आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

बुद्ध समजून घेताना

  • अनिल अवचट
  • 03.05.26
  • वाचनवेळ 17 मि.
anil awachat and buddha

मला बुद्ध कधी भेटला?

तरुणपणी बुद्धाविषयी काही काही कानावर पडायचं. तो पुनर्जन्म मानत नाही, तो जाती-वर्णभेदाच्या विरुद्ध आहे... असं काही. त्यामुळे आम्हा चळवळीतल्या मुलांना तो जवळचा वाटायचा. शिवाय डॉ. बाबासाहेबांनी तो धर्म स्वीकारला होता. बाबासाहेब म्हणजे आमचे हीरो. त्यामुळे बुद्ध आपल्या बाजूचा असं वाटायचं. पण म्हणजे तो कोण, तो नक्की काय म्हणत होता हे फारसं माहीत नव्हतं.

पण अलीकडे त्याचं एक वाक्य वाचनात आलं. तीन शब्दांचं वाक्य. एकदम चमकलोच जसा. ते वाक्य म्हणजे, ‘अत्त दीप भव.' म्हणजे, तुझा तूच प्रकाश हो.

कसं व्हायचं असतं आपला प्रकाश आपणच? त्या प्रकाशात काही पाहायचं, की त्यापेक्षा आपणच प्रकाश व्हायचं? स्वतः उजळून निघायचं?

पुढे बुद्धावरचं पुस्तक मिळालं की वाचायचा सपाटा लावला. त्यानंतर मग ‌‘अत्त दीप भव'चं विस्तृत रूप सापडत गेलं.

‘तुम्हीच तुमचा दिवा व्हा. तुम्हीच स्वत:चा आधार व्हा. आत्मनिर्भर व्हा. दुसऱ्या कुणाचा आधार घेऊ नका. दुसऱ्या कुणाचे आश्रित होऊ नका. फक्त सत्याचा आश्रय घ्या,' हे बुद्धाचं म्हणणं समजत गेलं.

मी खूष झालो. कारण हा माणूस माझ्या धर्माला किंवा मला माना, माझ्या धर्माचं आचरण करा, असं म्हणतच नाही. उलट, ‘तुम्हीच तुमचा आधार व्हा' म्हणतोय. आधार इतर कुणाचा नाही, फक्त सत्याचा घ्या, म्हणतोय. हे अजब आहे.

मी पूर्वी बुद्धाचं चरित्र वाचलेलं होतं. घरातून कसा बाहेर पडला; सर्व प्रकारचे संन्यास, योग मार्ग, हठयोग वगैरे करून पाहिलं पण त्याला शांती मिळाली नाही; मग त्याला बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं, वगैरे. पण ते ज्ञान काय हे कुठे माहीत होतं? आता वाचत होतो आणि चकित होत होतो.

वाचता वाचता बुद्धाने त्याच्या शिष्यांशी साधलेला संवाद वाचायला मिळाला आणि झटक्यात बुद्ध काय सांगू पाहतो आहे याचा अंदाज आला. बुद्ध शिष्यांना सांगतोय,‘तुम्ही जे काही ऐकलं आहे त्यावर विश्वास ठेवू नका. कित्येक पिढ्या, परंपरा तुमच्यापर्यंत चालत आलेल्या आहेत म्हणून त्यांच्यावरही विश्वास ठेवू नका. अनेक लोकांनी सांगितलं आहे, म्हटलं आहे किंवा त्यांच्या ऐकिवात आहे म्हणून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. एखाद्या वृद्ध ऋषीचं लिखित वचन तुमच्यासमोर ठेवलं आहे म्हणून ते मान्य करू नका. केवळ अंदाजावर विश्वास ठेवू नका. तुमचे गुरू आणि वडीलमाणसं यांनी काही सांगितलं आहे ते खरं समजून स्वीकारू नका. स्वतः निरीक्षण व विलेषण केल्यावर जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल आणि सर्वांच्या हिताला पोषक व संवर्धक ठरेल तेव्हाच त्याचा स्वीकार करा आणि तंतोतंत त्याप्रमाणे जगा. ते आचरणात आणा'

