आखातातल्या युद्धामुळे सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. युद्ध असंच चालू राहिलं तर आणीबाणीची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका तरुणाने शोधलेल्या पर्यायाला नव्याने महत्त्व आलंय. घरगुती ओल्या कचर्यातून गॅसनिर्मितीचा एक मार्ग त्याने शोधलाय- ‘वायू’ बायोगॅस. याद्वारे एलपीजीवरील अवलंबित्व दूर होऊ शकतं असं तो सांगतो. त्याच्याशी यासंदर्भात साधलेला संवाद.
‘वायू’ प्रकल्प नेमका काय आहे?
‘वायू’ हा एक छोटा बायोगॅस प्लांट आहे. आपण आपल्या घरात तो बसवू शकतो. शहरी भागात, लहान घरांमध्येही तो वापरता यावा यासाठी आम्ही तो छोट्या आकाराचा बनवला आहे. घरात तयार होणारा ओला कचरा यात जिरवला जातो. त्यातील सूक्ष्म जीव कचर्यापासून गॅस तयार करतात. हा गॅस आपण स्वयंपाकघरात वापरू शकतो. बाहेरच्या देशांमधून येणार्या इंधनावर आपण खूप अवलंबून असतो. अलीकडल्या युद्धकाळात तर ते अधिक तीव्रतेने जाणवलं आहे. आपल्या घरात रोजच कचरा तयार होतो. आपण तो बाहेर टाकतो. सार्वजनिक पातळीवर यावर काही चांगला उपाय केला जात नाही. त्यामुळे कचराव्यवस्थापन हाही आजघडीला एक भीषण प्रश्न होऊन बसला आहे. 'वायू' स्वतःचा कचरा स्वतः जिरवण्याची एक पद्धत आहे आणि त्यातून ऊर्जास्वावलंबनाकडे टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे.
'वायू'ची संकल्पना कशी आकाराला आली?
कॉलेज पूर्ण झाल्यानंतर पर्यावरणासंदर्भातच काम करायचं हे नक्की होतं. पण नेमकं काय, हे कळत नव्हतं. आपण वापरतो ती इंधनं कधीतरी संपणार आहेत, मग पुढे काय, हा प्रश्न मला सतत सतावत होता. वातावरणातील बदल हेही आणखी एक कारण होतं. या सगळ्या परिस्थितीला सामोरं जायचं असेल तर काहीतरी पर्याय शोधायला हवा असं सतत वाटत होतं.
पुण्यात आल्यावर एका मित्रामुळे आनंद कर्वेंशी भेट झाली. आनंद कर्वेंनी बायोगॅससंदर्भात मूलभूत संशोधनात्मक काम केलं आहे. त्यांच्याशी मी संवाद साधला आणि मला माझ्या कामाचा विषय मिळाला! त्यांच्याकडून शिकूनच मी माझ्या वडिलांच्या कंपनीमधील कचरा जिरवण्यासाठी पहिला बायोगॅस प्लांट बनवला. तोच हा 'वायू' बायोगॅस. २०१६ साली 'वायू' प्रायोगिक पातळीवर बसवायला सुरुवात झाली. २०१९ साली आम्ही कंपनी स्थापन केली. आतापर्यंत आम्ही 'वायू'चे साधारण साडेचारशे युनिट बसवले आहेत.
हे तंत्रज्ञान कसं विकसित होत गेलं? तुझे सुरुवातीचे काही अनुभव सांगशील का?
सुरुवातीला तर हे मी स्वतःपुरतं बनवलं होतं. आनंद कर्वेंकडून मला बायोगॅस संदर्भातली एक सीडी मिळाली होती. त्यात बायोगॅस निर्मितीचं सर्व तंत्र समजावून सांगितलं होतं. आई-वडिलांच्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याला मी या सीडीच्या मदतीने बायोगॅस तयार करायला सांगितला. माझ्या आई-वडिलांच्या कंपनीत साधारण शंभर माणसं काम करतात. तिथे तयार होणारा ओला कचरा तिथेच जिरवला जावा ही त्यामागची कल्पना होती. परंतु तो माणूस कंपनी सोडून गेल्यानंतर ती जबाबदारी पूर्णपणे माझ्याकडे आली. एका अर्थाने ते माझ्यासाठी चांगलंच झालं. कारण त्यामुळे मला ते सर्व तंत्र शिकता आलं. सुरुवातीला त्यात अनेक त्रुटी होत्या. हळूहळू मी त्या कमी करत गेलो. ते वापरासाठी उत्तम आहे असं वाटल्यानंतर मी मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना ते वापरून बघाल का, असं विचारायला सुरुवात केली. पुढे याचा व्यवसाय करणं शक्य आहे असं समजल्यावर त्याला व्यावसायिक रूप दिलं.
