माणूस हा समाजशील प्राणी आहे वगैरे गोष्टी आपण ऐकत आलो आहोत. तरी समाजात एकत्र राहताना एकमेकांशी संवाद, देवाणघेवाण आणि मतभेद होतच असतात. मात्र अलीकडे भारतात एक चिंताजनक सामाजिक पॅटर्न दिसून येतोय. तो म्हणजे, शुल्लक कारणांवरून होणारे टोकाचे वाद आणि त्यातून घडणारी हिंसा. किरकोळ मारामारीपासून गंभीर दुखापतीपर्यंतच्या घटना यामध्ये घडतात. क्वचित प्रसंगी ही हिंसा जीव घेण्यापर्यंत जाते. रस्त्यावर गाडी चालवताना हॉर्न वाजवला म्हणून, पार्किंगच्या जागेवरून, लहान मुलांच्या भांडणावरून, सोशल मीडियावरच्या एखाद्या कमेंटवरून, वगैरे किरकोळ कारणांवरून झालेल्या वादांचं रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात होतं. हा फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. ढळती सामाजिक सहिष्णुता, बिघडलेलं मानसिक स्वास्थ्य़ या गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात.
काही बोलकी उदाहरणं
छोट्या छोट्या कारणांवरून स्वतःवरचा ताबा सुटून मारामारी झाल्याच्या बातम्या सतत माध्यमांमध्ये येत असतात. ज्या गोष्टी बोलून किंवा थोड्याफार वादविवादाने सोडवल्या जाऊ शकतात, तिथे हिंसक वळण लागताना दिसतंय. याची अलीकडली काही उदाहरणं:
पार्किंगचा वाद आणि हत्या: दिल्लीसारख्या ठिकाणी पार्किंगची जागा मिळवणं महामुश्किल काम. अशाच पार्किगच्या जागेच्या वादातून ऑगस्ट २०२५मध्ये दिल्लीत एका व्यक्तीची हत्या झाली. असिफ कुरेशी असं त्याचं नाव. आपल्या घरासमोर दुचाकी लावू नका असं तो दोन इसमांना सांगत होता. त्यातून भांडण वाढत गेलं आणि त्यात असिफला त्याचा जीव गमवावा लागला.
रोड रेज आणि जीवघेणा हल्ला: रस्त्यावरून गाडी चालवताना एकमेकांना ओव्हरटेक करणं किंवा हॉर्न वाजवणं यावरून होणाऱ्या वादाला 'रोड रेज' म्हणतात. शहरातल्या वाढत्या ट्रॅफिकमधून प्रवास करणारा व्यक्ती असा एकतरी रोड रेजचा प्रसंग दररोज बघत असतो. रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये भांडणच झालं नाही असा शहरातला व्यक्ती सापडणं अवघड आहे. पण याही पुढे जाऊन गुडगावमध्ये एका कारचालकाने दुसऱ्या कारचालकाला केवळ ओव्हरटेक करण्याच्या कारणाने थांबवून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. असा बेदरकार राग आणि फुकटचा अहंकार येतो कुठून? 'मला ओव्हरटेक करणारा हा कोण लागून गेला?', 'याने मला हॉर्न कसा दिला?' असा या लोकांचा अहंकारी दृष्टीकोन असतो.
पाळीव कुत्र्यावरून वाद आणि हिंसा: अनेकदा शेजारीपाजारी राहणाऱ्यांमध्ये लहानसहान कारणांवरून मतभेद होत असतात. पण मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पाळीव कुत्र्याला फिरवण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. तो इतका विकोपाला गेला की त्या वादातून एका व्यक्तीने गोळीबार केला. त्यात दोघांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. शेजारीशेजारी राहणाऱ्या लोकांमधला संवाद आणि सामंजस्य कुठे गेलं, असा इथे प्रश्न पडतो.
लहान मुलांमधील उद्रेक: लग्न वगैरे विषयात प्रतिष्ठेचा मुद्दा करून आपल्याच मुलामुलींना मारणारे आई वडील आपल्याला दिसत असतात. पण मोबाईल दिला नाही, खेळायला जाऊ दिलं नाही अशा कारणांवरून मुलांनी स्वतःच्या पालकांवर हल्ले केल्याच्या घटनाही अलीकडच्या काळात घडत आणि वाढत आहेत.
या घटनांमागील कारणं
रागावर ताबा न राहण्याच्या या परिस्थितीमागे अनेक सामाजिक, मानसिक आणि आर्थिक घटक जबाबदार आहेत.
मानसिक ताणतणाव: आजचं शहरातलं-निम शहरी भागातलं जगणं धावपळीचं झालं आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे आर्थिक अस्थिरता, कामाचा ताण आहे. अशा वातावरणात कौटुंबिक समस्याही निर्माण होतात. अस्वस्थ वर्तमान आणि भविष्याची चिंता यांमुळे मानसिक दबाव वाढलेला आहे. परिणामी संयम आणि सहनशीलता कमी झाली आहे. अशावेळी मनात साचलेला राग आणि निराशा शुल्लक कारणाने बाहेर पडते आणि त्याचं पर्यवसान हिंसेत होतं, असं तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत.
अहंकार आणि प्रतिष्ठेची खोटी कल्पना: 'त्याने मला असं कसं म्हणलं?', 'माझ्या गाडीला हातच कसा लावला?' किंवा 'माझ्याकडे डोळे वटारून कसं काय बघितलं?' अशा अहंकारी विचारांतून अकारण वाद निर्माण होतात. स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणं, आपली सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी धडपडणं ही याची कारणं आहेत.
