आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

माणसांमधली मजा

  • निळू दामले
  • 19.09.26
  • वाचनवेळ 11 मि.
manasanmadhali maja

इस्तंबूलमधे पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. प्रवासाने दमलो होतो. त्यामुळे रात्री जेवण आणि मौज करायचं ठरलं. कोण्णालाही फोन केला नाही की दुसऱ्या दिवशी कामाची वेळ ठरवली नाही.

सकाळी उठल्यावर एक फोन केला. फोन कोणी उचलत नव्हतं. दुसरा फोन केला. तो माणूस परगावी गेला होता, दोन दिवस येण्याची शक्यता नव्हती. तिसरा फोन केला. एक महिला. तिलाही दोन दिवस वेळ नव्हता. या सगळ्यांपैकी कोणाचीच माझ्याशी पूर्वओळख नव्हती. मी येणार हेही त्यांना माहीत नव्हतं. सगळा मटका होता. आकडा लागला तर लागला. मी नाद सोडून दिला. 

कॅमेरा खांद्याला लावला आणि बाहेर पडलो. मला इस्तंबूलमधलं ओ की ठो माहीत नव्हतं. अडम तडम करून एक दिशा धरली आणि चालायला सुरुवात केली. चालता चालता समुद्रकिनारा लागला. किनाऱ्यावर रागेने रेस्तराँ होती. सकाळी आठची वेळ होती. कोळी लोक मासे आणत होते आणि स्वच्छ करून स्टॉलवर लावत होते. बेयाझ नावाचं एक रेस्तराँ लागलं. दोन-चारशे वर्ष जुनं होतं. देखणं होतं. एक माणूस हातात मेनू घेऊन बाहेर उभा होता. ताजे ताजे मासे खायला लोकांना बोलावत होता. 

“हे पहा, मी मासे खात नाही. मी शाकाहारी आहे. पण मला तुम्ही हा जो उद्योग करताय तो पाहायची इच्छा आहे. चल, आत जाऊ या” मी त्या मॅनेजरला म्हणालो. 

“तुम्ही काय करता? इथे कसे काय आलात?” त्याने विचारलं. 

“मी काऽऽऽही करत नाही. भटकत असतो. जमल्यास लिहितो. मी बेकार आहे.” मी म्हणालो. 

त्याचा विश्वास बसेना. त्याने आणखी दोघं गोळा केले आणि मी जे सांगितलं ते त्यांना तुर्की भाषेत सांगितलं. 

“लिहिता म्हणजे काय करता?” एकाने विचारलं. 

हेही वाचा - उगवत्या सूर्याचं अरुणाचल

“म्हणजे माणसांबद्दल लिहितो. मला कोणीही माणसं चालतात. पंतप्रधान असो की रेस्तराँमधला वेटर. माणसं सारखीच असतात. त्यांच्या अडचणी, आकांक्षा, इच्छा, आनंद, दु:ख सारखीच असतात. त्यांना पैसे हवे असतात. चिकण्या बायका हव्या असतात. प्यायला फर्स्ट क्लास दारू हवी असते. या गोष्टी मिळवण्यासाठी सारी खटपट चाललेली असते.” मी म्हणालो. 

तिघंही माझ्याकडे आश्चर्याने पाहायला लागले. 

“मग याच्याबद्दल लिहाच. याला आम्ही कॅसानोव्हा म्हणतो. बायका पटवण्यात उस्ताद! याला एक बायको आहे, एक मूल आहे; पण याला दररोज एक नवी बायको लागते.” एकाने सांगितलं. 

“याचंही तसंच आहे. यालाही दररोज एक नवी मुलगी लागते.” ज्याने माहिती दिली होती त्याच्याबद्दल तिसऱ्याने सांगितलं. 

तिघांनी मला रेस्तराँमधे नेलं. तिथे नाष्टा केला. रेस्तराँ आतून पूर्ण दाखवलं. इस्तंबूलचा हा किनारा माश्यांसाठी प्रसिद्ध. जगभरचे लोक संध्याकाळी इथे येतात. माश्यांसाठी आणि बायकांसाठी. 

