आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

पोलंड : एका देशाचा प्रवास

  • राजेश्वरी देशपांडे
  • 09.08.25
  • वाचनवेळ 12 मि.
poland-travel-experience

जगातल्या सर्वच देशांमध्ये नव्याने राष्ट्रवाद रचला जात आहे. पूर्वी जिथे कम्युनिस्ट राजवटी होत्या, अगदी तिथेही ही प्रक्रिया उलगडते आहे. पोलंडला नुकत्याच दिलेल्या धावत्या भेटीत या अनुषंगाने दिसलं ते असं होतं.

पु. ल. देशपांड्यांपासून तर रा. भि. जोशींपर्यंत मराठीतल्या अनेक थोर्थोर लेखकांनी प्रवासवर्णने लिहिली. त्यामुळे मराठीतल्या लेखनव्यवहारात थोडीफार का होईना, ‘मुशाफिरी' करू पाहणाऱ्या कोणाही होतकरू लेखकावर प्रवासवर्णन लिहिण्याची जबाबदारी येतेच. शिवाय, प्रवासवर्णनांच्या बळावर थोडक्यात साहित्यिक थोरपण प्राप्त होते, याचीही उदाहरणे मराठीत असल्याने प्रवासवर्णनाचा ‘तारा' (इंग्रजी शाळांतील मुलांना मिळणारा स्टार या अर्थाने) मिळवण्यासाठी होतकरू लेखकांना आणखी प्रोत्साहन मिळते ही देखील आणखी एक बाब.

खरे म्हणजे वर दिलेली दोनही स्पष्टीकरणे या लेखाच्या बाबतीत खरी नाहीत. व्यक्तिगत आनंदासाठी, व्यावसायिक प्रगतीचे गणित जुळवण्यासाठी (आणि ऑक्युपेशनल हजार्ड या अर्थाने व्यवसायनिगडित धोक्यांचा भाग म्हणून) केलेल्या परदेश प्रवासाचे वर्णन वाचकांच्या माथी (ऐन दिवाळीत) मारण्याचे नतद्रष्ट उद्योग सुरू केल्याने वाटणाऱ्या शरमेतून ही स्पष्टीकरणे, समर्थने उद्भवली आहेत.

पोलंड या युरोपातल्या देशाच्या नुकत्याच केलेल्या एका छोट्याशा प्रवासाच्या निमित्ताने त्या देशाच्या आजवरच्या ऐतिहासिक प्रवासाविषयीची काही निरीक्षणे-वर्णने आणि त्याभोवतीच्या प्रश्नांचा धांडोळा, इतकेच खरे तर या लेखाचे महत्त्व. या धांडोळ्यात एका अर्थाने पोलंड महत्त्वाचा आहे असेही नाही. पोलंडप्रमाणेच (विशेषत: पूर्व युरोपातल्या पण खरे तर जगातल्या कोणत्याही) इतर देशांचाही हा प्रवास असू शकतो. पण माझा पोलंडचा प्रवास हे त्या धांडोळ्याचे तात्कालिक निमित्त. म्हणून सुरुवात पोलंडपासून आणि प्रवासवर्णनापासून केली. शिवाय नाही म्हटले तरी दिवाळी अंकात चिकित्सक, कोरडे, धारदार लेख वाचणे कोणाला आवडेल? म्हणून या कोरडेपणाचे कंगोरे बोथट करण्यासाठी- देखील पोलंडच्या प्रवासाचे निमित्त. आणि या निमित्ताचे नमनाला घडाभर तेल.