‘स्वतः निरीक्षण आणि विलेषण' करायचं म्हणजे हा बुद्धिप्रामाण्यवादाचा पायाच की. बुद्ध हे कधी म्हणालाय? तर अडीच हजार वर्षांपूर्वी! जेव्हा ख्रिस्त नव्हता, महंमद नव्हता, कुठलेही वैज्ञानिक नव्हते. यज्ञयाग संस्कृती जोरात होती. यज्ञात बैल वगैरे पशू बळी दिले जात होते. जेव्हा जाती-वर्णव्यवस्थेची समाजावर घट्ट पकड होती तो हा काळ. पुढे हजार वर्षांनी आधुनिक विज्ञान आलं. संशोधकांनी निर्भीडपणे, चर्चला न जुमानता शोध, सिद्धांत मांडले; त्यासाठी शिक्षा भोगल्या, मृत्यू पत्करले त्याला वैचारिक आधार दिलाय बुद्धाने, अडीच हजार वर्षांपूर्वी. आहात कुठे!

हेही वाचा - ‘मी’ मम सरणं गच्छामि

त्या काळात ‌‘बाबा वाक्यम्‌‍ प्रमाणम्‌‍' या सूत्राची सद्दी होती. गुरूचं ऐकायचं. ‌‘गुरुबिन कछु नाही' हे प्रचलित वेदांचं, धर्मग्रंथांचं प्रामाण्य. त्यात असेल ते आणि तेच खरं. त्या काळात बुद्ध निर्भीडपणे सांगतोय, ते प्रमाण मानू नका, स्वतःचं डोकं चालवा. मी स्वतः म्हणतोय म्हणूनही मान्य करू नका, असंही सांगतोय तो. पुढे वाचनात आलं, बुद्धाने शिष्यांना त्याची तपासणी करण्याचं सुचवलं. कोणते प्रश्न विचारायचे त्याची यादीही सुचवली. इतकं निर्भिड, पारदर्शी व्यक्तिमत्त्व.

आणि नुसते निष्कर्ष काढून बौद्धिक आनंद घेणं त्याला मान्य नाही. त्या निष्कर्षांप्रमाणे तंतोतंत वागा, असं तो म्हणतोय. इथे शिष्यांची खरी परीक्षा होती. एकवेळ भोवतीचे, परंपरेचे प्रभाव नाकारणं, विलेषण करून निष्कर्ष काढणं सोपं, पण त्याप्रमाणे वागणं? अवघडच!

आपल्याकडे भ्रष्टाचारी माणसं पुण्य कमावण्यासाठी काय काय करतात! यज्ञ करतात, पूजाअर्चा करतात, थाटामाटाने भोजनावळी घालतात, भजन-कीर्तन करतात; पण भ्रष्टाचार चुकीचा आहे, ते पाप आहे, आपण तसं वागता कामा नये असं चुकूनही त्यांच्या मनात येत नाही. बुद्ध म्हणतो, ‘निष्कर्षावर थांबू नका. त्याप्रमाणे वागा.'

ईश्वरप्राप्तीसाठी धर्मपालन, असं सर्वसाधारण समीकरण मानलं जातं; पण बुद्धाच्या तत्त्वज्ञानात हे बसत नाही. एकदा बुद्धाला त्याच्या शिष्याने विचारलं, “ईश्वर आहे काय?”

बुद्धाने उत्तर दिलं, “नाही”.

परत शिष्याने विचारलं, “आत्मा आहे काय ? आणि तो अविनाशी असतो काय?”

तरी बुद्ध गप्प.

शिष्य म्हणाला, “तुम्ही उत्तर का देत नाही?”

यावर बुद्ध म्हणाला, “ईश्वर आहे की नाही, आत्मा असतो की नाही याविषयी विचार करायला माझ्यापाशी वेळ नाही. मला मानवी दुःखाचं मूळ शोधायचं आहे, त्यावर उपाय शोधायचा आहे.”

याबाबत त्याचे विचार किती स्वच्छ आणि स्पष्ट आहेत! ईश्वर एक की अनेक, तो अवतार कधी घेतो, त्याचं स्वरूप कसं आहे, तो मनुष्यदेहधारी आहे की अमूर्त आहे, तो स्वर्गात राहतो की पृथ्वीवर... या चर्चेत बुद्धाला रस नाही. मेल्यानंतर काय होतं, पुनर्जन्म असतो का, काय केलं असता स्वर्गात प्रवेश मिळेल, तुमचा मृतदेह जाळावा की पुरावा, किती काळाने थडग्यातून देव तुम्हाला उठवणार आहे... कशाचीही चिंता तो करत नाही. मिळेल तो दिवस आपला, इतकंच तो जाणतो.

