिशय समाधानकारकरीत्या संपवली. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचक या विचारप्रवर्तक लेखनाबद्दल डॉ. योगेश कुलकर्णी यांचे कायमचे आणि शतश: ऋणी राहतील.

शिक्षणाने समाजाचे प्रश्न सोडवणे अपेक्षित असताना समाजालाच शिक्षणाचे प्रश्न सोडवण्याची वेळ आली आहे! यातून बाहेर कसे पडायचे? समाजाला उपयुक्त अशी शिक्षणपद्धती कशी असायला हवी? समाजापुढील बदलत्या आव्हानांची सोडवणूक करणारे नवे कर्मशील ज्ञान कसे विकसित करायचे? त्याचे आर्थिक, सामाजिक विकासासाठी कसे उपयोजन करायचे? समाज व शिक्षणव्यवस्था यांच्यात प्रदीर्घ काळ टिकून राहिलेला अलगाव कसा दूर करायचा? ग्रामीण वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना त्यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते शिक्षण उपयुक्त ठरेल? त्यांना आत्मभान, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान मिळवून देणाऱ्या शिक्षणाची परिसंस्था कशी असायला हवी? युवांमधील (युवक व युवतींमधील) बेरोजगारी कशी हटवायची? त्यांच्या हाताला आणि डोक्याला उत्पादक काम कसे द्यायचे? त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव कसा द्यायचा? त्यांच्या सर्जनशीलतेला गावाच्या विकासाशी कसे जोडायचे? त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या संधींची विपुलता कशी निर्माण करायची? त्यासाठी शासकीय धोरणांमधील उचित बदलांची दिशा काय असावी? परावलंबन, प्रयत्नशीलतेऐवजी परिस्थितीला दोष देत बसण्याची वृत्ती, मानसिक असंतुलन, मानसिक गुलामगिरी, दैववाद, न्यूनगंड, निरुत्साह, रितेपण, नैराश्य, स्वत:च्या जीवनाचे क्षुल्लकीकरण, इ. मानसिक कमकुवतपणामुळे होणाऱ्या अनिष्ट परिणामांपासून युवांना कसे वाचवायचे? युवांचे मनोधैर्य कसे वाढवायचे? त्यांच्यातील आशावाद, आव्हाने पेलण्याचा आत्मविश्वास, सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची जाणीव कशी वाढवायची? ग्रामीण युवांना गुन्हेगारी, गुंडगिरी, टपोरीगिरी, व्यसनाधीनता, प्रलोभने, चंगळवाद, क्षुद्र राजकीय हेवेदावे, व्यभिचार, पुरुषी वर्चस्वाची भावना, जातीयता, धर्मांधता, सांप्रदायिकता, असहिष्णुता, अवैज्ञानिकता, अंधश्रद्धा, मेंदू धुलाई, हिंसाचार, अत्याचार, दहशतवाद, इ. पसरवणाऱ्या अनिष्ट प्रवृत्तींच्या जाळ्यात अडकण्यापासून कसे वाचवायचे? युवाशक्तीला विधायकतेकडे वळवून समाजात शांतता, सौहार्द, ज्ञानपिपासा आणि समृद्धी कशी वाढवायची? हे आणि असे प्रश्न तुम्हाला सतत अस्वस्थ करत असतील आणि तुम्हाला ते सुटण्याची शक्यता धूसर वाटत असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.