रेस्तराँमधले सगळे वेटर, शेफ, बार टेंडर, मॅनेजर सर्वजण भेटले. हे सगळे होते कुर्ड. तुर्कस्तानात कुर्ड अल्पसंख्य आहेत. त्यांना स्वतंत्र देश हवा आहे. त्यांचं फुटीरतेचं आंदोलन चाललेलं आहे. हेच कुर्ड इराकमधे आणि इराणमधेही आहेत. त्या तीनही देशांतले कुर्ड एकत्र येऊन एक देश स्थापन करण्याच्या खटपटीत आहेत. सद्दाम, इराणचा खामेनी आणि तुर्की राज्यकर्ते यांना चेपून काढत आहेत. कुर्डांनी आता दहशतवादाचा रस्ता धरला आहे. हजारो कुर्ड तुरुंगात छळ सोसत आहेत. लाखो कुर्ड मारले गेले आहेत. 

बेयाझ हॉटेलमधे कुर्ड दहशतवादी कार्यकर्ते कधी कधी येत असत.

बेयाझमधे या कुर्ड मंडळींशी माझी मैत्री झाली. एक वेळा त्यांनी मला दुपारचं जेवण दिलं. एक रात्री डिनर दिलं. त्या वेळी मला खास इस्तंबूली वातावरण अनुभवायला मिळालं. या मित्रांनी मला त्यांच्या घरात नेलं. ही घरं म्हणजे इस्तंबूलमधल्या गरिबांची घरं होती. एका कुर्ड दहशतवाद्याची भेटही त्यांच्यामुळे झाली. प्रत्येकाने मला त्याची घरकथा सांगितली.

त्यांच्या नादाने किनाऱ्यावरचे दुकानदार, ब्रेड विकणारे, छोटे-मोठे व्यवसाय करणारे भेटले. 

एक इस्तंबूल असतं, जे पर्यटकांसाठी असतं. ज्यात छान रेस्तराँ, दारू, घर सजवण्याच्या वस्तू, प्राचीन वास्तू इत्यादी असतात. एक इस्तंबूल असतं, ज्यात इस्तंबूलमधली तुमच्या- आमच्यासारखी माणसं राहत असतात. एक इस्तंबूल असतं, जे इतिहासातलं असतं. एक इस्तंबूल असतं, जे वर्तमानातलं असतं. 

बेयाझमधले मित्र मला भेटले, मला वर्तमानातलं इस्तंबूल पहायला मिळालं. 

एक दुकानदार. 

तयार कपडे विकणारा एक विक्रेता.

दिवसभर खाणावळीत बश्या धुणारा.

एक किराणामालाचा दुकानदार. 

एक खाटीक.

एक टॅक्सीवाला. 

बायका गाठून देणारा एक माणूस. 

अशी किती तरी माणसं.

भेटतात. न ठरवता. येऊन धडकतात. जणू मी तिथे पोचण्याची वाटच पाहत असतात. 

हेही वाचा - पोलंड : एका देशाचा प्रवास

कंदाहारमधे गेलो होतो तेव्हा कुठे उतरायचं ते ठरलेलं नव्हतं. सामान्यत: तसं ठरवत नाही. शहरात पाऊल ठेवायचं. तिथला फील घ्यायचा. वातावरणाचं म्हणून काही एक म्हणणं असतं. त्यानुसार कुठे उतरायचं ते ठरवायचं. पैसे नसतातच. त्यामुळे जिथे कमीत कमी पैसे पडतील अशाच ठिकाणी उतरायचं. मौलाना नासरी या सरायमधे उतरलो तोही असाच. टॅक्सी गावभर फिरत होती. एका गलबल्याच्या ठिकाणी ती थांबली. अरेबियन नाईट्‌‍समधल्यासारखं वातावरण होतं. लाल-हिरवे-निळे दिवे, जाकिटं- पागोटी घातलेली माणसं, बुरखा घातलेल्या तुरळक स्त्रिया. हातगाड्यांवर पसरलेले खजूर आणि काजू-किसमिसचे ढीग. वा:! मी म्हटलं, इथंच उतरायचं. 

मला मिळालेली खोली म्हणजे मजाच होती. जेमतेम मी आणि माझी बॅग राहत होती. एक कपाट होतं. मला वाटलं की ते कपडे ठेवण्यासाठी असावं. उघडलं, तर आत आदल्या दिवशी कोणी तरी ठेवलेले नानचे तुकडे होते. खोलीतला दिवा इतका मिणमिणता होता की समईसुद्धा बरी. वेटर म्हणाला, साहेब, येवढा दिवा चालतोय तेही नशीब समजा. दिवे केव्हाही जातात. तासन्‌‍तास येत नाहीत. 

