
जॉगिंग ट्रॅकवर होते. तिथे आवाज ऐकू आला. पथनाट्य सुरू होतं.
‘कापडी पिशव्या शिवून होताच, त्यांचा वापर जरूर करा
प्लॅस्टिकच्या विळख्यातून पृथ्वी आपली मुक्त करा..’
आवाजाच्या दिशेने गेले तेव्हा सातवी-आठवीच्या मुलींनी लक्ष वेधून घेतलं. सर्वांनी पांढरा कुर्ता आणि जीन्स घातलेल्या. या मुली काय करताहेत, ते पाहण्यासाठी त्यांच्यापाशी गेले. त्यांना विचारलं, “हे पथनाट्य कसलं?’’
त्या म्हणाल्या, ‘‘आम्हाला पृथ्वीला प्लॅस्टिकमुक्त करण्यात ‘खारीचा वाटा’ उचलायचाय.’’

त्यांच्या उपक्रमाचं नावच ‘खारीचा वाटा’ असं आहे. ओवी चौगुले, राधा ओढेकर आणि राधा कुलकर्णी या तिघींनी हा उपक्रम सुरू केलाय. ओवी चौगुले आणि राधा कुलकर्णी या आनंद निकेतन शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. तर राधा ओढेकर ही विज्डम हाय या शाळेची विद्यार्थिनी आहे. आनंद निकेतन शाळेच्या पुस्तक जत्रेच्या वेळीही या मुलींचा कापडी पिशव्यांचा स्टॉल पाहिल्याचं मला आठवलं.
या उपक्रमाची कल्पना या शाळकरी मुलींना सुचली कशी?
त्याचं झालं असं, या मुली आपल्या आईबरोबर भाज्या आणि फळं घ्यायला जात, तेव्हा विक्रेते त्यांना आपणहून प्लॅस्टिकच्या पिशवीत भाज्या देत असत. हे या मुलींना खटकत असे. त्या एकमेकींशी या विषयावर बोलत. बोलता बोलता एकदा त्यांच्या मनात विचार आला- ‘आपणच या विक्रेत्यांना कापडी पिशव्या नेऊन दिल्या तर ते ग्राहकांना प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशव्याच देतील.’त्यांनी हे घरी सांगितलं. घरच्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शनही केलं. मग तिघी कामाला लागल्या. त्यांनी आपापल्या घरातले वापरात नसलेले चांगले कपडे गोळा केलेच; पण ओळखीच्या घरांमधूनही ते मागायला सुरुवात केली. या कपड्यांचा पुनर्वापर करून वेगवेगळ्या पिशव्या शिवून घ्यायच्या, असं त्यांनी ठरवलं.
पिशव्या शिवून घेण्यासाठी त्यांनी घरोघरच्या घरकाम मदतनीसांची मदत घेतली. या मदतनीस बायका त्यांना हव्या तशा पिशव्या शिवून देऊ लागल्या. त्या पिशव्या आसपासच्या फळं-भाजी विक्रेत्यांना द्यायला तिघींनी सुरुवात केली. प्रत्येक पिशवीमागे एक-दोन रुपये घेण्याचा त्यांचा विचार होता. मात्र त्यांना त्यात फारसा प्रतिसाद मिळेना. लोकांना या पिशव्याही मोफत हव्यात, हे लक्षात आल्यावर त्यांनी कापडी पिशव्या मोफत द्यायला सुरुवात केली. त्यांनी फळं-भाजी विक्रेत्यांना विनंती केली की, ‘‘ज्या ग्राहकाला तुम्ही कापडी पिशवी द्याल, त्यांना परत खरेदी करायला येताना हीच पिशवी आणायला सांगा. म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर टाळता येईल.’’

कापडी पिशव्यांना हळूहळू मागणी वाढायला लागली. त्या शिवून देण्यासाठी आणखी मनुष्यबळ हवं होतं. त्यासाठी या मुलींनी पालकांसह ‘नॅब’ (नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्स) संकुल गाठलं. येथील दिव्यांग व्यक्तींना पिशव्या शिवण्याचं काम दिलं तर त्यांना रोजगार मिळेल, ही भूमिका त्यामागे होती. एकीकडे रोजगार आणि दुसरीकडे कापडी पिशव्या असा दुहेरी फायदा.
आतापर्यंत या मुलींनी २५०० पिशव्या शिवून घेऊन त्यांचं वाटप फळं-भाजी विक्रेत्यांना केलं आहे. पहिल्याच प्रयत्नात ५००० प्लॅस्टिकच्या पिशव्यांचं उच्चाटन करण्याचं त्यांचं ध्येय आहे. ग्राहकांना लागतील त्या सर्व आकारांच्या पिशव्या शिवून घेण्यासाठी त्यांना ‘नॅब’मधील मदतनीसांना रोजगार द्यावा लागतो. त्यासाठी देणग्या देण्याचं आवाहनही त्या करतात. बघता बघता ‘खारीचा वाटा’शी पन्नासेक लोक जोडले गेले आहेत. काही जण कपडे गोळा करतात, काही पथनाट्यात सहभागी असतात, तर काही ‘नॅब’च्या संपर्कात राहून शिवलेल्या पिशव्या विक्रेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात.
ग्राहकांचे काही अनुभव चांगले असतात, तर काही कटू. काही ग्राहक विक्रेत्यांकडून मोफत कापडी पिशवी घेतातच; पण प्लॅस्टिकची कॅरीबॅगही मागतात; इतकं प्लॅस्टिक सवयीचं झालेलं आहे. पण काही लोक मात्र आवर्जून प्लॅस्टिक टाळतानाही दिसतात. काही भाजीविक्रेतेही ग्राहकांचं प्रबोधन करतात.

