आम्ही कोण?
ललित 

माझ्या कोकणातला लाल-तांबडा

  • विक्रम परांजपे
  • 17.02.26
  • वाचनवेळ 4 मि.
vikram paranjape

पूर्वी गावातल्या सडकी लालबुंद शेंदरी होत्या. गाडीतून उतरलं की पायतळी लाल धूळ लागली की गावात आल्यासारखे वाटे. आठवणीतले निरनिराळे वास आणि रंग अगदी आत जाणवू लागत. गडगे, साकव, घाट्या अगदी स्वच्छपणे आठवू लागतं. आमच्या तळकोकणात एक सडा सोडला तर खाली उतरत गेलेली गावं हिरव्या रंगात बुडालेली. अगदी अंगणातच कोपऱ्यात वडिलोपार्जित फणस आणि आंब्याची कलमं, फुलांसाठी असलेले कवठी आणि इतर असेच चाफे, जास्वंदी. पुढे आगरातल्या केळी, पोफळी, माड यामुळे उगवतीच्या बाजूला गडद हिरवी भिंतच उभी असे.

आणि अशातच तांबड्याजर्द पायवाटा त्यातून पळालेल्या असत. गडद हिरव्याबरोबर या तांबड्या रेषा कमालीच्या उठून दिसत. आमची तांबडी बरडमातीसुद्धा हजारो तांबड्या छटा ल्यालेली. सड्यावर शेंदरी होऊन पिवळ्याला आपलसं करून खाली गावात बावीजवळच्या डोणीत जांभळी होऊन निळ्याशी संगत करणारी; पण रंगांचा एवढा पसारा सांभाळताना आपला तांबडा मूळ रंग न सोडणारी. बाजूच्या पडीक आगारातून करड्या गवतातून जाताना वाटेला काही ठिकाणी हळद फुटे. एवढ्या एवढ्या मुठीएवढी पिवळी भुकटी वर येई. पण देवळाकडे जाणाऱ्या चिऱ्याच्या पापडीवर मात्र मध्येच गुलालाने सारवलेली होई. वाडीतल्या वारंवार सारवलेल्या घरांवर नारिंगी पुटं चढत, आणि आडबाजूला न नाष्टांश झालेल्या भिंती आपल्या तांबड्या रंगाने, कुजत जाऊन पांढऱ्याधोट आणि हलक्या झालेल्या लाकूडकामाशी गेला काळ रंगवीत राहत.

तांबड्याला पटकन लाल म्हटलं जातं. तांत्रिकदृष्ट्या ठीक आहे. पण तांबडा आणि लाल या शब्दातील अभिव्यक्ती वेगळी आहे. आसक्ती आणि अनासक्ती इतका त्यात फरक आहे. तांबड्याच्या पोटजातीत तांबूस, मातकट, मळखाऊ इत्यादी आप्तगण आहेत, पण लाल मात्र डाळींबी, गुलबक्षी, जास्वंदी अशा तोलदार श्रीमंतांच्यात उठबस करणारा आहे.

हेही वाचा - धागा धागा रेखाटताना

लालतांबड्यांच काय पण कोणत्याही रंगाची संवेदना बाजूच्या रंगसंगतीवर अवलंबून असते. आजुबाजूच्या रंगामुळे एखादा रंग उमटतो तरी; नाहीतर खटकतो तरी. चैत्राच्या मध्यावर आतून अनिवारपणे फुटणारी जास्वंद... गच्च लाल निबीड रंगात बुचकलेले गोंडे असावेत अशी फुलं. नवतीने रसरसलेल्या एखादीची तारुण्याचा भार सोसताना, सांभाळताना त्रेधा व्हावी तशी जास्वंद! आणि त्याचवेळी खळात जमलेल्या गड्यांची पान खाऊन तांबडीबुंद, ओली झालेली रसरशीत तोंडे... तांबडे डोळे आणि दाताभोवती लाल रेषा.

वसंताचं कितीही गोजिरवाणं, गोंडस वर्णन केलं तरी वसंत खऱ्या अर्थाने आयुष्यावर उमटतो तो अशाच वेळी, लालबुंद होऊन.. वसंताचं असं ओंगळवाणं भेसूर पण तितकंच आकर्षक आणि आसक्त रूप. मनामनात दबलेलं काळ्या दुहेरी जिभेचं लवलवणारं पाप समोर आणणारं.

पण एकदा मात्र या तांबड्याचं विजोड रूप पाहिलंय. सुट्टीला गावी आल्यानंतर घरातल्या पुरातन वस्तू पुन्हा नव्या नजरेने पाहताना पटकन दाते की निर्णयसागर पंचांग दिसलं. आमच्या जुन्या जीर्ण घरात ते अतिशय विचित्रपणे चमकत होतं, लाल कडांना घेऊन. रंगांची संवेदना त्याच्या आजूबाजूवर अवलंबून असते हेच खरं...

हेही वाचा - चित्रकलेशी जडले नाते

सुट्टीला घरी आलं की पूजा माझ्याकडेच असे. माजघरात एका कोपऱ्यात आमचे देव होते. मऊभात- आंबे, हा महत्त्वाचा अजेंडा झाला की पूजा होईपर्यंत साडेबारा वाजून जात. बाहेर उन्हाचा आकांत. नुकत्याच झालेल्या गार पाण्याच्या अंघोळीने निवलेली कानशिलं. पूजा झाल्यानंतर निरांजनाच्या प्रकाशात उजळून गेलेली जास्वंद आणि त्यामुळेच की काय कृतार्थ झालेली बाहेरची दुपार.

