या मे महिन्यातली गोष्ट. नारकंडा नावाचं हिमाचलमधलं एक छोटंसं गाव. त्या गावात आम्हाला एक फिरंगी भेटला. बाइकवर आपलं सामान घेऊन या देशातून त्या देशात फिरणारा फिरस्ता. मूळचा फ्रान्सचा. जीन जॅक्सन ऊर्फ जेजे. जेजे पत्रकार-लेखकही आहे. त्याच्या बाइकवरच्या प्रवासातले अनुभव त्याने शब्दबद्ध केले आहेत. त्याच्या या वर्ल्ड टूरविषयी गप्पा मारत असताना तो आम्हाला म्हणाला, “तुम्हाला माझं इतकं आश्चर्य वाटतंय; पण बाइकवर जगातले सात खंड, ६४ देश फिरून आलेली मुलगी मराल यज़ार्लू तर तुमच्या पुण्यातच राहते. तिच्याशी बोला एकदा.” बाइकवर ६४ देश आणि बॅकपॅकिंग करून स्वतंत्रपणे ४७ देश फिरून आलेली मुलगी, हे ऐकल्यावर आमचा ‘आ' मिटतच नव्हता. वाटलं, कशासाठी लोक असा वेड्यासारखा प्रवास करत असतील? या जगाविषयी असलेलं कुतूहल? अभ्यासाचं वेड? काही तरी करून दाखवायची मनातली तीव्र इच्छा? असेलही.
काही करून या मुलीला भेटायचंच असं मी ठरवलं. अर्थात जेजेमुळेच हे शक्य झालं.
मराल यज़ार्लू मूळची इराणी. इराणच्या उत्तर किनाऱ्यावरच्या केलाराबाद या गावची. केलाराबाद, एका बाजूला कॅस्पियन समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरव्या पर्वतरांगांनी वेढलेलं छोटंसं गाव. मरालने तेहरानमधल्या कार विद्यापीठातून बीबीए केलं. २००४ मध्ये ती एमबीए करायला पुण्यात आली आणि मग पुण्याचीच होऊन गेली. खरं म्हणजे मराल भारतात आली ती तिच्या आईमुळे. तिची आई बॅकपॅकिंग करत फिरणारी धाडसी बाई. ती २०-२५ वर्षांपूर्वी भारतात येऊन गेली होती. तिने काढलेले अनेक फोटो बघून मरालला भारतात यावंसं वाटायचं. तिची आई पेशाने शिक्षिका होती. तिनेच मुलांना पुस्तकं वाचायची, प्रवासाची, निसर्गाची आवड लावली होती. मरालला त्या वेळी एकटीला इराणबाहेर शिक्षणासाठी पाठवणं हा तिच्या आईने घेतलेला एक धाडसी निर्णय होता.
हेही वाचा - साइकिल बड़ी नामी चीज़ है!
मरालने एमबीए झाल्यावर मार्केटिंगमध्ये डॉक्टरेट केली. त्यानंतर तिने पुण्यात १२ वर्षं कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली. बढती मिळवत ती बऱ्याच वरच्या पदालाही पोहोचली. इराणच्या एका छोट्याशा गावातून येऊन शिक्षण पूर्ण करून, पुण्यात कॉर्पोरेट विश्वात स्थिरावणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. अनोळखी भाषा, परका देश, स्पर्धेचं वातावरण यात तिचा चांगलाच कस लागला.
