
मूल जन्माला येणं म्हणजे आनंदोत्सव. पण बाळाच्या प्रगतीच्या पहिल्या टप्प्यातच जर मूल सामान्य नसून ‘विशेष’ आहे, असं लक्षात आलं तर त्या आनंदाची जागा दुःख, असहाय्यता आणि चिंता घेऊ लागते. विशेष मुलाचं पालकपण निभावण्याची सवय करेपर्यंत शाळेचा यक्षप्रश्न समोर उभा ठाकतो. आपल्या मुलाला किंवा मुलीला समजून घेईल, प्रेमाने तिच्या गरजा भागवेल अशा शाळेचा शोध सुरू होतो.
पिंपरी-चिंचवड आणि निगडी या भागांतल्या अशा अनेक पालकांचं शोधकार्य संपलं ते ‘झेप’पाशी. एका आईने आपल्या सेरेब्रल पाल्सी झालेल्या मुलासकट घेतलेली आकाशझेप म्हणजे झेप ही संस्था. नेत्रा पाटकर या त्या आई! चेहऱ्यावर गोडवा असलेल्या शांत नेत्रा झेप संस्थेतील १११ मुलांच्या आई म्हणून खंबीरपणे काम करतात. १११ पैकी एकच त्यांच्या स्वतःच्या पेशीचा, उरलेले एकशेदहा तसे परकेच. पण तरीही ते त्यांचेच.
आईच्या गर्भात असताना झालेल्या गुणसूत्रीय घोटाळ्यामुळे अशी विशेष मुलं जन्मतात, हे आपल्याला कळून चुकलं आहे. सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, मेंटल रिटार्डेशन, स्लो लर्निंग, ऑटिझम आणि अजून कितीतरी. अपत्यजन्माच्या आनंदाला लागलेलं कायमचं विरजण. तया मुलांच्या वाढीच्या प्रवासात अनेक शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास वाढून ठेवलेले असतात. पण त्यातला सर्वांत वेदनादायक म्हणजे अस्वीकार. अनेकदा मुलांचे बापही परिस्थिती स्वीकारायाला तयार होत नाहीत. माझ्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीचं मूल असं वेगळं जन्माला येऊच शकत नाही, असा त्यांचा ठाम गैरसमज असतो. मग पुढची लढाई एकट्या आईवरच येऊन पडते. तिथेच ‘झेप’सारख्या संस्थेचं काम सुरू होतं.

सतरा वर्षांपूर्वी नेत्रा त्यांच्या विशेष मुलासह मुंबईहून चिंचवडमध्ये स्थायिक झाल्या. तेव्हा चिंचवडमध्ये विशेष मुलांची शाळा नव्हती. तेव्हा नेत्रा आपल्या मुलाला पुण्यातल्या शाळेत घेऊन जायच्या. तेव्हा बसमध्ये त्यांना आपल्या विशेष मलाला घेऊन जाणारी आणखी एक आई दिसली. तिच्या कडेवर स्वतःची लाळही पुसता न येणारं आठ-नऊ वर्षाचं मूल होतं. गर्दी बघून भांबावणारं, रडणारं, रस्त्यात फतकल मारून बसणारं आणि अनेकवेळा चक्क आईच्या कानफडीत मारणारं. त्या आईची ससेहोलपट बघून नेत्रा यांनी स्वतःच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि डांगे चौकात 'झेप' संस्थेचा जन्म झाला.
संस्था काढून तर झाली, पण पुढे अनेक अडचणी होत्या. स्पेशल मुलांसाठी स्पेशल शिक्षक मिळणं मुश्कील. संस्थेची मांडामांड करताना येणाऱ्या विविध अडचणी, न जुळणारी आर्थिक गणितं. आणि त्याच वेळी स्वतःच्या आयुष्यात पती आणि सख्ख्या भावाच्या निधनामुळे झालेल्या मोठ्या उलथापालथी. पण नेत्रा यांनी खंबीरपणे या अडचणींवर मात करून संस्था सुरू ठेवली. वाढवली.
हळूहळू शाळेचं नाव वाढायला लागलं. सुरुवातीला बिचकत बिचकत येणारे पालक आत्मविश्वासाने त्यांचं मूल नेत्रा यांच्या स्वाधीन करू लागले. त्या प्रवासात भाडं वाढलं, जागा अपुरी पडायला लागली मग शिफ्टींग. असं होत होत तीन जागा बदलल्या. थोडाथोडका नव्हे; सतरा वर्षांचा खडतर प्रवास. अखेर तपश्चर्येला फळ यावं अशी घटना घडली. पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या पुढाकाराने बंद अवस्थेत असलेली महापालिका शाळा तीस वर्षांच्या करारावर झेपला देण्यात आली.