हे तंत्रज्ञान नियमित वापरण्यासाठी वापरकर्त्यांच्या बाजूने कोणती पूर्वतयारी आवश्यक आहे?
अलीकडे आम्ही याचं काम अगदीच सोपं केलं आहे. आम्ही हे इन्स्टॉल करून देतो. वापरकर्त्यांनी त्यात कचरा घालून थेट वापरायला सुरुवात करायची एवढं सोपं आहे. ‘वायू’च्या जिवंत प्राण्यांसारख्याच काही गरजा आहेत. त्याला आपण कचरा देतो. तो कचरा जिरवून त्यातून तो ऊर्जानिर्मिती करतो. त्यामुळे त्याला जिवंत प्राण्याप्रमाणेच सांभाळायला हवं. उन्हाळ्यात त्याच्या क्षमता जास्त असतात. हिवाळ्यात कमी होतात. जसं उन्हाळ्यात दही लवकर लागतं, तर हिवाळ्यात त्याला जास्त वेळ लागतो. तसंच ‘वायू’चं आहे.
त्यात कुठल्या प्रकारचा कचरा टाकू शकतो?
किचनमध्ये तयार होणारा अन्न कचरा. स्वयंपाकाची तयारी करत असताना वाया जाणाऱ्या फळांच्या साली, टरफलं आणि जेवणानंतर उरलेलं अन्न, शिळे अन्नपदार्थ यात टाकू शकतो. फक्त नारळाची करवंटी आणि शेंड्या यात टाकून चालत नाहीत.
हेही वाचा - खेड्यापाड्यांत सोईसुविधा आणि रोजगार उभारणारा तन्वीर इनामदार
दिवसभरात किती कचरा त्यात टाकू शकतो?
'वायू'चा मूळ उद्देश घरगुती पातळीवरचा कचरा जिरवणं हा आहे. त्याचे दोन मॉड्यूल्स आहेत. एक छोटं आणि एक मोठं. छोट्या मॉड्यूलमध्ये घरगुती कचरा जिरवू शकतो. छोटं मॉड्यूल दिवसाला दोन किलो कचरा जिरवतं. याचं एक युनिट बसवायला साधारण ६ बाय ४ फुट जागा लागते. यासाठी ४५ हजार रुपये खर्च येतो. याची वाहतूक आणि इन्स्टॉलेशनसाठी वेगळा खर्च येतो. आपल्या घरात साधारण अर्धा ते पाऊण किलो कचरा तयार होतो. मात्र त्याची क्षमता जास्त असते. ती कमतरता आपण इनोव्हेटिवली भरून काढू शकतो. आपण शेजाऱ्यांना किंवा आपल्याकडे कामाला येणाऱ्या माणसांना सांगून त्यांचाही कचरा यात जिरवू शकतो. अशा लोकल कोलॅबरेशनमधून ‘वायू’ला पुरेसं खाद्य आणि आपल्याला पुरेसा गॅस मिळेल. आपल्या एकूण वापरापैकी साधारण १० ते १५ टक्के गॅसची गरज यातून भागते. म्हणजे दिवसाला साधारण चाळीस मिनिट चालेल एवढा गॅस एका युनिटमधून मिळतो. एकदा हे पहिलं पाऊल टाकलं की मग पुढच्या टप्प्यात मोठं मॉड्यूल बसवून पूर्ण स्वावलंबनाचा विचार करू शकतो.
