सुचेता कडेठाणकर ही मंगोलियातील गोबीचं वाळवंट चालून जाणारी पहिली भारतीय. १५ जुलै रोजी तिच्या या मोहिमेला चौदा वर्षं पूर्ण होत आहेत. सलग ५२ दिवस चाललेल्या या सोळाशे किलोमीटरच्या कष्टप्रद पायपिटीतून तिला स्वत:विषयी जे शोध लागत गेले त्याबद्दलचा हा अनुभव.
आंखें मूंद किनारे बैठो, मन के रख्खो बंद किवाड ।
इंशाजी लो धागा लो, लब सिलो खामोश रहो।
अशा शांततेचा अनुभव आपण किती वेळा घेतो? रोजच्या जगण्यामध्ये तर नक्कीच नाही. अगदी ठरवून मुद्दाम शांत-रम्य ठिकाणी गेल्यावर आपण अनुभवतो तीदेखील खरं म्हणजे शांतता नसतेच. शांत-रम्य ठिकाणी जवळच्या व्यक्तीला बरोबर घेऊन गेल्यावर शांततेत तरंग उठल्याशिवाय राहतील कसे? अगदी आपण एकटे गेलो तरी आपल्या आत चाललेली अनागोंदी, गडबड आणि उसळलेला विचारांचा डोंब आपल्याला शांततेचा सविस्तर अनुभव घेऊच देत नाही. वर सांगितलेल्या दोह्यामध्ये लिहिल्याप्रमाणे ‘मन के रखो बंद किवाड', म्हणजे मनाची दारं बंद करून टाकायची, बाहेरचं काही आत येऊच द्यायचं नाही, हे अशक्यप्राय वाटतं... किंवा ‘लब सिलो खामोश रहो', ही शक्यता तर फारच दूरची. विचार करताना वाटतं, सुपरफास्ट प्रगतीची घाई झालेल्या कोणत्याही देशात, शहरात, खेड्यात अशी शांतता अनुभवायला मिळणं शक्यच नाही. मी मात्र गोबीच्या वाळवंटात शांतता तिच्या अगदी नैसर्गिक स्वरूपात अनुभवली.
मंगोलियामधलं गोबीचं वाळवंट आणि त्या वाळवंटामध्ये राहणारे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके भटके लोक. आवाज निर्माण करणारी कोणतीच यंत्रं त्यांच्याकडे नाहीत, त्यामुळे कोणताच कृत्रिम आवाज त्यांच्या ओळखीचा नाही. अथांग वाळवंटाच्या मध्यात दिसणारं या लोकांचं एखादंच घर. त्या घरामध्ये राहत असणारं एकच कुटुंब- सात-आठ लोकांचं. हे लोक आणि त्यांच्या शेळ्या, मेंढ्या, घोडे आणि उंट असा त्यांचा तांडा. शेजार कमीत कमी तीनशे किलोमीटर लांब. अशा स्थितीत आवाज होणार तरी कशाचा आणि किती? एकमेकांशी बोललं तरीसुद्धा त्या आवाजाचा त्या वाळूच्या पसाऱ्यामध्ये इवलासा तरंग उठणार आणि विरून जाणार...
वाळवंटातली सुंदर थंड रात्र, वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अधिकच जाणवणारी थंडी, स्वच्छ निळं आकाश, त्या निरभ्रतेमध्ये अगदी जवळ दिसणारा मोठ्ठा चंद्र, चंद्राच्या प्रकाशामध्ये उठून दिसणारे आमचे हिरवे तंबू... अगदी चंद्रमौळी झोपड्यांची आठवण करून देणारे...आवाज म्हणावा असं काहीच नाही. एका सरळ रेषेत बांधून ठेवलेल्या आमच्या उंटांपैकी कोणी शिंकलाच तर त्याच्या शिंकेचा आवाजसुद्धा गडगडाटासारखा भासणार. रात्री तंबूमध्ये जमिनीला कान लावून स्लीपिंग बॅगमध्ये झोपल्यावर तंबूच्या बाहेर वाळूवरून चालणाऱ्या एखाद्या सापाची किंवा विंचवाची सळसळसुद्धा थ्री-डी सिनेमासारखी अंगावर येणार... शांततेची त्या वेळी मला भीती वाटली तशी मला कधी वाटेल असं वाटलं नव्हतं.