मी कॉलेजात असताना एका स्वामीजींचा अनुग्रह घेतला. रोज रात्री ध्यान करायचो. आमच्या बरोबरचे काही शिष्य स्वामींजींचे लाडके होते; पण स्वामीजींचं शिष्यत्व पत्करूनही माणूस म्हणून त्यांच्यात काही फरक पडला नव्हता. व्यापारी होते, ते भेसळ करायचे. कंपनी अधिकारी नकोशा कामगाराविरुद्ध केस उभी करून त्याला काढून टाकायचे. मग मला प्रश्न पडायचा, या आध्यात्मिक प्रगतीचा काय उपयोग? मला चांगला माणूस व्हायचं होतं. मी रात्री बसून दिवसभरातले दोष हुडकायचो. दुसऱ्या दिवशी ते सुधारण्याचा प्रयत्न करायचो. त्या त्या माणसांची क्षमाही मागायचो. कुणी विचारायचं, “आस्तिक की नास्तिक?” मी म्हणायचो, “मला त्यातलं कळत नाही; पण एवढं कळतं, की माझ्यात अजून भरपूर दोष आहेत,ते मला दूर करायचे आहेत.”

ही भूमिका माझ्या नकळत बुद्धाच्या जवळ जाणारी होती. जे करायचं (सुधारणा वगैरे) ते करण्याची मला ओढ वाटू लागली. वेळेच्या बाबतीत परत बुद्ध मदतीला आला. त्याचं एक वाक्य पाहा : ‌‘ज्योत जळते तेव्हा ती प्रत्येक क्षणी नवीच असते.' किती अप्रतिम उपमा आहे ही! आधीचा कण जळून गेलेला, नंतरचा कण यायचाय, अशा अवस्थेत जगायचं. सुनंदाला कॅन्सर झाला तेव्हा ती तर म्हणायची, हा क्षण माझा आहे, तो मी छान जगणार आहे. ‌‘मुक्तांगण'मध्येही व्यसनी मित्रांना हेच सांगितलं जातं, आजवर झालं ते होऊन गेलं. भूतकाळाचं ओझं बाळगू नका. भविष्यकाळ अजून यायचाय. त्याची चिंता करू नका. आजचा दिवस आपला माना.

बुद्धाचं एक वाक्य आहे,‘जो ईश्वर आहे का असं विचारतो तो चूक करतो आणि त्याला उत्तर देतो, तोही चूकच करत असतो.' आपले तुकोबा म्हणतात, ‘तो लटिक्यामाजी भला। म्हणे देव म्यां पाहिला' (मी देव पाहिला असं म्हणतो तो खोट्यातला खोटा). बुद्धाची भूमिका याबाबत अगदी कुठलाही आडपडदा नसलेली, स्वच्छ आहे.

हेही वाचा - बिहार : पुरातन बौद्ध संस्कृतीचा चालता-बोलता इतिहास

बोधीवृक्षाखाली बुद्धाला काय ज्ञान झालं?

‘जग हे दुःखाने भरलेलं आहे' हे एक विधान. ‌‘दुःख' याचा अर्थ ‌‘समस्या' असा मी घेतो. माणसाला आयुष्यभर नाना तऱ्हेच्या समस्या असतात. चिंता, काळजीने त्याचं मन व्यापलेलं असतं. आणि त्या दुःखाचं मूळ तृष्णा आहे. इथे ‌‘तृष्णा' याचा अर्थ मी नुसता ‌‘तहान' असा घेत नाही, तर ‌‘वखवख' असा घेतो. सतत असंतुष्ट अवस्था म्हणजे तृष्णा. तृष्णेमागोमाग क्रोध, लोभ, हेवा, मत्सर अशी अवगुणांची रांगच येते. बुद्धाने म्हटलं आहे,‘क्षमेने क्रोधाला जिंकावं. असाधूला साधुत्वाने जिंकावं आणि लबाडाला सत्याने जिंकावं. ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही विशेष आहे, त्यांचा हेवा न करता, ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही कमी आहे, त्यांचा अवमान न करता आणि जे आपल्या समान आहेत त्यांच्याशी स्पर्धा न करता जगलास तर तू जगामध्ये श्रेष्ठत्वाकडे गेलास.'