मराल बाइकिंगकडे कशी वळली याचं मला सगळ्यात जास्त कुतूहल होतं. त्यालाही एक कारण घडलं. मराल सांगते, ती पुण्यात असताना तिच्या मित्राची नवी कोरी बाइक तिला चालवावीशी वाटली. ‘तुला कुठे बाइक चालवता येते?' असं म्हणून त्या मित्राने तिला बाइकवर बसूही दिलं नाही. तेव्हाच तिने ठरवून टाकलं, की त्याला प्रत्यक्ष कृतीतूनच उत्तर द्यायचं. ती मार्केटिंग आणि रिटेलमध्ये नोकरी करत होती. तिथे अनेक बाइक कंपन्यांचे कॅटलॉग तिच्याकडे यायचे- हार्ले डेव्हिडसन, ड्युकाती, बीएमडब्ल्यू इत्यादी. बाइक चालवायची पॅशन तेव्हा तिच्या मनात रुजत गेली. मग एकेक करत तिने स्वकमाईतून चार सुपरबाइक्स विकत घेतल्या. हळूहळू तिने बाइक राइड्स करायला सुरुवात केली. भारतभरात ती भरपूर फिरली. ६४ देशांचा प्रवास झाला तो त्यानंतरच. मात्र, त्या वर्ल्ड टूरपूर्वी तिने सुपरबाइकवर जवळपास एक लाख वीस हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता.
इराणमधली मुलगी धाडसीपणाने इतकं काय काय करतेय हे माझ्यासाठी अगदी नवीन होतं. जगातल्या मुस्लिमबहुल देशांविषयी सर्वसाधारणपणे बाहेरच्या देशांतल्या लोकांची जशी मतं असतात तशीच माझीही होती. याबद्दल बोलताना मराल म्हणाली, “इराण इतर मुस्लिम देशांपेक्षा खूप प्रगत आणि वेगळा आहे. भारतात आता १५ वर्षं राहिल्यानंतर तर मला असं वाटतंय की इराणमधलं सामाजिक वातावरण भारतासारखंच आहे. आमचा समाजही भारतासारखाच पितृसत्ताक पद्धतीचा आहे. मीडियाकडून इराणचं जसं चित्र जगाच्या नकाशावर रंगवलं जातं तितकी वाईट परिस्थिती नक्कीच नाही. माझ्या घरासारखीच मुलींना स्वतंत्र वृत्तीने वाढवणारी, शिक्षण देणारी अनेक घरं इराणमध्ये आहेत. मुस्लिम देश असल्यामुळे आम्हाला तिकडे स्कार्फ वापरावा लागतो एवढंच. मला इराणमधून बाहेर पडून आणखी व्यापक अशा जगातले अनुभव घ्यायचे होते म्हणून मी भारतात आले.”
पण मरालने बाइकवर जगप्रवास करायचं ठरवलं त्याचं कारण मात्र इराणशीच जोडलेलं आहे. अजूनही इराणमधे स्त्रियांना बाइक चालवण्याची परवानगी नाही. २५० सीसीच्या वरच्या बाइक्स इराणमध्ये दिसत नाहीत. इराणी बायका शिक्षित आहेत, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांत काम करत आहेत तर त्यांना बाइक चालवायची परवानगी का मिळू नये, असा विचार मरालच्या मनात आला आणि म्हणून ‘राइट टु बी वन' हे कॅम्पेन घेऊन तिने हा जगप्रवासाचा बेत आखला.
या प्रवासामागे तिची काही वैयक्तिक कारणंही होती. लहानपणापासून तिच्या घरची परिस्थिती उत्तम होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला लगेच नोकरी लागली. आयुष्यात तोपर्यंत तिला कसलीच तोशिस पडली नव्हती. तेव्हा तिला वाटायला लागलं, उद्या माझ्याकडून हे सुरक्षित आयुष्य कोणी काढून घेतलं तर मी जगू शकेन का? माझा आनंद या भौतिक गोष्टींत अडकून गेला आहे का? त्यावरच आपलं आयुष्य अवलंबलेलं आहे का? आणि तिने ठरवलं, की असं होता कामा नये. तिचा स्वभाव स्वस्थ बसणारा नव्हताच. कपड्यांचे चार जोड, रात्री झोपायला लागणारा टेंट, स्लीपिंग बॅग आणि तिची बाइक यांच्या साथीने ती या प्रश्नांवरच्या उत्तरांच्या शोधात बाहेर पडली. ती सांगते, “जिथे जे मिळेल ते मी खायचे. झोपायला दोन मीटर बाय एक मीटर जागा मिळाली की झालं. आपण किती गोष्टींच्या मोहात अडकलेले असतो याची जाणीव मला एवढ्याशा सामानानिशी प्रवास करताना आली.”