मोहिमेला सुरुवात झाली त्या वेळी नऊ वेगवेगळ्या देशांमधून आलेले आम्ही तेरा जण होतो. नवीन ओळखी होत होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये भरपूर गप्पा होत. दिवसभर चालताना, संध्याकाळी कॅम्प केल्यावर ते अगदी रात्री झोपेपर्यंत गप्पा रंगत. हळूहळू मोहिमेची तीव्रता वाढत गेली. उन्हाचा तडाखा वाढत गेला. प्रत्येकाने आपापला ताल पकडून चालायला सुरुवात केली. प्रत्येकाचा वेग वेगळा, काना-मनात वाजत असलेलं गाणं वेगळं, त्याच्या तालाशी पावलांचा मेळ घालत पकडलेली लय वेगळी. आपसात बोलणं हळूहळू कमी होऊ लागलं. आठ तासांच्या चालण्यामध्ये मुश्किलीने चार-पाच वाक्यं बोलली जात. कॅम्प केल्यावरदेखील रात्रीचं जेवण होईपर्यंत सगळेजण तंबूच्या बाहेर येऊन बसत, पण गप्पा नाहीच. प्रत्येकाकडे आपापलं साधन... स्वतःशीच संवाद साधण्यासाठी. कोणाकडे लिहायला डायरी, कोणाकडे वाचायला पुस्तक, कोणाकडे ऐकायला संगीत, कोणाची नुसतीच शून्यामध्ये लागलेली तंद्री, कोणी उंटांबरोबर न बोलता रमलेला, तर कोणी स्वयंपाकघराच्या तंबूमध्ये आमची (केवळ कझाक भाषा येणारी) कुक यंका हिच्याबरोबर स्वयंपाकात रमलेला. विचित्र गोष्ट अशी, की कुणाला एकमेकांशी बोलायची गरजही वाटायची नाही. माणूस हा समाजप्रिय प्राणी, त्याला माणसांची गरज असते वगैरे वगैरे म्हणतात. मग त्या इतक्या खडतर परिस्थितीमध्ये, शरीराला प्रचंड थकवल्यावरसुद्धा आम्हाला एकमेकांशी बोलायची गरज का बरं वाटत नव्हती? कदाचित आम्ही सगळे एक टीम म्हणून एकत्र होतो, तरीही सगळेजण एक-एकटेच होते. शरीराला सर्वाधिक वेदना होत असताना माणसाला माणसाच्या संगतीची ओढ का वाटत नाही? हा अनुभव खूप विचित्र आणि धक्कादायक होता. वैयक्तिक माझ्याबद्दल सांगायचं, तर मलाही एकटीलाच राहायला आवडू लागलं होतं. दिवसभर ट्रेकिंग करताना सगळे एकत्र असत, एकत्र चालत. चालताना एकमेकांमध्ये कधी कधी एक-दोन किलोमीटरचंसुद्धा अंतर असे. कोणी दोघंजण अगदी एकत्र म्हणावं असे शेजारी शेजारी चालत असले तरी त्यांच्यामध्ये संवाद कधी तरीच व्हायचा. आता विचार करताना वाटतं, किती तरी दिवस मी एकही शब्द बोलले नसेन. विपश्यनेचा भाग म्हणून लोकांना असं मौनव्रत पाळावं लागतं हे ऐकलं होतं, पण मौनाचा हा अनुभव मी माझ्या नकळत घेत होते. स्वतःशीच होणारा संवाद वाढत होता.