लाल रंगाची परिपूर्णता आता जाणवते. आसक्तीचा लवलेश नसलेली सोवळ्याच्या लाल कदासारखी.

vikram paranjape

रंगांचा खरा मेळा आमच्या उत्सवात दिसे. आमच्या ग्रामदैवताचा उत्सव पाच दिवस चाले. शेवटच्या दिवशी त्रिपुरीपौर्णिमेला समाराधना आणि रात्री मोठी जत्रा. खरं तर तिसऱ्या-चौथ्या दिवशीच पालं नटायला सुरुवात होई. त्यात साखरेची घरं आणि कोंबडे. आम्हा भटाच्या पोरांना घरंच मिळत. कोंबडा खाऊ देत नसत. निरनिराळ्या पिपाण्या, टोप्या. पिपाणीच्या डोक्यावर पिसांचा रंगीत फवारा असे. एक मोठं आणि एक लहान अशी दोन पिसं अडकवलेली ती पिपाणी वाजवण्यापेक्षा न्याहाळण्यातच व्ोळ जाई. शुभ्र पांढऱ्यासोबत असा कोणताही तीव्र रंग आला की विलक्षण निरागस आणि विशुद्ध वाटतो. त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे जत्रेत मिळणारी साखरफुटाण्याची पुडी. दहा-बारा साखर फुटाण्यांसोबत कपचीसारखी साखरेची रंगीत वडी असे. नव्याकोऱ्या पांढऱ्या फुटाण्यांसोबत ती अशी दिसे, की जीव एवढा एवढा होई.

हेही वाचा - सुभाष अवचट : अमूर्ताच्या शोधात चित्रकार

या सगळ्यात लाल मात्र विलक्षण अंग चोरून असे. घरातली प्रौढ व्यक्ती पाहुणे आल्यानंतर नेहमीचा शिस्तीचा बाणा सोडून थोडी मवाळ व्हावी तसं या लाल रंगाचं जत्रेत होई. आमच्या कोकणात कोकमापासून लोणच्यापर्यंत आणि ऊसळीपासून सारापर्यंत अधिराज्य गाजवणारा लाल ते चार-पाच दिवस मवाळ होई. चार-पाच दिवस रंगांची ऊतमात दिवाळी होई.

पाचव्या दिवशी समाराधना त्रिपुर पाजळणं, पुरुषांची लोटांगणं, दुपारी वडेघटल्याचं जेवण, रात्री पालखी बाहेर पडायलाच दीडदोन वाजून जात. देवस्थानचा वर्षभराचा आढावा वाचला जाई. गावातल्या ठळक घटनांवर बोललं जाई. मग बुवा कीर्तनाला उभे राहत. लळिताच्या कीर्तनात रंग भरे. आळवून आळवून चाललेलं कीर्तन पहाट होईपर्यंत चाले. पेंगुळलेली लेकरंबाळं घेऊन बसलेल्या बाया जागेवरून हात जोडत आणि शेवटी ‘हेचि दाऽन देगा देवा’ बुवांनी अशी आर्त हाक दिली की प्राण ओथंबून येत. मन पिसासारखं हलकं होई. उत्सव संपला, तीर्थ, बेलपत्र घेऊन माणसं कुजबुजत निघत आणि थोड्याच वेळात उगवतीला लालबुंद कडा उमटे.

विक्रम परांजपे | 8530159968 | vparanjape75@gmail.com

प्रा. विक्रम परांजपे चित्रकार आणि लेखक असून देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन (डीकॅड) इथे ते विभागप्रमुख म्हणून काम करतात.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 6

prasanna joshi22.02.26
सुंदर. तांबडी आणि लाल या अभिव्यक्तीचे शब्दांकन खास

भिडे काका 19.02.26
अत्यंत अप्रतिम लेख लहानपणी लवकर संपत डोंगर उत्तराच्या शेवटी व्हाळ असत आता काळाच्या ओघात ते फार उथळ झालेत पण त्यातील वेगळा वेगळ्या रंगाचे दगड निवडून ते शानेवर घासून त्याकलरने मी चित्र रंगवायचास या लेखामुळे ती आठवण उफाळून आली विक्रमने कोकणातील निसर्गाचाअभ्यास करून त्याची उत्तम प्रकारे मांडनी केली आहे शेवटी तो हाडाचा चित्रकार मग काय तो रंगातच हरवणार लेख अत्यंत सुंदर तुझाच दोस्त उदय भिडे

दिपक गजानन जोशी 18.02.26
अत्यंत सुंदर ओघवत्या भाषेतील कोकणचे वर्णन वाचून मन सुखावले. परांजपे सरांच्या ब्रशची किमया माहिती आहेच पण लेखणीत ही कौशल्य आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यांच्याशी बोलतांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील खट्याळपणा ही जाणवतो. लाल व तांबडा रंग याबाबतचे विवेचन खूपच भावले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात या लाल तांबड्याच्या सर्वच छटा आहेत हे खरे.तांबडा रंग हा सुर्योदय व सुर्यास्तातही आपले मन रिझवत असतो.हाच लाल तांबडा सरांच्या ही आयुष्यातील सर्व क्षेत्रात त्यांना उन्नती देत राहो याच सदिच्छा. दिपक जोशी, देवरूख

MEGHA DEEPAK CHANDORKAR18.02.26
संवेदनशील मनातून चितारलेली चित्रे आणि वर्णन मन अधिक संवेदनशील करतात!!!

Leena Adhav 17.02.26
अप्रतिम

Narendra V. Kumthekar Narendra17.02.26
रंगांची भाषा सांगणारी चित्र बोलकी की शब्द... दोन्हीही तेवढ्याच ताकतीचे... खरंच अप्रतिम 👌👌

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results