आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

ग्राममंगलच्या वर्षाताईंचे विकासघर

  • वृषाली जोगळेकर
  • 04.06.25
  • वाचनवेळ 4 मि.
vikasghar

‘विकासघर’ हा वर्षा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेला एक अनोखा उपक्रम आहे. गेली जवळपास पंधरा वर्षं वाई, पाचगणी आणि करवीर परिसरातील अनेक शाळांमध्ये तो सुरू आहे. वर्षा कुलकर्णी यांनी उपक्रमशील शाळा आणि त्यांचे विविध उपक्रम यावर बराच अभ्यास केलेला आहे. ‘ग्राममंगल’च्या उपक्रमांवर त्यांनी पीएचडी केलेली आहे.

२००९ साली ‘ग्राममंगल’चे रमेश पानसे वाईमध्ये आलेले असताना त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून ‘विकासघर’ ही संकल्पना पुढे आली. 'रमेश पानसे यांनी सुरु केलेला प्रकल्पच वर्षा कुलकर्णी यांनी पुढे नेला आहे. पहिली ते चौथी इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना पक्क्या व्हाव्यात, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी ‘विकासघरा’त विविध उपक्रम राबवले जातात. स्थानिक महिलांच्या मदतीने ते अमलात आणले जातात. वाईच्या भारत विद्यालयात याची सुरूवात झाली. तिथून हा प्रवास वाई आणि पाचगणी परिसरातील ७५ शाळांपर्यंत जाऊन पोचला आहे. अलीकडेच करवीर तालुक्यातील ५० शाळांमध्येही तो सुरू झाला आहे. शिवाय आणखी २५-३० शाळा येत्या शैक्षणिक वर्षात ‘विकासघरा’ची मागणी करत आहेत. सध्या १७५ अध्ययन सहाय्यक महिला विकासघरासाठी काम करत आहेत.

vikasghar

नुसतंच लिहिता-वाचता येणं म्हणजे शिक्षण नाही, तर त्या व्यक्तीमध्ये असलेले गुण-क्षमता फुलवणं, त्या क्षमतेची सर्वोच्च पातळी त्या व्यक्तीला गाठता येणं म्हणजे शिक्षण, हा ‘विकासघर’ संकल्पनेचा पाया आहे.

‘विकासघर’ दररोज शाळा सुरू होण्याआधी दोन तास शाळेच्याच आवारातच सुरू होतं. जोडशब्द लिहायला शिकवणं, शब्दांचे अर्थ समजून घेणं, हस्ताक्षर चांगलं होण्यासाठी मदत करणं, बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकार या गणितातल्या मूलभूत क्रिया सोप्या पद्धतीने समजावणं असे अभ्यासाची गोडी लागण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केले जातात.

याबरोबरच खेळ, कलानुभव, गाणी, नृत्य, विविध जीवनकौशल्य, तसंच भाजी निवडणं, कपड्यांच्या घड्या घालणं अशी घरातली कामं शिकवली जातात. आईच्या कामाचं महत्त्व कळण्यासाठी घरकाम शिकवलं जातं. साधी भाजीची जुडी निवडणं हे किती वेळखाऊ आणि कौशल्याचं कामं आहे हे मुलांच्या लक्षात यायला हवं, हा उद्देश. हे सगळं करताना मुलांना मजा वाटेल यावर भर दिला जातो. मुलंही आनंदाने शिकतात आणि सारी कामं करतात.

गावात आणि आजूबाजूच्या परिसरात अशा अनेक गृहिणी असतात, की ज्यांना भाषा आणि गणित या विषयाच्या मूलभूत संकल्पना मुलांना समजावून सांगता येतील. फावल्या वेळात थोडंफार काम मिळावं असं अनेक महिलांना वाटत असतं. याच महिला ‘विकासघरा’शी सहजपणे जोडल्या गेल्या. त्यांनाच अध्यापन सहाय्यक असं म्हटलं जातं.

vikasghar

या महिलांनी बीएड-डीएड केलेलं नसल्यामुळे शाळेत शिकवण्यासाठी त्यांना थोडं प्रशिक्षण देण्याची गरज असते. त्यांना प्रशिक्षण देणं, विकासघरात कसं शिकवायचं, त्या शिक्षणाचा फायदा नक्की कसा होतो हे बघणं, मुलांच्या कलाने शिक्षण देण्यासाठी मानसिक तयारी करून घेणं, शिक्षणासाठी लागणारी साधनं, उपकरणं तयार करणं, त्यांचा उपयोग सुबकपणे करता येईल हे बघणं, कामातला सफाईदारपणा, अध्ययन क्षमतेनुसार मुलांचे गट तयार करणं, त्यानुसार साधनं दिली जात आहेत ना हे बघणं, अशी अनेक कामं वर्षाताई करतात.

‘विकासघरां’च्या भेटी आणि त्यातून आलेले निष्कर्ष यानुसार पुढचं नियोजन केलं जातं. ‘विकासघरा’त काम करणाऱ्या ताई अधिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले जातात. वर्षाताईंबरोबरच ट्रेनिंग देणारी आणि इतर नियोजनात सहभागी असणारी आणखी ८-१० जणांची टीम आहे.

