आपल्यापैकी बहुतेकांनी अनुभवलेल्या एका गोष्टीपासून सुरुवात करू. आपण नवीन स्मार्ट फोन घेतला की आधी सुरक्षिततेसाठी परवलीचा शब्द देऊन फोनला कुलूपबंद करतो. अनेकजण आपला चेहरा किंवा बोटांचा ठसा याद्वारेही पक्कं कुलूप लावतात. चेहरा किंवा बोटांचा ठसा ओळखण्याचं कृत्रिम मज्जातंतूंचं जाळं फोनमध्ये अस्तित्वात असतं, त्याला आपली ओळख करून घ्यायला आपण ‘शिकवतो', हे आपल्याला समजतही नाही.
आधीच्या लेखात म्हटलं तसं, या जाळ्यातील शिकाऊ घटक संख्येच्या स्वरूपात असतात. नव्या फोनमधले हे घटक आपल्याला ओळखण्यासाठी बदलले जातात आणि तयार होते आपली एक नवीन सांख्यिक ओळख. ती आपल्या या नव्या फोनमध्ये साठवली जाते.
सांख्यिक ओळख म्हणजे नेमकं काय हे बघू.
आपण स्वत: वेगवेगळ्या संख्यांशी जोडलेलं असणं हे आपल्या खूप सवयीचं असतं. उदा. आपली जन्मतारीख किंवा आधार क्रमांक ही आपली कायमस्वरूपी सांख्यिक ओळख असते, तर वर्गक्रमांक किंवा बस/ट्रेन/विमानप्रवासातला आसनक्रमांक अशी ओळख तात्पुरती असते. काही तास ते एक वर्ष इतकंच त्या ओळखीचं आयुष्य. इंटरनेटवरच्या भासमान जगातही तिथल्या आपल्या हालचालींमुळे आपली अशीच ओळख निर्माण होते. ती निर्माण करण्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान कारणीभूत असतं. ती ओळख सांख्यिक असण्याचं कारण असं, की हे तंत्रज्ञान संगणकावर चालतं, आणि अगदी मूलभूत पातळीवर संगणकाची भाषा ही सांख्यिक असते.
आपण कुठल्या वेबसाइटवर किती वेळा जातो, तिथे किती वेळ घालवतो, आपण ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तू, या सगळ्याला एक सांख्यिक मूल्य दिलं जातं. आपली ही ओळख बहुआयामी असते. आपलं लिंग, वय, आपण विवाहित आहोत की नाही, आपल्याला अपत्य आहे की नाही, हे आपण स्पष्टपणे सांगितलं नाही तरी इंटरनेटवरच्या आपल्या हालचालींवरून याचं ‘भाकीत' केलं जातं. भाषेतील शब्दांचे अर्थ आणि त्यांचं वर्गीकरण हे जसं संदर्भानुसार केलं जातं तसंच आपलं एक व्यक्ती म्हणून वर्गीकरण केलं जातं.
या वर्गीकरणाचे अनेक फायदे आहेत.
उदा. ऑनलाइन संगीत ऐकणं. वेबसाइट किंवा एखाद्या ॲपवर कुठल्याही प्रकारचं संगीत एकाच ठिकाणी उपलब्ध असणं ही इंटरनेटमुळे झालेली मोठी सोय आहे. आपण आपल्या आवडत्या गाण्यांची यादी तयार करू शकतो, ती यादी हवी तशी बदलू शकतो. आपली संगीत ऐकण्याची आवड, त्यातलं वैविध्य आणि पद्धत (म्हणजे कुठल्या वेळेला कुठल्या प्रकारातली गाणी) याला एक संख्यात्मक ओळख देऊन आज अशी मिश्र गाण्यांची यादी आपोआप निर्माण केली जाते. आपापल्या आवडीनुसार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, चित्रपट संगीत ते पाश्चिमात्य संगीत असं सर्व प्रकारचं संगीत एकाच यादीत नांदू शकतं. हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानानेच शक्य होतं.