मौलाना नासरी अफगाण युद्धात पार नष्ट झालं होतं. मी पहिल्या मजल्यावर राहत होतो. दुसरा मजला उद्ध्वस्त होता. मी राहत होतो तो भाग म्हणजे मुजाहिदांचा अडड्ा होता. अमेरिकी सैन्य आणि मुजाहिद यांच्यात तुंबळ मारामारी झाली होती. कोणाला मी भेटायला बोलावलं तर या भागात यायलाही लोक टरकत होते, कारण हा तालिबानांचा बालेकिल्ला मानला जात होता. 

माझ्या हॉटेलचा मालक होता अब्दुर्रहमान. अफगाण यादवी युद्ध चाललं होतं तेव्हा तो पाकिस्तानात पळून गेला होता. अमेरिकी तालिबानच्या शेवटल्या दिवसांत तो कंदाहारमधे परत आला होता. अब्दुर्रहमान चांगलाच कडवा होता. त्याने जी माहिती मला दिली त्यावरून त्याचे आणि तालिबानांचे जवळचे संबंध होते असं वाटत होतं. त्याच्याशी माझं दररोज चांगलंच भांडण व्हायचं. नंतर त्याला माझ्याविना चैन पडत नसे आणि मला त्याच्याशी तंडल्याशिवाय दिवस बरा गेल्यासारखं वाटत नसे.

अब्दुर्रहमानच्या हॉटेलवर महंमद नावाचा एक वेटर होता. त्याला मी दररोज एक इंग्रजी वाक्य शिकवत असे. त्या बदल्यात तो मला गावातल्या लोकांकडे घेऊन जात असे. तालिबानच्या हातून मार खाल्लेले अनेक लोक मला महंमदमुळे भेटले. कंदाहारमधे काय, साऱ्या अफगाणिस्तानात अजूनही तालिबान शिल्लक आहे. त्यामुळे कोणी बोलायला धजत नव्हतं. 

आणि काबूलमधे मला फरहाद भेटला. असाच. माझ्यावर आदळलाच. त्याने मला त्याचं घर, नातेवाईक, मित्र तर भेटवलेच, पण तालिबही भेटवले. 

इंडोनेशियात पेकन बारू नावाच्या एका जिल्ह्याच्या ठिकाणी होतो. परग्रहावर आल्यासारखंच वाटत होतं. रोमन लिपीत बहासा इंडोनेशियात पाट्या लिहिलेल्या होत्या. दिशेचाही पत्ता लागत नव्हता. 

नेहमीसारखा अडम तडम करत फुटेल त्या वाटेने निघालो होतो. 

एकदम मनात आलं, की विद्यापीठात जावं. 

चौकशी करायला सुरुवात केली. एक्कालाही इंग्रजी येत नव्हतं. 

एक मोठ्ठा घुमट असणारी ऐसपैस इमारत दिसली. विद्यापीठासारखी वाटली. तिथे गेलो, तर ते निघालं म्युझियम. तिथे एका ऑफिसात चार-पाच लोक बसलेले होते. त्यांना इंग्रजी येत नव्हतं. युनिव्हर्सिटी हा शब्दही त्यांना कळत नव्हता. मी इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करत असल्याने ते माझ्याशी आदराने वागत होते. 

मी गंमत केली. एक कागद घेतला. जगाचा नकाशा काढला. त्यावर भारत काढला आणि इंडोनेशिया काढला. भारतावर फुल्ली करून सांगितलं, की मी भारतातून आलो. नंतर मुंबईवर खूण केली. त्यांना मजा वाटली. मग अभ्यासवर्ग घ्यावा तसं मलाया- इंडोनेशियातून कशा प्रकारे मसाल्याचा व्यापार होत असे ते नकाशात दाखवलं. दोस्ती झाली. मग युनिव्हर्सिटी या शब्दाची वेडीवाकडी रूपं करून उच्चारली. त्यात युनिवर्सिटा असं काही तरी म्हणालो. तर नेमका तो शब्द इंडोनेशियन भाषेत होता. त्यातल्या एका बाईने आनंदाने टाळी वाजवली. तिला कळलं की मला युनिव्हर्सिटीत जायचं होतं. त्यांनी आग्रहाने मला चहा पाजला आणि एक माणूस माझ्याबरोबर दिला. त्याने मला रस्ता ओलांडून योग्य त्या बसच्या स्टॉपवर उभं केलं. बस आल्यावर बसमध्ये बसवून दिलं आणि कंडक्टरला सांगितलं, की माझ्याकडून पैसे घेऊ नयेत. बहुधा मी परदेशी प्रोफेसर आहे असं त्यानं सांगितलं असावं असं त्याच्या उच्चारांवरून मला वाटतं.

