आम्ही कोण?
काय सांगता!  

रोमा- भारतातून जगभर पसरलेले लोक

  • गौरी कानेटकर
  • 10.03.26
  • वाचनवेळ 2 मि.
roma people

आर्य भारतातून बाहेर गेले की बाहेरून भारतात आले, यावर आपल्याकडे गेली शंभर वर्षं वाद-विवाद सुरू आहेत. आर्य भारतातून बाहेर गेले आणि त्यांच्यासोबत गेलेली संस्कृत ही भाषाच युरोपातल्या इतर इंडो-युरोपीयन भाषांची जननी आहे, असं सतत मांडलं जात असतं. ते तसं नसल्याचं आता शास्त्रीय़ पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. इ. स. पूर्व २००० ते इ. स. १५०० या काळात, म्हणजे हडाप्पा संस्कृती लयाला जात असण्याच्या काळात मध्य आशियातील कझाकच्या गवताळ प्रदेशातून पशुपालक माणसं सध्याच्या तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान इथे आली आणि मग भारतात पोहोचली. त्यांना आर्य असं म्हटलं जातं.

हेही वाचा - जागतिक स्थलांतरितांमध्ये भारतीय सर्वाधिक, पण त्यांच्याबद्दलचे अभ्यास मात्र तुटपुंजे

आर्य मूळ भारतातले नसले तरी भारतातून युरोपात गेलेली एक जमात आहे. पूर्वी जिप्सी म्हणून ओळखली जाणारी ही जमात युरोपात, तसंच अमेरिकेच्या काही भागांमध्ये परसलेली आहे. त्यांना आज रोमा किंवा रोमानी म्हणून ओळखलं जातं. आजच्या पंजाब-सिंध-राजस्थान-हरियाणा या भागातील काही लोक सुमारे १५०० वर्षांपूर्वी (इ. स. ५०० च्या सुमारास) भारतीय उपखंडातून बाहेर पडले आणि युरापोत, तसंच नंतर अमेरिकेतही पोहोचले. या लोकांच्या डीएनएची चाचणी केली असता त्यात त्यांच्यामध्ये आणि आफ्रिकेतून आलेल्या मूळ भारतीयांमध्ये समान जनुकीय अंश असल्याचं सिद्ध झालं आहे.

आज जगभरात सुमारे ४० लाख ते सव्वा कोटी रोमा लोक आहेत, असं मानलं जातं. ते अमेरिका, ब्राझील, रशिया, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यासह युरोपमधील अनेक देशांत पसरलेले आहेत. मुळात भटके असणारे हे लोक रोमानी भाषा बोलतात. या भाषेचं मूळ इंडो-युरोपीयन भाषा कुटुंबातच आहे.

गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com

गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results