पोलंडला जाण्याआधी तिथल्या फार थोड्या गोष्टी, माणसे परिचयाची होती. पोलंडचे नाव काढल्याबरोबर माझ्या शाळकरी मुलीने मेरी क्युरीची आठवण करून दिली. तिकीट काढताना वॉर्साच्या विमानतळाचे नाव ‘फ्रेडरिक शाँपे' या प्रसिद्ध संगीतकाराचे असल्याने विस्मय वाटून त्याचे आणखी एक नाव पोतडीत जमा झाले. कामाचे वाचन करत असताना केव्हा तरी झिग्मुंट बाउमन हे प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ (त्यांनी ज्यूंच्या शिरकाणाविषयी केलेल्या लिखाणामुळे) पोलिश आहेत हे लक्षात राहिले होते. तसाच ‘शिंडलर्स लिस्ट'देखील. पण या सर्व नावांपेक्षा पोलंडच्या अलीकडच्या इतिहासाशी जोडलेले सर्वांत ठळक नाव होते ते ‘लेक वालेसा' यांचे. अगदी शाळकरी वयात नाही, तरी सामाजिक चळवळींमध्ये भाग घेण्याच्या आणि जगबदलाच्या राजकारणाने भारून जाण्याच्या ‘संस्कारक्षम' (!) वयात काही पुस्तके ठळकपणे समोर आली होती. त्यातले एक होते अरुण साधूंनी लिहिलेले ‘फिडेल, चे आणि क्रांती' आणि दुसरे होते लेक वालेसांवरचे मराठीतले पहिले आणि एकमेव. पोलंडमधील कम्युनिस्ट राजवटीविरोधी कामगारक्रांतीचे नेतृत्व करणारे लेक वालेसा आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठावरची सॉलिडॅरिटी या त्यांच्या संघटनेच्या नावाची अधिकृत कॅलिग्राफी लक्षात राहिली.

खुद्द पोलंडमध्ये फिरताना मात्र लेक वालेसा कुठेच सापडले नाहीत. पोलिश लोकांनी वॉर्सात आणि मी गेले होते त्या तुलनेने आणखी छोट्या गावात-पोझनॅनमध्येही कम्युनिस्टविरोधातील राजकारणाच्या, कामगारक्रांतीच्या खाणाखुणा जपल्या आहेत. त्यात लेक वालेसा मात्र कुठे नाहीत. ते जिवंत आहेत की मृत याचीही काळजी पोलंडमधल्या फारशा कुणाला पडलेली नाही. जगभरात आणि विशेषत: रशियाविरोधी अमेरिकन वर्तुळात त्यांचे नाव मोठे झाले असले, तरी खुद्द पोलंडमध्ये मात्र त्यांचे राजकारण आणि त्या राजकारणाच्या स्मृतीसुद्धा विझून गेल्या आहेत. या विझण्यामागे एकीकडे लेक वालेसांचा वैयक्तिक राजकीय प्रवास आणि त्यातल्या खाचाखोचा जशा कारणीभूत आहेत, तसाच सोयीस्कर विस्मरणातून घडणारा राष्ट्रवादाचा आणि पोलंडसारख्या राष्ट्रांचा ऐतिहासिक प्रवासही कारणीभूत आहे.

युरोपमधल्या सर्व देशांच्या इतिहासावर दुसऱ्या महायुद्धाची एक गडद काजळी छाया पडलेली आहे. महायुद्धातील तथाकथित जेती आणि पराजित अशा दोन्ही प्रकारची राष्ट्रे या सावलीखाली आजही वावरत आहेत. भारतीयांना हा अनुभव नवा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या वतीने भारतीय सैनिक सामील झाले असले, तरी भारताच्या भूमीला आणि इथल्या बहुसंख्य नागरी जीवनाला या युद्धांची झळ बसली नाही. युरोपीय समाजांची मात्र या महायुद्धांत पुरती ससेहोलपट झाली. युरोपीय आधुनिकतेचा वारसा दिमाखाने मिरवणारी वैभवशाली शहरे उद्ध्वस्त- बेचिराख झाली, अमानुष नरसंहार घडला आणि घरटी एका सैनिकाचा मृत्यू घडून युरोपीय समाजातील प्रत्येक दिवाणखान्यात छायाचित्रांचा आणि स्मृतींचा एक हळवा कोपरा तयार झाला. मागे ऑस्ट्रेलियात काही काळ राहत असताना, पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रेलियाचा ज्यात पराभव झाला त्या तुर्कस्तानातील गलिपोली युद्धाचे सार्वत्रिक स्मरणरंजन, गौरवीकरण सुरू असल्याचे पाहून हसू आले होते; परंतु युरोपमधील युद्धस्मारकांना भेटी दिल्यानंतर या स्मरणरंजनाची दुसरी, दुखरी बाजू ध्यानात आली.

