'दशावतार' हे चित्रपटाचं नाव कोकणातील लोककलेचं प्रतिनिधित्व करणारं आहे. सण-उत्सवाच्या काळात कोकणी लोक वर्षानुवर्षं दशावताराच्या माध्यमातून पुराणातील कथांचं नाट्यसादरीकरण करत आले आहेत. सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने घेतलेले दहा अवतार ही दंतकथा दशावतारांमागे आहे. त्यानुसार रामायण, महाभारतातील प्रसंग रंजक पद्धतीने साजरे केले जातात. कोकणात होळी, गणेशोत्सव, नवरात्र, महाशिवरात्र, राम नवमी, हनुमान जयंतीच्या दिवसांत दशावताराचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर होतात. या लोककलेच्या परीघामध्ये कोकणातल्या सामान्य माणसाची कथा गुंफणारा सिनेमा म्हणजे 'दशावतार'.
पूर्वापार संस्कृतीचा अभिमान असलेला आणि कोकणच्या निसर्गाच्या रक्षणासाठी पुढे आलेला सामान्य कोकणी माणूस ही चित्रपटाची मध्यवर्ती थीम आहे. मागील काही वर्षांत कोकणात जे विकासप्रकल्प आणण्याचे प्रयत्न झाले, त्यामागील राजकारणाचे पदर 'दशावतार'मध्ये अलगदपणे उलगडून दाखवण्यात आले आहेत. निसर्गाला देव मानणाऱ्या कोकणी माणसांची 'राखणदार' ही कल्पना त्यासाठी वापरली आहे. कुणी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं, त्रास द्यायचा प्रयत्न केला तर राखणदार त्याच्याकडे बघून घेईल या प्रचलित समजाचा चित्रपटात उत्तम उपयोग केला गेला आहे.
बाबूली मिस्त्री हे दशावतार सादर करणारं चित्रपटातलं पात्र. दिलीप प्रभावळकर यांनी हे पात्र ताकदीने उभं केलं आहे. निसर्गाची समृद्धी असली तरी रोजगाराच्या पुरेशा संधी नाहीत ही कोकणवासीयांची दुखरी नस. मग रोजगाराच्या शोधात गाव सोडून मुंबई गाठायची हा बऱ्याच जणांचा ठरलेला प्लॅन. बाबूलीचा मुलगा माधवसुद्धा (सिद्धार्थ मेनन) याच द्वंद्वात अडकलेला. शिकूनसुद्धा म्हणावी तशी नोकरी नाही, त्यामुळे वडिलांच्या भरवशावर जगावं लागतंय ही खंत त्याला वाटत असते. आपले वडील म्हातारे झाले आणि त्यांना तब्येतीच्या अडचणी असल्या तरी ते दशावतार करणं थांबवत नाहीत याचं माधवला वाईट वाटत असतं. मात्र दशावतार हा वडिलांचा प्राण आहे याचीही जाणीव त्याला असतेच. माधवला नोकरी लागली की बाबूली दशावतार प्रयोग थांबवेल, असं दोघांच्या बोलण्यातून ठरतं.
पुढे गावाचा सरपंच असलेला तांडेल (रवी काळे) गावाला लागूनच असलेल्या खाणीमध्ये माधवला कामाला लावतो. माधवला नोकरी लागावी अशी बाबूलीची अपेक्षा असली तरी खाणीतलं काम म्हणजे निसर्गाच्या विरोधातलं काम असं त्याला वाटत असतं. त्यामुळे तो माधवला या नोकरीचा पुनर्विचार करायला लावतो. तेव्हा वडिलांच्या प्रेमाची, तळमळीची जाणीव असलेला माधव त्यांना 'निसर्गाच्या विरोधातलं काहीही इथं घडलं तर मी काम सोडेन' असं वचन देतो.
माधवला नोकरी तर लागते, पण मग बाबूली दशावताराचे खेळ थांबवतो का? खाणीच्या कामात नेमकं काय चालू असतं? माधव पुढे काय करतो? हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल. आसपासच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीविषयी जागरूक असलेल्या प्रेक्षकांना तर हा सिनेमा भावेलच पण त्याविषयी अनभिज्ञ असणारे सामान्य प्रेक्षकही दाद देतील अशी 'दशावतार'ची निर्मिती झाली आहे.