या प्रवासाची सुरुवात तिने पुण्यातूनच केली. ती जन्माने इराणी असली तरी भारत हीच तिची कर्मभूमी. म्हणूनच बाइकवर इराण आणि भारत दोन्ही देशांचे झेंडे लावून तिने हा जगप्रवास करण्याचं ठरवलं. आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, आफ्रिका, युरोप आणि परत आशिया असा प्रवास करताना तिने कोणते देश पालथे घातले ती जंत्री इथे देत नाही. कारण ते आपल्याला तिच्या ब्लॉगमधून कळू शकेल. मुळात तिने एकटीने हे सगळं कसं केलं असेल हे जाणून घेणंच जास्त महत्त्वाचं ठरतं.
कोणकोणत्या देशांना भेटी द्यायच्या हे मरालने स्वतःच ठरवलं. त्या त्या देशातला तिचा सुरुवातीचा थांबा आणि शेवटचा थांबा ठरलेला असायचा. शक्य तिथे ती नकाशे, जीपीएस वापरायची; नाही तर मग चहाच्या ठेल्यावर, पेट्रोल पंपावर, जेवणाच्या ठिकाणी ट्रक ड्रायव्हर्सशी गप्पा मारत रस्ते विचारायची. साधारणपणे आपण सार्वजनिक वाहतुकीच्या मार्गांनी गेलो की ठराविक गोष्टी, ठिकाणं पाहत जातो; पण तिने मात्र लोक सहजी जाणार नाहीत अशा अनेक रस्त्यांवरून प्रवास केला. त्यांतले अनेक रस्ते निसर्गसौंदर्याने बहरलेले तिला दिसले. “चिली-अर्जेन्टिना बॉर्डरवरचा २४ किलोमीटरचा ‘नो मॅन्स लँड'मधला प्रवास मला अजूनही आठवतो.” ती सांगते, “मी अक्षरशः पाच-पाच मिनिटांनी थांबून वेड्यासारखी निसर्गदृश्यं बघत होते, फोटो घेत होते.” फक्त दुचाकी गाड्या किंवा घोडे-गाढवंच जाऊ शकतील अशा खडकाळ दुर्गम भागातूनही तिने प्रवास केला. रस्त्यात छोटी गावं लागायची. तिला एकटीला प्रवास करताना बघून तिथल्या बायका आस्थेने तिची विचारपूस करायच्या, आपल्या घरी घेऊन जायच्या, चुलीवर स्वयंपाक करताना तिला शेजारी बसवून जेवू घालायच्या. त्यातून अनेक लोकांशी, त्यांच्या संस्कृतींशी तिची ओळख झाली.
यातली कुठलीच माणसं तिच्याशी कधीच चुकीच्या पद्धतीने वागली नाहीत, हे ती आवर्जून सांगते. कदाचित आपण जसे वागतो तसाच समोरचा माणूसही वागत असतो, नाही का? या प्रवासात स्वागत करणारे, मदत करणारे, आदर दाखवणारे किती तरी लोक तिला भेटले. सुरुवातीला तिचा बाइकर मित्र पंकज त्रिवेदी फोटो आणि व्हिडिओ शूटिंगसाठी तिच्या सोबत होता. जवळपास ३४ देश दोघं एकत्र होते. मग तब्येतीच्या कारणाने आणि व्हिसा कागदपत्रांच्या अडचणीमुळे त्याला मध्येच थांबावं लागलं.