warsaw-uprising-museum

तेव्हा तरणेबांड असणारे आणि युद्धातून नशिबाने वाचलेले परंतु आता चाकाच्याच खुर्चीचा आधार असणारे आणि छातीवर बिल्ल्यांच्या रूपाने युद्धखुणा मिरवणारे किती तरी जण वॉर्सातल्या १९४४मधील उठावाच्या स्मृती जपणाऱ्या संग्रहालयात सापडले. वॉर्सातील हा उठाव म्हणजे नाझी जर्मनी आणि युद्धखोर रशिया या दोहोंपासून पोलंडला वाचवण्याचे अपयशी प्रयत्न होते. ते अपयश पचवून आणि जर्मनीने संपूर्णपणे बेचिराख केलेल्या वॉर्सा शहराचे कल्पक पुनर्निर्माण घडवून पोलंडने आपल्या युद्धकालीन इतिहासावर मात घडवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. वॉर्सा उठावाच्या संग्रहालयाची एकंदर मांडणीदेखील याच प्रयत्नांचा भाग आहे असे दिसेल. एक तर जगातल्या सर्व संग्रहालयांचे रूपांतर आता ‘वस्तु'संग्रहालयांमध्ये झाले आहे आणि त्या संग्रहालयांशी निगडित अनुभवांचेही वस्तूकरण झाले आहे. त्यामुळे वॉर्साच्या या संग्रहालयातला प्रवेशच मुळी तिथल्या (अर्थातच अतोनात महाग) वस्तू विक्री केंद्रातून होतो. युद्धकालीन संभाषण आपल्याला ऐकवणारे फोन, काचेच्या लहानशा खिडकीतून डोकावून पाहिल्यास दिसणारी तत्कालीन अपरंपार नरसंहाराची दृश्ये, खोल विहिरीत फेकून दिलेले मृतदेह आणि सुरक्षित अंतरावरून ते पाहून शहारण्याची प्रेक्षकांची केलेली सोय, या उठावात सहभागी झालेल्या वृद्ध सैनिकांचे चित्रण आणि सरतेशेवटी या उठावात, उठावाच्या काळात वापरल्या गेलेल्या वाहनांवर, दुचाकींवर बसून ‘सेल्फी' काढण्यात मग्न असणारी तरुण मुले-मुली.

वॉर्साच्या संग्रहालयातला झटपट फेरफटका माझ्यासाठी विसंवादी होता. पोलंडच्या युद्धकालीन इतिहासाच्या स्मृती तिथल्या जनतेसाठी; अगदी त्यांच्या या उठावात लढलेल्या आज्या-पणज्यांची याद काढणाऱ्या तरुण मुलांसाठीदेखील खऱ्या नाहीत असे कुणीच म्हणू शकणार नाही. परंतु आता, २०१६ साली या दुखऱ्या स्मृतींचे अवशेषीकरण करून त्यांना काचेपलीकडे दूरस्थ, बंदिस्त करण्याचे पोलिश समाजाचे प्रयत्न चाललेले दिसतात. म्हणूनच अमेरिकन आणि जपानी टूरिस्टांचा कित्ता गिरवणारी, जिकडे-तिकडे सेल्फी काढणारी तरुण मुले वॉर्साच्या संग्रहालयात अधिक ठळकपणे लक्षात राहिली.

