
इंडियन एक्सप्रेस' हे भारतातील एक प्रमुख प्रतिष्ठित दैनिक आहे. राष्ट्रीय स्तरावर खरी पत्रकारिता करणारी जी दैनिकं उरलेली आहेत, त्यातील हे एक महत्त्वाचं आहे. हे स्थान, ही प्रतिष्ठा त्यांनी वर्षानुवर्षांच्या कामातून कमावली आहे. देशातील बड्या इंग्रजी दैनिकांच्या तुलनेत त्याचा खप कमी असला, तरी त्यांच्या शब्दाला इतर दहा दैनिकांपेक्षा जास्त वजन आहे.
असं हे प्रतिष्ठित दैनिक गेली कित्येक वर्षं एक उपक्रम नियमितपणे राबवत आहे. डिसेंबरमध्ये वर्ष आटोपलं की त्यानंतर त्या वर्षातील भारतातल्या सर्वाधिक शंभर प्रभावी व्यक्तिमत्त्वांची एक सूची ते आवश्यक माहितीसह प्रकाशित करत असतात. शिवाय या यादीत नव्याने कोण समाविष्ट झालं, कोण गळलं, कुणाचा क्रमांक वर-खाली गेला आणि असं का घडलं याचीही थोडक्यात पण नेमकी कारणमीमांसा ते करतात.
दैनिक प्रतिष्ठित आणि त्यांच्या पत्रकारितेतील तळमळ सर्वमान्य असल्याने ही यादी विश्वासार्ह असते. पैसे दिले, जाहिराती दिल्या, खटले मागे घेण्याचं आश्वासन दिलं किंवा अन्य फायदे पोहोचवले म्हणून यादीत फेरफार होण्याची शक्यता शून्य. त्या अर्थाने या यादीवर शंका घेण्याचं कारण उरत नाही.
ही यादी बघितली तर सर्वांत लक्षणीय गोष्ट कोणती जाणवते? या यादीत राजकीय नेत्यांची भरमार आहे. देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्याराज्यांचे मुख्यमंत्री, प्रमुख पक्षांचे नेते यांनी ही यादी व्यापलेली आहे. भारतावर सर्वाधिक प्रभाव कुणाचा आहे? तर धोरणकर्त्यांचा आणि राजकारण्यांचा! त्या पाठोपाठ सर्वाधिक प्रभावशाली लोकांमध्ये बडे उद्योगपती, अर्थसत्तेचे सूत्रधार वगैरे मंडळी येतात. नोकरशहा येतात. देशाचे मुख्य न्यायमूर्ती येतात.
कुणी म्हणेल, लोकशाही देशात देशाचे सत्ताधारी, धोरणकर्ते, नियोजनकर्ते, अर्थसत्ता चालवणारे, न्यायव्यवस्था चालवणारे लोकच महत्त्वाचे असणार यात नवल ते काय? हा प्रश्न बिनतोडच म्हणायचा. पण थोडा विचार करून बघा; देश चालवण्यात या लोकांची भूमिका निश्चितच महत्त्वाची असली तरी देश हेच लोक चालवतात हे खरं नाही.
कोणताही देश हा फक्त राजकीय आणि आर्थिक या दोन चाकांवर चालत नाही. समाज नावाची गोष्ट जिवंत माणसांनी बनत असते आणि माणसांना मेंदू असतो. त्यात संवेदना असतात, भावभावना असतात. माणसाला अधिक संवेदनशील माणूस बनवण्यात त्याच्या मेंदूला काय खुराक मिळतो यावर समाजाचं सामूहिक मन आकारत असतं. नृत्य, गायन, नाट्य, चित्रकला, शिल्पकला, संगीत, वास्तुकला, हस्तकला यासारख्या कला माणसांना रमवतात, आनंद देतात, नवनिर्मितीची प्रेरणा देतात. कोणत्याही प्रगत समाजात या कलांना आणि ती निर्माण करणाऱ्या कलावंतांना महत्त्वाचं स्थान असतं. पण ‘एक्सप्रेस'ची यादी बघितली तर त्यात ही क्षेत्रं जवळपास नाहीतच. ज्या देशाने मोठमोठे चित्रकार दिले, शास्त्रीय गायक-वादक दिले, ज्यांनी भारतीयांचं मन तयार करण्यात मोठं योगदान दिलं, त्या क्षेत्रातून एकही माणूस या यादीत नाही. हा दोष यादी तयार करणाऱ्यांचा खचितच नाही. देशावर प्रभाव पाडू शकणारे असे समर्पित आणि प्रतिभाशाली कलावंत निर्माणच होत नाहीत किंवा देशातल्या राजकीय हाणामाऱ्यांत आणि गदारोळात ते आणि त्यांची कला हरवून गेलीय, असा त्याचा अर्थ होतो.
