आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

म्हादेव

  • ना.धों. महानोर
  • 30.08.26
  • वाचनवेळ 10 मि.
mhadev

पुण्यातला ‘द्राक्ष बागायतदर संघा'चा कार्यक्रम आटोपून कोपरगावला निघालो होतो. हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांना एकत्र घेऊन अतिशय परिश्रमाने आयोजित केला जातो. सगळं काही आवडीचं वातावरण, जिव्हाळ्याचे विषय. शेती-पाणी, पर्यावरण, फळबागा यांत मी जे थोडंबहुत चांगलं काम केलं, त्यासाठी मला मोठा गौरव पुरस्कार जाहीर झाला होता. हजारो शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने-कौतुकाने मला खूप आनंद झाला. वर्षातून एकदा खूप काही देऊन जाणारी अशी ही आनंदयात्रा संपली आणि मी नवी ऊर्जा, शक्ती घेऊन निघालो. 

पुण्यातून थेट औरंगाबादला आणि तिथून घरी जायचं, असं आधी ठरलेलं; पण पुण्यातल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कोपरगावला शेतकरी संघटनेच्या मित्रांचं एक अधिवेशन होतं. त्यांचा खूप आग्रह झाला, म्हणून मी कोपरगावला त्यांच्या यात्रेत सामील झालो. कष्टकरी शेतकरी, त्यांची तळमळ, लढा पाहिला. त्यांच्या शुभेच्छा घेऊन पुढे निघालो. 

आता घरी जायचं होतं. दोन दिवसांच्या भेटीगाठींनी अतीव समाधान दिलं होतं. शेतीप्रश्नावर, पाणीप्रश्नावर आणखी खूप काम करावं अशी इच्छा मनात नव्याने जागृत झाली होती. मोटारीच्या खिडकीतून थंड हवेची झुळूक येत होती. त्यामुळे मी आणखीनच बहरून गेलो होतो. मनाला नवे पंख लाभल्यासारखं वाटत होतं. मात्र, कल्पनेच्या आकाशात विहरणाऱ्या माझ्या मनाला एकदम जमिनीवर आणणारा प्रसंग रस्त्यात पुढे माझी वाट पाहत होता... 

रस्त्याने वाहतुकीची प्रचंड गर्दी होती. त्यातून हळूहळू आमची मोटार मार्गक्रमण करत होती. एका ठिकाणी रस्त्याकडेला एक विस्तीर्ण वड होता. वडाच्या पारंब्यांखाली बसलेली एक तिशीतली काळी-सावळी बाई रडवेल्या चेहऱ्याने, काकुळतीने धावत आमच्या गाडीजवळ आली. आम्ही गाडी थांबवली. तिच्या हातात एक लहानशा दगडाचा ओबडधोबड आकार दिलेला महादेव होता. तिचा ‘म्हादेव'. वडाच्या सावलीत दगडाचा एक लहान नंदीही होता. जवळच एक खंगलेली गाढवीण उभी होती. गाढविणीच्या ढुंगणाजवळ दोरीचा रुतलेला, रक्ताळलेला मोठा व्रण, त्याभोवती माशा घोंघावत होत्या. ती सारखी शेपटी हलवत माश्यांना हाकलत होती. तिच्या पोटाजवळ तान्हं गाढव होतं. मी गाडीतून खाली उतरलो. फाटक्या लुगड्यातली, दु:खाने-भुकेने पिचलेली ती वडारीण सतत विनवणी करत होती. घळाघळा रडत होती. तिची भाषा थोडी कानडी, थोडी मराठी, नीटशी न कळणारी. ‘हा म्हादेव घेवा म्हादेव, धा रूपे. पोराबाळाला द्या' असं ती वारंवार हात जोडून सांगत होती. तिच्या बाजूला तिची दहा-बारा वर्षांची दोन लहान मुलं. त्यांच्या अंगात फक्त फाटका सदरा, बाकी नागवी. दोघं मूक, उदास डोळ्यांनी आमच्याकडे पाहत होती. 

आता माझी बायकोही गाडीतून उतरून तिच्याजवळ गेली. तिलाही रडू यायला लागलं. मला फार अवघड झालं. काहीच बोलता येईना. 