चित्रपटात महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, लोकेश मित्तल या मंडळीनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेला बाबूली आणि बाबूलीने साकारलेल्या दशावतारातील व्यक्तीरेखा दीर्घकाळ प्रेक्षकांच्या आठवणीत राहतील. यम, हनुमान, भीष्म, कृष्ण, वराह, नरसिंह, मत्स्य रूपातील दिलीप प्रभावळकर चित्रपटात पाहणं ही पर्वणी आहे. चपळ हालचाली करणारा, प्रसंगानुरूप भावनिक, मजेशीर आणि जशास तसं वागणारा कोकणी बाबूलीही प्रभावळकरांनी लीलया साकारला आहे.
कोकणच्या मातीत ४५ दिवसांचं शूटिंग करून हा चित्रपट तयार झाला आहे. निसर्गसमृद्ध कोकण प्रत्येक फ्रेममध्ये दिसून येतं. कोकणातील कातळशिल्प, समुद्रकिनारा, नारळाच्या आणि आंब्याच्या बागा, माती, जंगल हे सगळं मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. सिनेमॅटोग्राफर देवेंद्र गोलतकर यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून कोकणाचं विलोभनीय दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहेच, शिवाय व्यक्तिरेखांचे क्लोजअप, प्रकाश-सावल्या यांचा कथनामध्ये उत्तम वापर केला आहे. ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांच्या संगीताने भयसूचकता, गूढता, नैसर्गिकता जपत पूरक वातावरणनिर्मिती केली आहे.
चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच सिनेमा. कातळशिल्प हे कोकणचं वैभव अलीकडच्या काळात इतिहास आणि पुरातत्व संशोधकांमुळे जगासमोर येऊ लागलं आहे. त्याच्यावर संशोधन पेपर, पुस्तकंही आलीत. चित्रपटात तो देवाचा अधिवास असल्याची कल्पना करून त्याचा संबंध निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला असल्याचं जाणवतं.
या चित्रपटाची तुलना कन्नड भाषेतील 'कांतारा' या ऋषभ शेट्टीदिग्दर्शित चित्रपटाशी करण्याचा प्रयत्न झाला. अर्थातच जल, जंगल, जमीन आणि एकूणातच निसर्गरक्षणासाठी एकवटलेले सामान्य लोक ही दोन्ही चित्रपटांची मध्यवर्ती संकल्पना आहे. हे करत असताना आपापल्या भागातील सांस्कृतिक गोष्टींचा आधार हीसुद्धा दोन्ही चित्रपटातील कॉमन गोष्ट. मात्र तरीही 'दशावतार' हा कांताराची कॉपी नक्कीच वाटत नाही.
मागील काही दशकांत वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांनी दाभोळ, जैतापूर, नाणार, बारसू याठिकाणी अनेक प्रकल्प आणण्याचे प्रयत्न केले. पण तिथल्या सामान्य लोकांना विश्वासात घेऊन हे प्रकल्प व्हावेत असं स्थानिकांचं म्हणणं असतं. प्रकल्पातून मिळणारा पैसा आणि धनाढ्य उद्योगपतींचा उत्कर्ष एवढ्यापुरताच एखाद्या प्रदेशाचा विकास सीमित असेल तर आम्हाला हा विकास नकोय असंच ते म्हणत असतात. 'दशावतार'ने स्थानिकांची हीच भूमिका मांडली आहे.
'दशावतार' चित्रपटाचे शो हाऊसफुल चालले आहेत. ऐंशी वर्षांच्या दिलीप प्रभावळकरांनी 'ताकदीचा कलाकार थिएटरमध्ये गर्दी खेचू शकतो', हे या निमित्ताने दाखवून दिलंय. 'दशावतार'च्या टीमने या सिनेमाच्या माध्यमातून एक स्टेटमेंट सुद्धा केलं आहे. भूमिका न घेणाऱ्या सामान्य माणसाला ढोसणी देणारं हे काय स्टेटमेंट आहे हे थिएटरमध्ये जाऊनच बघायला हवं.