या तंत्रज्ञानामुळे मला स्वत:ला माझ्या लहानपणचे मित्र-मैत्रिणी सापडले. यामागेही सांख्यिक ओळखच असते. हे तंत्रज्ञान आपल्या सांख्यिक ओळखीला इतरांबरोबर ताडून पाहतं, आपण पूर्वायुष्यात कोणाशी संबंधित असू शकतो याचा एक आलेख काढतं. जगातील कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये सरासरी सहा कड्यांचं अंतर असतं (सिक्स डिग्रीज ऑफ सेपरेशन) असं मानलं जातं. उदाहरणार्थ, आपण आणि आपल्या भावाच्या मित्रात दोन कड्यांचं अंतर असतं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाद्वारे काढलेल्या आलेखाने फेसबुकसारख्या समाजमाध्यमांतल्या व्यक्ती-व्यक्तींमधले अशा प्रकारचे संबंध आपोआप शोधले जातात. त्यातून आपल्याला जुन्या ओळखी सापडतात किंवा जुन्या ओळखींची नव्याने ओळख होते.
हेही वाचा - कृत्रिम बुद्धिमत्तेचं सीमोल्लंघन
मुख्यत: ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या जाहिरातींसाठी अशा वर्गीकरणाचा उपयोग होतो. जाहिरात ही पासष्टावी कला मानली जाते. इंटरनेटपूर्व काळातही जाहिरातनिर्मिती करताना वेगवेगळ्या भाषा बोलणारी माणसं, त्यांची संस्कृती, आवडीनिवडी यांचा विचार नेहमीच केला जात असे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे फरक पडला तो असा, की कोणत्याही व्यक्तीच्या इंटरनेटवरील वावरामुळे त्या व्यक्तीचा वैयक्तिक कल बारकाईने ओळखणं सहज शक्य होऊ लागलं. कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान वापरून, व्यक्तीची सांख्यिक ओळख तयार करून, त्या व्यक्तीला लक्ष्य करणाऱ्या जाहिराती निर्माण करून तिच्यापर्यंत त्या पोहोचवणं यात मोठा फायदा आहे, हे ई-कॉमर्स कंपन्यांच्या लक्षात आलं.
आपण एखादी वस्तू ऑनलाइन खरेदी करतो आणि अचानक आपल्याला त्या वस्तूशी संबंधित किंवा समांतर इतर वस्तूंच्या जाहिराती दिसू लागतात. म्हणजेच यात फक्त आपल्याला लक्ष्य केलं जातं. हे कसं घडतं? यात कृत्रिम बुद्धिमत्तेचं एक ‘शिफारशी तंत्रज्ञान' (रेकमेंडर सिस्टीम) कारणीभूत असतं. हे तंत्रज्ञान कसं काम करतं ते बघू.
कोणत्याही दोन संख्या किती जवळजवळ आहेत ते वजाबाकीने समजतं. त्यांची वजाबाकी जेवढी शून्याच्या जवळ तेवढ्या त्या संख्या एकमेकांजवळ असतात. यामागे साधं अंकगणित आहे. अशाच प्रकारे, समाजमाध्यमांवर आपली सांख्यिक ओळख ज्यांच्याशी सगळ्यात जवळ असेल अशा सगळ्यांबरोबर एका अल्गोरिदमद्वारे आपला एक गट तयार केला जातो. हा गट देश, प्रदेश, भाषा, वय, लिंग यांतील कुठल्याही एक किंवा अनेक घटकांनुसार केलेला असू शकतो. उदा. वय ही जरी एक संख्या असली तरी हे तंत्रज्ञान त्याचे अनेक कंगोरे आत्मसात करतं. म्हणजे एखादी व्यक्ती तीस वर्षांची असेल तर ती मॅरेथॉन पळणारी असू शकते किंवा विशिष्ट व्यवसाय सुरू करण्यात गुंतलेली असू शकते किंवा दोन्ही गोष्टी करणारी असू शकते. हे तंत्रज्ञान त्या व्यक्तीच्या वयाची अशी ‘बहुसंख्यी' ओळख शिकतं.