तर स्वभावदोषांविषयी सांगत होतो... यावर बुद्धाची काही वाक्यं माझी खास आवडती, ‘युद्धात हजारो माणसांना जिंकणाऱ्या योद्ध्यापेक्षा स्वतःला जिंकणाऱ्यास मी खरा योद्धा समजतो.' स्वतःला जिंकणं म्हणजे काय? स्वतःच्या मनातल्या अनाठायी मोहावर विजय मिळवणं. ‌‘मुक्तांगण'मधल्या आमच्या पेशंट मित्राला दारूची आलेली तलफ आवरणं कसं अवघड असतं हे मी अनेकदा पाहिलेलं आहे.

बुद्धाने आणखी एक अशीच छान उपमा दिलीय- ‌‘लोखंडापासून जन्मलेला गंज ज्याप्रमाणे लोखंडालाच खातो, त्याप्रमाणे असत्यमार्गाला लागलेलं चित्त आपलंच नुकसान करतं,' म्हणजे शत्रू बाहेर नाही; आपल्यातच आहे आणि आपल्यालाच खातोय. बाहेरच्या शत्रूशी लढणं सोपं; पण माणसाच्या मनातले जातिभेद, धर्मद्वेष, अंधश्रद्धा... या दोषांना काढणं किती अवघड!

बुद्धाचं एक असंही वाक्य आहे- ‌‘युद्धात शत्रू शत्रूचं किंवा वैरी वैऱ्याचं जेवढं अकल्याण (नुकसान) करतो, त्याहून अकल्याण असत्यमार्गाला लागलेलं आपलं चित्त करतं.' विनोबांचं एक वाक्य यासारखंच आहे- ‌‘तलवारीचा जबाब तलवारीने द्या, असं म्हणणं योग्य नाही. तलवारीला जबाब ढालीने द्यायचा. तलवार जेवढी ताकदवान तेवढी ढाल भक्कम.' कबीरही असंच म्हणतो, ‘शिवीला उत्तर शिवीने दिलं तर तिथे शिवीगाळ होईल. शिवीला उत्तरच देऊ नका. ती एकटीच राहील.' बुद्ध. तुकोबा, विनोबा, कबीर एकच सत्य कसे निरनिराळ्या प्रकारे सांगतात. मध्ये हजार-दोन हजार वर्षांचं अंतर असलं तरी शहाणपणाचा धागा किती भक्कम आणि सुंदरही. ‌‘उसळलेल्या क्रोधाला (रथाप्रमाणे) जो आवरू शकतो तो खरा सारथी. बाकी नुसते हाती दोऱ्या धरणारे' हेसुद्धा स्वतःच्या मनाशी लढणंच.

बुद्धाला चांगली विनोदबुद्धी होती. तो संवादरूपाने बोलायचा. एकदा कुणी तरी त्याला विचारलं, “ज्याला सर्वज्ञान झालं आहे तो स्वर्गात जातो का?” बुद्ध म्हणाला, “मला माहीत नाही.” तो माणूस आश्चर्याने म्हणाला, “तुम्ही एवढे ज्ञानी. तुम्हाला कसं माहीत नाही?” बुद्ध म्हणाला, “कारण मी अजून मेलेलो नाही.” असाच आणखी एक मजेदार संवाद बघा : बुद्धाला कुणी विचारलं, “ध्यान करून काय फायदा झाला?” बुद्ध म्हणाला, “फायदा? छे, छे, उलट माझा राग, माझी निराशा, माझी असुरक्षितता, माझी वार्धक्याची भीती, हे सगळे मला सोडून गेले.” बुद्ध कुणी गंभीर तत्त्वज्ञ नव्हता. त्याच्या अशा विनोदबुद्धीमुळे त्याचा सहवास आसपासच्या लोकांना हवाहवासा वाटणारच.

आपल्या समाजात ज्येष्ठांचा आदर ठेवा, त्यांचं म्हणणं ऐका, त्यांचा सल्ला घ्या, असं सांगितलं जातं. आपण ते मानतोही. पण बुद्धाची टिप्पणी वेगळीच आहे. तो म्हणतो, ‘ज्येष्ठ लोकांचा सल्ला घ्या. त्यांचं नेहमी बरोबर असतं म्हणून नव्हे, तर त्यांच्याकडे चुका करण्याचा जास्त अनुभव असतो म्हणून.' आणि खरोखरच, ज्येष्ठ मंडळींनी श्रेष्ठत्वाचा तोरा सोडून लहानांना आपल्या चुका सांगितल्या तर? किती छान नातं जुळून येईल. माझे वडील मी लहान असताना त्यांच्या अभ्यासाबद्दल वगैरे सांगायचे. ते वर्गात खूप हुशार असणार. एकदा त्यांचे वर्गमित्र भेटले. त्यांना विचारलं, “माझे वडील अभ्यासात कसे होते?” ते हसून म्हणाले, “त्र्यंब्या? तो तर अगदी उडाणटप्पू होता.” त्या दिवसापासून वडिलांविषयीचा माझा आदर दुणावलाच.