pabal vidnyan ashram

ग्रामीण भागातील युवा, ग्रामीण अर्थव्यवस्था, त्यातील शेतीपूरक व इतर उद्योगक्षेत्र आणि सेवाक्षेत्र, तेथील शिक्षणव्यवस्था, पालक, समाज आणि शासनव्यवस्था यांच्यासमोरील वर उल्लेखलेले ग्रामीण विकासाचे, रोजगारनिर्मितीचे, युवांच्या जीवनाच्या अर्थपूर्णतेचे, पर्यावरणीय अरिष्टाचे, ग्रामीण जनतेच्या समृद्ध भविष्याचे आणि तिची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रश्न सुटण्याऐवजी उत्तरोत्तर अधिक गुंतागुंतीचे होत आहेत. या सर्व घटकांनी आपापले प्रश्न सुटे सुटे व एकट्याने सोडवण्याचे प्रयत्न फोल ठरले आहेत. विज्ञान आश्रमाने या सर्व प्रश्नांकडे एकात्मिक स्वरूपात पाहण्याची आणि सोडवण्याची नवी दृष्टी दिली. ग्रामीण भागाचा शाश्वत विकास, स्थानिक उद्योजकतेचा विकास, युवांच्या आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाला पुष्टी आणि शेतीपूरक आणि शेतीपलीकडची ग्रामीण रोजगारनिर्मिती या आणि अशा उद्दिष्टांसाठी या सर्व घटकांच्या बलस्थानांचा कल्पकतेने मिलाफ घडवून आणल्यास समुचित शिक्षणाची, नवसर्जक संशोधनाची आणि शाश्वत विकासाची एक पर्यायी अशी एकात्मिक प्रणाली विकसित करता येऊ शकते. त्यातूनच दिवसेंदिवस जटिल होत चाललेले वरील प्रश्न सुटण्याची वाट सुकर होत जाते हे विज्ञान आश्रमाच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीचे फलित आहे. विज्ञान आश्रमाने ‘इन-बॉक्स थिंकिंग'ऐवजी सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी ‘आऊट-ऑफ-द बॉक्स सायंटिफिक थिंकिंग' कसे करावे याचा वस्तुपाठ उभा केला आहे. हे पुस्तक त्याच्या निर्मितीची आणि वाटचालीची कहाणी अगदी सोप्या शब्दांत पण प्रभावीपणे मांडते.

हेही वाचा - इथं शिक्षकांच्या कल्पनेची मशागत करून मिळते..!

व्याख्याने ऐकून, पुस्तके वाचून, पाठांतर करून, गुगल सर्फून, यूट्युबवरील चित्रफिती वॉचून मिळते ती माहिती, ज्ञान नव्हे. पोहण्याच्या कौशल्यावरचे उत्कृष्ट पुस्तक वाचून पोहण्याचे ज्ञान होते का?- म्हणजे पोहता येते का? ‘नॉलेज इज इन्फर्मेशन इन ॲक्शन!'- इति व्यवस्थापन गुरू पीटर ड्रकर आणि ‘ज्ञानप्राप्तीचे एकमेव माध्यम आहे सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक काम!' -इति महात्मा गांधी. विनोबा म्हणतात, ‘बुकात डोके आणि डोक्यात बुके घालून ज्ञान मिळत नाही. गांधीजींच्या ‘नई तालीम'मध्ये ज्ञान आणि काम हे एकाच वेशात अवतरतात. कामामुळे ज्ञानप्राप्ती होते, ज्ञानातून फलदायी काम निघते आणि ज्ञान व काम यांच्या मिलाफातून बुद्धीचा विकास होतो.' विज्ञान आश्रमातील शिक्षणपद्धतीत ‘नई तालीम'ची बरीचशी तत्त्वे आहेत, पण तंत्रे मात्र कालसुसंगत वापरली आहेत आणि काही नवी तत्त्वे आणि तंत्रे प्रयोगातून विकसितही केली आहेत. ‘दि थर्ड वेव्ह' या ग्रंथात ऑल्विन टॉफ्लर यांनी नवा समाज घडवण्यासाठी मांडलेल्या ‘गांधी विथ सॅटेलाइट' या सूत्रासारखे ते आहे. ‘गांधी विथ इंटरनेट' असेही आता म्हणता येईल! गांधींची ‘नई तालीम' अस्तंगत किंवा कालबाह्य झाली आहे असे म्हणणाऱ्यांनी हे पुस्तक वाचून आपल्या मताची वैधता तपासावी. ग्रामीण समाजावरील साम्राज्यशाहीच्या आर्थिक आणि सांस्कृतिक आक्रमणाला महात्मा गांधी ‘नई तालीम'द्वारे उत्तर देऊ इच्छित होते. विज्ञान आश्रमाची शिक्षणपद्धती खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण (खाउजा) यांच्या ग्रामीण जीवनावरील वेगवान आक्रमणाला तोंड देत आहे. ग्रामीण समाजाच्या, शेतीच्या आणि ग्रामीण उद्योगांच्या बदलणाऱ्या गरजांचा आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आकांक्षांचा, त्यांच्यापुढील गंभीर आव्हानांना सामोरे जाण्याचा विचार ही पद्धती वैज्ञानिक दृष्टिकोनातून करते. गांधींची नई तालीम खुरटलेली नसून प्रवाही आहे, विकसनशील आहे, विकसित होत आहे, नव्या आव्हानांना सामोरे जायला समर्थ बनवणारी आहे, याचा विज्ञान आश्रमाची यशस्वी शिक्षणपद्धती हा ढळढळीत पुरावा आहे.

