आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

आणि एक डोंगर हिरवागार झाला

  • योगिनी पाळंदे
  • 13.03.25
  • वाचनवेळ 5 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
pravin bhagwat header

राजगुरुनगरजवळील वेताळे गावातला डोंगर एकेकाळी जंगलमय, हिरवाकंच होता. पण अक्षम्य वृक्षतोडीने, अविरत ओरबाडण्यामुळे आणि जमीन जाळण्याच्या चुकीच्या प्रथेमुळे हा डोंगर ओसाड, वैराण होत गेला. मात्र ११ वर्षांपूर्वी या रखरखीत डोंगरावर डॉ. प्रवीण भागवत नावाचा फकीर आला आणि त्याने आपली हरित संवेदनांची झोळी पसरली. या सृजनयज्ञात प्रवीण यांना साथ मिळाली अनंत तायडे यांची. त्यांच्या 14trees foundation या संस्थेविषयी..

पुणे-नाशिक रस्त्यावर एकेकाळी दुतर्फा पसरलेल्या हिरव्यागच्च जमिनी आता आधुनिक काळाच्या पडद्याआड नाहीशा झाल्यात. शेतीच्या जागी मिसळ, वडापाव, पावभाजीचे, अगदी मॅकडोनाल्ड आणि पिझ्झा हट यांचेसुद्धा स्टॉल आलेत. जोडीला नवनव्या गृहसंकुलांच्या जाहिरातींचे फलक, मोठी मोठी बांधकामं आणि त्यांचे बेपर्वाईने टाकलेले राडेरोडेही तिथे आहेत. त्या कोरड्या भगभगीतपणात भर घालायला धूर ओकणारी अगणित वाहनं आणि त्या साऱ्यांचे क्षणोक्षणी वाढणारे ‘कार्बन फूटप्रिंट्स’. जिथे सपाट, सखल जमिनीची ही कथा तिथे डोंगराळ भागाबद्दल काय बोलावं.

राजगुरुनगरजवळील वेताळे गावातल्या डोंगरावर हीच दुःस्थिती ओढवली होती. एकेकाळी हा डोंगर जंगलमय, हिरवाकंच होता. पण अक्षम्य वृक्षतोडीने, अविरत ओरबाडण्यामुळे आणि जमीन जाळण्याच्या चुकीच्या प्रथेमुळे हा डोंगर ओसाड, वैराण होत गेला.

मात्र ११ वर्षांपूर्वी या रखरखीत डोंगरावर डॉ. प्रवीण भागवत नावाचा फकीर आला आणि त्याने आपली हरित संवेदनांची झोळी पसरली. त्या उजाड जमिनीची, बोडक्या डोंगराची, निसर्गदेवतेची माफी मागून तो कामाला लागला. त्याच्या साथीला उभे राहिले अनेक ग्रामीण कृषीकर्ते आणि झपाटलेले शहरी कार्यकर्ते. वड, पिंपळ, चिंच, बाभूळ, बेल, जांभूळ, अर्जुन, पुत्रंजीवी, आपटा, बहावा, बेहेडा, काटेसावर असे चारशे देशी वृक्ष लावण्याचा सर्वांनी संकल्प केला आणि बीजारोपणाचा एक यज्ञ सुरू झाला.

या सृजनयज्ञात प्रवीण यांना साथ मिळाली अनंत तायडे यांची. अनंत हा शेतकऱ्याचा मुलगा. शहरात येऊन नशीब कमावण्यासाठी वाहनचालक म्हणून काम करत असलेला. अतिशय कल्पक आणि अर्थातच कष्टाळू. प्रवीण यांना त्याची साथ मिळाल्यावर कामाचा झपाटा वाढू लागला. निरनिराळे प्रयोग होऊ लागले.