बुद्धाचे विचार म्हणजे आजच्या भाषेत ‌‘लॅटरल थिंकिंग' होते. तो म्हणतो, ‘सर्व पृथ्वीला चामड्याचं आच्छादन घालायचा प्रयत्न कशाला करता? त्यापेक्षा आपल्या पायांत चामड्याचे जोडे करून घाला.'

अरेच्च्या! उत्तर तर डोळ्यांसमोर होतं, मग ते आपल्याला का नाही सापडलं?

baba adhav

बुद्ध कसा होता? त्याच्या समकालीन शिष्यांनी लिहिलेलं मधूनच वाचायला मिळालं. मातृचेट लिहितो, ‘तू अपकार करणाऱ्यांवरही उपकार करण्यासाठी जसा तयार असतोस, तसं लोक उपकार करणाऱ्यावरही उपकार करायला तयार नसतात.' ज्याने आपल्यावर उपकार केले, त्याची परतफेड म्हणून आपण त्याला मदत करायला जाऊ एकवेळ. पण बुद्धाचा उत्साह त्याहून वेगळा. अपकार करणाऱ्यालाही मदत करण्याचा त्याला केवढा उत्साह! त्यातही तो कोणाच्या मदतीसाठी जास्त अग्रक्रमाने धावत जायचा? त्याचा एक शिष्य लिहितो, ‘या जगात जे गरीब, असहाय आणि अनाथ आहेत, त्यांचा तथागत मित्र आहे. (तथागत : बुद्धाचं एक नाव) जे शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत की इतर कोणी असोत, त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांना साहाय्य करण्यासाठी तथागताचा जन्म आहे.'

किती छान! या परिच्छेदाने बुद्धाचं आपलं नातं जमलं. आधी होतं ते घट्ट झालं. फार पूर्वी बिहारच्या दुष्काळात काम करायला गेलो होतो. तिथली कृश मुलं पाहिली. चालणारे सांगाडेच जसे. रात्री-अपरात्री आमच्या अन्नछत्राबाहेर येऊन पडलेली आणि अन्नावाचून मेलेली महिला पाहिली. तो माझ्या आयुष्यातला बदलाचा क्षण. तेव्हापासून ठरलं- आपण कुणाचे? तर गरिबांचे. नंतर गरिबांच्या प्रश्नांवर मी खूप लिहिलं. त्यांच्याविषयी नुसता कळवळा म्हणून नव्हे, त्यांच्याशी मैत्रही जुळलं. म्हणून आजही खालच्या कष्टकरी थरात वावरणं मला अधिक आवडतं. माझ्या या निवडीला बुद्धाने मान्यता दिली आणि धन्य झालो.

बुद्धाचा हा उपदेश ऐकून सगळे असेच झाले आणि गरिबांची, रुग्णांची सेवा करू लागले तर? तुकाराम म्हणतातच ना, ‘जे का रंजले गांजले...'

जातिभेदावर बुद्ध नुसतं बोलला असता तरी ते त्या काळात मोठं धाडस झालं असतं. पण त्याने तर त्यापुढे जाऊन त्याचं म्हणणं आचरणात आणलं. त्याच्या विहारात, शिष्यवर्गात कोण कोण होतं? अंगुलीमाल हा दरोडेखोर होता. सुनीत हा मेहतर होता. श्वापक हा कुत्रं खाणाऱ्यांच्या जातीतला होता. स्वाती हा कोळी होता. नंद हा गुराखी होता आणि उप्पली हा न्हावी होता. तसंच भिक्षुणींमध्ये आम्रपाली ही कलावंतीण होती. विमला ही वेश्येची मुलगी होती, तर चंपा ही पारध्याची मुलगी होती. त्या काळी असं काही करणं म्हणजे केवढं मोठं पातक होतं!