मोठ्या क्षमतेच्या ‘वायू’ प्लांटचं एक युनिट बसवायला साधारण १२ बाय ८ फुट जागा लागते. यासाठी एक लाख साठ हजार रुपये खर्च येतो. या मॉड्यूलमध्ये दहा किलो कचरा जिरू शकतो. यातून दिवसाला साधारण तीन तास चालेल एवढा गॅस मिळतो. आता यासाठी जास्त कचरा कसा मिळवायचा, हे मात्र आपलं सोशल इनोव्हेशन. इमारतीतले लोक, आसपासची छोटीमोठी हॉटेल्स यांना कचरा देण्यासाठी आपण तयार करू शकतो का, हा आपल्या कौशल्याचा भाग. स्थानिक पातळीवरचे असे कोलॅबरेटीव उपाय आता आपल्याला शोधावे लागणार आहेत. अशा पद्धतीने आपल्या इमारतीतला, शेजारच्यांचा कचरा जिरवून आपण एलपीजीमुक्त होऊ शकतो. सध्या मी अशा प्रकारे एलपीजीमुक्त झालो आहे.
या सेट-अपचा मेन्टेनन्स कसा करावा लागतो?
साधारण चार ते सहा महिन्यांनी मेन्टेनन्स करावा लागतो. त्यातील न पचलेला भाग काढून टाकावा लागतो. आमची टीम येऊन ते काम करते. त्याव्यतिरिक्त आपण रोज त्याला कचरा खाऊ घालायचा, त्यातून तयार होणारा गॅस वापरायचा, मागे उरणारं खत बागेसाठी वापरायचं आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायचा एवढंच नियमित काम. एकच लक्षात ठेवावं लागतं. 'वायू'ला क्षमतेपेक्षा जास्त खाऊ घातल्यास तो आजारी पडतो. त्यामुळे आपल्याकडे जेवढा कचरा असेल तेवढ्या क्षमतेचा ‘वायू’ बसवायचा.
'वायू'बद्दल त्याचा वापर करणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया काय? दीर्घकालीन वापरात कुणाला काही अडचणी आल्या का? त्या तू कशा सोडवल्यास?
एकतर ही जैविक प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याच्याकडे मशीनसारखं बघता येत नाही. बऱ्याचदा 'वायू' एकजण घेतो आणि वापरतं मात्र दुसरंच कुणीतरी. एखाद्या संस्थेमध्ये ‘वायू’ बसवला की त्याच्या ऑपरेशनची जबाबदारी कँटिनच्या काँट्रॅक्टरकडे दिली जाते. पण त्याला यात काही इंटरेस्ट नसतो. यात गॅसची बचत होत असली तरी गॅस अन्यत्र सहज उपलब्ध असल्यामुळे तो वाचवावासा वाटत नाही. कचरा जिरवण्याचीही गरज वाटत नाही, कारण पालिकेचे लोक घेऊन जातात. पण ‘वायू’ प्लांटचा व्यवस्थित वापर केला जात नसेल तर त्यात बिघाड होतो. जेवढा जास्त कचरा तेवढे मॉड्यूल वाढवायचे. अलीकडे लोकांची गरज बघून आम्ही मोठं मॉड्यूलही तयार करत आहोत. लवकरच तेही वापरात येईल.
’वायू’चा घरगुती वापर आणि व्यावसायिक वापर याच्या अंमलबजावणीत काही फरक करावे लागतात का?
घरगुती वापरात काही समस्या येत नाहीत. मात्र व्यावसायिक वापर करताना काही समस्या जाणवतात. तिथे मोठ्या क्षमतेच्या शेगड्या असतात. 'वायू' तिथे पुरेसा नसतो. सगळेच पदार्थ 'वायू'वर होत नाहीत. काही निवडक पदार्थ मात्र उत्तम होतात. त्यामुळे 'वायू'वर काय करू शकतो आणि काय नाही हे तिथे सांगावं लागतं. व्यावसायिक वापर करताना शिस्त गरजेची आहे. तसंच वापरकर्त्या माणसांना योग्य ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. व्यावसायिक क्षेत्रात माणसं सतत बदलत असतात. नवीन माणसाला सगळ्या गोष्टी नव्याने सांगाव्या लागतात. अलीकडे आम्ही ट्रेनिंगसंदर्भात काही व्हिडिओ तयार करत आहोत. त्यातून हे काम सोपं होईल.
