एखाद्या देशाचं राष्ट्रगीत म्हणजे त्या देशाच्या इतिहासाचं प्रतिबिंब असतं. देशासाठी अभिमानास्पद असलेल्या गोष्टींचा उल्लेख राष्ट्रगीतात केला जातो. त्यावरून आपण त्या देशाची अस्मिता कशात आहे ते जाणून घेऊ शकतो. भारताच्या राष्ट्रगीतात भारताचे भौगोलिक भाग, विविध राज्यं, विविध भाषा-संस्कृतींचे लोक, पर्वतरांगा, नद्या यांचा उल्लेख आहे. भारताचं राष्ट्रगीत आपल्या विविधतेने नटलेल्या देशाची ओळख सांगतं तसंच विविधतेत दिसणारी एकताही प्रतिध्वनित करतं.
पण अमेरिकेच्या राष्ट्रगीतात मात्र तिथल्या रॉकी, आपालेचिअन या पर्वतरांगा अथवा मिसोरी- मिसिसिपीसारख्या नद्या अशा भौगोलिक भागांचा उल्लेख नाही; मात्र अग्निबाण, तोफांचा मारा, बारुदी गोळ्यांचा वर्षाव अशा गोष्टींचा त्यात उल्लेख आहे. त्या राष्ट्रगीतावरून हे कोणत्या तरी भयंकर युद्धाचं वर्णन आहे हे लक्षात येतं. त्याच्या पहिल्या कडव्याचा हा भावार्थच पहा-
सूर्याच्या पहिल्या किरणांसवे धुक्याच्या पडद्याआड ज्याचे दर्शन होत आहे
तो ध्वज कालच्या काळरात्रीनंतरही अजून दिमाखाने झळाळतो आहे.
अग्निबाण आणि बारुदी गोळ्यांच्या माऱ्यातही आणि लाल-तांबड्या आगीच्या लोळातही आमचा राष्ट्रध्वज खंबीरपणे झळाळतो आहे.
जोपर्यंत युद्धभूमीवर आमच्या राष्ट्रध्वजाचे दर्शन होत राहील तोपर्यंत या वीरांच्या आणि स्वातंत्र्याच्या भूमीसाठी आम्ही लढा देत राहू.
हे राष्ट्रगीत मी पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा, त्यातल्या युद्धाच्या वर्णनाने मला चकित केलं होतं. अमेरिकेला माणसांच्या अथक परिश्रमाने उभारलेली भव्यदिव्य शहरं व निसर्गाचं परिपूर्ण दान मिळालेलं असूनही राष्ट्रगीतात संहारक युद्धाचा उल्लेख का असेल, हा प्रश्न मला पडला. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जिज्ञासा मला अमेरिकी इतिहासाच्या प्रवासावर घेऊन गेली. जसजसा मी इतिहास खोदत गेलो तसतशी मला त्या राष्ट्रगीताची एक नवीन ओळख पटू लागली.
हे राष्ट्रगीत लिहिणारा माणूस व्यवसायाने वकील असलेला एक नवखा कवी होता. त्याचं नाव फ्रान्सिस स्कॉट की असं होतं. त्याने हे राष्ट्रगीत खरं तर एका युद्धासाठीच लिहिलं होतं. त्या युद्धाला '१८१२चं युद्ध' या नावाने ओळखलं जातं. या युद्धाचा इतिहास थोडक्यात असा आहे.
४ जुलै १७७६ रोजी अमेरिका खंडातल्या तेरा वसाहतींनी इंग्रज सरकारच्या बेबंदशाही करव्यवस्थेला कंटाळून इंग्रज साम्राज्यापासून स्वतंत्र होण्याची घोषणा केली. या वसाहतींच्या बंडखोरीला चिरडण्यासाठी इंग्रज पूर्ण बळानुसार त्यांना सामोरे गेले. इंग्रजी साम्राज्यापुढे वसाहतींचा निभाव लागणं अवघड होतं. परंतु, वसाहतींच्या मदतीला फ्रान्स व स्पेन साम्राज्यं पुढे आली. त्यामुळे वसाहतींना इंग्रजांशी यशस्वी लढा देता आला व आठ वर्षांच्या लढतीनंतर अखेरीस इंग्रजांनी अमेरिकेचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं. १७८३ मंध्ये पॅरिस इथे अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला मान्यता देणारा तह इंग्रजांनी कबूल केला. अशा पद्धतीने युद्धाच्या धुमश्चक्रीतून अमेरिकेचा उदय झाला.