पण आपला बुद्ध म्हणजे अगदी ‌‘बोले तैसा चाले..' या पंथाचाच. या सगळ्यांबरोबर तो राहत होता. तत्त्व आणि वागणं यांत थोडी जरी फारकत असती तर असं झालं असतं? जसा कळवळा माणसांचा तसाच प्राण्यांबद्दलही. यज्ञात दिले जाणारे जनावरांचे बळी... या प्रथेवर त्याने असाच हल्ला केला आहे. तो म्हणतो, ‘यज्ञात जनावरांचे बळी देण्याऐवजी स्वत:च्या अहंकाराचा बळी द्यावा.'

बुद्धाने पुनर्जन्म या कल्पनेचं जरासंही समर्थन केलं नाही. पुनर्जन्म त्याने साफ नाकारला. हे अडीच हजार वर्षांपूर्वीचं महाधाडस, पण ते त्याने केलं आणि निभावलंही. पुनर्जन्म एकदा नाकारला की जातिसंस्थेचा आधारच जातो. खालच्या जातीने बंड करू नये म्हणून सांगायचं, ‘तू मागच्या जन्मी पाप केलं म्हणून हे भोग तुझ्या नशिबी आले.'

अश्वलायन नावाच्या ब्राह्मणासोबतचा बुद्धाचा संवाद फार मार्मिक आहे. भिन्नवर्णीय लग्नसंबंधाबद्दल त्यांची चर्चा चालली होती. बुद्ध म्हणतो, ‘ब्राह्मणाच्या ब्राह्मण्या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करत नाहीत काय? त्या बाळंत होऊनच मुलाला जन्म देतात ना? अश्वलायना, समज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी संभोग केला तर काय जन्माला येईल? चतुष्पाद प्राणी की मनुष्यप्राणी?' यावर अश्वलायन गप्पच बसला असणार!

अश्वलायन गप्पच बसला असणार!

अहंकार, राग, क्रोध यावर बुद्धाने भर दिला आहे. त्यांच्यामुळेच जगातली बहुतेक दु:खं, प्रश्न निर्माण होतात. ‌‘वैर वैराला जन्म देतं. वैराला प्रतिसाद अवैराने द्या,' असं तो म्हणतो. बुद्धाचं एक वाक्य आहे, ‘आपण सारे मिळून राहू, सुसंवाद करू आणि एकमेकांना समजून घेऊ.' जग या वाटेने गेलं असतं तर? एवढा सूडाचा इतिहास समोर असून माणसं परत परत त्याच चुका का करतात? हा आंधळेपणा कधी जाणार?

या आंधळेपणावरून त्याचं एक वाक्य आठवलं- ‌‘मनुष्यजात ही अंधारात आंधळ्याने दाखवलेल्या वाटेने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे.' या वाक्याने मी तर चक्रावलोच. ही बुद्धाची प्रतिभा.

युद्ध, स्पर्धेतून काय निष्पन्न होतं? तो म्हणतो, ‘जय वैराला जन्म देतो, पराभव झालेला दुःखाने कोसळतो.' म्हणजे दोन्हीकडे काय निष्पन्न होतं? तर अनिष्टच. मैत्रभाव महत्त्वाचा. तो म्हणतो, ‘मैत्रीचा आरंभ स्वतःपासून करावा. नंतर प्रियजनांवर, त्यानंतर मध्यस्थांवर आणि नंतर शत्रूवर.. सर्व प्राणिमात्रांवर निस्सीम प्रेम करावं.' किती छान, पायरीपायरीने जायला सांगितलंय त्याने.

हे जो करत नाही त्याचं जीवन कसं असतं? तो म्हणतो, ‘जो जागत राहतो त्याला रात्र लांब वाटते, थकलेल्याला अंतर लांब वाटतं आणि संदर्भ न जाणणाऱ्यांचा संसार संपत नाही. जीवनात चुकीच्या रस्त्याने जाणाऱ्यांची वाट संपतच नाही. जीवनात वरवरलेपण राहतं. समाधान मिळत नाही.

क्रोधाविषयी त्याने लिहिलंय- ‌‘जळता विस्तव हातात घेऊन जो दुसऱ्यांकडे भिरकवायला जातो, त्याचाच हात जळतो.' क्रोधामुळे आपलंच नुकसान होतं, पण ते कळत नाही. त्याचं एक वाक्य कसं गोळीबंद आहे पाहा : ‌‘रागाबद्दल तुम्हाला कुणी शिक्षा करणार नाही, तुमचा रागच तुम्हाला शिक्षा करेल.‌‘ ‌‘संतुट्टी परमं धनं'-म्हणजे ‌‘संतोष हे परमधन आहे', जे आज आपण हरवून बसलोय. कबीर म्हणतो, ‘जब आया संतोषधन, सब धन धुरी समान.' बुद्ध आणि कबीर या दोघांत ठायी ठायी असं साम्य आहे.