इतका काळ सतत बाइकवर बसलेलं राहणं हे खूप अवघड काम असतं. मानदुखी, पाठदुखीचा त्रास होऊ शकतो हा एक भाग; शिवाय भौगोलिक बदल असतात, हवामान बदलत असतं; ऊन, वारा, पाऊस, बर्फ झेलत चिखलाचे किंवा खडबडीत रस्ते पार करत अतिशय सतर्क राहून अनोळखी प्रदेशात एकट्याने प्रवास करायचा असतो. हे सारं सांभाळत एवढा काळ तग धरून राहणं हे मोठं आव्हान असतं. मराल सांगते, “बाइकवर प्रवास करताना दिवस-रात्र कसे जायचे कळायचं नाही.” तिने काही ठिकाणी बोटीत, विमानात बाइक नेऊन मधलं अंतर कापून परत प्रवास सुरू केला. कस्टम क्लिअरिंग, व्हिसाचे सोपस्कार पार पाडणं, पेट्रोल पंप शोधून इंधन भरून घेणं, रात्री राहायला सुरक्षित जागेची निवड करणं या सगळ्या गोष्टी तिच्या तीच करायची. तिच्यासोबत मदतीसाठी, अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी कोणतीही टीम नव्हती. मेक्सिको, होन्डुरास, अर्जेन्टिना, व्हेनेझुएला, ग्वाटेमाला अशा संवेदनशील भागातून एकट्या बाईने प्रवास करणं खूप धोकादायक होतं. गँगवॉर, रस्त्यांवरची आंदोलनं, लोकांना पळवून नेणं, चोऱ्या हे इथे सर्रास चालतं; पण सुदैवाने ती अशा कुठल्याही संकटात सापडली नाही.
अर्जेन्टिनातला ‘रूट ४०' हा जगातल्या सर्वांत लांब रस्त्यांपैकी एक आहे. जवळपास ५००० किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर मरालला अगदीच तुरळक रेस्टॉरंट्स सापडली. त्यामुळे किती तरी दिवस केवळ फळं आणि बिस्किटं खाऊन ती तग धरून राहिली. काही चर्चमध्ये आणि शाळांत लोकांनी तिला खायला दिलं, नाही असं नाही; पण फळं आणि बिस्किटं हाच तेव्हा तिचा मुख्य आधार होता. या प्रवासात तिला तिच्यासारखेच अनेक बाइकर्स भेटले. त्यातल्या काहीजणांशी तिची चांगली मैत्रीही झाली.
अंटार्क्टिकाहून परतताना तिला दोन बलदंड शरीरयष्टीचे बाइकर्स भेटले. ते अमेरिकतले होते. तिला एकटीला जाताना बघून त्यांना वाटलं, हिची टीम मागे राहिली किंवा पुढे गेली आणि ही मुलगी रस्ता चुकली. ती एकटीनेच प्रवास करते आहे हे समजल्यावर ते दोघंही तिच्याकडे अवाक होऊन बघत राहिले. ती भारतातून आली आहे हे कळल्यावर तर त्यांना वेडच लागायचं बाकी होतं, आणि ते त्यांनी स्वच्छपणे बोलूनही दाखवलं- “आम्ही अमेरिकेतून आलो, तर आम्हाला वाटत होतं की आम्ही किती पराक्रम केलाय. तू तर कुठल्या कुठून आलीस! आम्हाला कधी वाटलंच नाही भारतातून इथे पोहोचणं शक्य असेल...”
या बाइकवरच्या प्रवासातच आपल्या खासगी आयुष्यातली वेगळी वळणं येणारं आहेत हे मरालला ठाऊक नव्हतं. या प्रवासात काही ठिकाणी तिला भेटायला येणारा, तिच्यावर अपार प्रेम करणारा आणि नंतर तिचा नवरा झालेला, मूळचा ब्रिटिश असलेला पॅट्रिक ॲलेक्स. तो तिला भेटायला विमानाने प्रवास करून काही देशांत आला. त्यांचं माचुपिचूला लग्न झालं.