या नव्या राष्ट्राची पहिली स्वातंत्र्यघोषणा बनवण्यात आली तेव्हा त्यामध्ये प्रत्येक माणसाचे काही मूलभूत अधिकार आहेत, असं नमूद करण्यात आलं. प्रत्येकाला त्याचं आयुष्य जगण्याचा, स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा व आयुष्यात सुख मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचा अधिकार आहे यावर भर देण्यात आला. त्या काळात राज्यांचा प्रजेवर अनिर्बंध अधिकार चालायचा, त्या पार्श्वभूमीवर ही क्रांतिकारक घटना होती.
अर्थात, अमेरिकेचा इतिहास अनेक विरोधाभासांनी भरलेला आहे. आज अमेरिका पूर्वेला अटलांटिक समुद्रापासून ते पश्चिमेला पॅसिफिक समुद्रापर्यंत पसरलेली आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात स्वतंत्र अमेरिकेचा व्याप फक्त उत्तर व पूर्व भागांकडेच होता. वाढत्या जागेच्या भूकेमुळे अमेरिकेने आपला विस्तार पश्चिमेकडे करण्यास प्रारंभ केला. या विस्तारात तिथल्या स्थानिक आदिवासी जमाती निर्वासित झाल्या. आदिवासी जमातींच्या प्रमुखांशी अमेरिकेने जागेच्या वाटपावरून वेळोवेळी अनेक तह केले, परंतु अमेरिकेनेच पुढे हे तह आपल्या गरजेनुसार मोडले. त्यामुळे स्थानिक जमातींचं, प्रजातींचं व निसर्गाचं नुकसानच झालं. हा अन्याय होत होता त्या वेळी प्रत्येकाला मूलभूत अधिकार देणारी स्वातंत्र्यघोषणा बनून थोडाच अवधी लोटला होता.
इकडे अमेरिका पश्चिमेकडे पसरत असताना युरोपमध्ये मात्र राजकीय परिस्थिती बिघडत चालली होती. अमेरिकन वसाहतींचा इंग्रजांविरुद्ध लढा सुरू असताना फ्रान्सने अमेरिकेला मदत केली होती, पण त्या युद्धाच्या खर्चामुळे फ्रान्सवर कर्जाचं प्रचंड ओझं झालं होतं. या कारणाने फ्रान्समध्ये राजकीय उद्रेक सुरू झाला. फ्रान्स राज्यक्रांतीच्या सुरुवातीच्या काळात सरंजामशाहीचा अंत करण्यात आला व लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पुढे फ्रान्समधील राजकीय परिस्थिती इतकी चिघळली की जनउन्मादाचा उद्रेक होऊन प्रचंड हिंसा सुरू झाली. हा काळ 'दहशतीचा काळ' म्हणून ओळखला जातो. या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेपोलियन बोनापार्तेचा उदय झाला. नेपोलियनच्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या वादळात संपूर्ण युरोप ओढला गेला. या काळात युरोपात झालेली युद्धं 'नेपोलियन युद्ध' म्हणून ओळखली जातात. युरोपवर या युद्धाची छाया एक तपभर राहिली. या धुमश्चक्रीत अमेरिकाही ओढली गेली.
या युद्धांच्या काळात इंग्रजांनी फ्रान्सच्या समुद्रवाहतुकीवर बंधनं घालणं व नौकांवर हल्ले करणं सुरू केलं. या घटनांचा परिणाम अमेरिकन समुद्रवाहतुकीवरही झाला. शिवाय अमेरिकेने पश्चिम भागात जी घुसखोरी केली होती त्याचा विरोध म्हणून तेथील स्थानिक जमातींचा इंग्रजांना पाठिंबा होता. हा पाठिंबा अमेरिकेला नाराज करणारा होता. या व अशा आणखी काही कारणांमुळे अमेरिकेने १८१२मध्ये इंग्रजांशी युद्धाची घोषणा केली.