वयाच्या ३२ वर्षांपर्यंत कित्येक अनुभव मी घेतले असतील. पण आता वाटतं, त्या कोणत्याच अनुभवाची खऱ्या अर्थाने अनुभूती मला झाली नव्हती. खरं म्हणजे जोवर तुम्ही असे एकटेच संपूर्णपणे निसर्गाच्या अधीन जात नाही तोवर एखादा अनुभव घेणं म्हणजे नेमकं काय असतं हेच आपल्याला कळत नाही. सुख-दुःखाचे अनेक प्रसंग प्रत्येकावर गुदरतात, पण रोजचं जगताना लहानपणापासून आपण कायम स्वतःला तडजोडच करायला शिकवत असतो. दुःख झालं तर ते झटकून मनाची उभारी घेऊन पुढे जायला आपल्याला शिकवलं जातं. जवळच्या व्यक्तीचं निधन असो, परीक्षेत आलेलं अपयश असो, प्रेमभंग असो किंवा अजून काही. जो माणूस या सर्व दुःखाच्या प्रसंगांवर मात करून उभा राहतो तो आपल्या ठायी यशस्वी असतो. याच्या उलट, आनंदाच्या प्रसंगातही आपली विवेकबुद्धी आणि समतोल ढळू न देणारा मनुष्य आपल्या लेखी मोठा ठरतो. हे सगळं करताना असं वाटतं, की आपण हे सुख-दुःखाचे कोणतेही प्रसंग मुळात अगदी संपूर्ण असे अनुभवतच नाही. त्या प्रसंगांमधून आपल्याला मिळणारी अनुभूती आपल्यापर्यंत पोचण्याआधीच, त्या अनुभूतीची चाहूल लागताच आपण आपल्या मनाला शहाणपणाची शिकवण देऊ लागतो. मग तो अनुभव आपल्यापर्यंत पोचताना आपण त्याला सामोरे जायला पूर्ण तयार असतो. त्या अनुभवामधून मिळू शकणाऱ्या सर्व भावनिक चढ-उतारांची कल्पना आपण खूप आधीच करून ठेवलेली असते. त्यामुळे आपल्यापर्यंत पोचणारा अनुभव पांचट झालेला असतो... तिखट, गोड, कडू, आंबट अशी कोणतीच चव नसणारा. आडाखे, विश्लेषण या सगळ्या आपण आपल्याला लावून घेतलेल्या सवयींमुळे एखाद्या गोष्टीचा मूळ गाभा बाजूला राहतो आणि आपल्याजवळ उरतात ते आपण त्या गोष्टीबद्दल बांधलेले आडाखे.
माझ्या वडिलांचं निधन होऊन आता अकरा वर्षं होऊन गेली, पण माझ्या मते ते गेल्याचं दुःख मी अकरा वर्षांनतर गोबीच्या वाळवंटात एकटी असताना खऱ्या अर्थानं केलं. जगासमोर दुःख करण्याची लाज वाटत होती, हे याचं कारण नव्हे, तर बाबा गेले आणि ते आता माझ्या आयुष्यात माझ्याबरोबर नसणार, हे सत्य तोवर मला पूर्णपणे उमगलंच नव्हतं. हे सत्य मी आजवर रिचवलंच नव्हतं. दीर्घकालीन आजारामुळे बाबा गेले. त्यांच्या आजाराच्या तीव्रतेमुळे हे केव्हा तरी होणार याची मानसिक तयारी होती. कदाचित त्यामुळेच, ते गणेश चतुर्थीला गेले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी या सत्याशी जुळवून घेतलेलं होतं. माझी लहान बहीण तर तेव्हा दुःख करण्याच्यादेखील वयात नव्हती. ती आठ वर्षांची होती. तिच्यासाठी म्हणून अगदी नकळत, शक्य तितकं नॉर्मल राहण्याची आणि वागण्याची सवय मी लावून घेतली. आईलादेखील या दुःखामधून शक्य तितकं लवकर बाहेर येता