अशा पद्धतीने निर्माण केलेल्या गटातील माणसं सांख्यिक दृष्टीने सारखी असली तरी त्यांच्यातही फरक असतातच. ते फरक ओळखण्यासाठीही एक प्रणाली असते. ही प्रणाली निव्वळ वजाबाकीवर आधारित नसते, तर त्यासाठी इतर अनेक प्रगत गणिती तंत्रं वापरली जातात. या फरकानुसार त्या गटातील व्यक्तींना ‘लक्ष्य' करता येईल अशा वस्तू ठरवल्या जातात. त्या व्यक्तीच्या अलीकडच्या खरेदी-पॅटर्ननुसार (हा पॅटर्न त्या व्यक्तीच्या सांख्यिक ओळखीत अंतर्भूत असतो.) तिला कुठल्या वस्तू आवर्जून दाखवायच्या हे शिफारशी तंत्रज्ञानाद्वारे ठरवलं जातं. एक सोपं उदाहरण बघू. ‘अ' आणि ‘ब' या दोन व्यक्ती एकाच गटात आहेत. या दोन व्यक्तींनाही इतिहासाची पुस्तकं आवडतात. पण ‘ब'ला मानववंशशास्त्रसुद्धा आवडतं, तर ‘अ'ला तेदेखील आवडण्याची शक्यता असेल, असं भाकीत करून तशा प्रकारची पुस्तकं जाहिरात म्हणून ‘अ'ला दाखवली जातात. हे उदाहरण ‘सोपं' यासाठी, की हे शिफारशी तंत्रज्ञान यापेक्षाही सूक्ष्म फरक ओळखण्यास सक्षम असतं. अशी वैयक्तिकदृष्ट्या जाहिरात करण्याची पद्धत अतिशय प्रभावी ठरलेली आहे. मेटा, गुगल, ॲमेझान यांसारख्या कंपन्यांची आर्थिक भरभराट होण्यामागे हे एक महत्त्वाचं कारण आहे.
या शिफारशी तंत्रज्ञानामुळे काही गमती झाल्या आहेत, तर काही थोड्या गंभीर घटनाही घडलेल्या आहेत.
एक तरुण त्याच्या मैत्रिणीला लग्नासाठी मागणी घालणार होता. त्यासाठी त्याने अंगठी विकत घ्यायचं ठरवलं आणि वेगवेगळ्या वेबसाइट्सवर तसा शोध सुरू केला. त्याची ही मैत्रीण कधी कधी स्वत:च्या कामासाठी त्याचा संगणक वापरायची. त्यात तिला अंगठीच्या जाहिराती प्रकर्षाने दिसू लागल्या. त्यावरून तिला अंदाज आला. त्याने तिला लग्नाची प्रत्यक्ष मागणी घातली, तेव्हा तो मागणी घालणार हे आपल्याला आधीच ठाऊक होतं, हे तिने कबूल केलं. ही फजिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने झालेली होती.
हेही वाचा - बुद्धिमान यंत्रं : जब दिल्ली दूर थी
अमेरिकेत घडलेली एक घटना. एक सोळा-सतरा वर्षांची अविवाहित मुलगी गरोदर होती. तिने आपल्या आई-वडिलांपासून हे लपवून ठेवलं होतं. अमेरिकेत ‘टार्गेट' नावाची सुपरमार्केटची एक साखळी आहे. या दुकानातून ती वासरहित सौंदर्यप्रसाधनं, जीवनसत्त्वांच्या पूरक गोळ्या वगैरे खरेदी करू लागली. तिने विकत घेतलेल्या एकूण पंचवीस वेगवेगळ्या वस्तूंनुसार ‘टार्गेट'च्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने ती गरोदर आहे हे तर ओळखलंच, शिवाय ती कधी प्रसूत होणार आहे, याचंही भाकीत केलं. ‘टार्गेट'कडून तिला आपोआपच तान्ह्या बाळांशी संबंधित सवलतीची कूपन्स यायला लागली. यावर तिच्या आई-वडिलांनी त्या दुकानात जाऊन चौकशी केल्यावर त्यांना खरं काय ते समजलं. कृत्रिम बुद्धिमत्तेने फक्त वस्तूखरेदीवरून केलेलं हे अचूक भाकीत त्या वेळेस सगळ्यांनाच चकित करून गेलं. लोकांच्या खासगी आयुष्याविषयी गुप्ततेच्या बाबतीत संवेदनक्षम राहण्याची गरजही याने अधोरेखित झाली.
अर्थात आपली सांख्यिक ओळख केवळ आपण इंटरनेटवर केलेल्या खरेदीवरच अवलंबून नसते. त्या जाहिराती आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात या दृष्टीनेही ती तयार केलेली असते.