त्या वेळी इंग्रज युरोपातील युद्धांमध्ये अडकले असल्यामुळे अमेरिकेशी सुरू झालेल्या या युद्धाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला होता. १८१४मध्ये नेपोलियनची हार झाल्यानंतर मात्र इंग्रजांनी अमेरिकेविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली व अमेरिकेत मोठ्या प्रमाणात सैन्य पाठवलं. युद्धात त्यांचं पारडं हळूहळू भारी झालं व एकामागून एक अमेरिकन शहरं इंग्रजांच्या आक्रमणाला बळी पडू लागली. इंग्रजांनी, अमेरिकेची राजधानी असलेलं वॉशिंग्टन हे शहर जिंकलं व त्याला आग लावून बेचिराख केलं.
अमेरिकेची राजधानी जाळल्यानंतर इंग्रजांनी अॅलेक्झांड्रिया हे बंदर जिंकून पुढे बाल्टिमोरकडे कूच केली. बाल्टिमोर शहराचं रक्षण करायला मॅकहेन्री नावाचा किल्ला होता. या किल्ल्याचं पतन झालं तर बाल्टिमोर शहराची हार पक्की झाली असती, म्हणून इंग्रजांनी या किल्ल्यावर हल्ला करायचं ठरवलं.
इंग्रजांचा हा हल्ल्याचा बेत ठरत होता तेव्हा फ्रान्सिस स्कॉट की नावाचा अमेरिकन वकील युद्धकैद्यांची अदलाबदल तसेच सुटकेचे प्रस्ताव घेऊन इंग्रजांच्या भेटीस आला होता. वाटाघाटींदरम्यान तो इंग्रजांच्या नौकेवर थांबला होता. अथक प्रयत्नांनंतर त्याच्या वाटाघाटींना यश आलं; परंतु नौकेवरील वास्तव्यात त्याला मॅकहेन्री किल्ला व बाल्टिमोर शहरावरील हल्ल्याच्या योजनेबद्दल कळलं असल्यामुळे इंग्रजांनी हल्ला संपेपर्यंत त्याला बंदी बनवायचं ठरवलं.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे इंग्रजांच्या नौसेनेने किल्ल्यावर दारूगोळे व क्षेपणास्त्रांनी मारा करणं सुरू केलं. फ्रान्सिस इंग्रजांच्या नौकेवरून हा मारा पाहत होता. किल्ल्यावर इंग्रज संपूर्ण शक्तीनिशी तोफगोळ्यांचा मारा करत होते त्या वेळेला किल्ल्यावर एक छोटासा अमेरिकन ध्वज फडकताना फ्रान्सिसला दिसला.
जोपर्यंत तो ध्वज फड़कतो आहे तोपर्यंत किल्ला लढा देतो आहे, असा याचा अर्थ होता. एकदा का किल्ल्याने समर्पण केलं की तो ध्वज खाली घेतला जाऊन त्याऐवजी समर्पणाचा श्वेत ध्वज फडकावला जाईल हे फ्रान्सिसने ताडलं. तोफगोळ्यांचा आवाज रात्रभर सुरूच राहिला. त्या वेळी फ्रान्सिसच्या मनात किती घालमेल होत असेल त्याची कल्पना करा.