नेमका तेव्हाच, तिकडे प्रवास करीत असतानाच वर्तमानपत्रात असाच आणखी एक ठळक विसंवादी तपशील प्रसिद्ध झाला. तो ‘ऑशविट्झ' या पोलंडमधील (कु)प्रसिद्ध ज्यूंच्या छळछावण्यांविषयीचा होता. या छळछावण्यांमध्ये नेमके किती ज्यू मारले गेले याविषयी निश्चित माहिती कोणालाच नसली तरी युद्धकाळात तिथे सुमारे दहा लाख ज्यूंचे शिरकाण घडले असा अंदाज आहे. पण ही बाब आता जुनी झाली. जुलै २०१६ मधील या छळछावण्यांविषयीची नवी बाब म्हणजे तिथेही ‘पोकेमॉन' अवतरले. अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील ‘हॉलोकॉस्ट म्युझियम' आणि पोलंडमधील ‘ऑशविट्‌‍झ' या दोन्ही स्मारकांच्या व्यवस्थापकांनी याविषयी ‘पोकेमॉन'च्या निर्मात्यांना एक जाहीर पत्र लिहिले आणि या स्मारकांचे गांभीर्य नष्ट होत असल्याने या ठिकाणी पोकेमॉन ‘न टाकण्याची' विनंती केली. या विनंतीत व्यक्त होणारा विसंवाद केवळ पोकेमॉनच्या आभासी वास्तवातील विपरिततांविषयीचा नाही; दुसऱ्या महायुद्धाच्या स्मृती पुसून टाकून एक नवी ग्राहकवादी, भांडवली, आकांक्षी संस्कृती पोलंडमध्ये आणि युरोपात सर्वत्र अवतरण्याविषयीचा आहे.

महायुद्धाचा इतिहास पोलंडच्या भूमीवर साक्षात घडल्याने तो अजूनही या राष्ट्राला ग्रासून तर आहेच; आणि तो सहजासहजी पुसलाही जाणार नाही. मात्र, १९९० नंतर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे युद्धांच्या आणि कम्युनिस्ट राजवटींच्या राखेतून उठून नाटोप्रणीत भांडवली अवकाशात झेप घेतल्यानंतर पोलंडने आपल्या दुखऱ्या इतिहासाला काचपेटीत बंदिस्त करून त्याचे एक प्रदर्शन मांडण्याचे मनावर घेतलेले दिसले.

वॉर्सा या पोलंडच्या राजधानीत निरनिराळ्या टप्प्यांवर बांधल्या गेलेल्या इमारतींमधून शहराचा इतिहास जिवंत होतो. चौदाव्या शतकातल्या, रोमन साम्राज्याच्या उदयानंतरच्या भव्य दिव्य कोरीवकामाने नटलेल्या आणि जग आपल्या बळकट खांद्यांवर पेलून धरण्याच्या महत्त्वाकांक्षी मानवी शिल्पांनी तोलून धरलेल्या इमारतींचा परिसर जुन्या वॉर्सात सापडतो. ‘रॉयल रूट' असेच या परिसरातल्या एका बसमार्गाचे नामकरण आता केले गेले आहे. याउलट शहराच्या रहिवासी भागात कम्युनिस्ट ‘साम्राज्या'च्या खुणा सर्वत्र आढळतात. नावांऐवजी क्रमांकांची नीरस ओळख जपणाऱ्या विटक्या, ठोकळेबाज इमारती; भक्कम दरवाजे, प्राचीन लिफ्ट्‌‍स हा आजही मध्यमवर्गीय वॉर्साचा तोंडवळा आहे, आणि तिसरीकडे १९९० नंतरचे जागतिक भांडवली अवकाशात मुक्त विहरणारे जागतिक ब्रँड्‌‍स, भपकेबाज मॉल्स आणि उंची रेस्टॉरंट्‌‍सने नटलेले वॉर्सा आहे.

