ओशो सांगतात,
एका माणसाने आपल्या तरुण मुलाला एका गुरूंच्या आश्रमात आणून सोडलं आणि तो गुरूंना म्हणाला, “जीवनाचं सत्य याला तुम्हीच शिकवू शकाल, असं मला अनेकांनी सांगितलंय. म्हणून याला तुमच्याकडे आणलंय.”
गुरू म्हणाले, “जीवनाचं सत्य वगैरे मला काही माहिती नाही. मी पहिली तीन वर्षं तलवारबाजी शिकवतो. ती शिकवण्याची पद्धतही वेगळी आहे माझी. मी कधीही, कुठेही, कुठूनही हल्ला करतो. त्याने तो हल्ला परतवून लावायला शिकलं पाहिजे. घाबरू नका. मी पहिल्याच दिवशी तलवार काढणार नाही. पहिले काही दिवस कापूस भरलेल्या तलवारीचा वापर होईल, मग लाकडी तलवार, नंतर खरीखुरी तलवार.
ही फारच अजब पद्धत होती. पण, काही इलाज नव्हता. या गुरूचं फार नाव होतं.
शिष्य आश्रमात एका कुटीत राहू लागला आणि गुरूने त्याचा शब्द खरा करायला सुरुवात केली. शिष्य जेवत असेल, वाचत असेल, काही काम करत असेल, कोणत्याही वेळी गुरू त्याच्यावर कापसाच्या उशीची तलवार घेऊन तुटून पडायचे. हळुहळू शिष्याला गुरूंच्या येण्याची खबर लागू लागली. त्यांच्या पावलांची चाहूल लागू लागली. मग गुरूने लाकडी तलवार वापरायला सुरुवात केली आणि ते मांजरीच्या पावलांनी येऊ लागले. काही तडाखे खाल्ल्यानंतर शिष्याला आता गुरूंच्या श्वासोच्छ्वासावरून त्यांची चाहूल लागू लागली. सहा महिन्यांत अशी वेळ आली की गुरूने कोणत्याही वेळी हल्ला केला तरी त्यांची तलवार शिष्याला स्पर्श करेना.
आता गुरूंनी रात्री झोपेतही त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्याला गाढ झोपेतही गुरूंची चाहूल घेण्याची सवय लागू लागली. सुरुवातीला काही काळ त्याला झोपेत फटके बसले. पण, आता तो झोपेतही गुरूंच्या चाहुलीने जागा होऊन त्यांचा हल्ला परतवायला शिकला.
गुरूंनी आता खरोखरची तलवार वापरायला सुरुवात केली. त्यामुळे तर शिष्याची आंतरिक जागृती चरमसीमेवर पोहोचली. तो तिन्हीत्रिकाळ सजग झाला होता.
एकदा गुरू आणि शिष्य पडवीत दोन टोकांना ग्रंथवाचन करत बसले होते. शिष्याच्या मनात विचार आला, गुरू आपल्यावर त्यांच्या मनात येईल तेव्हा हल्ला करतात. पण, ते स्वतः किती सजग आहेत? आपण तर आता पारंगत झालो आहोतच. आता आपण एकदा त्यांच्यावर हल्ला करून त्यांची परीक्षा घ्यायला हवी.
तत्क्षणी गुरुदेवांनी ग्रंथातून मान वर केली आणि म्हणाले, “बेटा, तसा विचारही मनात आणू नकोस. उगाच स्वतःच्या खांडोळ्या करून घेशील.”
आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचाय, हे शिष्याच्या लक्षात आलं.