
तामिळनाडूतल्या मायिलादुम्पराई इथल्या पुरातत्व उत्खननांमधून लोहयुगासंदर्भातली एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.
मायिलादुम्पराई हे ठिकाण पुरातत्व उत्खननांच्या दृष्टीने महत्त्वाचं मानलं जातं. दोन वर्षांपूर्वी तिथल्या उत्खननात सिरॅमिकची दीडशेहून अधिक पुरातन भांडी मिळाली. त्यांतल्या एका भांड्यात हाडं, खापराचे तुकडे, कोळसा आणि लोखंडी तुकडे असल्याचं दिसून आलं. तसंच तिथे लोखंडी कुर्हाडींचेही अवशेष मिळाले. या अवशेषांच्या पुरातत्व अभ्यासाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यानुसार, या वस्तू किमान पाच हजार वर्षांपूर्वीच्या असल्याचं निष्पन्न झालं आहे.
लोखंडाच्या खनिजापासून शुद्ध लोखंड मिळवण्यासाठी १२०० ते १४०० डिग्री से. इतक्या तापमानाची आवश्यकता असते. (Iron smelting) धातूविज्ञानातलं हे मूलभूत तंत्र इथल्या मानवाला तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीही अवगत होतं. याचा अर्थ, तेव्हा तिथे लोहयुग अवतरलेलं होतं.
आतापर्यंत असं मानलं जात होतं, की भारतात इ.स.पू. १५०० ते २००० दरम्यान लोहयुग होतं. मात्र मायिलादुम्पराई इथल्या अभ्यासामुळे भारतीय लोहयुगाचा काळ तब्बल दोन हजार वर्षांनी मागे गेला आहे. थोडक्यात, हे ठिकाण म्हणजे जगभरातलं सर्वात पुरातन लोहयुगीन वस्तीचं ठिकाण बनलं आहे.
भारतीय पुरातत्व अभ्यासाला यामुळे कलाटणी मिळू शकते.
मायिलादुम्पराईतला मानव जेव्हा लोखंडाच्या वस्तू घडवत होता तेव्हा विंध्याचलाच्या उत्तरेकडे सिंधू संस्कृतीत ताम्रयुगाचा काळ सुरू होता. पण अभ्यासकांच्या मते, विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तांब्याचे साठे मर्यादित असल्यामुळे तिथला मानव लोखंडाचा उपयोग करण्याकडे वळला असावा.
मायिलादुम्पराईच्या उत्खननात चित्राकृती असणारे खापराचे तुकडे सापडले आहेत. या चित्रशैलीचं सिंधू संस्कृतीतील चित्रकलेशी साधर्म्य आहे. म्हणजेच या दोन्ही ठिकाणच्या मानवांमध्ये काही सांस्कृतिक देवाणघेवाण झाली असावी, असंही अभ्यासकांचं म्हणणं आहे.
एक लक्षात घ्यायला हवं, की काही वेळा हे निष्कर्ष तात्पुरत्या स्वरूपाचे असू शकतात; त्यांवर सखोल मंथन होणं गरजेचं असतं. येत्या काळात ते होईलच. पण मानवी उत्क्रांतीच्या कथानकात आजही अनेक रहस्यं दडलेली आहेत, हे मात्र नक्की.
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.