वडारीण मोडक्यातोडक्या मराठी-कानडी भाषेत काही सांगत होती- “कर्नाटकातून येऊन दहा वर्षं झाली असतील आम्हाला. महाराष्ट्रात कष्टाचं काम करतो. दगडधोंडे, खडीकाम, डोंगर उपसतो. म्हादेव पोटापुरतं देतो. चार महिन्यांपूर्वी काही पोलिस आले. माझ्या नवऱ्याला अन् त्याच्या लहान भावाला जेलमध्ये घेऊन गेले. माझा नवरा देवमाणूस. चोरीचपाटी कधीच केली नाही. संशयानं घेऊन गेले. त्याला काठीनं मारलं. पोरं रडत होती. त्यांनाही मारलं. मी गावोगावी फिरते, काम मागते. कधी थोडं मिळतं-मिळत नाही. पोरं उपाशी आहेत- हा म्हादेव घ्या. तुमचं भलं होईल. पाया पडते, धा रुपये द्या. हा नंदीही घ्या.”

तिचं रडणं, आर्जव, आकांत आम्हाला पाहवत नव्हता. माझ्या बायकोने गाडीतून बिस्किटाचे पुडे, पाव, चिवडा काढला. तिला-मुलांना दिला. मुलं अधाशासारखी खाण्याला भिडली. हडकुळ्या गाढविणीचा हलका हंबर होता. तिच्याही तोंडात त्यांनी पावाचा तुकडा दिला. मी सुन्नपणाने वडाच्या पारंबीचा आधार घेऊन उभा होतो. त्या भुकेल्यांचे ध्वनी, त्यांची कुरतड मनाला भोवंडून टाकत होती. मी जागा झालो. मी तिचा म्हादेव हातात घेतला. बायकोने नंदी हातात घेतला. लहानसा दगडात कोरलेला, देवांचा देव, म्हादेव. तिला धीर दिला. शंभर रुपयांची नोट दिली. तिने नोट पाहिली. नको, नको, म्हणाली, “फक्त धा रुपये द्या.” 

हेही वाचा - जळू

आम्ही गाडीत म्हादेव, नंदी यांना जागा करून दिली आणि शून्य नजरेने पुढे निघालो. जेमतेम एखादा किलोमीटर गेलो असू. मला काय वाटलं कुणास ठाऊक, मी गाडी मागे वळवायला सांगितली. आम्ही पुन्हा वडाजवळ त्या बाईजवळ आलो. तिला कळेल अशा भाषेत पुन्हा पुन्हा विचारत राहिलो- नवऱ्याला कोणत्या गावी पकडलं, कधी, तो कोणत्या जेलमध्ये आहे, त्याचं नाव सांग... तिने त्याचं नाव सांगितलं; मात्र ते मला कळलं नाही. बाकी तिला काहीच सांगता येत नव्हतं. 

मी महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार असताना अनेक कारागृहांना भेटी दिल्या. ते विद्रूप-असहाय जग पाहिलं. अट्टल गुन्हेगार, देशद्रोही पाहिले. त्यापेक्षाही किरकोळ भांडणांतल्या साक्षी-पुराव्यांअभावी तुरुंगातल्या यातना भोगणारे सज्जन साधे लोक पैठणच्या मुक्त जेलमध्ये पाहिले. त्या सर्व गोष्टींनी आता मनात गर्दी केली. आपण हिच्या नवऱ्यासाठी काही करू शकलो तर... हा भाबडा आशावाद जागृत झाला. त्यासाठीच मी तिला बोलतं करण्याच्या प्रयत्नात होतो. ती भांबावलेली.धास्तावलेली, अडाणी, तिला थोडंही सांगता आलं नाही. पुन्हा तसेच निघालो.

खंडाळा गाव आलं. हे बहिणाबाईंचं सासर. पुढे देवगाव आलं. ते बहिणाबाईंचं माहेर. ती कोणत्याही ठिकाणची स्त्री असो, तिचा आतला, मनाच्या तळघरातल्या कोलाहलाचा थांग लागणं कठीण. सासरी-माहेरी न सांगता येणारं विराट दु:ख घेऊन बहीणाबाई एकट्या काटेरी वाटेने देहूच्या-पंढरपूरच्या गाभाऱ्यात कवितेत लीन होऊन जगली. मी त्या तिच्या गावांना दुरूनच नमस्कार केला. 