old-town-square-poznan

केवळ वॉर्साच नव्हे, तर मी गेले होते ते पोझनॅन हे तुलनेने लहानसे शहर गेल्या दहा वर्षांत ते नव्याने कात टाकते आहे. या गावाची संख्या जेमतेम पाचसाडेपाच लाख; परंतु तिथल्या पंचतारांकित मॉल्सची संख्या आणि बाजारपेठेचा विस्तार पाहिला तर इतक्या दुकानांमध्ये इतक्या वस्तूंची खरेदी कोण करणार असा अचंबा वाटावा. या गावातील एक जुन्या बीअर निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे रूपांतर आता एका अवाढव्य आणि देखण्या सप्ततारांकित शॉपिंग मॉलमध्ये करण्यात आले आहे. हा शॉपिंग मॉल केवळ पोलंडमधीलच नव्हे, तर युरोपातील ‘स्टार ॲट्रॅक्शन' ठरतो आहे. दुसरीकडे, युरोपात इतरत्र असणाऱ्या अस्थिरतांच्या आणि स्थलांतरितांच्या प्रश्नाभोवती होणाऱ्या उद्रेकांच्या पोर्शभूमीवर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा, औद्योगिक आणि विद्यापीठीय चर्चासत्रे, करारमदार यासाठी पोझनॅन हे एक तुलनेने सुरक्षित स्थळ म्हणून झपाट्याने विकसित झाले आहे. मी देखील याच कारणाने पोझनॅन आणि पोलंडचा प्रवास केला. अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी तेथे एक जागतिक दर्जाचे ‘कन्व्हेन्शन सेंटर' बांधण्यात आले आहे. आणि साहजिकच अशा परिषदांभोवतीचे एक स्वतंत्र अर्थकारण पोझनॅन आणि पोलंडमध्ये उभे राहते आहे.

palace-of-culture-and-science-warsaw

आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखवण्यासाठी पोझनॅनमध्ये आणि वॉर्सामध्येही जे काही आहे ते ‘ओल्ड टाऊन स्क्वेअर'मध्ये किंवा ‘जुन्या शहरातल्या चौकात' सहसा बंदिस्त झाले आहे. या सर्व मध्ययुगीन युरोपच्या वैभवशाली इतिहासाच्या खाणाखुणा आहेत. आता त्यांचे रूपांतर देखण्या पर्यटनस्थळांमध्ये झाले आहे. वॉर्सातील जुने शहर जर्मनांनी संपूर्णपणे बेचिराख केले. त्यातील वीट अन्‌‍ वीट जशीच्या तशी पुन्हा बांधून काढण्याचे स्वप्न पोलिशांनी बाळगले. आपल्या सत्तेला पोलंडमध्ये अधिमान्यता मिळावी यासाठी कम्युनिस्टांनीही त्यांना मदत केली. (कम्युनिस्टांनी पोलंड ताब्यात घेतल्यानंतर वॉर्सामध्ये ‘पॅलेस ऑफ कल्चर अँड सायन्स' नामक एक अवाढव्य इमारत स्टॅलिन यांच्या नावाने उभारली आणि ती पोलंडला भेट दिली; परंतु कम्युनिस्ट राजवटीला अधिमान्यता मिळवून देण्यासाठी केले गेलेले हे प्रयत्न बिल्कुल यशस्वी ठरले नाहीत. ‘स्टॅलिनची सिरिंज' (इमारतीच्या आकारावरून) किंवा ‘रशियन वेडिंग केक' म्हणून पोलिश लोक या इमारतीची हेटाळणी करतात. असो.)

मुख्य मुद्दा हा, की पर्यटकांसाठीचे पोलंड हे प्रामुख्याने मध्ययुगीन स्मृतींभोवती आणि त्यांच्या (कसोशीने पुनर्बांधणी केलेल्या) अवशेषांभोवती उभारले गेले आहे. युरोपमधल्या इतर अनेक देशांप्रमाणेच वॉर्सा आणि पोझनॅनमध्येही या जुन्या शहरांमधील नक्षीदार, दगडी बांधणीच्या मोकळ्या, सविस्तर चौकात लोक खात-पीत, खरेदी करत, संध्याकाळच्या आल्हाददायक हवेत चालणारी गाणी-बजावणी ऐकत अखंड सुट्टीवर अखंड मजेत विहरत असतात.