तीन खोल्यांमधून सुरू झालेला संस्थेचा प्रवास एका मोठ्या इमारतीत येऊन स्थिरावला. आता नवीन इमारतीत मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक अवस्थेनुसार त्यांचं वेगवेगळ्या वर्गात विभाजन होतं. त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रगतीचे टप्पे बघून भविष्यातले गोल सेट केले जातात. झेपची सायकॉलॉजिस्ट प्रत्येकाची वेगळी फाईल बनवते, नोट्स काढते आणि त्यानुसार शिक्षिकांना अभ्यासक्रम बनवून देते. फिझिओथेरपी, स्पीच थेरपी, सेंसरी थेरपी, म्युझिक थेरपी अशा अनेक स्तरांवर मुलांसाठी अभ्यासक्रम आखले जातात.
एखाद्या बारा वर्षांच्या मुलाच्या अभ्यासक्रमात टॉयलेट ट्रेनिंगसुद्धा असू शकतं किंवा स्वतःचे दात स्वतः घासणं ही क्रियासुद्धा असू शकते. जी क्रिया शिकायला सामान्य मुलांना एखादा दिवस लागतो, ती शिकायला इथे मुलांना सहा-सहा महिनेसुद्धा लागू शकतात.
हे सर्व करताना पालकांना लागणारं समुपदेशन, पालकांनी मुलांकडून घरी करून घ्यायची फिजिओथेरपी याचंही प्रशिक्षण दिलं जातं. आता शाळेत दुर्वांकुर नावाचा चोवीस वर्षांचा एक उमदा संगीत शिक्षक आहे, जो तालासुरात गाणी बसवून घेतो. कोरसमध्ये तालासुरात गाणारी मुलं पहिली की डोळ्यांना आनंदाच्या धारा लागतात.
या मुलांना ठराविक स्पर्श आवडतात आणि कुठल्याही नवीन स्पर्शाला ती बावचळतात, त्यामुळे विविध स्पर्शज्ञान व्हावं या उद्देशाने एक सेंसरी एरिया तयार केलेला आहे. जिथे खडबडीत रस्ता, गुळगुळीत रस्ता, मऊ हिरवळ, चरचरीत गवत असे अनेक तुकडे तयार केलेले आहेत आणि त्यावरून चालण्याचा अनुभव हेही एक शिक्षणच असतं. शिवाय ट्रॅफिक सिग्नलची माहिती दिली जाते. शाळेच्या आवारातच एक सुंदर बाग फुलवली आहे; जिला या विशेष मुलांचे विशेष हात लागले आहेत. एवढंच नव्हे तर स्वयंपाकघरात लागणारी थोडी थोडी कौशल्यं, घरात एकटं वावरताना लागणारी कौशल्यं अशा अनेक स्तरांवरील ज्ञान त्यांना दिलं जातं..

साच्यातले गणपती, सुकवलेल्या फुलांच्या पाकळ्यांपासून होळीचे रंग, फ्रीजमध्ये ठेवायच्या पिशव्या, पणत्या, पाडव्यासाठी छोट्या गुढ्या असे कुटिरोद्योग मुलांकडून करून घेतले जातात. त्याचा काही प्रमाणात मोबदलाही दिला जातो. महिनाअखेरीस पगाराचं छोटं पाकिट घेऊन सूरज घरात शिरतो तेव्हा त्याची चाल बदललेली असते. तो दुणावलेल्या आत्मविश्वासाने जगायला लागतो, असं सूरजची आई सांगते तेव्हा नेत्राच्या डोळ्यात विलक्षण समाधान झळाळत असतं.
झेपचा प्रवास नेत्रा यांच्या स्वतःच्या मुलासोबत सुरू झाला. दुर्दैवाने गेल्या वर्षी त्याचं निधन झालं. पण झेपच्या मुलांची संख्या दिवेसेंदिवस वाढतेच आहे आणि नेत्रा तिच्या समर्थ सहकाऱ्यांच्या साथीने त्यांना सामान्य आयुष्य जगायला मदत करते आहे, त्या मुलांचंच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांचं, विशेषतः आईचं आयुष्य सोपं करायचा प्रयत्न करते आहे. तिच्या या गोवर्धनाला अपेक्षा आहे ती संवेदनशील माणसांच्या मदतरूपी काठ्यांची.