विज्ञान आश्रमातील शिक्षणपद्धती ही कर्मशील ज्ञानाची प्राप्ती आणि निसर्गाने विद्यार्थ्याला दिलेल्या बहुविध बुद्धिमत्तांच्या विकासाची एक स्वाभाविक पद्धती आहे हे आपल्याला पुस्तक वाचताना पानोपानी जाणवते. काम आणि ज्ञान यांच्यातले अतूट परस्परावलंबन किंवा समव्यय त्यात आहे. उत्पादक श्रम करणाऱ्या माणसाला ज्ञानप्राप्तीद्वारे माणूसपण मिळवून देण्याचा, ज्ञानातून निर्माण होणारा आनंद आणि प्रतिष्ठा सर्वांना मिळवून देण्याचा म्हणजेच विषमतामुक्त समाजनिर्मितीचा तो अहिंसक मार्ग आहे. ‘कृतीतून शिक्षण किंवा खेळातून शिक्षण' या परंपरागत शैक्षणिक पद्धतींपेक्षा ही पद्धत भिन्न आहे. (गांधींचा ‘टकळी व्हर्सेस टॉय' हा लेख जरूर वाचावा.) येथे प्रत्येक कृतीला उद्योगाचा, सामाजिक उपयुक्ततेचा, उत्पादकतेचा आणि वैज्ञानिक संशोधनातून करण्याच्या नवसर्जनाचा स्पष्ट हेतू आहे. या शिक्षणात ज्ञानप्राप्ती ही जीवनासाठी आहे आणि जीवनाकरवी आहे. ती आजीवन करत राहण्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थी येथून पुढे जातो. येथे शिक्षणासाठी शिक्षण नाही, ज्ञानप्राप्तीसाठी ज्ञानप्राप्ती नाही. ज्ञान-भोगवादाला (नॉलेज कन्झुमरिझम) येथे स्थान नाही. मिळवलेल्या ज्ञानातून अधिक फलदायी काम करायचे आहे. येथे ज्ञानसाधनेला ग्रामीण जीवनातल्या ज्वलंत समस्यांना उत्तरे शोधण्याचा, येथील लोकांच्या दैनंदिन गरजा उच्च गुणवत्तेने, कमी खर्चात आणि कमी वेळात, स्थानिक संशोधनातून आणि शक्यतो स्थानिक संसाधनांच्या संतुलित वापरातून भागवण्याचा सुस्पष्ट हेतू आहे. विज्ञान आश्रमात सातत्याने संशोधित होणारी अशी लोकोपयोगी नवोन्मेषांची अनेक रोमहर्षक उदाहरणे लेखकाच्या अप्रतिम कथनशैलीमुळे आपल्या जाणिवेत जिवंत होतात, आपल्याला खिळवून ठेवतात. हे पुस्तक वाचताना आपली अवस्था अलिबाबाच्या गुहेत शिरलेल्या आणि तेथील रत्ने पाहत हरवून आणि हरखून गेलेल्या कासीमसारखी होते!