यावं, म्हणून पुन्हा ऑफिसला जायला लावलं. आणि एकूणच महिन्याच्या आतच सगळं गाडं पुन्हा एकदा रुळावर आणलं. कालपर्यंत बाबा माझ्याबरोबर होते, आज नाहीत, इतकं मी ते सोपं करून टाकलं. गेल्या अकरा वर्षांत कित्येक कारणांनी कित्येक वेळा त्यांची आठवण आली असेल, पण मी स्वतःला त्या आठवणींमध्ये कधी रमूच दिलं नाही. कारण एकच.. यशस्वी व्हायचं असेल तर आपण खंबीर, कणखर वगैरे वगैरे राहायला हवं, ही मिळालेली शिकवण. पण वाळवंटामध्ये दिवसच्या दिवस एक अवाक्षरही न उच्चारता घालवल्यावर मनात गर्दी होत असे, ती याच सगळ्या अपुऱ्या राहिलेल्या अनुभवांची. बाबांच्या जाण्याची पूर्ण जाणीव माझ्या मना-शरीरातल्या प्रत्येक कणाला झाली, ती या वाळवंटामध्ये. या वाळवंटामध्येच मी अकरा वर्षांत प्रथमच त्यांच्या जाण्याचं दुःख केलं. अगदी रडून नाही; पण ती जाणीव ज्या दिवशी मला झाली त्या दिवशी जणू आत्ताच बाबा सोडून गेल्याचं दुःख मला झालं. असे कित्येक अपुरे अनुभवलेले क्षण मी वाळवंटामध्ये पुन्हा एकदा पूर्णपणे अनुभवून घेतले.
मला हा असा अनुभव वाळवंटामध्येच का आला असावा? विचार केल्यावर लक्षात येतं, की मुळात मी माझा स्वतःचाच अनुभव प्रथम घेत होते. खूप खूप सोपं उदाहरण देऊन सांगता येईल. परत आल्यावर मी ‘ज़िंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट बघितला. पैशांच्या मागे धावणारा हृतिक रोशन डीप सी डायव्हिंगचा अनुभव घेतो आणि आनंदाने त्याच्या डोळ्यांमधून अश्रू येतात. चित्रपटमधल्या या प्रसंगाशी मी स्वतःला खूप रिलेट करू शकले. श्वास घेणं आणि चालणं या दोन गोष्टी आपण रोजच्या जगण्यामध्ये प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या करत असतो- त्यांचा कोणताच विचार न करता. पण आपला चालत असणारा श्वास, त्याची एकसारखी लय, आपल्या श्वासाच्या तालाबरोबर लयीत पडणारी आपली पावलं, पावलांचा वेग वाढवला की लगेच वाढणारी श्वासाची गती... हे सगळं सगळं किती रम्य आहे! आपल्या प्रत्येक श्वासाचा अनुभव आपण जेव्हा घेतो तेव्हा खरं तर आपण आपल्याच असण्याचा अनुभव घेत असतो. माझ्यासाठी हा अनुभव भारावून टाकणारा होता, आणि म्हणूनच कदाचित शरीराला प्रचंड कष्ट देऊनसुद्धा मी शीळ घालत, आनंदात त्या रखरखीत उन्हात १६३६ किलोमीटर चालू शकले. जावेद अख्तर यांचे शब्द उधार घेऊन मनाची ही अवस्था नेमकी सांगता येईल..
पिघले नीलमसा बहता हुआ यह समा
नीली नीलीसी खामोशियाँ
न कहीं हैं जमीं न कहीं आसमां
सरसराती हुई टहनियाँ, पत्तियाँ
कह रही हैं कि बस एक तुम हो यहाँ
सिर्फमैं हूँ, मेरी साँसे हैं और मेरी धडकनें
ऐसी गहराइयाँ, ऐसी तनहाइयाँ
और मैं, सिर्फ मैं
अपने होनेपे मुझको यकीन आ गया...