भारत विरुद्ध इतर देश, महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्य, हिंदू विरुद्ध मुसलमान, मराठी विरुद्ध अमराठी, एका जातीचे विरुद्ध दुसऱ्या जातीचे असे वाद राजकीय आणि सामाजिक पातळीवर सतत होत असतात. त्याचे अनिर्बंध पडसाद सोशल मिडीयावर उमटत असतात. धर्म, देश, राज्य, भाषा, लिंग, संस्कृती अशा सर्व पातळ्यांवर आपल्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या व्यक्तीविषयी उत्सुकता, कुतुहूल न वाटता, द्वेष वाटण्याचं वातावरण वाढतं आहे. त्यामुळे संवाद न होता वादच होतात. मग मनात साचलेला राग ज्वालामुखीसारखा असा कुठेही आणि कधीही बाहेर पडतो.
सोशल मीडियाचा प्रभाव: सोशल मीडियावर कमेंटमधून सहज ट्रोलिंग करता येतं, द्वेषपूर्ण टिप्पणी करता येते. त्या आभासी जगात सहज आक्रमकपणा दाखवता येतो. तोच आक्रमकपणा आता वास्तव जगण्यातही येऊ लागला आहे का, हे तपासून बघायला हवं. सोशल मिडीयावर कसंही व्यक्त होता येतं. समाजात वावरताना जो संयम नाईलाजाने का होईना दाखवावा लागतो त्याची तिथे एवढी आवश्यकता नसते. कसंही काहीही बोलण्याच्या आणि समोरच्याविषयी आदर न दाखवण्याच्या तिथे रुळलेल्या सवयी आता प्रत्यक्षात उतरायला लागलेत का हे बघावं लागेल.
संवादाचा अभाव: शहरी वातावरणात शेजारीपाजारी आणि समाजात सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत. शहरीकरणामुळे आपण ज्या सोसायटीत राहतो तिथपासून ते ज्या कंपनीत काम करतो तिथपर्यंत एक प्रकारचा अपरिचितपणा वाढलेला आहे. बऱ्याचदा शेजारी कोण राहतं हे कित्येकांना माहिती नसतं. आपल्या कंपनीत दुसऱ्या डिपार्टमेंटला काम करणारा व्यक्ती माहिती नसतो. सगळे एकमेकांच्या गर्दीचा भाग बनत जातात. या अपरिचितपणामुळे लोक एकमेकांशी बोलायला कचरतात. अशा परिस्थितीत कोणताही मतभेद चर्चेने सोडवण्याऐवजी थेट संघर्षाचा मार्ग निवडला जातो.
न्यायव्यवस्थेवरील अविश्वास: या कायद्याच्या व्यवस्थेत न्याय मिळायला उशीर लागतो त्यामुळे 'आपणच आपला न्याय करावा' अशी भावना सामान्य लोकांमध्ये निर्माण होते. गुन्हेगारांना कठोर आणि त्वरित शिक्षा न मिळाल्याने असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होतं. असं वातावरण हिंसक प्रवृत्तींना बळ देतं.
वैयक्तिक आणि सामाजिक परिणाम
या अशा घटनांचे परिणाम केवळ पीडित किंवा आरोपी कुटुंबापुरते मर्यादित राहत नाहीत. त्याचे दूरगामी सामाजिक परिणाम होतात.
समाजात भीती आणि अविश्वासाचं वातावरण तयार होतं. रस्त्यावरून चालताना, शेजारच्यांशी बोलताना किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना लोक अधिक सावध आणि संशयी बनत जातात. सामाजिक सलोखा आणि एकोपा कमी होतो.
अशा घटनांमुळे, ताकदीच्या आणि हिंसेच्या जोरावर कोणताही प्रश्न सोडवला जाऊ शकतो असा चुकीचा संदेश समाजात पसरण्याची शक्यता वाढते. शिवाय अशा घटनांमुळे पोलीस आणि न्यायव्यवस्थेवरच्या कामाचा बोजा वाढतो. त्यांचा वेळ आणि शक्ती जी खरं म्हणजे गंभीर गुन्हेगारी रोखण्यासाठी खर्ची पडायला हवी, ती या अशा गुन्ह्यांवर खर्च होते.
शुल्लक कारणांवरून होणारी ही हिंसा ही केवळ वैयक्तिक रागाचं प्रतिबिंब नाहीय. आपल्या समाजाच्या स्वास्थ्यावर प्रश्नचिन्ह उभं करणारा हा मुद्दा आहे. शिक्षण, रोजगार, इन्फ्रास्ट्रक्चर, महागाई, स्थलांतर, आरोग्य इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय नागरिकासमोर साचलेले प्रश्न या रागाच्या मुळाशी आहेत का हे बघावं लागेल. या सगळ्याचा परिणाम म्हणून घटलेली सहनशीलता, वाढता अहंकार, एकमेकांविषयीचा द्वेष, मानसिक ताण आणि संवादाचा अभाव या सर्वांचा हा एकत्रित परिणाम आहे. या समस्येवर मात करण्यासाठी नुसते कठोर कायदे करून फायदा नाही. तर सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावरही प्रयत्न करावे लागतील. शाळा-महाविद्यालयांमधून आपल्या रागाचं व्यवस्थापन कसं करायचं, वाद कसे मिटवायचे, संघर्षाचं निराकारण कसं करायचं, हे शिकवायला हवं. त्याचसोबत मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणं, सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी सामुदायिक उपक्रम राबवणं असे अनेक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये भारताची दरसाल होणारी घसरण, अशा गोष्टींकडे गांभीर्याने बघायला हवं. नाहीतर हा सामाजिक ज्वालामुखी समाजाची शांतता आणि सुरक्षितता भस्मसात करू शकतो.
मृदगंधा दीक्षित | mrudgandha.uniqueportal@gmail.com
मृदगंधा दीक्षित युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून त्यांना कथा-कादंबरी-कविता लिहिण्यातही रस आहे.