डोंगरजमीन हिरवी करायची तर तिला जलसिंचन हवं. डोंगरापासून अगदी जवळच चासकमान धरणाच्या जलाशयाचं मुबलक पाणी उपलब्ध होतं. मात्र तिथलं पाणी वापरायचं नाही असा एक कठीण-पण प्रवीण यांनी केला आणि मग त्यांना कल्पना सुचली ती जलतळी खोदण्याची. त्या भागात प्रचंड पाऊस पडतो. पावसाचं पाणी अडवून साठवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांतून डोंगरउतारावर मोठाली जलतळी खोदली गेली. त्यांत साठलेल्या पाण्याने डोंगरावर लावलेल्या सर्व देशी वृक्षांना पाणी पुरवलं गेलं. पाणी देताना अतिशय विचारपूर्वक मर्यादित पाणी दिलं गेलं. ती झाडं विपरित परिस्थितीतसुद्धा तग धरून जिवंत राहू शकतील याची खातरजमा केली गेली.

आज त्या परिसरात एकशे आठ जलतळी आहेत. आणि त्यांच्या मदतीने गेली अकरा वर्षं एक जिवंत सळसळणारी हरित क्रांती अविरत चालू आहे. दोन लाखांच्यावर देशी वृक्ष लावले गेले आहेत. त्यांच्या वाढीकडे आस्थेने लक्ष पुरवायला गावातीलच दोनशे-अडीचशे माणसं रोजगारावर नेमलेली आहेत. त्यांच्या हाताला काम, श्रमाला दाम आणि नजरेला हिरवा आराम मिळतो आहे. तिथे वावरत असलेल्या मधमाश्या, भुंगे, किडे आणि असंख्य पक्षी यांपासून ते अगदी बिबट्यापर्यंतचे प्राणी जंगल पुनर्वसन यशस्वी झाल्याची साक्ष देत आहेत.

‘एक माणूस पृथ्वीवर जितका प्राणवायू वापरतो, तितका त्याला जर सृष्टीला परत करायचा असेल तर त्याने किमान चौदा देशी झाडं लावून जगवायला हवीत,’ या तत्त्वाला अनुसरून या प्रयोगाचं नाव 14trees foundation असं ठेवलं गेलं.

चार एकरावर सुरू झालेली ही रुजवण दोनशे एकरांपर्यंत पोहोचली. पण हा प्रवास खडतर होता. आसपासच्या शेतकऱ्यांनी त्यांची जमीन देण्यासाठी सुरुवातीला कडाडून विरोध केला. पण ग्रामस्थांना रोजगार पुरवत पुरवत, शास्त्रीय पद्धतीने, सातत्याने चालू असलेल्या त्या सृजनसोहोळ्याला मिळणारं यश बघून शेतकर्‍यांचा विरोध मावळत गेला आणि पुढे येऊन येऊन त्यांनी आपल्या जमिनी देऊ केल्या.

डॉ प्रवीण भागवत यांना मोलाची साथ देणार्‍या अनंत तायडे याला आज तिथे सगळे अनंतराव म्हणून ओळखतात. अनंत स्वतः तिथे देशी वृक्षांच्या अनेक नर्सरीज यशस्वीपणे चालवत आहे. त्याच्याकडे शेतीविषयक पुस्तकी ज्ञान नाही, तरी शाश्वत विकास या विषयात त्याला खोलाची समज आहे. पाण्याचं नियोजन, देशी वृक्षांचं संगोपन, tree guard making, बांबूतलं कोरीव काम, stone house making, लाकडाच्या विविध वस्तू बनवणं अशा अनेक कामांत तो पारंगत झाला आहे.

डॉ प्रवीण आणि अनंत यांची दूरदृष्टी इतकी, की त्यांचे दोन कृषिकर्ते भीमाशंकर जंगलात पूर्णवेळ बीज संकलनाचं काम करत आहेत. म्हणूनच आजच्या घडीला त्यांच्या नर्सरीमध्ये पाच लाख वृक्षबाळं तयार आहेत, जी छोट्या पिशव्यांतून सरोगेट होऊन मोठ्या मातेच्या कुशीत रुजायची वाट बघत आहेत.