इंटरनेटवरील समाजमाध्यमांमधला आपला वावर ही आजच्या काळातील आपल्या आयुष्यातील महत्त्वाची बाब झालेली आहे. आपल्याला लक्ष्य केल्या जाणाऱ्या जाहिराती यशस्वी होण्यासाठी आपण समाजमाध्यमांवर जास्त वेळ कसा घालवू, जास्त सक्रिय कसे राहू यासाठी त्या कंपन्या प्रयत्नशील असतात. समाजमाध्यमांवरची आपली सांख्यिक ओळख आणखी थोड्या वेगळ्या प्रकारे निर्माण केली जाते. आपण कुणाच्या संपर्कात आहोत, कुणाचे लेख आवर्जून वाचतो व आपल्याला आवडतात असं दर्शवतो (लाइक), अशा प्रत्येक कृतीतून आपली ओळख आपोआप ठरवली जाते. या ओळखीवर आधारित शिफारशी तंत्रज्ञान कार्यान्वित होतं. आपल्याला ज्या प्रकारचं लेखन आवडतं त्या विषयातले किंवा समांतर लेख, पोस्ट्स आपल्यासमोर आणल्या जातात. किंबहुना, तसं लेखन करणाऱ्या व्यक्तीदेखील आपल्याला दाखवल्या जातात. आपण सरासरी किती वेळ समाजमाध्यमांवर वावरतो हे मोजलं जातं. ही सरासरी वाढवणं ही गोष्टदेखील या तंत्रज्ञानामध्ये अंतर्भूत असते. उदाहरणार्थ, फेसबुकवर आपण रोज अर्धा तास घालवत असू, तर ती वेळ संपत आली की आपल्याला अधिक रोचक शिफारशी दाखवल्या जातील अशी व्यवस्था या तंत्रज्ञानात असते, ज्यायोगे आपला तिथला वावर वाढेल.
हे सर्व तऱ्हेच्या समाजमाध्यमांमध्ये असतं. आपण आवर्जून काही व्हिडिओ बघतो, मग त्यानुसार इतर व्हिडिओ शिफारशी येतात, हे तर अनेकांनी अनुभवलं असेलच. यातून केवळ आपल्या आवडीनिवडीचंच संख्यात्मक मूल्य शिकलं जातं असं नाही, तर आपल्याविषयी अनेक समांतर अंगांनी भाकितं केली जातात. व्यक्तीचं वय, आर्थिक स्थिती, राजकीय बांधिलकी, छंद, प्रदेश, भाषा या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. त्या त्या काळातल्या मुख्य बातमीनुसार, लोकप्रिय घटनेनुसार आपल्याला शिफारशी येतात. बऱ्याच वेळा आपल्या नकळत! निवडणुका, क्रिकेट विश्वचषक, ऑलिम्पिक, एखादी दुर्दैवी घटना, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने व्यक्त केलेली मतं या सर्व गोष्टींना आपल्या ओळखीशी संख्यात्मकदृष्ट्या ताडून आपल्याला तिथे जास्तीत जास्त व्यग्र कसं ठेवता येईल यासाठी ते तंत्रज्ञान कार्यरत ठेवलं जातं.
इंटरनेट आणि त्यावरची समाजमाध्यमं यावर आपली जशी सांख्यिक ओळख असते तशीच ती वस्तू, विषय, घटना यांच्यासाठीही निर्माण केली जाते. इथे एक नमूद करणं आवश्यक आहे- ही ओळख प्रत्येक क्षणागणिक बदलू शकेल अशी व्यवस्था या तंत्रज्ञानामध्ये असते. हे ‘जागृत' तंत्रज्ञान त्यावेळच्या परिस्थितीचं प्रतिनिधित्व करत असतं. उदाहरणार्थ, एखाद्याला टेनिस हा खेळ आवडतो आणि जोकोविच हा त्याचा आवडता खेळाडू आहे. (हे त्या व्यक्तीच्या सांख्यिक ओळखीत अंतर्भूत आहे.) विंबल्डन स्पर्धा चालू आहे. (या स्पर्धेलाही सांख्यिक ओळख मिळते.) अशा वेळेस त्या व्यक्तीला टेनिसचे आणि त्यातही जोकोविचचे व्हिडिओ किंवा त्यासंबंधीची बातमी जास्तीत जास्त वेळा दाखवता यावी यासाठी हे तंत्रज्ञान आपोआप सक्रिय होतं.
हेही वाचा - एआय टूल्स : कितपत विश्वासार्ह?