या शिक्षणपद्धतीत सुरुवात ज्ञानाने किंवा पुस्तकाने होत नाही तर समाजासमोरच्या समस्येला भिडण्याने होते. लेखक अशा समस्यांची विज्ञान आश्रमाने हाताळलेली किती तरी उदाहरणे या पुस्तकात मांडतो. ती वाचताना ग्रामीण समाजाच्या साध्यासुध्या गरजाही शहरी शिक्षण-संशोधन-विकास व्यवस्थेने दुर्लक्षित केल्या आहेत हे जाणवते. त्याचबरोबर विज्ञान आश्रम हे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या अनेक राज्यांतल्या लोकांना आशास्थान का वाटते याचेही उत्तर मिळते. विज्ञान आश्रमाच्या कार्याचा सार्थ अभिमान वाटतो.

समस्येचे वैज्ञानिक पद्धतीने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आकलन करताना, ती सोडवायची खटपट करताना नानाविध अनुभव येतात, अडचणी येतात, लोकांशी संवाद साधावा लागतो. चिकाटी, मनोधैर्य, कल्पकता आणि बुद्धिचातुर्य पणाला लावावे लागते. आडाखे बांधावे लागतात. प्रयोग करून निरीक्षणे घ्यावी लागतात आणि निष्कर्षाप्रत यावे लागते. त्यात यशापयश पदरी पडते, खरेखुरे नवे प्रश्न पडत जातात. त्यातून पुढल्या ज्ञानप्राप्तीची तृष्णा निर्माण होत. ज्ञानप्राप्तीचे नवे मार्ग शोधावे लागतात. ज्ञानप्राप्ती झाल्यावर तिच्या उपयोगामुळे समस्येचे अंशत: किंवा पूर्णत: निराकरण करता येते आणि त्या फलदायित्वामुळे ज्ञानतृष्णा वाढत जाते ही विज्ञान आश्रम पद्धतीची खासियत आहे. यात सर्व गोष्टी नैसर्गिकपणे घडत जातात. हेतुविहीन व संदर्भविहीन अशा प्रचलित शिक्षणातल्या जबरदस्तीचा किंवा कृत्रिमतेचा लवलेशही येथे नसतो. जीवनापासून तुटलेल्या, विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या, त्यांना बेकार बनवणाऱ्या आणि त्यांना समाजावर बोजा बनवून ठेवणाऱ्या प्रचलित शिक्षणव्यवस्थेच्या वैधतेला हे पुस्तक पानोपानी अप्रत्यक्षपणे प्रश्नांकित करते. एकप्रकारे तिची कठोर पण मूक समीक्षाच करते. तिला अहिंसक आणि विधायक मार्गाने कल्पक, व्यवहार्य आणि क्रांतिकारी पर्याय देते.

हेही वाचा - हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या लांडग्यांचं पुनरुज्जीवन

विज्ञान आश्रमाच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थिविकास आणि ग्रामीणविकास यांचा अफलातून मिलाफ कसा होतो हे वाचून आपण प्रभावित होतो. समाजासाठी संशोधन होते, समस्यांची सोडवणूक होते, समाजाला उपयुक्त आणि उत्पादक असे काम होते आणि त्याच वेळी विद्यार्थ्याला चरितार्थ, ज्ञानप्राप्ती, बुद्धिविकासाचा लाभ होतो. येथे शिक्षणाला थेट सामाजिक संदर्भ असल्याने आव्हानांना सर्वांनी मिळून सामोरे जावे लागते. सर्वांचे सहकार्य व सहयोग मिळवण्याचे कौशल्य सरावाने प्राप्त होते. विनोबांच्या शब्दांत सांगायचे तर ‘योग, उद्योग व सहयोग' या त्रिसूत्रीचा परिपोष होतो. केवळ व्यक्तिगत कर्तबगारीची, श्रेष्ठतेची किंवा व्यक्तिगत उत्कृष्टतेची कल्पना विरून जाते. याप्रकारे प्राप्त केलेले ज्ञान ही खासगी बौद्धिक संपदा (इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी) न राहता सामूहिक ज्ञानसंपदा बनते.