या यादीत त्यातल्या त्यात चित्रपट क्षेत्रातील नावं दिसतात. तीही करण जोहर, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, आलिया भट यांची. आणि १०० पैकी ९६, ९७, ९९ आणि १०० या क्रमांकावर. यावरून त्यांचा प्रभाव किती क्षुल्लक उरलाय हे अधोरेखित व्हावं. त्यांच्यापेक्षा दक्षिणेकडील विजय आणि अल्लु अर्जुन वगैरे नट वरच्या क्रमांकावर आहेत. पण इथे मुद्दा असा आहे की चित्रपटासारख्या लोकप्रिय कलेमधील दिग्गज कलावंतही इतक्या शेवटच्या क्रमांकावर फेकले गेले आहेत! शिवाय चित्रपट ही अप्लाईड कला आहे. शास्त्रीय कलांमधील कुणीही व्यक्ती या यादीत पोहचू शकलेली नाही. भारतात आजघडीला कलांची अवस्था किती बिकट आहे, हे यावरून कळावं. (शिवाय कलाक्षेत्रातून नीता अंबानी यांची निवड झालीय, यातही बरंच काही येतं!)
दुसरीकडे, या यादीत एकही तत्त्वज्ञ, विचारवंत, अभ्यासक, समाजसेवक, लेखक, पत्रकार, समीक्षक, कवी,.. कुणी म्हणजे कुणीही नाही. याचा अर्थ, आज भारत हा असा देश बनला आहे की विचारी माणसांचा त्याच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही, असा घ्यायचा का? की भारतीयांना विचार करणारी, नवं काही सांगणारी-बोलणारी-लिहिणारी माणसंच नको आहेत? की तळमळीने काही सांगू पाहतात त्यांच्याकडे लक्ष देण्याची त्यांना गरजच उरलेली नाही? की आपल्या देशात अर्थ, कृषी, सामाजिक शास्त्र, पर्यावरण, विज्ञान वगैरे अभ्यासाच्या क्षेत्रात मूलभूत महत्त्वाचं योगदान देणारी माणसंच तयार होईनाशी झाली आहेत? यातील काहीही कारण असेल तर आपला समाज म्हणून भविष्यकाळ नक्कीच खडतर असेल.
या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली, बूमरा हे आपल्या सर्वांचे आवडते खेळाडू आहेत. पण हेही सगळे क्रिकेटमधलेच आहेत. हॉकी, बॅडमिंटन, मैदानी खेळ, भालाफेक किंवा कुस्ती-कबड्डी-खोखोसारखे देशी खेळ यांतून एकही हिरो या यादीत पोहचू शकला नाही. (विश्वनाथन आनंद हा एकमेव अपवाद!) काही वर्षांपूर्वी गोपीचंदसारख्या क्रीडा प्रशिक्षकांनी आपल्यातील तळमळीतून देशाला मोठे खेळाडू दिले होते. त्याही बाजूवर आपली पीछेहाट झालेली दिसते.
हे सर्व पाहिल्यावर असं वाटतं की आपल्या देशाला आणि समाजाला समृद्ध करणाऱ्या एकूणएक क्षेत्रांची जबरदस्त पीछेहाट झाली आहे आणि त्याबद्दल आपल्याला कोणताही अपराधबोध नाही. वृथा राजकीय मारामाऱ्या करणं, राजकारण्यांच्या पालख्या वाहणं, त्यांनी ठरवून दिलेल्या विषयांवर एकमेकांची डोकी फोडणं, आप्तांमध्ये शत्रूत्व तयार होईल असे तापट वाद घालणं वगैरे कृतींमुळे जगण्याच्या नाजूक तारा छेडणं जवळपास बंद झालं आहे. एक मोठा वर्ग जेमतेम जगण्याची लढाई लढत असताना सुस्थितीत असलेला वर्ग असा बेभान झाला आहे.
असं असेल तर त्या समाजातून कलावंत, विचारवंत कसे तयार होणार आणि त्यांचा समाजावर प्रभाव कसा पडणार? ‘एक्स्प्रेस’च्या शंभर प्रभावशाली लोकांमध्ये त्यांचा अंतर्भाव होण्याची गोष्ट तर भलतीच दूरची!
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.