समजा, तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज आणि स्वभाव वापरून एक एआय मॉडेल तुम्हाला घरबसल्या बनवता आलं तर? सध्या एआय तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने प्रगती करतंय, की हा दिवस देखील कदाचित दूर नसेल. पण असं तंत्रज्ञान आलं तर खरंच त्यात हुबेहूब मानवी भावभावना असेल? असं एआय मॉडेल हाडामांसाच्या माणसांसारखं बोलू-चालू शकेल? इतकंच काय, तर ते कुटुंबाला आणि मातृत्वाच्या भावनेलाही पर्याय ठरेल? या आणि अशा अनेक प्रश्नांवर भाष्य करतो 'उत्तर' नावाचा ताजा मराठी चित्रपट.
क्षितीज पटवर्धन हे लेखक म्हणून ‘ताली’, ‘सिंघम अगेन’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांशी जोडलं गेलेलं नाव. ‘उत्तर’ हा चित्रपट म्हणजे त्याचं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल.
निनाद आणि उमा या मायलेकाच्या आयुष्याची ही कथा आहे. निनाद हा एक तरुण 'एआय' इंजिनिअर आहे. एका प्रतिष्ठित आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेसाठी तो एक प्रोजेक्ट बनवतोय. हातात मोबाईल आणि कानाला हेडफोन्स लावून त्याने स्वतःला डिजिटल कुंपणात अडकवून घेतलंय. त्याला त्याची प्रायव्हसी प्राणप्रिय आहे. आपल्या आईचं बोलणं ऐकून घेण्याची, तिच्याशी संवाद साधण्याची उसंतही त्याच्याकडे नाही. शिवाय एका जुन्या कारणाने निनादच्या मनात आईबद्दल रागही आहे.
निनादची आई उमा ही आकाशवाणीमध्ये निवेदिका आहे. तिचा आवाज जगाला ऐकू जातो, पण मुलगा तिचं मन ओळखू शकत नाही याची खंत तिच्या मनात आहे.
या दोघांच्या आयुष्यात एक मोठं संकट येतं. तेव्हा तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला निनाद त्याला कसं तोंड देतो? तो हतबल होतो का? उमा या परिस्थितीतून मार्ग काढताना निनादला नक्की कोणतं 'उत्तर' देते? या प्रश्नांची उकल म्हणजे हा चित्रपट. या कथेला सायफायची जोड दिली गेलीये. पण त्यापलीकडे जाऊन हा चित्रपट आजच्या काळातल्या कौटुंबिक संबंधावर भाष्य करतो.
या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे रेणुका शहाणे यांचा अभिनय. एक साधी पण बाणेदार आई त्यांनी सहजतेने साकारली आहे. पडद्यावरची ही आई प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःच्या आईसारखी वाटू लागते. आईचं पात्र लिहितानाच क्षितीजच्या डोळ्यासमोर रेणुका शहाणे होत्या. त्यांनी साकारलेली आई ही प्रेमळ तर आहेच, पण ती आजच्या काळाशी जुळवून घेणारी आणि प्रसंगी मुलाला टोकणारी स्मार्ट आईदेखील आहे.
अभिनय बेर्डेने टेक्नोसॅव्ही, बंडखोर निनादची भूमिका साकारलीये. Gen-Z मुलाच्या मनातली खदखद आणि कामाची ऊर्मी त्याने उत्तमरीत्या मांडलीये.
हे सगळं असलं तरी आई आणि मुलगा या नात्यात असणारी काळजी आणि प्रेमदेखील चित्रपटात वेळोवेळी अधोरेखित होत राहते. दोघांतील प्रेम आटून गेलंय असं वाटत नाही. दोन्ही व्यक्तिरेखांची काळजी करण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी आहे. चित्रपटातील उमा आणि निनादच्या काही प्रसंगातून आपल्याला हे सतत दिसत राहतं.
निनादला फार मित्रमंडळी नाहीत. क्षिप्रा ही त्याची एकमेव जवळची मैत्रीण. ही भूमिका हृता दुर्गुळेने केली आहे. निर्मिती सावंत यांचीही चित्रपटात एक विशेष भूमिका आहे. ही दोन्ही पात्रं कथेला भावनिक स्थैर्य देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. 'माणसाला माणसाची गरज असतेच' अशी जाणीव करून देणारा एक हृद्य प्रसंग निर्मिती सावंत आणि रेणुका शहाणे यांनी सुंदररीत्या निभावलाय.