हेही वाचा - दोन पाय, ७५ दिवस अन् १००० किलोमीटर
मराल सांगते, “ही राइड चालू असताना माझं लग्न होणं ही अक्षरशः अचानक झालेली गोष्ट होती.” तिच्या सख्ख्या भावाचंही लग्न ठरत होतं; पण राइड अर्धवट सोडून त्याच्या लग्नाला जाणं तिला शक्य नव्हतं. तिने लग्नाचा घेतलेला निर्णय भावाला माहिती होता. मग दोघांनी ठरवलं, की ती तिच्या दौऱ्यात जिथे असेल तिथे एकत्रच लग्न करायचं. दिवस ठरला. तिचं आणि तिच्या भावाचं लग्न अत्यंत साध्या वातावरणात, पेरू देशात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या इंका व्हॅलीत इंका रिवाजानुसार, चर्चमध्ये ख्रिश्चन पद्धतीने आणि मुस्लिम रिवाजानुसार झालं. कारण तिचा नवरा ब्रिटिश नागरिक आणि जन्माने ख्रिश्चन आहे. खूप लोकांना वाटतं, की तिचे लग्नातले फोटो ‘फोटोशॉप' केलेले आहेत; पण ते काही खरं नाही. लग्नानंतर दोनच दिवसांत तिने तिची बाइक राइड पुढे सुरू केली. तिने राइड मध्येच सोडली असती तर तिच्या नवऱ्यालाही ते आवडलं नसतं.
ही राइड चालू असतानाच मरालला दिवस गेले. बाळाला आणि तुला त्रास होत नाही तोपर्यंत तू प्रवास करत राहा, असं म्हणून नवऱ्याने तिची उमेद आणखीनच वाढवली. ती सांगते, “सुरुवातीच्या दिवसांतल्या उलट्या-मळमळ इत्यादी त्रासाला वेळच नसायचा. कारण राइडच्या नादात दिवस कसा संपायचा कळायचंच नाही.” दिवस पुढे सरकू लागले तसतशी तिच्या पायांवर सूज यायला लागली. रायडिंग बुटांत पाय मावेनासे झाले. सलग दीड वर्ष डोक्यावर सतत हेल्मेट असल्यामुळे मानदुखी सुरू झाली होती. त्यामुळे तिचा आधीच असलेला मायग्रेनचा त्रास बळावला; पण प्रेग्नन्सीमुळे तिला इतर कोणती औषधं घेणंही शक्य नव्हतं. तसंच त्या अवस्थेत नुसत्या टेंटमध्ये गादी-उशी काहीही नसताना झोपणं दिवसेंदिवस तिला कठीण होऊ लागलं. मग तिच्या नियोजित टप्प्यानुसार आपल्या मायभूमीत, इराणमध्ये तिने हा प्रवास थांबवायचं ठरवलं.
इराणमध्ये अजूनही स्त्रियांना बाइक चालवायची परवानगी नाही; पण मरालने इराण सरकारला खास विनंती करून बाइकवरूनच इराणमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मागितली. सुदैवाने तिची विनंती मान्य केली गेली आणि इराणच्या इतिहासात पहिल्यांदाच इराणमध्ये जन्म घेतलेल्या एका स्त्रीने तिथे बाइक चालवली, तीही साडेसहा महिन्यांचं वाढलेलं पोट घेऊन. इराणच्या महिलांनी तिचं खूप कौतुकाने, मनापासून स्वागत केलं. तिला अजूनही ‘आम्हालाही तुझ्यासारखं बाइकवर मोकळेपणी हिंडायचं आहे, प्रवास करायचा आहे,' असे खूपजणींचे मेसेज येत असतात. स्त्रियांना इराणमध्ये बाइक चालवायची परवानगी मिळावी म्हणून इराण सरकारला कायद्यात बदल करण्याची विनंती ती करते आहे.
