
मनुष्यप्राण्याच्या इतिहासात शेकडो-हजारो वर्षं नैसर्गिकरीत्याच प्रसूती होत होती. परंतु आधुनिक वैद्यकाच्या प्रसारामुळे गेल्या पंचवीस-पन्नास वर्षांत नैसर्गिक म्हणजे नॉर्मल प्रसूतीचं प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. अर्थातच, सीझेरियन पद्धतीने प्रसूतीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हाताशी उपलब्ध माहितीनुसार भारतात २००५-०६ मध्ये ८.५ टक्के प्रसूती सीझेरियन पद्धतीने होत होत्या. त्या केवळ दहा वर्षांत दुपटीने वाढून १७.२ टक्के झाल्या. पाचच वर्षांनी हा आकडा २१.५ टक्क्यांवर गेला व २०२१-२२ मध्ये तो २३.२९ टक्के झाला. याचा अर्थ, केवळ १५-१७ वर्षांत सीझेरियन प्रसूतीचं प्रमाण १५ टक्क्यांनी वाढलं असून भारतात चारांतली एक प्रसूती सीझेरियन पद्धतीने होऊ लागली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सीझेरियन प्रसूतीचं प्रमाण जास्तीत जास्त १५ टक्के असायला हवं; पण वर्षांमागून वर्षं भारतातील हे प्रमाण वाढतच चाललं आहे. या वाढत चाललेल्या टक्केवारीच्या पोटात अनेक लक्षणीय आकडे लपलेले आहेत. उदा. २०१९-२१या वर्षांमध्ये ग्रामीण भागात सीझेरियन प्रसूतीचं प्रमाण १७.६ टक्के होतं, तर शहरी भागात हा आकडा ३२.३ टक्के म्हणजे जवळपास दुपटीने जास्त होता. त्याचप्रमाणे, सरकारी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या प्रसूतींत सीझेरियनचं प्रमाण १४.३ टक्के होतं, खासगी दवाखान्यांमध्ये हे प्रमाण ४९.३ टक्के होतं. म्हणजे तिपटीहूनही अधिक.
महाराष्ट्रातली आकडेवारीसुद्धा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना चिंताजनक वाटते आहे. देशाची सरासरी २३-२४ टक्के असताना महाराष्ट्रात मात्र ३० टक्के प्रसूती सीझेरियन पद्धतीने होत आहेत. त्यातही काही जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण ४० ते ५० टक्के दरम्यान आहे. महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा जास्त टक्केवारी ठाणे-३२ टक्के, पुणे- ३७ टक्के, कोल्हापूर व मुंबई- ४० टक्के, आणि नागपूर- ४९ टक्के अशी आहे. या शहरांतील सरकारी दवाखान्यांत अल्प प्रमाणात होणाऱ्या सीझेरियन प्रसूती पाहता खासगी दवाखान्यांतील प्रमाण किती जास्त असेल याची कल्पनाच केलेली बरी.
याउलट, महाराष्ट्रात आदिवासीबहुल व ग्रामीण भागात अजूनही सीझेरियन प्रसूतीचं प्रमाण कमी आहे. यवतमाळमध्ये २३ टक्के, वाशिममध्ये १८ टक्के, बुलढाण्यात ९ टक्के तर नंदुरबारमध्ये केवळ ६ टक्के सीझेरियन प्रसूती होतात. या जिल्ह्यांमध्ये आधुनिक वैद्यकीय व्यवस्था कमी पोहोचल्या असल्याने नॉर्मल पद्धतीने प्रसूती जास्त होत असतील असं मानणारा एक वर्ग आहे. मात्र, शहरी भागात लोकांकडे पैसा आहे आणि त्यामुळे खासगी हॉस्पिटल्सचा कल सीझेरियन प्रसूतीकडे जास्त असतो, असं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
डॉक्टरांच्या मते स्त्रियांची प्रसूतिकळा सहन न करण्याची इच्छा, उशिरा होणारी गर्भधारणा, जीवनशैलीतील बदल आणि कृत्रिम गर्भधारणेचा अवलंब वगैरे कारणांमुळे सीझेरियनचं प्रमाण वाढत चाललं आहे. शिवाय सीझेरियनचं ऑपरेशन हे सुरक्षित असल्यामुळेही पेशंट आणि जवळच्या नातलगांचा त्याकडे ओढा असतो असं म्हटलं जातं.
मात्र, सीझेरियनच्या वाढत्या आकड्यांमागे खासगी हॉस्पिटल्सचे आर्थिक नफ्याचे हितसंबंध तर नाहीत ना, हे पाहण्याची मागणी होत आहे. त्यानुसार खासगी व सरकारी दोन्ही दवाखान्यांमध्ये सीझेरियन्सच्या केसेसमागील कारण देणं आणि त्याची खातरजमा करणं, अशी पावलं आरोग्य प्रशासन उचलत आहे. वैद्यकतज्ज्ञांनुसार नॉर्मल प्रसूतीमध्ये जन्मणारं मूल हे जास्त निरोगी असतं व त्या तुलनेत सीझेरियन प्रसूतीमार्फत जन्मणाऱ्या अपत्याची रोग प्रतिकारक्षमता कमी असते.
त्याचप्रमाणे या बाळांमध्ये श्वसनाशी व मज्जासंस्थेशी संबंधित आजार होण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे सीझेरियनपेक्षा नॉर्मल प्रसूती केव्हाही अधिक योग्य असते. त्यामुळेच वाढत्या अनावश्यक सीझेरियन प्रसूतींवर आळा घालण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.