पटकथेतील शांतता आणि विराम ही या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद आहे. या चित्रपटाची कथा धीमेपणाने पुढे सरकते. अशा ठेहरावामुळे पडद्यावरील प्रसंग, त्यातील व्यक्तिरेखांची होणारी घालमेल समजून घेणं सोपं जातं. दोन संवादांच्या मध्ये प्रेक्षकाला स्वतःशी संवाद साधायला वेळ मिळतो.
कथेत तांत्रिक जग आणि मानवी भावना यांचा सुंदर मेळ घातलेला आहे. विशेषतः चित्रपटातील 'एआय' पात्राचा कल्पकतेने वापर केला गेलाय. चित्रपटात अनेक भावनिक प्रसंग आहेत. पण चित्रपटाचं पार्श्वसंगीत अंगावर येत नाही, उलट ते कथेला पूरक असं आहे. पात्रांच्या वेशभूषेतही साधेपणा आहे. या सर्व गोष्टींमुळे ही कथा आपल्यापैकीच कुणाचीतरी आहे असं वाटतं.
दुसऱ्या बाजूला चित्रपटात एआय, एमएल (मशीन लर्निंग) यांसारखे तांत्रिक विषय येतात. काही वेळा संवादांमध्ये तांत्रिक शब्दांचा वापर जास्त वाटू शकतो. कदाचित सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी हे तांत्रिक संदर्भ किचकट ठरू शकतात. पण त्यामुळे चित्रपटाची कथा मार खातेय असं वाटत नाही. दुसरं, म्हणजे ही संपूर्णतः सायफाय फिल्म नाही याची नोंद घ्यायला हवी. चित्रपटातले तंत्रज्ञानाचे संदर्भ हे कथेला पूरक म्हणून वापरले आहेत. त्यामुळे हॉलिवूड सिनेमांत दाखवल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची आणि या चित्रपटातील तंत्रज्ञानाची तुलना करणं चुकीचं ठरेल. हा चित्रपट पूर्णपणे संवादांवर अवलंबून आहे. ज्यांना ॲक्शन किंवा मेलोड्रामा आवडतो, त्यांना हा सिनेमा संथ वाटू शकतो.
या चित्रपटाच्या कथेमागची कथासुद्धा तितकीच रंजक आहे. २०१७ साली क्षितीजला ही कथा सुचली. कथेत एआय होतं. ज्या काळात एआय सर्वसामान्यांना उपलब्ध नव्हतं तेव्हा कथेत अशा प्रगत तंत्रज्ञानाविषयी अनेक संदर्भ होते. क्षितीज आणि त्याचे मित्र विनायक पाचलग यांनी २०१७ मध्ये जयंत नारळीकर यांची भेट घेऊन त्यांना कथा दाखवली. नारळीकरांना ही कथा आवडली. त्यांनी कथेत काही बदल सुचवले. विज्ञानाच्या मदतीने मानवी नातेसंबंधांची वीण कशी घट्ट करता येईल असा विचार करून कथेवर काम केलं गेलं. आता सात वर्षांनी ही कथा चित्रपटरूपात प्रेक्षकांच्या समोर आली आहे. हा चित्रपट जयंत नारळीकर यांनाच समर्पित केला गेलाय.
‘उत्तर’ हा चित्रपट काळाच्या पुढचा विचार मांडणारी आजची गोष्ट सांगतो. हा फक्त एक मनोरंजक चित्रपट नाही, तर तो मुलांनी आपल्या पालकांना गृहित धरण्याच्या प्रवृत्तीवर केलेली एक मार्मिक टिप्पणी आहे. सध्याच्या चित्रपटांतील गोंगाट, हिंसा आणि बटबटीतपणाला कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट 'मच निडेड ब्रेक' ठरतो. थोडक्यात सांगायचं तर, ज्याला आजच्या डिजिटल युगात हरवलेली नाती पुन्हा शोधायची आहेत, त्या प्रत्येकासाठी ‘उत्तर’ हे एक उत्तम उत्तर आहे.
तुम्हाला नातेसंबंधातील गुंतागुंत, आजच्या काळातील तंत्रज्ञानाचा अतिवापर आणि एक उत्तम कौटुंबिक कथा अनुभवायची असेल तर हा चित्रपट चुकवू नका. खासकरून जेन-झी मंडळींनी हा चित्रपट आवर्जून पाहायला हवा. चित्रपट संपल्यावर थिएटरमधून बाहेर येताना तुम्हाला तुमच्या आईची आठवण येईल आणि तुम्ही तिला नक्की फोन कराल, हेच या चित्रपटाचं यश आहे.
मन्सूर मुल्ला
मन्सूर युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून डिजिटल मीडिया हा त्याचा आवडीचा विषय आहे.