अध्यापन सहाय्यक असलेल्या या बहुतांश महिला पुरुषसत्ताक घरांमधून येतात. घरातल्या अनेक जबाबदाऱ्या, घरकामं सांभाळून त्या वेळ देतात. हा वेळ देणं त्यांना महत्त्वाचं वाटतं. या कामातून त्यांना ओळख मिळते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळेच कधी पगार उशिरा झाला, मिळाला नाही तरी त्या त्यांचं काम करत राहतात. पैशांपेक्षाही या कामामुळे मिळणारा आत्मविश्वास आणि आदर हा त्यांना जास्त महत्त्वाचा वाटतो.

vikasghar

‘विकासघरा’ला हा टप्पा गाठायला काही काळ जावा लागला. हे विकासघर सुरूवातीला पालक आणि शिक्षक यांना असुरक्षित वाटलं होतं. शाळेला समांतर अशी काही पद्धत हे लोक सुरू करत आहेत का, असा संशय त्यांना येत होता. आपल्या नोकऱ्यांवर याचा विपरीत परिणाम तर होणार नाही ना अशा शंका शिक्षकांच्या मनात येत होत्या. मुलांना दोन तास आधी शाळेत पाठवणं पालकांना त्रासदायक वाटत होतं. पण हळूहळू सगळ्यांनाच ‘विकासघरा’चं महत्त्व पटलं. मुलांना लवकर उठण्याची सवय लागली. मोबाईलचं वेड कमी झालं, अनेक खेळांमध्ये मुलं तरबेज होऊ लागली, अनेक चांगल्या सवयी लागल्या. अभ्यासात त्यांची प्रगती व्हायला लागली. आता शाळा आणि पालक आपणहूनच ‘विकासघरा’ची मागणी करतात. शिक्षकांना आणि पालकांना यासाठी थोडासुद्धा खर्च करावा लागत नाही.

वाई आणि पाचगणी या भागात ‘मॅप्रो’तर्फे, तर करवीर तालुक्यात ‘एमकेसीएल’ यांच्याकडून ‘विकासघरा’साठी आर्थिक सहाय्य दिलं जातं. पालक अथवा शाळांना त्यासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही. अध्ययन सहाय्यकांचे पगार, शैक्षणिक साहित्य वगैरे गोष्टींचे खर्चही याच आर्थिक मदतीतून केले जातात.

करवीर तालुक्यामध्ये गटशिक्षण अधिकारी समरजित पाटील आणि त्यांच्या साहाय्यक मनीषा जाधव यांचं मोलाचं सहकार्य त्यांना लाभत आहे. तसेच वाई-पाचगणी विभागात गटशिक्षण अधिकारी आनंद पळसे यांचंही सहकार्य मिळत आहे. यासोबतच पाचगणी येथील समन्वयक पूजा पांगारे या व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात. ‘विकासघरा’त येणारे पहिली ते चौथीचे विद्यार्थी आणि त्यांना शिकवणाऱ्या ताई यांचं आयुष्य आता बदललं आहे. वर्षाताई कुलकर्णी यांना त्याचं अपार समाधान आहे.

वृषाली जोगळेकर | joglekarvrushali.unique@gmail.com

वृषाली जोगळेकर युनिक फीचर्समध्ये कार्यरत असून समाजाच्या विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान आणि धडपड्या व्यक्तींबद्दल लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 17

सानिका पवार26.11.25
हा उपक्रम खरच खूप छान आहे. मुलांच्या अंगी चांगल्या सवयी लागतील व ते मोबाईल पासून लांब राहतील तसेच त्यांना घरातील कामांचे महत्त्व कळेल. हा उपक्रम सर्वत्र जावा. वर्षाताई कुलकर्णी यांना खूप खूप शुभेच्छा...💐

मनिषा अशोक जाधव .09.06.25
'विकासघर' उपक्रम ही एक प्रभावी आणि प्रेरणादायी शैक्षणिक चळवळ आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणात सहभागी करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कृतींवर भर देण्यात आला आहे. समाजातील अनेक घटकांचा सकारात्मक सहभाग हे या उपक्रमाचे मोठे यश आहे.

सुदाम बाटे 06.06.25
अप्रतिम उपक्रम आहे हा. आजच्या या मोबाईलच्या युगात मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून खेळाच्या माध्यमातून शिक्षणाकडे वळवणे व मुलांचा शारिरीक व बौद्धिक विकास करणे हि काळाची गरज आहे आणि नेमकी तीच गरज ओळखून वर्षाताईनी हा अप्रतिम उपक्रम चालु केला त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे या विकास घरामध्ये माझी सौभाग्यवती शुभांगी बाटे हि अध्ययन सुपरवायझर म्हणून काम करत आहे. याचबरोबर घरची सगळी जबाबदारी पार पाडत या विकास घरात काम करणाऱ्या सर्व ताईंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच सर्व ताईंना व आपल्या विकास घर प्रकल्पास भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐

Saee kanade06.06.25
Masta Varsha mavshi 👍👌👌

सई कुलकर्णी हातेकर 06.06.25
कौतुकास्पद ..... आणि सध्याच्या काळात अतिशय गरजेचा उपक्रम..... मी स्वतः महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करताना मुलांमधे मूलभूत कौशल्ये वेळीच विकसित व्हायला हवी, अशी निकड जाणवते

दीपक जगदाळे 06.06.25
वर्षा कुलकर्णी (हर्डीकर) मॅडम अत्यंत उपक्रमशील आहेत. सतत वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करून, संशोधन केले आहे . प्राथमिक शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी यांचा जवळून अभ्यास केला आहे. पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. विकास घर प्रकल्प हा अत्यंत उपयुक्त प्रकल्प आहे. ग्रामीण भागातील अभ्यासात मागे असणारे विद्यार्थी आता सकाळी दोन तास शाळेत येतात आणि वेगवेगळ्या ॲक्टीव्हीटीज पूर्ण करतात. अगदी आनंदाने ताईंकडून शिकत असतात. माझ्या विद्या मंदिर पाडळी बुद्रुक ता. करवीर या शाळेतही विकास घर प्रकल्प सुरू आहे. इथे वर्षाताईंच्या मार्गदर्शनाखाली सोनाली पाटील या मुलीने(ताईने) खूप सुंदर काम केले आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास होत आहे. वर्षा ताईंच्या या आगळ्यावेगळ्या प्रकल्पाबाबत वृषाली जोगळेकर यांनी अत्यंत सुंदर आणि वास्तव लेखन केले आहे त्यांना धन्यवाद आणि वर्षा कुलकर्णी यांना खूप खूप शुभेच्छा..!

Kiran06.06.25
आगळा वेगळा उपक्रम समजात चागलं काही चालू आहे ते प्रेरणा देऊ शकते असा उपक्रम उत्तम त्याची माहिती देणाऱ्या वृषाली ताई ना ही मनपूर्वक धन्यवाद

गीता राशीनकर 06.06.25
विकास घर हा एक चांगला उपक्रम आहे त्यामुळे लहान मुलांमधील सुप्त क्षमतांना वाव मिळून त्यांचा विकास होऊ शकतो वृषाली जोगळेकरांनी उत्तम लेखन केलेले आहे

सौ.राजश्री भगवान खाडे 06.06.25
खूप छान उपक्रम.पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

Dr sharvari Sarang Belapure 06.06.25
मी वर्षाताई बरोबर थोडे काम केले आहे.शिक्षण क्षेत्रातील अडचणी आपण सर्वांनाच माहीत आहेत.त्या दूर करण्यासाठी ह्या सातत्याने,मनापासून खूप कष्ट घेत आहेत.जास्तीत जास्त पालकांनी ह्या कामाला वेळ देऊन हे काम पुढे कसे जाईल हे बघितले पाहिजे.आपल्याच मुलांसाठी हा गोवर्धन पर्वत ताईंनी उचलला आहे.आपापल्या क्षमते नुसार आपण सर्वांनी याला हातभार लावुया.

वसुधा हर्डीकर 06.06.25
वर्षाताईचे विकासघर हा एक उत्तम प्रकल्प चालू आहे. मी एक रिटायर शिक्षिका असल्यामुळे उत्सुकता म्हणून शिक्षिकेना दिले जाणारे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष फिल्ड वर केले जाणारे काम जवळून पहिले आहे. अतिशय कौतुकास्कपद आणि अभिमानास्पद असे हे कार्य आहे. विकासघर हे नाव ही इतके योग्य आहे कारण या प्रकल्पमध्ये मुलांचा विकास hot आहे आणि राष्ट्राच्या विकासासाठी भावी पिढी घडत आहे. आणि लेख सुद्धा abhyas पूर्ण लिहिला आहे

अतुल दत्तात्रय अयाचित 06.06.25
खूपच छान आम्हाला अभिमान आहे त्या आमच्या वाहिनी आहेत

अर्पिता योगेश पवार06.06.25
वर्षाताई आणि वृषालीताई या दोघींचे ही खूप खूप अभिनंदन...समाजाचे आणि विशेषतः समाजातील महत्त्वाचा अंग असलेल्या महिलाना शिक्षित करून त्यांच्या कडून लहान मुलांसाठी सुजाणतेने काम करून घेणं,सातत्याने कामाचा दर्जा सुधारत जाणं हे वर्षाताई चे कौशल्य आहे.या साठी खूप खूप शुभेच्छा...आणि या कामाची दखल घेत समाजा पर्यंत ते पोहचवणे हे ही तितकेच महत्वाचे आहे.वृषाली ताई तुझे ही खूप खूप आभार.... धन्यवाद!!

Ila Jogi 05.06.25
खूप छान उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेलं. 🙏🙏

ऋद्धी उमेश कुलकर्णी 05.06.25
वर्षा खुप अप्रतिम काम!

सचिन पाटील 05.06.25
खूपच छान आणी समाजपयोगी काम आहे हे. अभिनंदन हे काम करणे व सरावंसमोर आणणे. 👏👏

नागेश शंकर मोने 04.06.25
चांगला लेख.

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results