विज्ञान आश्रमाची शिक्षणपद्धती प्रचलित शिक्षणपद्धतीसारखी संदर्भहीन अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, वर्गखोल्या, कंटाळवाण्या तासिका, घोकंपट्टी, पोपटपंची, अपेक्षित वेळात अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तरांची अपेक्षा करणाऱ्या निरर्थक आणि कालबाह्य परीक्षा, इ.च्या तुरुंगात बंदिस्त नाही. इथे अभ्यासक्रम समाजोपयोगी कामाच्या संदर्भात आकार घेतो. कोणी तरी आधीच निश्चित केलेला व पुस्तकी राहत नाही. ही शिक्षणपद्धती विषयकेंद्री, संकुचित क्षमता/कौशल्यकेंद्री, पाठ्यपुस्तककेंद्री, शिक्षककेंद्री, व्यवस्थाकेंद्री, अधिमान्यताकेंद्री, अनुदानकेंद्री, परीक्षाकेंद्री, पदवीकेंद्री नाही, तर ती समाजाभिमुख, ज्ञानविकासकेंद्री, नवसर्जनकेंद्री, विद्यार्थिविकासकेंद्री आणि ग्रामविकासकेंद्री आहे. ती ग्रामीण भागातल्या दुर्लक्षित, वंचित किंवा नापास विद्यार्थ्याला आत्मविश्वास मिळवून देते, स्वत:च्या पायावर उभे करते. त्यामुळे सामाजिक विषमतेला खतपाणी घालणाऱ्या प्रचलित पद्धतीऐवजी ती सामाजिक समता वाढीस लावते. आश्रमीय जीवनपद्धतीत साधी संयमी राहणी, काटकसर, सहजीवन, शिस्त, नैतिकता व मूल्यनिष्ठा यांचे नकळत संस्कार करते. प्रचलित अर्थाने कितीही ‘लहान' (कमी प्रतीचे!) असलेले काम वैज्ञानिक दृष्टी वापरून कल्पकतेने केले तर ते ‘महान' होते हे शिकवते. कामाची महानता पूर्वग्रहदूषित अभिजनवर्चस्ववादी दृष्टिकोनात नसून कामाच्या सामाजिक उपयोगितेत आणि त्यातून होणाऱ्या ज्ञानप्राप्तीत आहे हे समजल्याने ते करण्यातल्या श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होते आणि ते आनंददायी होतात. वैज्ञानिक पद्धतीचा आग्रह अंधानुकरणाऐवजी स्वतंत्र विचार करण्यास, त्याची स्वतंत्र अभिव्यक्ती करण्यास, कळीचे प्रश्न किंवा शंका उपस्थित करण्यास प्रवृत्त करतो. व्यावहारिक अस्पष्ट (टॅसिट) ज्ञानाकडून सुस्पष्ट (एक्सप्लिसिट) सैद्धांतिक ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो, विद्यार्थ्यांना स्वदिग्दर्शित बनवतो. येथील विशिष्ट शैक्षणिक इकोसिस्टीममध्ये कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला चालना मिळते. जीवनाशी, कामाशी, समस्येशी, समाजाशी आणि ज्ञानाशी एकरूप होणे, ही या शिक्षणपद्धतीची स्वाभाविक निष्पत्ती आहे.