या कामाने प्रभावित झालेल्या आजूबाजूच्या गावातल्या अनेक ग्रामपंचायतीसुद्धा प्रवीण यांच्याकडे येत आहेत. सुकून पिवळी पडलेली त्यांची गायरानं हिरवी व्हावीत यासाठी रीतसर करार करत आहेत. त्या गायरानांची जमीन धरून आजमितीला बाराशे एकरांच्या गायरानांवर प्रवीण आणि अनंत यांची जादूची कांडी फिरली आहे. आता सजग झालेली आणखी अनेक नवीन गावं आणि ग्रामपंचायती 14 trees च्या अहिल्यास्पर्शाची वाट पाहात आहेत.

भारतातली 20 टक्के जमीन ही मानवाच्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे ओसाड झालेली आहे. यावरूनच या कामाचा आवाका किती प्रचंड आहे याची कल्पना येते. म्हणूनच आता जास्तीजास्त कार्यकर्त्यांची आणि अर्थातच निधीची गरज निर्माण झाली आहे. या कामात सहभागी होण्यासाठी अनेक खाजगी कंपन्यांनी तिथे आपापली ग्रीनव्हेंचर्स केली आहेत. कुणी कर्मचाऱ्यांना भेट म्हणून तिथल्या झाडांचं पालकत्व घेतलं आहे. तर कुणी आपला CSR Fund देऊ केला आहे. कुणी कर्मचार्‍यांसोबत तिथे भेट देऊन वृक्षारोपणाचं काम केलं आहे. तिथे कॉर्पोरेट ग्रोव्हज आणि व्हिजिटर ग्रोव्हज आहेत.

डॉ प्रवीण हे कानपूर आयआयटीचे माजी विद्यार्थी. कानपूर आयआयटीला ६० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी तिथल्या शेकडो शिक्षकांच्या नावांनी झाडं लावली आहेत. आपल्या शिक्षकांची ऋणजाण ठेवून त्यांना वृक्षरूपाने अमर करण्याच्या या कल्पनेला दाद द्यावीशी वाटते. त्यामुळेच तिथे आता ‘कानपूर आय आय टी ग्रोव्ह’सुद्धा तयार झालं आहे.

असं म्हणतात, की संपूर्ण सजीवसृष्टीत मानव हा सर्वात शेवटी पृथ्वीवर आला आणि त्याने केलं काय, तर संसाधनांची अनिर्बंध लूट. हजारो वर्षांच्या या ओरबाडण्याला आवर घालायची वेळ आली आहे. ढळलेला तोल सावरायची वेळ आली आहे. अन्यथा पुढच्या पिढ्यांवर कोणती वेळ ओढवेल सांगता येत नाही.

14trees foundation सारख्या संस्था आपलं समाजभान, निसर्गभान, कार्बनभान जपण्यासाठी जे कार्य करत आहेत त्याला जास्तीतजास्त माणसं जोडली जावीत हीच इच्छा आणि अपेक्षा.

https://www.14trees.org

योगिनी पाळंदे







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 3

Dhanashree Karmarkar 15.03.25
स्तुत्य उपक्रमाला मनापासून नमस्कार
प्रतिमा जोशी 14.03.25
अतिशय मोलाचं कार्य. तितकंच कठीण. एखाद्या तपस्येप्रमाणे ! अवघ्या चराचर सृष्टीच्या क्षेम कल्याणासाठी अश्या प्रकारची तपश्चर्या करणार्‍या या व्यक्ती आणि त्यांचे सहकारी यांच्यासमोर केवळ नतमस्तक व्हायला होतं. या अभिनव कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐
समीर मणियार 13.03.25
उत्तम काम सुरु आहे. पर्यावरण संतुलनासाठी डॉ प्रविण आणि अनंतराव करीत असलेले काम लाखमोलाचे आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी ते करीत असलेले संवेदनशील समाजमनाचे काम नव्या पिढीपर्यंत जायला हवे.
See More

Select search criteria first for better results