‘नेटफ्लिक्स'ने तर खुद्द एका मालिकेच्या निर्मितीसाठीच हे तंत्रज्ञान वापरलं. कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेल्या त्यांच्या ग्राहकांच्या सांख्यिक ओळखींचं सखोल विलेषण केलं गेलं. जास्तीत जास्त लोकांना मालिकेसाठी कुठली कल्पना आवडेल, कुठले कलाकार त्यात असणं जास्त चांगलं, अशी अनेक भाकितं आणि अनुमानं कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारेच काढली गेली आणि त्यावर अवलंबून नेटफ्लिक्सने मालिका काढली- ‘हाऊस ऑफ कार्ड्स'. ही मालिका प्रचंड गाजली. आपल्यासारख्या ग्राहकांची ‘नेटफ्लिक्स'ने निर्माण केलेली सांख्यिक ओळख किती अचूक असू शकते हे यावरून लक्षात येईल.
कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे शिफारशी तंत्रज्ञान परिस्थितीनुसार अगदी सहज अनुकूल बनवता येऊ शकतं. याचा प्रत्यय कोविड साथीच्या वेळेस आला. तेव्हा अचानक संचारबंदी लागू केली गेली. या अनपेक्षित बदलामुळे तोपर्यंतच्या सर्व सांख्यिक ओळखी मोडीत निघाल्या. प्रत्येक व्यक्तीचा इंटरनेटवरचा वावर वाढला, पण तो मोठ्या प्रमाणात बदललाही. चैनीच्या वस्तू विकत घेण्याचं प्रमाण कमी झालं. मुख्यत: जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल गेला. समाजमाध्यमांवरच्या चर्चांचे विषय बदलले. हे प्राधान्यक्रम बदलल्यामुळे वाणिज्य व्यवस्थापनावर बरेच सखोल परिणाम झाले. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठासाखळीवर ताण आला.
मग ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्याकडचं शिफारशी तंत्रज्ञान कृत्रिम पद्धतीने बदलण्याचं ठरवलं. ही जणू एक पूर्णपणे नवीन सुरुवात होती. अनेक व्यक्ती, ज्या एरवी इंटरनेटवर नव्हत्या किंवा खरेदी करत नव्हत्या, त्या तिथे अचानक सक्रिय झाल्या होत्या, मात्र त्यांची सांख्यिक ओळख निर्माण करायला वेळ नव्हता. बहुसंख्य लोक जवळजवळ सारख्याच परिस्थितीत असल्यामुळे या नवीन आलेल्यांच्या बाबतीत काही गृहितकं धरली गेली आणि त्यानुसार शिफारशी तंत्रज्ञान बदलण्यात आलं. प्रत्येक वस्तूचा आणि व्यक्तीचा ‘सांख्यिक ओळख' म्हणून पुनर्जन्म झाला. जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे उद्योग ते ग्राहक या पुरवठा साखळीतील प्रत्येक टप्प्याची व्यवस्थाही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने केली गेली. त्यामुळे तेव्हा जीवनावश्यक मालाची ऑनलाइन कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली नाही.
कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्माण केलेली आपली सांख्यिक ओळख जितकी सखोल आणि व्यापक असू शकते तितकीच क्षणभंगूरही असते हे नमूद करावं लागेल, आणि तरीही आपल्यावर तिचा प्रभाव किती मोठा आहे हेही आपल्या लक्षात येईल. ही ओळख आपल्याला उपयोगी पडत असली तरी मुख्यत: तिचा उपयोग ती निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या नफ्यासाठी असतो, याची जाणीव आपण ठेवणं आवश्यक आहे.
इंटरनेटव्यतिरिक्त इतरही अनेक ठिकाणी आपली अशी ओळख दडून बसलेली असते. आपण बँकेत कर्ज घेण्यासाठी जातो. आपलं वय, उत्पन्न, उत्पन्नाचं साधन आणि संपत्ती याचबरोबर आपण पूर्वी कर्जं घेतलेली असल्यास त्यांची परतफेड कशी केली, क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरतो की नाही, अशा अनेक घटकांच्या मदतीने आपली एक सांख्यिक ओळख बनवली जाते. त्यातून आपल्या कर्जाच्या अर्हतेविषयी भाकीत केलं जातं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने या बाबतीत निर्णय घेणं आता बऱ्यापैकी सार्वत्रिक झालं आहे. बँकांचे ग्राहकांसाठीच्या सुविधांचे प्रस्तावदेखील ग्राहकांच्या सांख्यिकी ओळखीने ठरवले जातात.