प्रचलित शिक्षणपद्धतीसारखी ही पद्धती युवांना बेरोजगार किंबहुना अरोजगारक्षम बनवत नाही किंवा आपल्या गावातून विस्थापित बनवून मोलमजुरीसाठी शहरातल्या झोपडपट्टीत धाडत नाही; पालक, समाज आणि शासनावरचा बोजा बनवत नाही; तर स्थानिक समाजाचा स्वावलंबी आणि उपयुक्त घटक बनवते हे या पुस्तकात वाचून आपण थक्क होतो. सर्वांत महत्त्वाची बाब ही, की ही शिक्षणप्रणाली विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवू शकते. कारण ती तिच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे स्वत: बहुतांश स्वावलंबी आहे आणि म्हणूनच ती स्वायत्तही आहे. शासकीय-प्रशासकीय सत्तेपासून आणि धनसत्तेपासून स्वायत्त तसेच अभिजन-वर्चस्ववादी अशा ज्ञानसत्तेपासूनही स्वायत्त!

विज्ञान आश्रमातील कामाचे काबाडकष्टात अवमूल्यन होत नाही. एकाच वेळी सर्जनाचा आणि शिकण्याचा (म्हणजेच ‘ज्ञानाच्या गतिमान स्वरूपाच्या' प्राप्तीचा) आनंद मिळतो. काम आणि ज्ञान यांच्या अतूट नात्याचा विद्यार्थ्यांना मनोज्ञ प्रत्यय येतो. एरवी उत्पादक कामात काबाडकष्टातून निर्माण होणाऱ्या शोषणाच्या भावनेऐवजी इथे ज्ञानातून प्रगतीचा, मुक्तीचा आनंद मिळतो. काही औद्योगिक कामगारांमध्ये आढळून येणाऱ्या परात्मभावाऐवजी (एलियनेशन) कामाविषयी आत्मभाव निर्माण होतो. कारण विज्ञान आश्रम विद्यार्थ्यांना कष्टकर्मी या भूमिकेत मर्यादित न ठेवता ज्ञानकर्मी अशी सार्थ ओळख आणि भूमिका देतो. विद्यार्थ्यांची सर्जनशील ऊर्जा संशोधनात (काल्पनिक नव्हे तर) खऱ्याखुऱ्या स्थानिक समस्येची उकल करण्यात, उत्पादनात किंवा सेवा देण्यात कारणी लागत असल्याने आपला समाजाला उपयोग होतो आहे हे पाहून विद्यार्थ्यांना त्याचा रास्त अभिमान वाटतो. त्यांना समाजाशी नाळ जुळल्याचे समाधान मिळते, कनेक्ट जाणवतो, त्यांचे अस्तित्व त्यांना अर्थपूर्ण वाटू लागते.

विज्ञान आश्रम संकल्पनेचे देशात सार्वत्रिकीकरण झाल्यास स्थानिक समस्या सोडवताना स्थानिक युवांना ज्ञानकर्मी बनवणारी ‘लॅब्ज-कम-वर्कशॉप्स' ही ग्रामीण भारताची आधुनिक शैक्षणिक परिसंस्था होऊ शकेल आणि व्हायला हवी. त्यातील प्रयोगशील, विज्ञाननिष्ठ आणि विषमतामुक्त अशा स्वावलंबी समाजाची धारणा करणाऱ्या शिक्षणाची तत्त्वे सर्वत्र रुजायला हवीत असे हे पुस्तक वाचताना वाटत राहते. भारताच्या प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी विज्ञान आश्रम प्रभावीपणे कार्यरत असणे नितांत गरजेचे आहे. त्या तालुक्यातील माध्यमिक शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतने, इ.ना तेथून स्फूर्ती व मार्गदर्शन मिळत राहील. त्यासाठी स्थानिक सामाजिक सहभाग ही पूर्वअट असायला हवी. पण त्याचबरोबर त्यासाठी कौशल्यविकास, ग्रामीण विकास, आदिवासी विकास, लघु-मध्यम उद्योग विकास, उद्योजकता विकास, कृषी विकास, समाजकल्याण, महिला सक्षमीकरण, कामगारकल्याण, मागासवर्ग विकास, इत्यादी शासकीय विभागांच्या योजनांतील पुरेसा निधी या योग्य हेतूसाठी द्यायला हवा.