बुद्धाचं एक वाक्य : ‌‘तुमच्या जीवनाचा हेतू, म्हणजे तुमच्या जीवनाचा हेतू शोधणं आणि त्यामागे जाणं होय.' जगण्याविषयी किती छोट्या वाक्यात किती मोठं काही सांगून जातो तो. आपल्याला वेदना झाल्या की जीव कळवळवतो. बुद्ध म्हणतो, ‘वेदना होणारच. व्याकुळ किती व्हायचं ते आपल्या हातात असतं.' अरे, ही तर आधुनिक आर.ई.बी.टी. (रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हियर थेरपी- विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती). आमचा आनंद नाडकर्णी त्याचं ट्रेनिंग घेतो. त्याला म्हणालो, “अरे, बुद्धाने आर.ई.बी.टी. सांगितलीय.” तो म्हणाला, “अल्बर्ट एलिसने (या थेरपीचा जनक) बुद्धाचा अभ्यास केला होता.” म्हणजे बुद्ध आजही, अडीच हजार वर्षांनीही भरभरून देतोच आहे. सुनंदाला रेडिएशननंतर कायम तळहातांना आणि तळपायांना वेदना व्हायच्या, रात्रंदिवस; पण चेहऱ्यावर कायम स्मित. पेशंटशी हसून बोलणार, चौकशी करणार, त्यांचे प्रश्न समजावून घेणार. तिचं हे वागणं बघून कळतं, की ती बुद्धाच्या या शिकवणीप्रमाणे जगली. दुःख आपल्या हातात नाही, पण दुःखावरची प्रतिक्रिया आपल्या हातात असते. त्यामुळेच ती केमोथेरपीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसन्न चेहऱ्याने मुक्तांगणात हजर असे.

हेही वाचा - विपश्यना एक आत्मानुभूती

बुद्ध म्हणतो. ‌‘खडक आणि पाण्याच्या वाहत्या प्रवाहाच्या संघर्षात पाणीच जिंकतं. सामर्थ्यामुळे नाही, तर सातत्यामुळे. सुनंदाने पेशंट्ससाठी केलेल्या अविरत श्रमांनी पेशंट मित्रांच्या मनातला नशेच्या आकर्षणाचा खडक कधी फुटायचा ते कळायचंही नाही. ती स्वतःच्या अनुभवातून शिकत राहिली, वाट चालत राहिली. बुद्ध म्हणायचा, ‘सुखाची वाट शोधायला तुम्हाला वाट झालं पाहिजे'. तशी सुनंदा ही एक वाटच होती.

बुद्धामध्ये आणि इतर धर्मसंस्थापकांमध्ये, धर्मधुरीणांमध्ये खूप फरक आहे. गीतेत कृष्ण म्हणतो, ‘हे जग मी निर्माण केले. मी हे चालवतो आणि मीच विनाश करतो.' बुद्ध तसा काही दावा करत नाही. त्याचं वाक्य असं आहे, की ‌‘सब्बे संसारा अनिच्चा'. बदल हाच निसर्गाचा नियम आहे. तो म्हणतो, ‘कारणातून वस्तू निर्माण होतात आणि ज्या कारणाने त्या निर्माण होतात त्याच कारणाने त्या नष्ट होतात.'

ख्रिस्त आणि मोहम्मद यांना प्रेषित मानलं जातं. पण बायबलमधल्या किती संकल्पना पुढे विज्ञानाने खोडून काढल्या. बुद्धाच्या बाबतीत तसं झालं नाही. बुद्ध म्हणतो, ‘या जीवनचक्राचा निर्माता कुठलाही देव नाही. घटना घडत असतात त्या कार्यकारणभावामुळे'. आधुनिक विज्ञानाचा हाच तर पाया आहे. कार्यकारण हा शब्द त्या काळात अशा रीतीने वापरणं, हे बुद्धाचं शहाणपण.

पहिला जीव कसा निर्माण झाला हे शास्त्रज्ञांना कळलेलं नाही, पण जीव निर्माण झाल्यावर पुढे गुंतागुंतीचं शरीर असलेल्या प्राण्यांपर्यंत उत्क्रांती कशी झाली ते माणसाने शोधलंय. शिवाय जे माहीत नाही त्याचा शोध जगभर चालू आहे. कधी तरी शोध लागेल हा विश्वास आहे. हा विश्वास माणसाला विज्ञानाने दिला. त्यामागची कार्यकारणभावाची संकल्पना बुद्ध सांगतो आहे. तिथे नेमकेपण आहे, फापटपसारा नाही. तो प्रयोग करत नाही, पण पुढे येणाऱ्या प्रयोगाची बैठक तयार करतो आहे.