दुसरीकडे खुद्द स्थानिक पोलिश जनतेलादेखील व्यक्तिगत भौतिक प्रगतीचे आणि अखंड मजेत जगण्याचे भांडवली स्वप्न अधिकाधिक भुरळ घालते आहे. आणि म्हणून केवळ कम्युनिस्टांच्या कटू वारशाचेच नव्हे, तर नंतरच्या अल्प- काळातील ‘सॉलिडॅरिटी'रूपी समाजवादी कल्याणकारी राजवटीचेही विस्मरण घडून, ‘पूर्व' नव्हे तर ‘मध्य' युरोपातील एक नवा उत्सुक देश म्हणून इतिहासाची उभारणी करण्याच्या मागे पोलिश लोक लागले आहेत.

नव्वदच्या दशकात आर्थिक उदारीकरणाची धोरणे राबवल्यानंतर पोलिश अर्थव्यवस्थेची झपाट्याने भरभराट झाली. आजमितीस मध्य युरोपातील आघाडीची तर युरोपीय समुदायातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून पोलंडने नावलौकिक मिळवला आहे. समकालीन जागतिक भांडवलशाहीचे स्वरूप लक्षात घेता, पोलंडच्या अर्थव्यवस्थेमध्येदेखील सर्वाधिक वाटा सेवा क्षेत्राचाच आहे. मात्र, पोलंडमधील शेतकी अर्थव्यवस्थादेखील सुस्थितीत आणि चांगल्या पद्धतीने टिकाव धरून आहे. त्यामुळेच जगातल्या संपन्न जीवनशैली राखू शकणाऱ्या निवडक देशांमध्ये पोलंडचा समावेश होतो. पूर्वाश्रमीच्या साम्यवादी देशांमध्ये पोलंडचा या बाबतीतील अपवाद महत्त्वाचा ठरावा. २००८-०९ मधील जागतिक मंदीच्या तडाख्यातूनदेखील पोलंड आश्चर्यकारकपणे बचावले आणि या बचावामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कम्युनिस्टांच्या पाडावानंतर तेथे अल्पकाळ वावरलेली जुन्या लोकशाही समाजवादाची, राज्यसंस्था पुरस्कृत कल्याणकारी राज्याची संकल्पना. दुसऱ्या महायुद्धानंतर आणि कम्युनिस्टांच्या कार्यकाळात पूर्णपणे कोलमडलेली पोलंडची अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था नव्वदीच्या दशकाच्या पूर्वार्धामध्ये काहीशी सावरली याचे श्रेय कामगारांच्या उठावातून स्थापन झालेल्या काहीशा समाजवादी धाटणीच्या परंतु साम्यवादी राजवटीपेक्षा खुल्या शासनव्यवस्थेकडे जाते असे अर्थतज्ज्ञांना वाटते. जागतिक भांडवलशाहीच्या खुल्या परंतु क्रूर स्पर्धेत पोलंड सहभागी होण्यापूर्वीचा टप्पा कामगारक्रांतीतून तेथे साकारला आणि या टप्प्याने (भारतासारखेच) पोलंडलाही जागतिक मंदीच्या तडाख्यातून वाचवले.

lech-walesa-poland

१९८० च्या दशकात पोलंडमध्ये घडलेल्या या महत्त्वपूर्ण राजकीय स्थित्यंतराचे नेतृत्व केले होते लेक वालेसा यांनी. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘सॉलिडॅरिटी' ही तत्कालीन साम्यवादी देशांमधील पहिली महत्त्वाची कामगार संघटना होती. पोलंडमधील कामगारांच्या उठावाचा इतिहास खरे म्हणजे सॉलिडॅरिटीच्या स्थापनेआधी योगायोगाने पोझनॅनमध्ये सुरू होतो. १९५६ साली साम्यवादी राजवटीच्या स्थापनेनंतर लगेचच कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी धरणे धरले, मोर्चे काढले; मात्र हे उठाव निर्दयपणे चिरडले गेले आणि त्यात अनेक कामगार मृत्युमुखी पडले. पोझनॅनच्या एका विस्तीर्ण, मध्यवर्ती चौकात या उठावांचे खुले, भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. १९५६च्या उठावानंतरच्या या स्मारकावरच्या नोंदी १९७० आणि १९८०च्या दशकांतील आहेत. या नोंदींमध्ये लेक वालेसा यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