ग्रामीण युवांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगारक्षम बनवणारे समुचित तंत्रशिक्षण मिळावे, हा डॉ. कलबाग यांच्याकडून घेतलेला वसा समाजापर्यंत पोहोचवण्याची अपार कळकळ लेखकाच्या शब्दाशब्दांत जाणवते. कथनशैली ओघवती असल्यामुळे वाचकाचा उत्साह आणि उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. (शब्दांकनकर्त्या वंदना अत्रे आणि शोभना भिडे यांनाही त्याचे श्रेय आहेच.) सोपी उदाहरणे देत आपल्याला या ज्वलंत सामाजिक प्रश्नावर जागृत करणारी, सहजतेचे देणे लाभलेली लेखनशैली प्रभावी आहे. चपखल शब्दांची, सोप्या भाषेतली, छोटी छोटी पण कमालीची अर्थवाही वाक्ये ग्रामीण जीवनाच्या अनेक समस्या मांडून आपल्याला अस्वस्थ करतात, वैज्ञानिक आणि तात्त्विक संकल्पना अलगद आपल्या मेंदूत उतरवतात आणि विज्ञानाच्या खंबीर पायावर ग्रामीण जीवन आनंददायी करण्याची उमेदही जागवतात.

हे पुस्तक ग्रामीण (आणि शहरीही) युवांनी, पालकांनी, शिक्षकांनी, शिक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी, शिक्षणसंस्थांच्या चालकांनी, शिक्षणविषयक धोरणकर्त्यांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी, मंत्री तसेच लोकप्रतिनिधींनी, समाजपरिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांनी व व्हिसलब्लोअर्सनी तसेच माध्यमांच्या संपादकांनी आवर्जून वाचायला हवे. कारण आजचे विशेषत: ग्रामीण कुटुंबांपुढील, समाजापुढील आणि देशापुढील अनेक जटिल आणि जुनाट (क्रॉनिक) प्रश्न सोडवण्याच्या अनेक ‘तंत्रयुक्ती' या छोटेखानी पुस्तकात आहेत. न्यूनगंडात ढकलणाऱ्या शिक्षणव्यवस्थेच्या जोखडातून ग्रामीण युवांना मुक्त करण्यासाठी हजारो वाचकांना हे पुस्तक प्रोत्साहित करीत राहील.