वेरूळच्या लेण्यांजवळ मी गाडी थांबवायला सांगितली. घशाला कोरड पडली होती. कपभर चहा हवा होता. गाडी थांबली होती, त्यासमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं मोठं तैलचित्र होतं. साध्वी अहिल्याबाई अबोल पण प्रेमळ चेहरा. दीनदुबळ्यांसाठी, पशू-पक्षी सकलांसाठी अथक काम करणारी, देवाधर्माचं काम करणारी राज्यकर्ती राजमाता. सोबतीचे सारे गळाले-पळाले; पण ती एकटी देशासाठी सर्वस्व देऊन काम करत राहिली. पोर्ट्रेटमध्ये त्यांच्या उजव्या हातात दिसणारा लहानसा देव. महादेव, म्हादेव! राजमातेच्या हातातल्या म्हादेवाच्या दर्शनाने मनाला जरा तजेला आला. तैलचित्राखाली लिहिलेलं होतं : राजमाता अहिल्याबाईंनी देशभर पाण्याच्या सुंदर, भव्य बारवा बांधल्या. त्यातली ही ‘अहिल्या बारव'. बाजूच्या घृष्णेश्वर महादेव मंदिराचं पुनरुज्जीवन आणि सर्वकाही सुधारणा बांधकाम त्यांनीच केलं.' मी अहिल्यादेवींच्या हातातल्या म्हादेवाला आणि घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यातल्या म्हादेवाला शांतपणाने नमस्कार केला. 

परिसरात प्रचंड गर्दी होती. देश-विदेशातले पर्यटक, राजरस्त्यावर, हॉटेल्सजवळ, लेण्याच्या परिसरात कॅमेरे, शूटिंग-गाणी, तरुण-तरुणींचं फोटो सेशन, घाम-घुसमट-धिंगाणा. दूरवर नजर टाकली. उंच उंच गगनावरी गेलेलं जगविख्यात कैलास शिल्प. कैलास. म्हादेवाचं कैलास. 

आम्ही निघालो. दोन किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम होता. घुसमट वाढली होती. औरंगजेबाच्या दर्ग्याजवळ एकाने येऊन अत्यंत नम्रतेने माझी विचारपूस केली. अनोळखी माणसांची एवढी घट्ट आत्मीय जवळीक पाहून मीही हरखलो. “पाच मिनिट के लिए अंदर आ सकोगे?” ते गृहस्थ म्हणाले. मी उर्दूतली ओळखीची पाटी पुन्हा वाचली. या हिंदुस्थानचा शहेनशाह सम्राट औरंगजेब : याचा शेवटचा देह या ठिकाणी ठेवला गेला. ‘मराठी रियासत'चा चक्रावून टाकणारा, सुन्न करणारा इतिहास. ती पानं मनात भिरभिरत होती. मी दहा वर्षांपूर्वी आत दर्ग्याजवळ अर्धा तास बसून दोघा-चौघांसोबत बोललो होतो, हे त्यांना सांगितलं. ते त्यांना माहीत होतं. त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी गाडीत एक फळांची पेटी टाकली आणि खडीसाखरेची छोटीशी पिशवी. 

मी ड्रायव्हरला सांगितलं, “आता कुठेही गाडी न थांबवता थेट पळसखेडला चल. गावाबाहेरही थांबू नको. सरळ घरी चल. रानातल्या पिंपळाच्या पायथ्याशी आजच म्हादेव ठेवायचा आहे आणि एक दिवा लावायचा आहे त्या बाईसाठी...” 

पळसखेडला गावात गाडी शिरली आणि पाच-दहा ग्रामस्थांनी आम्हाला थांबवलंच. धावतपळत घरात जाऊन त्यांनी कुंकवाचा करंडा आणला. माझ्या आणि बायकोच्या तोंडात गुळाचा खडा दिला. दोन दिवसांपासून आणलेला फुलांचा हार काढला. पण त्यांनी खूप आग्रह केला, तरीही मी गळ्यात हार घातला नाही. सगळे नाराज झाले. माझा एवढा मोठा सन्मान झाला, पण माझ्या चेहऱ्यावर हसू का नाही, त्यांना प्रश्न पडला होता.

हेही वाचा - एका युद्धगीताची गोष्ट

मी लगेच शेताकडे निघालो. गौरव झाला याचा मला झालेला आनंद का मावळला होता? तो त्या वडाखालच्या वडारीणबाईने, तिच्या लेकरांनी, रक्ताळलेल्या मरतुकड्या गाढविणीने हिरावून घेतला होता. काही केल्या मनाची घरघर थांबत नव्हती. 