दुसऱ्या दिवशी पहाटे फ्रान्सिसने जेव्हा अस्वस्थ मनाने किल्ल्याकडे पाहिलं तेव्हा त्याला एक अद्भुत दृश्य दिसलं. किल्ल्यावर गोळ्यांचा मारा सुरूच होता, पण आदल्या दिवशी तिथे जो छोटासा ध्वज होता त्याऐवजी आता भला मोठा ध्वज लावला गेला होता. हे दृश्य पाहून फ्रान्सिस भारावून गेला व त्या वेळेला त्याच्या मनात आलेले विचार त्याने कवितारूपात एका पत्राच्या मागच्या बाजूला रिकाम्या जागेत लिहिले. अग्निबाण, बारुदी गोळ्यांच्या माऱ्यातही आणि लाल- तांबड्या आगीच्या लोळातही खंबीरपणे झळकणाऱ्या राष्ट्रध्वजाची ती तारीफ होती. तो राष्ट्रध्वज अवघड परिस्थितीतही आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी चिकाटीने झुंज देण्याच्या अमेरिकन वृत्तीचं प्रतीक होता. मॅकहेन्री किल्ल्याने हार पत्करली नव्हती. या युद्धानंतर अमेरिकेचं पारडं फिरलं व अमेरिकेने इंग्रजांना हिमतीने तोंड दिलं. पुढे युद्ध संपल्यावर अमेरिका नव्या जोमाने आगेकूच करू लागली. फ्रान्सिसने लिहिलेली कविता देशप्रेमाच्या भावनेमुळे अत्यंत गाजली. १९३१मध्ये या कवितेला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला.
अमेरिकन राष्ट्रगीतात अमेरिकेचं वर्णन 'स्वातंत्र्याची 'भूमी' असं केलं गेलं आहे; परंतु हे वर्णन संपूर्ण सत्य नव्हतं. या यशाचा पाया गुलामगिरीच्या शापाने झाकोळलेला होता. अमेरिकेतील दक्षिणेकडील वसाहतींमध्ये शेती व इतर कामांसाठी आफ्रिकेतून स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी प्रत्येक पाच माणसांमागे एक मोठ्या प्रमाणात गुलाम आणले जायचे. अमेरिकन माणूस गुलाम होता. अमेरिकन संसदेच्या शिखरावर विराजमान झालेली स्वातंत्र्यदेवीची मूर्तीही एका गुलामानेच साकारलेली होती.
फ्रान्सिस स्कॉट की हा स्वतःही गुलाम राखून होता.
इतकंच नव्हे, तर गुलामगिरी बंद करण्यासाठी जे लोक प्रयत्न करत होते त्यांना फ्रान्सिसचा कट्टर विरोध असायचा. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचा एक जनक म्हणून ज्याला ओळखलं जातं व ज्याने स्वातंत्र्याच्या घोषणेत 'सर्व मनुष्यगण एकसमान आहेत हे स्वयंसिद्ध सत्य आहे' असं नमूद केलं होतं त्या थॉमस जेफर्सनकडे शेकडो गुलाम होते. एकीकडे स्वातंत्र्याचा पुरस्कार तर दुसरीकडे गुलामगिरीचा स्वीकार, या परस्परविरोधी तत्त्वांनी अमेरिकन घटनेला ग्रासलं होतं. 'अंतर्गत कलह व विचारभेद ज्या गृहात असतील त्याचं पतन अटळ असतं' असे उद्गार एकदा अब्राहम लिंकन यांनी काढले होते. ही जणू भविष्यवाणीच ठरली. १८६०च्या दशकात अमेरिका गुलामगिरीच्या प्रश्नावर दोन भागांत विभागली गेली व त्या भागांत तुंबळ युद्ध सुरू झालं. या अतर्गत युद्धात अंदाजे सहा लाख लोकांचा बळी गेला. अखेरीस राष्ट्रपती अब्राहम लिंकनच्या अथक प्रयत्नांनी अमेरिकेला विभाजनातून परत एकत्रीकरणाकडे आणलं व १८६३मध्ये गुलामगिरी कायद्याने रद्द करण्यात आली. अशा पद्धतीने गुलामगिरीचा अंत झाला असला, तरीही तिथे वर्णद्वेष व विषमता मात्र अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कायम राहिली. या विषमतेच्या विरोधात डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, माल्कम एक्स अशा अनेक नेत्यांनी लढा दिला. त्या प्रदीर्घ लढ्याला अखेरीस यश मिळालं व वर्णद्वेषाचं विष समाजातून हळूहळू नष्ट होत गेलं.