शिक्षक, पालक, संवेदनशील नागरिक, विचारवंत, साहित्यिक, कलावंत, समाजसुधारक, माध्यमकर्मी, इत्यादींच्या मनात शिक्षणासंबंधीचे अनेक जटिल प्रश्न काहीशा संदिग्ध स्वरूपात वर्षानुवर्षे घर करून राहिलेले आहेत हे आपल्याला जाणवते. त्यांना सतावणारी, अस्वस्थ व चिंताग्रस्त करणारी शिक्षणविषयक गहन कोडी आणि त्यामुळे होत असलेली विद्यार्थ्यांची कोंडी ते आपापल्या आकलनानुसार व्यक्त करीत असतात. त्यात बऱ्याचदा पुरेशी वैचारिक स्पष्टता नसली तरी त्यातली कळकळ निर्विवाद असते. एकंदरच, आजच्या शिक्षणाविषयी समाजात सार्वत्रिक असंतोष दाटलेला आहे हे त्यातून आपल्याला जाणवते. प्रचलित शिक्षणव्यवस्थेविषयी क्वचितच कोणी समाधानी असल्याचे निदर्शनास येते. हे शिक्षण काही थोड्यांना अपवादात्मक यश देते आणि बहुतेकांच्या पदरात हमखास अपयश टाकते हे आपण वर्षानुवर्षे विविध पाहणी अहवालांवरून जाणतो. याचे कारण मुलांच्या निसर्गदत्त अशा व्यक्तिभिन्नतेला, सर्जनशीलतेला आणि तिला प्रतिसाद देत साधण्याच्या व्यक्तीअनुरूपतेला आपल्या शिक्षणात आणि मूल्यमापनात स्थान नाही. सब घोडे बारा टक्के! बहुतेक मुलांच्या वाट्याला येणारे अपयश ही त्यांच्या बेजबाबदारीची किंवा मंद बुद्धीची फलश्रुती नसून त्यांना दिल्या गेलेल्या अशास्त्रीय शिक्षणाचा तो परिपाक आहे, हे शिक्षक व पालकांच्या चटकन लक्षात येत नाही. अल्बर्ट आइनस्टाइन यांनी म्हटल्याप्रमाणे- ‘प्रत्येकजण कुशाग्र बुद्धिमत्तेचा असतो. पण माशाचे यश तुम्ही त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर पारखू लागलात तर तो स्वत:ला मूर्ख समजण्यात आपले सारे आयुष्य व्यतीत करेल!' आज आपल्या देशातील लाखो मुले त्या माशाप्रमाणे अशास्रीय शिक्षणाचे बळी ठरत आहेत. शाळाबाह्य अवस्थेत पुन्हा निरक्षर होत आहेत. न्यूनगंडाने पछाडलेले जीवन जगत आहेत. कोट्यवधी मुले शाळेत जाताहेत पण ती खरेच शिकताहेत का याबद्दल शंका घेण्यास सबळ पुरावे उपलब्ध आहेत. मात्र, ती स्वत:ला आणि समाज त्यांना त्यांच्या शैक्षणिक मागासलेपणाबद्दल दोष देत आहे.

आधुनिक विज्ञानाची कास धरली आणि ज्ञानरचनावादी तंत्रवैज्ञानिक शिक्षणप्रक्रियेचा पुरस्कार केला तर ग्रामीण समाज जीवनातील अनेक कोडी नि:संदिग्धपणे सुटू शकतात आणि युवांची कोंडी फुटू शकते, हा आशावादही या पुस्तकाच्या वाचनातून साकारतो. त्यामुळे नैराश्यात अडकून पडलेल्या अनेकांना त्यातून बाहेर पडून ठोस शैक्षणिक कृती करण्यास हे पुस्तक प्रेरक ठरेल यात शंका नाही. ती ताकद या पुस्तकात समाविष्ट झालेल्या विज्ञान आश्रमाच्या अनुभवसिद्ध तत्त्वज्ञानामध्ये आणि ग्रामीण युवांसंबंधीच्या अपार करुणेमुळे पानोपानी जाणवते. लेखकाने आपल्या सर्जनशील अभिव्यक्तीद्वारे ती द्विगुणित केली आहे.

‘सर्व ग्रामीण युवांसाठी सर्वत्र दर्जेदार तंत्रशिक्षण' हे सध्याच्या भीषण वास्तवात केवळ दिवास्वप्न आहे असे मला वाटत होते. मात्र, हे पुस्तक वाचल्यानंतर मला ती व्यापक लोकजागृतीतून उभी राहू शकेल अशी वैज्ञानिक शक्यता वाटते आहे. लेखकाला त्रिवार धन्यवाद आणि पुढील काळात अशाच समाजोपयोगी ग्रंथलेखनासाठी मनापासून शुभेच्छा!

(समकालीन प्रकाशनाच्या 'कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची' या डॉ. योगेश कुलकर्णी लिखित पुस्तकातून साभार..)

विवेक सावंत







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results