नाशिकमध्ये होणार्या विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी स्टॉल लावून या लहान मुली जागरूकता कार्यक्रम, पथनाट्य सादर करतात.
प्लॅस्टिक, सूक्ष्म प्लॅस्टिक हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तसंच पर्यावरणाच्याही दृष्टीने अत्यंत घातक आहे. भारत हा देश प्लॅस्टिक प्रदूषणात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात दररोज २६ हजार टन प्लॅस्टिक कचरा जमा होतो. त्यातला ८ टक्केच रिसायकल केला जातो. भारत दरवर्षी ९.३ दशलक्ष टन प्लास्टिक कचर्याची पर्यावरणात भर घालतो आहे. तसंच आपला देश आता कॅन्सर हब म्हणूनही ओळखला जातोय. कर्करूग्णांचं प्रमाण इतकं वाढण्यामागच्या काही कारणांमध्ये प्लॅस्टिकशी संपर्क हेही मोठं कारण आहे. पुढच्या पिढयांना जणू काही आरोग्यासाठी सुरक्षित अशा पृथ्वीचा वापर नकोच आहे असं समजून जमीन, मृदा, पाणी, वायू यांचं अतिरेकी प्रदूषण जगभरात सुरू आहे.
या मुली मोठ्यांना प्रश्न विचारतात, ‘‘तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढ्या निरोगी जगाव्यात, असं खरंच वाटतंय का? तसं वाटत असेल तर आम्हा मुलांचा विचार करून तुम्ही प्लॅस्टिकचा वापर टाळा.’’
या मुलींचा प्रश्न अंतर्मुख करणारा आहे, आपल्या सर्वांनाच. कोणीतरी मोठा माणूस या प्रश्नावर उत्तर शोधेल, असं म्हणून या मुली थांबल्या नाहीत. तर त्यांनीच त्यांच्या परीने उत्तर शोधलं.
या तीन मुली प्लॅस्टिकच्या इतर वापराबद्दलही तळमळीने बोलतात- हल्ली लग्न किंवा कोणत्याही समारंभात पाहुण्यांना द्यायला प्लॅस्टिकच्या छोट्या पाण्याच्या बाटल्या आणल्या जातात, त्याऐवजी पाणी देण्याची पर्यावरणपूरक दुसरी व्यवस्था करता येऊ शकते. पूर्वी कुठे प्लॅस्टिक होतं, तरीही मोठे समारंभही होत होते आणि पाणीही दिलं जात होतं. आताही ते करता येऊ शकतं, असं त्या म्हणतात. ‘‘प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आहे, मग या लोकांकडे कॅरीबॅग येतात कुठून? यावर कोणी काही करू शकत नाही का?,’’ असा प्लॅस्टिक समस्येच्या मुळाशी हात घालणारा प्रश्नही त्या विचारतात.
त्यांचे प्रश्न सामान्य माणसाला विचार करायला लावणारे आहेत. आता डोळ्यांवरची झापडं काढा आणि प्लॅस्टिकच्या अतिवापराने सजीवसृष्टीच कशी धोक्यात येतेय हे पाहा, हे सांगणारे आहेत.
‘वाणसामान, भाजीपाला मिळायचा पिशव्यांतून...
दूध, दही, ताक मिळायचं काचेच्या बाटल्यांतून’
पथनाट्यातील या ओळी ऐकल्या आणि मीही ठरवलं, आता काहीही झालं तरी घरातली कापडी पिशवी घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. या मुलींना भेटले आणि मीही त्यांच्या ‘खारीचा वाटा’मध्ये सहभागी व्हायचं ठरवलं.
‘खारीचा वाटा’ संपर्क:
स्वाती चौगुले ९९२३८३०९२० / रुपाली कुलकर्णी ९०११८९६६८१
शिल्पा दातार | 7020659314 | mrs.shilpapankaj@gmail.com
शिल्पा दातार या नाशिकस्थित मुक्त पत्रकार आहेत.