१९८० च्या दशकातील कामगारलढ्यांमध्ये वालेसा यांना अनेकदा तुरुंगवास पत्करावा लागला, भूमिगत राहून काम करावे लागले, गुप्त पोलिसांचा ससेमिरा त्यांच्यामागे लावण्यात आला. मात्र, बंदी घालूनही या काळात सॉलिडॅरिटीची लोकप्रियता कमालीची वाढून पोलंडची सुमारे पंचवीस टक्के लोकसंख्या संघटनेची सभासद बनली. त्यांच्या लढ्याच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधातील राजकीय आशयामुळे वालेसा पश्चिमी राष्ट्रांच्याही गळ्यातील ताईत बनले आणि आंतरराष्ट्रीय वर्तुळांमध्ये त्यांचे महत्त्व झपाट्याने वाढून १९८३ साली त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९९० मध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेनंतर वालेसा पोलंडचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि नंतर मात्र त्यांची लोकप्रियता झपाट्याने उतरत गेली.

त्यांच्या वैयक्तिक राजकीय प्रवासातील अनेक खाचखळगे आणि घूमजाव यातून हे घडले. वरवर कम्युनिस्टांशी लढत असताना प्रत्यक्षात मात्र गुप्त पोलिसांचे खबरे म्हणून वालेसांनी काम केले, असा गंभीर आरोप त्यांच्यावर केला गेला. आपल्या अनेक सहकाऱ्यांना त्यांनी दुखावले. २००० साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला. २००६ साली खुद्द सॉलिडॅरिटी संघटनेने उजव्या राजकीय शक्तींना पाठिंबा दिला आणि त्याविषयीच्या त्राग्याने वालेसा यांनी संघटनेचाच राजीनामा दिला आणि तेथून पुढे एका अर्थाने ते राजकीय विजनवासात गेले.

परंतु वालेसांचा राजकीय विजनवास केवळ त्यांच्या व्यक्तिगत राजकीय प्रवासापुरता मर्यादित नाही. आर्थिक सुधारणांच्या आणि पुनर्रचनांच्या पुढच्या टप्प्यात पोलंडमधील, युरोपमधील आणि एकंदर जगातील राजकारणाचा पोत बदलला आणि त्यातून वालेसांसारखे अनेक नेते अंधारात गेले. या टप्प्यावर खुद्द वालेसा यांनीदेखील युरोपमधील स्थलांतरितांच्या विरोधात जहाल वक्तव्ये केली आणि युरोपात नव्याने साकारत असणाऱ्या भांडवली, ग्राहकवादी आणि उजवीकडे झुकलेल्या राष्ट्रवादी राजकारणात ते सामील झाले. या राजकारणाच्या चौकटीत कामगारलढ्यांना आणि त्या लढ्यांमागील कल्याणकारी राज्य-लोकशाही-समाजवाद या अक्षांभोवती फिरणाऱ्या विचारसरणीला स्थान नव्हते. त्याऐवजी ‘पूर्व युरोप'शी असलेली आपली नाळ तोडून टाकून कामगारांऐवजी ग्राहक-उपभोक्ता असा नवा नागरिक घडवण्याची आस खुद्द पोलंडमधील कामगारांनाही आता लागलेली दिसते.

या नव्या पोलंडमध्ये वालेसा आणि वालेसांभोवती उभारला गेलेला इतिहासाचा अवघड, काट्याकुट्यांचा टप्पा विसरला जाऊन मध्ययुगीन दूरस्थ इतिहास आणि ‘नाटो'तील सहभागातून खुल्या होणाऱ्या स्वप्नरम्य भविष्याची दारे अधिक ठळक बनली, असे तिथे फिरताना ठसठशीतपणे जाणवले इतकेच.

 राजेश्वरी देशपांडे

(अनुभव मासिकाच्या दिवाळी २०१६ च्या अंकातून)

राजेश्वरी देशपांडे

राजेश्वरी देशपांडे या राजकीय व सामाजिक घडामोडींच्या विश्लेषक असून राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results