लहानपणी आम्ही बघायचो- घरोघरी दळणाचं दोन दगडांच्या पाळूचं जातं असायचं. ते वापरून वापरून गुळगुळीत व्हायचं. या टकारणी बायका लहान छिन्नी, हातोडा घेऊन घरोघरी जातं टकारून द्यायच्या. पाटा-वरवंटा टकारून द्यायच्या. मग त्यावर दळलेलं पीठ अधिक गोड, स्वादिष्ट वाटायचं. पुढे जात्याचा वापर कमी कमी होत गेला. मग या बायका मोठ्ठाले दगड-धोंडे फोडण्याचं अतिशय कष्टाचं, घामाचं काम करायला लागल्या. देशाला स्वातंत्र्य मिळालं, मात्र ही जमात बेघरच राहिली. आमदार असताना मी किती तरी भटके, विमुक्त, आदिवासी, पालावर गावोगावी फिरणाऱ्या अर्धपोटी जाती-जमाती पाहिल्या. आत्मीय भावनेने त्यांचे प्रश्न, दु:ख, दारिद्य्र विधिमंडळात मांडलं. मीच नाही, अनेक अभ्यासू सक्रिय आमदार खासदार-मंत्र्यांनीही हे केलं. पण इतरांच्या विकासाच्या प्रवाहात हे अगदीच थिटं होतं असं वाटायला लागलं. 

विचारांच्या वळणावळणांनी, टेकड्यांच्या वळणवाटांनी माझी गाडी माझ्या रानातल्या टेकाडावर आली. आपलं घर, जवळची लहान, कौलारू, प्रिय झोपडी. सभोवताली पिंपळ, वड, जांभूळ, रामफळ, सीताफळ, चिंच, रुद्राक्ष, कडूनिंब असे वीस-पंचवीस जिवाभावाचे गणगोत, स्नेही. इथे पोचल्यावर मनातलं घरघरणारं दु:ख हलकं झालं. दिवस मावळतीला आला होता. दररोज सायंकाळी घराच्या अवतीभवतीच्या या झाडांच्या गर्दीतल्या एका पिंपळासमोर दिवा लावायची, नमस्कार करण्याची आमची पद्धत. पक्षी संध्याकाळी घरी परततात. आपापल्या खोप्यात बसल्यावर त्यांनाही पणतीच्या दिव्याचा आधार वाटतो. मंद तेजाची वात अवघ्या परिसरातल्या काळोखाला गिळून टाकते. बायकोने लगबगीने घरातून कापसाची वात आणि तेलाची वाटी आणली. 

पळसखेड, माझं इवलंसं खेडं. उंच-सखल, कोरडवाहू शेतीचं, कष्टाने गांजलेलं. तरीही गीतसंगीत-लोकसंगीत यात आपलं दु:ख विसरून जगासाठी अन्नाचा घास निर्माण करणारं. पिकल्यावर भरभरून आनंदाने नाचणारं, नांदणारं. इथेच गाव सोडून लहानशा शेतावर रानात घर करून मी एकटा-झाडासोबत राहिलो. दिवसा शेतकऱ्यांची गजबज. रात्रीचा शांत एकान्त. कधी चांदण्यांचा, कधी गर्द काळोखाचा. इथेच जीव रमतो आहे. पावसाळ्यात, हिवाळ्यात आत पुस्तकांसोबत झोपतो. उन्हाळ्यात उघड्यावर दोन खाटा टाकून पिंपळाच्या, वडाच्या झाडांच्या गाभाऱ्यात निवांत गप्पागोष्टी करत पडायचं. तीस वर्षं या रानातल्या घराने, शेतीने, परिसरातल्या वृक्षवेलींनी मला वेढून ठेवलेलं. दरवर्षी नवा पाऊस, नवी पिकं, नवं आकाश, नवी सृष्टी... 

त्यानंतर बरीच वर्षं गेली. शेतावर माझ्या सोबतीने असलेला गडी परवा आला. म्हणाला, “गेल्या वर्षीच्या अतोनात पावसाने झऱ्याचा काठ ढासळला, दगड-माती बांध ढासळला, किनाऱ्यावरची झाडं पडली, मोसंबीची एक रांग गेली. तो नाला बांधणं जरुरी आहे. तिथे ट्रॅक्टर जात नाही. माणसं ते करायला धजत नाहीत.” मी म्हटलं, “मीही ते पाहिलं, अवघड आहे. करायला तर पाहिजे.” “पंधरा दिवसांपासून गावातल्या बारवेच्या विहिरीजवळ वडाखाली दोन-चार मजूर आलेले आहेत. ते चांगलं काम करतात अशी गावात बातमी आहे. सांगू का?”