बुद्धाने आपलं वलय निर्माण केलं नाही. त्यामुळे त्याला कोणतेही चमत्कार चिकटले नाहीत. आपल्या अंगात काही तरी अद्भुत शक्ती आहे, असं त्याने कधीही म्हटलं नाही. तो एक साधा, सामान्य माणूस म्हणून जगला. एकदा एका स्त्रीचं मूल गेलं. ती शोकविव्हल होऊन बुद्धाकडे आली आणि ‌‘मुलाला जिवंत कर' म्हणू लागली. बुद्ध म्हणाला, ‘तू अशा घरी जाऊन चिमूटभर मोहरी आण, की त्या घरात आधी कुणी मेलेलं नसलं पाहिजे. ती स्त्री गावातली चार घरं हिंडली; पण ज्या घरात आतापर्यंत मृत्यू झाला नाही असं घर तिला सापडलं नाही तेव्हा तिला भान आलं, की मृत्यू ही न चुकणारी गोष्ट आहे. ती नंतर बुद्धाची शिष्या बनली.

बुद्धाने तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार केला नाही. भिख्खू नवीन जागी जाऊन बुद्धमार्गाची माहिती द्यायचे. ज्यांना पटेल ते ते धर्म स्वीकारायचे. एकदा एकजण बुद्धाजवळ बसला. त्याची सगळी शिकवण त्याला पटली. तो म्हणाला, “आता मी बौद्ध धर्म स्वीकारतो.” बुद्ध म्हणाला, “कसं वागायचं ते ठरवलं आहेस ना? मग धर्म स्वीकारायची गरजच काय?”

एक शिष्य बुद्धाला म्हणाला, “मी तिकडे जाऊन धर्मप्रसार करतो.”

बुद्ध म्हणाला, “ते लोक फार वाईट आहेत. ते तुझी निंदा करतील.”

“एवढंच ना? अंगावर हात तर टाकणार नाहीत ना? मग ते लोक चांगलेच आहेत.”

“ते मारतीलही.”

“काठीने तर मारणार नाहीत ना? म्हणजे ते लोक चांगलेच आहेत.”

“ते तुला ठारही करू शकतील.”

“बरं झालं. वार्धक्यातून सुटका होईल. ते लोक चांगलेच आहेत.”

बुद्ध हसून म्हणाला, “जा. तू आता जाण्यायोग्य झालेला आहेस.”

आपण आता ज्याला ‌‘पॉझिटिव्ह थिंकिंग' म्हणतो त्याची ही अडीच हजार वर्षांपूर्वीची कमाल आहे. माझी मुलगी मुक्ता पेशंटमित्रांचा ‌‘तरी बरं' हा ग्रुप घेते. स्वतःचे अनुभव सांगते. मित्रांना हा ग्रुप आवडतो. आता हे वाचताना वाटतंय, हा ‌‘तरी बरं'चा पूर्वजच!

पुढे बुद्धानंतर बौद्धांमध्ये ‌'हीनयान' आणि ‌‘महायान' असे पंथ निर्माण झाले. ज्या मूर्तिपूजेला बुद्धाचा सक्त विरोध होता त्याच्या (कुणाच्या नसतील इतक्या) भव्य मूर्ती कोरल्या गेल्या. पण तरी काही उरलंच. या धर्मीयांनी धर्मासाठी हिंसा केली नाही. त्यांनी अन्य धर्मीयांचा द्वेष केल्याचं ऐकिवात नाही, दंगलीही केल्याचं ऐकिवात नाही.

मी माझं प्रेम बुद्धावर केंद्रित केलं आहे. माझा बुद्ध जीवनाशी निगडित आहे. तो निर्मळ आहे. मनातली जळमटं काढणारा आहे. आपली वाट शोधायला आपल्यालाच उद्युक्त करणारा आहे. आणि प्रकाश? अर्थात आपला आपणच.

अत्त दीप भव!

(अनिल अवचट यांच्या समकालीन प्रकाशित ‘जवळचे' या पुस्तकातून साभार)

अनिल अवचट







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results