साताऱ्यातील खोजेवाडी गावच्या जिल्हा परिषद शाळेतील एक तरुण शिक्षक कृष्णात जाधव. त्यांच्या डोक्यातून एक भन्नाट कल्पना आली. मुलांनी भरपूर वाचायला तर हवं पण पुस्तकं घेणं परवडत नाही म्हणून वर्तमानपत्राच्या रद्दीपासूनच ग्रंथालय उभं करावं अशी शक्कल या धडपड्या शिक्षकाच्या डोक्यात आली. त्यातून या शाळेच्या मुलांनी वर्तमानपत्राच्या रद्दीपासून ग्रंथालय तयार केलं. ही मुलं रोज चार-पाच पेपर वाचतात. त्यातल्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या बातम्या, लेखांची कात्रणं काढतात. त्याच्या स्वतंत्र वह्या तयार करतात. या ग्रंथालयामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडत असून त्यांचं वाचनही दिवसेंदिवस वाढत आहे. या ग्रंथालाय उपक्रमासाठी त्यांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिपही मिळाली. शिवाय वाचनाशी संबंधित स्पर्धा, भेटी, चर्चा ही कामंही मुलं आवडीने करतायत.
अशीच एक शाळा जालन्यातल्या श्रीराम तांड्याची. या शाळेत येणारी मुलं वीटभट्टी आणि उसतोड कामगारांची. रोजगारासाठी सारखं स्थलांतर करावं लागल्यामुळे मुलांची शाळेतील उपस्थिती २५ पेक्षाही कमी असायची. त्यामुळे जगदीश कुटे या स्थानिक शिक्षकाने इथल्या सहा मुलांना दत्तक घेतलं. मुलांच्या शिक्षणाचा, कपड्यांचा, खाण्या-पिण्याचा खर्च मी बघतो, प्रवासालाही पैसे देतो, असं मुलांच्या आई-वडिलांना सांगितलं. शिवाय त्यांनी शिक्षणाची पद्धत बदलली. मुलांना हस्त-खेळत गोष्टी शिकवण्याचे नाना प्रयत्न केले. याने शाळेची परिस्थिती बदलली. शाळेची विद्यार्थी संख्या आता १५० पेक्षा जास्त आहे. जगदीश कुटे यांनाही फेलोशिप मिळाली. त्यांनी फेलोशिपमध्ये मिळालेले पैसे या मुलांसाठीच खर्च केले.
२०२० च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी काही उद्दिष्टं ठरवून देण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षकांनी शिकवण्याच्या पद्धतीत आवश्यक ते बदल करणं, नवीन ज्ञाननिर्मितीचा प्रयत्न करणं, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं आणि विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील शोधक वृत्ती वाढवणं याचा प्रामुख्याने समावेश आहे.
हाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने शरद पवार फेलोशिप इन एज्युकेशनची सुरुवात केली. २०२२ पासून सुरू झालेल्या या फेलोशिप अंतर्गत शैक्षणिक कामात नाविन्याचा ध्यास असणाऱ्या शिक्षकांचा शोध घेतला जातो. दरवर्षी महाराष्ट्रातील अशा ४० शिक्षकांना ही फेलोशिप दिली जाते. बालशिक्षणात काम करणाऱ्या १०, प्राथमिक विभागासाठी २० आणि माध्यमिक विभागासाठी १० शिक्षकांना ही फेलोशिप मिळते. आतापर्यंत शंभरहून अधिक शिक्षकांना ही फेलोशिप मिळालेली असून त्याचा फायदा शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा, गावकरी या सर्वांनाच होताना दिसत आहे.
दरवर्षी ऑगस्ट महिन्यात या फेलोशिपची घोषणा होते. साधारण २ महिन्यांत महाराष्ट्रभरातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटांतील उपक्रमशील आणि धडपड्या शिक्षकांकडून अर्ज मागवण्यात येतात. आलेल्या अर्जांची व्यवस्थित छाननी करून ४० शिक्षकांची फेलोशिपसाठी निवड केली जाते. या ४० शिक्षकांना त्यांनी निवडलेल्या विषयात मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी काही कार्यशाळा घेतल्या जातात. यामध्ये तो तो उपक्रम कसा राबवायचा यावर सांगोपांग चर्चा केली जाते. सोबतच प्रत्येक शिक्षकाला मार्गदर्शक म्हणून शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीशी जोडून दिलं जातं. सद्यस्थितीत डॉ ह. ना. जगताप, डॉ वृषाली देहडराय, किशोर दरक, डॉ माधव सूर्यवंशी, अजित तिजोरे, तुषार म्हात्रे, मच्छिन्द्र बोऱ्हाडे हे तज्ज्ञ मार्गदर्शक फेलोशिपप्राप्त शिक्षकांशी वेळोवेळी संवाद साधतात. बालशिक्षण फेलोशिपसाठी नीलेश निमकर हे प्रमुख मार्गदर्शक आहेत.