बऱ्याच दूरवर विद्यापीठ लागलं.

मग विद्यापीठातल्या एका विभागातून दुसऱ्या विभागात असं फिरफिर फिरलो. इंग्रजी येत नसल्याने माणसं घोटाळा करून भलत्याच विभागाकडे पोचवत होती. मला इस्लामिक सायन्स या विभागाची चौकशी करायची होती. शेवटी मी अर्थशास्त्र विभागात पोचलो. त्यातही आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विभागात. गंमत अशी, की त्या विभागाचे प्रमुख हे विद्यापीठाचे व्हाइस चान्सलर होते. मी उडालोच. थोडासा चाचरलो. एकदम अपॉइंटमेंट न घेता व्हाइस चान्सलरला भेटणं बरं नव्हतं, आणि भेटलेच तर काय विचारायचं असाही प्रश्न होता. 

हेही वाचा - फिनलंड: एक आगळा अनुभव

व्हाइस चान्सलर चक्क जागेवर होते. जेवत होते.

त्यांनी मला आत बोलावलं. स्वतःचा डबा उघडा केला. 

इंडोनेशियन माणसाच्या प्रत्येक पदार्थात कसलं ना कसलं तरी मांस असतं. मला तर मांस नको असतं. मी नको म्हणालो.

त्यांनी डबा गुंडाळला. म्हणाले, की चला, तुम्हाला आवडेल अशा ठिकाणी जेवायला जाऊ या. 

गप्पा सुरू. इंडोनेशिया अमेरिकेवर फार अवलंबून आहे; पण लोकांना ते आवडत नाहीय. इंडोनेशियात इस्लामवाद डोकं वर काढू पाहत आहे; पण तो इस्लामवाद आधुनिक आहे. बुरखा न वापरणाऱ्या, दारू- बिरू पिणाऱ्या बायकांचा इस्लाम. फुटीरतावादही इंडोनेशियात मूळ धरतो आहे. पेकन बारू हा प्रांत समृद्ध असल्याने इंडोनेशियातून फुटू पाहत आहे. ॲकॅडमिक अचूकतेने ते माझ्याशी बोलत होते. मीही माझी माहिती त्यांना देत होतो.

एका पश्चिमी रेस्तराँमध्ये जेवलो. नंतर त्यांनी मला त्यांच्या बंगल्यावर नेलं. घरच्या सगळ्यांची ओळख करून दिली. स्वतःच्या घराण्याचा इतिहास तपशीलवार सांगितला. अख्खा दिवस त्यांच्याबरोबर होतो. संध्याकाळ झाल्यावर एका ठिकाणी गेलो. थोडीशी दारू घेतली. “तुमचा हा इस्लाम आपल्याला पसंत आहे बुवा!” मी म्हणालो. ते हसले. 

पुन्हा कधीही विद्यापीठात यावं, त्यांच्या घरी उतरावं, असं एक केव्हाही वापरता येण्यासारखं आमंत्रण घेऊनच मी दिवस मावळल्यावर केरिंची या माझ्या मुक्कामगावी पोचलो.

अशा किती तरी देशांतल्या किती तरी गोष्टी.

काहीही ठरलेलं नसतं. पाठीवर बोचकं घ्यायचं आणि निघायचं. गोष्टी घडत जातात.

आणि देशातही.

एका अभ्यासासाठी वाराणसीमधे गेलो होतो. अगदी ठरल्यासारखंच एक काँटॅक्ट कोसळला. ज्या माणसाला भेटायचं होतं तो गुल झाला, आठवडाभर येणार नव्हता.

कॅमेरा पिशवीत टाकला आणि हॉटेलच्या लॉबीत पोचलो. तिथे काळ्या कपड्यातले कमांडो उभे. ते मला उभंच राहू देईनात. त्यातल्या एका कमांडोशी दोस्ती केली. मुंबई, पत्रकार, लेखक एवढ्या तीन गोष्टी जगात बहुतेक सर्व ठिकाणी उपयोगी पडतात. पण गंमत अशी, की मी पत्रकार आहे, लेखक आहे याचा पुरावा गेल्या तीस वर्षांत जगात कोणीही माझ्याकडे मागितला नाही. माझं एकूण ध्यानच तसं वाटत असावं. इस्रायलसारख्या अत्यंत कडक शिस्तीच्या देशातही दोन-चार वेळा माझं ओळखपत्र न मागताही मला सरकारी पत्रकार परिषदेत प्रवेश देण्यात आला. खरं म्हणजे माझ्याकडे ओळखपत्र आहे हेही मी विसरून गेलोय. तर कमांडोशी दोस्ती झाली. तो म्हणाला, की मायावती त्या हॉटेलमध्ये कोणाला तरी भेटायला येणार होत्या.