वाळूच्या अथांग पसरलेल्या त्या समुद्रापुढे, त्या भव्यतेपुढे आपलं अस्तित्व आणि आपल्या क्षुद्रतेची जाणीव होणं ही फार दूरची गोष्ट राहिली. त्याआधी मुळात आपल्या असण्याचीच जाणीव होणं आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक रंध्रांना श्वास घेताना अनुभवणं, हा अनुभव अवर्णनीय आहे. मोहिमेतून परत आल्यावर माझ्या मनामध्ये भरून राहिलेली कोणती एक आठवण असेल, तर ती ही.
शरीराला होणाऱ्या वेदनांचं आपण एरवी स्तोम माजवून ठेवतो. गोबी मोहिमेच्या दरम्यान शरीराला होणाऱ्या या वेदना शरीराचा एक भाग बनल्या होत्या. वेदना आणि शरीर हे जणू भिन्न नाहीच, असं वाटायचं. दररोज वाळवंटातल्या त्या उष्णतेमध्ये तीस-पस्तीस किलोमीटरचं अंतर चालल्यावर पायांना येणारे फोड, नखांना होणाऱ्या जखमा या क्षुल्लक वाटू लागल्या. मोहिमेच्या साधारण विसाव्या दिवशी मला आमच्यातल्याच एका उंटाने जोरदार लाथ मारली. त्या लाथेमुळे माझ्या पायाला थोडंफार लागलं, पण खांद्याला जोरदार दुखापत झाली. त्या वेळी माझा खांदा खरं म्हणजे निखळला होता.(ही गोष्ट मला मोहिमेतून परतल्यावर समजली.) तेव्हा मोहिमेचे पुढचे तीसहून अधिक दिवस शिल्लक होते. खांद्यामध्ये होणाऱ्या वेदना भयानक होत्या. त्यामुळे दररोज सॅक पाठीवर घेण्यासाठी नवनवीन युक्त्या मी शोधून काढीत असे. अर्थात, शेवटपर्यंत मला सॅक विनावेदना पाठीवर घेण्याची पद्धत सापडलीच नाही. पण या खांद्याच्या दुखण्यामधून मला आपल्या शरीराच्या वेदनेबद्दलचा एक शोध लागला. आपलं शरीर हे मुळात वेदनांचे वेगवेगळे स्रोत निर्माण करण्यात तरबेज असतं. खरं म्हणजे विसाव्या दिवसानंतर या संपूर्ण मोहिमेमध्ये माझा सर्वाधिक वेदनादायक भाग माझा खांदा असायला हवा होता. पण कित्येक दिवस असे जात असत की खांद्याची वेदना मला जाणवतच नसे. डाव्या पायाची करंगळी किंवा उजवा घोटा एखाद्या दिवशी कमालीचा दुखू लागे आणि शरीर वेदनेचा आणखी एक स्रोत निर्माण करी. मग माझं लक्ष जुन्या वेदनेला विसरून या नवीन स्रोताकडे वळे. शरीर दिवसागणिक असे दुःखाचे, वेदनेचे स्रोत निर्माण करत जाई, पण त्या सर्वांवरून लक्ष काढून घेतल्यावर आपल्याला त्या वेदनेचा विसर पडतो, मनाला त्या वेदनेची सवय होऊ लागते आणि मग शरीरही त्रास देत नाही, असं माझ्या लक्षात आलं आहे.
कित्येक वेळा मी दिवस संपवून जेवण झाल्यावर माझ्या स्लीपिंग बॅगमध्ये शिरत असे, तेव्हा दिवसभरात मी चाललेलं प्रत्येक पाऊल मला आठवत असे. त्या पावलाखालचा रस्ता तसाच्या तसा माझ्या समोर जिवंत उभा राहत असे. काल दुपारच्या जेवणात आपण कोणती भाजी खाल्ली हेही जेव्हा इकडे आल्यावर आठवेनासं होतं, तेव्हा वाळवंटात आलेला हा अनुभव मोठा विचित्र वाटतो. प्रत्येक क्षण त्यामधल्या छोट्या छोट्या कंगोऱ्यांसकट जगणं म्हणजे काय हे मला वाळवंटामध्ये उमगलं.