शिक्षकांना त्यांच्या कामात उपयोगी पडेल असा अभ्यासदौराही फेलोशिप काळात काढला जातो. या फेलोशिपचे मुख्य समन्वयक म्हणून डॉ विवेक सावंत काम पाहतात. डॉ वसंत काळपांडे आणि दत्ता बाळसराफ यांच्या अनुभवपर सूचनांचा फायदाही फेलोशिपच्या पूर्ण कालावधीत शिक्षकांना होतो. शिक्षकांच्या कार्यशाळेचं नियोजन, त्यासाठी आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देणं आणि त्यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी योगेश कुदळे पार पाडतात.
निवड झालेल्या शिक्षकांना वर्षभराच्या कामासाठी ६० हजार रुपयांची फेलोशिप मिळते. यामध्ये प्रत्यक्ष काम, भटकंती, लागणाऱ्या संसाधनांचा खर्च या सगळ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांप्रति प्रेमभावना असलेले अनेक शिक्षक या फेलोशिपच्या माध्यमातून समोर येताहेत. मागील तीन वर्षांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्हणजे ग्रामीण, शहरी, निमशहरी, दुर्गम वाड्या-वस्त्या आणि अगदी आदिवासी पाडे इथल्या अनेक शिक्षकांना या फेलोशिपचा फायदा झाला आहे.
जानेफळ हे गाव बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यातलं. या गावात नेहमीची पाणीटंचाई. गावातील अनेक मुलं-मुली फक्त पाण्यासाठी लांब अंतरावर जावं लागतं म्हणून शाळेला दांडी मारायचे. गावातल्या सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक नंदकिशोर बोकाडे यांनी ही परिस्थिती बदलायचं ठरवलं. शाळेतल्या मुलांना सोबत घेऊन पाण्याच्या बचतीचे वेगवेगळे प्रयोग त्यांनी करून बघितले. उद्देश होता जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापन. पावसाचं पाणी साठवणं असूदे किंवा रोजच्या वापरातील पाण्याचा अपव्यय टाळणं. वर्षभरातच गावच्या पाण्याची अडचण मिटली. आता पाणी नाही म्हणून गावाबाहेर जाणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी झालं. शाळेला दांडी मारणारी मुलंसुद्धा नियमित शाळेत येऊ लागली.
वर्षा गायकवाड या बारामतीमधील शारदाबाई पवार प्राथमिक विद्यामंदिरच्या शिक्षिका. त्यांनी लहान मुलांना स्वयंपाकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. किचन कॉर्नर हा परदेशात चालणारा उपक्रम त्यांनी समजून घेतला. मुलांना वस्तू हाताळायला दिल्याशिवाय त्या वस्तूंविषयीची भीती कमी होणार नाही, हे वर्षा गायकवाड यांना समजलं होतं. आपल्याकडे स्वयंपाक करणं हे मुलांचं काम नाही अशी नकळत शिकवण लहानपणापासून दिली जाते. त्याला छेद देत त्यांनी मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, सरबत, सलाड आणि स्वतःच्या डब्यासाठी पौष्टिक खाऊ बनवायला शिकवलं.
गजानन निवळे हे ठाणे महानगरपालिकेच्या विशेष शाळेत शिकवणारे शिक्षक. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ते गेली अनेक वर्षं काम करतायत. दिव्यांग मुलांच्या शारीरिक हालचालींना मर्यादा असतात. दैनंदिन जगण्यातील काम करत असताना त्यांना बऱ्याचदा कुणाचातरी आधार घ्यावा लागतो. अशा मुलांना ओरिगामी शिकवून त्यांच्यातील शिथिलता कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या प्रयत्नामुळे दिव्यांग मुलांच्या एकाग्रतेत वाढ झाली. त्यांच्या हालचाली सुधारल्या आणि त्यांच्यातील आत्मविश्वासही वाढला.
शिक्षकांचं हे काम समाजासमोर येतं तेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातही सकारात्मक बदल घडून येतो, हे अनेक उदाहरणांतून दिसून आलं आहे. फेलोशिपच्या निमित्ताने शिक्षक-पालक, शिक्षक-विद्यार्थी आणि शिक्षक-समाज यांच्यात विचारांची देवाणघेवाण वाढली आहे. मुलांमधील कुतूहल आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड वाढल्यामुळे हा प्रयोग आनंददायी शिक्षणाचा बनला आहे. एका ठिकाणी चांगला चाललेला शैक्षणिक प्रयोग दुसऱ्या ठिकाणी राबविण्याच्या दृष्टीनेही शिक्षक प्रयत्न करताहेत. एकूणातच उपक्रमशील शिक्षकांचं जाळं या फेलोशिपच्या निमित्ताने महाराष्ट्रभरात तयार होत आहे.
२०२५ सालासाठीच्या फेलोशिपसाठी अर्ज करण्याची मुदत सुरू झाली असून तुमच्या संपर्कातील धडपड्या शिक्षकांना याविषयी नक्की कळवा.
अधिक माहितीसाठी संपर्क – योगेश कुदळे - 9850122713
फेलोशिपला अर्ज करण्यासाठी लिंक -