हेही वाचा - एआयचा जमाना: देखिले डोळा, खरे खोटे समजेना
कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीतही या पद्धतीचा उपयोग होतो. गुन्हा घडण्याआधीच व्यवस्थेद्वारे तो रोखला गेला तर अधिक चांगलंच. पण एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ न करता त्याचा दिनक्रम, कृती यावरून गुन्हा करण्याकडे त्याची वाटचाल चालू आहे का याचं भाकीत करणारं तंत्रज्ञान सार्वत्रिक नसलं तरी अस्तित्वात आहे.
अमेरिकेसारखे देश हे तंत्रज्ञान व्हिसा मंजुरीसाठी वापरतात. व्हिसा अर्जदाराचा सर्व प्रकारचा इतिहास यात जोखला जातो. अर्जदार व्यवसाय करतो की नोकरी, त्याचं स्वरूप काय, तो कशासाठी आणि किती दिवस प्रवास करणार आहे, ही माहिती संख्येच्या स्वरूपात साठवून ती व्यक्ती व्हिसा मंजूर करण्यासाठी पात्र आहे की नाही याचं भाकीत केलं जातं. आंतरराष्ट्रीय प्रवासात विमानतळावर कुठल्या व्यक्तीची अधिक तपशीलात तपासणी करण्याची गरज आहे हेदेखील कृत्रिम बुद्धिमत्ता ठरवते. या बाबतीत हे तंत्रज्ञान देश, वर्ण, धर्म असा पक्षपात करणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष पुरवण्याचं आव्हान तंत्रज्ञांपुढे आहे.
काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांची कौशल्यं विशिष्ट नोकरीच्या दृष्टीने मिळतीजुळती आहेत का नाहीत हे ठरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान वापरलं जातं. उमेदवाराच्या बायोडेटाचं सांख्यिक रूपांतर केलं जातं. नोकरीतील विशिष्ट जागेच्या अपेक्षा या सांख्यिक स्वरूपातच असतात. त्यामुळे या तंत्रज्ञानाद्वारे जास्तीत जास्त जवळच्या उमेदवारांची यादी मिळवता येऊ शकते.
आपल्या आरोग्यासंबंधित माहितीदेखील आपली एक सांख्यिक ओळखच असते. आज शहरी भागात फिटबिट किंवा ॲपलचं मनगटी घड्याळ (स्मार्ट वॉच) सर्रास घातलं जातं. त्यात आपल्या हृदयाचे ठोके, आपण किती पावलं चाललो, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण, असे आठ-दहा घटक सतत मोजले जातात. या माहितीच्या आधारे फक्त सध्याच्या आरोग्याविषयीच नाही तर भविष्यातील संभाव्य आजारांची भाकितं करणारं तंत्रज्ञानही त्यात असतं.
अशाप्रकारे स्मार्टफोनपासून ते जगात दूरवर मोठ्या कंपन्यांच्या संगणकजाळ्यात आपली प्रत्येकाची संख्यात्मक ओळख वसलेली असते. बऱ्याच वेळा ती तशी तयार होणं हे आपल्या नियंत्रणाबाहेर असतं. ती तशी असणार आणि भविष्यात त्याचं प्रमाण वाढत जाणार हे नक्की. त्याकडे व त्याच्या परिणामांकडे डोळसपणे पाहणं हेच आपल्या हातात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान आपल्या संख्यात्मक ओळखीपुरतं मर्यादित नसतं. त्याचा आपल्यावरचा प्रभाव त्यापलीकडेदेखील असतो. त्याबद्दल पुढच्या लेखात.. तोपर्यंत तुकोबांचे शब्द थोडे बदलून सांगायचं, तर ‘उरलो संख्येपुरता।'
(अनुभव, मार्च २०२५च्या अंकातून साभार.)
श्रीनिवास पंढरपुरे | pshrini@gmail.com
श्रीनिवास पंढरपुरे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात कार्यरत आहेत. विज्ञान, खगोलशास्त्र आणि विज्ञानप्रसारात त्यांना विशेष रुची आहे.