अमेरिका हा देश अनेक कारणांमुळे वेगवेगळ्या युद्धांमध्ये ओढला गेला आहे किंवा अनेकदा युद्धांना कारणीभूत ठरला आहे. दोन्ही विश्वयुद्धांत अमेरिकेचा महत्त्वाचा वाटा होता. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर हा देश एक जागतिक महाशक्ती म्हणून पुढे आला. दुसरी जागतिक महाशक्ती म्हणजे सोव्हिएत युनियन ऑफ रशिया होती. या दोन महाशक्तींच्या शीतयुद्धात अनेक देश नाहक भरडले गेले, कोरिया, व्हिएतनाम व अफगाणिस्तान इथे व इतर अनेक ठिकाणी शीतयुद्धाच्या छायेखाली खरीखुरी युद्ध झाली. जसजशी ही युद्धं लांबली तसतशी अमेरिकन लोकांची युद्धाबद्दल निष्ठा कमी होत गेली आणि व्हिएतनाम युद्धाच्या वेळेला अमेरिकेतली तरुणाई युद्धविरोधी प्रदर्शन करायला रस्त्यांवर उतरली.
१९६९मध्ये न्यूयॉर्क राज्यातील वुडस्टोक नामक गावी तरुणाई जेव्हा संगीत महोत्सवासाठी जमली तेव्हा तिथे संगीताच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने युद्धविरोधी भावनांना वाट करून दिली गेली. जिमी हिंड्रिक्स नावाच्या सुप्रसिद्ध गिटारवादकाने अमेरिकन राष्ट्रगीत गिटारवर वाजवलं; परंतु ते नेहमीप्रमाणे लयीत न वाजवता त्यात अनेक चढउतार घालून व मध्ये मध्ये कर्णकर्कश स्वर लावून वाजवलं. अशा प्रकारे एकही शब्द न बोलता त्याने त्या काळाची अस्वस्थता जणू आपल्या वादनातून स्पष्ट केली. ज्या राष्ट्रगीतात वीररस ठासून भरलेला आहे आणि जे संपूर्णतः युद्धभूमीचं वर्णन आहे, तेच शांततेच्या मागणीसाठीही वापरलं गेलं.
अमेरिका हा शब्द अनेक लोकांसाठी अनेक स्वप्नं घेऊन येतो. असंख्य लोक नव्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेत आले आहेत, असं अमेरिकेचा इतिहास सांगतो. पण जशी देशांतरित लोकांची संख्या वाढत गेली तसतसा नवीन लोकांच्या प्रवेशाला विरोधही वाढला. देशांतरित लोकांमुळेच बनलेल्या या देशात नव्या देशांतराला थांबवण्यासाठी कठोर कायदे करायची मागणी वाढू लागली. त्यातूनच चीन, मेक्सिको या देशांतील स्थलांतरित लोक वर्णद्वेषाचे बळी ठरू लागले.
असं असूनही आजही अमेरिका मोठ्या प्रमाणात देशांतरित लोकांचा स्वीकारच करते व लोकांना एक चांगलं आयुष्य देऊ करते. या अर्थाने त्याची 'स्वातंत्र्याची भूमी' ही ओळख सार्थच ठरते. केन बर्न यांनी दिग्दर्शित केलेल्या एका माहितीपटातील एक गीत अमेरिकेची संकल्पना सुरेख शब्दांत व्यक्त करतं
'जिथे स्वातंत्र्य जपले जाते, त्या देशाचे स्वप्न शेकडो वर्षांच्या अथक प्रयत्नांतून व वाडवडिलांच्या कष्टांतून साकार झाले आहे.
त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला वारसात मिळाल्या आहेत, ज्या आपल्याला नव्या पिढीला सुपूर्त करायच्या आहेत.
माझे आयुष्य संपताना माझ्या मनात हीच भावना असावी, की देशाबद्दल माझे कर्तव्य पुरे करताना मी कुठे कमी पडलो नाही.
हे अमेरिका, मी माझे सर्वस्व व सर्वश्रेष्ठ तुला सुपूर्त करत आहे'.
(अनुभव, जुलै २०१६च्या अंकातून साभार.)