“ताबडतोब ते काम देऊन टाक. कितीही कठीण असलं तरी ते करूनच घे.”

हेही वाचा - कावळ्याबगळ्याची गोष्ट

आज कडुनिंबाच्या गर्द सावलीत मी दिवसभर एक अप्रतिम पुस्तक वाचण्यात दंग होतो. एका बाईचं आत्मकथन, अस्वस्थ करणारं..

संध्याकाळ होत आली. शेतावरला गडी आला आणि म्हणाला, “तो झऱ्याच्या काठचा फुटलेला बांध, ढासळलेली शेती, दगडं सगळं नीट बांधून झालं. एखादा कारागीर काय करील इतकं भक्कम, पक्कं. आठ दिवसांचं काम चार दिवसांत या लोकांनी पूर्ण केलं. त्यांना पैसे द्यावे लागतील. आजच ते दुसऱ्या गावी जाताहेत.” 

मी माझी बॅग आणायला सांगितलं. पैसे काढले. वडाच्या आड बसलेली एक पोक्त, पन्नाशीतली काळीसावळी बाई आली. तिची दोन मुलंही आली. उंच धडधाकट. मी पैसे देताच ते नमस्कार करायला वाकले. मी थोपवलं आणि म्हणालो, “दहा हजार आहेत. नीट ठेवा.” त्यावर ती म्हणाली, “इतके नको. अर्धे द्या.” ती कानडी मराठीत ओबडधोबड कशी तरी बोलली आणि मी खुर्ची बाजूला सारून ताडकन उभा राहिलो. तिला पुन्हा पुन्हा न्याहाळलं... तो रस्ता, तो वड, ती गर्भार, रक्ताळलेली गाढवीण, तिचं लेकरू... जेलमध्ये पाठवलेला तिचा नवरा... शंभर नको, धा रुपये द्या म्हणणारी ती. 

बायकोने पिंपळाच्या बुंध्याजवळ दिवा लावला. तिथेच आमचा म्हादेवही ध्यानस्थ बसलेला, पंधरा वर्षांपासून. मी त्या बाईच्या हातात पूर्ण पैसे दिले आणि पिंपळाकडे बोट दाखवलं. तिने ते पैसे पदरात बांधले. लहानशा पिंपळपाराजवळ लहानशा गाभाऱ्यात बसलेल्या म्हादेवाला पाहून ती मोठ्यांदा ओरडली- ‘म्हादेव... म्हादेव... म्हादेव!' आणि मुलांना ओढत तिथे घेऊन गेली.

मंद दिव्याच्या उजेडात तिचा चेहरा उजळून गेला होता. थोडा हसणारा. म्हादेव, पिंपळाची सळसळ, पणतीची पिवळी-निळी ज्योत, ती काळीसावळी पोक्त बाई, तिची धडधाकट, शांत मुलं... ती खूप वेळ त्याच चौथऱ्यावर बसून राहिली होती. ध्यानस्थ. 

रात्र वाढत गेली. काळोखी दाटत चालली. मी हाक मारली, पण उत्तर आलं नाही. ती, तिची मुलं केव्हा गेली, कळलंही नाही. मी सुन्न झालो. अनेक प्रश्नांनी मला वेटाळून टाकलं- तिला थांबवून विचारलं का नाही? तू कोण? पंधरा वर्षांपूर्वीचं तुला आठवतं का? तुझा नवरा? त्याचं काय झालं? मीच तुझा म्हादेव घेऊन आलो... तुझा म्हादेव-माझा म्हादेव...

पण ही तीच असेल का? की तिच्यासारखीच वेगळी कुणी तरी? काय सांगता येतं? नसेलही. माझ्याच प्रश्नांना माझ्याजवळ उत्तरं नव्हती.

रात्रीचा काळोख अधिकच काळा होत चाललेला. सुनसान रात्र. मी नि:शब्द. एकटा. रेडिओ लावला. जितेंद्र अभिषेकींचा गंभीर स्वर- जे जे जगी जगते तया.. माझे म्हणा..करुणाकरा.. सर्वात्मका सर्वेश्वरा..

शेवटी आर्त स्वरात अरुवार कंठातलं कुमार गंधर्वांचं गीत- उडिजा रे ऽ.. हंस अकेला..

(अनुभव, दिवाळी २०२०च्या अंकातून साभार.)

ना.धों. महानोर







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results