त्या वेळी मायावती जोरात होत्या. सगळ्या पक्षांना त्या हाताच्या बोटावर नाचवत होत्या.

‘चला, तुमची भेट करून देतो,' असं म्हणून बळेबळे नंतर मला त्याने मायावतींकडे नेलं.

मायावतींचं राजकारण हा माझा त्या वेळच्या अभ्यासाचा विषय नव्हता; पण त्यांचं वागणं, समोरच्या माणसाला त्या कशा खेळवतात, सत्तेतून येणारा गर्व आणि उर्मटपणा या गोष्टी मला चार फूट अंतरावरून पाहायला मिळाल्या.

मायावती गेल्यावर मी पुन्हा मोकळा. चहाच्या टपरीवर जाऊन चौकशी करायला सुरुवात केली. इथे कोणी नावाजलेलं गाणं-बजावणं करणारा कलाकार राहतो का? वाराणसी हे शहर बिसमिल्ला खान वगैरे लोकांसाठी प्रसिद्ध होतं. 

टपरीवाल्याने कानाच्या पाळीला हात लावला आणि म्हणाला, “पंडितजी पलीकडच्या गल्लीत राहतात.” 

“कोण पंडितजी?” मी विचारलं.

“पंडित किसन महाराज.”

वीज चमकली. तबलानवाज किसन महाराज!

अपॉइंटमेंट नाही, काहीही नाही. मी त्यांच्या घराच्या दरवाज्यावरची कडी वाजवली. 

सुनेने दरवाजा उघडला.

किसन महाराज नुकतेच तयार झाले होते.

आढेवेढे न घेता ते भेटले. भरपूर वेळ. मनापासून बोलले. त्यांनी माझी काहीही चौकशी केली नाही. संगीत हा माझा विषय आहे की नाही हेही त्यांनी पाहिलं नाही. त्यांच्या मनातली व्यक्तिगत आणि सांगीतिक व्यथा त्यांनी मोकळेपणाने सांगितली. त्यांचे राग-लोभ व्यक्त केले. एक माणूस मला अनेक अंगांनी पाहायला मिळाला.

माणूस कोणत्याही पदावर असो, त्याच्या बुडाखाली कोणतीही खुर्ची असो, त्याच्या खिशात कितीही पैसे असोत, त्याच्या जनानखान्यात कितीही बायका असोत, त्याच्या नावावर कितीही कीर्ती असो, शेवटी तो माणूसच असतो. इतर कुठल्याही माणसासारखा.

मोठी माणसं सामान्य माणसाच्या वाट्याला येत नसल्याने त्यांच्याबद्दल कुतुहल आणि आदर निर्माण होतो. सामान्य माणूस आपल्या आसपास वावरत असल्याने तो आपल्याला मोठा वाटत नाही येवढंच.

कुठल्याही देशाची ट्रिप आखणं मला सोपं असतं.

चौकशी करायची ती स्वस्तात स्वस्त तिकिटाची. लंडनला व्हाया मॉस्को गेलं किंवा व्हाया कोलंबो गेलं किंवा व्हाया तेल अवीव गेलं तर पाच-सात हजार रुपये वाचतात. दोन दिवस जास्त खर्च होतात हे खरं. पण त्या निमित्ताने नाना तऱ्हेची माणसंही भेटतात.

तिकीट झालं की संपलं. कमीत कमी कपडे बरोबर घ्यायचे. कॅमेरा आणि लॅपटॉप खांद्यावर लटकावायचा. निघायचं. माणसं भेटत जातात, अशी-तशी कशी असतात तशी. काही वेळा फार वाईट माणसंही भेटतात. अपमान होतो. त्रास होतो. पुढलं विमान पकडून घरी परतावं असंही वाटतं. पण तीच तर गंमत असते. सगळंच आपल्या मनासारखं कसं होणार?

जे चांगलं वाटलं त्यावर लिहायचं. जे वाईट असेल त्याचे उल्लेख टाळायचे.

(अनुभव, जुलै २००४ च्या अंकातून साभार)

निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com

निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results