दिवसा खूप ऊन आणि रात्री खूप थंडी, आजूबाजूला पसरलेली फक्त रेताड, नापीक जमीन- एकही हिरवा कोंब नसलेली. क्षितिजाच्या विस्तारापर्यंत स्वच्छ दिसणारं दृश्य- एकसुरी. अशा परिस्थितीमध्ये जगभराच्या काना-कोपऱ्यांमधून आलेल्या अनोळखी लोकांबरोबर ५२ दिवस चालताना स्वतःच्या अनेक क्षमतांचा कस लागला, अनेक धडे मिळाले. लहानपणापासून शिकलेल्या काही शिकवणींची उजळणी झाली. मुळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपल्यामध्ये असणाऱ्या सर्व क्षमता अजमावून बघण्याची ही संधी आपण स्वतःला किती वेळा देतो? संयम आणि संस्कारांच्या आपण आखून घेतलेल्या मर्यादांमध्ये राहण्याच्या अट्टहासामुळे मर्यादेपलीकडे भासणाऱ्या काही गोष्टी करण्यासाठी आपण धजावतच नाही. आपल्याला असलेल्या या मर्यादा खरंच मर्यादा आहेत की आपल्या सोयीसाठी आपणच घालून घेतलेले बांध आहेत, हे आपण पडताळूनच बघत नाही. आपल्यामध्ये असणाऱ्या प्रचंड शक्तीची जाणीव आपण स्वतःला होऊच देत नाही. आपापल्या आयुष्यात आपापल्या परीने अशक्य आणि अवघड वाटणाऱ्या गोष्टी करून बघण्याची, आपल्या सोयीच्या आणि सवयीच्या त्या परिघामधून बाहेर येण्याची थोडीशी तयारी दाखवली तर आपली आपल्या स्वतःलाच नवीन ओळख होते. मला माझी नव्याने खरं म्हणजे प्रथमच ओळख झाली. रूटिनमध्ये घडणाऱ्या घटनाही रूटिनच असतात. त्यामध्ये धक्कादायक असं काही घडण्याच्या शक्यताच कमी असतात. त्यामुळे रूटिनमध्ये घडणाऱ्या काही प्रसंगांमध्ये आपल्या प्रतिक्रिया काय असतात हे आपल्याला माहीत असतं. मात्र, एखाद्या अनपेक्षित प्रसंगामध्ये आपणच दिलेल्या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे स्वतःलाच चक्रावून टाकणारे प्रसंग किती येतात? आपण ते येऊच देत नाही. अगदी साधं उदाहरण द्यायचं, तर भूक लागली की आपण खातो. पण खूप खूप भूक लागूनसुद्धा, जेवण न मिळूनसुद्धा चालत राहिलं तर आपण कसे वागतो हे मी प्रथमच अनुभवलं. स्वतःच्या मनालाच खेळवत राहण्याचे, फसवण्याचे अनेक मार्ग आपण कुठून कुठून काढत राहतो तेव्हा आपल्यातल्या अचाट क्षमतेची जाणीव आपल्याला होते.
स्वतःला अशा चित्रविचित्र परिस्थितीमध्ये टाकून स्वतःच्या प्रतिक्रिया काठावर बसून स्वतःच बघण्यामधली मजा आता मला येऊ लागली आहे. माझ्यासाठी हा एक नवीन खेळच होऊन बसला आहे. गोबी मोहिमेच्या दरम्यान मला आलेल्या या अनेकविध अनुभवांमुळे मी खूप समृद्ध झाले. परत आल्यावर हेच सगळे अनुभव मनात रुंजी घालत राहिले. चालणं, बदलतं हवामान, मोठ्ठं अंतर, खडतर प्रवास, गोबी वाळवंट चालणारी पहिली भारतीय, वगैरे वगैरे गोष्टी आता खूप खूप मागे पडल्या आहेत. मनःपटलावर कायमचे उमटून गेलेत ते फक्त हे अनुभव!
(अनुभव जानेवारी, २०१२च्या अंकातून साभार)