गेली काही दशकं ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये बायोगॅसचा वापर होतो आहे. तो सेट-अप आणि 'वायू'च्या सेट-अपमध्ये काय फरक आहे?
गोबरगॅसचे प्लांट हे गोबर म्हणजेच शेणासाठी होते. शेण आणि कचरा हे दोन वेगवेगळे इनपुट आहेत. कचऱ्यामध्ये अन्न असल्यामुळे ऊर्जाक्षमता जास्त आहे. तर शेण हे पचलेलं अन्न असल्यामुळे त्यात ऊर्जाक्षमता कमी आहे. त्यामुळे कचऱ्यावरच्या सिस्टिम थोड्या छोट्या होतात. एवढाच काय तो फरक आहे. बाकी त्यामागील विज्ञान सारखंच आहे.
हेही वाचा - व्यवस्थेला आव्हान देणारी शेतकरी महिला
सध्या इराण युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. असे मोठे प्रश्न निर्माण झाले तरच माणसं शाश्वत ऊर्जेच्या पर्यायाकडे वळतात, तात्पुरता मार्ग म्हणूनच त्याकडे पाहिलं जातं, असं तुला वाटतं का? सवयीच्या, जाणीवेच्या पातळीवर यात बदल करण्यासाठी तुझ्या मते काय करायला हवं?
कुठल्याही सामान्य माणसाला हे समजतं की इंधनं मर्यादित आहेत. तरीही आपण ती अमर्याद असल्यासारखी वापरतो. पण आता पुन:निर्मिती करता येणाऱ्या अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर वाढवायला हवा. परंतु व्यवस्था या सगळ्याला पूरक नाहीये. त्यामुळे वेगळी वाट निवडून असे काही प्रयत्न करणारे लोक फारच कमी आहेत. ते आम्हाला भेटत गेले. त्यांनी भविष्यातील समस्या हेरल्या होत्या. त्यामुळे ते आमच्यासोबत कृती करायला तयार होते. आता युद्धामुळे आपल्याकडे एलपीजी संकट आलं. तसंच पेट्रोल संकटही येऊ शकतं. शेवटी दोन्हीही जमिनीतून काढलेली इंधनं आहेत. आणि ती इंधनं कधी ना कधी संपणार आहेत. आपल्याकडे वर्षाचे आठ महिने सूर्य इतका तेजस्वी असतो. त्यामुळे आपल्याला सूर्य, बायोमास, कचरा अशा अनेक पर्यायी ऊर्जास्त्रोतांकडेच पाहावं लागणार आहे. ज्यासाठी जमीन खणावी लागणार नाही, बाहेरील देशांवर किंवा कुणावरच अवलंबून राहावं लागणार नाही असे पर्याय उभे करणं गरजेचं आहे. या दिशेने जितके अधिक लोक विचार करू लागतील तितक्या अधिक शक्यता तयार होतील असं मला वाटतं.
सध्या 'वायू' यंत्रासाठी आम्हाला बरेच जण संपर्क करत आहेत. लोकांचा हा प्रतिसाद आमच्यासाठी सुखद आहे. मात्र ही यंत्रं मोठ्या संख्येने तयार करण्यासाठी आमच्या टीमला काही दिवसांचा अवधी लागेल. ते १-२ दिवसांत होणारं काम नाही. आम्ही अधिकाधिक ग्राहकांना हे यंत्र लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहोत. हा शाश्वत पर्याय असल्याने एलपीजी पुरवठा सुरळीत झाला तरी या पर्यायाचा विचार नक्कीच होऊ शकतो. आमच्याशी संपर्क करण्यासाठी www.vaayubiogas.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.
मयूर पटारे | 9970355105 | mayur355105@gmail.com
युनिक फीचर्स मध्ये पत्रकार. कष्टकरी समूहात फिरून त्यातील माणसांचं जगणं समजून घ्यायला आवडतं.