“बायकांनी ठरवलं तर अवघड, आव्हानात्मक, पोलादी ताकदीची कणखर कामं त्या करू शकतात. आपलं धाडसी मनच आपल्याला सगळ्या आव्हानांच्या पार घेऊन जातं, सगळ्या भीतींवर मात करायची ताकद आपल्यातच असते हेच मला माझ्या या जगप्रवासातून दाखवून द्यायचं होतं. इराण सरकारही एक दिवस बायकांना बाइक चालवायची परवानगी देईल यासाठी हा सगळा प्रयत्न आहे.” मराल सांगते. ५२६ दिवस, ६४ देश आणि ७ खंड असा हा मरालचा प्रवास. या राइडमुळे जगाकडे पाहण्याची माझी दृष्टीच बदलून गेली, असं ती म्हणते. जगातल्या काही देशांतल्या लोकांचं जगणं म्हणजे आयुष्य सहन करत कसंबसं भीतीच्या, दहशतीच्या छायेखाली दिवस काढणं आहे; त्यांनाही आनंदाने जगण्याचा हक्क आहे, हे तिला प्रवासादरम्यान सतत जाणवत राहिल्याचं ती नमूद करते.
२०१८ मध्ये सुपरबाइकवर २ लाख ५० हजार किलोमीटर अंतर पूर्ण केलेली भारतातली पहिली महिला म्हणून तिला ‘क्वीन ऑफ सुपरबाइक्स' हा किताब मिळाला. ‘लेडीज ऑफ हारले' आणि भारतातला पहिलावहिला सुपरबाइक चालवणाऱ्या बायकांचा क्लब ‘लेडी रायडर्स ऑफ इंडिया' हे ग्रुप तिच्यामुळेच सुरू झाले.
मराल कराटे ब्लॅक बेल्टधारक आहे. ती इराणच्या सॉफ्टबॉलच्या टीममध्ये खेळायची. तिच्या विद्यापीठातल्या स्विमिंग टीमची ती कॅप्टनही होती. या बाइक राइडच्या आधी तिने २०१२ मध्ये इटलीत मिलानला जाऊन एक फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला होता. त्यानंतर ‘हाऊस ऑफ मराल यज़ार्लू- ‘माया' या नावाने तिने स्वतःचा फॅशन ब्रँड सुरू केला. पॅरिस, रोम, लंडन, दुबई आणि भारतातही अनेक प्रदर्शनांतून तिचं कलेक्शन झळकलं आहे. पुण्यात तिचं स्वतःचं फॅशन स्टोअर आहे. एक मुलगी वयाच्या केवळ सदतिसाव्या वर्षी इतकं काय काय करू शकते यावर विश्वास बसणंच कठीण आहे. त्यामुळेच की काय, मराल अजिबात टिपिकल बाइकर्ससारखी नाही. म्हणूनच तिचा हा प्रवास एकदम वेगळा ठरतो. या प्रवासात भेटलेल्या गावोगावच्या बायकांकडून अनेक प्रकारचे कपडे, त्यातलं वैविध्य, वस्त्रकला, विणकाम यांची अगदी जवळून ओळख करून घेता आल्याचं ती आवर्जून सांगते. तिच्या व्यवसायात त्याचा तिला नक्की उपयोग झाला असणार.
मरालचं एक वाक्य माझ्या अगदी लक्षात राहिलं आहे- ‘प्रवास हा आत्मनिरीक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही जितका अधिक प्रवास करता तितकंच स्वतःला अधिकाधिक जाणून घेऊ शकता.' स्वतःच्या जगप्रवासातून तिने कमावलेले हे विचार मला खूप महत्त्वाचे वाटतात. कोणी तरी म्हटलंय, ट्रॅव्हल लीव्ह्ज यू स्पीचलेस, देन टर्न्स यू इनटु अ स्टोरीटेलर. बाइकवरच्या जगप्रवासातले किती तरी अनुभव गोळा करत समृद्ध होताना मराल यज़ार्लू आज एक स्टोरीच बनली आहे, स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या एका जिगरबाज मुलीची!
(मुशाफिरी २०१९च्या अंकातून साभार.)
